हरिश्चंद्रगड भाग ३

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in भटकंती
6 Jan 2017 - 2:17 pm

हरिश्चंद्रगड भाग १

हरिश्चंद्रगड भाग २

सात नंतर एकेकाचे डोळे उघडायला लागले. आणि पुन्हा रात्रीच्या त्या दोन अनाहूत पाहुण्यांचा विषय सुरु झाला, तरी बरे ते पाहुणचार घेण्यासाठी थांबले नव्हते. मग पुन्हा शेकोटीभोवती जमा झाले सगळे. लगबग हा शब्द आमच्या ग्रुपला माहित नाही, स्थळ काळाचे भान विसरून त्यांची मस्ती चालू असते. आपल्याला घरी जायचे आहे आणि त्याआधी भांडारदऱ्याला बोटिंग साठी फिरायचे आहे हे त्यांना पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला लागले तेव्हा कुठे एक एकाने फ्रेश व्हायचे मनावर घ्यायला सुरुवात केली. तोपर्यंत ‘तत्पर’ असलेल्या वसंतने सकाळसाठी पाण्याची सोय केली होती(व्यवस्थापनाच्या बाबतीत मला वसंतचा खूप आधार असतो). स्वत:पुरते वसंताने आणखी एक ‘जुगाड’ केले होते, एका झोपडीवजा हॉटेलमध्ये बादलीभर गरम पाण्यासाठी बोलून स्वत:च्या अंघोळीची व्यवस्था केली. सावज हेरणे त्याच्या कडूनच शिकावे कोणीही हे त्याने पुन्हा सिद्ध केले होते. सगळे फ्रेश झाल्यावर मस्त चहाचं आंधण ठेवलं चुलीवर. राजूरच्या बाजारातून आलं घेतलं होतं(बिना आल्याचा चहा आमच्या भगिनी आणि सौ च्या घश्याखाली उतरत नाही म्हणून आलं घेण्याची हि योजना म्हणजे त्यांच्या ‘दूरदृष्टीचा’ प्रताप होता) ते घातलं ठेचून आणि वसंताने पुन्हा आपला स्वभाव गुण दाखवला, काल कोकण कड्यावरून परतताना कड्याजवळ असलेल्या एक लिंबूसदृश्य झाडाची तीन चार पानं त्याने तोडली होती. या आधीच्या आमच्या गडाला दिलेल्या भेटीत आम्ही त्या झाडाची पानं चहात घातली होती हे त्याला आठवण होते आणि त्याने पुन्हा सगळ्यांच्या नकळत ती काल तोडून घेतली होती. बाकी कोणाला कोणाला याची उकल झाली नाही लगेच पण मी आणि मनीष त्याच्या पुढे नतमस्तक झालो. अशी अजब रसायने घातलेला तो काढा वजा चहा तयार झाला एकदाचा. हरिश्चंद्रगदावाराच्या थंडीत तो चहा म्हणजे ‘अमृताहुनी गोड’ वाटू लागला होता. शाळेत असताना शिकलेल्या ‘पाड्यावरचा चहा’ या धड्याची आठवण मधेच कुणीतरी काढत, मधेच बिस्कीटांवरून भांडत चहापान उरकले आणि रात्रीचा उरलेला खिचडीभात गरम करून फस्त केला.

गडावरचा चहा.
Tea
खरंतर सकाळसाठी अखिल जगतातील भटक्यांचे आवडते खाद्य म्हणजेच मॅगी घेतले होते पण एवढा खिचडीभात फेकून देणे काही मला योग्य वाटले नाही आणि तो न फेकण्याचा निर्णय आम्ही घेतला.
आता आवरा आवर केली आणि हरीश्चन्द्रेश्वराच्या मंदिरात गेलो(खिचडीभात न खाता वसंत आमच्या आधी इथे येऊन पूजेत व्यग्र होता हे सांगणे नलगे.) आधी पोटोबा मग विठोबा हि म्हण शब्दशः सार्थ ठरवत आम्ही दर्शन घेतले. वसंताने सगळ्यांना प्रसाद वाटला.

हरिश्चंद्रेश्वर मंदिर.
Harischandreshwar Temple

शिवलिंग
Shiv Ling

मग मंदिराच्या उजव्या बाजूला खाली असलेल्या लेण्यांमधील शिवलिंगाचे दर्शन घेतले. मी मुद्दामच एक गोष्ट केली होती. सगळीच ठिकाणे एकामागे एक न दाखवता आधी लेणी, मग कोकण कडा आणि आता सकाळी मंदिर आणि लेण्यातलं शिवलिंग असं एक एक ठिकाण ग्रुप ला दाखवलं त्यामुळे सगळे हरखून गेले होते.

आता परतीला निघताना खरोखरच सगळ्यांची पावले जड होत होती. मला तर ते खास जड जाते, अगदी गडाला दिलेल्या पहिल्या भेटीपासून मी या गडाच्या प्रेमात पडलोय म्हणून तर मागच्या वर्षी जेव्हा नयन आणि विशाल भाऊने हे जाहीर केले कि ती हरिश्चंद्रगडची शेवटची ट्रेक आहे तेव्हाच मी मनाशी ठरवले होते कि भले नवा ग्रुप बनवू किंवा एकटे येऊ पण इथे येत राहू.

उतरताना जास्त वेळ लागला नाही. भराभर उतरून पायथ्याशी आलो. उन वाढत होतं. थोडा वेळ बसून बॅग्स भरल्या आणि निघालो. पाचनई सोडून थोडेच पुढे गेलो नाही तर दोन राजूर येण्याआधीच दोन म्हातारे पायी निघाले होते. त्यांनी हात केला तर मनीषने गाडी थांबवली, तशाही गाडीत दोन जागा रिकाम्याच होत्या. डोक्यावर गांधीटोपी, पंधरा सदरा आणि पांढरे धोतर असा पारंपारिक गावरान पोशाख, पायांत काहीच नाही चढ उतार आणि बोचऱ्या खडीने भरलेल्या रस्त्यावरून हे दोघे असे पायीच चालले होते. सासरी गेलेल्या मुलीला आणि नातवंडांना भेटून आल्याचे समाधान चेहऱ्यावर दिसत होते. गाडीत बसल्यावरही त्यांनी भरपूर गप्पा मारल्या म्हणे, आणि आमचे मावळेही इतके रंगून गेले गप्पांमध्ये कि त्यांना त्यांच्या इच्छित स्थानाच्या १००-२०० मीटर्स पुढे आणून सोडले. हसत हसतच दोघे अजोबा उतरले, आमच्या गाड्यांकडे बघत दोन्ही हात वर करून आशीर्वाद देत ‘सावकाश जा पोरांनो’ म्हणत त्यांच्या वाटेला माघारी फिरले, आम्हाला कायमची शिदोरी देऊन. या भागात अजूनही प्राथमिक सोयी सुविधांची वानवाच आहे. खासगी प्रवासी ने-आण करणाऱ्या जीपच्या कॅरीअर्स वर सुद्धा माणसे चढलेली असतात.

travel

एस.टी. बसेसही मोजक्याच नजरेस पडतात.
रस्त्यात एक मोठा ओढा लागला तिथे गाड्या थांबवल्या. त्या नितळ पाण्यात पोहण्याचा मोह आवरणे म्हणजे अशक्य वाटत होत. भंडारदऱ्याच्या तलावक्षेत्रात पोहण्याला परवानगी आहे कि नाही हे माहित नव्हते त्यामुळे इथेच मनसोक्त डुंबून घेतले आणि निघालो.आता सरळ राजूरला जाऊन पेट्रोल भरून तडक निघालो.
थोड्याच वेळात भांडारदऱ्याला पोचलो. भांडारदऱ्याचा विस्तीर्ण जलाशय नजरेत मावत नव्हता. पाण्याच्या किनाऱ्याशीच थोडे भटकलो आणि एक छानशी बोट भाड्याने घेऊन बोटिंग करण्यासाठी निघालो. सगळे भराभर बोटीत चढले. आणि पाण्यावर भलंमोठं शेपूट मिरवत बोट निघाली. पुन्हा एकदा कल्ला सुरु झाला सगळ्यांचा. मग बोटिंग करता करता सगळ्यांनी सांगोपांग फोटोशूट करून घेतलं. चांगले अर्धातास आजुबाजूच्या गड-किल्ले-शिखरांची माहिती देत नावाड्याने छानशी सफर घडवली आणि बोट परतून किनाऱ्याला लावली.
bhandardara

bhandardara

bhandardara

bhandardara

bhandardara

आतापर्यंत साडेतीन वाजले होते आणि सगळ्यांना भुका लागल्या होत्या आणि कुठल्याही हॉटेलात थांबून जेवण करणे म्हणजे मलातरी खूप वेळखाऊ प्रकरण वाटत होते. आत्तापर्यंत सगळं काही वेळेनुसार चाललं होतं तरी मला घाई झाली होती कारण सोन्याला आजच परतून लांज्याला जायचं होतं. तसे लांज्याला न्यायचे सामान व कपडे वगैरे त्याने घरून निघतानाच आणले होते पण रत्नागिरीसाठी गाडी ठाण्यावरून होती त्याची. म्हणजे आम्हाला त्याला कसारा अथवा खर्डी रेल्वे स्थानकात सोडणे क्रमप्राप्त होते आणि तेही कसारा ते मुंबई दरम्यान अत्यंत कमी असणाऱ्या लोकल रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक ध्यानात घेऊन.
हो-नाही करत भांडारदऱ्यालाच मिसळ पाव ओरपण्याचा बेत झाला व एका लहानश्या खानावळ वजा हॉटेलात ठाण मांडले सगळ्यांनी. मालाकानीही तत्परतेने घाई करत झणझणीत मिसळ दिली आणि आम्ही तुटून पडलो. पोट(आणि मनही) भरेस्तोवर मिसळ खाल्यानंतर कटिंग चाय घेता घेता हॉटेल मालकांचे आभार मनात निघालो. आता लवकरात लवकर खर्डी रेल्वे स्थानक गाठायचे होते.
घाई घाईत खर्डी रेल्वेस्थानकात घुसलो तर गाडीची वेळ झाली होती. सुदैवाने तिकीट खिडकीत गर्दी नव्हती. त्याचं तिकीट काढलं आणि थोड्याच वेळात गाडी आलीही. सगळं समान घेतलं आहे याची खात्री केली आणि सोन्याला निरोप दिला.
आता घाई करण्याचं काही विशेष कारण नव्हतं. संध्याकाळचे सात वाजले होते. थंडी लागत होती आणि अंधारही बऱ्यापैकी पडला होता. मग मानिशालाही आरामात गाडी चालवायला सांगितली आणि शांतपणे निघालो घराकडे.
कुडूसला आलो, आपापले समान घेतले आणि सगळे निघालो एकमेकाचा निरोप घेऊन. पुढची एक दिवसाची ट्रेक लोहगड आणि रात्रीच्या वस्तीची ट्रेक राजमाची किंवा राजगड करायची या निश्चयाने.

समाप्त.

आम्ही घेतलेली काळजी:
सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेवर निघणे जे बऱ्याचदा जमत नाही. सुरवात वेळेवर झाल्यामुळे पुढचं वेळापत्रक बिघडलं नाही आणि आरामात जास्त थकवा न जाणवत चढता आले.
ग्रुप मध्ये काहीजण नवे आहेत हे ध्यानात घेऊन तुलनेने सोपी वाट निवडली.
बरोबर नेलेली प्लास्टिकची पाण्याची एकूण एक बाटली परत घरी आणली(आणि 'काचेच्या' बाटल्या घेणारं कोणी नव्हतही ग्रुपमध्ये).
जेवणासाठी पात्रंही कागदी घेतली प्लास्टिक ऐवजी, जेणेकरून जाळल्यास प्रदूषण जास्त होणार नाही आणि जाळली नाही तरी ती कुजून जातील.
उगीच धांगडधिंगा नाही, निसर्गाशी खेळ तर अजिबात नाही.

मित्राच्या कॅमेराची भिंगं पिरगाळून केलेले काही प्रयोग:
flower

flower

flower

flower

swimm

माझा ब्लॉग: kalpeshgawale.blogsopt.in

प्रतिक्रिया

तीनही भाग एका दमात वाचून काढले. फोटो आणि वर्णन दोनीही सुरेख.

श्रीधर's picture

6 Jan 2017 - 3:57 pm | श्रीधर

फोटो आणि वर्णन खूप छान..

काल कोकण कड्यावरून परतताना कड्याजवळ असलेल्या एक लिंबूसदृश्य झाडाची तीन चार पानं त्याने तोडली होती. या आधीच्या आमच्या गडाला दिलेल्या भेटीत आम्ही त्या झाडाची पानं चहात घातली होती हे त्याला आठवण होते आणि त्याने पुन्हा सगळ्यांच्या नकळत ती काल तोडून घेतली होती. बाकी कोणाला कोणाला याची उकल झाली नाही लगेच पण मी आणि मनीष त्याच्या पुढे नतमस्तक झालो. अशी अजब रसायने घातलेला तो काढा वजा चहा तयार झाला एकदाचा.

असे अनोळखी वनस्पती आणि फळांच्या वाटेला जाऊ नये. "दात हातात आले नाहीत" हे नशीब समजा.

इरसाल कार्टं's picture

6 Jan 2017 - 8:36 pm | इरसाल कार्टं

या झाडाबद्दल दोन वर्षांपासून माहिती आहे आम्हाला आणि स्थानिकांकरवी आम्हीही खात्री करून घेतली होती,

छान जमले तिन्ही भाग.
पुलेशु.

पाटीलभाऊ's picture

6 Jan 2017 - 5:43 pm | पाटीलभाऊ

मस्त झालेत तीनही भाग.

प्रभू-प्रसाद's picture

8 Jan 2017 - 1:32 pm | प्रभू-प्रसाद

बरोबर नेलेली प्लास्टिकची पाण्याची एकूण एक बाटली परत घरी आणली(आणि 'काचेच्या' बाटल्या घेणारं कोणी नव्हतही ग्रुपमध्ये).
हे अगदीच छान !

फोटो आणि वर्णन दोन्हीही झकास.

संदीप डांगे's picture

8 Jan 2017 - 3:23 pm | संदीप डांगे

व्वा! आवडलं. तुमचं लिखाण फार प्रामाणिक आणि पारदर्शी आहे.