कर्वेनगरात

दाह's picture
दाह in जनातलं, मनातलं
2 Jan 2017 - 4:02 pm

जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम.
बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात.
स्वागत म्हणून की काय कोण जाणे , स्वारगेटवर उतरताच जो बदाबदा पाउस कोसळायला लागला थांबायचं नावंच घेईना. तसाच अखंड भिजलेल्या अवस्थेत कसाबसा आधीच ठरवून ठेवलेल्या रूमवर पोहोचलो. नव्या पेठेत. आता केवळ वरवर पाहून गडबडीत ठरवलेली खोली ही मी आणि माझ्या एका मित्राने. महिना ६००० रुपये एका खोलीचे. बर त्यात विशेष असं काहीच नव्हतं. एक साधी खोली विथ संडास-बाथरूम. पंखा पण नव्हता. पाण्याची बोंबाबोंब आणि वरून मालकीण आणि तिच्या सासूची सतत कटकट आणि सूचना. इतर कुणाला यायची बंदी. इतक्या छोट्या खोलीचे ६००० कशासाठी घेतात हे न कळल्याने एकदा मालकाला विचारलं तर तो ख्यक करून हसून म्हणाला, ”पैसे खोलीचे नाहीत जागेचे आहेत. इट्स इन हार्ट ऑफ द सिटी.” आयला म्हणजे असं पण काही असतं का ? आम्ही आपली वडणगे बुद्रुकच्या पल्याडपण न गेलेली माणसं. आम्हाला हे (तेव्हा) नवीन होतं. असो.
महिन्याभरात या कटकटीला वैतागलो. नाही म्हणायला मालकाची मुलगी अगदी छान होती. पण तिने पण मला डायरेक्ट ‘अभिदादा’ बनवून टाकल्यामुळे प्रश्नच मिटला. मित्रपण “सोडून जाऊ” म्हणत कुरकुरायला लागला. मग म्हटलं आता बघूच दुसरी जागा. पुन्हा शोधाशोध सुरु केली.
यावेळी जरा चांगलीच बघू असं ठरवलं. आणखी एका मित्रालाही रूम पार्टनर होण्यासाठी तयार केलं आणि मग तिघांनीही मोहीम हातात घेतली. राहायला चांगला , आमच्या क्लासपासून तसा टप्प्यात आणि खिशाला परवडणारा एरिया कुठला याची चौकशी केल्यावर कोथरूड, कात्रज आणि कर्वेनगर असे तीन पर्याय मिळाले. क्लास एफसी रोडवर असल्यामुळे कात्रज कट करून टाकला. आता कोथरूड की कर्वेनगर असा प्रश्न असताना ब्रोकरने आम्हाला कर्वेनगरात कमिन्स कॉलेजजवळ एक फ्लॅट असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर साहेबांनी जीभ बाहेर काढून आणि हाताने “रापचिक” टाईप ची खूण करून तो एरिया म्हणजे जन्नत आहे आणि सगळी मुले तिथेच खोली घेऊन राहण्यासाठी धडपडतात हे ही आवर्जून सांगितलं.
आता ही जन्नत का असावी याचा अंदाज मला आलेला कारण कमिन्स हे एक मुलींचं अभियांत्रिकी कॉलेज आहे हे अगोदरपासून माहिती होतं. पण प्रत्यक्षात बघितल्यावर मात्र खात्रीच पटली. पूर्ण कर्वेनगरात मुलीच मुली. हातात पुस्तकं, drafter, जर्नल घेऊन इकडेतिकडे फिरणाऱ्या, एकदम स्टायलिश आणि हायफाय, फाडफाड इंग्रजी झाडणाऱ्या, आणि जवळजवळ सगळ्याच सुंदर. म्हणजे दिसेल ती मुलगी चांगलीच दिसायला. असं कसं शक्य आहे ? पण तसंच होतं. माझा एक मित्र तर लईच एक्साईट झाला. सगळ्यांनी ठरवून टाकलं आता इथेच राहायचं. शाहू कॉलनी, कर्वेनगर.पुणे-५२.
इथला मालकही तसा खडूसच. एक नंबरचा कंजूष. हा राहायचा सदाशिव पेठेत. बऱ्याचदा न सांगता धाड टाकायचा. सतत फोन करून पिडायचा. भाडे द्यायला एक दिवसही उशीर झाला तरी याचे फोन सुरु व्हायचे. पण घर मात्र छान हवेशीर होते.
बाकी कर्वेनगरातलं वातावरणच एकदम जबरदस्त होतं.सर्वत्र गर्द झाडी. शाहू कॉलनीच्या ११ छोट्या छोट्या गल्ल्या आणि त्या गल्ल्यांमध्ये घरांबरोबरच (किंवा घरातच ) भरमसाट मुलींची वसतिगृहं. जिथे तिथे सायबर कॅफे , मेस आणि कॅन्टीन्स.संध्याकाळी तर एकदम मॅजिकल. जिथेतिथे उत्साह , इकडेतिकडे (अक्षरश:)बागडणाऱ्या मुली , जागोजागी मुलामुलींनी सदा भरलेली छोटी कॅन्टीन्स. मुलींबरोबरच मुलंपण भरपूर. एका चौकात सगळी पोरं आपापल्या गाड्या लावून चहा किंवा ज्यूस पीत येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे पाहत बसलेली असायची. अर्थात आम्हीपण त्याचा हिस्सा होतोच. पण पाहण्यापलीकडं काही जमलं नाही. इतकी मुलं इथं येऊन का राहतात हा प्रश्न नेहमी पडायचा. पण एकदा माझ्या एका मित्राच्या मित्राने ‘कर्वेनगर म्हणजे स्ट्रगलर बॅचलर पोरांचा एक अड्डा आहे’ असं म्हटल्यावर याचं उत्तर मिळून गेलं. नोकरीसाठी आमचा स्ट्रगल अजूनही सुरूच होता. तिथे राहणारी इतरही बरीच पोरं नोकरीच्या शोधात असलेलीच असायची. रोज कर्वेनगरात कॅन्टीन , मेसमध्ये दिसणारे काही चेहरे कंपनीत मुलाखातीवेळीपण दिसायचे. जवळजवळ सगळेच इंजिनियर. जॉब शोधणारे. लवकर मिळावा म्हणून ढीगभर कोर्स करत बसणारे, छोट्या शहरांमधून आलेले. आमचे समदु:खी. संध्याकाळी मात्र सगळे एकदम उत्साहात चौकात गप्पा झाडत, पोरी बघत थांबायचे. भले त्या भाव का न देईनात. काही पोरांशी अशाच ओळखीही झाल्या. पुढचा ऑफ-कॅंपस कधी, कुठे आहे याची चर्चा करता करता हळूच सर्वांच्या नजरा पोरींच्या चकचकीत वॅक्सिंग केलेल्या पायांकडे कधी वळायच्या हे कळायचंही नाही.
मर्सिडीज, बीएमडब्ल्यू घेऊन कॉलेजला येणाऱ्या पोरी पाहिल्या की खूप अप्रूप वाटायचं. मुलींना सिगारेट ओढताना पहिल्यांदा मी तिथेच बघितलं. जिकडेतिकडे पोरीच पोरी. एकापेक्षा एक भारी. पण ढुंकूनही पाहायच्या नाहीत. आधीच आम्ही दिसायला महादेखणे. आमच्याकडे गावातल्या पोरी बघायच्या नाहीत तर या कसल्या बघतायत. पूर्ण दोन वर्षांत फक्त एकदाच एक मुलगी माझ्याशी बोलली. काय? तर एकदा कॅन्टीनमध्ये माझ्याशेजारी एक ज्यादा खुर्ची होती ती घेऊ का असं मला तिने विचारलं. बस.
पण आयला यांचं एक कळायचं नाही. संध्याकाळी जेव्हा आम्ही चौकात थांबायचो , त्यावेळी बऱ्याचजणी एकतर सतत फोनवर असायच्या. नाहीतर १५० सीसी बाईकवर आपल्या स्टायलिश बॉयफ्रेंडच्या मागे बसून इकडून तिकडे फिरत असायच्या अथवा त्यांच्याशी बोलत, हसत-खिदळत थांबायच्या. आता हे मुलींचं कॉलेज. यांना बॉयफ्रेंड(किंवा मित्र म्हणा) मिळतात कसे हेच कळायचं नाही. बर हे सगळे बॉय लोकपण एकदम झ्याकप्याक असायचे. आम्हा स्ट्रगलरांना उगाचच आम्ही ‘जो जीता वही सिकंदर’ मधल्या मॉडेल कॉलेजचे असल्यासारखं वाटायचं(आमीर खान पण नाही, त्याचे मित्र). आम्ही सगळे आशाळभूतपणे तो सोहळा पाहत राहायचो. बऱ्याचदा वाटायचं ट्राय मारावा एखादा पण हिम्मत कधीच नाही झाली. सगळ्या आउट ऑफ रेंज वाटायच्या.नाही, होत्याच. नंतरनंतर तर उगाचच स्वत:बद्दल न्यूनगंड यायला लागला कारण नसताना.
माझा मित्र काहीही करून एक मुलगी पटवायचीच असं खूळ घेऊन बसलेला. त्याने असा अंदाज काढला की इथे कॅन्टीनमधले काही लोक मुलामुलींना भेटवून वा नंबर देऊन-घेऊन मॅचमेकिंग करत असावेत. झालं. खात्रीसाठी त्यानं एकदा (आम्ही शेजारी उभारलेलो) एका कॅन्टीनवाल्याला डायरेक्ट “ भैया इधर लडकी कैसे पटाते है?” असं विचारलं. हे ऐकून तो माणूस “मुझे क्यूं पूछते हो? मुझे नाही मालूम” असं म्हणत जो खेकसला आणि अशा विचित्र नजरेनं त्यान पाहिलं की विचारूच नका. तेव्हापासून आम्ही तो दिसताच इकडेतिकडे पाहू लागलो.
तो एरियाच असा होता की तिथे राहता राहता आपणही आपला गबाळा अवतार सोडून थोडं छान-छान राहायला-वागायला हवं या भावनेनं मला झपाटलं. मित्राच्या देखरेखीखाली माझ्यासाठी कपड्यांची खास खरेदीही झाली. जरा त्यातल्या त्यात बऱ्या अवतारात मी वावरू लागलो. चार पोरी माझ्याकडे बघतील अशी (अवास्तव)अपेक्षा ठेवू लागलो. या सगळ्या मुलींपैकी निदान एकतरी माझी गर्लफ्रेंड असावी , निदान मैत्रीण तरी असावी असं वाटायचं. पण छे हो, असं काहीच नाही झालं. माझा रिलेशनशिप स्टेटस काही बदलला नाही. आम्हा मित्रांपैकी कुणाचाच नाही बदलला. इकडे जॉबसाठी धडपड सुरु होतीच अजूनही. एकाला मिळालेला. पण आम्ही दोघे अजूनही धडपडत होतो. मला आयटी मधलीच नोकरी हवी होती. पण मिळत नव्हती.
एव्हाना कर्वेनगरात येऊन दीड वर्षे उलटून गेलेली. बरेच चेहरे सतत चौकात पाहून पाहून ओळखीचे झालेले. काही पोरं, हॉटेल-मेस-कॅन्टीनवाले, दुकानदार, चहावाले सगळेच. कर्वेनगर अगदी सोडू नये असं वाटायचं. वेगळंच जग ते आमच्यासाठी. कमिन्सच्या आजूबाजूला फिरणारं. तिथे कंटाळाच नाही यायचा कधी. पण नंतर हळू हळू यायला लागला. का कुणास ठाऊक पण मन विटलं या सगळ्याला. आपण उगाचच काही तरी होऊ घातलेला बनतोय असं वाटायला लागलं. आधी पोरींना बघून भिरभिरणारे डोळे आता सरळरेषी झाले. पण काही झालं तरी जागा सोडण्याची इच्छा होत नव्हती. पण सोडावी लागली. सोडली.
२ वर्षे पुण्यात राहूनही नोकरी न मिळाल्यानं नाईलाजानं मी गावातल्या MIDC मध्येच जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि मे २०१२ मध्ये मी पुणे सोडलं. पुन्हा गावी निघालो. जणू कर्वेनगरानं, पुण्यानं मला “तू इथला नव्हतासंच, निघ आता.” असा इशारा दिलेला. निघालो.
मित्रांचा निरोप घेऊन , भरलेल्या बॅगा घेऊन निघताना डोळ्यात पाणी नाही आलं पण येईल का काय अशी भीती वाटण्याइतपत परिस्थिती नक्कीच होती. कर्वेनगर सोडलं. पुणेही. ते सुटलं ते कायमचंच.
माझं आयटीचं स्वप्न मात्र तसंच राहिलं. आता कर्वेनगरमधल्या या दोन वर्षांनी मला काय दिलं, काय नाही दिलं हे समजण्याच्या फंदात मला पडायचं नाही. पण एक प्रश्न आहेच. अजूनही तिथे अशीच मुलं असतील का? माझ्यासारखी. माझ्या मित्रांसारखी. पास झाल्यानंतर एखादा जावा , डॉटनेट वगैरेचा कोर्स करत नोकरी शोधणारी. हिंजवडीच्या, मगरपट्ट्याच्या खेपा मारणारी. रूमवर आल्यावर संध्याकाळचा टाईमपास म्हणून चहा मारता मारता चौकात पोरी बघत थांबलेली. यातली एखादी आपल्याला कटली तर किती भारी होईल ना!! अशी स्वत:ला कल्पनेत कुरवाळणारी. सकाळी घरातून बाहेर पडताना चांगल्या पॅकेजच्या जॉबचे आणि संध्याकाळी गर्लफ्रेंडचे अशी दोन-दोन स्वप्ने पाहणारी. आणि तरीही त्या जगाच्या खिजगणतीतही नसणारी.
असतील बहुतेक. असोत. कर्वेनगर अजूनही माझ्या मनातून जात नाही हे मात्र नक्की.

राहती जागाअनुभव

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

2 Jan 2017 - 4:08 pm | महासंग्राम

कर्वेनगर... वाह जियो शेठ लैच भार जुने दिवस आठवले.

अजया's picture

2 Jan 2017 - 5:11 pm | अजया

मस्त लेख. आवडला.
प्रत्येकाचे जागा शोधण्याचे आराखडे वेगळे! नुकतीच पुणे फ्लॅट शोध मोहीम कोथरुडात संपवली. तेव्हा एजंटने हा एरिआ लांबुनच दाखवून सगळा बॅचलर पोरापोरींचा भाग, लै लफडी असं सांगुन इथे अजिबात फ्लॅट घेऊ नका असा फुकट सल्ला पण दिलेला !

तुषार काळभोर's picture

2 Jan 2017 - 5:49 pm | तुषार काळभोर

एजंट तोच एरिया बॅचलरांना दाखवेल ," सगळा बॅचलर लोकांचा सुंदर एरिया! शांत, अभ्यासासाठी उत्तम! वगैरे.. "

अगदी!! एजंट नामक दुतोंडे लोक काय वर्णावे.

खिक

एस's picture

4 Jan 2017 - 10:56 pm | एस

अच्छा, म्हणजे पुणे फ्लॅट शोध मोहीम शेवटी विदर्भात संपली की तुमची. आयुर्वेद रसशाळा गावाच्या बाहेर वाटायची किती. पूर्वीचं पुणं राहिलं नाही ;-)

वेल्लाभट's picture

2 Jan 2017 - 6:14 pm | वेल्लाभट

मस्त लेख ! सुरेख.

पद्मावति's picture

2 Jan 2017 - 6:59 pm | पद्मावति

छान लिहिलंय.

पगला गजोधर's picture

2 Jan 2017 - 7:21 pm | पगला गजोधर

:)

रेवती's picture

2 Jan 2017 - 7:48 pm | रेवती

लेखन आवडले.

सतिश गावडे's picture

2 Jan 2017 - 7:54 pm | सतिश गावडे

2010 साली पुण्यात आयटीमध्ये जॉब मिळाला नाही? ते ही दोन वर्षे प्रयत्न करुन?

अभिजीत अवलिया's picture

2 Jan 2017 - 8:38 pm | अभिजीत अवलिया

हाच प्रश्न मला पडला. लेख चांगला आहे.

अभिजीत अवलिया's picture

2 Jan 2017 - 8:38 pm | अभिजीत अवलिया

हाच प्रश्न मला पडला. लेख चांगला आहे.

फेदरवेट साहेब's picture

2 Jan 2017 - 8:49 pm | फेदरवेट साहेब

सन, तेनला केटी लागली असली म्हंजी? साला आपुन बी केटी अन वायडी झाला होता, हॅरीऍट वॅट पॉलीटेक्निक मदी एडिंबरोच्या, मंग आपुन लै स्ट्रगल केला, इव्हन ग्लासगोच्या डॉक मंदी हमाली बी केली, तेचानंतर आपुन एका शिप मंदी बसून इंडिया मदी पळून आला, बेनसन अँड जानसन मदी धोंडू जोसीचा बॉस पण झाला.

प्रत्येकजन पर्फेक्त नसते सन, काय काय लोक टाट्या , बाबुराव ने सुब्रह्मण्यम , कुलकर्णी बनते म्हणून तर टॅलेंटेड पोरेलोकाला , स्टँड आऊट होयाला एक क्राऊड भेटते नी! रेमेम्बर, लाईफ इज सफरींग इट्स लाइक स्कोरिंग ४० मार्क्स इन युवर एम ५ जस्ट बिफोर योर एनएफटीइ अटेम्पट.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2017 - 8:03 am | अत्रुप्त आत्मा

या लेखाचे णाव बदलून ट्यास फुलांच्या बागेतले दिवस , अशे णाव ड्यावे अशी आंम्ही विणम्र विणंती क्रुण ल्येख आवडल्याचे शांगत आमचे घरंगळत आलेले शबुद संपवतो. ढण्यवाड.

रातराणी's picture

3 Jan 2017 - 11:34 am | रातराणी

:)

सस्नेह's picture

3 Jan 2017 - 12:19 pm | सस्नेह

लेखन आवडले. पु. ले. शु.

मराठी कथालेखक's picture

3 Jan 2017 - 1:00 pm | मराठी कथालेखक

नोकरी, गाडी नसल्याने पोरगी पटली नाहीतर निदान परिस्थितीला दोष देता येतो.
नोकरी, पैसा, गाडी ई सर्व असूनही पटत नसेल तर मात्र जास्तच न्यूनगंड जाणवू लागतो (स्वानुभव) :)

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2017 - 1:27 pm | टवाळ कार्टा

यातले काही नसेल आणि बोलाबच्चनगिरी करता येत असेल तर पोरगी पटायचे चान्सेस जास्त असतात

मराठी कथालेखक's picture

3 Jan 2017 - 1:40 pm | मराठी कथालेखक

आणि व्यक्तीमत्व प्रभावी पाहिजे, उंची वगैरे..
झालंच तर काहीतरी चित्र-विचित्र (उटपटांग) गोष्टी करणार्‍या मुलांच्या अवतीभोवतीही बर्‍यापैकी मुली गोळा होतात असं निरिक्षण आहे

सिरुसेरि's picture

3 Jan 2017 - 11:09 pm | सिरुसेरि

प्रामाणीक लेखन आवडले . या सर्व त्रासदायक काळात तुमचे पालक खंबीर राहिले याबद्दल त्यांचेही कौतुक आहे .

लाडू's picture

4 Jan 2017 - 3:31 pm | लाडू

छान लिहिलेय!
कर्वेनगर अजून तसेच आहे :)
लफडी वाढली आहेत, नवीन generation मधल्या पोरी अजून फटाकड्या झाल्या आहेत...
मुख्य म्हणजे इथे राहणे सोयीचे वाटते त्यामुले जागांचे रेट्स खूपच वाढले आहेत.

छान लेख , ते वयच तसे असते.

पाटीलभाऊ's picture

5 Jan 2017 - 3:02 pm | पाटीलभाऊ

सुदर लेखन

मन१'s picture

9 Jan 2017 - 9:20 pm | मन१

जवळपास ह्याच काळात मीही कर्वेनगरात रहात होतो. आणि जवळपास तोच वयोगट. अलिकडच्या काही वर्षातलाच काळ. धाग्यामुळे ते दिवस आठवले.