गहू - ओट्स - बदाम कूकीज

रुपी's picture
रुपी in पाककृती
25 Dec 2016 - 12:55 am

c1

ख्रिसमसनिमित्त शेजारीपाजारी, कार्यालयात सगळेजण केक, ब्रेड, कूकीज असं काय-काय बेक करण्याच्या मागे लागतात. "फराळाचं काय काय बनवून झालं?"च्या सुरात एकमेकांना 'काय काय बेक करुन झालं?' असे प्रश्न विचारात नाहीत एवढंच! दर वर्षी आमच्या शेजारच्या आजी आणि इतर शेजारी त्यांनी स्वतः घरी बेक केलेले पदार्थ आम्हांला देतात. हे सगळं कमीच की काय म्हणून या वर्षी कार्यालयात बेकींगची स्पर्धाही होती. अस्मादिकांनी भाग घेतला. "हेल्दी कूकीज" म्हणून कौतुक झालं, पण "हेल्दी-बिल्दी"ला काही ब्राऊनी पॉइंट्स नव्हते आणि काही पाकृ जबरदस्त होत्या त्यामुळे नंबर अर्थातच आला नाही. मात्र लोकांनी एकमेकांना सांगून सगळे कूकीज फस्त केले. रिलीज झाल्यावर सुरुवातीला सिनेमा चालला नाही, आणि नंतर "माऊथ-पब्लिसिटी"ने लोकांच्या उड्या पडाव्यात तसंच झालं.

काल पुन्हा एकदा बनवले आणि फोटोही काढले.. तुम्हीही बनवून बघा मातृत्व कूकीज क्र. २ :)

साहित्य:
१ कप गव्हाचे पीठ,
१/३ कप ओट्स,
१/२ कप बटर,
६ टे.स्पून पीठीसाखर,
३ टे.स्पून बदामाचे तुकडे/ काप,
१/२ टी.स्पून सोडा,
१/२ टी.स्पून बेकींग पावडर,
१/२ टी.स्पून व्हॅनिला इसेन्स,
चवीपुरते मीठ (ऐच्छिक)

कृती:
बटर फ्रीजमधून बाहेर काढून मऊ होईपर्यंत ठेवा.
एका भांड्यात बटर आणि साखर चांगली फेटून एकत्र करुन घ्या. (मी केरी-गोल्ड बटर आणि पावडर गोल्डन ब्राऊन शुगर घेतली).
ओट्स मिक्सरमध्ये भरडसर करुन घ्या.
गव्हाचे पीठ, ओट्स, सोडा, बेकींग पावडर, मीठ एकत्र करुन घ्या (माझ्या बटरमध्ये मीठ होते त्यामुळे मी आणखी घातले नाही).
हे सर्व बटर आणि साखरेच्या मिश्रणात घाला.
व्हॅनिला इसेन्स आणि बदामाचे तुकडे घाला आणि एकत्र करुन घ्या, फार जास्त वेळ एकत्र करु नका.
मिश्रण पातळ होता कामा नये, फक्त हातावर घेऊन साधारण आकार देता येईल असेच पाहिजे.
ओव्हन ३५० फॅ. ला प्रिहीट करुन घ्या, बेकींग ट्रेला बटर पेपर लावून घ्या.
मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून तळव्यांमध्ये दाबून बिस्कीटचा आकार देऊन बेकींग ट्रेवर ठेवा. या मिश्रणात साधारण २५ कूकीज होतील.
सर्व बिस्कीटे झाल्यावर ओव्हनमध्ये १५-१७ मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा. तोपर्यंत घरभर कूकीजचा सुवास दरवळायला लागेल.
बाहेर काढून ५ मिनिटांनी जाळीवर थंड होण्यासाठी ठेवा.

c2

कूकीज खाण्यासाठी तयार आहेत. उरलेले बिस्कीट्स हवाबंद डब्यात भरुन ठेवा.

c3

प्रतिक्रिया

कैवल्यसिंह's picture

25 Dec 2016 - 2:48 am | कैवल्यसिंह

मस्त दिसतायत कुकीज... पन...

आमच्या घरी ओवन नाही.... तर गॅसवर करता येतील का ह्या कुकीज? कश्या करायच्या?

बरखा's picture

26 Dec 2016 - 2:55 pm | बरखा

आमच्या घरी ओवन नाही.... तर गॅसवर करता येतील का ह्या कुकीज? कश्या करायच्या?

हो.. गॅसवर तवा आणि त्यावर परातीत/ ताटात कूकीज ठेवून आणि त्यावर झाकण ठेवून करता येतील. जमत असेल तर तव्यावर वाळू घालून मग परात ठेवा. शक्यतो मंद/ मध्यम आचेवर ठेवा, किती वेळ हे मात्र नक्की नाही सांगता येणार. अधून मधून झाकण काढून बघावे लागेल.

कैवल्यसिंह's picture

26 Dec 2016 - 11:37 pm | कैवल्यसिंह

वाळू उपलब्ध नस्ल्यावर तव्यावर मीठ टाकुन त्यावर प्रात/भांडे ठेवल तर चालतय काय?

मीठ वापरण्याबद्दल मला माहीत नाही. वाळू उपलब्ध नसेल तर तुम्ही अशीच तव्यावर परात ठेवून बघा. माझी आई थोडे वेगळ्या प्रकारचे कूकीज तसे बनवते, तिच्याकडे ओव्हन नाही. परात फार लवकर तापणार नाही असे बघा, नाहीतर कूकीज खालून जळून जातील आणि वरती कच्चे राहतील.

पैसा's picture

25 Dec 2016 - 9:37 am | पैसा

फार मस्त आहेत!

पद्मावति's picture

25 Dec 2016 - 4:23 pm | पद्मावति

मस्तच.

त्रिवेणी's picture

25 Dec 2016 - 5:06 pm | त्रिवेणी

कुकीज मस्त.पण इतक हेल्दी खायची सवय नै.

अजया's picture

25 Dec 2016 - 5:56 pm | अजया

मस्त!

स्मिता चौगुले's picture

26 Dec 2016 - 10:10 am | स्मिता चौगुले

मस्त!

जागु's picture

26 Dec 2016 - 1:31 pm | जागु

छानच.

पूर्वाविवेक's picture

26 Dec 2016 - 4:02 pm | पूर्वाविवेक

पौष्टिक आणि मस्त

दिपक.कुवेत's picture

4 Jan 2017 - 7:06 pm | दिपक.कुवेत

पण वेळखाउ वाटत आहे....

वेळखाऊ नाहीये.. फार पटकन होतात.. जो काही वेळ लागला तो बटर रुम-टेंपरेचरला आणायलाच :)

मस्त फोटू. करायलाच हव्यात एकदा!