सद्गुरू आणि स्मोकिंग!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
14 Dec 2016 - 5:46 pm

(Disclaimer- खालील लेख वाचण्यापूर्वी जे लोक शंकर महाराजांचे किंवा अन्य कोणत्याही महाराजांचे निस्सीम वगैरे उपासक आहेत त्यांनी तो वाचू नये किंवा आपल्या जबाबदारीवर वाचवा. भावना वगैरे दुखावल्यास अस्मादिक जबाबदार नाहीत.)

हे फेसबुक, whats app, वगैरे सोशल नेट्वर्किंग च्या चलती मुळे आमची आणि आमच्या सारख्या सश्रद्ध लोकांची पुण्यार्जनाची भलतीच सोय होऊन राहिली आहे. (तुम्ही लगेच अंधश्रद्धाळू म्हणून हिणवाल आम्हाला पण मृत्यू नंतर रौरव नरकातल्या तेलात तळून निघताना कळेल तुम्हाला, आम्ही तेव्हा स्वर्गात सोमरस on the rocks घेताना अप्सरांचा कॅबरे बघत असणार...)म्हणजे बघाना कुठल्या कुठल्या देवाचे नाहीतर बाबा, बुवा, माता भगीन्यांचे फोटू पाहायला मिळतात. ते जास्तीजास्त लोकान्ना शेअर करायची “देवाज्ञा” असते, नाही केले तर “४२ पिढ्यांचे तळपट होईल”, “धंद्यात खोट येईल”, अशी इशारा वजा (धमकी नाही बरं) प्रेमळ सूचना असते. आम्ही तर बाबा असे पुण्य कमवायची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे आमच्या पुण्याचा निधी हल्ली हल्ली अगदी ओसंडून वाहू लागला आहे. आताशा सरकारने जशी ५००, १००० ची नोट बंद करून अनेक पुण्य(!)वान लोकांची गोची केली, तशी काही तरी देवाज्ञा/ आकाशवाणी(‘मन कि बात’ नव्हे ...तुम्ही पण ना!) करून आमची गोची त्या जगण्नियन्त्याने आणि त्याच्या ह्या भूतलावराच्या एजंटांनी करु नये हि कळकळीची विनंती.
आम्ही राहतो तेथे म्हणजे, सातारा रोड, पद्मावती इथे एक सद्गुरू शंकर महाराज मठ आहे. हि एका महान साधुपुरुषाची समाधी आहे. हे शंकर महाराज मोठे सिद्ध पुरुष होते बरका.आम्ही त्यांचे महान भक्त. पण आमच्या पत्नीच्या मते, आम्ही त्यांचे भक्त बनायचे खरे कारण म्हणजे महाराज स्वत: सिगारेट ओढत असत, इतकी की आज ते गेल्यावरही लोक त्यांच्या मठात सिगारेटी लावतात. उदबत्ती सारख्या, प्रसाद म्हणून, आणि आम्हाला लग्नाआधी सिगारेट ओढायची फार सवय पण लग्नानंतर बायकोने सिगारेट ओढण्यावर बंधने घातली आणि मग आम्ही मठात जाऊन तेथे एकाच वेळी पेटलेल्या शेकडो सिगारेटीच्या धुपात श्वास घेऊ लागलो.सिगारेटचे पैसे हि वाचले आणि बायकोचे शापही. असो तर ह्या शंकर महाराजांनी म्हणे अवतार घेतला तो १८०० साली कधीतरी आणि समाधी घेतली १९४७ साली. चांगले १५० वर्षे वगैरे जगले महाराज... आहात कुठे!. बर समाधी घेऊन असे सिद्ध पुरुष स्वस्थ का बसतात? अधून मधून भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी, येऊ घातलेल्या संकटाची आगाऊ सूचना देण्यासाठी ते पुन्हा पुन्हा धरतीवर येताच असतात. काय म्हणालात एखादा मेसेज किंवा स्टेटस अपडेट का नाही टाकत? केली ना नास्तीकांसारखी शंका उपस्थित? अहो हि दैवी माणसं, त्यांच्या लीला अगाध त्यांना फार डिवचू नये, श्रद्धा ठेवावी आणि आमचा विश्वास आहे बर का, आमच्या भावना दुखावल्या तर महाराज आम्हाला तुमचे डोके फोडायची बुद्धी देतील आणि नंतर रौरवातली उकळत्या तेलाची कढई आहेच. विसरु नका.
तर झाले असे कि नुकताच एक विडीयो आमच्या पाहण्यात आला. ज्यात महाराजांची एक छोटी मूर्ती होती.( आम्ही लगेच भक्तिभावाने हात जोडले-त्यामुळे फोन पडला पण फुटला नाही, महाराजांची कृपा!) त्यातले सद्गृहस्थ सांगत होते कि एक माणूस त्यांच्या कडे काही पैसे मागण्यासाठी आला. आता हे काही त्याला ओळखत नव्हते, पण तो माणूस म्हणाला माझ्याकडे हि सद्गुरूंची मूर्ती आहे, ती मी तुमच्या कडे ठेवतो त्याबदल्यात मला पैसे द्या मी नंतर पैसे फेडून मूर्ती घेऊन जाईल. आता हे पडले स्वामी भक्त(सॉरी सॉरी, सद्गुरू भक्त, स्वामी शब्दाचे कॉपीराईट सध्या अक्कलकोटी आहेत.) आमच्या एका नास्तिक मित्राने अक्कलकोट म्हणजे माणसाच्या अकलेला जिथे कोट(भिंती/ तटबंदी) पडतात ती जागा असे आम्हाला सांगितले. त्याची जागा नरकात कुठे मुक्रर केली आहे ते वर सांगितलेच आहे.) त्यांनी लगेच पैसे काढून दिले. काही दिवसांनी हे सद्गृहस्थ घरात काही काम करत असताना अचानक त्यांना सिगरेटचा वास आला. (अहो खरे सांगतो, आम्हालाही लग्नानंतर, म्हणजे घरात सिगरेट-बंदी झाल्यानंतर अचानक असा वास येतो आणि गुरु माउलींची हाक आली असे ओळखून आम्ही लगेच मठात धावतो बरं...असो) आता ह्या गृहस्थांच्या घरात कोणी धुम्रपान करीत नाही, आजूबाजूला कोणी करते का? जवळपास एखादी पानटपरी आहेका / असले अश्रद्ध प्रश्न विचाराल तर आमच्या श्रद्धा दुखावतील आणि मग तुम्हाला माहिती आहेच. मग त्यांनी सद्गुरू आज्ञा ओळखून एक सिगारेट आणली आणि पेटवून महाराजांच्या मूर्तीच्या तोंडाला लावली तर काय आश्चर्य ती सिगारेट त्या मूर्तीच्या तोंडाला चिकटली आणि संपूर्ण राख होई पर्यंत तिथेच तशी चिकटून राहिली.
अहाहा! हा प्रसंग आम्ही पुन:पुन्हा पहिला. पाहताना आमचे अष्टसात्विक भाव उफाळून आले. अंगावर उन्मनी अवस्थेतल्या योग्याप्रमाणे रोमांच उभे राहिले. महाराज आजही आम्हा भक्तांना निरनिराळ्या प्रकारे दर्शन देत असतात. आजूबाजूला इतके दैन्य, रोगराई, दुष्काळ, उपासमारी, अज्ञान असताना त्याचे निवारण करण्याच्या कामातून सवड काढून आम्हा पामराच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महाराज असे मूर्तीत येऊन सिगारेट ओढतात. महाsssराssssज! धन्य आहाततुम्ही. तुमच्यासारखे गुरु आम्हाला भेटले हे आमचे अहोभाग्य. वाड वडलांची पुण्याई फळाला आली.( बायकोने विचारले ,”ते सगळे ठीक आहे. पण ते पैसे उधार घेतले होते त्या माणसाने? ते परत केले कि नाही? आणि असे किती उधार पैसे घेतले होते, मूर्ती तारण ठेवून? ” अश्रद्ध आहे आमची बायको, तिची पण जागा ....काही नाही, काही नाही!)
--आदित्य

वावरविचार

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

14 Dec 2016 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले

अच्चा अचं जालं तल !

उगी उगी हं !

ह्या धाग्यातील लेखनाला तरी संदर्भ आहेत की हाही असाच ऐकीव माहीतीवर झंगडपकड आलीलहर केलाकहर म्हणुन धागा पाडलाय ?

=))))

संजय क्षीरसागर's picture

14 Dec 2016 - 6:02 pm | संजय क्षीरसागर

माझ्या पहाण्यातले शंकर महाराजांचे भक्त सुद्धा सिग्रेटचा वास किंवा कुठेसं पडलेलं जळकं थोटूक यावर महत्त्वाचे निर्णय घेतात.

आदित्य कोरडे's picture

14 Dec 2016 - 6:05 pm | आदित्य कोरडे

विडिओ खरोखर आलाय ...फिरत फिरत तुमच्यापर्यंत हि येईल कदाचित...

संजय क्षीरसागर's picture

14 Dec 2016 - 6:08 pm | संजय क्षीरसागर

.

आदित्य कोरडे's picture

14 Dec 2016 - 6:52 pm | आदित्य कोरडे

माहित नाही कसा टाकायचा ते. शिवाय मी तो उडवला केला आहे पण ग्रुप मधल्या दुसर्याकडून घेता येईल मला कदाचित...

प्रसाद गोडबोले's picture

14 Dec 2016 - 6:09 pm | प्रसाद गोडबोले

म्हणजे विडीयो पाहुन धागा लिहिलाय तर !

भारीच की ! तुम्ही म्हणजे एकदम टर्बोरावांना टशन देणार तर !

बाकी तुमचा नंबर देवुन ठेवा , आम्हालाही व्हॉट्सॅप्प वर भारी भारी व्हिडीयो येत असततात, तुम्हाला फॉरवर्ड करत जाऊ , धागा पाडायला तेवढेच कच्चे मट्रियल

=))))

प्रचेतस's picture

14 Dec 2016 - 6:20 pm | प्रचेतस

हा मठ मी स्वतः पाहिलाय.
येथे खरंच शंकर महाराजांना सिगारेटी अर्पण करतात. जशी देवळाच्या आसपास हारफुलांची दुकाने असतात तशी मठाच्या आसपास फुलांबरोबर सिगारेटीही ठेवलेल्या असतात.

प्रसाद गोडबोले's picture

14 Dec 2016 - 6:43 pm | प्रसाद गोडबोले

मग तुम्ही लेख लिहा ना गडे !!

आदित्य कोरडे's picture

14 Dec 2016 - 6:50 pm | आदित्य कोरडे

७२७६०९७०८२

आदित्य कोरडे's picture

24 Dec 2016 - 9:01 am | आदित्य कोरडे

7276097082

एस's picture

14 Dec 2016 - 5:53 pm | एस

:-)

पण मृत्यू नंतर रौरव नरकातल्या तेलात तळून निघताना कळेल तुम्हाला, आम्ही तेव्हा स्वर्गात सोमरस on the rocks घेताना अप्सरांचा कॅबरे बघत असणार...

हा हा हा __/\__

असंका's picture

14 Dec 2016 - 6:37 pm | असंका

बोचरा विनोद.दुर्दैवी.

तिथे चरणामृत म्हणून दारु देतात. च्यामारी कोणाच्या मंदिरात चखणा देतात? आपण तिथे आजन्म सेवा करायला तयार आहोत.

उज्जैनच्या कालभैरवाला देखील दारूचा नैवेद्य असतो.

आनंदयात्री's picture

14 Dec 2016 - 8:05 pm | आनंदयात्री

उत्तम. पण बोकोबांना चखण्यासाठी राजस्थानात जावे लागेल .. करणी माता मंदिरात !!

प्रचेतस's picture

14 Dec 2016 - 8:20 pm | प्रचेतस

लोल =))

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 8:25 pm | संदीप डांगे

जबरा प्रतिसाद!!! लोल च लोल!

बोका-ए-आझम's picture

15 Dec 2016 - 1:44 am | बोका-ए-आझम

यात्रीभौ, चखणा हवाय हो. जेवण नकोय! ;)