उतारा (कथा)

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in जनातलं, मनातलं
3 Dec 2016 - 5:07 am

"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले"

प्रकाश परत तेच म्हणत होता.

"अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले.

"सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला.

सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता.

आम्ही दोन दिवस फार्महाउस वर नव्हतो, तेव्हाच दागिने गायब झाले होते. कपाटात दागिन्यांचा डबा नाही ही गोष्ट ज्योतीच्या लक्षात आली. आमच्या लग्नात ज्योतीच्या आजीनेच तो डबा ज्योतीला दिला होता. ज्योती कधीतरीच तो डबा उघडायची. तो डबा कुठे ठेवला आहे हे मला माहीत नव्हते आणि मी ही कधी विचारले नाही.

पण त्या दिवशी आम्ही दोघ घरी आलो, ज्योती ने कपाट उघडले, खूप शोधा, शोध केली, पण तिला डबा सापडला नाही पण बाकीचे काही चोरीला गेले नव्हते.

मी लगेच प्रकाशला फोन केला, प्रकाश माझ्या फार्म हाऊसचा केअर टेकर होता. फार्म हाऊसच्या जवळ राहायचा.मी प्रकाशला सरळ विचारले, पण तो सूर्यावरच आरोप करत होता, शेवटी मी पोलिसांकडे जायचा निर्णय घेतला.

"सर, पोलिसात जाऊ नका" प्रकाश कळवळून म्हटला.
"अरे मग दागिने कसे मिळणार?" मी विचारले.

ज्योती रडत होती, मला तिच्या रडण्याचा कंटाळा आला होता, पण तसे तिला सांगता ही येत नव्हते. माझा व्यवसाय ही चांगला चालू होता. कष्टांना यश मिळाले होते. मी कामातून सुट्टी घेतली होती. या सुट्टीत मला फार्महाउस वर येऊन आराम करायचा होता, पण आता अराम होईल असे काही वाटत नव्हते.

"सूर्यकांतनेच दागिने चोरले आहेत" प्रकाश एकदम म्हटला.

मी शांत पणे उठलो, बाहेर जायला लागलो, तेवढ्यात प्रकाश खालच्या आवाजात म्हणाला "मला त्यानेच सांगितले"
"अरे पण तो तुला का सांगेन?" मला आश्चर्य वाटले.
"कारण त्यानेच मला कपाटाची डुप्लिकेट चावी बनवायला सांगितली होती"
मला यातले काही खरे वाटत नव्हते.

"मी त्याला समजावले पण तो मला बळजबरीने उताऱ्याला घेऊन गेला" प्रकाश एका दमात बोलून गेला.

ज्योती ने चमकून त्याचाकडे बघितले.
"उतारा? काय?" मी विचारले.

"सर, गावात एक उतारा आहे तिथे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते."

मी हसलो. "ए बाबा, काय पण नको सांगू, जा सूर्यकांतला शोधून आण"
"माझा ही त्यावर विश्वास नव्हता, सूर्यकांतच घेऊन गेला होता" प्रकाश म्हटला.
"तिकडे काय आहे" मला आता याचा कंटाळा आला होता.
"सर, एक जागा आहे त्याला वरदान मिळाले आहे"
"जागेला वरदान? बेस्ट!" मी कुत्सित पणे विचारले.
"तिथे जायचे, तिथे एक खुर्ची आहे, त्या खुर्चीत बसून आपल्या मनातला प्रश्न विचारायचा आणि वाट बघायची"
"आणि मग उत्तर मिळते? चांगली आयडिया आहे"
प्रकाशने होकार अर्थी मान डोलावली.

"पण मग दागिने कुठे आहेत हे कळेल का?" मी विचारले.
"नाही सर, असे नाही विचारता येत, असा प्रश्न विचारायचा ज्याचे उत्तर हो किंवा नाही असेल"
"पण मग तुम्ही काय विचारले?" मी कुतूहलाने विचारले.

"आम्ही दोघे ही गेलो होतो, माझे पैसे ही सूर्यकांत ने भरले होते"
"किती पैसे? कोणाला द्यायचे?" मला आता बरेच प्रश्न पडत होते.
"पाचशे रुपये एका प्रश्नाचे"
"मी आत जाऊन तीन ते चार प्रश्न विचारेन, मग?" मी लगेच प्रकाशला प्रश्न केला.
"नाही सर, एवढा वेळ नाही मिळत. पाच मिनिटच्या आत बाहेर यावे लागते"
"ही आयडिया कोणाची?"
"उतारकरच्या मालकीची जागा आहे, तो तिथेच असतो, त्यालाच पैसे द्यायचे"

"अरे यार, तुम्ही वेडे आहेत, कोणीही भोंदू येतो आणि तुम्हाला वेड्यात काढतो" मला या सगळ्याचा वैताग आला होता. ज्योतीचे रडणे ही अजून थांबले नव्हते. आपण काहीतरी करायला पाहिजे नाहीतर ही बाई नंतर आपले डोके खाईल याची मला पूर्ण कल्पना आली होती.

"मी फक्त काय असते ते बघायला गेलो होतो" सूर्यकांत चेहरा ही रडवलेला झाला होता.
"तिकडे जाऊन काय केले" मी विचारले.
"आम्ही दोघांनी एकच प्रश्न विचारला" प्रकाश थोडा घाबरत म्हणाला.
"कुठला प्रश्न?" मला त्याच्या घाबरण्याचे हसू आले.
"प्रश्न विचारला की, मी दागिन्यांची चोरी करू का?"
मला आता काही कळत नव्हते, "तुम्ही एकत्र प्रश्न विचारला? "

"एकत्र नाही, पहिल्यांदा सूर्या आतमध्ये गेला, तो बाहेर आला आणि मग मी आत मध्ये गेलो आणि तोच प्रश्न विचारला" प्रकाश म्हटला.

मला उभ राहण्याचा कंटाळा आला होता, मी सोफ्या जाऊन बसलो, प्रकाश जे काही बोलत होता त्यावर विचार केला आणि माझ्या मनात एक शंका आली.

"मग तुला काय उत्तर मिळाले" मी अजूनही विचारांच्या तंद्रीत होतो.

"मला नाही असेच उत्तर आले आणि..."
"आणि सूर्याला हो असे उत्तर मिळाले असणार?" मी प्रकाशचे वाक्य पूर्ण केले.
प्रकाश फक्त मान डोलावली.

मला हे सगळे विनोदी वाटत होते, " अरे, तुला काय माहीत त्याला 'हो' असे उत्तर मिळाले? त्याला 'नाही' असे उत्तर मिळाले असेल, तुझ्याशी तो खोटे बोलला असेल." मी ज्योती कडे बघत बोललो, तिचे रडणे थांबले होते, तिला ही या सगळ्याचे हसू येत होते.
यावर प्रकाशकडे काही उत्तर नव्हते, त्याला माझा मुद्दा पटला होता.

"ते असेल का आता उघडे?" मी प्रकाश ला विचारले.
आता? माहीत नाही, आता नसेल उघड" प्रकाशला तिकडे परत जायचे नव्हते.
"चल, जाऊन बघू, सूर्याला पण शोधू" मी ज्योतीला फार्महाउस वर थांबायला सांगितले. मी प्रकाशला घेऊन उताऱ्याकडे निघालो.

माझा अंदाज होता की उताऱ्याला कोणीही नसेल, पण तिथे दहा ते बारा लोंकाची रांग होती. एक वडाचे झाड होते, त्या खालीच एक जीर्ण, पडके घर होते, त्या पडक्या घरातच नव्याने बांधलेली एक खोली होती. खोलीच्या भिंतीवर उतारकर महाराजांचे एक मोठे चित्र होते, ते डोळे मिटून एका हाताने आशीर्वाद देत होते. प्रत्येक जण त्यांना नमस्कार करून आत जात होता. आत जाताना मोबाईल, चपला बाहेर काढत होता. मला काही ओळखीचे चेहरे ही दिसले. आम्ही रांगेच्या शेवटी जाऊन उभे राहीलो.

दोन मिनिटानंतर एक बाई रडत बाहेर आली, तिला बघून मला ज्योतीची आठवण झाली, ती सुद्धा इथे येऊन रडली असती.

रांगेतल्या पहिल्या माणसाने पाचशेची नोट तिथेच बसलेल्या माणसाकडे दिली, त्याची परत पावतीही घेतली. मला या सगळ्याचे आश्चर्य वाटत होते.

"आत काय आहे" मी प्रकाश ला विचारले.

"आत एक खुर्ची आहे, त्यावर बसून प्रश्न विचारायचा" प्रकाश ने खालच्या आवाजात सांगितले.

"उभा राहून प्रश्न नाही विचारता येत का" माझ्या या विनोदावर मी एकटाच हसलो. बाकीचे लोक माझ्या कडे बघायला लागले.

"मी काय विचारू" मी प्रकाश ला विचारले.
"सूर्याने दागिने चोरले आहेत का? असे विचारा" प्रकाश आत्मविश्वासाने म्हणाला.
प्रकाशचा प्रश्न मला पटला. तो पर्यंत आमचा नंबर आला होता.

"सर, तुमची हरकत नसेल तर मी पण एक प्रश्न विचारू" प्रकाश दीनवाण्या चेहऱ्याने म्हटला.
मी हसलो, "थांब आधी मी जाऊन येतो" मी ते लोखंडाचे दार उघडून आत गेलो.

खोली खूपच छोटी होती, अंधुक होती, नीट उभे ही राहता येत नव्हते, उंची जेमतेम सहा- सात फुटाची असेल खोलीच्या मधोमध एक अस्पष्ट अशी खुर्ची दिसली, मी खुर्चीत बसलो आणि प्रश्न विचारला.

"ज्योतीकडे दागिन्यांचा डबा खरच होता का?"

मी तो दागिन्यांचा डबा कधीच बघितला नव्हता, त्यात किती दागिने आहेत हे ही मला माहीत नव्हते. माझ्या आईने दिलेले दागिने मला माहीत होते, पण मग हिच्या आजीने दिलेले दागिने मी कधीच बघितले नव्हते.
मी प्रश्न विचारून दोन-तीन मिनटे तसाच बसून राहीलो, उत्तर कसे मिळते हे मला माहीत नव्हते. मी परत प्रश्न विचारला.

"दागिन्यांचा डबा होता का?"

काही उत्तर आले नाही. या अंधुक, दमट खोलीत अजून बसवत नव्हते. मी उठलो, जायला लागलो.

"दागिन्यांचा डबा कधीच नव्हता"

अचानक माझ्या मनात हे वाक्य आले, मी दचकलो, हा भास आहे का? असे परत वाटले. मी तसाच उभा राहिलो, त्या वाक्याची वाट बघत.

"दागिन्यांचा डबा कधीच नव्हता"

परत तेच वाक्य, तेच शब्द, त्याच गतीने मनात आले, मला ते जाणवले, हा भास नव्हता.हे खरे होते, उताऱ्याने उत्तर दिले होते. मी पुन्हा एकदा हसलो.

ती ने असे का केले, ती का खोटे बोलली? कदाचित तिचे कारण शुल्लक असेल अथवा मोठे ही असेल. पण मला ते परत कधी कळणार नव्हते.

मला पुढे काय घडणार याचा अंदाज आला होता, हा सगळा डाव ज्योतीचा असणार आणि सूर्यकांत, प्रकाश ने तिला यात साथ दिली असणार, मी पूर्णपणे फसलो होतो. मी परत स्वतःशीच हसलो. माझ्या सारख्या हुशार माणसाला फसवण्यासाठी एवढी मोठी योजना कोणी करेल असे कधी वाटले नव्हते पण ज्योतीला हे सहज जमले होते. उतारकार नावाचे कोणी महाराज आहे की ही नाही हे ही मला कधी कळणार नव्हते.

एकांदरीत या कटात किती लोक सामील असावीत असा मी विचार केला, पण आता त्याचा काय उपयोग? मी पद्धशीरपणे आत इथे अडकून मरणार होतो.

किती दिवस झाले असतील माहित नाही, वेळेचा काय थांगपत्ता नाही, पण ते दार कधी परत उघडले गेले नाही, दार वाजवले, हाका मारल्या आणि अजूनही हाका मारतोय पण ते दार परत कधीच उघडले गेले नाही.

आज बऱ्याच दिवसांनी मनात विचार आला, मी परत कसाबसा खुर्चीत बसलो आणि प्रश्न विचारला.

"मी इथून कधी बाहेर पडणार आहे का"

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

3 Dec 2016 - 6:25 am | अनन्त अवधुत

शेवट जबरी.

पिलीयन रायडर's picture

3 Dec 2016 - 6:42 am | पिलीयन रायडर

जबरदस्त हो!!! अजिबात शेवटाचा अंदाज आला नाही. ही कथा दिवाळी अंकात अगदी शोभली असती!

विनटूविन's picture

3 Dec 2016 - 4:00 pm | विनटूविन

अगदी!

क्या बात है! शेवटपर्यंत कळले नाही पुढे काय होणार आहे ते. जबरदस्त!

ज्योति अळवणी's picture

3 Dec 2016 - 1:28 pm | ज्योति अळवणी

ओह... अप्रतिम कल्पना. खूप आवडली गोष्ट

वरुण मोहिते's picture

3 Dec 2016 - 3:45 pm | वरुण मोहिते

जमली आहे

भम्पक's picture

3 Dec 2016 - 4:32 pm | भम्पक

खरेच शेवटपर्यंत रहस्यमयी....

पैसा's picture

3 Dec 2016 - 4:52 pm | पैसा

लै भारी कथा!

जव्हेरगंज's picture

3 Dec 2016 - 6:34 pm | जव्हेरगंज

अफलातून कथा!!!!

सस्नेह's picture

4 Dec 2016 - 10:12 am | सस्नेह

जबरी कथा !

पिशी अबोली's picture

4 Dec 2016 - 10:20 am | पिशी अबोली

जबरदस्त ट्विस्ट! अंदाजच येत नाही..

संदीप डांगे's picture

4 Dec 2016 - 10:31 am | संदीप डांगे

माय गॉड!!!! जबरदस्त कथा. आजकाल शॉर्टफिल्मसाठी उत्तम ताकदीच्या कथा येत आहेत मिपावर.

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2016 - 1:30 pm | टवाळ कार्टा

खत्रा

पद्मावति's picture

4 Dec 2016 - 3:11 pm | पद्मावति

जबरदस्त!

सिरुसेरि's picture

5 Dec 2016 - 10:23 am | सिरुसेरि

अप्रतिम रहस्यकथा

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2016 - 4:10 pm | मराठी कथालेखक

चांगली कथा

रातराणी's picture

5 Dec 2016 - 4:46 pm | रातराणी

जबरदस्त!

किसन शिंदे's picture

6 Dec 2016 - 6:02 pm | किसन शिंदे

जबरदस्त कथा !!

रंगासेठ's picture

6 Dec 2016 - 6:08 pm | रंगासेठ

जबरदस्त कथा, शेव्॑टला डायरेक्ट सिक्सरच!

अनुप ढेरे's picture

6 Dec 2016 - 6:15 pm | अनुप ढेरे

मस्तं!

बबन ताम्बे's picture

6 Dec 2016 - 6:18 pm | बबन ताम्बे

नोटबंदीच्या अनेक धाग्यांमधे अशा कथा म्हणजे गार झुळुक !!

मद्रकन्या's picture

9 Dec 2016 - 6:56 pm | मद्रकन्या

हॅट्स ऑफ!

तुषार काळभोर's picture

10 Dec 2016 - 6:05 am | तुषार काळभोर

एक नंबर कथा!!!

निर्धार's picture

12 Dec 2016 - 6:04 pm | निर्धार

एकच नंबर....

पुंबा's picture

24 Mar 2017 - 2:20 pm | पुंबा

एक नंबर.. 'गॉन गर्ल' सारखी वाटली अगदी.. :))

कपिलमुनी's picture

24 Mar 2017 - 5:28 pm | कपिलमुनी

९९ % रहस्य आधीच ओळखता येते पण इथे सपशेल शरणागती !
प्लॉट भारी आहे

प्राची अश्विनी's picture

25 Mar 2017 - 7:39 am | प्राची अश्विनी

जबरी!