आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २)

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
1 Dec 2016 - 8:57 pm

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २)
सीडीज आवरणे .. एकदम सोपे काम...
शात्रीय संगीत एका बाजूला , नाट्यसंगीत वेगळे . पुलं , वपु, शंकर पाटील यांच्या साठी एक वेगळा कोपरा
हिंदी गाणी खालच्या कप्प्यात.. त्यातही रफीसाहेबांसाठी वेगळा कोपरा. गझलस वेगळ्या बाजूला ... डोक्यात सगळं पक्क होत.. पटापट आवरू . दोन अडीचशे सीडीज आवरायला कितीसा वेळ लागतो ...
----------------------------------------------------------------------------------------२

धडाक्यात कामाला सुरवात केली. काही पत्ता चुकलेल्या सीडीजना योग्य पत्त्यावर पोचवले ... म्हणजे सीडी कव्हर एक आणि आत सीडी दुसरीच किंवा कव्हरच्या आत सीडीचं नाही ... मग त्या सीडीची शोधाशोध.

अशातच हाताला लागली ते रशिद खानची एक सीडी .. म्हणजे फक्त कव्हर .. परत शोधाशोध ... त्यातून ही माझी फार आवडती सीडी . पहिला ट्रॅक "जोग" आणि दुसरा "सोहोनी" ..
मुळात मी राशिदभाईंचा मी जबरदस्त पंखा ... अगदी १२-१३ वर्षांपूर्वी सवाई ला ऐकलं तेंव्हापासून ... काय यमन गायले होते , आणि त्यानंतर "याद पिया कि आये" बस हम तो फिदा हो गये. मग त्यानंतर पुण्यात कुठेही त्यांची महेफील आले तर आमची उपस्थिती ठरलेली. मग ते सी आर व्यास महोत्सवात असो किंवा दिवाळी पहाट असो ... "जग कर्तार हे तू ही " अजून कानात रुंजी घालताय. अरे रशीद भाईंची भैरव ची सीडी कुठे आहे?
अर्थात रशीद खान ला रशीद भाई म्हणण्याइतकी सलगी दाखवणं जरा अतीच होतंय ना ? पण तस पाहिलं तर भिमसेनजींना अण्णा म्हणणे किंवा अभिषेकींना बुवा .. आपलं तेवढं वय नाही आणि लायकी तर त्याहून नाही . पण एक रसिक म्हणून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा दुरूपयोग ...
पण ते जाऊ दे .. ही सोहोनी ची सीडी कुठे गेली ?
रशीद भाईंचा सोहोनी ऐकलं होता गणेश कला क्रिडाला ... काय महेफ़िल होती . आधी कौशिकीचे गाणे. कौशिकी चक्रवर्ती .. नवा तारा .. new sensation च म्हणाना . सौन्दर्य आणि सूर यांचा अनोखा संगम. मनमोकळं हसण , प्रसन्न मुद्रा आणि अजॉयजींच्या तालमीतला गाणं चमत्कृतीपुर्ण , सरगमचा भरपूर वापर असलेलं. त्यादिवशी बिहाग गायली .. क्काय जमुन गायलेय म्हणता ... गाणं संपलं पण बिहाग चे सूर तसेच रेंगाळत होते. सभागृह पूर्णपणे भरून गेले होते. त्यानंतर मंचावर आले राशिदभाई ... आता काय पेश करणार? मुख्य म्हणजे हे बिहागचे सूर कसे बाहेर घालवणार ? पहिल्यांदाच मला थोडी धाकधुक वाटू लागली . आणि रशीद भाईंनी सुरुवात केली "देख वेख मन ललचाए " .. सोहोनी... पाहता पहाता बिहागचे सूर पुसले गेले आणि सोहोनीचे अधिराज्य सुरु झाले .. आणि त्यानंतर अतिद्रुत तराणा .. म्हणजे या सगळ्यावर कळसच .........

अरे ती सीडी नुसती हातात घेऊन काय करतोयस .. आवर लवकर ... बायकोने समोर चहाचा कप ठेवत मला वर्तमानात आणले. न मागता चहा ... वा ..
आज चहात आलं घातलय वाटते ... पहिल्याच घोटाला मी पावती दिली ...

आज ? मग नेहेमी चहात काय असते? सौ... गत

जाऊदे ... चर्चा वाढवण्यात काही अर्थ नव्हता ... बाकी बाहेर थंडी असो व नसो, आलं घातलेला चहा भारीच लागतो ...

मी परत सीडीजच्या ढिगाऱ्याकडे वळलो. एकंदर परिस्थिती तासाभरापूर्वी पेक्षा जरा भीषणच होती .. कारण बऱ्याच सीडीज ड्रॉवर मधुन बाहेर पडुन इतस्थत: पसरल्या होत्या. पण Disruption is necessary for new creation हे आम्ही नुकतेच मोदीगुरुजींच्या नोटबंदीतुन शिकलो होतो. त्यामुळे या परिस्थितीतूनही मार्ग निघेल याची मला खात्री होती

हळुहळु शात्रीय संगीतावर ताबा मिळवत मी गझल्स कडे वळलो. हे मी सीडीज बद्दल बोलतोय गैरसमज नसावा ....
जगजीत, पंकज , गुलाम अली अशी वर्गवारी सुरु झाली. हो ... पंकज उधास सुद्धा.. खरे तर माझ्या गज़ल ऐकण्याची सुरवात पंकज उधास पासुनच झाली.

पंकज, जगजित, हरिहरन, गुलाम अली हे म्हणजे गझल ऐकण्याच्या तयारीचे प्रथमा, द्वितीया, प्राविण्य आणि अलंकारच आहेत. यापुढे ज्यांना मेहेंदी हसन आवडतो ते म्हणजे संगीतातले खरेखुरे जाणकार अथवा सवाईला कडक इस्त्रीचा झब्बा घालून जाणाऱ्यांपैकी.

या सगळ्यात ही मराठी सीडी कुठून आली ? नाव कैफियत असले म्हणून काय झाले ? गाणी मराठीतच आहेत. माधव भागवतांचा अल्बम.

माधव भागवत.... प्रत्यक्ष ऐकले फक्त एकदाच... मन परत भूतकाळात गेले

२००४ सलातील गोष्ट आहे.. भटसाहेबांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात गरवारे कॉलेजच्या सभागृहात एक कार्यक्रम झाला होता. भट साहेबांच्या काही आठवणी, काही रेकॉर्डिंग्स, काही गाणी असे करत करत हा कार्यक्रम शेवटाकडे आला होता. आणि अचानक घोषणा झाली.. सुरेश भट यांचे एक चहाते मुंबईहून आले आहेत व त्याना काही सादर करण्याची इच्छा आहे.. त्यानंतर श्री माधव भागवत (त्यांच्या पत्नीसह) मंचावर आले व त्यानी एक गझल सादर केली..
मनाप्रमणे जगावयाचे किती किती छान बेत होते..
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते

माधव भागवत यांना प्रत्यक्ष ऐकण्याची ही पहिली व शेवटची वेळ. पण त्यांचा आवाज व सादरीकरण... हे नाव मनात घर करून गेले. त्यानंतर त्यांना नक्षत्रांचे देणे मधे हीच गझल सादर करताना टीवी वर बघून जुनी आठवण ताजी झाली. नंतर म्यूज़िक बॅंक च्या दुकानात शोधाशोध करत असतांना अचानक "कैफियत" सापडली... अप्रतिम अल्बम.. नंतर बाकीचेही अल्बम ऐकले पण कैफ़ियतची सर नाही . काही काही गोष्टी जमून जातात.
उत्तम कविता, साजेशी चाल आणि सुरेल गायन ... आणि हो.. सचिन खेडेकर यांचे कवितेतून केलेले अप्रतिम निवेदनही ..
सचिन खेडेकरांच्या आवाजात शब्द येतात

ते तुझ्या घराचे दर्शन... श्रीमंती जागोजागी....
फुलबाग मला दिसलेली कागदी फुलांची होती...
नुसतेच बहाणे होते.. नुसतेच खुलासे होते...
कोरड्या तुझ्या शब्दांचे.. कोरडे दिलसे होते...

त्यानंतर चक्क नामंझूर सारख्या कव्वालीच्या सुरवातीस शोभेल असे इंट्रो म्यूज़िक .. आणि माधव भागवतांचा आवाज.. क्या बात है....

अरे तुझं आवाराताय कि नाही ? यावेळी आम्हाला वर्तमानात आणण्याच्या मान मातोश्रींचा होता.

जेवायची वेळ झालीय .. पाने घेतोय .. पटकन अंघोळ करून घे ...

आता सुट्टीच्या दिवशी जेवायचा आणि अंघोळीचा काय संबंध ?
पण जाऊ दे..

आतमधुन छान लसणाच्या फोडणीचा वास येतोय. आज काय बेत आहे? मसुराची आमटी आणि तांदळाची भाकरी.... जबरा ... तांदळाची भाकरी गरम गरम खाल्ली पाहिजे. अंघोळीला फाटा देऊन मी सरळ स्वैपाकघरात घुसलो. आईच्या तीव्र नापसंतीकडे दुर्लक्ष करायला आत्त्ताच थोडं थोडं जमायला लागलाय.

भाकरीवर मोठठा लोण्याचा गोळा घेऊन सुरवात केली. उद्यापासून डाएट करायचं हे नक्की.

जरा अंमळ जास्तच जेवण झाले. आता दुपारची झोपा पाहिजेच... हळूज आतल्या खोलीत सटकत असताना माँसाहेबांनी टोकलेच.

झोपायला चाललास ? हा पसारा कोण आवरणार ? नेहमीचा आपुलकीचा प्रश्न
हे काय.. उठल्यावर लगेच आवरतो .. किती वेळा लागतो आवरायला ...

पुढचा वाक्य येण्याच्या आत शिताफीने सटकलो.

आमची दुपारची झोप ही झोप कमी आणि तंद्री जास्त असते. कारण झोपताना गाणी लावतो. ती ऐकता ऐकता छान तंद्री लागते. मध्येच सीडी चेंजरचा आवाज येतो तेव्हढाच अडथळा.
आज काय लावावे बरे ? सकाळपासून डोक्यात घोळतंय ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे... तेच ऐकुया.

भर दुपारी यमन ? माझाच आतला आवाज जोरात किंचाळला. मनमोहनसिंग पंतप्रधान झाल्यापासून ह्या आतल्या आवाजाचे स्तोम फारच वाढलाय.

त्याला काय झाले ? एकदा पडदे ओढले, डोळे मिटले कि झाली रात्र ... मनमुराद यमन ऐकुया.

भानावर आलो (कि जाग आली?) तेंव्हा उन्हं उतरली होती. सासू सून टीव्हीपुढे बसल्या होत्या. पण टीव्हीपेक्षा त्यांचाच आवाज जोरात येत होता.
मग मीच सर्वांसाठी कडक चहा बनवला.

मग नेहमीचाच संवाद झाला
अरे किती लाल चहा करतोस रे ... आमच्या तीर्थरुपांना चहात दुध आणि साखर दोन्ही जास्त लागते.
तुम्हाला पांढरा चहा प्यायच्या ऐवजी डायरेक्ट दूधच का पीत नाही ? ... यानंतर माँसाहेबांचा कप जोरात खाली ठेवण्याचा आवाज.

मी गुपचूप गरम दुधाचे भांडे आणि साखरेचा डबा वडिलांकडे सरकवला व बिस्किटाचा डबा पुढे ओढला.

आता संध्याकाळी काय करायचे ? या विचारात मी मोबाईल हातात घेतला. गेले ४-५ तास मोबाईलला हात पण लावला नव्हता.

कायप्पा उघडले .. गण्याचा मेसेज.. संध्याकाळी येताना पानं घेऊन ये .. संध्याकाळी येताना? कुठे येताना? हा गण्या पण ना अर्धवट का लिहितो ?
अरे .. इकडे आमच्या मित्रमंडळी ग्रुपवर मेसेजचा खच पडलाय...

आमच्या थोरल्या वाहिनी माहेरी चालल्यात... थोरल्या वाहिनी म्हणजे ... आमच्या ग्रुपमध्ये गण्याचे लग्न सर्वात आधी झाले.. त्यामुळे त्याच्या बायकोला आम्ही थोरल्या वाहिनी म्हणतो.

म्हणजे आज गण्याकडे पार्टी .. तरीच तो पानं घेऊन यायला सांगतोय... आमचा अनिल काय पान लावतो ... कलकत्ता साधा , पक्की सुपारी आणि लवंग जाळून ..

पण ह्या मठ्ठ गाण्याने पार्टीचा मेसेज मित्रमंडळ ग्रुपवर कशाला टाकला? इथे आमच्या बायका पण असतात.. बोंबला ..म्हणजे हे सौ नी वाचले असणार. अजून काही बोलली कशी नाही ? ही वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते.

गाण्याने मेसेज पाठवलाय …. मी हळूच सूतोवाच केले.

हस्तकलाला सेल लागलाय ... जाताजाता मला नमिताकडे सोड... बायकोचे हे वाक्य ऐकून हस्तकला चे किती आभार मानावेत तेच कळेना.

चालेल. मी पटकन अंघोळ करतो ... आपण लगेच निघु ..
आणि हा पसारा कोण आवरणार ? माँसाहेबांचा प्रश्न. दुसरं कोण ?
पण काही पर्याय नव्हता. सगळ्या सीडीज पटापट गोळा केल्या आणि ड्रॉवरमध्ये रचल्या. आता एखाद्या सीडीचे कव्हर बदललं म्हणून काय झाले? आतली गाणी थोडीच बदलतात ?

बस्स...... आता इथेच थांबतो .. यानंतर पार्टीत काय झाले ते काही लिहीत नाही . कारण दोन पेग नंतरचे सगळे सुसंगत आठवेल याची काय गॅरंटी ? आणि आठवलेंच तरी सगळेच काही लिहिता येणार नाही

तेंव्हा भेटुच परत .. एखाद्या शनिवारी.. अजून सीडीज आवारायच्यात .. पुस्तकेही तशीच पडली आहेत ...

----------------------------------------------------------------------------------------
तर अशी ही आमची एका शनिवारची कहाणी .. सकाळची कहाणी लिहायला बसलो आणि संपूर्ण दिवसाचीच कहाणी झाली.
असो.. तर हे साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण (का उलटे ? )

यातील प्रसंगांचे प्रत्यक्ष जीवनात साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

1 Dec 2016 - 9:20 pm | गणामास्तर

मस्त खुसखशीत लिहिलंय. आवडले !
एक आगाऊ सूचना: फक्त तेवढे अनुस्वार थोडे कमी केले तर चांगले होईल :)

अनुस्वारच्या जागी पूर्णविराम असे वाचावे.

अमर विश्वास's picture

2 Dec 2016 - 1:55 am | अमर विश्वास

मास्तर
धन्यवाद. नक्की सुधारणा करीन

पद्मावति's picture

1 Dec 2016 - 10:24 pm | पद्मावति

मस्तं!
तुमची सहजसुंदर लेखनशैली खूप आवडली. लिहीत राहा.

संजय पाटिल's picture

2 Dec 2016 - 11:49 am | संजय पाटिल

मस्त लेखन आनि ओघवती शैलि..

भम्पक's picture

2 Dec 2016 - 12:23 pm | भम्पक

काय पण भारी लिहिलंय. वाचतांना तंद्री लागली. मस्तच.
पुढील लेखनास शुभेच्छा . आनेदो......

पाटीलभाऊ's picture

2 Dec 2016 - 12:59 pm | पाटीलभाऊ

लिखाणाची शैली आवडली.. :)

पियुशा's picture

2 Dec 2016 - 1:00 pm | पियुशा

खुसखुशीत आहे लेखन आवडल :)

आणी हो एक राहीलच, मला शिर्षक वाचुन तुम्ही शनिवरी सकाळचा मुहुर्त ब्घुन दरया किनारी फिरायला गेले आहात न बन्गाली नाविकाला क्श्ती बान्धायला सान्गता आहात असा मोठा (गैर ) समज झालेला माझा ;)

अमर विश्वास's picture

2 Dec 2016 - 6:03 pm | अमर विश्वास

धन्यवाद ...

तुम्ही म्हणता तसे मी कोलकात्याला समुद्रकिनारी गेलो होतो .. पण तो अनुभव फारसा आनंददायक नव्हता ...

त्यापेक्षा हुगळी नदीत फिरण्याचा अनुभव बरा होता

सस्नेह's picture

2 Dec 2016 - 1:25 pm | सस्नेह

खुसखुशीत लेखन.

सानझरी's picture

2 Dec 2016 - 2:51 pm | सानझरी

झकास! मस्त लिहीलंय.. :)

नीलमोहर's picture

2 Dec 2016 - 2:55 pm | नीलमोहर

आवडलं लिखाण,

एस's picture

3 Dec 2016 - 9:24 am | एस

भारीये. आवडेश.

अजया's picture

3 Dec 2016 - 3:31 pm | अजया

मस्त लिहिलंय!

पैसा's picture

3 Dec 2016 - 10:12 pm | पैसा

खूप छान!