आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ....

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
29 Nov 2016 - 8:15 pm

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ....

शनिवार आणि रविवार हे आम्हा कष्टकरी लोकांच्या दृष्टीने खास दिवस . सोमवार ते शुक्रवार भरपुर कष्ट केल्यानंतर (पुण्यातील ट्रॅफिकमधुन वाट काढत ऑफिसला पोचणे हे मुख्य कष्ट .... ऑफिसमध्ये कामाचे वेगळे .. ) हे सुट्टीचे दोन दिवस म्हणजे जणू संजीवनीच ....

तर अशाच एका शनिवार सकाळची ही कहाणी

----------------------------------------------------------------------------------------

शनिवार सकाळ ... जरा आरामातच उठलो. अर्थात मी सूर्यवंशी नाही (सेटमक्सवर सूर्यवंशम पहिल्यापासून हे मी फारच अभिमानाने सांगतो). त्यामुळे आमची सकाळ तशी लवकरच होते. त्यातून शुक्रवार रात्र जर कोरडीच असेल तर अजूनच लवकर.

त्यामुळें सकाळी उठलो... पेपर चाळला . हल्ली पेपर वाचण्यापेक्षा फक्त चाळतोच. एकतर पेपरात फारसे काही वाचण्याजोगे नसते आणि बातम्या तर थोपु व कायप्पा वर जास्त लेटेस्ट असतात.

आता काय करावे असा विचार चालू होता. तेव्हढ्यात आतून घेई छंद मकरंद ऐकू आले. बायकोनी सावन वर गाणी लावली होती ,,,

च्यायला हे काय ऐकतेस ? थांब तुला असली चीज ऐकवतो ... या माझ्या कॉमेंटवर बायकोनी फक्त मोबाईलचा आवाज वाढवला . आता काहीतरी करायला पाहिजे . तातडीने माझा सीडीचा ड्रॉवर उघडला, वसंतरावांची कट्यारची सीडी शोधली आणि कव्हर उघडले ....... तर आत चक्क रॉक ऑन ची सीडी. म्हणजे कव्हरला वसंतराव आणि आतमध्ये रॉक ऑन ... कुठे फेडाल ही पापे ... यांना क्षमा नाही . अर्थात हे सगळं मनातच.

ए .. जरा इकडे ये .. माझ्या हाकेला प्रतिसाद म्हणुन आतमध्ये फक्त गाणे बदलले गेले ..

आता मलाच काहीतरी करणे भाग होते. या सगळ्या सीडीज नीट लावून ठेवल्या पाहिजेत.
आज आता हे सगळं आवरतोच .. मी माझा इरादा जाहीर केला.

ही मात्रा बरोबर लागू पडली. कारण मागच्या वेळी साफसफाई करताना एक जुने घंगाळे भंगारवाल्याला दिले होते. आता आमच्या बायकोने खास तांब्याचे घंगाळे आणले होते आणि त्याला पोलिश करून त्यात एक रबराचे झाड लावायचा प्लॅन होता हे मला कसे समजावे ....

त्यामुळे आवराआवर म्हटल्यावर लगेच आत हालचाल झाली

अरे पण तू आज पुस्तके आवरणार होतास ना ? .. आमच्या मातोश्री दुसरे कोण ...
खरं म्हणजे हे पुस्तक प्रकरण जरा हाताबाहेच जाऊ लागले आहे. काही वर्षांपुर्वी नवीन फर्निचर करताना पुस्तांकांसाठी छान कपाट केले होते. नंतर ते पुरेना म्हणून दुसऱ्या खोलीत अजून एक कपाट केले. पण ही पुस्तके तरीही बाहेरच. बरं .. हवे ते पुस्तक सापडले नाही कि चिडचिड फक्त माझीच कारण पुस्तक मलाच हवे असते.. काय करावे काळत नाही.. हे लायब्ररीवाले एवढी पुस्तके कशी संभाळतात देव जाणे.

हो.. हो ... पुस्तक पण आवरायची आहेत .. पण आधी सीडीज . मी ही ठाम होतो.
बरं .. आधी नाश्ता करून घे .. काल भाकऱ्या जास्त करायला सांगितल्या होत्यास ना....

नाश्ता ... तरीच म्हटलं मला भूक का लागलीय .. चला भाकरीचा काला करू या.. मग काय .. एक लठ्ठ कांदा चिरला .. भरपुर दही आणि वरून फोडणी .. हिरव्या मिरच्यांची अशी चरचरीत फोडणी केलीय देवा .. काय सांगावे .. चक्क तीर्थरुपांनी खोकत "सकाळ" बाजूला ठेवला आणि न बोलावता नाश्त्याला आले.

नाश्त्याचे कार्य आटोपल्यावर मी परत सीडीज कडे वळलो... आता मला कोणी डिस्टर्ब करू नका अशी जोरदार घोषणा करुन कामाला सुरवात केली

या घोषणेचा अर्थ " आता अंघोळीला कधी जाणार" असे फालतू प्रश्न विचारू नका असा होता. चहा वगैरे साठी डिस्टर्ब केले तर चालेल ...

सीडीज आवरणे .. एकदम सोपे काम...
शात्रीय संगीत एका बाजूला , नाट्यसंगीत वेगळे . पुलं , वपु, शंकर पाटील यांच्या साठी एक वेगळा कोपरा
हिंदी गाणी खालच्या कप्प्यात.. त्यातही रफीसाहेबांसाठी वेगळा कोपरा. गझलस वेगळ्या बाजूला ... डोक्यात सगळं पक्क होत.. पटापट आवरू . दोन अडीचशे सीडीज आवरायला कितीसा वेळ लागतो ...

----------------------------------------------------------------------------------------
प्रत्यक्षात सीडीज आवरायला किती वेळ लागला आणि त्यात सकाळची दुपार .. व पुढे संध्याकाळ कशी झाली ते पुढच्या भागात
तसेच शीर्षकातले किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे .... याचा संदर्भ काय .. तेही पुढच्या भागात

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

29 Nov 2016 - 8:51 pm | पद्मावति

छान लिहिताय. पु.भा.प्र.

अमर विश्वास's picture

29 Nov 2016 - 11:36 pm | अमर विश्वास

धन्यवाद ..
ललित लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे ...

सुचना / सुधारणा सुचवा

सस्नेह's picture

30 Nov 2016 - 7:29 am | सस्नेह

खुसखुशीत !
जरा मोठे भाग येऊद्या.

नाखु's picture

30 Nov 2016 - 11:06 am | नाखु

आणी फोटो टाकलेत तर अनुभवी गृहमंत्री नामधारी मुख्यमंत्र्याना येत्या शनिवारी कामाला लावू शकतील तेंचा सल्ला स्वजबाबदारीवर !!!

लेख मस्तच.

आवरण्याचे (फक्त)संकल्प करणारा नाखु

आनन्दा's picture

30 Nov 2016 - 8:53 am | आनन्दा

पु भा प्र.

चांदणे संदीप's picture

30 Nov 2016 - 12:42 pm | चांदणे संदीप

मस्त लिहिलंय! आवडलं!
पुभाप्र!

Sandy

बरखा's picture

30 Nov 2016 - 12:44 pm | बरखा

पुढचा भाग लवकर येउद्यात..

अमर विश्वास's picture

30 Nov 2016 - 2:38 pm | अमर विश्वास

धन्यवाद .. पुढचा भाग लिहितो आहे
पण अजून मराठी टंकलेखनाचा वेग कमी पडतोय ..