महेश्वरची मंतरलेली पहाट!

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
29 Nov 2016 - 3:06 pm

२००९ मधे नारेश्वर, गरुडेश्वर दौरा झाला आणि झपाटल्यासारखी नर्मदा परिक्रमेवर असलेली मिळतील ती पुस्तके वाचून काढली. त्यात प्रतिभा चितळे यांची सीडी, मिपावर खुषीताईंनी लिहिलेली लेखमाला,हे भर घालतच होते.
'महेश्वर' या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इंटरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच!

... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच. महेश्वर, मांडू , उज्जैन, इंदौर , आणि नविन वर्षाला ओंकारेश्वर असा त्रिकोण करायचा प्लॅन केला. सुट्ट्या जुळुन आल्या. नेटवरुन अंतर मोजुन, हॉटेल्स बुकिंग करुन घेतल. मधेच ३-४ दिवस पुण्यात अभुतपुर्व थंडी अचानक पडली. मनात म्हटलं, मैय्या परीक्षा घेतेय, घेऊ दे!
त्यात बडवानी हुन निरोप आला की तिथे २ डिग्री तापमान आहे. आणि नर्मदेच्या किनारी रहाणार म्हटल्यावर अजुनच थंडी असेल. हे पाहुन आमच्या ग्रुपमधे २-४ जण गळाले.तरी आमचा निर्धार पक्काच. काही झाल तरी जायचे...नर्मदा मैय्यावर सोपवुन. ती पाहुन घेइल. गाडीनेच जायचय ना, बरोबर गरम कपड्यांचा स्टॉक घेउन. बहिण, तिचे मिस्टर, मी आणि माझा मुलगा..आम्ही चौघेच निघालो.
सकाळी साधारण ८ च्या सुमारात नाशिकहुन प्रस्थान केले. दुपारी बिजासन घाटात माता बिजासनीचे दर्शन घेउन संध्याकाळी ६ च्या सुमारास महेश्वरला पोहोचलो.
महेश्वर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं हे टुमदार गाव. होळकर पॅलेसच्या आवारातच होटेल होते. हॉटेल मैय्या किनारी, मैय्याचे सतत दर्शन होईल अशा तर्‍हेने बुक केले होते.
गम्मत म्हणजे तिथे अजिबात थंडी नव्हती. मैय्याने आमची 'हाक' ऐकुन 'ओ' दिली होती. संध्याकाळी जवळच्या राजराजेश्वर मंदिरात जाउन आलो. गाभार्यात अहिल्यादेवींच्या काळापासून तेवत असलेले भलेमोठे 11 दगडी दिवे... साजूक तुपाचे! पाहूनच मन भरून गेले. घाटावर ही चक्कर मारली. इथला घाट अतिशय सुंदर..घडीव पायऱयांचा... प्रचंड आकाराचा!
घाटावरची गर्दी कमी झाली होती. एखादा दुसरा परिक्रमावासी, 2-3 साधू, 2- 3 पुजारी इतकेच तुरळक लोक. अंधार पडायला सुरुवात झाली होती मात्र पलीकडचा काठ उजळून निघाला होता. होळकर राजवाड्यात त्या 2-3 दिवसात कुणी कन्येचे लग्न होते.पलीकडच्या काठावर लग्नाचं शाही वर्हाड उतरले होते. त्यांचे पन्नासेक तंबू दिसत होते. आणि त्या तंबुवर लागलेले लाईट्स ची असंख्य प्रतिबिंब पाण्यात हेलकावत होती. आमच्याजवळच कुणी एक स्त्री घाटावर येऊन मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती.आकाशातही एकेक नक्षत्र उगवत होते आणि माईचा चमचमता पदर अधिक खुलून दिसत होता. त्या दिवे सोडणार्या स्त्रीला आम्ही ," इथे पहाटे स्त्रिया येतात का स्नानाला? काही भीती नाही ना? वै वै पांढरपेशी प्रश्न विचारले. त्यावर तिचा प्रतिसाद आश्वासक होता.

भल्या पहाटे उठुन मैय्यावर स्नानाला निदान दर्शनाला जायच ठरवल खर... पण पहाटेच्या थंडीत उठावेसे वाटेना. 'हो' 'नाही' चालु होते.शेवटी बहिणीने जोर लावुन धरला. ६ वाजता मैय्याच्या प्रशस्त निर्मनुष्य घाटावर आम्ही चौघे पोहोचलो.

आता मैय्या सोबतीला होती.भीतीचा प्रश्न नव्हता. इथली मैय्या अगदी संथ, शांत! जलतत्वांच असं हे अजिबात आवाज न करणार रूप माझ्यासाठी नवीन होतं. संपूर्ण पात्रभर पांढराशुभ्र धुक्याचा पडदा!उजाडल्याशिवाय हा पडदा उठणार नव्हता. आधी थोडेसे लांब बसून अंदाज घेतला. मग मैय्यापासून अगदी एक फुटावर कुडकुडत बसलो. अजूनही थंड पाण्यात पाय टाकायचे धारिष्ट होत नव्हते. मैय्या म्हणजे तीर्थजननी.. तिला भेटायला जायचे म्हणजे आधी पाय कसा लावायचा? हा विचार करून आधी त्या जलतत्वाला नमस्कार केला. हळूच आधी हात बुडवून ते पाणी प्रोक्षण केले.. ' नर्मदे हर' म्हणत माथ्यावर शिंपडले. आणि मग हळूच तळवे जलात सरकवले.. आश्चर्य! मैयाचे जल अगदीच काही थंडगार नव्हते. एक सुखद लहर शरीरातून... मऊशार पाणी तळव्यांना गुदगुल्या करतंय! एवढ्या अंधारातही मैय्याचा तळ आता स्पष्ट दिसतोय.छोटे छोटे मासे आणि त्यातही काही झपकन ट्युबलाईट पेटावी असे प्रकाशमय मासे.. पायाला लुचू लागलेत.या सुखानुभवात आपोआप डोळे मिटले गेले. हाच का तो शाश्वत आनंद? आतापर्यंत आनंदाचे क्षण का कमी आलेत? मुलगा झाला तो आनंद, नोकरी लागली तो आनंद, पगार वाढला, आत्मनिर्भर झालो हा आनंद ...किती काळ टिकला? मग शाश्वत आनंद कशात?

डोळे मिटले की दृष्टी 'आत' वळते म्हणतात. अचानक आठवलं आपलया गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात पण महेश्वर चा उल्लेख आहे ना? इथूनच गेले असतील का श्रीमहाराज? कदाचित इथेच बसून या मैय्याच्या साक्षीनेच त्यांनी आत्मसमाधी लावली असेल का? अंगावर रोमांच उठले.नकळत डोळे भरून आले.माझ्याही नकळत हे जलतत्व आता अंतर्यामी उतरू लागलेय. माझे सद्गुरु ज्या ज्या ठिकाणी फिरले अश्या तुझ्या किनारी तूच भेटायला बोलवतेस, मैय्या! हे तूच घडवून आणतेस!
तरीही हे मन वेडं असत ग! हे असे परमानंदाचे क्षण सोडून, सुख-दु:खाच्या हेलकाव्यात क्षणात आनंदित तर क्षणात चिंतीत तर कधी साशंक होत. आपल्या जीवनाचा हेतूच अजून लक्षात येत नाहीये. "
तिच्या उसळत्या पाण्याचा खळखळाट आता स्पष्ट ऐकू येतोय. जणू गिरक्या घेत मला ती म्हणतेय, किती ' साठवून' ठेवतेस आत? मी बघ मागचं सगळं विसरून कशी पुढेच धाव घेते. तुम्ही कधी काळी धुवून टाकलेले सगळे राग, लोभ, द्वेष ,मत्सर पोटात घालूनही कशी नितळ राहाते! ते पाण्यावर वहात चाललेलं पान दिसतय तुला?? किती मजेत चाललय! आहे का त्याला उद्याची चिंता कि भूतकाळातली संवेदना? प्रवाहाचा झोत आला की जोरजोरात उसळी घ्यायचं आणि संथ असेल तेव्हा मजेत पाण्यावर पहुडायचं. मधेच एखादी खडक आला की एक गिरकी घेऊन आपल्याच मस्तीत झोकुन द्यायचं! बघ, अस जगता येईल तुला?"
डोळ्यातुन धारा सुरु झाल्या होत्या.
"माई, धन्य झाले मी !! सगळा संभ्रम दूर केलास! तू घडवून आणले म्हणून ही तीर्थयात्रा.. आम्ही फक्त तुझी इच्छा करायची. तुझ्या सान्निध्यात आलं की कुठलीही इच्छा करा.. मग ती ऐहिक असो कि पारमार्थिक , तू त्या पूर्ण करतेस. कशी होऊ त्याची उतराई??

आता हे जलतत्व चक्क बोलतंय माझ्याशी!
ती: बरं मग, मी जे मागेन ते देशील?
मी: खरंच! तुला जे हवे ते! हा देह देऊ? आता या क्षणी मृत्यू जरी समोर आला तरी आनंदाने पत्करेन मी.
ती: हाहा, तो पंचमहाभूतांकडून उसना घेतलेला देह मलाच परत करून काय साधणार? मला जे हवंय ते दुसरंच!
मी: सांग मैय्या, काय आहे माझ्याकडे देण्यासारखं! जर हा देह, हा श्वास देखील त्या परमात्म्याने दिलाय तर मी माझं स्वतःचं असं काय?
ती: हे सगळं खरं असलं तरी एक गोष्ट आहे तुझी स्वतःची!
... तुझा 'अहं', तुझा 'मी'पणा देऊ शकतेस तू??

मी: ( थोडं थांबून) धत! एवढंच ना, हा बघ दिला. एवढा माझा जप राहिलाय तो झाला की लगेच.... (किती पटकन बोलुन जातो आपण नै?)
ती: ( खळखळुन हसत) हाहाहा ... म्हणजे अजूनही 'तू स्वतःच' जप' करतेस असं तुला वाटतय???

मी अवाक!
निर्बुद्धपणे पहातच राहिले...

मनातले उसळते जल शांत झाले होते. हलकेच डोळे उघडले. काल संध्याकाळी आलेली तीच स्त्री पुन्हा मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती.हे दिवे आणि पलीकडच्या तिरावरचे अश्या असंख्य दिव्यांनी मैय्याचे पात्र उजळून गेले होते. नकळत हात जोडले गेले!

दूरवरून राजराजेश्वर मंदिरात होत असलेल्या आरतीचा आणि घंटेचा आवाज हे मंगलमय वातावरण अधिकच अधोरेखित करत होता!
पूर्वक्षितिजावर लाल गुलाबी रंग दिसू लागला होता.

....आणि मैय्या?

मैय्या खळखळत आपल्याच मस्तीत वाहत होती. मैय्याच्या पात्रावरचा धुक्याचा पडदा हळूहळु विरत होता!

आणि ...
मनातलाही!

IMG_20151229_064934

IMG_20151228_165121

IMG_20151228_171537

मुक्तकसमाजआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Nov 2016 - 3:21 pm | कैलासवासी सोन्याबापु

नर्मदेssss हर ssssss हर sssss

मनातल्या नेमक्या भावना सांगणारे शब्द :)

प्रचंड आवडले :)

मितान's picture

30 Nov 2016 - 1:30 pm | मितान

+१११

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2016 - 7:15 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११
नमोस्तु नर्मदे.. नमोस्तु महेश्वर!

प्रदीप's picture

4 Dec 2016 - 7:59 pm | प्रदीप

.

पद्मावति's picture

29 Nov 2016 - 3:29 pm | पद्मावति

+१

महासंग्राम's picture

29 Nov 2016 - 3:50 pm | महासंग्राम

जबरदस्त लिहिलंय ...

कंजूस's picture

29 Nov 2016 - 5:21 pm | कंजूस

बहोत सुंदर!

आमच्या इथे शास्त्रीय नर्मदा परिक्रमा (१५ दिवस) असे एका पर्यटनवाल्याची जाहिरात फलक दिसले. एक झालीय, पुढची जानेवारीत आहे.

आर्या१२३'s picture

30 Nov 2016 - 1:23 pm | आर्या१२३

हो सध्या गाडीने १५-१७ दिवसाच्या परिक्रमा करतात.
नुकतेच एप्रिल मधे आम्हीही अ‍ॅक्च्युअल परिक्रमेचे अनुभव घेण्यासाठी तिलकवाडाहुन एक दिवसीय २४ किमी चे पायी परिभ्रमण केले. प. पु. वासुदेवानंद सरस्वती यांनी १०१ कि १०८ दिवसाच्या परिक्रमेस तिलकवाडाहुन सुरुवात केली होती. याची आठवण म्हणून तिथले विष्णूगिरी महाराज दर वर्षी चैत्र शु.तृतीयेला अशी परिक्रमा अरेंज करतात .

यशोधरा's picture

29 Nov 2016 - 5:58 pm | यशोधरा

सुरेख.

चित्रगुप्त's picture

29 Nov 2016 - 6:07 pm | चित्रगुप्त

आता या क्षणी मृत्यू जरी समोर आला तरी आनंदाने पत्करेन मी.

असा अनुभव नर्मदेच्या तीरी विविध ठिकाणी, नर्मदेतून नावेतून जाताना, त्या प्रदेशातील अन्य ठिकाणी (उदा. अशीरगडचा किल्ला, मांडू वगैरे) अनेकदा आलेला आहे. काहीतरी अद्भुत आहे त्या प्रदेशात.

आर्या१२३'s picture

30 Nov 2016 - 1:11 pm | आर्या१२३

अगदी खरय!. नर्मदा ओढ लावते.

चित्रगुप्त's picture

29 Nov 2016 - 6:11 pm | चित्रगुप्त

फ्लिकर वरून हे फोटो इथे कसे टाकले ? कारण माझ्या या धाग्यात लिहील्याप्रमाणे फ्लिकर वरून टाकलेले फोटो दिसत नाहीत.

आर्या१२३'s picture

30 Nov 2016 - 1:10 pm | आर्या१२३

२-३ वेळेस झटापट केली. माबोवर एक फोटो टाकुन ट्राय केल. :)
फोटोला पब्लिक अ‍ॅक्सेस देउन embeded मधे आली ती लिन्क इथे पेस्ट केली होती.

पुष्कर जोशी's picture

3 Dec 2016 - 3:03 pm | पुष्कर जोशी

Embedded फोटो टाकताना कास ट्रीक वापरली ?? चेपु embedded जमत नाहीये ...

फ्लिकरवरून टाकलेले फोटो दिसतात सर्वांना. चेपुवरचेही दिसतात. चेपुचं काम फारच सोपे आहे.फक्त तिकडे अपलोड करताना ४एमबी पेक्षा मोठे सध्या जात नाहीत ,ते फ्लिकरवर टाकावे लागतात.

पुष्कर जोशी's picture

5 Dec 2016 - 12:09 am | पुष्कर जोशी
पुष्कर जोशी's picture

5 Dec 2016 - 12:13 am | पुष्कर जोशी

काय आणि कसे केले इस्कटुन सांगा ना .. चे पु चा एम्बेडेड कोड पेस्ट केला काही दिसत नाही .. image. मधे पेस्टकेला तरी जमना..

iPad वर jpeg असलेली लिंक कशी मिळवायची

पुष्कर जोशी's picture

5 Dec 2016 - 12:15 am | पुष्कर जोशी

कुछतो हुआ और जम गया !!

कंजूस's picture

5 Dec 2016 - 5:03 am | कंजूस

फेसबुकवरून इमिज लिंक मिळवण्यासाठी इथे पाहा

आर्या१२३'s picture

30 Nov 2016 - 1:07 pm | आर्या१२३

मनापासून धन्यवाद सर्वांना! __/\__

वरुण मोहिते's picture

30 Nov 2016 - 1:47 pm | वरुण मोहिते

वर चित्रगुप्त सरानी लिहिलेल्या अनुभवांशी सहमत . कित्येकदा मध्य प्रदेश गुजरात पालथं घातलं आहे पण जी भावना मध्य प्रदेशात येते ती गुजरात ला नाही येत नर्मदा मय्या पाहताना का कोण जाणे ..हा स्वानुभव.बाकी लेख आवडला ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2016 - 2:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

पियुशा's picture

30 Nov 2016 - 3:17 pm | पियुशा

सुरेख अनुभुती :)

दिपस्वराज's picture

30 Nov 2016 - 8:04 pm | दिपस्वराज

खासच .......अनुभव मनाला स्पर्श करून जाणारे आहेत.
ब्रम्हानंदी टाळी.

कवितानागेश's picture

1 Dec 2016 - 6:33 am | कवितानागेश

अगदी मनातून आतून उतरलंय लेखन.

मस्त लिहिलयत. फोटोही साजेसे आलेत.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Dec 2016 - 2:07 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मी पण रेवाच्या प्रेमात आहे. आयुष्याची संध्याकाळी तिच्या सहवासात रहायचंय मला. मांडु,महेश्वर, देवास.....

इशा१२३'s picture

3 Dec 2016 - 2:45 pm | इशा१२३

छान लिहिलय!फार सुंदर आहे मांडु,महेश्र्वर आणि सगळाच भाग.
फोटो सुंदर आहेत.

पुष्कर जोशी's picture

3 Dec 2016 - 2:56 pm | पुष्कर जोशी

अप्रतिम

पुष्कर जोशी's picture

3 Dec 2016 - 3:09 pm | पुष्कर जोशी

नर्मदेच्या काठी विकास होउ नये ... तो परिसर नैसर्गीकच रहावा ... नाहीतर वैष्णो देवी.. होण्यास वेळ लागणार नाही ..

औकारेश्वर, महेश्वर उज्जैन हा परिसर अद्भूत आहे .. जसा आहे तसाच टिकून रहावा ... लोकांना त्रास झाला तरी ठीक ...

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Dec 2016 - 5:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे काही खास पटले नाही, पण ज्याचेत्याचे विचार त्यामुळे असो :)

लोकांना त्रास झाला तरी ठीक ...

क्या बात है. टूरिस्ट लोकांच्या सोयीसाठी तत्रस्थांनी जितेजागते म्युझियममधील नमुने बनून रहावे. वा वा वा!

औद्योगिकरण नको आणि झालंच तर केमिकल झोन नको असं म्हणायचं असेल.

बॅटमॅन's picture

4 Dec 2016 - 11:46 pm | बॅटमॅन

येस, मेबी. आतले-बाहेरचे संघर्ष हा अटळ आहे. आतल्यांना रोजबर्राच्या जिंदगीकरिता सुधारणा पाहिजेत, तर बाहेरच्यांचा इंट्रेस्ट 'प्रिस्टाईन' पणात आहे. दोन्हीही पूर्णपणे साध्य होणे केवळ अशक्य आहे. अंशतःच शक्य होऊ शकते.

पैसा's picture

3 Dec 2016 - 9:54 pm | पैसा

छान लिहिलंय.

कंजूस's picture

4 Dec 2016 - 6:59 pm | कंजूस

मुक्तक छान आहे.

मुक्तक छानच. महेश्वर घाटाचा फोटो अतिशय आवडला. माळव्यात कधी जाणे होईल देव जाणे. जायची इच्छा तर खूप आहे.