कंट्रोल रूम - २

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
29 Nov 2016 - 11:36 am

(जुनाच ढिस्क्लेमर: या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!)
०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
कंट्रोल रूम
०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
"नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?"
"हॅलो, म्याडम, ते याडं टाकीवं चलडय... उडी माराय."
"पत्ता सांगा, कुठून बोलताय तुम्ही"
"प...त्ता... हां लिहून घ्या ॲड्रेस... जनबाई गिरमे चाळ, मोडक आळी, मेन बाजाराच्या म्हाग.. खेड."
"थोडक्यात सांगा, आत्ता काय परिस्थिती आहे, कोण चढलंय टाकीवर? कसली टाकी आहे? किती लोक आहेत तिथे?"
"आवो काय सांगाह्याचं... आत्ता आलतो दुकान उघडाह्या. तं सकाळ सकाळ मोप गर्दी! पाह्यलं तं ते पलीकल्ल्या गल्लीतलं ब्यावडं जगताप चलडय टाकीव आन लागलय जोरजोरानी बोंबा ठोकाया! ती टाकीबी यागळीच ह्ये, मोठया टाकीवं बारकी टाकी हाये. कोन सलापवं जरी चलडा तरी त्ये उडी टाकीन म्हणतयं. कोन्ला येऊं द्येना झालयं वर. निस्त आराडतय, शिव्या देतयं बायकूला आन उडीचं टाकतो म्हणतयं! बगा लवकं काह्यतरी करा नाह्यतं ते मारातय उडी आजं!"
"ओके, लगेचंच पोलीस आणि फायरब्रिगेड वाले येतील तिथे."
अशा एका कॉलने कंट्रोल रूमच्या आजच्याही दिवसाची सुरूवात झालेली आहे. कॉल ड्युटीवर असलेल्या म्याडम पो.शि. सौं. स्वाती चाबळे मॅडम यांनी यांत्रिकपणे पहिला फोन फायब्रिगेडला लावला व दुसरा त्या भागातील सरकारी दवाखान्यात लावला आणि शेवटचा पोलीस स्टेशनला.
"एएसाय मानमोडे बोलतो."
"तुमच्या भागातून कॉल आलेला आहे. बाजाराच्या मागच्या आळीत एक माणूस आत्महत्येसाठी टाकीवर चढलेला आहे. पॉईंटवर लवकरात लवकर पोलीस पथक व मार्शल्स पाठवा."
"म्याडम, रात्रपाळीचे लोकं आता ड्युटी संपवून घरी निघालेत व दिवसपाळीचे आत्ता हाजरीला थांबलेत म्याडम. दहा मिन्ट तरी लागतेल पॉईंटवर पोचायला."
"ओके, शक्य तितक्या लवकर पॉईंटवरून रिपोर्ट करायला सांगा."
टाकीवरच्या विरूला उतरवण्यासाठी फायब्रिगेडची गाडी कशीबशी त्या गल्लीत शिरून त्या उमारतीला दोन बाजूंनी शिड्या लावण्यात यशस्वी झाली होती. मार्शलही तोपर्यंत आलेच, त्यांनी दोन-चार शिव्या हासडत, एकदोघांच्या बखोटीला धरून भिरकावून देत गर्दी पांगवली. फायब्रिगेड, पोलीस बघताच टाकीवरच्याची तंतरली. वरच्या लहान-गोलाकार टाकीवर त्याच्या हालचाली जलद होऊ लागल्या व कोणीही वर आल्यास उडी मारेन अशी धमकी देऊ लागला.
फायब्रिगेडचे कर्मचारी त्याला न जुमानता झपाट्याने शिडीवरून वर चढू लागले तशी त्याने एकदाची उडी मारलीच! गर्दीच्या काळजाचा ठोका चुकला. हातातले मोबाईल बाजूला करून पब्लिक आपापल्या डोळ्यांनी त्याला वर शोधू लागलं. उडी मारणारा खालच्या टाकीची साईज विसरला होता व पॅनिक होऊन विहिरीच्या काठावरून पाण्यात उडी मारतात तशी उडी मारून बसला होता. आता तो खालच्या टाकीच्या कडेलाच मोडलेला पाय हातात घेऊन पालथा पडून जोरजोरात बोंबलत होता. एव्हाना फायरब्रिगेडचे कर्मचारी त्याच्याजवळ पोचलेच होते. त्यांनी त्याला त्यांच्याजवळच्या दोऱ्यांत अडकवून खाली सुखरूप उतरवला. स्ट्रेचर घेऊन ॲम्ब्युलन्सचे लोकंही हजर होतेच. तात्काळ त्याला ॲम्ब्युलन्सात चढवला. तिथे एका हवालदाराने त्याचा जबाब घेतल्यावर आधीतर पब्लिकला हसू आवरले नाही आणि नंतर वैताग व त्रागा. त्याने जबाबात आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण बायको जेवायला देत नसल्याचे सांगितले!!

पुढचा कॉलही रांगेत होताच.

"नमस्कार, कंट्रोल रूम. बोला, काय मदत हवी आहे."
"नमस्कार, मी सदाशिव पांडुरंग माने बोलतो. रा. घर क्रं ४३६, कोळसे वस्ती, फुले नगर क्रमांक २ येथून."
"काय तक्रार आहे?"
"तक्रार नाही ओ. ते आमच्या इथल्या नदीवर जो पूल आहे. म्हणजे बघा, दोन पूल आहेत. एक दुचाकी - चारचाकी वाल्यासांठी आहे आणि त्याच्यावरच पायी चालणाऱ्यांचीही सोय आहे बरंका! आणि त्यालाच पॅरलल दुसरा पूल आहे तो रेल्वेसाठी आहे."
"*&%$##%%&-**%$#"(हे, मॅडमच्या मनात!)
"तर, एक मनुष्य, अंदाजे ४० वर्षे वय, सडपातळ बांधा.. रं.... ग.... इथून लांबून दिसत नाहिये ओ."
"साहेब, काय झालंय त्या माणसाला?"
"नाही, काही झाल नाही, पण झालं तर? तो रेल्वेच्या पुलावर येरझारा घालतोय, रेल्वे आली म्हणजे, अचानक उडी-बिडी मारली तर? एक तर त्याला माहीत नसणार तिथे पाण्याची खोली कमी आहे. म्हणजे बुडून जरी नाही मेला तरी मार लागून नक्कीच मरेल."
"ठीक आहे, संबंधित हद्दीतील पो. स्टेशनला कळवते. पोलीस येतील पंधरा मिनीटात."
"अहो पण तो उडी मारेल का नाही माहिती नाही. एक काम करतो. त्या माणसाने उडी मारली की परत फोन करतो."

चाबळे मॅडमला त्या माणसाची निरर्थक बडबड आणि तीही निवांत, मुद्देसूद, ऐकायची नसल्याने त्यांनी फोन ठेवला.
आता पुढचा कॉल चाबळे मॅडमने नदीच्या अलीकडच्या पो.स्टे. ला लावला. अपेक्षेप्रमाणे हद्दीची उजळणी झाली तीच गत नदीच्या दुसऱ्या बाजूकडच्या सरकारी यंत्रणेची. शेवटी मॅडमने दुसऱ्या दिवशीच्या पेपरातली डिट्टेल बातमी दोन्हीकडच्यांना वाचून दाखवली.

पुढच्या पंधरा मिनीटात नदीपुलाच्या दोन्ही बाजूला एक-एक पोलीस जीप, फायरब्रिगेडच वाहन, रूग्णवाहिका आणि पत्रकारांची जत्रा अस साग्रसंगीतं लटांबर उपस्थित झालं. नदीपुलावरचा माणूस आता एका बाजूकडे कडे गुमान चालू लागला होता.
०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
- संदीप चांदणे

वाङ्मयविनोदसाहित्यिकसमाजमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

देशपांडेमामा's picture

29 Nov 2016 - 12:41 pm | देशपांडेमामा

कहर प्रकार आहेत हे!! अश्या वेळेस डोक कायम शांत ठेवून काम करणे म्हणजे अवघड आहे!

देश

असंका's picture

29 Nov 2016 - 1:49 pm | असंका

खरोखर कहर!!!!
पण फक्त दोन किस्से!

एक सलग सिरीज येत असेल तर मात्र लैच भारी!!

वाचतोय. अजून येऊ द्यात.

महासंग्राम's picture

29 Nov 2016 - 2:20 pm | महासंग्राम

कडक लिहिलंय अजून येऊद्या ....

चांदणे संदीप's picture

30 Nov 2016 - 12:49 pm | चांदणे संदीप

या लेखाचे वाचक व प्रतिसादकर्ते यांचे आभार! __/\__

Sandy