काळरात्र (भाग ५) आयझँक असीमोव्ह

विचित्रा's picture
विचित्रा in जनातलं, मनातलं
21 Nov 2016 - 3:48 pm

शीरीनने आपलं बोलणं सुरु ठेवलं. " जेव्हा आपले अवकाशसंशोधक लगाशग्रहाच्या भ्रमणकक्षेचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, कि या कक्षेवर दुसर्या अवकाशवस्तूचा प्रभाव पडतोय. पण हा अवकाशगोल लगाशसारखाच प्रकाशरहित असल्यामुळे, नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकत नाही."
" लगाशभोवती फिरणार्या त्या गोलाला चंद्र म्हणतात, हे माहित आहे सगळ्यांना."
" बरोबर. तर, हा चंद्र एका विशिष्ट वेळी, बरोबर बीटा सुर्याच्या रेषेत येतो.त्याच्या सावलीमुळे बीटा तारा पूर्णपणे झाकला जातो. याचवेळी इतर सूर्य विरुद्ध गोलार्द्धात असल्यामुळे लगाशवरच्या विशिष्ट भागात संपूर्ण अंधार पसरतो."
" ग्रहण म्हणतात त्याला. अशी स्थिती साधारण अडीच हजार वर्षांनी निर्माण होते, हे सगळं शास्त्रीय गृहीतक मलापण माहित आहे. " थरमॉन अधीरपणे म्हणाला. " पण मला कळत नाहीये, कि लोक अंधाराला एवढं का घाबरतायंत? त्यामुळे सामुदायिक वेड कसं काय लागू शकेल?"
" तुला माहितेय अंधार म्हणजे काय?" शीरीनने तीक्ष्णपणे विचारलं.
" प्रकाशाचा अभाव. सावलीत किंवा खिडक्यांचे पडदे झाकल्यावर वाटतं तसं, किंवा डोंगरातल्या गुहेत गेल्यावर...." " तू गेलायंस?" शीरीनने मध्येच रोखलं. " नाही."
" मी गेलोय एकदा. भीतीदायक अनुभव होता तो. प्रवेशद्वार दूर जायला लागलं, अंधार वाढू लागला, तसं मला अस्वस्थ वाटायला लागलं. श्वास रोखू लागला. थंडी वाढायला लागली. शेवटी मी पाठी वळून प्रवेशद्वाराच्या दिशेने पळत सुटलो. बाहेर उजेडात पोहोचलो, तेव्हा मोकळा श्वास घेतला. " त्याच्या चेहर्यावर दिसणारी भिती पाहून थरमॉन कुचेष्टेने हसला. " तुमचं वय झालंय, त्यामुळे असं वाटलं असेल." "
" ठीक आहे. आपण एक प्रयोग करु."
यावेळी ते बीटा किरणांच्या विरुद्ध दिशेच्या कक्षात होते. तिथे एकच मोठी खिडकी होती. आधीच क्षीण असलेला तार्याचा प्रकाश आता ग्रहणाचे वेध लागल्यामुळे अधिकच मंद झाला होता. हे संधिप्रकाशाचं वातावरण लोकांना अपरिचीत होतं.
" उठ आणि ते पडदे झाक." शीरीनने अचानक आज्ञा केली. थरमॉन उठून खिडकीपाशी गेला. ते जाड पडदे अोढायला सुरुवात केल्यावर खोलीतील उरलासुरला प्रकाश नष्ट होऊ लागला. तो क्षणभर थांबला, पऩ शीरीन आपल्याकडे रोखून पहातोय हे लक्षात आल्यावर त्याने धाडसाने संपूर्ण पडदा झाकला त्याबरोबर खोलीत मिट्ट काळोख झाला. त्याचा श्वासच रोखला गेला.
" आता इकडे ये." दूरवरून शीरीनचा आवाज आला. " कसं शक्य आहे? मला काहीच दिसत नाहीये. "
" चाचपडत ये. स्पर्शज्ञान आहे ना. ? "
काही क्षणांनी डोळे अंधाराला सरावल्यावर त्याला वस्तूंच्या अस्पष्ट बाह्याकृती दिसू लागल़्या. धाडस करुन थरमॉनने एक दोन पावलं आवाजाच़्या दिशेने टाकली, पण एक थंडगार शिरशिरी त्याच्या मणक्यातून गेली. घाईघाईत मागे येऊन त्याने पडदे उघडून टाकले. तिथेच उभा राहून धापा टाकणार्या थरमॉनला पाहून शीरीन मंद हसत होता. " काय झालं."
" भयंकर" थरमॉन पुटपुटला. अस्वस्थ वाटतंय मला. या भिंती अंगावर चाल करुन येतायंत मला चिरडायला असा भास झाला. "
" आत्ता तू क्लोस्ट्रोफोबियाचा अनुभव घेतलास." शीरीनने समजावलं.
( क्रमशः)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

पुंबा's picture

21 Mar 2017 - 5:34 pm | पुंबा

पुढचा भाग टाका ना..

विचित्रा's picture

23 Mar 2017 - 2:40 pm | विचित्रा

प्रयत्न करते.

पैसा's picture

22 Mar 2017 - 4:54 pm | पैसा

मस्त रूपांतर