देवगिरीचे यादव

आशुतोष-म्हैसेकर's picture
आशुतोष-म्हैसेकर in जनातलं, मनातलं
20 Nov 2016 - 12:57 am

देवगिरीचे यादव

संभाजीनगर(औरंगाबाद) म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी. पायथ्याकडून पाहतानाच त्याची भव्यता लक्षात यावी आणि उंची पाहता मनात धडकी भरावी असे त्याचे रुपडे. शिवरायांची राजधानी रायगडी हलवली जाण्यापूर्वी सभासद बखरीत म्हटल्यानुसार "दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच." अशी प्रत्यक्ष रायगडाशी तुलना ज्याच्या नशिबात होती तो हा देवगिरी. ह्या देवगिरी प्रांताने इतिहासाच्या दोन हजार वर्षांत अत्यंत भरभराटीचा काळ पहिला. इसवीसनपूर्व काळापासून चालत आलेले सातवाहन राज्य,इथल्याच पैठणचे. नंतरच्या काळात वेरूळ आणि औरंगाबाद लेण्यांच्या निमित्ताने राष्ट्रकुट राजांनी ह्या प्रदेशाला सौंदर्य दिलं. पुढे चालून यादव काळात हा उभा देवगिरी,यादवांची राजधानी बनून राहिला. तद्नंतर उत्तरेकडून झालेलं इस्लामी आक्रमण इथल्या इतिहासाला कलाटणी देऊन गेलं.इतिहासात वेडा तुघलक म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद बिन तुघलकाने तर अख्या भारताची राजधानी थेट दिल्लीहून इथवर हलवली.अन नंतर मुघल काळात दक्षिणविजयाच्या महत्वकांक्षा घेऊन आलेला औरंगजेब तो आला अन आजही आपल्या नावाची छाप ठेऊन आहे.

पण ह्या सर्व उतरा आणि चढाव पाहिलेल्या,हजारो वर्षांत व्यापार-राजकारण-कला-स्थापत्य आदि अनेक मार्गांनी आपला तो तो काळ सजवून घेतलेल्या ह्या देवगिरी प्रांतात एक महत्वाचा कालखंड ठरला तो म्हणजे यादव काळ. सुमारे दीडशे वर्षांच्या आसपास देवगिरीवरून आपला राज्यकारभार हाकणारे देवगिरीचे यादव राजे शेवटी मात्र उत्तरेकडून झालेल्या इस्लामी आक्रमणाला बळी पडले आणि या प्रांतावर असलेला सुमारे हजारावर वर्षे जुना स्वकीयांचा अंमल संपुष्टात येण्याला सुरुवात झाली. याच यादव काळाचा छोटासा आढावा म्हणून हा लेख.

सुरुवातीचा यादव काळ

मुळात यादव म्हणजे यदु वंशी राजे. थेट भगवान श्रीकृष्ण यांचा वंश, हा उत्तरेत वाढला. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात हे उत्तर भारतातील यादव दक्षिणेत येऊन राज्य करू लागले असावेत असा कयास बांधला जातो परंतु ह्याबाबतचे सबळ पुरावे मिळत नाहीत. या यादवांचा सुरुवातीचा काळ म्हणजे ‘सेऊणदेश’ म्हणजे आजचा खान्देश. थोडक्यात नाशिक आणि देवगिरीच्या आसपासच्या प्रदेशात या यादवांचे छोटेखानी राज्य असावे.

सुरुवातीच्या काळात यादव हे तत्कालीन दख्खनचे प्रशासक राष्ट्रकुट राजांचे सामंत होते. राष्ट्रकुटांच्या गुर्जर आणि प्रतीहार साम्राज्यांसोबत झालेल्या युद्धांत अमोघवर्ष (प्रथम) आणि कृष्ण (द्वितीय) या राष्ट्रकुट राजांना यादव साम्राज्याचे दृढप्रहर आणि सेउणचंद्र यांनी मदत केली. त्या बदल्यात त्यांना ‘सेउणदेश’ चा काही प्रदेश बक्षीस देण्यात आला होता. पैकी दृढप्रहर ऐवजी सेउणचंद्र हाच मूळ यादव साम्राज्याचा संस्थापक असावा यावरून थोडा गोंधळ आहे. यादवांनी आपली राजधानी नाशिक च्या ईशान्येस चंदोरी येथे उभी केली मात्र हेमाडपंताच्या व्रतखंडात सेउणचंद्राची राजधानी श्रीनगर (सिन्नर) असल्याचे सांगितले आहे. दृढप्रहराने इसवीसन ८६० ते ८८० च्या काळात आणि सेउणचंद्राने इसवीसन ८८० ते ९०० ह्या काळात ह्या प्रदेशावर राज्य केले. मात्र त्यांच्या अधिपत्याखाली असलेला प्रदेश हा आजच्या नाशिक जिल्ह्यापेक्षाही लहान होता.

या नंतरच्या काळात धडीयप्पा (प्रथम), भिल्लम (प्रथम) आणि राजीग हे यादव राजे होऊन गेले. इसवीसन ९०० ते ९५० च्या काळात ह्यांनी राज्य केले. पुढील काळात वाडीग्गा , भिल्लम (दुसरा), वाडूगी, वेसुगी, सेउणचंद्र (दुसरा), एरमदेव, सिंहराज, मल्लुगी अशा बऱ्याच यादव राजांचा उल्लेख इतिहासात आहे. यातील बहुतांश नावे ही रामकृष्ण भांडारकर यांच्या The Early History of Dekkan आणि हेमाडपंताच्या बखरीद्वारे मिळतात. परंतु ह्यात नंतरच्या काळात आलेला भिल्लम (पाचवा) इथून यादव साम्राज्याची खरी कारकीर्द सुरु होते. भांडारकर यांच्या म्हणण्यांनुसार दृढप्रहर ते भिल्लम पाचवा यांदरम्यान सुमारे २३ यादव राज्यकर्ते होऊन गेले. त्यातील बरेचसे राजे हे एकाच पिढीचे (म्हणजे भाऊ) असल्यामुळे खूप साऱ्या पिढ्यांचा काळ गेला नाही. राष्ट्रकुट साम्राज्याकडून चालुक्यांचा पराभव झाला तेव्हापासून सुमारे ४३७ वर्ष यादव राज्य करत होते. त्यामुळेच दख्खनच्या इतिहासात यादव काळाचे महत्त्व वाढते.

भिल्लमचा उदय आणि देवगिरीची पायाभरणी

बाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात चालुक्य घराण्याचा पाडाव होताच दख्खनेत असलेल्या अस्थिरतेचा पुरपूर फायदा यादवांनी घेतला. ह्या काळात अमरमल्लुगी चा मुलगा बल्लाळ (अमरमल्लुगी हा मल्लुगी चा मुलगा) यादव साम्राज्यावर राज्य करत होता. परंतु यादव साम्राज्याची आणि देवगिरीची पायाभरणी केली ती पाचव्या भिल्लमने. भिल्लम हा मल्लुगीचा मुलगा होता किंवा पुतण्या ह्यावरून साशंकता आहे. आपल्या घराण्यातीलच दुफळी टाळण्यासाठी भिल्लम ने सेउणप्रदेशाच्या बाहेर आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि दख्खनेत आपले स्वातंत्र्य घोषित केले.

भिल्लमाने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली ती श्रीवर्धनचा किल्ला घेऊन. आणि तदनंतर प्रत्यंडगड (प्रचंडगड किंवा तोरणा) वर हल्ला केला. त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जाऊन ‘मंगलवेष्टके’ म्हणजे आजचे मंगळवेढे येथील राजाची हत्या केली. अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला. त्यामुळे भिल्लमचे स्वतःचे साम्राज्य हे यादवांच्या मूळ ‘सेउणदेश’ पेक्षा आकाराने बरेच मोठे झाले आणि भिल्लमच्या भावंडांमध्ये वितंड वाढले. परंतु भिल्लमाने इतर सर्व यादवांना थोपवत स्वतःला राज्यकर्ता घोषित केले. ह्याचा कालखंड इसविसन ११७५ च्या सुमारास धरता येईल.

स्वतःला राज्यकर्ता घोषित करताच आपल्या कारकि‍र्दीची सुरुवातीची काही वर्षे त्याने उत्तरेकडेच्या गुर्जर आणि माळवा प्रांताशी युद्धात घालवली आणि तिथे भरपूर यशही मिळाले. त्याने थेट मारवाड पर्यंत मजल मारल्याचे दाखलेही आहेत. मुत्तुगी आणि पाटणच्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे भिल्लम हा ‘माळव्याची डोकेदुखी’ बनला होता. त्याची उत्तरेतील कारकीर्द सुमारे इसवीसन ११८४ ते ११८८ दरम्यान राहिली असावी. उत्तरेत त्याने मारवाड पर्यंत मजल मारली असल्याचे दाखले असले तरी त्याला त्या प्रदेशांचा ताबा मिळवता आला नाही, मात्र मारवाड पर्यंत मारलेली मजल त्याला आत्मविश्वास देणारी ठरली असावी. म्हणून त्याने पुढे चालून संपूर्ण दख्खन चा सम्राट होण्याचे स्वप्न आखले. आधीच दख्खनच्या वर्चस्वावरून चालुक्य, होयसळ आणि कलचुरी साम्राज्यांमध्ये तणाव होताच. त्यात शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर ह्याला दक्षिणेतून होयसळ राजा वीरबल्लाळ आणि उत्तरेतून भिल्लम ह्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले आणि ह्यात होयसळ राजा वीरबल्लाळशी तोंड देतानाच सोमेश्वर चालुक्याचा पराभव झाला आणि तो राज्य सोडून इतरत्र निघून गेला.
याच गोंधळात भिल्लमदेवास समोर असलेली संधी दिसून आली. चालुक्य राजा सोमेश्वराने पुनःश्च सैन्य उभारून लढण्याची तयारी न दाखवता राज्य सोडून निघून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने समोरचा मार्गच मोकळा मिळाला अन होयसळ सैन्य येण्यापुर्वीच भिल्लमाने चालुक्यांची राजधानी कल्याणी (आजचे बसवकल्याण) आपल्या ताब्यात घेतली. तत्कालीन होयसळ नोंदीनुसार भिल्लमाने कल्याणीवर ताबा घेतल्याचा उल्लेख केला नसला तरी हेमाद्री (हेमाडपंत) ने त्याचा उल्लेख केला आहे. अन भिल्लमाने तत्काळ चालुक्यांच्या दक्षिणेत असलेल्या होयसळ सैन्यावर हल्ला केला. आधीच चालुक्यांवरच्या विजयामुळे आनंदात असलेल्या होयसळ सैन्याला भिल्लमाने पराभूत केले आणि म्हैसूर राज्यातील हसन प्रांताच्या भागापर्यंत थोपवून ठेवले. उपलब्ध माहितीनुसार इसविसन ११८७ ते ११८९ पर्यंत वरील घटना घडल्या असाव्यात. कल्याणीला असलेली राजधानी भिल्लमने देवगिरीला हलवली आणि आजचं देवगिरी हे शहर वसवलं. मुळात कल्याणी ही होयसळ साम्राज्याच्या अत्यंत जवळ होती, त्यामुळे बहुदा ती हलवून राज्याच्या अंतर्गत भागात हलवण्याचा विचार भिल्लमने केला असावा.

अशा पद्धतीने देवागिरीची पायाभरणी झाली आणि हळू हळू इथे किल्ला उभा राहत गेला. संपूर्ण किल्ला हा पाचव्या भिल्लमाने उभा केला नसला तरी त्याने त्याची सुरुवात केली हे नक्की. काहींच्या मते देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रकुट राजांनी उभा केला असे मत व्यक्त केले जाते. कारण किल्ल्याच्या उभारणीतील मानवी हातांनी तासलेले कडे आणि भूलभुलय्या पाहता ते राष्ट्रकुटकालीन कार्य वाटते, असेच कार्य वेरुळच्या लेणी मध्येही आढळते, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा किल्ला भिल्लमानेच उभा करण्यास सुरुवात केली असे मानावे लागेल.

तिकडे दक्षिणेत पराभवाने चिडलेला होयसळ राजा वीरबल्लाळने पुनश्चः दख्खनविजया करिता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याने बनावासी आणि नोलमबावडी वगैरे शहरे परत मिळवली. भिल्लमला येणाऱ्या काळाची चाहूल मिळाली आणि त्याने २ लक्ष पायदळ आणि १२००० घोडदळ घेऊन धारवाड कडे प्रयाण केले. इसविसन ११९१ च्या सुमारास धारवाड मधील सोरातूर येथे ह्या दोन्ही साम्राज्यांत युद्ध होऊन त्यात भिल्लम यादवाचा दारूण पराभव झाला. भिल्लमाचा सेनापती जैत्रपाल ह्याने मोठ्या हिमतीने लोकीगुंडी (लोकुंडी) चा किल्ला लढवला मात्र तो लढाईत मारला गेला. होयसळ वीरबल्लाळने येलबुर्ग,गुट्टी,बेल्लतगी आदी किल्ले जिंकून घेतले आणि कृष्णा व मलप्रभा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेशावर आपला ताबा प्रस्थापित केला.

ह्या युद्धात झालेल्या दारूण पराभवात झालेल्या आघाताने भिल्लमचा मृत्यू झाला. होयसळ नोंदीनुसार भिल्लम हा युद्धात मारला गेला व त्याचे शीर बल्लाळने तलवारी वर उचलून नेल्याचे म्हणतात परंतु ही नोंद इसविसन ११९८ मधील असून ११९२ मधील गदगचा शिलालेख मात्र भिल्लमच्या मृत्यूचा उल्लेख करत नाही.

भिल्लमाचा असा दारूण अंत झालेला असला तरी एक त्याला पराभूत राजा म्हणविता येणार नाही. कारण एक योद्धा म्हणून भिल्लमाने स्वतःचे असे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केले होते. ते स्वतःच्या हिमतीवर उभे केले होते. उत्तरेत त्याने थेट मारवाड पर्यंत छापेमारी करून दाखवली होती. आणि एका चाणाक्ष बुद्धिमत्तेने योग्यवेळी चालून जाऊन त्याने होयसळ राजांची दख्खन ताब्यात घेण्याची योजना धुळीस मिळवली होती. त्याच्या पराभव केल्या नंतरही होयसळ बल्लाळने कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाण्याची योजना कधी केली नाही. त्यामुळे भिल्लम हा तत्कालीन दख्खनेतील एक हुशार आणि शौर्यवान योद्ध होता असे म्हणता येईल.

जैतुगी

भिल्लमाच्या मृत्यू पश्चात् त्याचा मुलगा जैतुगी हा इसवी सन ११९१ मध्ये सत्तेवर आला. अत्यंत संकटाच्या वेळी सत्तेवर येऊन देखील त्याने तत्काळ तयारी करून होयसळ साम्राज्यापासून सीमा सुरक्षित केल्या व कृष्णा नदी ही होयसळ आणि यादव साम्राज्याची सीमा ठरवली गेली.

पूर्वीच्या चालुक्यांचे सामंत असलेले काकतीय घराणे देखील हळूहळू डोके वर काढू लागले. भिल्लमच्या मृत्यूचा फायदा उठवत काकतीय राजा रुद्र ह्याने आपला भाऊ महादेव ह्यास यादव साम्राज्यावर मोहिमेत पाठवले. इसवी सन ११९४ च्या काळात होयसळ साम्राज्याबरोबर शांती प्रस्थापित झाल्यानंतर जैतुगीने थेट काकतीय साम्राज्यावर आक्रमण केले व त्यात राजा रुद्र मारला गेला तर त्याचा भाऊ महादेवचा मुलगा गणपती हा युद्धात पकडला गेला. महादेवने काही काळ चोख प्रतीउत्तर दिले मात्र तो देखील काही काळात मारला गेला. पुढच्या काळात संपूर्ण काकतीय प्रदेशावर जैतुगी यादवाचे नियंत्रण होते मात्र त्याने हिंदूधर्माच्या शिकवणीनुसार युद्धकैदी म्हणून पकडल्या गेलेल्या गणपतीस इसवीसन ११९८ मध्ये पुन्हा काकतीय साम्राज्याच्या गादीवर बसवले व पुढे संपूर्ण काळ यादवांचे पाईक म्हणून राहण्याचे वचन घेतले.
जैतुगीच्या कार्यकाळाचा शेवट नेमका कधी झाला ह्याबाबत स्पष्टता नसली तरी महाराष्ट्र सरकारच्या गझेट मध्ये ती १२१० मानली आहे.

सिंघणदेव

यादव साम्राज्याची धुरा सांभाळणारा पुढचा राज्यकर्ता म्हणजे जैतुगीचा मुलगा सिंघण. इसवी सन १२१० ते १२४७ च्या काळात हा सत्तेवर होता. लहानपणापासूनच प्रदीर्घ काळ राजकुमार होण्याचा अनुभव असल्याने सिंघण निश्चितच कुशल राज्यकर्ता होता. अन ते त्याच्या कारकि‍र्दीकडे पाहून लक्षात येतेच.
यादव सम्राटांपैकी सर्वात बलवान आणि कुशल राज्यकर्ता म्हणून सिंघणचे नाव घेता येईल. त्याला वापरले गेलेले ‘प्रौढप्रतापचक्रवर्ती’ हे विशेषण योग्य ठरते.
सिंघण हा सत्तेवर येण्यापुर्वीच त्याने १२०६ च्या काळात होयसळ बल्लाळचा त्याने पराभव केला होता आणि विजापूर प्रांताचा बराचसा भाग त्याने जिंकून घेतला.सत्तेवर येताच त्याने पुनः होयसळ साम्राज्याविरुद्ध मोहीम सुरु करून धारवाड, अनंतपुर, बेल्लारी, चित्तलदुर्ग, शिमोगा आदी प्रदेश जिंकून घेतला.

कोल्हापूरचे शिलाहार राजे भोज हे यादवांचे पाईक होते मात्र तेथील राजा भोज ह्याने देखील आता यादव सत्तेविरोधात बंडाचे निशाण उगारले. त्यामुळे होयसळाविरुद्धची मोहीम पूर्ण होताच सिंघणदेव ने इसवी सन १२१७ मध्ये कोल्हापूर वर आक्रमण करून ताब्यात घेतले. तेथील राजा भोज जवळच असलेल्या परनाळा (पन्हाळा) किल्यावर पळून जाताच सिंघणने पन्हाळा देखील ताब्यात घेतला, राजा भोजला ताब्यात घेतले आणि त्याचे राज्य ताब्यात घेतले. ह्यानंतरच्या यादव घराण्यातील नोंदीनुसार सिंघणच्या एका सेनापतीने अंबाबाई मंदिरा समोर दरवाजा उभा केल्याचा उल्लेख आढळतो. कोल्हापूर येथून जवळच असलेल्या सौदत्ती मधील रट्टा वंशीय साम्राज्याचा अंत देखील सिंघणने करविला.

पुढच्या काळात सिंघणदेवने माळवा आणि गुजरात वर आक्रमण केले आणि तेथील परमार वंशीय साम्राज्यावर ताबा मिळवला. इसवी सन १२२० मध्ये केलेल्या आक्रमणात सिंघणला भरूचवर ताबा मिळवण्यात यश आले आणि बहुतांश गुजरात प्रदेशावर त्याचे नियंत्रण आले. पुढे झालेल्या अनेक मोहिमांत सिंघणने उत्तरेतल्या बहुतांश प्रदेशावर ताबा मिळवला आणि आपल्या नियंत्रणाखाली आणले.

सिंघणदेवच्या काळात यादव सत्तेने आपला सर्वोच्च यशस्वी काळ पाहिला. दक्षिणेतील होयसळ,काकतीय,चालुक्य किंवा मावळ,परमार यांपैकी कुणीही यादव साम्राज्याला विरोध करण्याची हिम्मत दाखवू शकला नाही आणि देवगिरीचे यादव, सिंघणदेवच्या काळात दख्खनचे मुख्य नियंत्रक बनून राहिले. उत्तरेस भरूच ते जबलपूर अशी नर्मदा नदी सीमा बनली. संपूर्ण मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातचा काही भाग, आंध्रचा उत्तर भाग, महाराष्ट्र आणि म्हैसूरच्या उत्तरेचा प्रदेश हा देवगिरीच्या छताखाली नियंत्रित झाला आणि यादव हे एकमेव दख्खनचे राजे बनले.

परंतु हे करत असताना सिंघणने काही महत्वाच्या चुका केल्या ज्यामुळे दख्खनचा पुढे येणारा सर्व इतिहास बदलला असता. उत्तरेतील मावळ, परमार, लता आदी साम्राज्ये इस्लामी आक्रमणांना तोंड देत असताना, अख्ख्या दख्खनवर नियंत्रण असणारे यादव आपल्या इतर शेजाऱ्यांना सामील होऊन इस्लामी आक्रमणाला सहज थोपवून,परतवून लावू शकले असते. पण दख्खन विजयाची महत्वाकांक्षा असलेल्या सिंघणने उत्तरेतील साम्राज्यांना इस्लामी आक्रमणा विरोधात मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच हल्ले करून त्यांना नुकसान करण्याची घोडचूक केली. अन दख्खनच्या इतिहासात पुनश्चः एकदा भयंकर उलथापालथ घडवून येण्याचा मार्ग मोकळा झाला. इसवी सन १२४६ च्या सुमारास सिंघणदेवचा मृत्यू झाला व त्याचा मुलगा कृष्णदेव सत्तेवर आला.

कृष्णदेव

कृष्णदेव हा इसवी सन १२४६ पासून १२६० च्या दरम्यान सत्तेवर होता. कृष्णदेव सत्तेवर येताच त्याने उत्तरेतील परमार साम्राज्यावर पुनःश्च आक्रमण केले. इसवी सन १२३५ मध्ये इल्तुमश च्या आक्रमणामुळे आधीच भिलसा आणि उज्जयिनी प्रांत गमावून खिळखिळे झालेल्या परमार राजा जैतुगीदेववर आक्रमण करून कृष्णदेवने परमार साम्राज्य ताब्यात घेतले. परमारांना साठ देऊन उत्तरेकडून होत असलेल्या इस्लामी आक्रमणा विरोधात मोर्चा काढण्याऐवजी परमारांवरच आक्रमण करण्याचा कृष्णदेवचा निर्णय दुर्दैवी होता. त्यामुळे दख्खनचे राजे म्हणून उदयाला आलेले यादव साम्राज्य अशा चुकांमुळेच पुढील काळात क्षणार्धात कोसळण्याची वेळ ओढवून घेऊ लागले.
परामर साम्राज्य ताब्यात घेतल्या नंतर कृष्णदेव ने गुजरातवर हल्ला करून दक्षिण गुजरातचा प्रदेश ताब्यात घेतला. ह्या नंतर १२६० मध्ये कृष्णदेवचा मृत्यू झाला.

महादेव

कृष्णदेवच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रामचंद्र हा लहान असल्या कारणाने कृष्णदेवचा भाऊ महादेव हा सत्तेवर आला. याने उत्तर कोकणातील शिलाहार साम्राज्यावर ताबा मिळवला. काकतीय साम्राज्यातील गणपती ह्या राजाच्या मृत्यूनंतर त्याची कन्या रुद्रम्बा ही सत्तेवर आली, त्यावेळी काकतीय साम्राज्यावर महादेवने प्रहार करून काकतीय सैन्यातील काही हत्ती पळवून नेले.

ह्याच महादेव राजाच्या पदरी असलेला मंत्री म्हणजे हेमाद्री अर्थात हेमाडपंत. ह्याच हेमाडपंताने व्रत-खंड, प्रसती, चतुर्वर्गचिंतामणि यांसारख्या ग्रंथांची निर्मिती केली. दख्खनच्या पठारावर होत असलेल्या ज्वारीच्या पिकाचा जनक म्हणून हेमाडपंताचे नाव घेतले जाते. आणखी महत्वाची कार्ये म्हणजे हेमाडपंताने मोडी लिपी वापरात आणून प्रचलित केली. सोबतच महाराष्ट्रात आढळणाऱ्या अनेक पुरातन मंदिरांपैकी ‘हेमाडपंती’ मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बांधकामाची विशिष्ट पद्धत म्हणजे चुना न भरता दगडे एकमेकांना जोडण्याची पद्धत हेमाडपंताने प्रचलित केली.

अम्मना (अमाणदेव)

महादेवच्या मृत्यूनंतर आधी म्हटल्याप्रमाणे कृष्णदेवचा मुलगा रामचंद्र हा सत्तेवर येणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता महादेवचा मुलगा अम्मान हा सत्तेवर आला. परंतु आता बराच वयात आलेला रामचंद्रदेव हा खरा सत्तेचा अधिकारी ठरत असल्याने महादेवच्या मंत्रीमंडळातील बहुमतांशी सरदारांचा कल रामचंद्रकडे होता. त्यात ऐन तरुण वयात असलेल्या अम्मानला संगीत व नृत्याची विशेष आवड होती.
ह्याचाच फायदा घेत, अम्मानाच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याबाहेर गेलेला रामचंद्र आपल्या काही विशेष व खात्रीतल्या सहकाऱ्यांसह नाट्यकाराचा वेश घेऊन देवगिरीच्या किल्ल्यात दाखल झाला व अम्मनाच्या दरबारात येऊन कला सादर करण्याच्या बहाण्याने त्याने थेट दरबारात अम्मनाला ताब्यात घेऊन कैद केले व मंत्रीमंडळातील इतर सरदारांच्या मदतीने स्वतःला पुन्हा सत्तेवर आणले.

रामचंद्रदेव

आपल्या चुलत भावाने मिळवलेली सत्ता परत घेऊन इतर सहकाऱ्यांच्या मदतीने रामचंद्र इसवी सन १२७१ मध्ये सत्तेवर आला. रामचंद्रने पुन्हा एकदा उत्तरेतील माळवा आणि परमार साम्राज्यावर आक्रमण करून सहज त्यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिणेकडेच्या होयसळ साम्राज्यावर आक्रमण करून त्यांच्या राजधानी पर्यंत मजल मारली. परंतु पुन्हा झालेल्या प्रतिकारामुळे रामचंद्रच्या सैन्याला माघार घ्यावी लागली.

त्यानंतर १२८६ ते १२९० च्या दरम्यान, रामचंद्रदेव यादवने ईशान्येला साम्राज्य विस्तार करण्याची योजना आखली आणि त्या नुसार आजचा चंद्रपूर भंडारा च्या पलीकडील प्रदेश जिंकून घेत जबलपूर जवळील त्रिपुरी देखील ताब्यात घेतले. एका शिलालेखानुसार यादव राजा रामचंद्रने बनारस (वाराणशी) वर ताबा मिळवल्याचा उल्लेख आहे मात्र तो ताबा फार कल टिकून राहू शकला नाही. जलालुद्दीन खिलजीच्या शक्ती पुढे रामचंद्रला माघार घ्यावी लागली आणि त्याचे सैन्य दक्षिणेत परतले. मात्र ह्या वाराणशी मोहिमेदरम्यान एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे तिथून जवळच असलेला माणिकपूरचा सरदार अल्लाउद्दिन खिलजीच्या सुभेदारीला पोहोचलेली झळ. रामचंद्रच्या स्वारी आणि चापेमारी मुळे अल्लाउद्दीनच्या क्षेत्रालाही हानी पोहोचली असावी ह्यातूनच बहुदा अल्लाउद्दीन ने दक्षिणेवर,विशेषतः यादव साम्राज्याकडून बदला घेण्याचे ठरवले असावे.

रामचंद्रदेवचा काळ म्हणजे अनेकविध साहित्य निपुणांनी नटला आहे. महादेव यादवच्या पदरी असलेला हेमाडपंत रामचंद्रदेवच्या पदरी देखील होता. रामचंद्रदेव रायाच्या काळातच संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. अन ह्याच काळ अनेक महानुभाव संत उदयास आले.

इस्लामी शक्तींचा दख्खनेत प्रवेश आणि यादव साम्राज्याचा अंत

इस्लामी शक्तींचा उत्तरेतला प्रभाव वाढू लागला आणि सुमारे शंभर वर्ष जुन्या यादव साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. तेराव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांत उत्तरेतल्या चालुक्य,परमार आदी साम्राज्याचा होत असलेला विनाश पाहून हीचं वेळ आपल्यावर देखील येईल आणि आपण त्यासाठी तयार राहावे असा विचार दुर्दैवाने यादव सम्राटाने केला नाही. उलट आधीच खिळखिळी झालेल्या आपल्या शेजारी साम्राज्यांशी दोन हात करून त्यांच्या विनाश घडवण्यात भागीदारी मिळवली.
आपल्या शेजारी राष्ट्रांशी मित्रत्व पत्करून परकीय सत्तेला आव्हान देण्याचे आणि आपल्या सर्वांचीच साम्राज्ये सुरक्षित करण्याचे पर्याय असताना यादव साम्राज्यासारख्या बलाढ्य शक्तीने अगदी उलट काम केले. त्यामुळे इस्लामी शक्तींना एक एक करत सर्वच राष्ट्रांचा विनाश करणे सहज शक्य झाले.
यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो १२९४ च्या काळात. जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दख्खनस्वारी करिता यादवांवर लक्ष ठेउनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरी वर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरी पासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा,कारण यादवांचे सैन्य विभागलेलं नसे. वर सांगितल्या प्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीन ला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत, जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दिन देवगिरीच्या दिशेने निघाला.
देवगिरीपासून ८० मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दिन येऊन पोचला त्यावेळेस रामचंद्रदेवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्राच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दिन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काहीही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकरदेवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता खरा पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्यसाठा देखील पुरेसा नव्हता. त्यामुळे रामचंद्रने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे काबुल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्यचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. अन अशा तर्‍हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेतील परकीय शक्तीचे पायिक बनले.

देवगिरीच्या पडावा होण्या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते. रामचंद्र किल्ल्याच्या वेढ्यात अडकला असताना माघारी खिलजीच्या सैन्या सोबत अधिक मोठे सैन्य दाखल होते आहे असे त्याला दिसून आले. ते खिलजीचे वाढीव सैन्य असावे आणि आता खिलजीची ताकद अधिक वाढली तर आपले काही खरे नाही असा कयास रामचंद्रने बांधला आणि तत्काळ शरण गेला. परंतु किल्ल्याची द्वारे उघडल्यानंतर रामचंद्रच्या लक्षात आले की मागून येत असलेले सैन्य म्हणजे त्याचाच मुलगा शंकरदेव हा होता. परंतु हे केवळ आख्यायिका असून ह्याला कुठलाही आधार नाही.

पुढे आयुष्यभर अल्लाउद्दिन खिलजी चा पाइक बनून राहिलल्या रामचंद्रचा मृत्यू इसवीसन १३११ मध्ये झाला. मधल्या काळात शंकरदेवने पुनःश्च खिलजी विरुद्ध उठाव केल्याने रामचंद्रला दिल्लीत अटक करवून नेण्यात आले खरे पण तेथे खिलजीने त्यास सन्मानाची वागणूक दिली.

शंकरदेव

रामचंद्रच्या मृत्युनंतर शंकरदेव सत्तेवर आला. शंकरदेव हा आपल्या पित्याच्या अत्यंत विरुद्ध स्वभावाचा होता. रामचंद्रने अगदी अलगद पत्करलेले पाईकत्व त्याला अजिबात मान्य नव्हते आणि तो सदैव खिलजीचा विरोध करू लागला. त्याने देवगिरीला पुन्हा स्वतंत्र करण्याची घोषणा केली. हे एक मोठे धाडसच होते आणि ते योग्यही असले तरी देवगिरी चे यादव साम्राज्य अत्यंत कमकुवत बनले होते.

शंकरदेवने पुन्हा उठाव करताच अल्लाउद्दिन खिलजी ने मलिक काफुरला दख्खनेत धाडले. मलिक काफुर ने शंकरदेवची हत्या करून यादवांना अस्ताला नेले अन यादव साम्राज्य केवळ नावाला उरले.

यादव सत्तेचा सूर्यास्त.

इसवी सन १३१५ मध्ये अल्लाउद्दिन खिलजी चा मृत्यू होताच मलिक काफुर दिल्ली कडे परत निघून गेला अन त्याचा फायदा उचलावा म्हणून रामचंद्रचा जावई हरपालदेव आणि राघव नामक एक सरदार ह्यांनी पुनः यादव सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीच्या सत्तेवर नव्याने आलेलं कुतुब मुबारक शाह ने १३१८ मध्ये देवगिरीकडे कूच करून हरपालदेवला ताब्यात घेतले व त्याला फासावर लटकवले अन अशाप्रकारे दख्खनच्या एक बलाढ्य साम्राज्याचा सूर्यास्त झाला कायमचा.

ह्या यादव इतिहासात विशेष नमूद करावे ते म्हणजे एका छोट्या,स्वतःच्या हिम्मतीवर निर्माण केलेल्या पाचव्या भिल्लमाच्या यादव साम्राज्याने दख्खनसम्राट होण्याचे स्वप्न पाहिले,आपल्या इतर बलाढ्य प्रतीस्पर्ध्यांना मात देत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले देखील मात्र आपल्या महत्वकांक्षा पूर्ण करत असतानाच बदलत्या काळाची कास धरत,वेळ पडेल तसे राजकारणाची गणितं बदलत अस्तित्व टिकवून ठेवणे यादवांना जमले नाही आणि एका हिंदू साम्राज्याचा दुर्दैवी अंत झाला.

हा लेख दैनिक सामना (संभाजीनगर आवृत्ती) द्वारा प्रकाशित दिवाळी २०१६ अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

20 Nov 2016 - 9:00 pm | आनंदयात्री

हा माहितीपूर्ण लेख इथे प्रसिद्ध केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूपशी नवीन माहिती मिळाली.

आशुतोष-म्हैसेकर's picture

20 Nov 2016 - 11:54 pm | आशुतोष-म्हैसेकर

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे

देवगिरी बोले तो दौलताबद बोल्ते वोहिच क्या?

आशुतोष-म्हैसेकर's picture

21 Nov 2016 - 11:56 am | आशुतोष-म्हैसेकर

हाओ देवगिरी म्हणजे दौलताबाद. जुनं देवगिरी नंतरच्या काळापासून त्याचं नाव दौलताबाद केलं

महासंग्राम's picture

21 Nov 2016 - 9:37 am | महासंग्राम

अत्यंत माहितीपूर्ण लेख यादव साम्राज्याचा लेखाजोखा सरळ सोप्या भाषेत मांडला आहे. आता प्रचेतस यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा. त्यातुन अजून जास्त माहिती चा खजिना उघडेल. पुलेशु.

अनुप ढेरे's picture

21 Nov 2016 - 10:22 am | अनुप ढेरे

छान माहिती.

गॅरी ट्रुमन's picture

21 Nov 2016 - 11:38 am | गॅरी ट्रुमन

मस्त लेख. आवडला.

दिपस्वराज's picture

22 Nov 2016 - 9:08 am | दिपस्वराज

लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.

प्रचेतस's picture

22 Nov 2016 - 10:23 am | प्रचेतस

लेख ओझरता वाचलाय.

वर भिल्लमाने श्रीवर्धन आणि प्रचंडगड घेतल्याचे उल्लेख आलेत. त्यातले श्रीवर्धन म्हणजे श्रीवर्धन बंदर नव्हे किंवा राजमाची- श्रीवर्धन हा किल्लाही नव्हे. पाचव्या भिल्लमाच्या वेळी उत्तर कोकणावर शिलाहार अपरादित्याची राजवट होती. त्याचे त्यावेळचे समुद्राधिप, कोंकणचक्रवर्ती अशी बिरुदे असलेले कित्येक लेख उपलब्ध आहेत.
हे श्रीवर्धन म्हणजे बीड नजीकची एखादा गढीवजा भुईकोट किल्ला असावा. महानुभाव पंथाच्या एका ओवीत बीड जवळच्या श्रीवर्धनचे कुणीतरी एक संत असा उल्लेख आहे. स्थानपोथीत कदाचित नक्की स्थान मिळू शकेल. स्थानपोथी मजकडे आहे,सवडीने बघून सांगतो.

वर उल्लेख केलेला प्रत्यांडकगड म्हणजे प्रचंडगड किंवा तोरणा नव्हे, शिवाजी महाराजांनी मूळचे तोरणा हे नाव बदलून प्रचंडगड असे केले. लेखात उल्लेखलेला प्रत्यंडकगड म्हणजे उस्मानाबादजवळचा बळकट किल्ला परांडा हा होय. भिल्लमाची बहुतेक सर्वच कारकीर्द ही प्रामुख्याने मराठवाड्यात गेली.

गामा पैलवान's picture

22 Nov 2016 - 6:47 pm | गामा पैलवान

प्रचेतस,

तुमच्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर लेखातलं हे वाक्य तपासून घ्यायला पाहिजे :

अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला.

रत्नागिरी प्रदेशाशी भिल्लमचा काही संबंध होता का? की मराठवाडा वा पश्चिम महाराष्ट्रातल्या रत्नगिरी नामे कुण्या किल्ल्याशी संबंध आहे?

आ.न.,
-गा.पै.

प्रचेतस's picture

22 Nov 2016 - 8:45 pm | प्रचेतस

नक्कीच नाही.
रत्नागिरीवर दक्षिण कोकण शिलाहारांची राजवट होती पण ती ११ व्या शतकात संपली हा भाग परत चालुक्यांच्या ताब्यात गेला. त्यांनी इथे कोणीतरी सामंत नेमला तो कोण ते नेमकं ठाऊक नाही. पण पाचवा भिल्लम कधीही रत्नागिरीपर्यंत पोहोचला नाही. त्याचे राजकीय कर्तृत्व बीड, सोलापूर, उस्मानाबाद , उत्तर कर्नाटकापर्यंत मर्यादित राहिले. कोकण प्रांतात यादवांचा शिरकाव झाला तो सिंघण दुसरा ह्याच्या कारकिर्दीत. सिंघणाने शिलाहार भोज दुसरा ह्याचा खिद्रापूरजवळ पराभव करून कोल्हापूर शिलाहार राजवट संपवली तर त्याचा मुलगा कृष्णदेव यादव याचे राजवटीत महादेव यादवाने सोमेश्वर शिलाहाराचा समुद्री युद्धात पराभव करून उत्तर कोकण शिलाहार संपवले. उरलासुरला कोंकण प्रांत नंतर रामचंद्रदेव यादवाने काबीज केला.

गामा पैलवान's picture

23 Nov 2016 - 3:10 am | गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद प्रचेतस. नक्केच नाही हे रत्नागिरी प्रांताला उद्देशून होतं असं दिसतंय.
आ.न.,
-गा.पै.

आशुतोष-म्हैसेकर's picture

22 Nov 2016 - 9:03 pm | आशुतोष-म्हैसेकर

प्रचेतस,

मी देखील ह्यावरून गोंधळलो होतो,पण ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.

आशुतोष-म्हैसेकर's picture

27 Nov 2016 - 12:37 am | आशुतोष-म्हैसेकर

ह्यातील झालेल्या चुकीमुळे मी पुनः एकदा नेमका मी चुकीची माहिती कुठून आणली ह्याचा विचार करत होतो. त्यात पाचव्या भिल्लमाची माहिती घेताना हा प्रत्यांकगड म्हणजे तोरणा असा सरळ उल्लेख आहे तो महाराष्ट्र सरकारच्या स्थलवर्णनकोशात. मी तिथूनच खात्रीने केली कारण त्या लेखात हेमाद्री च्या प्रसती ग्रंथाचा आधार घेऊन ही माहिती दिली आहे.

ती चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद,

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2016 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त माहितीपूर्ण लेख !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Nov 2016 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख चाळला. सविस्तर पोच निवांत देतो. मिपावर स्वागत.

-दिलीप बिरुटे