सानु इश्क लगा है प्यार दा...

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
26 Oct 2016 - 3:23 pm

ब्लॉगदुवा

बरेच दिवसांनी एका गाण्याविषयी लिहावंसं वाटलं. तसं हे गाणं मी बरंच आधी ऐकलेलं आहे. एकदा नव्हे, तर अनेकदा, आणि परत परत. झिंग चढते अशी अनेकदा अनेक गाण्यांची, त्यापैकीच हे एक.

a

आबिदा परवीन. एक विलक्षण आर्तता असणारा हा आवाज जेंव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेंव्हाच त्यातलं वेगळेपण कळलं. जाणवलं वगैरे नाही, स्पष्ट होतं ते. मस्त कलंदर हे सर्वसाधारणपणे टाळ्या वाजवायला लावणारं गाणं जेंव्हा आबिदा गाते तेंव्हा त्या गाण्याचा तुम्हाला अभिप्रेत असणारा अर्थ आणि तिला कळलेला अर्थ यात एक अनामिक अंतर असल्यासारखं वाटतं. ते अंतर म्हणजे कदाचित त्यातला निर्गुणीभाव असावा, जो आबिदाच्या प्रत्येक गाण्यात तुम्हाला दिसतो. मग ती ग़ज़ल असो किंवा एखादा सूफ़ी क़लाम.

सूफ़ी म्हटलं की आबिदाचंच नाव प्रथम तोंडावर येतं. ज्या एकात्मतेने आणि तल्लीनतेने आबिदा सूफ़ी गाते तसं कुणीही गात नसेल असं म्हणावंसं वाटतं. मग ते छाप तिलक सब छीनी असेल, किंवा तेरे इश्क नचाया असेल किंवा रांझण असेल; आबिदाने गायलेल्या प्रत्येक सूफ़ी गाण्यावर आपली अशी छाप पाडली आहे की आबिदा म्हणजे सूफ़ी असं समीकरणच व्हावं. अर्थात, माझा सूफ़ी किंवा आबिदा विषयांवर फार अभ्यास नाही पण जे कानामार्गे मनापर्यंत पोचतं, ते जनापर्यंत पोचवायची अंतरिक इच्छा होते. आबिदाचं असंच एक हे गाणं जे पहिल्यांदा ऐकल्यापासून ते आजतागायत नेहमीच माझ्या मोबाईल, पेनड्राईव्ह सगळ्या कलेक्शन मधे आपलं एक अढळ स्थान धरून आहे. 'निगाह-ए-दरवाईशां'

कोक स्टुडिओ पाकिस्तान सीझन ३ मधलं हे गाणं प्रत्येक वेळा तल्लीन करून जातं. प्रत्येक वेळा त्यातल्या एखाद्या ओळीचा एक निराळाच अर्थ लागतो आणि प्रत्येक वेळा ते पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.

बुल्ले शाह या पंजाबी-सूफ़ी कवीचे अनेक वेगवेगळे दोहरे, काफ़िए (या पंजाबी काव्यप्रकारांबद्दल माहिती शोधतो आहे) या गाण्यात एकत्र आणलेत, अगदी हिरे वेचावेत तसे. एकाहून एक सरस. आणि त्याला मोहक चाल आणि आबिदाचा जमिनीपासून अंतराळापर्यंत स्वैर विहार करू शकणारा स्वर्गीय आवाज यांची जोड आहे त्यामुळे हे गाणं ऐकणार्‍याच्या अक्षरशः मागे लागतं. अर्थात, तितक्या तन्मयतेने ऐकलं तर. त्यातल्या काही निवडक ओळी व त्यांचा माझ्या कुवतीनुसार भावानुवाद देण्याचा इथे प्रयत्न आहे. संपूर्ण गाण्याचा दुवा शेवटी आहेच.

ना खुदा मसीह्ते लभदा
ना खुदा विच काबे
ना खुदा कुरान किताबां
ना खुदा नमाज़े

हे ऐकताना देव देव्हार्‍यात नाही ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अगदी तोच विचार मांडलाय इथे.

मशिदीत नाही देव
काब्यात देव नाही
ना देव प्रार्थनेमध्ये
धर्मात देव नाही

सानु इश्क लगा है प्यार दा
सानु प्यार दा, दिलदार दा

ही ध्रुवपदाची ओळ. प्रेम या भावनेवर प्रेम जडतं तेंव्हा ते व्यक्तिसापेक्ष उरत नाही ते वृत्तीसापेक्ष होतं, त्यातला अहंभाव जातो आणि निखळ, निर्मळ प्रेम उरतं ज्याला अपेक्षेचं कोंदण नसतं.

प्रेमात रंगले प्रेम
प्रेमात लाभला सखा
आकाश व्यापले प्रेमे
सांगती चंद्रतारका

अशाच आशयाच्या आणखी काही ओळी आहेत,

ना रब अर्श मुअल्ला उत्ते
ना रब खाने काबे हू
ना रब इल्म किताबी लभा
ना रब विच मेहराबे हू
गंगा तीरथ मूल न मिलेया
पैंदे बेहिसाबे हू

ना नभात ना काब्यात
देवळात ना ग्रंथात
व्यर्थ ती भेट गंगेची
काठी न तू न पात्रात

किंवा या ओळी ज्या मला खूप भावतात,

मसजिद ढा दे
मंदिर ढा दे
ढा दे जो कुछ ढहदा
पर किसी दा दिल न ढा
रब दिलांविच रैंदा

खरं तर अगदी साधा विचार आहे परंतु त्याच्या मांडणीने त्याचं सौंदर्य खुललंय. माणसात देव बघावा हे अनेक थोरांनी सांगितलेलं आहेच. अर्थात, तो देव बहुतेकांना दिसतच नाही ही वेगळी गोष्ट. ती दृष्टीच नाही. उपास-तापास, तीर्थयात्रा करून पुण्य शोधणारे महाभाग जगात लाखोंनी आहेत. ट्रेनमधे असं कितीदा होतं की दारात उभा माणूस कुठलं देऊळ दिसलं की हात एकदा ओठाला एकदा कपाळाला लावून काहीतरी नमस्कारसदृश कृती करतो, आणि चार सेकंदांनी मागच्या माणसाकडे रागाने बघून 'धक्का मत दे ***' म्हणतो. गाडीच्या डॅशबोर्डवर एक मिनिएचर देऊळच करून ठेवणारे लोक म्हातार्‍या माणसाला रस्ता क्रॉसही करू देत नाहीत. तिथेही शिव्या देतात. अशी उदाहरणं बघितली की वाटतं, यांच्या भक्तीला अर्थच नाही जर ती फक्त देवापुरती मर्यादित असेल. भक्ती माणसांवर केली पाहिजे.

तोड ती देवळे सारी
तोड जे वाटते जेथ
सांभाळ मात्र ह्रदयांना
देवत्व नांदते तेथ

दिल की बिसात क्या जी
निगाह-ए-जमाल में
एक आईना था
टूट गया देखभाल में

निव्वळ सुंदर विचार. प्रेमाने भरलेल्या एका सुंदर कटाक्षापुढे ह्रदयाचा टिकाव कसा लागावा, त्याची पात्रता ती काय! एक आरसा असावा तसं ते (ह्रदय) होतं, सांभाळ करता करता तुटलं.

नजरेच्या खेळात बिचार्‍या
ह्रदयाची ती पोच किती
सांभाळातच तुटे आरसा
जखमेची त्या बोच किती

रातें जागै शेख सदावें
ते राते जागण कुत्ते, तें थि उत्ते
दर मालिकदा मूल न छड्डे
भावें सौ सौ पाउंदे जुत्ते, तैं थि उत्ते
रुख्ही सुक्खी रोटी खांदे
अते जा ररे ते सुत्ते, तैं थि उत्ते
चल वे मियां बुल्लेया चल यार मना ले
नै ते बाज़ी ले गए कुत्ते, तैं थि उत्ते

याचं थोडं विश्लेषण करायला हवं. ही प्रथमदर्शनी बुल्ले शाह ने माणसाची कुत्र्याशी केलेली तुलना आहे. की तुम्ही रात्र रात्र जागता आणि स्वतःला शेख म्हणवता. ते कुत्रेही रात्रभर जागतात, मग ते तर तुमच्याही वरचढ आहेत. लोकांनी मारलेल्या चपला, दगड झेलूनही ते मालकाच्या (घराच्या) दारावरून हटत नाहीत, ते तर तुमच्याही वरचढ आहेत. ते शिळी कच्ची पोळी खाऊन राहतात, जमिनीवर झोपतात, ते तर तुमच्याही वरचढ आहेत. तेंव्हा भल्या माणसा, आपल्या जवळच्या मित्राची, माणसाची समजूत काढ, म्हणजे त्यांना धरून रहा, नाहीतर ते कुत्रेच (माणसापेक्षा, प्रत्येक बाबतीत) वरचढ ठरतील. अहंभाव, स्वार्थीपणा, हपापी वृत्ती अशा सगळ्या माणसाच्या रिपुंवर या चार ओळी निशाणा साधतात. माणूस जातीला प्राण्यांपासून वेगळं करणार्‍या गोष्टी म्हणजे मन, विचार, भावना. परंतु त्याच गोष्टी माणूस जपू शकला नाही. त्यामुळे संरक्षणापासून मनोरंजनापर्यंत अनेक गोष्टींसाठी माणूस प्राण्यांचा वापर करू लागला. इथेच खरं तर मानवजातीचं अपयश, आणि खरं रूप उघडं पडतं.

मला पंजाबी येत नाही. बराचसा अर्थ मी साधारण समजून लावलेला, किंवा जालावरच्या वाचनाच्या आधारे लावलेला आहे तेंव्हा चुका असू शकतात. जाणकारांनी प्रतिसादातून त्या सुधारल्या तर मनापासून स्वागत आहे.

तूनळीचा दुवा खालीलप्रमाणे:
https://www.youtube.com/watch?v=VOwWo2-bd2M

संगीतकविताभाषाविचारआस्वादलेखमत

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

26 Oct 2016 - 4:55 pm | महासंग्राम

खूप सुंदर रसग्रहण, विशेषतः

दिल की बिसात क्या जी
निगाह-ए-जमाल में
एक आईना था
टूट गया देखभाल में

ह्या ओळी आवडल्यात खास करून...

अवांतर आबिदा परवीनच कोक स्टुडिओ सिझन ९, भाग १ मधलं ये सब तुम्हारा करम है आका पण नक्की ऐका

वेल्लाभट's picture

4 Nov 2016 - 4:14 pm | वेल्लाभट

ते तुम्ही सांगितलेलं गाणं छान आहे! :) आभार सुचवल्याबद्दल.

अप्पा जोगळेकर's picture

26 Oct 2016 - 6:43 pm | अप्पा जोगळेकर

अरेच्चा, ही तर पाकडीण दिसते. त्यामुळे धागा पुढे वाचता आला नाही.

वेल्लाभट's picture

27 Oct 2016 - 10:50 am | वेल्लाभट

आहे खरं. बरोबर आहे तुमचं.

निखिल माने's picture

9 Nov 2016 - 3:01 pm | निखिल माने

आबिदा परवीनच वो हमसफर था हे गाणं मला फार आवडत. फार सुंदर गातात त्या

निखिल माने's picture

9 Nov 2016 - 3:01 pm | निखिल माने

आबिदा परवीनच वो हमसफर था हे गाणं मला फार आवडत. फार सुंदर गातात त्या