गुरबानी!

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 12:30 pm

आज एका वेगळ्याच विषयावर लिहायचा मोह झाला आहे. आज सकाळीच मोबाइलवर गाणी ऐकताना अचानक माझी अत्यंत लाडकी गुरबानी ‘इक ओंकार सतनाम’ ऐकायला मिळाली आणि लिहावेसे वाटले. (गुरबानी हा शब्द ईकारान्ती असल्यामुळे मी स्त्रीलिंगी वापरत आहे.)
मन अशांत असताना ही गुरबानी ऐकल्याचे असे खास आठवत नाही परंतु ही जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा मनाला अतिशय शांत, प्रसन्न वाटतं हे मान्य करायलाच हवं. मला वाटतं कोणत्याही श्लोक/मंत्र उच्चारात ते सामर्थ्य असतं. त्यातील लय आणि शांत रस याचे ते फलित असावे. आपले ‘मनाचे श्लोक’ किंवा ‘गायत्री मंत्र’ हे सुद्धा तितकेच प्रभावी आहेत. पण मला आज ‘आपलं आणि इतरांचं’ ह्या फंदात न पडता त्या पलीकडे जाऊन व्यक्त व्हायचंय. सरतेशेवटी सर्व धर्मांची शिकवण ही मानवतेचा उद्धार करणारी असते. ‘धूल का फूल’ ह्या सिनेमातील साहिर लुधियानवी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ हे आज ६५ वर्षांनंतर सुद्धा समर्पक वाटतंय. तेव्हा तुलनात्मक दृष्टीकोन न ठेवता एक व्यक्ती म्हणून जे आवडते ते समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून पुढील लेखात मी तुलनात्मक लेखनाचा मोह टाळला आहे.
मी लहानाची मोठी झाले त्या काळात आजूबाजूला शीख (Sikh) सोडून बाकी सर्व धर्माचे लोक होते. आमच्या सोसायटीमध्ये मराठी, गुजराती, पारसी, भय्या, पंजाबी, सिंधी, मुस्लिम आणि अनेक ख्रिस्ती होते. सर्व गुण्या गोविंदाने एकत्र वाढलो. आमचे शेजारी पंजाबी आणि मुस्लिम होते. त्यामुळे विविध संस्कृती चालीरीती जवळून पहिल्या, अनुभवल्या असल्या तरी शीखांविषयी फारसे काही माहित नव्हते.
अकरावीत असताना केस कापायला मी नवीनच उघडलेल्या पार्लर मध्ये गेले तेव्हा ते एका शीख बाईचे होते ते कळले. घरातच बाल्कनी मध्ये तिने चालू केले होते. ही माझी पहिली वहिली ओळख. मला अजून आठवतंय की केस कापताना ती खूप गप्पा मारत होती. त्यांच्या धर्मात केसाला कात्री लावत नसताना तिने इतरांसाठी ती हातात घेतली आणि त्यासाठी तिला थोडाफार संघर्ष करावा लागला हे सर्व सांगितल्याचे आठवते आहे. लग्नानंतर ‘कॉलनी’ वास्तव्यात काही जणांशी ओळख झाली तरी मुलांच्या व्यापात तेव्हा जास्त जाणून घ्यायला सवडच नव्हती. मग हळू हळू हिंदी टीव्ही मालिका आणि सिनेमा ह्यातून आणि आंतरजालावरून बरीच माहिती मिळत गेली. जी चांगली माहिती मिळाली ती वाचून कौतुक वाटले.
सर्व समभाव (All are equal) आणि नि:स्वार्थी सेवा (Selfless service) ही मुख्य शिकवण! दसवंद म्हणजे मिळकतीतला आणि वेळेतील एक दशांश (Ten percent) भाग हा सेवेसाठी देणे अपेक्षित असते. गुरुद्वारा मधील लंगर माहीतच असेल. शाकाहारी भोजन जे सर्व एकत्र येऊन बनवतात आणि सर्वाना मोफत उपलब्ध असते. सर्वाना म्हणजे कोणालाही जाऊन जेवता येते. गुरुद्वारा मध्ये सर्व समान मानले जातात. सर्व अनुयायी आर्थिक आणि व्यक्तीश: सेवा करतात. कोणतेही कष्ट करा पण भीक मागू नका हेही शिकवले जाते. गुरुद्वारा मध्ये धर्म, प्रांत, लिंग भेद न ठेवता कोणीही जाऊ शकतात. तिथे गुरबानीचे पठण होत असते. गुरबानी म्हणजे गुरूंनी लिहिलेली ज्ञानवाणी किंवा चित्तवाणी.
अशीच एक गुरबानी आपण बरेचदा ऐकली आहे – ‘इक ओंकार सतनाम’- रंग दे बसंती मधील. मला ही खूप आवडते म्हणून मी अर्थ जाणून घेतला तर तोही आवडला. ‘गुरु ग्रंथ साहिब’ मधील ‘मूल मंत्र’ मधील प्रथम ओवी आहे जी सकाळच्या प्रार्थनेसाठी म्हणतात. आज सिनेमाच्या माध्यमातून गुरबानी घराघरात ऐकली गेली आहे. श्रद्धा ही व्यक्तीनुरुप बदलत असते. तेव्हा कोणी प्रार्थना म्हणून ऐकेल तर कोणी फक्त एक गाणं म्हणून ऐकेल. पण तरीही ती अनेक लोकांच्या तोंडी आहे आणि तिला सर्वत्र ओळख मिळाली आहे.
प्रत्येक धर्म श्रेष्ठ असतो आणि चांगलीच शिकवण देत असतो. कोणी कोणत्याही धर्माचा असू दे त्याने ‘माणुसकी’ हा धर्म विसरू नये हीच सदिच्छा!

– उल्का कडले

Gurbani

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

ੴ ਸਤਿ ਨਾਮੁ ਕਰਤਾ ਪੁਰਖੁ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰੁ ਅਕਾਲ ਮੂਰਤਿ ਅਜੂਨੀ ਸੈਭੰ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦਿ ॥
इक ओंकार सत नामु करता पुरखु निरभउ निरवैरु अकाल मूरति अजूनी सैभं गुर प्रसादि ॥
॥ ਜਪੁ ॥
जपु ॥
ਆਦਿ ਸਚੁ ਜੁਗਾਦਿ ਸਚੁ ॥
आदि सचु जुगादि सचु ॥
ਹੈ ਭੀ ਸਚੁ ਨਾਨਕ ਹੋਸੀ ਭੀ ਸਚੁ ॥੧॥
है भी सचु नानक होसी भी सचु ॥१॥
ਸੋਚੈ ਸੋਚਿ ਨ ਹੋਵਈ ਜੇ ਸੋਚੀ ਲਖ ਵਾਰ ॥
सोचै सोचि न होवई जे सोची लख वार ॥
ਚੁਪੈ ਚੁਪ ਨ ਹੋਵਈ ਜੇ ਲਾਇ ਰਹਾ ਲਿਵ ਤਾਰ ॥
चुपै चुप न होवई जे लाइ रहा लिव तार ॥
ਭੁਖਿਆ ਭੁਖ ਨ ਉਤਰੀ ਜੇ ਬੰਨਾ ਪੁਰੀਆ ਭਾਰ ॥
भुखिआ भुख न उतरी जे बंना पुरीआ भार ॥
ਸਹਸ ਸਿਆਣਪਾ ਲਖ ਹੋਹਿ ਤ ਇਕ ਨ ਚਲੈ ਨਾਲਿ ॥
सहस सिआणपा लख होहि त इक न चलै नालि ॥
ਕਿਵ ਸਚਿਆਰਾ ਹੋਈਐ ਕਿਵ ਕੂੜੈ ਤੁਟੈ ਪਾਲਿ ॥
किव सचिआरा होईऐ किव कूड़ै तुटै पालि ॥
ਹੁਕਮਿ ਰਜਾਈ ਚਲਣਾ ਨਾਨਕ ਲਿਖਿਆ ਨਾਲਿ ॥੧॥
हुकमि रजाई चलणा नानक लिखिआ नालि ॥१॥

बोका-ए-आझम's picture

17 Oct 2016 - 1:08 pm | बोका-ए-आझम

गुरुद्वारात सकाळच्या वेळी जेव्हा ग्रंथी ती म्हणतात तेव्हा तर ऐकायला अतिशय छान. फार शांत वाटतं. अर्थ समजला नाही तरी काहीही फरक पडत नाही.

रविकिरण फडके's picture

17 Oct 2016 - 1:10 pm | रविकिरण फडके

'सरतेशेवटी सर्व धर्मांची शिकवण ही मानवतेचा उद्धार करणारी असते' हे फार सर्वसाधारण विधान - motherhood statement - झाले, नाही का? शिकवण ह्या शब्दात नेमके काय अभिप्रेत आहे, त्या धर्माचे तत्वज्ञान की त्याचे आचरण?
तत्वज्ञानाच्या पातळीवर बोलायचे झाले तर इस्लाम आणि इसाई हे धर्म असे मानतात की जो कोणी ह्या धर्माचा नसेल तो पापी आहे आणि त्याचे पुनर्वसन केल्याखेरीज पर्याय नाही. हे पुनर्वसन कसे करायचे ह्याबद्दल वेगवेगळी मते व मार्ग असतील. इसाई धर्माने त्यासाठी लाखो धर्मप्रसारक निर्माण केले व त्यांनी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबून अधिकाधिक लोकांना आपल्या धर्मात ओढले. राजसत्तेने त्यांना मोठ्या प्रमाणावर रसद पुरविली हे जगजाहीर आहे. इस्लामने धर्मप्रसारासाठी काय काय केले हा तर चर्चेचा विषयही होऊ नये.
राहता राहिला प्रश्न आचरणाचा. केवढे मोठे भाग्य आहे की प्रत्येक इसाई किंवा मुस्लिम माणूस आपल्या तत्वज्ञानाचे 100% आचरण करीत नाही! तो आपल्या सारासार विवेकाचा, common sense चा अवलंब करतो. नाहीतर अन्य धर्मियांना जगणे मुश्किल झाले असते. एकूणच, लोकांनी एकमेकांशी व्यवहार करताना माणूस म्हणून तो करावा आणि धर्म घरात ठेवावा हे शहाणपणाचे. बरेचसे लोक तसे करतातही हे नशीबच.

एस's picture

17 Oct 2016 - 1:10 pm | एस

फार सुंदर.

पद्मावति's picture

17 Oct 2016 - 2:04 pm | पद्मावति

खरंच सुंदर.

अनिंद्य's picture

17 Oct 2016 - 4:02 pm | अनिंद्य

गुरबानी ऐकायला खूप आवडते,
शब्द फार काही नाही समजले तरी स्वरावली बहुतांशी
हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतावरच बेतलेली असल्याने स्वर परिचित वाटतात.

मी कधी गुरुद्वारा मध्ये न गेल्यामुळे तेथील प्रत्यक्ष ऐकली नाही आहे.
मी अर्थ असलेली युट्युब लिंक दिली आहे. पण ती उघडत नाही आहे. :(
@ एस, पद्मावति - धन्यवाद!

अगदी असा मंजुळ स्वर कानी पडला कि श्रमपरिहार झाल्याचा फील येतो...
मराठीत अर्थ बघितला पाहिजे...

मराठीत मला समजलेला अर्थ मी लिहून काढला होता. शोधून द्यायचा प्रयत्न करते. खाली लिंक दिलीय त्यात इंग्लिश अर्थ दिलेला आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2016 - 6:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

गुरबानी! अहाहा

____/\_____

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2016 - 9:00 pm | स्वाती दिनेश

छान लिहिले आहेस उल्का.
आमची एक जर्मन मैत्रिंण भारत दौर्‍यावर गेली होती. हे लोकं बहुतेकदा पहिल्यांदा भारत पाहतात तेव्हा गोल्डन ट्रायांगल म्हणजे ताजमहाल, जयपूर,उदयपूर आणि अमृतसर पाहतात. तिला विचारले, कसा वाटला तुला आमच्या भारतातला हा भाग? तिचे उत्तर, राजस्थान रॉयल आहे, ताजमहाल अद्भुतच आहे पण अमृतसरच्या स्वर्णमंदिरात खूप शांत, अगदी आतून, मनाच्या तळातून शांत वाटले.
तिला तर हिंदी, पंजाबीचा गंध नाही की गुरुबानी शी संबंध नाही, तरी तिची भावना मात्र तीच होती हे ऐकून मला उगाचच परत त्या स्वर्णमंदिराच्या आवारात जाऊन गुरुबानी ऐकावीशी वाटायला लागले.
स्वाती

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2016 - 9:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

फार कमी वयात मी मरण पाहिले, सगेसोयरे डोळ्यासमोर जाताना पाहिलेत, लहानवयात घर सोडले, उघड्या जगात लाथा खाऊन राहिलो, टणक झालो, इतका की आजकाल सहसा डोळ्यात टिपुस येत नाही, पण गुरबानी ऐकली की अखंड धारा सुरु होतात, तसाही शीख लोकांबद्दल अपरिमित आदर आहेच, १९८४, खलिस्तान ह्याच्या नंतर जन्मलेल्या पिढीतले आम्ही लोक पोरंटोरं समजा, पण शीख आवडतात खरे :)

अजया's picture

17 Oct 2016 - 10:40 pm | अजया

कधी ऐकली नव्हती गुरबानी.तुझा लेख वाचून ऐकायची इच्छा झाली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2016 - 10:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

रंग दे बसंती सिनेमा पाहिला असेल ताई तर त्यात टायटल सॉंग सुरु व्हायच्या आधी असलेली गुरबानी :)

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2016 - 11:10 pm | स्वाती दिनेश

लिहायला आले होते. प्लस किरण खेर इक ओंकार.. म्हणताना तिच्या चेहर्‍यावरचे त्यावेळचे भाव..
स्वाती

वर बापूंनी सांगीतल्याप्रमाणे माझाही शीख हा आवडता धर्म आहे. रुममेट शीख असल्यामुळे त्याच्या बरोबर गुरुद्वारात जाणे. तेथील स्वादीष्ट भोजन खाणे. तेथील गुरुबाणी ऐकणे. सेवा- जेवण वाढायला मदत करणे ही कामे करताना मनाला बरे वाटायचे. एवढा आनंद कधी आपल्या देवळात जाउन मिळाला नाही. शीख लोकांचा स्वाभीमानी आणि दीलदार स्वभाव, कोणतेही काम करताना मन लाउन करण्याची पध्द्त यामुळे ते एक चांगले मित्र असतात. मित्राला रोज सकाळी पगडी बांधायला मदत करणे यात एक आत्मीक समाधान मिळत असे.
परदेशात शीख समाजाबद्दल बरंच कुतुहल आहे. दाढी मुळे परदेशी लोक त्यांना मुसलमान समजतात. पण मी परदेशी लोकांचा गैरसमज दुर केलाय.

उल्का's picture

17 Oct 2016 - 11:01 pm | उल्का
उल्का's picture

17 Oct 2016 - 11:32 pm | उल्का

स्वातीताई, सोन्याबापू व खटपट्या - तुमचे तिघांचे अनुभव बोलके आहेत. त्यांचे ते 'जो बोले सो निहाल सत श्री अकाल' पण किती जोशात असतं. पाच 'क' ने सुरु होणाऱ्या वस्तू... लिहायला खूप आहे. जेवढं वाचलं त्याने उत्सुकता वाढली. पण मी लेखन गुरबानी पुरतं सीमित ठेवलं.
स्वातीताई, मलाही सुवर्ण मंदिरला एकदा भेट द्यायची आहे. तिथे लंगर हा त्यांचा प्रसाद खाण्याची आणि ही गुरबानी ऐकायची इच्छा आहे. :)

पिशी अबोली's picture

17 Oct 2016 - 11:34 pm | पिशी अबोली

छान लेख!

हॉस्टेलशेजारीच गुरुद्वारा आणि पंजाबी कॉलनी. पंजाबी आंटी म्हणून एक जेवण बनवतात. व्यवसाय म्हणून करत असल्या तरी त्यांच्या घरी गरमागरम रोट्यांचा हिशोबच नसतो. वर तुपाची धार. त्यांच्या घरी बसून सगळं ऐकायला मिळतं शांत.