रात्र-कोजागरीच्या निमित्ताने

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
13 Oct 2016 - 8:12 pm

कोजागरीच्या रात्री जागायचं लहानपणी खूप अप्रूप होतं. 'को जागर्ति' म्हणत देवी आली आणि मी झोपलेली असले तर कसं चालेल, असा माझ्या दृष्टीने बिनतोड प्रश्न बाबांसमोर केलेला आठवतो. 'मी खात्री पटवून देईन तिची तू झोपलेली असलीस तरी जागीच आहेस याची' हे तेवढंच बिनतोड उत्तर पेंगुळलेल्या डोळ्यांनी ऐकताना खरं वाटणारच! पुढे वर्षातून एकदा जागवायची रात्र रोजचीच होऊन गेली, तेव्हा रात्रीचं खरंखुरं रूप कळायला लागलं..

घरी असले, की रात्रीत निरनिराळे आवाज पावसाळ्यात येतातच, पण पावसाळा संपला की रातकिडे किरकिर करू लागतात. कित्येकदा घरच्या फोनवर रातकिड्यांचा आवाज ऐकू येतो आणि खूप शांत वाटतं. तेच इथे पुण्यात दिवसभर इतके आवाज, की रात्रीच्या शांततेत त्या आवाजांचे तरंग उमटत राहतात. तरीही, सगळे झोपी गेल्यावर कॉफी घेऊन खिडकीत बसून वाचणे हा आनंद कधी ना कधी मिळतोच. तेवढ्यासाठी ३-४ वाजवण्यात मला कधीच फारसं वाईट वाटलेलं नाही.

एकदा रात्री बसचा नेहमीचा  कंटाळवाणा प्रवास करताना गाडी घाटाला लागली, आणि घाटात खोल होत जाणारी रात्र एकदम समोर आली. अत्यंत निरभ्र आकाशात दिसणारे चंद्र-तारे, आणि निश्चल झाडांमधून भिनत जाणारी रात्र पाहून अंगावर एकदम शहारा आला होता. .

गोवा एक्प्रेस मधून दिवसा दिसणारा दूधसागर बघायला नुसती झुंबड उडते. हा रात्री कसा दिसतो ते पाहण्यासाठी मुद्दाम ३ वाजेपासून उठून खिडकीला डोळे लावून एकदा बसले होते. आणि तो खरोखर दिसलासुद्धा.. ती रात्र आणि तो दूधसागर यांना जणू काही एकमेकांचा कैफ चढला होता. तिची शांत तंद्री भंग करण्याचा चंग बांधून त्याचं फेसाळतं नृत्य चालू होतं. आणि त्याचे हे प्रयत्न ओळखूनच जणू काही  ती त्याच्या भोवती अजून गडद होत चालली होती. असलं अद्भुत माझ्या मानवी मर्यादांना झेपणारं नव्हतं, पण कायम मनावर कोरलं मात्र गेलं आहे.

राजापूरला मामाच्या घरी खळ्यात बाजेवर बसून ऐकलेल्या भुतांच्या गोष्टींच्या रात्री एकातरी भुताच्या भासाशिवाय पूर्ण झालेल्या आठवत नाहीत. कवठीचाफ्याच्या झाडावर बसून जुन्या लाकडी गजांमधून भूत हात आत घालणार याची तेव्हा कोण भीती! शंकरेश्वराच्या मंदिराजवळ वडे तळणारी आणि चाफ्याच्या झाडावर 'ज्योत से ज्योत' गाणं गाणारी भुतं तेव्हा कशाला, आजही तसल्या मिट्ट रात्री खरीच वाटतात.

एकदा एका फील्डवर्कमधे किंचित उंच ठिकाणी असलेल्या एका गावात रात्र झाली..पांघरुण घातल्यासारखं अंधाराने वेढून घेतलं. आणि आकाशातली नक्षी इतकी काही स्वच्छ दिसू लागली, की अजून थोडं चढून गेलं तर लागेलच हाताला मृग नक्षत्र.. आणि नुकतंच केप टाऊनला फील्डवर्कला येताना एका खगोलप्रेमी मैत्रिणीने वेगळाच सल्ला दिला. एखाद्या रात्री आकाश बघ. तिथे वेगळं दिसेल आपल्यापेक्षा. त्यामुळे लक्षात ठेऊन तिथला विचित्र पाऊस नसताना बघितलं आणि बघतच राहिले. दुबई वरून रात्री निघताना तिथल्या लखलखत्या झगमगाटाने जाम परकं वाटलं होतं.आणि इथे रात्री बाहेर पडायला मला सक्त मनाई होती. पण आवारातून का होईना, शांत दिसणाऱ्या  रात्रीच्या आकाशाने आश्वस्त केलं. आणि परत येताना ढगांच्या वरून पुन्हा भेटलेले ते चंद्र-तारे.. गोग्गोड काल्पनिक काव्यमय जगात जगण्याचा सोस अगदीच वाईट नाही असं वाटून गेलं तेव्हा..

रात्र रात्र जागण्याबद्दल माझी काळजी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला एकदातरी त्याबद्दल ऐकवलं असेल..पण अज्ञानाच्या सुखात अलगद झुलवताना अज्ञाताची ओढ मात्र जिवंत ठेवणारी रात्र कोजागरीची असो का अमावस्येची, जागवण्यात गंमत आहे खरी..

वावर

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

13 Oct 2016 - 8:23 pm | यशोधरा

अतिशय तरल आणि सुरेख.

माम्लेदारचा पन्खा's picture

13 Oct 2016 - 8:43 pm | माम्लेदारचा पन्खा

रात्रीच्याच खोल डोहासारखा गहिरा.....

बोका-ए-आझम's picture

13 Oct 2016 - 8:47 pm | बोका-ए-आझम

ती रात्र आणि तो दूधसागर यांना जणू काही एकमेकांचा कैफ चढला होता.

क्या बात है! अप्रतिम!

यशोधरा's picture

13 Oct 2016 - 8:58 pm | यशोधरा

पुन्हा वाचलं!

अज्ञानाच्या सुखात अलगद झुलवताना अज्ञाताची ओढ मात्र जिवंत ठेवणारी रात्र

किती सुरेख शब्दकळा! लिहिती रहा.

पद्मावति's picture

13 Oct 2016 - 9:31 pm | पद्मावति

आहा....अतिशय सुरेख लिहिलं आहेस. जणू एखादी ग़ज़लच लेखाच्या स्वरुपात वाचल्यासारखी वाटली.

बहुगुणी's picture

14 Oct 2016 - 4:41 am | बहुगुणी

एखादी गज़लच लेखाच्या स्वरूपात वाचल्यासारखी वाटली
+१

सुरेख!

राजाभाउ's picture

14 Oct 2016 - 10:30 am | राजाभाउ

+१ असेच म्हणतो. अप्रतीम !!!

अजया's picture

13 Oct 2016 - 9:49 pm | अजया

अगदी तरल लेखानुभव.अतिशय आवडला लेख.

प्रचेतस's picture

13 Oct 2016 - 10:18 pm | प्रचेतस

प्रचंड सुंदर लिहिलंय.

कवितानागेश's picture

13 Oct 2016 - 10:20 pm | कवितानागेश

तरल!

रातराणी's picture

13 Oct 2016 - 10:30 pm | रातराणी

फार सुंदर!

रुपी's picture

13 Oct 2016 - 11:23 pm | रुपी

सुरेख लिहिलं आहे!

कालची रात्र बोकाभाऊंमुळे माहीत झालेले "स्केअर-क्रो" वाचण्यात आणि मग वाचल्यावर वाटणार्‍या भीतीत जागवली आहे ;)

(मला वाटते बरोबर शब्द "कोजारी" आहे.)

सूड's picture

13 Oct 2016 - 11:27 pm | सूड

सुंदर!!

स्वाती दिनेश's picture

14 Oct 2016 - 12:22 am | स्वाती दिनेश

खूप छान, तरल लिहिलं आहेस,
स्वाती

उल्का's picture

14 Oct 2016 - 12:28 am | उल्का

खूप छान लिहिलं आहेस!

रेवती's picture

14 Oct 2016 - 12:55 am | रेवती

छान लिहिलयस.

प्रियान's picture

14 Oct 2016 - 2:50 am | प्रियान

कसलं सुरेख लिहिलंय !!
"ती रात्र आणि तो दूधसागर यांना जणू काही एकमेकांचा कैफ चढला होता.... " - हे तर अफलातून :)

एवढं ओघवतं आणि मनाला भिडणारं लिहिणाऱयां बद्दल नेहमीच कौतुक वाटतं मला !

नाखु's picture

14 Oct 2016 - 9:34 am | नाखु

चपखल शब्द आणि अलगद उपमा, भाषाप्रभुत्वाची साक्ष देतात.

पुलेशु

पैसा's picture

14 Oct 2016 - 8:44 am | पैसा

कसलं सुंदर!

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।

सस्नेह's picture

14 Oct 2016 - 9:26 am | सस्नेह

शब्दांचा साज लेवून भावविभोर काव्यच उलगडत गेले..

स्मिता चौगुले's picture

14 Oct 2016 - 10:01 am | स्मिता चौगुले

कसलं भारी लिहिलयस पिशी .. मस्तचं .

राही's picture

14 Oct 2016 - 10:03 am | राही

सभोवतालच्या अंधकारात तरल तीक्ष्ण संवेदनांची पणती तेजाळत ठेवून अज्ञाताची वाट शोधणारा लेखनप्रवास आवडला

स्मिता_१३'s picture

14 Oct 2016 - 10:05 am | स्मिता_१३

सुरेख !!!

सुखीमाणूस's picture

14 Oct 2016 - 10:13 am | सुखीमाणूस

खूप छान लिहील आहे.

अबोली, आवडले लेखन. अप्रतिम झालेय.
शब्द अन भाषेबद्दल काय बोलणार आम्ही पामर, तुम्ही धनी त्याचे.

मानस्'s picture

14 Oct 2016 - 11:56 am | मानस्

खूप सुंदर लिहलत.....हल्ली शहरांमध्ये ही निरव शांतता हरवत चालली आहे, रात्री उशिरापर्यंत कसले ना कसले आवाज येतच राहतात, गणपती नवरात्र लग्नाच्या वराती, डीजे. हल्ली रात्री 12 वाजता फटाके वाजवून साजरे केले जाणारे वाढदिवस, बाकी वाहनाचे आवाज लोकांना शांततेचा एवढा काय वावडं आहे काळात नाही.

एस's picture

14 Oct 2016 - 12:29 pm | एस

खूप छान.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Oct 2016 - 1:07 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फारच सुरेख.पुन्हा वाचले.

सहजसुंंदर, माहितीतलंं तरीही अनोखंं असंं लिहितेस तू !! अशीच लिहीती रहा!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Oct 2016 - 1:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम !

स्नेहल महेश's picture

14 Oct 2016 - 3:54 pm | स्नेहल महेश

खूप छान लिहील आहे.

किसन शिंदे's picture

14 Oct 2016 - 5:41 pm | किसन शिंदे

जाम भारी लिहीलंय राव हे.

भावना कल्लोळ's picture

14 Oct 2016 - 5:59 pm | भावना कल्लोळ

सुरेख.

पिशी अबोली's picture

14 Oct 2016 - 9:54 pm | पिशी अबोली

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! मिपावरील कौतुकाने लिहिण्यास खरा हुरूप येतो. :)

रुपीताई आणि स्वातीताईंनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे 'कोजागरी' असा शब्द योग्य आहे. तसाच वाचावा. :)

पिशी अबोली's picture

14 Oct 2016 - 9:54 pm | पिशी अबोली

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! मिपावरील कौतुकाने लिहिण्यास खरा हुरूप येतो. :)

रुपीताई आणि स्वातीताईंनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे 'कोजागरी' असा शब्द योग्य आहे. तसाच वाचावा. :)

विशाखा राऊत's picture

15 Oct 2016 - 3:26 am | विशाखा राऊत

खुप मस्त लिहिले आहेस :)

स्वीट टॉकर's picture

15 Oct 2016 - 1:51 pm | स्वीट टॉकर

काय एक से एक क्लासिक वाक्यं आहेत!

पिशी अबोली's picture

15 Oct 2016 - 10:21 pm | पिशी अबोली

धन्यवाद!

वैभव पवार's picture

15 Oct 2016 - 11:50 pm | वैभव पवार

एऽकदम! भारी।

अनन्न्या's picture

16 Oct 2016 - 1:48 pm | अनन्न्या

त्यामुळे गूढ रात्रीचं वेगळच सौंदर्य मनाला स्पर्श करून जातय!!!

प्रीत-मोहर's picture

20 Oct 2016 - 3:54 pm | प्रीत-मोहर

__/\__
किती मस्त लिहितेस माहित आहे का तुझं तुला? फार कमी लिहितेस अशी तक्रार आहे माझ्ही.

वेळ काढ आणि लिही, तुझे केपटाउनचे अनुभव.

पिशी अबोली's picture

20 Oct 2016 - 7:17 pm | पिशी अबोली

धन्यवाद!
जो आज्ञा मॅडम. लवकरच लिहेन अनुभव. :)

जयंत कुलकर्णी's picture

21 Oct 2016 - 9:19 am | जयंत कुलकर्णी

अरेच्चा हे निसटले होते... आत्ता वाचले आणि सकाळी उगच वाचले अशी चुटपुट लागून राहिली हे मात्र खरे.... हे कुठेतरी रात्री गवतात पाठीवर पडून, चांदण्याखाली..मिणमिणत्या प्रकाशातच वाचायला पाहिजे..... किंवा ऐकायला पाहिजे. याचे रेकॉर्डिंग करता येईल का ?

पिशी अबोली's picture

21 Oct 2016 - 11:09 pm | पिशी अबोली

रेकॉर्डिंग करून अशा छान रात्री ऐकण्याइतपत हे चांगलं झालं असेल, तर मला आवडेलच.. :)

धन्यवाद!