Now she does not bite…!

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
21 Sep 2016 - 6:07 pm

(हा लेख अनाहितामधे पूर्वप्रकाशित आहे आणि तिथले काही उल्लेखनीय उत्तम साहित्य ज्यात कोणतेही वैयक्तिक संदर्भ नसतील असे यापुढे नियमितपणे लेखिकांच्या परवानगीने मिपावर सर्वांसाठी खुले करू. - अनाहिता)

------------------------------------

(आमची प्रेरणा)
मागच्या महिन्यात आमच्या घरी मोठाच फंडा झाला..
नाही हो, माझा अन माझ्या नवऱ्याचा नव्हे, तिचा अन तिच्या पिल्लांचा !
सगळा घोळ माझ्या झाडांच्या हौशीमुळे झाला असं नवऱ्याचं म्हणणं. तर मी म्हणते त्याच्या आळशीपणामुळेच इतकी आणीबाणीची वेळ आली.

म्हणजे त्याचं काय झालं, की कंपाऊंडच्या कडेने मी जी तीन नारळाची झाडे लावली आहेत, त्यांच्या झावळ्या कंपाऊंडच्या पलीकडील असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेल्या अन त्या येता जाता वाटेत येऊ लागल्यावर अपार्टमेंटवाल्यांनी ढकलून ढकलून परत आमच्या हद्दीत लोटल्या. परिणामी, त्या झावळ्यांनी कंपाऊंडच्या कडेने एक छानपैकी पाच बाय तीनचे शेड तयार केले. मी नवऱ्याला खुरपे घेऊन त्या झावळ्या कापण्याविषयी रोज एकदा असा साधारण आठ दिवस आग्रह करूनही त्याने त्यासाठी आपला मोलाचा वेळ खर्च करण्याचे टाळले.

अन एक दिवशी नारळीजवळची अळूची पाने काढायला गेले तर गुर्र गुर्र आवाज आला. पाहते तर एका श्वान -कुलवधूने नारळीखाली चक्क पिल्ले दिलेली ! म्हणजे मला आधी पिल्ले दिसली नाहीत. मी दगड घेऊन तिला हाकलायला गेले तर बया दात विचकून माझ्या मागेच आली की ! मी अळू तिथंच टाकून ताशी शंभरने पलायन केले अन घरात शिरून दार झटकन बंद केले. तरीही ती पाच मिनिटे दाराबाहेर वॉव वॉव करत होती. कुई कुई आवाज आल्यावर समजले की कुत्री मागे का लागली !

‘आई, तुझ्या ऑफिसात स्पोर्ट्स सुरु झाले का ?’ चिरंजीव.
‘का रे ?’
‘नाही, तू एवढ्या सकाळी रनिंग प्रक्टिस करतेस म्हणून मला वाटलं ...’
‘अरे, नारळाच्या झाडाखाली ना, एका कुत्रीनं पिल्लं घातली आहेत.’
‘वॉव ! मला त्यातलं एक पाहिजे !’
‘अरे, जाऊ नकोस तिथं. कुत्री चावते ती !’
‘बघू..’ मुलग्याने मागचे दार उघडले. लगेच वॉव वॉव चा स्फोट झाला. दार घाईघाईने दडपले गेले.
काही वेळाने नवरा आला. त्याला कुत्रीची कथा सुनावण्यात आली.
‘हं ! त्याला काय होतंय ? काय करत नाही ती कुत्री. मी हाकलतो काठीनं.’

काठी घेऊन चालत गेलेला नवरा तिची बत्तिशी पाहून पळत घरात परत आला.
झाले ! आता घराच्या पाठीमागे जायची बंदी झाली.

मुलाने खिडकी उघडून हळूच पिल्ले पहायचा प्रयत्न केला. लगेच पुन्हा वॉव वॉवचा स्फोट .
थोड्या वेळाने कामवाली शीला आली. भांडी उचलून तिने मागच्या दाराची दिशा धरल्यावर एकच हलकल्लोळ झाला. मी, मुलगा अन नवरा तिघांनी एकदम ताबडतोब तिला धोक्याची इस्टमनकलर कल्पना दिली . मला वाटलं आता ती कामाला सुट्टी घेणार ! निमतालाच टेकलेली असते मेली सदा ! पण आश्चर्य म्हणजे आमच्या कल्लोळाचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

‘मंग काय झालं ? तिच्या पिल्लांजवळ न जाता बाजूला ऱ्हायलं तर काय नाय करत ती !’ शीला नाक उडवून म्हणाली अन खुशाल मागच्या दारी गेली. आम्ही वॉव वॉवची प्रतिक्षा करू लागलो. पण कुत्रीबाई माहेरची मैत्रीण भेटायला आल्यागत भांडी धुणे होईपर्यंत तिच्याकडे बघत निवांत बसली की !

दिवस सगळा तिच्या धाकातच गेला. अन पिल्लांच्या कुई कुईनं रात्रीची झोप हराम झाली. दुसऱ्या दिवशी तिला बाहेर काढण्यासाठी जाणकारांचा सल्ला घेण्यात आला . नगरपालिका वाल्यांनी ही जबाबदारी नुसतीच नाकारली नाही, तर आम्हालाच धाक घातला की कुत्र्याला मारले तर तीन महिन्यांची शिक्षा होते. काही जणांच्व मत पडले की सात दिवसांनी पिल्लांचे डोळे उघडले की ती जाईल.

दुसरा काही मार्ग नसल्याने सात दिवस वाट पाहण्याचे ठरले. मग मागचे-पुढचे दार उघडण्यापूर्वी आधी कुत्रीची चाहूल घ्यायची अन मगच दार उघडायचे अशी प्रक्टिस सुरु झाली. कुत्रीपासून सुमारे वीस फुट परीघ सोडूनच आमची दैनंदिन कामे उरकण्याची कसरत. ती सकाळी दहाच्या सुमारास बाहेर जाते अन बाराच्या सुमारास परत येते, हे चिरंजीबाने शोधून काढले. त्याप्रमाणे मागच्या अंगणातली कामे आवरण्याचे टाईमटेबल आखण्यात आले. अंगणात फिरायची चोरी झाली. ‘ती’ आलेली दिसली की घरात पळायचे. बाहेर जाताना हातात काठी मस्ट.

असे सात दिवस काढले अन आठवा दिवस उगवला. देवकीच्या आठव्या पुत्राची कंसाने काय वाट पाहुली असेल अशी आम्ही आठव्या दिवसाची वाट पाहत होतो, आठवा दिवस उगवला अन मावळला. कुत्री अन पिल्ले जागच्या जागीच !
आम्ही हैराण ! दिवसेंदिवस कुत्रीची दहशत वाढत चालली. तिची बत्तिशी अन आमच्या पोटऱ्या यांच्यातले अंतर दिवसेंदिवस कमी कमी होऊ लागले. मुलाचे मित्र काठ्या घेऊनच आमच्या घरात येऊ लागले. लहान लहान काठ्यांचे घरात संमेलनच भरले. वातावरण ‘कुई कुई’ मय झाले.

पंधराव्या दिवशी कहर झाला. चप्पल घालताना कुत्री नवरोजींच्या अंगावरच धावली. त्याला पळता भुई थोडी झाली.
मग डाव केला. दुपारी एका गड्याला बोलावले. कुत्री बाहेर गेल्यावर नवरा काठी घेऊन गेटपाशी उभा राहिला. गड्याने सगळी पिल्लावळ गोळा करून कॅरीबॅग मध्ये भरली अन शेजारच्या रिकाम्या पडक्या गॅरेज मध्ये नेऊन ओतली. गेट पक्के बंद करून त्यावर अन कंपाउंडवर काटे लावले. अन कुत्रीची वाट पहात बसलो.

थोड्या वेळाने ती मागच्या कंपाउंडवरून आली. लेकुरे जागेवर दिसेनात तशी नाक जमिनीला लावून गरागरा फिरली. मग उडी मारून पलीकडील गेली. गॅरेज मधल्या पिल्लांना तिने लगेच शोधून काढले. ती बेटी कुई कुई करतच होती. मग त्यांच्या जवळ ऐसपैस पसरून त्यांची पोटे भरू लागली !

दुसऱ्या दिवशीपासून ती, सचिन तेंडुलकरने गल्लीतल्या बारक्या पोरांच्या क्रिकेटकडे पाहावे तितक्याही अगत्याने आमच्याकडे ढुंकूनही न पाहता आपल्या पिल्लांकडे सरळ जाते अन येते. वॉव वॉव बंद अन बत्तिशीही बंद !

Now she does not bite…!

विनोदमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Sep 2016 - 6:25 pm | यशोधरा

=))

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2016 - 6:26 pm | टवाळ कार्टा

=))
मस्तय

नीलमोहर's picture

21 Sep 2016 - 6:35 pm | नीलमोहर

ऑफिसजवळ एक प्रकरण होतं असं, नुसती पायाला चावायला बघायची, नको नको केलं होतं अगदी, तरी बरं पिलांची भानगड नव्हती, सिंगल होती, कदाचित म्हणूनच वैतागलेली असेल, नंतर गेलीच ती.
परत सेम अजून एक बया हजर, ही तर अंगावर उड्या मारायला बघायची, तिथे फिरतांना मग झाडाच्या फांद्या घेऊन फिरावं लागायचं, काही प्राणी फार शहाणे असतात, काही अर्धवट प्रकार खूप त्रासदायक.

मार्मिक गोडसे's picture

21 Sep 2016 - 6:53 pm | मार्मिक गोडसे

वॉव !
कुत्र्यांना ४२ दात असतात.

प्रसाद_१९८२'s picture

21 Sep 2016 - 7:00 pm | प्रसाद_१९८२

मस्तच =))

हाहाहा. आपल्याला कुत्री-फित्री अजिबात आवडत नाहीत. लेख फर्मास आहे. कुणी लिहिलाय? म्हणजे स्नेहाताईंनीच लिहिलाय का असे विचारतोय.

सस्नेह's picture

22 Sep 2016 - 1:33 pm | सस्नेह

काही दिवसापूर्वी अनाहितामध्ये लिहिला आहे.

अभिजीत अवलिया's picture

21 Sep 2016 - 7:10 pm | अभिजीत अवलिया

सगळे प्राणी असेच असतात मुलांच्या बाबतीत.
मी लहान असताना एकदा एक कोंबडीचे पिल्लू पकडायला गेलो होतो तर कोंबडी धावत येऊन माझ्या डोक्यावरच बसून चोच मारू लागली. दिली तिला भिरकावून आणि जे पळत घरी गेलो.

कविता१९७८'s picture

21 Sep 2016 - 7:14 pm | कविता१९७८

मस्त

रातराणी's picture

21 Sep 2016 - 8:09 pm | रातराणी

:)

पद्मावति's picture

21 Sep 2016 - 10:13 pm | पद्मावति

=))

रेवती's picture

21 Sep 2016 - 10:19 pm | रेवती

हा हा हा. बत्तीशी व पोटर्‍यांमधील कमी होणारे अंतर..............भारी.

आजच मुलाचे रॅबिजचे तिसरे इंजेक्शन झाले! त्यामुळे कथेशी जोरदार सहमत.आवडली हे वे सां न!

ज्योति अळवणी's picture

22 Sep 2016 - 1:57 am | ज्योति अळवणी

झक्कास लिहिली आहे कथा.. अनुभव! एकदम आवडला

चाणक्य's picture

22 Sep 2016 - 5:18 am | चाणक्य

.

सुखीमाणूस's picture

22 Sep 2016 - 6:47 am | सुखीमाणूस

:))

प्रीत-मोहर's picture

22 Sep 2016 - 7:36 am | प्रीत-मोहर

लोल. परत वाचून पण तेवढीच मज्जा आली

आतिवास's picture

22 Sep 2016 - 8:40 am | आतिवास

:)

क्रेझी's picture

22 Sep 2016 - 8:55 am | क्रेझी

भार्री आहे लेख :)

नाखु's picture

22 Sep 2016 - 9:37 am | नाखु

आम्ही चारच काय चांगले चाळीस हात दूर राहतो.

श्वानभय्मुक्त कुटुंब वत्सल नाखु

टीपः एक मिपा मित्राच्या घरच्या भूभूचा आम्च्या कन्येने ज्याम धसका घेतला आहे.

पूर्वाविवेक's picture

22 Sep 2016 - 3:39 pm | पूर्वाविवेक

भारीच हो..

पैसा's picture

22 Sep 2016 - 4:32 pm | पैसा

=)) =))