पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.

Primary tabs

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
18 Sep 2016 - 3:13 pm

‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’
लेखिका – आतिवास सविता.

आतिवास यांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर जाताच वाचकाला आतील शब्दानुभवांमध्ये भरलेल्या ताणाचे दडपण जाणवायला सुरूवात होते, इतके हे मुखपृष्ठ भेदक झाले आहे. आणि याचे श्रेय अर्थातच ‘रविमुकुल’ यांना आहे. एका भिंतीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा आणि शेजारी एक बंद खिडकी. सेपिया रंगसंगतीवर खरवडल्यासारखं शुभ्र रंगातील शीर्षक. जणू भीतीचं सावट पुसण्याचा, जिवंत राहण्याच्या अनिवार ओढीतून केला गेलेला आकांत. लेखिका म्हणतात तसा ‘माणूस म्हणून जगण्याचा हक्क’ मिळवण्यासाठी धडपडणार्‍या असंख्य अनामिक अफगाण स्त्रियांचा तो भिंतीरूपी बुरख्याआडचा चेहरा. तितकाच बंदिस्त, तितकाच भयग्रस्त.

लेखिकेला इ. स. २०१३ मध्ये एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातनं चार महिने काबूलमध्ये राहून काम करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवांवर आधारीत लेखांची एक मालिका ‘अब्द-शब्द’ या त्यांच्या ब्लॉगवर आणि ‘मिसळपाव’ वर प्रसिद्ध होत असे. त्याचंच विस्तारीत आणि सुधारीत म्हणूया, असं लिखित स्वरूप म्हणजे ‘भय इथले...’ हे पुस्तक. मूळ शीर्षक ‘भीतीच्या भिंती’ हे जसे समर्पक होते तसेच ‘भय इथले...’ हेही वाटते, कारण कवी ग्रेस यांच्या ‘भय इथले संपत नाही...’ मूळ ओळी अफगाणिस्तानच्या आजच्या परिस्थितीला चपखल लागू पडतात, हे अफगाण लोकांचे, विशेषतः स्त्रियांचे दुर्दैव. तेथे काम करताना लेखिकेला मर्यादा आल्या, सुरक्षिततेसाठी बंधनांच्या दृश्य आणि भीतीच्या अदृश्य भिंती त्याच्या भोवती सतत उभ्या होत्या. त्या भिंतींपलीकडील जगात, तिथल्या सामान्य जनतेच्या, स्त्रियांच्या भावविश्वात डोकावण्याची पुरेशी संधी इतक्या कमी कालावधीत मिळणे जरी अशक्य असले, तरी त्यातूनही त्यांना जे दिसले, जाणवले, बोचले आणि जे जितपत समजले; ते या पुस्तकामध्ये नुसते वाचतानाही भारतासारख्या तुलनेने खूपच सुरक्षित वातावरणात जगणार्‍या तुमच्या-आमच्यासारख्या वाचकांना तरीही हादरवून सोडते, इतके तिथले वास्तव भयानक आहे.

‘भीतीच्या भिंती’ या आंतरजालावरील लेखमालिकेत सुमारे सात-आठ भाग प्रसिद्ध झाले होते. पुस्तकात एकूण सतरा प्रकरणे आणि चार परिशिष्टे, तसेच शक्य तितकी छायाचित्रे आणि नकाशाच्या माध्यमातून हे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवतात. प्रत्येक प्रकरणात छोट्या-छोट्या वाक्यांतून, किश्श्यांतून, माहितीच्या तुकड्यांतून आणि विश्लेषणातून लेखिकेची शैली झळकत राहते. कुठेही मेलोड्रामाटिक वगैरे न होता सहज-सरळ पद्धतीने हा पट आपल्यापुढे उलगडत राहतो. ‘आहे हे असं आहे’ आणि ‘असं आहे तर ते तसं का आहे’ या प्रामाणिक उत्सुकतेनेही. ही उत्सुकता, कळकळ भीतीच्या भिंतींमुळे बव्हंशी अपूर्णच राहत असली तरी त्या भिंतींपलीकडील जगाचा बाह्य जगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न अगदीच निष्फळ ठरत नाही हाच काय तो त्यातल्या त्यात दिलासा. आणि हे पुस्तक म्हणजे याच दिलाशाचे छापील रूप.

हे पुस्तक वाचत असताना सर्वसामान्य वाचकाच्या समजुतींना धक्के बसू शकतात हे मात्र आधी सांगितलं पाहिजे. लेखिका सामाजिक कार्यकर्ती आहेत; युद्धनीतीविश्लेषक वगैरे नाहीत. तेव्हा अफगाणिस्तान म्हणजे ‘काबुलीवाला’ ते ‘सोवियेत सैन्याचे आक्रमण व माघार’ ते ‘तालिबानी धर्मांध राजवट’ ते ‘९/११ आणि अमेरिकेचे आक्रमण’ इतकेच ढोबळमानाने असलेले ‘सामान्यज्ञान’ कदाचित या पुस्तकातील दृष्टिकोनातल्या सर्वच मतांशी सहमत होऊ देईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उदा. खालील वाक्य पहा –
‘युद्ध फक्त शस्त्रास्त्रं, रणनीती, शौर्य यांची साहसगाथा नसते; तर ती दुःख, अश्रू, शोषण, अन्याय आणि हतबलता यांचीही अविरत गाथा असते.’
ज्यांना ‘युद्धस्य कथा रम्यः’ वाटतात त्यांना वरील दृष्टिकोन कदाचित अडचणीचा आणि म्हणून न पटणारा वाटू शकेल. अशा वाचकांना काही ठिकाणी लेखिकेची काही मते आवडणार नाहीत. तेव्हा हे पुस्तक वाचताना एकतर लेखिकेचे इतर लिखाण वाचणे व त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी जाणून घेणे उपयुक्त तर ठरेलच; आणि दुसरे म्हणजे स्वतःची मतेमतांतरे काहीशी बाजूला ठेवून तटस्थपणेच या प्रश्नाकडे बघावे लागेल. लेखिकेची ‘इनसाइट’ आणि निरीक्षणशक्ती या दोहोंच्या संगमामुळे असा तटस्थपणा वाचकांत आपसूकच येत जातो.

अफगाणिस्तानमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, किंवा लेखिकेला तिथे काय दिसले याची हे पुस्तक म्हणजे जंत्री नाही. पण सामान्यतः एखाद्या वाचकाला तिथल्या प्रश्नांची शक्य तितकी माहिती व्हावी यासाठी उपयुक्त असलेली जगाच्या या भागाची ऐतिहासिक, भौगोलिक आणि भूराजकीय माहिती बर्‍याच प्रमाणावर दिली आहे. यात परिशिष्टे, नकाशे, रंगीत छायाचित्रे, अगदी तिथल्या खाद्यसंस्कृतीबद्दलही माहिती आहेच. परंतु नुसत्याच विदाजंजाळपणापेक्षा या पुस्तकाचे वाचनमूल्य वाढते ते लेखिकेच्या सखोल विचारपद्धतीचा पुनःपुन्हा प्रत्यय येत राहिल्याने. तळागाळातल्या माणसांमध्ये कार्य करत असल्याने लेखिकेकडे माणसे वाचण्याचे कौशल्य आहे, आणि कित्येकदा पुस्तक वाचताना वाचक याची प्रचीती येऊन थक्क होतो. मग ते दिल्लीतील विमानतळाच्या लाउंजमध्ये बसलेले अफगाण स्त्री-पुरुष असोत, वा ऑफिसमधल्या खालाजान, वा गुरखे सुरक्षारक्षक अथवा फाहिमी हा अनुवादक, तिथले सरकारी कर्मचारी, रुकिया बाल्खींसारख्या महिला उद्योजिका, मलिकाजान, सईदाजानसारख्या मंत्रालयात भेटलेल्या स्त्रिया, विशेषतः स्थानिक अफगाण स्त्रियांचे वागणे-बोलणे ज्या खुबीने त्या टिपतात आणि त्यामागील चिकित्साही वाचकांपुढे मांडतात ते स्तिमित करणारे आहे. पुस्तकात पदोपदी लेखिका या हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याचा प्रत्यय येत राहतो. (आजकाल गल्लीबोळांत बोकाळलेले तथाकथित ‘सा. का.’ पाहून खरे सामाजिक कार्यकर्ते कसे असतात हे समाज विसरूनच गेलाय की काय असे वाटते. असो.)

‘स्त्रिया’ असे एक स्वतंत्र प्रकरणच या पुस्तकात आहे. हे प्रकरण म्हणजे माझ्या मते या पुस्तकाचा प्राण आहे. आणि मुखपृष्ठावरील बंद खिडकीपासून ते मलपृष्ठावरील पुस्तकओळखीपर्यंत आणि प्रत्येक प्रकरणाचे, छायाचित्रांचे सर्व धागे या प्रकरणापर्यंत पोहोचतात. आंतरजालावरील मूळ लेखमालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा कित्येक वाचकांच्या मनात आलेला प्रश्न सुरूवातीला मलाही पडला – एक स्त्री आणि तेही अफगाणिस्तानसारख्या देशात जातेय! काय? बापरे!... पण हे प्रकरण वाचताना हे एका स्त्री-लेखिकेचे अनुभवपटल आहे याबद्दल मनापासून बरे वाटले. तिथल्या स्त्रियांच्या प्रश्नांची अशी जाणीव, त्यामागील कार्यकारणभाव, कित्येकदा अव्यक्त, अपरिचित अशी स्पंदने, हुंकार, निश्वास आणि अजूनही बरेच काही हे कुणा पुरुषाला इतक्या संवेदनशीलतेने टिपता व मांडता आलेही नसते. किंबहुना ते पहायची, तिथल्या स्त्रियांशी संपर्क साधून त्यांना बोलत्या करायची व त्यांची परिस्थिती जाणून घ्यायची संधीच त्याला मिळाली नसती. युद्धाच्या अन्यायाच्या, झळीच्या पहिल्या बळी तिथल्या स्त्रिया असतात. या पुस्तकातून हे पुनश्च अधोरेखित होत राहते. आतिवास यांच्या शब्दांमधून भेटत राहणारी प्रत्येक अफगाण स्त्री आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. दारिद्र्य, निरक्षरता, आरोग्याची हेळसांड, जीवनावश्यक उत्पन्नाची साधने मिळवता येण्यास मर्यादा, बहुपत्नीत्त्व, कुटुंबनियोजनाचा डावलला जाणारा हक्क, सतत डोक्यावर घिरट्या घालणारे भयाचे सावट, एक ना अनेक प्रश्न. असंख्य संकटे. आणि त्यातूनही उमलू पाहणारी त्यांची जीवनेच्छा. व ती जपण्याचा त्यांचा दैनंदिन संघर्ष. हे सारेच वाचकाच्या मनःपटलावर कोरले जाते. कुठेही अकारण भावनाविवश, करुणार्द्र वगैरे न होता. या सर्व समस्यांच्या भयानकतेतूनही तिथे होत असलेले काही सकारात्मक प्रयत्न, ‘तीळभर पुढे – इंचभर मागे’ का होईना, होत असलेली प्रगती हेही तितक्याच सकारात्मकतेने लेखिका मांडतात तेव्हा जीव किंचित सुखावतोही.

या आवर्जून संग्रही ठेवण्यायोग्य पुस्तकात काढायच्याच झाल्या तर काही त्रुटीदेखील नक्कीच आहेत. एक म्हणजे मुद्रितशोधनाच्या काही चुका अधूनमधून रसभंग करतात. दुसरे म्हणजे नकाशे अजून जास्त सखोल आणि संदर्भसूची, दिशादर्शक बाण इत्यादींसहीत असायला हवे होते. नकाशांची संख्याही वाढवता आली असती. (‘राजहंस’ सारखे प्रकाशन नकाशांकडे ‘नकोशे’ असेच बघते की काय असे मला त्यांच्या इतर पुस्तकांचाही अनुभव घेता वाटले. असो.)

सरतेशेवटी ‘आतिवास सविता’ ही त्यांची आंतरजालावरील नाममुद्राच पुस्तकात लेखिकेचे नाव म्हणून येते. या नाममुद्रेमागील व्यक्ती आपल्याला या पुस्तकातून कुठेही भेटत नाही. तसेच त्यांचे अफगाणिस्तानमध्ये नेमके काय काम ( इंग्रजीमध्ये ‘रोल’) होते हेही पुरेसे स्पष्ट होत नाही. तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचे निरीक्षण नोंदवायचे असे जरी मलपृष्ठावर लिहिलेले असले तरी त्याची ही ढोबळ रूपरेषा आणि त्यांनी आखून घेतलेली आभासी प्रतिमा यांच्या भिंतींमधल्या किलकिल्या खिडक्यांमधूनच वाचकालाही हे अनुभवविश्व वाचावे लागते आणि तितकेच समजून घ्यावे लागते. अर्थात हे माझे मत झाले. त्यांच्या भूमिकेचा आदर आहेच.

वाचकांना हा पुस्तकपरिचय आवडल्यास त्याचे संपूर्ण श्रेय या पुस्तकालाच असेल; तथापि यातल्या उणिवांची जबाबदारी मात्र पूर्णतः माझी.

‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’
लेखिका – आतिवास सविता.
राजहंस प्रकाशन.
किंमत रू. २७५/-
ISBN 978-81-7434-967-5
a

संस्कृतीसमाजप्रवासआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

18 Sep 2016 - 3:28 pm | पद्मावति

सुरेख पुस्तक परिचय. धन्यवाद.

पद्मावति's picture

18 Sep 2016 - 3:28 pm | पद्मावति

सुरेख पुस्तक परिचय. धन्यवाद.

जेपी's picture

18 Sep 2016 - 3:32 pm | जेपी

मराठीत तेही मराठी लेखकाकडुन प्रथमच अफगाण परिस्थिती बद्दल वाचायला मिळाल.
पुस्तक आवडले.संग्रही राहिल.

मारवा's picture

18 Sep 2016 - 3:51 pm | मारवा

या पुस्तकाचे प्रमोशन वाखाणण्याजोगे आहे मात्र त्यातील घाऊक शैली ने निर्माण झालेल्या एका विसंगतीची मौज वाटली.
असो.

जव्हेरगंज's picture

18 Sep 2016 - 5:01 pm | जव्हेरगंज

bhay

भ ट क्या खे ड वा ला's picture

18 Sep 2016 - 5:14 pm | भ ट क्या खे ड वा ला

वाचल पाहीजे

प्रचेतस's picture

18 Sep 2016 - 6:33 pm | प्रचेतस

उत्कृष्ट परिचय.

पुस्तक वाचणार आहेच. एस यांचेही लिहिते झाल्याबद्दल ख़ास आभार.

बोका-ए-आझम's picture

18 Sep 2016 - 9:47 pm | बोका-ए-आझम

एसभौंना लिहिते केल्याबद्दल आतिवासताईंचे अभिनंदन!:)

नीलमोहर's picture

22 Sep 2016 - 10:05 am | नीलमोहर

पुस्तकातील काही भाग लोकरंग मध्ये वाचला होता, भीतीच्या भिंती लेखमाला उत्तमच होती,
उत्कंठा वाढली आहे, पुस्तक वाचायचं आहेच.
एस यांचे लिखाण बऱ्याच दिवसांनी वाचले, आवडले.

पुस्तक परिचय आवडला. 'भय इथले' वाचलं आणि आवडलं. पुटकाच्या माहितीच्या मर्यादा लक्षात घेऊनही सर्व माहिती अभिनिवेश रहित पद्धतीने दिली आहे, हा पुस्तकाचा मोठा प्लस पॉईंट वाटला. कुठेही अनाठायी कौतुक वा टीका नाही, जसे घडले आहे तसे मांडले आहे आणि ते आवडले.

पुस्तकाच्या छपाईचा दर्जा मात्र खटकला.

अभिजीत अवलिया's picture

18 Sep 2016 - 7:04 pm | अभिजीत अवलिया

आतिवास ह्यांनी हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा मला व्य.नि.च्या माध्यमातून कळवले होतेच. तुम्ही दिलेला परिचय देखील उत्तम आहे.

अतिवास ताईंची मिपावरील लेखमालिका अप्रतिम आहे.त्यामुळे पुस्तक छान असणार या खात्रीने पुस्तक घेतलेले आहे वडलांनी डोंबिवलीला! मला पुढच्या आठवड्यात मिळेल.
पुस्तक परिचय अगदी नेटका.आवडला.

महामाया's picture

18 Sep 2016 - 8:09 pm | महामाया

सुरेख पुस्तक परिचय.

भरपूर प्रतीक्षेनंतर आजच मिळालंय पुस्तक. नजीकच्या लायब्ररीला रेकमेंड करुन मागवायला सांगितलं. डिमांड आहे पुष्कळ. आता वाचून संपवणार. लोकसत्तामधे अंश वाचून झलक मिळालीच होती.

जियो अतिवासताई.

पुस्तकपरिचय खुप आवडला. एस भाऊ यानिमित्ताने तुम्ही खुप कमीवेळा लिहीता अशी तक्रार करते.

आतिवास ताईंची मिपावरची लेखमाला माझ्या सर्वात आवड्त्या लेखनांपैकी एक आहे. पुस्तकाबद्दल भर्पुर उत्कंठा देखील आहे. लवकरात लवकर मिळवुन वाचायचे आहे .

धन्यवाद मंडळी. काहीबाही खरडलेलं गोड मानून घेतलंत याबद्दल आभार. :-) पाठपुरावा करून माझ्याकडून लिहून घेणाऱ्या यशोताईंचे आभार.

मित्रहो's picture

20 Sep 2016 - 11:17 am | मित्रहो

हे पुस्तक बुकगंगावरऑर्डर केले आजच

रातराणी's picture

20 Sep 2016 - 11:32 am | रातराणी

सुरेख परिचय!

मार्गी's picture

20 Sep 2016 - 11:43 am | मार्गी

महत्त्वाचा विषय.

सविस्तर पुस्तक परिचयासाठी एस यांचे आभार.
पुस्तक वाचलेल्या आणि वाचू इच्छिणा-या सर्व वाचकांचेही आभार.
पुस्तकातले मुद्रणदोष आणि अन्य उणिवांची नोंद घेतली आहे. संधी मिळताच त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन.
मारवा यांना लेखनशैली घाऊक वाटली असली तरी त्यात काही बदल करता येईल असं मात्र वाटत नाही. क्षमस्व.

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2016 - 9:37 am | श्रीरंग_जोशी

पुस्तकपरिचय आवडला.

आतिवास यांची भीतीच्या भिंती ही लेखमालिका वाचल्यावरही हे पुस्तक का वाचावे या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकपरिचयातून मिळाले.

या लेखनातला आदरार्थी बहुवचनाचा वापर मात्र फारसा रुचला नाही. काही वेळा तर असे ध्वनित झाले की दोन किंवा अधिक लेखिकांनी संयुक्तपणे हे पुस्तक लिहिले आहे.

अवांतर - आतिवास, विशाखा पाटील व इतर मिपाकर लेखकांना (ज्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत) विनंती आहे की त्यांनी मराठी पुस्तकांच्या प्रकाशकांना इ-बुक आवृत्तीही प्रकाशित करण्यास राजी करावे.

बरोबर आहे. थोडे घाईतच लिहिलेय. हा पहिला लेख आहे जो आधी कागदावर लिहून काढला आणि मग टंकला. चतुरभ्रमणसंचावर टंकणे बरेच अवघड जाते. सासंकडे जर वेळ असेल तर कृपया आदरार्थी अनेकवचनाऐवजी एकवचन करून घ्यावे ही विनंती.

जव्हेरगंज's picture

22 Sep 2016 - 1:01 pm | जव्हेरगंज

आदरार्थी अनेकवचन
?
मला वाटते ते तुमच्यासाठी नसावे.

एस's picture

22 Sep 2016 - 1:50 pm | एस

ते माझ्यासाठी नाहीच आहे. श्रीरंगभाऊ 'लेखिकांच्या' ऐवजी 'लेखिकेच्या' असं करा म्हणताहेत.

जव्हेरगंज's picture

22 Sep 2016 - 2:07 pm | जव्हेरगंज

ओह! आलं लक्शात!!

t

सस्नेह's picture

22 Sep 2016 - 12:57 pm | सस्नेह

शब्दातला समर्पक परिचय.
पुस्तक वाचले असल्याने परीक्षणाचा व्यवस्थित आस्वाद घेता आला.

स्रुजा's picture

24 Sep 2016 - 1:22 am | स्रुजा

वाह एस भाऊ !! अप्रतिम परिचय आणि पुस्तकाच्या कव्हरचं विश्लेषण तर लाजवाब !! तुमची फोटोग्राफरची नजर जाण्वत राहते लेखात. योग्य तिथे फोकस आणि आहे ते नजाकतीने मांडुन पुस्तकाला न्याय दिलाय तुम्ही. तुम्ही लिहीत राहा.

अतिवास ताई, या सुंदर पुस्तकाबद्दल धन्यवाद आणि मनापासोन कौतुक. बुक गंगावर जेवढं वाचायला मिळालं त्यावरुन आणि इथल्या लेखमालेवरुन पुस्तक कधी वाचेन असं झालं आहे.

कंजूस's picture

24 Sep 2016 - 7:46 am | कंजूस

मस्त.

पैसा's picture

26 Oct 2016 - 2:47 pm | पैसा

छान पुस्तक परिचय. 'भय इथले' पुस्तक फारच सुंदर जमलंय. त्यात जी काही आकडेवारी वगैरे आलीय ती आवश्यक आहे. अशी जंत्री वाचणेही तिथे अजिबात कंटाळवाणे होत नाही. वाचता वाचता असे लक्षात आले की अफगाणिस्तानचा इतिहास आपल्याला माहीत असला तरी तो तुकड्या तुकड्यानी माहीत असतो. असा एकसंध वाचून त्याचा खरा परिणाम कळतो.

आतिवास ताईंना सुरक्षिततेच्या कारणासाठी तिथल्या स्त्रियांचे फार लिमिटेड जग पाहता आले. पण तेवढेही अंगावर येणारे आहे. एस्केप फ्रॉम तालिबान पाहिला असल्याने सुरक्षितता अगदी अत्यावश्यक होती यबद्दल अजिबात एवढीशीही शंका नाही. ते मूळ पुस्तक लिहिणार्‍या सुश्मिता बॅनर्जींची नंतर तिकडेच हत्या झाली होती. तेव्हा आतिवास यांच्या बाबत इतकी काळजी घेतली गेली त्याचे आश्चर्य नाहीच. मात्र अशा परिस्थितीत तिथे जाऊन त्यांनी काही काम करणे हेच मला फार कौतुकास्पद वाटले. त्या भीतीच्या दबावाखाली काही काम करणे एखादीला अशक्य होऊन बसले असते.

आतिवास यांचे लिखाण मला नेहमीच आवडते. त्याच्याशी नाते जोडणे सहज शक्य असते. अगदी अस्स्सल जिवंत अनुभव, मात्र मांडणीत तटस्थता, अलिप्तपणा राखणे हे कठीण असते. पण आतिवास यांनी ते सहज जमवले आहे! तिथले अनुभव आमच्यापर्यंत अगदी नीट पोचले आहेत.

अफगाण लोकांची भाषा मला खूप जवळची वाटली. ते 'आस' कोकणीत 'आसा'च की! जरा स्वस्थपणे ऐकायला मिळाली तर ती बोली कोणीही शिकून घेऊ शकेल असे वाटले वाचून. बरेच शब्द हिंदी मराठी, गुजराती, कोंकणी याना जवळचे असावेत. एका छान वाचनानुभवासाठी आतिवास यांना खूप धन्यवाद आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!