बेधुंद (भाग : १७ )

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
28 Aug 2016 - 10:13 pm

सुऱ्याचे दिवस आनंदात 'न्हाऊन' सरत होते . स्वप्नातही त्याने त्याला पियासारखी 'गर्लफ्रेंड' मिळेल असा विचार केला नव्हता. स्वर्ग जर कुठे असेल तर इथेच - पियाच्या मिठीत ! अजून २ वेळा तरी त्याला पियाला भेटता येणार होते , त्याचे दिवसरात्र पियाच्या 'गरम' श्वासांच्या आठवणीत जात होते - स्वर्ग कुठे असेल तर इथेच !

अन, दुसरीकडे एकाच रूम मध्ये राहून नित्याला काहीच चांगले भासत नव्हते ! ऐनवेळी हर्षलाचे 'ट्रेनींग' बदलल्याने , तो दिवसातून २०-२५ वेळा तरी तिला कॉल करत असे पण तीचा नंबर लागत नव्हता . दुसऱ्या कुणाला फोन करायची सोय नव्हती ! महाराष्ट्रापासून दूर असल्याने त्याला काय करावे हे कळत नव्हते . एकेक दिवस एकेक वर्षासारखा जात होता . तो सुऱ्याशीही जास्त बोलत नसे !

एकटाच , शांत , विचित्र, शून्यात राहत होता तो - नरक कुठे असेल तर इथेच !

प्रेम पण काय विचित्र 'खेळ' खेळत असतं ना ? एकाच रूम मध्ये राहून दोघेही आपल्यापरीने स्वर्ग अन नरकाच्या अनुभव घेत होते .

शेवटचं ट्रेनिंग संपलं अन दोघेही 'सर्टिफिकेट' घेऊन परत आपापल्या घरी निघाले .ट्रेनमध्ये नित्या फक्त एकच गाणं पुन्हा पुन्हा ऐकत होता - ' 'सच केह रहा है दिवाना दिल , दिल ना किसीसे लगाना ..... !' गाणं ऐकून झालं की तो हर्षलाला कॉल करत असे , पण फोन कडून नेहमीचं उत्तर - 'तुम्ही डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही !'

नित्याला काही कळायला मार्ग नव्हता ! - कदाचित त्याच प्रेमच अस्तित्वात नव्हतं .

'यार सुऱ्या , काय झालंय हर्षलाला माहित नाही - तिचा फोन लागत नाही , पण ती तर फोन करू शकते ना यार ! - आधीच जागून - जागून सुजलेल्या डोळ्यावर हात ठेवत तो सुऱ्याला बोलला .'
'यार , तिची पण परिस्थिती समजवून घे , कदाचित तिच्या घरच्यांनी तिचा मोबाईल तिच्याकडून काढून घेतला असेल - सिम कार्ड फेकून दिले असेल ! '
'माहितेय मला , खरच एवढे वाईट आहोत काय यार आपण ? नित्याचे डोळे भरून आले .
'कधी एकदा हर्षलाला भेटतोय असे झाले आहे ! कधीकधी वाटते ह्या ट्रेन मधून उडी मारावी - नित्या ट्रेन मधल्या फिरणाऱ्या पंख्याकडे बघत निराशेने बोलला .
' मार मग येडXX ... काय होणार त्याने ? हर्षला मिळेल तुला ? - सुऱ्या वैतागून बोलला , अश्विनीपण फोन उचलत नाही माझा ! तिलाही माहितेय की मी हर्षलासाठीच तीला फोन करेल ! भेटशील रे हर्षलाला ! नको काळजी करू !

थोडा वेळ शांतता , दोघांनाही काय बोलावे कळत नव्हते .

'हम्म , जातो मी - दरवाज्यात बसतोय ! ' अन नित्या दरवाज्यात बसायला निघाला .
' जा , अन उडी नको मारुस, पागल झालायेस तू ' - सुऱ्या थोडं हसत बोलला .
नित्या काहीच बोलला नाही . नित्या जाताना थोडासा लंगडत होता . हर्षला मिळावी म्हणून २ आठवड्यापूर्वी तो कुठल्यातरी एका मंदिरात गेला होता . तिथे कुणीतरी त्याला सांगितले की जो कुणी ह्या २००-२५० पायऱ्या गुडघ्यावर चढून जातो त्याची प्रत्येक ईच्छा पूर्ण होते . काहीही विचार न करता हर्षलाच्या आठवणीत तो सगळ्या पायऱ्या चढला , परत आला तो पॅन्टवर रक्त घेऊन , हर्षलाला मिळवण्यासाठी त्याने आपले गुडघे फोडून घेतले होते . 'विरह ' माणसाकडून काय काय करून घेतो !
सुऱ्याला हे सारं माहित होत पण बोलणार काय ? उगीच त्याला अजून कशाला दुखवायचे म्हणून त्याने पुन्हा त्याला काहीच विचारले नाही !

नित्या ट्रेनच्या दरवाज्यात वार तोंडावर घेत ,पळणारी झाडे बघत बसला . मन सुन्न झालं होत ! हर्षलाचे भरलेले डोळे अन
नाराज चेहरा त्याच्या डोळ्यासमोरुन जात होते , वाहनारा वारा तो मुठीत पकड्ण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता . हर्षला पण त्याची वाट बघत आहे ,असं त्याला वाहणारा वारा सांगत होता . तलावातील वाहणार पाणीही कुणाचीतरी 'आसवे' आहेत असा त्याला भास होत होता . मावळणारा सूर्य विरहाने निघून जात होता , त्याचा विरह फक्त एका दिवसासाठीचा होता , पण नित्याला हर्षलासाठी अजून वाट बघावी लागणार होती . भरधाव धावणाऱ्या ट्रेन मधून उडी मारावी असं सारखं सारखं त्याच मन त्याला सांगत होत , अन हर्षलाचे वाट बघणारे डोळे त्याला आडवत होते . केसांवरून हात फिरकवून त्याने सिगारेट पेटवली . बंगालच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याने एकटेच तिच्या प्रेमाची निशाणी हातात घेऊन घालवले होते . एकत्र घालवलेले कितीतरी क्षण डोळ्यासमोरून सरकत होते .

सुऱ्या आपल्या सीटवर आरामात बसला होता . पियाची आठवण त्याच्या मनात त्याला हसवत होती . पियाच्या हाताचा स्पर्श , तिच्या केसांचा सुगंध , तिच्या कमरेचा गरम स्पर्श , आपल्या आयुष्यच 'सार' पियाच आहे ह्याची अनुभूती कदाचित त्याला झाली असावी . त्याच मन धावणाऱ्या ट्रेन सोबत पियाच्या आठवणीत नाचत होत .
........

सेमिस्टर : ७ (फायनल इयर )

बघता बघता तीन वर्ष निघून गेली होती , कळालंच नाही की वेळ इतक्या लवकर कशी काय निघून गेली ? आत्ता अधिकृतरित्या' फाईव्ह स्टार्स ' सिनिअर्स ' होते . ट्रेनिंग वरून परत आल्यावर नित्याच्या वेडेपणात अजूनच भर पडली . एकतर HDयाने हर्षलाचे ट्रेनिंग ऐनवेळी बदलून नित्याच्या प्रेमाला 'आवाहन' दिले होते . लाखो विचारांच्या वादळात नित्या बॅग्स घेऊन रूमवर पोहोचला . रुमच्या दरवाज्याकडे बघून अजूनच त्याच्या मनात आग भडकू लागली .
त्याच्या रूमचे 'लॉक' तुटलेले होते , फक्त दरवाजाला कडी लावली होती . कुणीतरी त्याची रूम फोडली होती . क्षणातच त्याला कळाले की हे काम HD शिवाय दुसरं कुणीच करू शकत नाही . तसही नित्याच्या 'नादी' दुसरं कुणी लागणार ही नव्हतं ! हॉस्टेलवर कधीच चोरी होत नसे , त्यामुळे रूममधून चोरीला काही जाईल ह्याची त्याला काळजी नव्हती . पण त्याची एक महत्वाची गोष्ट रूममध्ये होती , त्याची त्याला जास्त काळजी लागली होती .
धडधडत्या काळजाने त्याने रूम उघडली . रूम जराशी अस्ताव्यस्त होती . HDने बहुतेक सगळी रूम चाळली होती .
हर्षलाच्या प्रेमाने भरलेली कितीतरी प्रेमपत्रं , ग्रीटिंग्स कार्ड्स अन दोघांनी लपून काढलेले फोटो - ह्याची नित्याने एक 'सिक्रेट' फाईल केली होती . ती फाईल त्याने कपाटाला कुलूप लावून ठेवली होती . ती फाईल कपाटातून गायब होती .
त्याच्या अंगावर भीतीने काटा आला अन तेवढ्याच प्रमाणात रागही !
काहीतरी वाईट होणार आहे ह्याची त्याला चाहूल लागली होती . .

रागाने किंवा भीतीने त्याचा हात थरथरू लागला , त्यालाच कळत नव्हते की तो का एवढा थरथरत होता . आता त्याला हर्षलाशी बोलायची गरज भासू लागली . कुणी 'डिस्टर्ब्' करू नये म्हणून त्याने रूम आतून बंद केली अन हर्षलाला फोन केला . कदाचित कॉलेजला परत आल्याने तिचा नंबर सुरु झाला असेल असे त्याला वाटले होते , पण नाही - पुन्हा एकदा ' आपण डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही ! '
शेवटी त्याने गर्ल्स हॉस्टेलच्या लँडलाईन वर कॉल केला .

' हा बोल ' - हर्षलाचा कोरडा आवाज त्याला ऐकू आला
तिचा आवाज ऐकून त्याच्या जळणाऱ्या हृदयात थोडासा गारवा आला .
' फोन का नाही केला यार ! मागच्या महिन्यापासून ? एक तर तुझा फोन लागत नाही , काय चाललंय काय ? - नित्याच्या आवाजातून त्याच्या प्रेमाची मागितलेली भीक अन राग एकदमच स्पष्ट होत होता !
'तसं नाही रे ! घरी होते ना मी , माझं ट्रेनिंग माझ्या गावाशेजारीच होतं ! माहितेय ना तुला .... हर्षलाच्याहि आवाजात कसलीतरी अमानिक भीती होती .
' हम्म , माहितेय ! भेटायचंय मला तुला , आज , आत्ता ! निराशेने डोक्यावरून हात फिरवून तो बोलला .
' नको ना रे , नाही रे जमणार - माहितेय ना , दादाने काय केलं ते ! - हर्षलाचा आवाज बोलताना कापत होता .
' घाबरतेयेस काय तू, जानु ? मी आहे ना ! '
' अरे , मग काय ? आपली सगळी 'लव्ह लेटर्स' त्याच्या हातात आली , माझा पासवर्ड कसा त्याला माहित झाला काय माहित , आपले G - Talk चे सगळे 'चाट' वाचलेत त्याने , कॉपी करून घेतलेत ! माहितेय ना काय काय लिहलं होत त्यात मी , तो हे वाचूच कसं शकतो ? किळस आलाय मला त्याचा आत्ता ! घरात मला आता ' लाज ' नसलेली पोरगी म्हणून सगळे बघतायेत , प्रेम करणं खरंच एवढा मोठा गुन्हा आहे का रे ? अन मी ते फक्त तुलाच लिहल होत ना ! - अन ती मोठ्याने रडायला लागली .
' रडू नको रे - '
' मी काय करू नित्या ? मला घरचे पण महत्वाचे आहेत अन तू पण ! असं पळून जाऊन मी नाही रे लग्न करणार ' अन माझ्या घराचे कधीच आपल्या लग्नाला हो नाही म्हणणार !
' अरे , मी कुठे म्हणतोय की आपण पळून जाऊ ? ' समजावू त्यांना - आपण थोडीच लगेच लग्न करणार आहोत ?
' मग मी काय करू ? सांग तू , मला कळत नाही रे !
' ते सोड , सांग आधी कुठे भेटायचं ? १-२ महिने झाले तुला बघितलं नाही मी ' - नित्या
'नको ना रे , भेटलं की मला आवरनार नाही अन मला धमकावलंय की पुन्हा मला तुझ्याबरोबर बघितलं तर मला काढून टाकतील कॉलेज मधून ! - हर्षला अजून रडतच होती
'का ? आवरणार नाही म्हणजे काय ? हाहा ... - 'किस'करशील काय ? - नित्या आपले अश्रू दाबत , हसत बोलला . वातावरण थोडंसं सौम्य करायचा केविलवाणा प्रयत्न !
'गप्प ना , अन नितेश , रडू नको तू आता , तु रडलेले मला पाहवत नाही -हर्षलाला कसे कळाले की नित्याच्या डोळ्यात अश्रू आहेत ?
'नाही ग , वेडी आहेस काय ? रडत नाहीये मी - नित्या डोळ्यातून पाझरलेले अश्रू पुसत अन हुंदका आवरत बोलला ' तुझी आई काय म्हणाली ? , ते महत्वाचं आहे आपल्यासाठी ! तुझ्या भावाचा मी जास्त विचार नाही करत ! '
' ती म्हणतेय , तिने माझ्यावर एवढा विश्वास ठेवला , अन मी तिचा विश्वासघात केला ! लहानपणापासून काहीही झालं कि मी तिला सांगत असे , अन एवढी मोठी गोष्ट मी कशी काय अन का नाही तिला सांगितली ? --- तू सांग असं कसं सांगू मी आईला की माझं अफेअर सुरु आहे ते ? अन तसही मी सांगणारच होते ना यार !
'हम्म '- नित्या
'मला कळत नाही रे की मी काय करू ? कधी कधी वाटते जगून तरी काय करू मी ? मी दुसऱ्याशी लग्न केले तरी मी तुला आयुष्यभर नाही विसरू शकणार अन मला कुणाला फसवायला नाही जमणार.... !
' मग हे तुझ्या आईला सांग ना !
' सांगितले रे , ती म्हणतेय की मुलाकडच्यांना आपण सगळं आधीच सांगूया , मग तू फसवलं असं नाही होणार , चांगली मुलं मिळतील , जी तुला स्वीकारतील , आता हे तरी प्रॅक्टिकल आहे का यार ?
' अच्छा , बरंय तुझं ', तू निदान दुसऱ्याशी लग्न करायचा विचार तरी सुरु केलाय ! - नित्याला आत्ता काय बोलवे हे कळत नव्हते.
'काय बरं , गप्प ना , मी काय करू तूच सांग - अन अजूनच जोराने तिचं रडणं सुरु झालं ' आई म्हणत होती कि, तुझ्याशी असलेल्या १-२ वर्षाच्या नात्यासाठी , आमच्याशी असलेले २०-२१ वर्षांचं नातं तोडणार का ? खूप रडते रे ती ,सारखी ! धड बोलत नाही माझ्याशी ! आधी मी तिच्या कुशीत झोपत असे , आजकाल माझ्याकडे कशी बघते ती ! मला तुझ्याशिवाय नाही राहायचं ! अन आईशिवाय पण !!!
' हम्म ! '
' तू घरी सांगितलंस का ? ! '
' नाही अजून , पण कदाचित त्यांनाही कळालं असावं , माझ्या घरून तरी काही प्रॉब्लेम नाही होणार !
' हो ना , माझी आईपण हेच म्हणत होती की - तुझ्या घरच्यांना काय एवढी सुंदर , श्रीमंत , शिकलेली सून मिळेल !
' बरं ' एवढं झालं अन साधा तुला मला एक कॉल करता नाही आला महिनाभर ?
' फोन माझ्याकडे नव्हता रे ,अन आत्तही माझ्याकडे फोन नाहिये , अन मी पण तुला विसरायचा प्रयत्न करत होते ! मला तुझी खूप काळजी वाटते रे ! तुला काही झालं तर -
'विसरायचा म्हणजे ? नित्याच्या काळजात धस्स झालं !
'काही नाही होणार रे , तू माझी नको काळजी करुस ! बर एक सांग तुला काय वाटतंय ?
'कशाबद्द्दल '?
'कशाबद्दल काय ? आपल्याबद्दल ? आपल्या दोघांबद्दल ? - नित्या वैतागून बोलला .
'मला नाही माहित , मला नाही कळत काय करू ते ? - खरंच ! मी कशाला तुला 'हो' म्हणाले ? कशाला मी तुझ्या आयुष्यात आले ? सगळं माझ्यामुळेच होतंय ! इकडे तू दुःखी , तिकडे माझी आई दुःखी !- हर्षला डोळे पुसत बोलली .
'असं कसं तुला नाही माहित ? , प्रेम करताना वाटलं नव्हतं की एक दिवस असाही येईल ? '
' नव्हतं वाटलं , त्यात तू असा - काय ठरवलायस तू तुझ्या भविष्याबद्दल ? भांडण करून आयुष्य नसतं रे सरत ! तू फायनल इयर मध्ये आहेस आत्ता काय करणारेस पुढे ? MPSC / UPSC / GATE / CAT ???? काहीच नाही ?'
थोडा वेळ दोघांच्याही मनात अंधार भरला .
' हा बोल तू , ऐकतोय मी ' -
'आपण ब्रेक - अप करूया नितेश ! अन तू ही विसर ! उगीच माझ्या भावाच्या नको नादी लागूस ! - हर्षला आता लहान पोरीसारखी रडू लागली ! ठेवतेय मी !! मला नाही बोलवत आत्ता !!!
' काय ब्रेक अप ???एवढं सोप्प आहे का ? तुला काय ? तू तर खूषच दिसतेय !!! - नित्याचा राग आता अनावर झाला होता .
' मी खूष ? जर तू माझ्यावर एकदाही खरं प्रेम केलं असशील तर विसरून जा मला '
अन तिने फोन कट केला .

'ब्रेकअप ' हा शब्द त्याच्या मेंदूला हालवु लागला . अंगातून वारं गेल्यासारखा तो भिंतीचा आधार घेत , चालत बाल्कनीत आला , कुणाला दिसणार नाही अश्या ठिकाणी खाली बसला अन गुड्घ्यात डोके घालून ढसाढसा रडू लागला . मधेच रडताना तो रिकाम्या आभाळाकडे बघत होता , डोळ्यातून आसवे वाहत होती. पण त्याला ती पुसू वाटत नव्हती . मध्येच रागाने तो दगडी भिंतीवर हात आपटू लागला . हर्षलाचे हसणे, रडणे दोन्ही त्याच्या काळजात घुमत होते ! हर्षलाचे सुंदर डोळे त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते . मोठ्याने रडताही येत नव्हते , शेवटी मुलगा तो !
सर्रकन डोळ्यासमोरून २ वर्ष सरकत होती , हर्षलाला पहिल्यांदा भेटल्यापासून ते आतापर्यंत , अन पुढे काय ह्याचा विचार ! विचाराच्या लाटेत तो कुठेतरी घुसमडून जात होता !

काही वेळाने तो दरवाजा उघडण्यासाठी आला . सुऱ्या बराच वेळ त्याचा दरवाजा वाजवत होता.
तो उभा राहिला , पाण्याची बाटली उघडली अन तोंडावर पाणी मारले . टॉवेलने तोंड पुसून तो दरवाज्यासमोर आला .
' अबे , थांब ना XXX , एवढा काय दरवाजा वाजवतोय ? ' कुणी मेलं की काय ? - त्याचंच प्रेम मरतंय हे त्याला कळत होतं !
' काय रे नित्या , काय झालं ? झोपला होतास काय ? - सुऱ्या त्याच्या टेबलवर पडलेल्या , नित्याने घरून आणलेल्या ड्ब्यातून एक लाडू उचलत बोलला .
'कुठं काय ? ' काही नाही ! ' नित्या आपला चेहरा दुसरीकडे वळवत बोलला .
' मग डोळे एवढे लाल का ? रडलायेस का तू ? - कदाचित खऱ्या मित्रांच्या नजरेतून काहीच सुटत नसावं !
' नाही रे , साल्या ! काहीपण काय ? हाहा '
' काय 'सिन' आहे ? तुझा अन हर्षलाचा , काही बोलने झाले का ? - नित्याची अवस्था बघून त्याने हर्षलाबद्दल विचारले .
' ब्रेक अप करायचं म्हणतेय ती - नित्या सरळ छताकडे बघत बोलला .
' काय ????? ब्रेक .... अप ..... सुऱ्याने उचलेला लाडु डब्यामध्ये ठेवला , कदाचित त्याला काही गोडवा जाणवला नसावा
'काय मजाक आहे काय राव ! ब्रेक -अप ! सुऱ्या छतावर फिरणाऱ्या पंख्याकडे बघत बोलला . ' कॉम्पलीकेटेड ' आहे रे हे ' प्रेम '
' मग तू काय ठरवलंयस ? HD पण हॉस्टेलवर आहे .
नित्याला काही बोलावसं वाटलं नाही . थोडा वेळ रुम मध्ये पसरली .

' बरं सोड , 'स्टुडन्ट कौंसिल' 'फॉर्म' करण्यासाठी नोटीस लागलीये , डीनने उद्या नावे मागितलीत , रेक्टर येणारेत हॉस्टेलवर आज ' सुऱ्या बाल्कनीत येत नित्याशी विषय अन मूड बदलण्याच्या उद्देशाने बोलला .
'मग , मी काय करू ? मला काही इंटरेस्ट नाही कौंसिल मध्ये ! नित्या वैतागून बोलला .
'अरे त्यांच्या ' गॅंग' मधला टॉपर 'चेअरमन' होतोय ! चंद्यासकट बाकीच्या ३ टॉपर्सनी चेअरमन ह्यायचं नाकारलंय ! 'पॉलिटिक्समध्ये कशाला पडायचं म्हणून ?
' अन तात्या ? '
' तो पण नको म्हणतोय !
'जाऊदे यार , आपल्याला पण नाही पडायचं ह्या किस्स्यात ! ' - नित्या
'बरं चल जातो मी ' - असं बोलून सुऱ्या रम मधून निघून गेला .

काही वेळाने नित्या आवरून लॉबीतून जात होता , रिकाम्या मनानं त्याला वेडं करून सोडले होते . अन समोर बघतो तोच त्याला HD दिसला . HDच्या डोळ्यात आग भडकत होती .

दोघे रागाने एकमेकांसमोरून जात होते .
' साले , भोXXX चोर , MPSC करताय तर - दुसऱ्यांच्या रूम फोडून चोऱ्या करायचं बंद करा - महाराष्ट्र सरकार तरी कशी चोरांना नोकरी देते ? XXXX ! , ह्या असल्या लोकांमुळे प्रगती होईना यार महाराष्ट्राची ! - नित्या स्वतःशीच HD ला ऐकू जावे एवढ्या जोराने ओरडत बोलला .
' बेXXXX ! उडायचं नाही इथं- HDने नित्याची कॉलर पकडली !
' नित्या , आवेगाने HDया च्या अंगावर गेला - फायनल इयर मध्ये आहे आत्ता मी ! तू -तू जास्त उडू नकोस आता ! - अन 'स्टुडंट कौंसिलचा' सेक्रेटरी आहे मी ! माहितेय ना स्टुडन्ट कौंसिल ? तू इथं दुसऱ्याच्या हॉस्टेलवर , दुसऱ्याच्या रूमवर राहतोयेस माहितेय ना ? रिफ्युजी आहेस तू ... नीट राहा , दुसऱ्याच्या 'फाईल्स' चोरू नकोस , रूम्स फोडू नकोस नाहीतर हॉस्टेल वर पाय ठेऊ देणार नाही , MPSCची मेन्स दिलीये ना , इंटरव्हिव्ह द्यायला तोंड जागेवर ठेवणार नाही ! - नित्याचा राग बडबडत होता .
नित्याने 'मी स्टुडंट कौंसिल चा सेक्रेटरी आहे ' असे का बोलले ,हे त्यालाही कळालं नाही . पण HD थोडा शांत अन जरा घाबरलेला त्याला दिसला .
एकदोन शिव्यांची आदला - बदल झाली , क्षणातच HDचे मित्र लॉबीमध्ये जमा झाले .' रेक्टर 'ऑफिस मधून गोंधळ ऐकून बाहेर आले अन दोघांनीही तिथंच आवरत घेतलं .

काहीही झालं तरी 'स्टुडन्ट कौंसिलच्या' एखाद्या कमिटीचा 'सेक्रटरी' होणे किती महत्वाचे आहे हे HD च्या शांततेने त्याला पटवून दिले होते . HDयाला आपलं पण काही महत्व आहे, बॅच मध्ये 'नित्या' पण महत्वाचा आहे हे दाखवायची संधी आहे , हे त्याच्या ध्यानात आलं .स्टुडंट कौंसिल मध्ये असणेही मानाचे समजले जाई , तसही मान -अपमान व्यक्ती , जागा , अन 'पोझिशन' बदलल्या की बदलतात जगामध्ये !

' सुऱ्या - स्पोर्ट्स सेक्रेटरी मीच होईल - भोXXX गेले सगळे ! - नित्या सरळ सुऱ्याच्या रूम मध्ये गेला .
' अन तुला स्पोर्ट्स सेक्रेटरी ह्यायचा एवढा किडा का ? मेरिट मध्ये नाहीयेस तू ! कौन्सिल मेरिटवर होते , माहितेय ना ?
' ते सोड , मीटिंग कधी आहे ?
'आज रात्री TV हॉल मध्ये , पण नको पडू ह्या फंद्यात !
........ ......
स्टुडंट कौंसिल :

स्टुडंट कौंसिल मध्ये चेअरमन अन बाकीचे ७ वेगवेगळ्या कमिटीचे सेक्रेटरी निवडायचे होते . सालाबादप्रमाणे मेरिट नुसार कौंसिल 'फॉर्म' करण्यासाठी आज TV हॉलमध्ये फायनल इयरची मीटिंग होणार होती . मेरिट नुसार घोषणा होई अन जर एखादा टॉपर 'इंटरेस्टेड' नसेल तर पुढच्या मेरिट होल्डरला संधी मिळत असे . 'GS' अन 'म्यॅग्झिन सेक्रेटरी' ही त्यातील २ पदे आधीच मुलींकडे मेरिटनुसार गेली होती . अश्विनी GS झाली होती . कॉलेज मध्ये कदाचित मुलगी टॉपर असली तरी काहीही झाले तरी चेअरमन मुलगाच बनत असे . 'पुरुषांचं वर्चस्व' / इगो ' असेल कदाचित !

रात्री ८ वाजता जवळ जवळ सगळ फायनल इयर TV हॉल मध्ये जमले .
कौंसिल ची मीटिंग सुरु झाली , आधीच सगळं ठरलेले असले तरीही वातावरण एकदम तापलेले होते , नित्याच्या अन HD चे भांडण सगळ्यांना माहित झालं होत .
मिटिंग सुरु झाली . रेक्टर मीटिंगसाठी हजर होते .
चंद्या अन तात्याची नावे मेरीटनुसार घेतल्यानंतर दोघांनीही नकार दिला . २ मुली आधीच सेक्रेटरी निवडल्याने ५ व्या टॉपर ला चेअरमनची संधी मिळाली . एकेक करून जागा भरू लागल्या . स्पोर्ट्स सेक्रेटरीसाठी मेरीटनुसार संग्रामच जेव्हा नाव घेण्यात आलं तेव्हा नित्या सरळ उभा राहिला .
' सर , बाकीच्या कमिटीच्या सेक्रेटरीची निवड तुम्ही मेरिट वर करा , पण 'स्पोर्ट्स सेक्रेटरी' अन मेरिटचा काहीही संबंध नाही '
रेक्टर ने त्याचे बोलणे ऐकून घेतले . ' जो स्पोर्ट्स सेक्रेटरी होणार आहे त्याची पण युनिव्हर्सिटी झाली आहे क्रिकेट मध्ये , मेरिट अन युनिव्हार्सिटी दोघेही त्याच्याकडे आहेत ! तुझे मेरिट कुठेय ? तू कसा काय विचार करतोयस की तू सेक्रेटरी होशील ??? ' रेक्टर रागाने बोलले .
'हो सर , नियम का बदलायचा ? , आणि ह्याला प्रत्येक वेळी 'राडा' करायची सवयच आहे ! - संग्राम बोलला .
' सर , हा नितेश - फर्स्ट इयरपासून ३ वेळा युनिव्हर्सिटी झालोय अन ते हि ३ वेगवेगळ्या स्पोर्ट्स मध्ये ... प्रत्येकाने आपापल्या 'ट्रॉफ्या' आणाव्या इथे , ज्याच्या ट्रॉफ्या जास्त तो 'स्पोर्ट्स सेक्रेटरी' ! - सुऱ्याने नित्याला सपोर्ट केला .
नित्याने तात्या , अक्षा , चांद्याकडे बघितले !
' हो सर , आम्हालाही हेच वाटते की स्पोर्ट्स सेक्रेटरीसाठी मेरिटच बंधन नसावं - तात्या , अक्षा अन चंद्या ने रेकटर कडे मागणं घातलं .
' पण सर , हे कसं शक्य आहे ? ह्या नित्याचा फर्स्ट क्लास पण नाही - रितेश रागाने बोलला .
' तर मग आम्ही ही कौंसिल फॉर्म होऊ नाही देणार - सुऱ्या
' अशी कशी होऊ नाही देणार ? संग्राम
' शांत , एकदम शांत .... आजपर्यंत असं कधी झालं नाही , उद्या डीनशी बोलून निर्णय होईल !- रेक्टर रागाने बोलले . बाकीच्या कमिटीचे सेक्रेटरी निवडून डीन रागाने निघून गेले .
अन जाताना नितेश अन संग्रामला धमकी दिली की , जर हॉस्टेल मध्ये रात्री काही भांडण झालं तर दोघांनाही स्टुडंट कौंसिल मध्ये तर सोडा पण हॉस्टेल मध्येही जागा मिळणार नाही ! -

' हर कुत्ते का दिन आता है - ' असं नित्याकडे म्हणत संग्राम रुमवर निघून गेला .
तो कल तेरा आयेगा ... जा बे' - स्पोर्ट्स सेक्रेटरीच्या पदासाठी नित्याला आज त्याच्याशी भांडायचं नव्हतं

दुसऱ्या दिवशी नोटीस बोर्डवर नवीन 'स्टुडंट कौंसिल' ची नावे लागली . नित्याचं नाव स्पोर्ट्स सेक्रेटरीच्या समोर होत . कस काय माहित पण डीनने हा निर्णय घेतला होता अन बाकीच्या कुणी 'ऑब्जेक्शन' घेतलं नाही ! संग्रामला 'हॉस्टेल/ मेस ' च्या कमिटीचे सेक्रेटरी पद मिळालं होत .

आपलं नाव वाचून नित्याची छाती आनंदाने फुलून आली , लगेचच त्याने हर्षलाला फोन केला .

' हर्षला , मी आत्ता 'स्पोर्ट्स सेक्रेटरी' आहे स्टुडन्ट कौन्सिल मध्ये '
' माहितेय कसा झालायेस ते , अन तुला काय गरज होती माझ्या भावाशी भांडायची ? तुला कळतंय ना काय करतोयस तू ते ? ह्ह्ह !!! सुखाने मला राहू देशील की नाही इथे - अन रागाने हर्षलाने फोन ठेवला .

(क्रमश :)

बेधुंद - भाग १ : http://www.misalpav.com/node/34768
बेधुंद - भाग २ : http://www.misalpav.com/node/34925
बेधुंद - भाग ३ : http://www.misalpav.com/node/35006
बेधुंद - भाग ४ : http://www.misalpav.com/node/35777
बेधुंद - भाग ५ : http://www.misalpav.com/node/35798
बेधुंद - भाग ६ : http://www.misalpav.com/node/35832
बेधुंद - भाग ७ : http://www.misalpav.com/node/35859
बेधुंद - भाग ८ : http://www.misalpav.com/node/35885#new
बेधुंद - भाग ९ : http://www.misalpav.com/node/35937
'बेधुंद - भाग १० :http://www.misalpav.com/node/36003
बेधुंद- भाग ११ : http://www.misalpav.com/node/36353
बेधुंद - भाग १२ : http://www.misalpav.com/node/36354
बेधुंद - भाग १३ : http://www.misalpav.com/node/36355
बेधुंद - भाग १४ : http://www.misalpav.com/node/36884
बेधुंद - भाग १५ : http://www.misalpav.com/node/36913
बेधुंद - भाग १६ : http://www.misalpav.com/node/36926

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

क्षमस्व's picture

29 Aug 2016 - 6:29 am | क्षमस्व

छान लिहिलंय।
पूभाप्र

अविनाश लोंढे.'s picture

29 Aug 2016 - 11:53 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद

प्रसन्न३००१'s picture

29 Aug 2016 - 10:00 am | प्रसन्न३००१

मस्त... प्रत्येक क्षण नि क्षण जिवंत उभा राहतो डोळ्यासमोर ... जबरदस्त लिहील आहेत

अविनाश लोंढे.'s picture

29 Aug 2016 - 11:53 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद

झुमकुला's picture

29 Aug 2016 - 10:33 am | झुमकुला

छान लिहिलंय, हॉस्टेल लाईफ अगदी डोळ्यासमोरून तरळून गेले,
एक शंका, फक्त कुतूहल, तुम्ही COEP ला होतात का? नाही एवढे सगळे secretary फक्त तिथेच होते म्हणून विचारले.

अविनाश लोंढे.'s picture

29 Aug 2016 - 12:02 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद , नाही मी COEP ला नव्हतो , प्रत्येक वाचकाला कुठेतरी जोडण्याचा प्रयन्त आहे :)

हलकट बाब्या's picture

18 Sep 2016 - 11:36 am | हलकट बाब्या

तुम्ही COEP ला होतात का?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 Aug 2016 - 1:29 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त जबरदस्त चालु आहे कथा अविनाश लोढे साहेब

वाहवा.. खुप छान... पुढचा भाग पण लवकर येऊ देत.

सुखी's picture

29 Aug 2016 - 3:07 pm | सुखी

मस्त, वेगवान आहे कथा

अविनाश लोंढे.'s picture

31 Aug 2016 - 12:15 am | अविनाश लोंढे.

धन्यवाद

हलकट बाब्या's picture

18 Sep 2016 - 11:39 am | हलकट बाब्या

मस्त वाटलं वाचून ... पुढील भाग लवकरच टाकाल ही अपेक्षा :)

स्मिता चौगुले's picture

21 Sep 2016 - 4:03 pm | स्मिता चौगुले

पुढील भाग ??

अविनाश लोंढे.'s picture

25 Sep 2016 - 11:02 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद ....
'बेधुंद'च पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर असल्याने पुढील भाग 'नकोसे वाटूनही' काळजात दडवून ठेवले आहेत .
थोडी वाट बघावी लागेल .
माफी असावी ... !

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Sep 2016 - 12:14 pm | अनिरुद्ध.वैद्य

अभिनंदन!

अरे वा लोंढे साहेब, पुस्तक प्रकाशन म्हणजे भारीच की.
अभिनंदन बरका. होउ द्या जोरात.