एक संघ मैदानातला - भाग २०

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
25 Aug 2016 - 4:05 pm

काही वैयक्तिक कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व..

--------------x--------------x----------

योग्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. उद्यासाठीचा सॉलिड टॉपिक तिला मिळाला होता. तुप्याने तिला झापडून शांत केलं. ती गप्प बसणार नाही हे आम्हाला माहित होत पण तिला जे हवं ते आम्ही तिला आत्ता करू देणार नव्हतो.
सगळीकडे प्रचंड शांतता होती. हवेत उकाडा असल्यामुळे आत जावेसेही वाटत नव्हते पण म्हणून रात्र बाहेर काढणे पण योग्य नव्हते. अजून थोडा वेळ बाहेर काढून आम्ही नाइलाजले आत जाऊन झोपलो. मनावर आलेल्या ताणाने म्हणा किंवा त्या रागाने म्हणा नीट झोप काही लागली नाही. जरा खुट्ट झाल कि जाग तरी येत होती किंवा डोळा लागला तर विचीत्र स्वप्न पडत होती. पहाटे कधीतरी इतर संघाच्या मुलींना लवकर निघायचं असल्यामुळे त्या उठल्या आणि त्यांचा आवाज ऐकू आला तेव्हा कुठे जरा झोप लागली.
सकाळी सगळ्यात शेवटी मी उठले आणि आरामात सगळे आवरले. आज खूप हलकं हलकं वाटत होत. कालच्या प्रकारचा मनावर जेवढा ताण घ्यायचा होता तो घेतला होता आता मात्र त्याच काहीच वाटत नव्हतं. बिनधास्त समोरच्या कट्ट्यावर नांगर टाकून तोंडात ब्रश धरून आकाशाकडे तंद्री लावून बसले होते. तेवढयात दीदीने मला आवरण्यासाठी ढोसलं. माझा आवरायचा अजिबात मूड नव्हता पण भूक लागली होती त्यामुळे झक मारत जेमतेम आवरलं आणि मेसच्या दिशेने निघालो. कालचा प्रकार घडून गेल्यावर मला आज मोकळं मोकळं वाटत होत तर रुपाला जाम टेन्शन आलं होत. ती ते टेन्शन मला पास करत होती. मी तिचं म्हणणं उडवून लावलं पण तुप्यानेही तिची बाजू घेतली. त्यांच्या मते ती मुलं कालचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आपण खूप मोठी चूक करून बसलो आहोत, आता आपलं कसं होणार दादा, दीदी, आप्पा आपल्यालाच बोलणार....असं सगळं ती मला सांगत असताना परत तो कार्टा रस्त्यात दिसला. मी त्याला पहिले आणि काही झालाच नाही अश्या प्रकारे लुक देऊन नजर दुसरीकडे वळवली. तो शांत रस्त्याच्या पलीकडे उभा होता. आम्हीही शांतपणे मेसमध्ये जाऊन नाश्ता केला आणि आलो तसेच गपचूप परत रूमवर आलो. रस्त्यात महाशय होतेच उभे. ह्यावेळी माझ्याबरोबर जागूलाही तो दिसला पण रात्री त्याचा चेहरा तिला नीट न दिसल्यामुळे ती शुअर नव्हती.
सकाळी सकाळी योग्याने काल रात्रीचा प्रसंग मेसला जाईपर्यंत सगळ्यांना सांगायचाच ह्या निश्चयाने प्रत्येकाला धरून धरून कानात सगळं ती सांगत होती आणि वर 'कोणाला सांगू नकोस हं तुला म्हणून सांगतेय ' असंही बजावत होती. त्यामुळे मेसमध्ये व्हायचे ते झालंच. ती कोण मुलगी म्हणून बाकीच्या तिला विचारात आणि योग्या ती मुलगी कोण हे तिच्याकडे न बघता तिने काय काय घातलाय ह्यावरून सांगे. ते वर्णन जुळणारी दिसली कि मुली हळू आवाजात तिच्याकडे न बघता कुजबुज करत त्यामुळे त्या मुलीला काय ते समजलं. आम्ही योग्याला रूमवर गेल्यावर कोपऱ्यात घ्यायचं ठरवलं. तुप्याने तिला जोरदार चिमटा काढत गप्प बसायला सांगितलं.
आम्ही रूमवर पोचलो आणि ठरल्याप्रमाणे योग्याला गंडवून बाथरूममध्ये घुसवलं आणि तिची यथेच्छ धुलाई केली. आमची वरात बाथरूममध्ये जाताना त्या नाशिकच्या मुलीने देखील पाहिलं असावं ते शेपुटं पण आमच्या मागे मागे तिथे हजर झालं. योग्याला धुणं तिला एन्जॉय करायचं असावं कारण आमचा प्रोग्रॅम होईपर्यंत शहाणी शांतपणे बाहेर उभी होती. मी बाहेर डोकावले तर ही बया बाहेर होती म्हणून आम्ही बाहेर आलो.
" तू इथे काय करतेयस ? "
" जाऊ दे गं.. उगाच कशाला तिला बुकलताय तुम्ही"
" आम्ही का बुकलतोय ते आम्हाला आणि तिला बरोबर माहित आहे.. तू मध्ये पडू नकोस " तुप्याने तिला ठणकावलं.
" मला वाटलं म्हणून मी सांगायला आले... कालच्या प्रकारानंतर असे काही तरी होणार ह्याची मला कल्पना होती.. तरी माझ्याकडून मी तुम्हाला सांगत आहे.. उगाच परत तिने तुमच्या किंवा आमच्या सरांना सांगितलं तर अजून मला भारी पडेल.. बाकी काही नाही.. " ते ऐकल्यावर आम्ही पण जरा विचारत पडलो पण एवढ्या लाथा खाल्ल्यावर योग्या काही तोंड उघडत नाही हे जागून म्हंटल्यावर आम्हाला पटलं. योग्याला परत प्रेमाने समजावून आणि तिला पुढ्यात घालून रूमवर जाऊ लागलो.
रुमजवळ जात असताना आम्हाला प्रचंड शांततेचा आवाज येऊ लागला. हो ! शांततेचा आवाज... कारण एरवी रूमवर असतो तो आवाज आणि आताचा आवाज खूप फरक होता. आम्ही तिथे पोचल्यावर ही अशी शांतता का हे उमगले. सांगलीमध्ये आप्पांचे आगमन झाले होते आणि हे वादळ आमच्या रूमवर धडकले होते. त्यांना तिथे बघून डोकं सुन्न झालं. अचानक ग्राउंडबाहेरचे सगळे पराक्रम डोळ्यासमोर येऊन गेले. आम्ही एकमेकींकडे पाहिलं आणि गपचूप आत जाऊन सगळ्यांमध्ये प्रवचनाला बसलो. एकूण प्रवचनाचा सूर असा होता कि आम्ही चुकून सगळ्या मॅचेस जिंकलो आहोत, त्या जिंकायची आमची पात्रता नव्हती. तरी आता जिंकलंच आहात तर पुढेही डोकं लावून नीट खेळावं.
तासभर आमची अक्कल काढल्यावर त्यांना आज फायनल असल्याची आठवण झाली मग कस आणि काय खेळायचं ह्याचं प्लॅनिंग केलं म्हणजे त्यांनी केलं आणि आम्ही फक्त ऐकलं. आता बोलण्यासारखं आणि प्लॅनिंग करण्यासारखं काही राहिलं नाही असं वाटलं तेव्हा त्यांनी परत 'शिस्त' ह्या विषयावर सुरुवात केली तेवढयात रूपाने रामुगडे सर आप्पांना विचारात होते आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे असं सांगितल्यावर त्यांना अजून कसली तरी आठवण झाली आणि त्यांनी अजून किमान तासाभराच्या इराद्याने ठोकलेली मांडी मोडून दादांबरोबर ते रामुगडे सरांना पिडायला निघून गेले.
आम्ही बुकललं म्हणून योग्याच अंग दुखायला लागलं, मग आम्हीच तिला जरा बाम वैगरे लावून दिला. तोपर्यंत जेवायची वेळ झालीच होती. मेसमध्ये जेवण करून रूमवर जाताना कुल्फीचा राउंड झाला. काल रात्री नीट झोप न लागल्यामुळे दुपारी छान झोप लागली. काल त्याला धुतल्यापासून मी बिनधास्त होते पण रूपा आणि जागु उगाच टेन्शनमध्ये होत्या आणि सगळीकडे तोंड पडून फिरत होत्या. आमच्यात काहीतरी झालेलं आहे ह्याचा वास सगळ्यांना येत होता पण बाकीच्यांना काहीच माहित नसल्यामुळे नक्की काय झालंय त्यांना कळत नव्हतं.
आज संध्याकाळी ७ ची फायनल होती. त्याआधी थर्ड प्लेससाठी मॅच असणार होती. आम्ही ६ वाजता ग्राउंडवर जायचं असं ठरवलं. आज मागे आप्पा असणार ह्याचं सगळ्यांना टेन्शन आलं होत. दादा आम्हाला जास्त न तापवता आमचा खेळ करायला मोकळीक देत होते त्याउलट आप्पा होते ते मागे बसून गेम सॉलिड तापवत आणि त्यांच्या प्लॅनिंगनुसारच गेम करायला लावत. त्यामुळे ते मागे असले कि टेन्शन येत असे. आम्ही उठून हळूहळू आवरायला घेतलं. दीदी आणि रेश्माची काहीतरी कुजबुज चालू होती. नककी कशावरून काय चालू होत काही काळात नव्हतं. दीदीनेच विषयाला वाचा फोडली.
" आज आपण दादांना सांगूया कि मागे तुम्हीच बसा.. आप्पा नको... काय वाटत तुम्हाला ?"
" आयडिया चांगली आहे ग.. निदान आपल्या डोक्याने शांतपणे खेळू तरी.. पण आप्पांना सांगणार कोण आणि ते ऐकणार ?" रेश्माने विचारलं
" ते आपण फायनल पोचलो म्हणून इथे आले आहेत.. ते कशाला दुसरीकडे बसतील?" तुप्याचा सवाल
" एक गम्मत करूया.. मी बोलते दादांशी... " जागू म्हणाली.
त्या वेळेवर निर्णय सोडून आम्ही बाहेर पडलो. चहा घेऊन ग्राउंडवर जाताना जागूने दादांना गाठलं आणि काहीतरी पट्टी पढवायला लागली. ग्राउंडवर पोचेपर्यंत जागूने बहुतेक दादांना पटवले आहे असे आम्हाला वाटले. मॅच सुरु होताना काय ते समजणार होतेच. आम्ही जाऊन बसल्यावर अर्ध्या तासाने थर्ड प्लेसच्या मॅचेससाठी कॉल दिला. आम्ही शांतपणे समोर काय चालू आहे ते बघत बसलो होतो. लांबून सगळ्यांना पिडून आप्पांनी आमच्या दिशेला मोर्चा वळवलेला आम्हाला दिसला. ते ज्या दिशेने चढत यायला लागले त्याच्या विरुद्ध दिशेने आम्ही खाली उतरायला लागलो. असं आम्हाला जाताना बघून ते वॆतागले आणि दादांजवळ बसले. आम्ही स्टेडियमच्या मागे येऊन गवतात बसून राहिलो. मग थोड्यावेळाने त्याचा हि कंटाळा आला. प्रमुख पाहुणे आल्याचे माईकवरच्या आरडा-ओरड्यामुळे समजले. त्यामुळे आता लवकरच थर्ड प्लेसनंतर लगेचच मॅच असेल म्हणून आम्हीही तयारीला लागलो. थोड्यावेळातच आम्हाला पहिला पुकार देण्यात आला. इथे आमचा वार्मअप सुरु झाला होता.
तिसरा पुकार दिल्यावर आम्ही मैदानाच्या पाया पडलो आणि शिस्तीने मैदानात पोचलो. मैदानाला गोल फेरी मारून आम्हाला हवं ते ग्राउंड घेतलं. जागूने सांगितल्याप्रमाणे मागे फक्त दादांसाठी १ खुर्ची ठेवली होती. पण आमच्या मनासारखं करतील ते अप्पा कसले? ते मागे येऊन त्या खुर्चीवर बसले आणि दादा कुठूनतरी दुसरी खुर्ची उचलून आणायला लागले. समोरचा संघ आला. कव्हर फिरवली. टॉस उडवला. आम्ही टॉस जिंकलो. ह्यावेळी पंचांकडून नाणं घेतलं. ग्राउंडची मागणी केली. मागणी मान्य झाली.
रेड सुरु व्हायच्या आधी दीदीने सगळ्यांना बोलावले.
" मागे अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. कोणी कितीही तापवू दे.. हो हो म्हणा आणि सोडून द्या.. "

आम्ही एकत्र झालेलो बघितल्यामुळे आप्पा पळत आले. तोपर्यंत आम्ही आमच्या जागा पकडल्या. मग ते परत गपचूप जागेवर जाऊन बसले.
शिटी वाजली आणि फायनलची पहिली रेड सुरु झाली. रेडर आली तिने कव्हर नाचवण्याआधी माझ्यावर अटॅक केला. मी तो वाचवला. तेवढ्यात तिने जागूला बैठी मारली. तिचा तोही अटॅक वाया गेला पण साधारणतः हि काय करू शकते आम्हाला अंदाज आला. आज पुण्याच्या टीमने पश्चिम बंगालच्या २ प्लेयर्सना उतरवले होते. त्यामुळे त्यांच्या खेळाचा फार अंदाज नव्हता. ह्यावेळी आमच्याकडून पहिली रेड रेशमाने केली. कव्हर नाचवून बोनस करून आली.(१-०) ती परत येताना तिला फॉलो मारला आणि आणि त्यांना एक पॉईंट गेला. (१-१)
झालं आप्पा भडकले. " तू फॉलो कसा खाऊन घेतलास? लक्ष कुठे होत तुझं ? . . . . . . . . . . " वैगरे.
रूपाने रेश्माचा कॉर्नर घेतला. तेवढ्यात त्यांनी मुद्दाम लेफ्ट रेडरला पाठवले. तिने लेफ्ट टर्नला आणि मला दाबून सुंदरपैकी थर्डला बोनस केला (१-२). रूपा फिरू कि नको ह्या गोंधळात असताना तिने वर रुपावरही अटॅक केला. सुदैवाने जागु अलर्ट होती. तिने रेडरला डॅश देत ग्राऊंडच्या बाहेर केलं (२-२). रेश्मा आत आली आणि अप्पांची बडबड वाढली.
पुढची रेड दीदीने केली. बोनस हा तिचा हुकमाचा एक्का आहे हे परत तिने सिद्ध केलं (३-२). त्यांच्याकडून लेफ्ट रेडर आली. ती स्टेपिंग करत थर्डवर गेली आणि आता रेश्मावर अटॅक करायला जाणार एवढ्यात तिची बॅक मी काढली (४ -२). आजच्या मॅचला दिप्तीला उतरवले होते त्यामुळे आमचे लेफ्टचे पॉकेटसुद्धा टाइट होते. जागु रेडला गेली. गेल्यागेल्या तिचा उलट पट काढला त्यामुळे ती बाहेर बसली (४-३). आप्पा परत वैतागले. त्यांना बाहेर शांतपणे बसवेना. दर थोड्या वेळाने ते खुर्ची घेऊन थोडं थोडं पुढे सरकत राहायचे. आता ते लॉबीच्या कोपरयला येऊन बसले होते. पंचांचे लक्ष कसे गेले नव्हते काय माहित ?
रुपाला राईट कॉर्नर देऊन मी टर्नवर आले. पुढच्याच रेडला मी हात मारून घेतला आणि आउट झाले (४-४). आता आमची ५ ची कव्हर होती आणि त्यांची ७ची. दीदीने काही वेळ बोनसवर गेम सुरु ठेवायचा असं ठरवलं. रूपाच्या हाताला दिप्तीला पाठवले. दीदी गेली आणि बोनस करून आली (५-४). पुण्याची रेडर आली तिने बरीच कव्हर नाचवली पण पॉईंट लागला नाही तशी परत गेली. आता रेडला रूपा गेली. रूपा पॉईंट मारण्याच्या प्रयत्नात असताना तिला डॅश दिला (५-५). तीही आमच्या रांगेत येऊन बसली. आता आप्पा त्यांच्या खुर्चीसकट लॉबीमध्ये पोचले आणि हे पंचाच्या लक्षात आले. त्यांनी शिटी वाजवत कोचसाठी आखलेल्या जागेत जाऊन बसायला सांगितले. नाईलाजाने आप्पा मागे सरकले.
मॅच जरी इक्वल असली तरी ग्राऊंडमध्ये आमचे चारच प्लेयर्स शिल्लक होते. त्यांची रेड सुरु झाली. अप्पांच्या बडबडीमुळे रेश्मा तापली आहे हे बाहेरून समजत होते. आम्ही बाहेरून बोलून तिला शांत करायचा प्रयत्न करत होतो पण ते शक्य होत नव्हते. आम्ही दादांकडे पाहिले आणि खुणेनेच त्यांना आप्पांना घेऊन जाण्याबद्दल सांगितले. आमच्या सांगण्यानुसार दादांनी प्रयत्न करून पहिला पण आप्पा मागे यायला अजिबात तयार नव्हते. दीदीने टाईम आउट घेतला. रेश्माला आणि दीदीला हाताखाली ठेवून योग्या आणि दिप्तीला कॉर्नर देऊया असं ठरवलं. रेड सुरु झाली रेश्मा रेडला गेली. तिला बोनस मिळाला (६-५). ह्यावेळी आम्हाला बोनस पेक्षा पॉईंट्सची जास्त गरज होती. लावलेल्या कव्हरसह हाफटाईम पर्यंत गेम तसाच सुरु राहिला. हाफटाईम पर्यंत आप्पांना दोन वॉर्निंग मिळाल्या होत्या. अजून १ वॉर्निंग आणि आमच्याकडून त्यांना १ टेक्निकल पॉईंट गिफ्ट.
हाफ टाईम सुरु असताना दीदीने आप्पांना थोडं शांत राहण्यास सांगितल आणि टेक्निकल पॉईंटची पण आठवण करून दिली. आप्प्पा गुरगुरत का होईना पण थोडा वेळ शांत बसले. खेळ परत सुरु झाला. ह्यावेळी त्यांनी गेम स्पीड करायचा असं ठरवलेलं दिसलं. त्यांचा रेडर्स जबरदस्त वेगाने रेड करत होत्या. खेळ सुरु झाल्यावर साधारण २ मिनिटातच दीप्ती तापली आणि तिने हात घातला. ती आणि योग्या बाहेर आल्या (६-७). आता दीदी आणि रेश्मा राहिल्या. पुढच्याच रेडला दीदीने बोनस केला पण तिला पॉईंट मारायला यश येत नव्हते (७-७) हे कळत होते. आता त्यांची रेड सुरु झाली. दीदीला कव्हर करण्यासाठी रेश्माने खूप पुढे कव्हर काढली आणि त्यामुळे रेश्मा आऊट झाली (७-८). आता दीदी एकटी उरली होती. तिने सुरुवातीलाच बोनस करून पॉईंटसाठी प्रयत्न सुरु केला पण त्यांच्या लेफ्ट टर्नने दीदीला पटात पकडले (८-११). लोण पडला आणि ३ चा लीड गेला. आम्ही टाईमआऊट घेतला. शेवटची ५ मिनिटं राहिल्याचा पुकारा झाला.

आम्ही सगळे आत आलो. त्यांनी बंगालच्या रेडरला रेडला पाठवले. तिने कव्हर जास्त न नाचवता रेशमा जवळ बोनस केला (८-१२). आता रेडला दीदी गेली. तिनेही सहज बोनस केला. शेवटची ४ मिनिट शिल्लक राहिली. आप्पा मागून अखंड बडबड करत होते. आम्ही त्यांचं ऐकत नसल्यामुळे त्यांना प्रचंड राग येत होता. अर्थात त्यांच्या बडबडीतला एक एक शब्द आम्हाला नंतर कळणारच होता. त्यात त्यांची एक नील रेडसुद्धा झाली. अचानक मी फॉलो मारला. फॉलो काही लागला नाही पण रेडला गेल्यासारखं वरच्या कॉर्नरवरच अटॅक करायचा ठरवलं. माझी ही खेळी माझ्यासाठीही नवीन होती. मन सांगेल त्याप्रमाणे मी केलं. कव्हर नाचवून टर्नला दाबून वर कॉर्नरवर रनिंग अटॅक मारला. ज्याची अपेक्षा होती तेच झालं. त्याची कॉर्नर बाहेर बसली (९-१२). त्यामुळे त्यांना कव्हरमध्ये बदल करावे लागले. त्यामुळे दीदीला बोनस घेणे सोपे झाले. त्यांची परत एक रेड नील गेली. शेवटची ३ मिनिट राहिली आणि ३ चा लीड. रेडला रेश्मा गेली. तिने बोनस आणि पॉईंटसाठी खूप प्रयत्न केले पण जमले नाही पण ह्यामुळे आप्पा चिडले. दीदीची एक रेड वाया घालवली... जमत नाही तर रेड करायची कशाला... वैगरे वैगरे... असं काहीसं तिला वाटेल ते बडबडायला लागले. दिप्तीने दादांना खूण केली पण ते ऐकायला तयार नव्हते. पुण्याची रेड सुरु झाली. आम्ही वातावरण हलकं ठेवायचा प्रयत्न करत होतो. पण अगदी शेवटच्या क्षणी घोळ झाला. लेफ्ट टर्नवरून दीप्ती फिरली. दीप्ती फिरली म्हणून रेश्मा आली आणि पकड फेल होऊन अजून २ चा लीड त्यांच्याकडे गेला (९-१४). शेवटची २ मिनिट राहिली होती. शेवटच्या ४ किंवा ५ रेड होणार होत्या.
दीदी रेडला गेली. गेल्या गेल्या तिने बोनस केला आणि पॉईंटसाठी प्रयत्न करू लागली. त्यांनी बोनस सोडून कव्हर खूप आत घेतली. दीदी अजून आत आत जात चालली होती. आम्ही मागून २ वेळा खुणेच्या टाळ्या वाजवल्या. पंचानी आमच्याकडे पाहिलं आणि चक्क दुर्लक्ष केलं. ह्यावेळी पंचांना टेक्निकल पॉईंट पुण्याला द्यायचा फुल चान्स होता. आधी आप्पांनी घातलेला गोंधळ आणि मग आमचं क्लापिंग.. पण तरीही त्यांनी बहुतेक आम्हाला सोडायचं ठरवलं. दीदीला बहुतेक भान आलं असावं. ती मागे फिरली. त्यांची रेडर आली. आरामात टच करून व्यवस्थित ३० सेकंड टाईमपास करून मागे फिरली. परत दीदी गेली. ह्यावेळी त्यांनी तिने बोनस करायच्या आधी दीदीचा पट काढायचा प्रयत्न केला पण पकड झाली नाही आणि पॉईंट आम्हाला मिळाला (१०-१४).
" सामना संपायला शेवटचं मिनिट... " पंचांची पुकारा केला. आम्ही एकमेकींकडे पाहिलं. आप्पा मागून सुरूच होते.
त्यांची रेड सुरु झाली. ठरवल्याप्रमाणे तिने टच केली आणि ३० सेकंड घालवून परत गेली. मॅच हातातून गेलीच होती. शेवटच्या रेडला योग्याला पाठव म्हणून आप्पा मागून ओरडत होते पण शेवटची रेड सुद्धा दीदीनेच करायची ठरवली. त्याप्रमाणे ती रेडला गेली. त्यांच्याकडे ४ चा लीड असल्यामुळे त्यांनीसुद्धा तिला झुंजवायचे ठरवले. कव्हर टचवर घेतली. दीदी वैतागली. तिने टच करत असतानाच हाताने कॉर्नर आणि हाताखालच्या असे २ पॉईंट्स सुद्धा मारले (१२-१४).
ती परत मागे येताच शिटी वाजली आणि सामना संपला. आम्ही २ पॉइंट्सने हरलो. अप्पांच्या बडबडीची शिक्षा म्हणून पुण्याला १ टेक्निकल पॉईंट दिला गेला. म्हणजे आम्ही ३ ने हरलो. मैदानाला नमस्कार करून समोरच्या संघाचे अभिनंदन करून स्टेडियमच्या मागे गवतात येऊन बसलो. आज ग्राउंडवर पाणी कमी मारल्यामुळे पाय चांगलेच सोलवटले होते. हाता-पायांची बँडेज सोडवेपर्यंत आप्पा आणि दादा तिथे पोचलेच.
" चांगली टफ दिलीत... छान खेळलात.... अभिनंदन... सेकंड प्लेस घेतलीत.." दादांनी सुरुवात केली. आम्ही डोळ्याच्या कोपऱयातून त्या गुरगुरण्याऱ्या वाघाकडे बघत होतो. ते काहीच बोलत नाहीत ह्याचा चान्स घेऊन आम्ही बाथरूमचं निमित्त करून सटकण्यासाठी आवरण्याचा वेग वाढवला.
" तुमचं आवरून झालं कि इथेच या... मला तुमच्याशी बोलायचंय... " शेवटी वाघोबा बोललेच. आता सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
एक संघ मैदानातला - भाग १२ http://www.misalpav.com/node/36281
एक संघ मैदानातला - भाग १३ http://www.misalpav.com/node/36300
एक संघ मैदानातला - भाग १४ http://www.misalpav.com/node/36406
एक संघ मैदानातला - भाग १५ http://www.misalpav.com/node/36536
एक संघ मैदानातला - भाग १६ http://www.misalpav.com/node/36579
एक संघ मैदानातला - भाग १७ http://www.misalpav.com/node/36625
एक संघ मैदानातला - भाग १८ http://www.misalpav.com/node/36685
एक संघ मैदानातला - भाग १९ http://www.misalpav.com/node/36730

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

नाखु's picture

25 Aug 2016 - 4:33 pm | नाखु

उशीरा टाकलात पण सामना समालोचन न वाटता थेट वर्णन केलेत ते चांगले.

पुभाप्र

बंट्या's picture

25 Aug 2016 - 4:58 pm | बंट्या

फॅन आहे मी तुमच्या शैलीचा .हाही भाग खूप सुंदर ....

शलभ's picture

25 Aug 2016 - 5:04 pm | शलभ

मस्त मॅच झाली.

हाही भाग छान. पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

25 Aug 2016 - 11:58 pm | मुक्त विहारि

हा पण भाग मस्त....

नावातकायआहे's picture

26 Aug 2016 - 7:04 am | नावातकायआहे

बाडिस...

असंका's picture

28 Aug 2016 - 1:33 am | असंका

फार सुरेख लिहित आहात...धन्यवाद!

पुभाप्र!!

बाबा योगिराज's picture

28 Aug 2016 - 1:15 pm | बाबा योगिराज

हा भाग सुद्धा आवडला.

पुलेशु, पुभाप्र.

बाबा योगीराज

पक्षी's picture

29 Aug 2016 - 7:13 pm | पक्षी

छान, पु भा प्र

नावातकायआहे's picture

5 Sep 2016 - 7:33 am | नावातकायआहे

पु भा प्र

नावातकायआहे's picture

8 Sep 2016 - 6:36 am | नावातकायआहे

पु भा प्र

आतिवास's picture

5 Sep 2016 - 9:12 am | आतिवास

सगळे भाग वाचते आहे.

महेश रा. कोळी's picture

8 Sep 2016 - 1:15 pm | महेश रा. कोळी

सगळे लेख एकादमात वाचले आणि जुन्या दिवसात गेलो.
मी पण कबड्डी खेळायचो ते दिवस आठवले. रोज संध्याकाळची प्रॅक्टिस,वॉर्मप,किट,मॅच च्या वेळी बोलायची वेगळी भाषा,चवडा, बॅक,पट,ढुस,जम्प,बोनस,लोन अहाहा खरच खूप मस्त दिवस होते ते! बाहेर गावी खेळायला गेल्यावरची दंगा मस्ती,शाळेच्या क्रीडा महोत्सवात इतरांपेक्षा थोडं जास्त कळत असल्यामुळं मारलेली शायनिंग,शिक्षकांच्या आणि खास करून मुलींच्या कौतुकाच्या नजरा सगळं आठवून अंगावर मोरपीस फिरल्यासारखं वाटलं.

म्हैश्या
लेफ्ट टर्न जयहिंद

महेश रा. कोळी's picture

8 Sep 2016 - 1:18 pm | महेश रा. कोळी

एक राहिलंच पुढचा भाग लवकर येऊ दे!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

8 Sep 2016 - 6:56 pm | घाशीराम कोतवाल १.२

चान्गला होता हाहि भाग

नावातकायआहे's picture

19 Sep 2016 - 4:44 am | नावातकायआहे

पु भा प्र

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2016 - 8:50 am | टवाळ कार्टा

+१

नावातकायआहे's picture

23 Sep 2016 - 6:42 am | नावातकायआहे

+१

नावातकायआहे's picture

6 Oct 2016 - 6:44 am | नावातकायआहे

पु भा प्र

रघुनाथ.केरकर's picture

20 Sep 2016 - 3:12 pm | रघुनाथ.केरकर

लेखिकेचे खरेच कौतुक ....
सगळा सामना डोळ्यासमोरुन गेला.

शिबिआय तै, भारी लिहिता.

सगळे भाग एकदम वाचले. झक्कास आहेत.
पुढचा भाग कधी ?

स्मिता चौगुले's picture

21 Sep 2016 - 4:06 pm | स्मिता चौगुले

पुढचा भाग कधी ?

सही रे सई's picture

24 Oct 2016 - 9:02 pm | सही रे सई

किती वाट पाहायला लावणार? आता येउद्या कि पुढचा भाग म्हणते मी.

नावातकायआहे's picture

25 Oct 2016 - 4:30 am | नावातकायआहे

पु भा प्र

बोका-ए-आझम's picture

25 Oct 2016 - 9:00 am | बोका-ए-आझम

आता तर विश्वचषक पण जिंकला आपण!

विजुभाऊ's picture

20 Jun 2020 - 8:26 pm | विजुभाऊ

या पुढचे भाग कुठे आहेत कोणी सांगेल का