अमेरिकेत मी काय वाचतोय ?

जयन्त बा शिम्पि's picture
जयन्त बा शिम्पि in जनातलं, मनातलं
25 Aug 2016 - 8:17 am

सध्या मी पुन्हा एकदा अमेरिकेत आलो असुन,माझे वाचन काय सुरु आहे अशी विचारणा,भारतातील सूनबाईने (सौ सुजाता ने)केली आहे,त्याचे हे उत्तर.
सर्वात प्रथम आत्ता दोन पुस्तकांचे वाचन सुरु आहे,१) A-G Man's Life.....by मार्क फेल्ट व २) Inside the White House( The hidden lives of the modern Presidents and the secrets of the World's most powerful institution. by Ronald Kessler.( पत्रकार )
येथील (माहवाह) लायब्ररीचे एक बरे आहे कि पुस्तक देतांनाच,परतीची तारीख लांबची देतात.पुस्तके आणली १८/८ ला, आणि परत करायची आहेत ७/९ला. फोनवर सुद्धा दोन वेळा मुदत वाढविता येते. आता हीच पुस्तके कां निवडली?त्याची पार्श्वभूमी आहे.
२०१३ मध्ये येथे आलो होतो त्यावेळी ' All the President's men'...by Bob Woodward and Carl Bernstein हे पुस्तक वाचून काढले होते. काय होते बरं त्या पुस्तकात? वाचा

अमेरिकेत दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत . डेमोक्रेटिक व रिपब्लिकन . १९६८ साली रिपब्लिकन पक्षाचे रिचर्ड निक्सन प्रेसिडेंट म्हणून निवडून आले होते. १९७२ मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले होते. ज्या ठिकाणी,अमेरिकन खासदार पार्लमेंटच्या कामासाठी बसतात, ते ठिकाण म्हणजे Capitol House. जेथे प्रेसिडेंट निवास करतात ते White House. त्याच्या जवळच Water Gate नावाची एक इमारत होती,जेथे डेमोक्रेटिक पक्षाचे कार्यालय होते. शनिवार १७ जून १९७२ रोजी,पहाटे पाच अज्ञात इसमांना,त्या इमारतीत काहीतरी कारभार करतांना पोलिसांनी पकडले.त्या पाचांपैकी,एकजण पूर्वी CIA या अमेरिकन गुप्तचर संस्थेमध्ये,काम करीत होता.पहाटे अडीच वाजता, त्या इमारतीच्या सुरक्षा अधिकाऱ्याने पाहिले कि एका दरवाज्याला,' प्रवेश प्रतिबंध 'अशी टेप लावली होती.त्याने ती टेप काढून टाकली.चाळीस मिनिटानंतर,पुन्हा कुणीतरी तशीच टेप लावलेली त्याला दिसली.त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला.त्या पाचही जणांनी अशी बतावणी केली कि ते प्लंबर आहेत आणि लिकेज थांबविण्यासाठी काम करीत आहेत.पाच वाजेपर्यंत, पोलिसांनी व FBI(Federal Borough of Investigation--अमेरिकन पोलीस यंत्रणा)च्या अधिकाऱ्यांनी पाहिले कि अनेक ठिकाणी त्यांनी,गुप्त संदेश टिपणारी यंत्रे, मायक्रोफोन,ट्रान्समीटर,छुपे केंमेरे, गुप्त जागी बसविले होते. त्या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. ही बातमी बाहेर पसरण्यास वेळ लागला नाही.शत्रूपक्षाच्या कार्यालयातील,बित्तमबातम्या,ऐकण्यासाठी,ही उपकरणे तेथे बसविण्यात आली होती हे जगजाहीर तर झाले,पण ह्याच्या मागे कोणाचा हात आहे,हे शोधणे महत्वाचे होते.White House मधील रिचर्ड निक्सन सह सर्वच सरकारी अधिकाऱ्यांनी,कानावर हात ठेवले. अगदी " मी नाही त्यातली अन कडी लावा आतली " असा प्रकार सुरु होता.अमेरिकेत " वाशिंगटन पोस्ट " नावाचे एक चांगल्या खपाचे वर्तमान पत्र आहे.त्याचे वरील दोघे,Bob Woodward and Carl Bernstein,तरुण पत्रकार होते. त्या दोघांनी,ह्या घटनेच्या मुळापाशी जाण्याचे ठरविले. वरवर पहाता हे काम सोपे नव्हते. FBI च्या प्रमुख पदावर म्हणजे संचालक म्हणून J.Edger Hoover हे होते.१ जानेवारी १८९५ साली जन्मलेले हे गृहस्थ,१९२४ पासून संचालक,पोलीस गुप्तहेर खाते,म्हणून नेमले गेले.त्याच खात्याचे १९३५ मध्ये FBI या नावाने रुपांतर करण्यात आले होते.त्यांनी FBI चा इतका दरारा निर्माण केला होता कि प्रेसिडेंट हेंरी ट्रुमन काय नि रिचर्ड निक्सन काय, त्यांना त्यांच्या पदावरून हटविण्यास घाबरत होते. कारण लोकमानसातील क्षोभ त्यांना असे करू देऊ शकत नव्हता. १९२४ पासून १९७२ पर्यंत प्रदीर्घ कालावधी साठी हूवर संचालक म्हणूनच राहिले. २ मे १९७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.आणि १७ जून १९७२ ला ही भानगड उपस्थित झाली.त्यांच्या हाताखाली उप संचालक म्हणून मार्क फेल्ट हे काम करीत होते व शिवाय त्यांच्या कामावर हूवर खुश होते.मार्क फेल्ट यांना अपेक्षा होती कि हूवर नंतर त्यांनाच संचालक पदावर बढती मिळेल,पण प्रत्यक्षात तसे न होता,दुसऱ्याच व्यक्तीला संचालक म्हणून नेमण्यात आले. तपास करण्याचे काम मार्क फेल्ट यांचे कडेच आले.
ह्या पाच जणांना जी अटक करण्यात आलेली होती,त्याचे खुलासे वर्तमान पेपरात येण्यास सुरवात झाली होती.प्रेसिडेंट निक्सन व त्यांच्या हाताखालील अधिकार्यांनी बातमी कुठून लिक होते व ते थांबविण्यात FBI ला अपयश येते आहे म्हणून दबाव आणण्याचा खूप प्रयत्न केला." Washington Post " च्या संपादकांना धमक्या मिळत गेल्या,पण पत्रकारांच्या जोडगोळीने हार मानली नाही. पाच जणांना अटक झाली तेंव्हा त्यांचेकडे २४०० डॉलर्स रोख मिळाले.ही रक्कम कोठून आली ? काम करीत असताना ह्या रकमेची गरज काय?असा प्रश्नांचा भडीमार सुरु झाला.बॉब वूडवर्ड त्यांच्या पुस्तकात म्हणतात कि आम्हाला White House मधूनच काही विश्वसनीय सूत्रांकडून ह्या कटकारस्थानाचे धागे मिळत होते.त्यासाठी त्याने एक टोपण नाव जाहीर केले,ते म्हणजे " Deep Throat ".ह्या डीप थ्रोट कडून जी गुपिते मिळत गेली,त्याच्या अनुरोधाने आम्ही तपास करीत गेलो आणि कटाचे कारस्थान कुठून कसे सुरु झाले,हे दररोज Washington Post मध्ये छापून येवू लागले.रिचर्ड निक्सन आणि चौकडीचे धाबे दणाणले.निक्सन खोटे बोलतच राहिले.कोणतीही गुप्त बातमी,मोठ्याने बोलून दाखवायची नसते,तर हळू हळू,कुजबुजत,आवाजात सांगायची असते. ते कुजबुजणे म्हणजेच घशातल्या घशात बोलणे, म्हणून Deep throat हे टोपण नाव ! ! ' All the president's men " ह्या पुस्तकात Bob Wood Word लिहितात कि हा जो कुणी सूत्रधार,आम्हाला महत्वाची माहिती देत होता,तो एका ठरलेल्या, गेरेजच्या आतमध्ये बसून,रात्रीच्या वेळी,देत होता. त्यांनी ठरविले होते कि डीप थ्रोट चे नाव शेवटपर्यंत जाहीर करावयाचे नाही. ते वचन त्याने शेवटपर्यंत पाळले सुद्धा ! ! आता,FBI च्या नव्या संचालकाचा सुद्धा संशय,मार्क फेल्ट,यांचेवरच होता.पण त्याने कधी तसे जाहीरपणे बोलून दाखविले नव्हते.
पेपरमध्ये ह्या घटनेचा इतका गाजावाजा झाला कि सारे प्रकरण,कोर्टाकडे गेले आणि ह्या कटाचा सूत्रधार म्हणून प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांचेच नाव पुढे आले.कारण White House मधील निक्सन यांनी जे जे फोनवर बोलणे केले होते व आपल्या लोकांसह स्वतःला वाचविण्याचा जो प्रयत्न केला,तोही कोर्टापुढे आला.निक्सन ह्यांचे हे टेप वरील संभाषण प्रसिद्ध झाले आहे .(नेट वर शोधले तर सापडेल)कोर्टाने त्यांचेपुढे दोनच पर्याय ठेवले,एक म्हणजे खटल्याला सामोरे जाणे (त्यालाच Impeachment असे म्हटले जाते,मराठीत 'महाअभियोग')किंवा राजीनामा देणे.निक्सन यांनी राजीनामा देणे पसंत केले .
त्या नंतर श्री मार्क फेल्ट यांचेवर,कामात कसूर केल्याबद्दल,वेगळ्या कारणासाठी,खटला भरला गेला होता त्यातून ते सहीसलामत सुटले.
महत्वाचे:- Deep Throat कोण होता हे गुपित दिवस काय,महिने काय,पण किती वर्षे राहावे?तब्बल २००५ साल उगवेपर्यंत ! ! गुपित टिकविले ते ३३ वर्षापर्यंत ! ! मार्क फेल्टच्या नातीने आग्रह केला,म्हणून २००५ मध्ये मार्क फेल्ट, ह्यांनी,वयाच्या ९२ व्या वर्षी,आपणच डीप throat ची भूमिका बजावली होती हे जाहीर केले.त्यालाही बॉब वूडवर्ड चा नकारच होता,कारण त्याचे स्वतःचे पुस्तक,गूढतेमुळे जास्त खपत होते म्हणून! ! १७ ऑगस्ट १९१३ मध्ये जन्मलेले,मार्क फेल्ट, १८ डिसेंबर २००८ साली वारले.
त्यांनी २००६ साली वर उल्लेख केलेले पुस्तक प्रकाशित केले.Water Gate हे प्रकरण फारच गाजले होते.त्या पुस्तकात ह्या प्रकरणाशिवाय आणखी सुद्धा त्यांच्या कामगिरीचा उल्लेख आहे,म्हणून हे पुस्तक वाचण्यासाठी मी निवडले आहे.जगभरात कोठेही भ्रष्टाचारचे प्रकार बाहेर आले कि पत्रकार त्याचा गेट लावून उल्लेख करीत असतात. उदाहरणार्थ भारतात कोळशाच्या खाणींचे वाटप गैरमार्गाने केले,त्याचा उल्लेख Coal Get म्हणून केला गेला.
पुढे बॉब वूडवर्ड त्याच' Washington Post 'वृत्तपत्राचे संपादक म्हणून ३३ वर्षे काम करीत होते. ह्या जोडगोळीचा , अलीकडचा फोटो,पेपरात छापून आलेला मी पाहिला आहे.
दुसरे पुस्तक : -- अमेरिकेच्या पहिल्या वारीत White House,आम्ही फक्त बाहेरून पाहिले होते,( बराक ओबामा लांबून दिसले होते, मी त्यांना हात ही दाखविला होता , पण त्यांनी आम्हाला आतमध्ये काही बोलाविले नव्हते, ह घ्या)त्यामुळे अठरा एकरात पसरलेल्या ह्या इमारतीमध्ये आत काय काय असू शकेल हे जाणून घेण्यासाठी, हे पुस्तक मी निवडले आहे.यात अनेक प्रेसिडेंट राहून चुकले,त्यांच्या बाबतीत मागेच २०१३ मध्ये मी,अमेरिकेत असतांना,अनेक लेख लिहून पाठविले होते.त्या साठी येथील वाचनालयात मला " Our Presidents " नावाचे पुस्तक मिळाले होते.बराक ओबामा हे ४४ वे प्रेसिडेंट आहेत.ह्याच White House मध्ये हे प्रेसिडेंटस,त्यांच्या बायका मुलांसह,कसे रहात होते,त्यांच्या काय काय भानगडी सुरु असायच्या,कोणी कोणी कसा आणि कुठल्या थरापर्यंत,याचा फायदा घेतला,त्याचा खर्च कसा आणि कोण भागवितो,केम्प डेविड ही प्रेसिडेंट यांच्या विश्रांतीची जागा कोठे आहे,याचे अगदी सविस्तर व रसभरीत वर्णन,पत्रकार श्री. रोनाल्ड केस्स्लर,यांनी केले आहे.ते वाचणार आहे,टिपणे काढणार आहे,आणि ज्यांनी मागितली,त्यांना कळविणार आहे.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

25 Aug 2016 - 8:55 am | नेत्रेश

> ज्यांनी मागितली,त्यांना कळविणार आहे

ईथेही लिहा.

मस्त शैली, बाकी ते 'अनेक प्रेसिडेंट राहून चुकले' जरासे खटकले

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 9:13 am | संदीप डांगे

मस्त शैली, बाकी ते 'अनेक प्रेसिडेंट राहून चुकले' जरासे खटकले
+१

जयन्त बा शिम्पि's picture

25 Aug 2016 - 5:14 pm | जयन्त बा शिम्पि

एका द्रुष्टीने ते खटकणार सुद्धा नाही, जर चुकले शब्दाला अवतरण चिन्ह दिले तर, कारण त्यांनी खरोखर ' चुका ' च केल्या आहेत, म्हणुनच तर ते पुस्तक रंजक बनले आहे ! ! ' चुका ' या अर्थाने की , प्रेसिडेंट या पदाची शान त्यांनी घालवली आहे.उदाहरणार्थ प्रेसिडेंट बिल क्लिंटन व त्यांची सेक्रेटरी मोनिका हे प्रकरण ( जग जाहीर आहे ).
पुढील लेख ' मिपावर ' पण टाकीन.

शलभ's picture

25 Aug 2016 - 5:52 pm | शलभ

मस्त लेख.

बोका-ए-आझम's picture

25 Aug 2016 - 6:51 pm | बोका-ए-आझम

पुस्तक आणि चित्रपट हे दोन्हीही छान आहेत. एक शंका - hard copy घेऊन वाचता की किंडल सारख्या उपकरणावर?

जयन्त बा शिम्पि's picture

25 Aug 2016 - 6:55 pm | जयन्त बा शिम्पि

नाही, वाचनालयातुन पुस्तक आणुन वाचतो व त्यावर लिहितो.त्याचा खुलासा तिसर्‍या परिच्छेदात केला आहे.

निशदे's picture

25 Aug 2016 - 9:32 pm | निशदे

अजून काही सुचवतो.
Roosevelt and Stalin: Portrait of a Partnership by Susan Butler
दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी रूझवेल्ट व स्टालिनमध्ये झालेला पत्रव्यवहार व इतर डिप्लोमॅटिक संबंध या पुस्तकात समोर ठेवलेला आहे. तीन महासतयांंमधील(अमेरिका, सोविएट युनियन व ब्रिटन) मैत्री व प्रसंगी संघर्षही या चर्चांमधून समोर येतो. पण त्याहूनही मला आवडलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अटलांटिक चार्टर व त्याच्या अंमलबजावणीसाठी रूझवेल्ट्चे प्रत्यक्ष व स्टालिनचे अप्रत्यक्ष प्रयत्न व त्याचे तत्कालिन भारतावरील परिणाम.

Tinderbox by M.J. Akbar
आधुनिक पाकिस्तानच्या इतिहासाचा व पाकिस्तान इस्लामिक राज्य होण्याच उत्कृष्ट आढावा घेणारे पुस्तक. ऐतिहासिक, ब्रिटिश स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर अशा तीन काळात विभागून दुसर्‍या काळाला जास्त प्रकाशझोतात ठेवून हे पुस्तक लिहिले आहे. जरूर वाचा.

The Blood Telegram by Gary J. Bass
बांग्लादेश निर्मिती व त्यातील अमेरिकेचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग याच्यावरील हे पुस्तक. मात्र पुस्तकाचा रोख भारत-पाकिस्तान संबंध नसून प्रेसिडेंट निक्सन-सेक्रेटरी ऑफ स्टेट हेन्री किसिंजर-अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट या त्रिकोणाचे परस्परसंबंध याकडे आहे. डिप्लोमॅट स्तरावरील हालचाल दाखवणारे उत्कृष्ट पुस्तक.

The Most Dangerous Place by Imtiaz Gul
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील Federally Administered Tribal Areas (FATA) भागाचा व इस्लामिक दहशतवादाचा वेध घेणारे उत्कृष्ट पुस्तक. सध्या सुरू असलेल्या बलोचिस्तान वादामध्ये हिरीरीने उड्या मारणार्‍या अनेक TV पंडितांसाठी हे पुस्तक compulsory reading म्हणून ठेवले पाहिजे.