" गुरु "

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
19 Aug 2016 - 4:44 pm

समोर उभा असलेला बाप त्याची सगळी करणी आज उधळून लावत होता , आत्ता मात्र महाडिक पण त्या दुसऱ्या मांत्रिकाकडे पोहोचला , झाली हकीकत सांगितली होम पेटवला गेला आणि आत्ता दोघे मिळून जनार्दन चा बळी घ्याला जोर लावत होते......
" गुरु सठ गुरु हठ गुरु हैं वीर, गुरु साहब सुमिरों बड़ी भांत सिंगी ढोरों बन कहो, मन नाउं करतार। सकल गुरु की हर भजे, छटटा पकर उठ जाग चैत संभार श्री परमहंस। "
तिकडे जनार्दन च्या सर्वांगाला टाचण्या टोचल्या जात होत्या श्वास कोंडला जात होता. काही झालं तरी आपण हे होऊ देणार नाही.......बापाचा आत्मा समोर उभा ठाकला होता त्याची काळी करणी उधळून लावायला.
१९६० -७५ चा काळ , वसिष्ठी नदीच्या तीरावर वसलेलं खानोळी गाव. गणपत गोविले नावाचा एक मांत्रिक ह्या गावात रहात होता. उपजीविकेसाठी शेती करायचा अथवा कोणाकडे गवंडी काम किंवा कोणाच्या घराला कुंपण घालायची असल्यास तो ते करून द्यायचा. पण ह्याच बरोबर गणपत हा आजूबाजूच्या गावात त्याच्याकडे असणाऱ्या मांत्रिकी विद्येसाठी प्रसिद्ध होता. कोणावर कोणी करणी केली,कोणाला भूतबाधा झाली, किंवा एखाद्याला सर्प चावला कि लोकं गणपत कडे धाव घ्यायचे.त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला त्याच्या त्रासातून मुक्त करणं ह्याला तो आपली जबाबदारी मानायचा. आजपर्यंत त्याने आपल्या विद्येचा वापर कोणाचं वाईट करण्यासाठी कधीच केला न्हवता. त्याला एक मुलगा , संजय . लहानपणापासून शाळा शिकता शिकता हळू हळू तो हि आपल्या बापाच्या विद्या शिकू लागला. संजय आत्ता मोठा झाला होता, आपल्या बापासोबत तो हि ह्या कडक साधना करायला लागला..अमावस्या पौर्णिमेला गणपत आणि संजय दोघेही वसिष्ठी नदीत पाण्यात रात्रभर साधनेला बसायचे. गावच्या कुलदेवी ला प्रसन्न करून नंतरच पुढे त्यांच्या ह्या साधना चालू व्हायच्या.
असं करता करता , संजयची भेट बाजूच्या गावात असलेल्या एका मांत्रिका सोबत झाली. पण हा मांत्रिक आपल्या विद्येचा वापर वाईट कामांसाठी करायचा, कोणावर करणी करणं ,कोणाची गुरं ढोरं मारणं ..कोणाला वशीकरण करणं, भानामती करून लुबाडणे , म्हणजे पैसे कमवण्यासाठी कोणी काही सांगेल ते तो करायचा. त्याचाकडे एखादा माणूस गेला म्हणजे नक्कीच कोणाचं तरी वाईट घडणार. अनेक लोकांचे बळी पण घेतले होते. त्या मांत्रिकाची साधना हि असुरी होती. गणपत त्या मांत्रिकाला चांगला ओळखून होता . अनेकवेळा दोघांमध्ये सूक्ष्म युद्ध चालायचे , त्याने करणी केली कि गणपत ती उधळून लावायचा ...कधी कधी तर उलटी पण फिरवायचा पण हा मांत्रिक काय चीज आहे हे संजय ला माहिती न्हवतं. एकदा शेतावर बैल चरायला गेला असता त्याची भेट ह्या मांत्रिका सोबत झाली. बोलता बोलता त्याने संजय ला आपल्याकडे आकर्षित केलं. त्याने संजय ला समजावलं "तू तुया विद्येचा वापर करून बक्कल पैसा कमवू शगतस, मी बघ २ वर्षात घराला लाद्या मारल्या, नवीन बैलजोडी घेतली , हे सगलं तू पन कमवू शगतस "
कसं ?
असे खूप लोकं आहेत ज्यांचं कोणा न कोणाशी वैर आहे, ते सांगतील तसं करायचं आपल्याला काय पैसा हवा. " हो पण माझा बाप तसं काही करत नाही , मला पण करून देणार नाय "
तो बोलला ठीक आहे बाप जित्ता हाय तोवर काय करू नग , मी सांगतो तसं कर .." तुया बापानं कोणावर झालेली करणी मोडायला काढली कि तू मंत्र चुकीचे मारत जा ....बास एवढा कर , मी तुया पैशाचा वाटा तुला देन "
आणि संजय पैशांचा आमिषाला भुलला, बाप घरात नसताना कोणी करणी मोडायला आलाच तर संजय चुकीचे मंत्र मारून फक्त नाटक करायचा. असं करता करता लोकं बोलायला लागले ...."गणपत तुझ्या पोराच्या हाताला गुण नाय , काय उपयोग होत नाय बघ " गणपत च्या लक्षात येऊ लागलं, नक्की काहीतरी गडबड आहे.
नेहमीप्रमाणे अमावस्या आली , आज गणपत संजय ला घेऊन नदीवर निघाला. पण त्यादिवशी संजय ने नदीवर जाण्यास नकार दिला, त्याने स्मशानाकडे जाण्याचा रस्ता पकडला. गणपत ओरडला" आरं पोरा तिकडं काय सैतानाची साधना करायला चाललास काय रं "
संजय बोलला हो " तू काय मिलवलास एवढ्या वर्षात लोकांची सेवा करून " हे ऐकून गणपत मनातून पार खचला, तो समजून गेला पोरगा आपलं ऐकत नाय, पोरगा असुरी विद्येकडे वळला. बाजूच्या गावातल्या मांत्रिकाने गणपत च्या पोराला बरोबर फितवला.
पण गणपत ने आपला मर्ग सोडला नाही, आत्ता तो अजून कडक साधना करायला लागला, कारण आत्ता त्याला गावातल्या लोकांचं रक्षण एक नाही दोघांकडून करायचं होतं.
ह्या तिघांमध्ये खूप महिने सूक्ष्मातून मांत्रिकी युद्ध झालं. वर्ष उलटून गेली, गणपत ने जमेल तेवढं त्यांना रोखता येईल तेवढं रोखलं आणि लोकांचं रक्षण केलं. वर्ष उलटून गेली, गणपत ने आत्ता ७० री ओलांडली, म्हातारा गणपत आत्ता पार थकला होता, पोराचे वाईट धंदे बघून दररोज मनातून कुडत बसायचा, " कुठं फेडशील रं हि पापं पोरा ". आणि एकदिवस झोपेतच गणपत मेला.
रितीरिवाजाप्रमाणे गावातल्या लोकांनी गणपतचे अंत्यसंस्कार केले. आत्ता मात्र संजयला रान मोकळं झालं. गणपत मारून जेमतेम १५ दिवस झाले , एक दिवस संजय कडे बाजूच्या गावातून महाडिक नावाचा एक इसम आला, जनार्दन सावंत ने आपला वाडा मोडला , त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. संजय म्हणाला ५००० होतील आणि सामान लागेल त्याचे पैसे वेगळे. तो महाडिक इसम तयार झाला.
संजय ने त्याला सामानाची यादी दिली, ११ नासके नारळ, हळद पिंजर माचीस २१ लिंबू काळी बाहुली आणि १ टाचणीचं पाकीट.
महाडिक ला अमावस्येच्या दिस्व्ही बोलावलं, तो आला,संजय ने सामान लावायला घेतलं, उत्तर दिशेला नारळाच्या शेंड्या फिरवल्या, लिंबू अर्धे कापले आणि तांब्यात पाणी आणायला तो उठून आत घरात गेला, महाडिक पण उठून लघवीला बाहेर गेला .संजय आल्यावर बघतो तर नारळाच्या शेंड्या दक्षिणेला झाल्या होत्या आणि लिंबू सगळ्या घरभर झाले होते.त्याने महाडिक ला विचारलं " हे काय केलत महाडिक " महाडिक बोलला
"मला माहिती नाही, मी बाहेर लघवीला गेलो होतो. हा पण परत येताना बघितलं मी तुमच्या घरात कोणीतरी शिरलं "
" कोण शिरलं इथं आपण दोघेच आहोत " जाऊ दे मांजर आलं असल आणि संजय ने पुन्हा मांडणी केली.
संजय ध्यान लावून बसला, महाडिक त्याच्या समोर बसला. संजय ने डोळे मिटले महाडिक त्याच्याकडे बघत होता. अचानक महाडिक च्या पाठीत कोणीतरी जोरात लाथ घातली. महाडिक जोराने ओरडला ..." आई आई गो मेलो मेलो " संजय चं ध्यान मोडलं , "काय झालं महाडिक " ....
माझ्या पाठीत लाथ घातली कोणीतरी ......"लाथ कोण घालेल दरवाजा बंद आहे महाडिक "
खरं सांगतोय मी .... संजय उठला त्याने उंबरठ्यावर हळद पिंजर टाकून मंत्र मारले आणि दरवाजा पुन्हा बंद केला. तो पुन्हा ध्यान लावून बसला , तोंडातल्या तोंडात मंत्र बोलायला लागला ....... आणि तिकडे जनार्दन सावंत ला त्रास व्हायला लागला, जनार्दन गडाबडा जमिनीवर लोळायला लागला, त्याच्या घरातले घाबरले. काय होतंय कोणालाच समजेना. आजूबाजूची लोकं जमली जनार्दन डोळे फिरवायला लागला.......इथे संजय मंत्रावर मंत्र मारायला लागला ....
" मोहिनी बन सर्पबिशंसख बातीश तेकेली बान बाघ बोंधा बिख बान झोर बान जुई निबरानी पाश आणि काम बान , र र र र र र र भूम फट "
आणि बघता बघता जनार्दन अर्धमेला होत चालला होता, त्याच्या संपूर्ण शरीराला टाचण्या टोचल्या जात होत्या तो वेदनांनी किंचाळत होता, अचानक गावातल्या कुठल्यातरी बाईने गणपत चं नाव घेतलं, ती जोराने ओरडली
" गणपता ये रं बाबा मांझ्या पोराला वाचव रं बाबा ये, रांडच्यांनी करणी केली र पोरावर वाचव र बाबा मांझे पोराला" आणि म्हातारीने गावदेवीकडे धाव घेतली देवळात म्हातारी जीवाच्या आकांताने गणपत ला हाका मारू लागली, आणि तिकडे एक एक करून संजय च्या फुड्यात ठेवलेले नासके नारळ आपोआप फुटायला लागले, संजय उठला, कोणीतरी आपल्या शक्तीला निष्फळ करतोय.
दरवाजावर कोणीतरी लाथ मारली आणि घरात वारा शिरला , हळद पिंजर हवेत उडाली. आणि त्याचा समोर त्याचा बाप उभा राहिला......गणपत गोविले.
गणपत ला समोर बघून महाडिक घाबरला ...आणि तो भूत भूत करत त्या घरातून बाहेर पळून गेला . आपण इथे करणी करायला आलो होतो हे कोणाला समजू नये म्हणून महाडिक गावाच्या मागच्या रस्त्याने पळून गेला.
संजय समोर उभा असलेला गणपत बोलायला लागला " पोरा बाप हाय म्या तुझा, कर करणी ..लाव जोर तुझ्या असुरी विद्येचा , आज तू जिंकशील नायतर म्या जिंकन" संजय समजून चुकला होता, मेलेला आपला बाप आत्ता अधिकच बळकट झाला आहे. ह्याला हरवनं आपलं काम नाय. पळून गेलेला महाडिक बाजूच्या गावातल्या मांत्रिकाकडे गेला , बुवा वाचवा मला ...आणि त्याने झाला प्रकार त्याला सांगितला. गणपत चा बंदोबस्त करायला मांत्रिकाने ताबडतोब होम पेटवला. इकडे संजय ने पुन्हा जनार्दन वर करणी करायला सुरवात केली ..
आणि जनार्दन च्या घराच्या बाजूला असलेलं जांभळी चं झाड हलायला लागलं.जनार्दन पुन्हा जमिनीवर लोळायला लागला, पोट पकडून रडायला लागला , तोंडाला फेस आला, शरीर काळ पडायला लागलं.
आत्ता मात्र ते गणपत चं भूतं भडकलं त्याने संजय चं सगळं सामान उडवून लावायला सुरवात केली. भुताने आपला आवेश बदलला .....पोराला २-४ वेळा उचलून जमिनीवर आपटला. बाजूच्या गावात होम करायला बसलेला मांत्रिक आत्ता असह्य्य झाला होता, त्याचं काहीच चालेना. भुताच्या हल्ल्यात संजय बेशुद्ध पडला आणि तिकडे मांत्रिकाच्या घरावर असलेला पेंडा पेटला. अंगणातला मांडव पेटला , घराचं छप्पर पेटलय बघताच तो हि आपल्या घरातून बाहेर पळाला .........
इकडे जनार्दन जमिनीवर कोसळला, थोड्यावेळाने शुद्धीवर आला ,जांभळीचं झाड स्थिर झालं सगळं काही शांत झालं. आणि लोकांनी जनार्दनला पाणी पाजलं.
जनार्दन व्यवस्थित झाला , बाजूच्या गावातला मांत्रिक गाव सोडून पळून गेला.
संजय आत्ता जवळच्या प्राथमिक शाळेवर शिपाई आहे ,त्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे तो पार घाबरूनच गेला होता.काळ्या जादूच्या विरोधात सरकार ने पण कायदे कडक केले. आपण करत असलेला धंदा आत्ता सोप्पा राहिला नाही हे त्याला कळलं .
अनेक वर्ष निघून गेली , तंटामुक्ती चं धोरण अवलंबलं गेलं ,गावात लोकं सुखाने राहतात, लोकं सुशिक्षित झाले , काळाप्रमाणे ते हि बदलले . आज खानोळ गावाला "आदर्श गाव" म्हणून घोषित केलं गेलं आहे. आत्ता करणी ,काळी जादू हे शब्द फक्त विनोद म्हणून वापरले जातात कोणाचा जीव घेण्यासाठी नाही.

*( "भुताटकी" या फेसबुक पेजवर पूर्वप्रकाशित )

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

19 Aug 2016 - 6:57 pm | राजाभाउ

ते मंत्र कुठुन आणलेत ? खरे आहेत कि काय ?

gogglya's picture

19 Aug 2016 - 7:00 pm | gogglya

छान आहे कथा...

टवाळ कार्टा's picture

19 Aug 2016 - 7:08 pm | टवाळ कार्टा

चायला इतकीच जर काळी जादू कोणाला येत असेल तर करा की अतिरेक्यांच्या विरोधात वापर...सरकारच सत्कार करेल दरवर्षीचा संरक्षणाचा खर्च वाचवल्याबद्दल...लोक पण यडच्याप अस्तात आणि भगत/मांत्रिकांच्या नादाला लागतात

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Aug 2016 - 7:16 pm | माम्लेदारचा पन्खा

अणुबाँब बनवण्यापेक्षा "पंतप्रधान कार्यालय येथे सूक्ष्म मांत्रिकी योध्दे नेमणे आहे" अशा नोकरीच्या जाहिराती का देत नाहीत ?

क्षमस्व's picture

19 Aug 2016 - 9:23 pm | क्षमस्व

छान कथा।।।
आणि हो जो वेग कथेत पकडला गेला तो तर खूपच भारी।।।
पु ले शु

क्षमस्व's picture

19 Aug 2016 - 9:23 pm | क्षमस्व

छान कथा।।।
आणि हो जो वेग कथेत पकडला गेला तो तर खूपच भारी।।।
पु ले शु

ज्योति अळवणी's picture

19 Aug 2016 - 11:58 pm | ज्योति अळवणी

छानच .... आवडली कथा