आमची बोळाची ( काळोखी ) खोली

मनीमोहोर's picture
मनीमोहोर in जनातलं, मनातलं
15 Aug 2016 - 11:05 am

आमचं कोकणातल घर आहे जुन्या पदध्तीचं..... कौलारु.... ओटी, माजघर, देवघर, सैपाकघर आणि परसदार अशी रचना असलेलं. घर खूप मोठ असलं तरी त्या वेळच्या पद्धती प्रमाणे या घराला खोल्या तशा जास्त नाहीत. मुख्य घराच्या लेवलला एकच आहे खोली. तीच ही बोळाची खोली. बाकीच्या सगळ्या खोल्या चार पाच पायर्‍या खालच्या लेवलला आहेत.

या खोलीला माजघरातुन आत जायला दार आहे. एका बाजुला ओटीची भिंत आणि एका बाजुला माजघराची भित असल्याने हिला फक्त एकाच बाजूने दोन छोट्या छोट्या खिडक्या आहेत, ज्या उघडल्या तरी खोलीत फारसा प्रकाश येत नाही.माजघराच्या दारातुन प्रकाशाचा काय कवडसा येइल तेवढाच प्रकाश. पूर्वीच्या काळी काही घरातुन बाळंतीणीची खोली अशी असे काळोखी. पण ही आमची खोली बाळंतीणीची नाहिये. बाळंतीणीची दुसरी स्वतंत्र खोली आहे. ही खोली फारशी मोठी ही नाहिये. असेल आठ नऊ फूट रूंद आणि दहा अकरा फूट लांब. अश्या लांबोडक्या, बोळासारख्या रचनेमुळेच हिला बोळाची खोली हे नाव पडले असेल. तशातच माजघरतुन माळ्यावर जाणार्‍या जिन्याने ही ह्या खोलीचा काही भाग व्यापला आहेच.

ह्या खोलीत आहे एक माचा, ज्यावर वर भरपूर गाद्या रचुन ठेवलेल्या असतात. त्यामुळे एक छोटीशी उडी मारल्या शिवाय ह्या माच्यावर बसता येत नाही ( स्मित ) . एका भितीच्य कडेला एक छोटसं कपाट आणि एक मोठसं फडताळ आहे . एका छोट्या लाकडी स्टुलावर एक भरपूर आवाज करणारा टेबल फॅन आहे. ह्या खोलीची जमीन आम्ही कित्येक वर्ष सारवणाचीच ठेवली होती आग्रहाने, पण अलीकडेच ह्या खोलीला ही फरशी बसवून घेतली आहे. आणि हो बाकी उजेडाच्या दृष्टीने उजेडच असल्याने उजेडा साठी एक पिवळ्या प्रकाशाचा बल्ब आहे . एकंदर खोलीच्या सजावटीला तो शोभुन दिसणाराच आहे.

ह्या खोलीच्या मध्यवर्ती स्थानामुळे माझे तिकडे रहाणारे सासरे दुपारी ह्याच खोलीत झोपत असत. त्यामुळे त्यांना सगळीकडे नजर ठेवणे सोपे जाई. पण आता ते गेल्या नंतर मात्र घरातल्या बायकांनी दुपारच्या विश्रांतीसाठी हिचा ताबा घेतला आहे. दुपारी जेवणं झाली की आम्ही सगळ्याजणी ह्याच खोलीत आडव्या होतो. एक दोघी जणी माच्यावर, दोघी़ जणी खाली चटईवर, एखादी त्यांच्या पायाशी ........ कधी कधी न झोपता हळू हळु आवाजात मस्त गपा ही रंगतात आमच्या. हं पण पुरेसा उजेड नसल्याने वाचत वाचत झोपण्याचे सुख मात्र इथे मिळत नाही. उन्हाळ्यात दुपारी लाईट गेले तर मात्र एरवी बाहेर आडव्या होणार्‍या ही ह्याच खोलीत झोपायला धडपडतात कारण उन्हाळ्यात गार आणि हिवाळ्यात उबदार असते ही खोली. तसेच पावसाळ्यात कोकणात कितीही काही ही केलं तरी माशांचा उपद्रव असतोच. आणि त्यात लाईट गेलेले असले तर पंखा ही नसल्यामुळे तर जास्तच त्रास देतात माशा. पण ही खोली मात्र याला अपवाद आहे कारण काळोखामुळे इथे माशा जराही नसतात.

एखाद लहान मुल खूप मस्ती करायच्या नादात सैराट झाल असेल आणि झोपायच नाव घेत नसेल तर ह्या खोलीत नेऊन झोपवल की हमखास झोपत ते खोलीत असलेल्या काळोखामुळे आणि गारव्यामुळे. आमच्याकडे अजूनही सुट्टीत दुपारी मुलं डबा ऐसपैस किंवा लपंडाव खेळतात. बोळाची खोली म्हणजे मुलांचा लपण्याचा हुकमाचा एक्काच. इथल्या फडताळातत ठेवलेल्या डब्यातले दाणे, गूळ वैगेरे मस्त पैकी चरत लपून बसलेली असतात मुलं ह्या खोलीत. आम्ही कोणी त्याच वेळी खोलीत गेलो आणि दिवा लावला तर मात्र त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी भिती आश्चर्य आणि " ही आत्ता का आलीय इथे " असे भाव उमटतात आणि आपसुकच तोंडावर बोट ठेउन "प्लिज, सांगु नकोस" अशी न बोलता विनंती वजा आज्ञा ही केली जाते. कोणी सर्दी तापाने वैगेरे आजारी असेल तर त्याचे ही अंथरुण ह्याच खोलीत पडते. मुख्य घराला जवळ असल्याने सतत लक्ष रहाते आणि आजार्‍याचं हवं नको पहाणं ही सुलभ होतं.

आमचं खूप मोठं कुटूंब आहे कोकणात. नेहमी माणसांची वर्दळ असते घरात. आणि आगरात गडी माणसं ही वावरत असतात सतत . एवढ्या माणसात नवीन लग्न झालेल्या आमच्या मुलांना शहरात मिळतो तसा मोकळेपणा नाही मिळत. पण इथे ही बोळाची खोली त्यांच्या मदतीला धावून येते . ( स्मित)

घरात काही मंगल कार्य असेल तेव्हा मात्र ह्या खोलीच रुपच बदलुन जात. खोली रंगीबेरंगी आणि एकदम कलर फुल दिसायला लागते. निरनिराळ्या प्रकारच्या रेंगीबेरंगी साड्या, दागिने प्रसाधनं , अत्तरं , फुलांचे गजरे, गप्पा, हास्याचे चित्कार यांनी खोली भरुन जाते. कारण अशा प्रसंगी बायकांची ड्रेसिंग रुम बनते ही खोली. त्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात सगळ्यांचा नट्टापट्टा चाललेला असतो. सगळा जामानिमा झाला की हल्ली एखादा सेल्फी ही काढला जातो खोलीतुन बाहेर पडायच्या आधी. शंभरहुन अधिक वर्षापूर्वी हे घर जेव्हा बांधलं तेव्हा भविष्यात हे असं काही होईल अशी पुसटशी कल्पना तरी केली असेल का ह्या खोलीने?

एकदा एका मे महिन्यात आमच्या घरी खूप पाव्हणे मंडळी जमली होती.त्यात माझ्या एक नणंद बाई ही होत्या. दुपारच्या जेवणाची वेळ होती. आधी मुलांची पंगत मग पुरषांची आणि मग आम्ही बायका अशी पद्ध्त आहे आमच्याकडे . जेवायला वेळ होता म्हणून त्या बोळाच्या खोलीत आडव्या व्हायला गेल्या होत्या. बायकांच्या पंगतीसाठी ताटं घेताना अगदी आठ्वुन आठवून, मेळ घालत, कोण जेवलं कोण राहिलय अशी बोटं मोजुन ताटं मांडली . आम्ही जेवायला सुरवात केली . माझ्या एक सासुबाई आम्हाला अन्न गरम करुन द्यायला उभ्या होत्या गप्पा मारत मारत सावकाशपणे आमची जेवणं चालली होती. आणि अचानक ह्या माझ्या नणंद बाई येऊन उभ्या राहिल्या. आमचं तर बोलणच बंद झाल. " असे कसे ह्यांना विसरलो " ही अपराधी पणाची भावना प्रत्येकीच्या चेहर्‍यावर उमटली. पण त्यानीच सावरुन घेतल. ह्या गोष्टीचा अजिबात इश्यु केला नाही. माझ्या सासुबाईनी त्यांना पटकन ताट वाढुन दिल आणि त्यांनी ही काही झालचं नाहीये असं दाखवून हसत खेळत जेवायला सुरवात केली. पण तेव्हा पासुन जास्त पाव्हणे असले की शेवटच्या पंगतीच्या वेळेस बोळाच्या खोलीत कोणी नाहिये ना याची खातरजमा करुन घेण्याची सवय आमच्या अंगवळणी पडली आहे.

अशी ही आमची बोळाची खोली . माणसाच हृदय कसं त्याच्या शरीराच्या आकाराने मानाने लहानच असत तसच ही खोली ही एकंदर घराच्या आकराच्या मानाने लहान असली तरीही आमच्या घराच ह्रूदयच आहे जणु......

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

मनीमोहोर's picture

15 Aug 2016 - 11:11 am | मनीमोहोर

मिपाची मी जुनी वाचक आणि नवीन सभासद आहे
मिपा वरचा हा माझा पहिलाच लेख आहे बघा वाचुन आवडतोय का ते

रेवती's picture

15 Aug 2016 - 11:57 am | रेवती

लेखन आवडले.

काळुराम's picture

15 Aug 2016 - 2:18 pm | काळुराम

आवडली.. घराचे फोटो बघायला आवडेल ..

किसन शिंदे's picture

15 Aug 2016 - 2:22 pm | किसन शिंदे

लेखन आवडले. लिहित रहा

संजय पाटिल's picture

15 Aug 2016 - 2:23 pm | संजय पाटिल

लेखन आवडले

Nitin Palkar's picture

15 Aug 2016 - 2:36 pm | Nitin Palkar

छान जमलेय!

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2016 - 5:58 pm | ज्योति अळवणी

छान आहे... आवडले...

फोटो टाका की घराचे!

नूतन सावंत's picture

15 Aug 2016 - 6:23 pm | नूतन सावंत

मिसळपाववर स्वागत.लेखन आवडले.पुलेशु.

यशोधरा's picture

15 Aug 2016 - 6:55 pm | यशोधरा

छान लिहिलेय.

एस's picture

15 Aug 2016 - 6:59 pm | एस

छान आठवणी.

अजया's picture

15 Aug 2016 - 7:41 pm | अजया

छान लिहिलंय.पुलेशु

मनीमोहोर's picture

15 Aug 2016 - 10:43 pm | मनीमोहोर

धन्यवाद सर्वाना.

बहुगुणी's picture

15 Aug 2016 - 11:02 pm | बहुगुणी

शेवटही छान. फोटोही पहायला आवडले असते.

अरुण मनोहर's picture

16 Aug 2016 - 7:43 am | अरुण मनोहर

चित्रदर्शी वर्णन !
नाशीकला आजीच्या वाड्यात अशीच एक अंधारी खोली होती. त्याची आठवण झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही नागपूरहून आजीकडे जायचो. तेव्हा त्या थंडगार खोलीत दुपारभर आम्हा मुलांचा पत्त्यांचा अड्डा बसला असायचा.
आणखी लिहीत रहा! फोटो जरूर टाका!

नीलमोहर's picture

16 Aug 2016 - 12:18 pm | नीलमोहर

त्या खोलीचा फोटो खरंच पहायला आवडेल. आजोळी वाड्यात अशी एक खोली होती मात्र ती काळोखी वगैरे नव्हती.

जागु's picture

16 Aug 2016 - 12:52 pm | जागु

वा हेमाताई सुंदर लेख.

सौंदाळा's picture

16 Aug 2016 - 2:49 pm | सौंदाळा

मस्त..
सुंदर लिहिलय

तिमा's picture

16 Aug 2016 - 3:12 pm | तिमा

तुम्ही फारच छान लिहिलंय. पुष्कळ दिवसांत शुद्ध मराठीत लिहिलेलं वाचलं नव्हतं, म्हणून विशेष आनंद झाला.

उन्हाळ्यात दुपारी लाईट गेले तर
हे वाचून तर आपल्यासारखे बोलणारे कुणी आहेत, याचा आनंद झाला. नाहीतर, 'लाईट गेली तर' असलं मराठी ऐकलं की अंगावर पाल पडल्यासारखं वाटतं.

अरुण मनोहर's picture

16 Aug 2016 - 4:30 pm | अरुण मनोहर

उन्हाळ्यात दुपारी लाईट गेले तर
हे वाचून तर आपल्यासारखे बोलणारे कुणी आहेत, याचा आनंद झाला. नाहीतर, 'लाईट गेली तर' असलं मराठी ऐकलं की अंगावर पाल पडल्यासारखं वाटतं.

अंगावर पाल पडल्यामुळे नव्हे, मराठीवर इंग्रजी पडल्यामुळे असे होतेय.
'वीज गेली तर' म्हणून पहा, सगळे स्वच्छ दिसेल!

मुक्त विहारि's picture

16 Aug 2016 - 3:59 pm | मुक्त विहारि

आजोळच्या आठवणी जाग्या झाल्या.

अनुप ढेरे's picture

17 Aug 2016 - 8:31 pm | अनुप ढेरे

हेच बोल्तो.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2016 - 5:56 am | अत्रुप्त आत्मा

+१
बाकी.. लिहीते रहो... वाचते रहो!

पैसा's picture

16 Aug 2016 - 7:02 pm | पैसा

खूप आवडले.

पद्मावति's picture

16 Aug 2016 - 10:10 pm | पद्मावति

सुरेख लेख मनीमोहोर!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Aug 2016 - 2:06 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त लेख. चित्र उभे राहिले. फोटो बघायची उत्सुकता आहे.

पिशी अबोली's picture

17 Aug 2016 - 5:35 pm | पिशी अबोली

आवडला लेख.

सुंदर लिहीलंय, एखादा फोटो टाका की तुमच्या ह्या लाडक्या खोलीचा!!

अमोल विभुते's picture

17 Aug 2016 - 6:18 pm | अमोल विभुते

मस्त लेख. जिथे स्मित लिहलय तिथे खरच स्मित आल चेहर्यावर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2016 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मुक्तक !

मिपालेखकांत स्वागत !

जिन्गल बेल's picture

18 Aug 2016 - 2:53 pm | जिन्गल बेल

लिहीत राहा अश्याच!!

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2016 - 3:08 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर लेख. बाहेरील जगाचा संबंध सुटून, बोळाच्या खोलीचा सर्व पट डोळ्यांसमोर उलगडत गेला.

अंतरा आनंद's picture

18 Aug 2016 - 3:24 pm | अंतरा आनंद

मस्त. चित्र डोळ्यासमोर उलगडत जाणारं वर्णन. सुंदर लिहीलं आहे. लिहीत रहा.

स्वाती दिनेश's picture

18 Aug 2016 - 4:43 pm | स्वाती दिनेश

बोळाची खोली आवडली,
छान लिहिले आहे. लिहित रहा.
स्वाती

विचित्रा's picture

19 Aug 2016 - 3:35 pm | विचित्रा

सुंदर ललितलेख. मला माझ्या मामाच्या घरची अडगळीची खोली आठवली, याच सगळ्या गोष्टींसह. आता तिचं आधुनिक बेडरूममध्ये रुपांतर झालं असलं, तरी अजून वापर तसाच आहे. शिवाय या घरात एक माचा पण आहे, वर सात-आठ गाद्या टाकलेला. त्यामुळे deja vu अनुभव.
(रच्याकने विशिष्ट आकाराच्या लाकडी पलंगाना कोकणात माचा म्हणतात. हे काही वेळा सुंभाने विणलेले असतात. तर माचा हा शब्द प्रादेशिक आहे का?

अभिजीत अवलिया's picture

20 Aug 2016 - 3:31 am | अभिजीत अवलिया

खोलीचे काही फोटो टाकले असते तर लेखाला चार चांद लागले असते.

स्मिता.'s picture

20 Aug 2016 - 4:35 am | स्मिता.

खूप आवडला लेख, शाळेतल्या मराठीच्या पुस्तकात शोभेल असा! लिखाण आवडलं, लिहीत रहा :-)

खटपट्या's picture

20 Aug 2016 - 4:38 am | खटपट्या

आवडला लेख

एक एकटा एकटाच's picture

20 Aug 2016 - 6:55 am | एक एकटा एकटाच

चांगला आहे लेख

विवेकपटाईत's picture

20 Aug 2016 - 8:06 am | विवेकपटाईत

लेख आवडला. पूर्वी अश्याखोल्या प्रत्येक घरात राहायच्या.

मनीमोहोर's picture

25 Aug 2016 - 4:53 pm | मनीमोहोर

पहिलाच लेख मिपा कराना आवडल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.
फोटो पहायची उत्सुकता आहे पण माझ्याकडे फोटो नाहिये. आणि तस बघायला गेल तर आहे काय त्या खोलीत एक कॉट, एक फडताळ एक कपाट आणि खुप सारा काळोख ( स्मित) .

पद्मावति आणि जागुले तुम्हाला इथे बघुन जुनी मैत्रीण भेटल्याचा आनंद झाला.