सोबतीण (भाग ३)(शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
28 Jul 2016 - 4:40 pm

"पृथा तुला तर पार त्यातीथे कोकणात अनुभव आला. तोसुद्धा रात्रीच्या अंधारात काहीसा आवाज आणि एक धुसर आकृती... ज्याची तुला आत्ता विचारले तर खात्री देता येणार नाही. पण माझा अनुभव या इथे गजबजलेल्या मुंबईमधला आहे. तो अनुभवच इतका जिवंत आहे की त्यापुढे मरण सोपं  वाटेल," अपर्णा म्हणाली.

"ए अपर्णा उगाच नमनाला घडाभर तेल अस करू नकोस हा. काय घडल नक्की सांग बघू मला." पृथा हसत अपर्णाला म्हणाली.

"तेच सांगते आहे. पण मला मध्ये  मध्ये बोलून माझी लिंक नको ह तोडुस  पृथा." अपर्णाने तिला दम दिला. त्यावर हसत पृथा म्हणाली, "बर बाई. माझी हाताची घडी आणि तोंडावर बोट. एकदम गप्प बसते आता. तूच बोल... हम्. कर सुरवात."

"पृथा मी आत्ता गेले महिना दोन महिने या ऑफिस मध्ये जॉईन झाले आहे. पण  त्याच्या अगोदर एवढी ग्रजुएट होऊन देखील मला चांगली नोकरी मिळत नव्हती.  तुला मागे मी म्हणाले न; माझ्या बाबांचा एका अपघातात पाय गेला. गेली अनेक वर्ष ते ज्यांच्याकडे ड्रायवर म्हणून काम करत होते, ती माणस चांगली आहेत. त्यांनीच सगळ्या उपचारांचा खर्च केला. नंतर थोडी रक्कम देखील दिली. पण बाबा कायमचे घरी बसले. आता या वयाला दुसरं काय काम करू शकणार ते? आई २-३ स्वयंपाकाची काम करत होती. तिने ती कामं वाढवली. पण त्यातून कितीसे पैसे पुरणार. त्यात बाबांच्या औषध-पाण्याचा खर्च तर आहेच ना अजून. म्हणून मग मी येईल ती नोकरी स्वीकारायचे ठरवले.

आईच्या एका मैत्रिणीने एका नामांकित रेडीमेड कपड्यांच्या दुकानामध्ये सेल्स गर्ल म्हणून नोकरी आहे अस सांगितल. मला खरच कामाची खूप आवश्यकता होती, म्हणून मी ती नोकरी काहीही विचार न करता स्वीकारली. पण ते दुकान बांद्रयाला, पाली हिल जवळ होत. तुला तर माहीतच आहे की पाली हिल म्हणजे किती दूर आहे स्टेशन पासून. त्यामुळे रोज ट्रेनचा प्रवास आणि मग बसने त्या दुकानापर्यंत पोहोचायचं. माझी कामाची वेळ दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंतची होती. मुळात ते अस दूर एकाकी जागी असणार दुकान असल्याने कोणी मुली तिथे दुपारच्या शिफ्टला काम करायला तयार नव्हत्या, अस मला सांगितल गेल.

मी जॉईन झाले आणि तिसऱ्याच दिवशी मला खर कारण लक्षात आल. आमच्या दुकानाचा मॅनेजर एकदम लंपट माणूस होता. कारण नसताना तो सारख समोर बोलवायचा आणि काही ना काही निरर्थक काम सांगायचा. मला खूप राग यायचा त्याचा. पण मी काय करू शकणार होते. अश्या एका बाजूच्या ठिकाणची नोकरी मी माहित असूनही स्वीकारली आहे म्हणजे मी गरजू आहे एवढ समजण्याइतका तो हुशार होता. बर तो एरिया पण असा की रात्री ८ नंतरच तिकडच्या श्रीमंत बायका शॉपिंगसाठी यायच्या. भटकून झालं की घरी जाताना गाडी थांबवून शॉपिंग करायची आणि मग जायचं. त्याना काय? ना स्वयंपाक करायचा असतो; ना मुलांची काळजी असते.....

अपर्णाची सांगताना तंद्री लागली होती त्यामुळे ती बोलता बोलता थांबली. पण पृथाला रहावेना. तिने अपर्णाला टोकलच. "अपर्णा तू भुताच्या अनुभवाबद्दल सांगते आहेस न? की तुझी नोकरी आणि त्या एरियामधल्या बायकांच वर्णन करते आहेस?"

अपर्णा वैतागली. "पृथा चल आपण निघू." ती म्हणाली.

"अग काय झाल?" पृथाने विचारल.

"तू जर अस मला सारख मध्ये मध्ये बोलून अडवणार असशील तर मी तुला काही सांगणार नाही. मुळात मी तुला सांगावं की नाही याचा विचार करते आहे. खर सांगायचं तर पृथा तुला सांगण्यात रिस्क आहे ग.... मी तुला यात गुंतवत तर नाही न, असं वाटत आहे मला." परत अपर्णा सांगू की नाही अशा मनस्थितीत गेली.

पण आता पृथा एकायला तयार नव्हती. "तू सांग अपर्णा. मला काही होत नाही. मी तुला माझा अनुभव सांगितला तर लगेच तू त्यात अडकलीस का? काहीतरीच तुझं. आणि dont worry. मी तुला नाही अडवणार आता. तुझी तंद्री लागली होती न बोलताना, त्याची मजा वाटली म्हणून मी तुला डिस्टर्ब केल होत. बोल तू." ती महाली.

"बर! तू काही आता ऐकायची नाहीस." अस म्हणून अपर्णाने सांगायला सुरवात केली.

"तर....... या बायका ८ नंतर यायच्या आणि ९ वाजून गेले तरी निघायच्या नाहीत. माझी स्टेशनसाठी बस होती ९.२० ची. ती गेली की मग एकदम ९.४०/४५ ची पुढची बस होती. त्यामुळे उशीर व्हायला लागला की माझा जीव कासावीस व्ह्यायचा. तो मॅनेजर मात्र मुद्धाम त्या बायकांशी बोलत बसायचा. मला उशीर व्हावा म्हणून. म्हणजे मग त्याला मला विचारता येईल न की तुला स्टेशनला सोडू का. पण मी ८.४५ नंतर शोपिंगला येणाऱ्या बाईला हळूच कल्पना द्यायचे की ९ ला दुकान बंद होत आणि मी लांब रहाते. बायका पण समजून घ्यायच्या आणि ९ पर्यंत निघायच्या. त्यामुळे त्याला कितीही प्रयत्न केला तरी मला अडकवता येत नव्हत.

गेल्या सप्टेंबर महिन्यातली गोष्ट. सप्टेंबरमध्ये रिटर्न्स फाईल करायचे असतात न... तर त्या ऑडीटच काम सुरु होत. चार्टर्ड अकौंटटकडून दोन इंटरन्स येत होते. चांगले होते बिचारे. तेसुद्धा माझ्याबरोबर निघायचे. खरतर ते दोघे असल्याने मला थोडा आधारच होता. त्यांच काम आटपत आल होत. एक दिवस त्यांच्यातल्या एकाला ताप आला. त्यामुळे तो दुसऱ्यादिवशी येऊ शकला नाही. मग त्यांच्या बॉसने एका मुलीला पाठवलं. काम फक्त दोन दिवसाचं उरलं होत. त्यामुळे तसा काहीच प्रश्न नव्हता.

उषा दिसायला फारच साधीशी होती. सावळा रंग आणि कमालीची बुटकी होती ती. म्हणजे जेमतेम कॉलेजमध्ये जाणारी मुलगी वाटेल अशी. पण तिचे केस मात्र लांबसडक होते. काम करताना ती तिची वेणी गळ्याभोवती गुंडाळायची तर त्याचे दोन वेढे व्हायचे. इतके लांब होते. कामाचा शेवट होता त्यामुळे आमच्या गप्पा काही फार झाल्या नाहीत. पण ती माझीच ट्रेन घ्यायची. त्यामुळे आम्ही एकत्रच जात होतो.

शेवटच्या दिवशी थोडा उशीर होत होता त्यांना. पण मग मीसुद्धा थांबले त्यांच्याबरोबर. मुळात मीसुद्धा अकौंटस वाली असल्याने मदतीला थांबले होते. जेणेकरून काम लवकर आटपेल आणि आम्ही निघू. काम आटपल तेव्हा ९.३० होऊन गेले होते. आम्ही पटापट आमच्या बॅग्स उचलल्या आणि निघालो. उषा निघताना म्हणाली,"अपर्णा तू पुढे हो आणि बस आली तर थांबव. मी आलेच ग. जरा बाथरूमला जाऊन येते. इथल्या A.C. चा मला फार त्रास होतो."

मी म्हणाले,"उषा आपण एकत्रच निघू. मी इथेच थांबते." तर ती म्हणाली,"नको. तू हो पुढे. आताची बस चुकली तर मग परत २०/२५ मिनिट थांबायला लागेल." मलाही ते पटल आणि मी बस थांबवायला पुढे स्टॉपकडे गेले. दहा मिनिट झाली तरी उषा आली नव्हती. मी तिला बोलवायला जाणार तर तेवढ्यात समोरून बस आली. मला कळेना काय कराव. एवढ्यात उषाने हाक मारल्यासारख वाटल. मी मागे वळून बघितल तर ती दुकानाजवळून जोरजोरात हात हलवून दाखवत होती. मला कळेना तिला काय म्हणायचं आहे. म्हणून मग मी बस सोडून तिच्याकडे जायला वळले. पण तो बरोबरचा मुलगा म्हणाला अग ती जायला सांगते आहे. थांबते आहे ती बहुतेक.

मी गोंधळून परत एकदा उषाच्या दिशेने बघितल. तर खरच ती बाय करत असल्यासारखा हात हलवत होती. माझी द्विधा मनस्थिती झाली. घरी काळजी करत वाट बघणारे आई-बाबा मला दिसत होते आणि इथे उषाकडे जावं असंही वाटत होतं. तेवढ्यात बस समोर येऊन थांबली. त्या मुलाने माझ बखोट धरून मला बसमध्ये चढवलं आणि आम्ही निघालो.

दुसऱ्या दिवशी नेहेमीप्रमाणे मी कामाला आले. आजपासून ती ऑडीटची मुल येणार नव्हती. त्यांच काम आटोपलं होत. पण बरेच दिवास ते येत होते त्यामुळे त्याच्या असण्याची सवय झाली होती. त्यादिवशी संध्याकाळ झाली तरी मॅनेजर आला नव्हता. मला थोड आश्चर्य वाटल. पण बरच होत ते एका दृष्टीने. म्हणजे मी वेळेत निघू शकणार होते.

मी ९.२० ची बस घेतली आणि स्टेशन ला पोहोचले. नेहेमीची ट्रेनदेखील घेतली. नेहेमी प्रमाणे जेमतेम २-४ बायका होत्या डब्यात. मी माझ्या नेहेमीच्या कोपऱ्यातल्या जागेवर जाऊन बसले आणि माझ्या पुढ्यातच उषा बसलेली दिसली. मला आश्चर्यच वाटल. मी तिला विचारल,"तू कशी काय इथे ग?"

ती म्हणाली,"तुला सोबतिण म्हणून आले आहे. काल काही तू माझ्यासाठी थांबली नाहीस. म्हंटल आता तुझी सोबत सोडून चालणार नाही." ती हसत म्हणाली.

मला कळेनाच. मी म्हणाले,"अग, पण तू तर आम्हाला बाय करत होतीस न? मला वाटल की तुला वेळ लागणार आहे म्हणून मग मी निघाले."

त्यावर तिने माझ्याकडे क्षणभर रोखून बघितले आणि म्हणाली,"अपर्णा मी का थांबीन तिथे? मुख्य म्हणजे तुला माहित नाही का तुमचा मॅनेजर कसा आहे? तरीही तू मला सोडून निघालीस न?"

मला एकदम लक्षात आल. त्याक्षणी मला फक्त सुटणारी बस दिसत होती. पण आत्ता तिने मॅनेजरची आठवण करून दिल्या नंतर मला वाटलं मी थांबायला हव होतं. पण ती इथे बसली आहे म्हणजे तिला काही प्रोब्लेम नाही झाला. म्हणून मग मी म्हणाले,"उषा, अग तू आलीसच २ दिवसांसाठी. त्यात शेवटचे काम चालू होते त्यामुळे मी तुला सांगायची विसरले ग त्या हलकटाचा स्वाभाव. का तुला निघताना काही त्रास दिला का त्याने? मग तू पुढची बस घेतलीस का? खूप उशीर झाला का ग? सॉरी उषा. तुला सोडून जायचं माझ्या मनात नव्हत ग. पण बस दिसली आणि निघायचा मोह झाला मला; इतकच. By the way तसा आज तो आलाच नव्हता."

माझ सगळ एकून घेतल उषाने आणि मग म्हणाली,"आज काय तो आता कधीच येणार नाही."

मी गोंधळले. म्हंटल,"म्हणजे काय ग?"

त्यावर ती म्हणाली,"त्याने मला अडकवून ठेवल होत अपर्णा. त्याने माझ्या एकट असण्याचा आणि कमजोर असण्याचा फायदा घेतला. मी नंतरची काय कुठलीच बस घेऊ शकले नाही. कारण त्याने केलेले अत्याचार मला सहन झाले नाहीत. त्यामुळे समाधान होऊन तो जेव्हा माझ्यावरून दूर झाला ना तेव्हा त्याला लक्षात आल की मी जिवंतच नाही आहे. घाबरला मग तो. मला उचलून गाडीत टाकल त्याने आणि जवळच्या समुद्र किनाऱ्यावर नेऊन माझ कलेवर ढकलून दिल गाडीबाहेर. अग माझ्या शरीरातून जीव गेला होता, पण माझा आत्मा तिथेच होता. आणि आत्मा कमजोर नसतो ना. मी तशीच त्याच्याच गाडीत त्याच्याच मागे बसून गेले. तो हलकट माझ्या कलेवराची विल्लेवाट लावून आनंद साजरा करण्यासाठी एका बारमद्धे गेला. एकामागुन एक दारुचे ग्लास रिचवून तो तर्र होऊन बाहेर त्याच्या गाडिजवळ पोहोचला. मी याच क्षणाची वाट बघत होते. त्याने गाडीचे दार उघडले आणि त्याच्या गाडीतून मी बाहेर येऊन त्याच्या समोर उभी राहिले. 

मला बघुन त्याची बोबड़ी वळली. त्याला हा धक्का सहन झाला नाही आणि हार्ट अटॅक येऊन तिथेच कोसळला."

एवढं बोलून उषा थांबली. मात्र तिच बोलण एकताना मी थिजुन गेले होते. समोर बसलेली उषा माझी चेष्टा करत होती की ती जे सांगत होती ते खरच घडल होत; अस माझ्या मनात आल. पण जर खरच ती म्हणते तस घडल असेल तर?......तर?.... तो विचार मनात आला आणि चर्र झाल. ही जे सांगते आहे ते खरं आहे का? की ही चेष्टा करते आहे आपली? जर खरं असेल तर....

म्हणजे.... म्हणजे... समोर बसेली उषा? 

मी धीर करुन तिला हाक मारली,"उषा......?"

"मी तुला खर तेच सांगते आहे अपर्णा." उषा म्हणाली. जणुकाही तिला माझ्या मनातले प्रश्न कळले होते.

तिच बोलणं एकल आणि माझी घाबरून गाळण उडाली. "उषा... अग... मी... मला... मी काय ग? तू इथे कशी आली आहेस?" मी काय बोलत होते ते मलाच कळत नव्हतं. 

उषा माझ्याकडे बघुन हसली. पण तिच हसणं मला भेसुर वाटत होत.

"अपर्णा तुला हेच विचारायच असेल न की मी जे काही घडल ते तुला सांगायला का आले आहे? अपर्णा.... काल जे काही घडल फ़क्त तेवढच तुला सांगायला मी आले नाही. अपर्णा... अग काल जर तू त्या बसचा मोह सोडून माझ्या सोबतीसाठी थांबली असतीस तर कदाचित्.... पण जाऊ दे. ते कदाचित् आता काही उपयोगाच नाही. अपर्णा तू काल माझ्यासाठी थांबली नाहीस. पण यापुढे रात्रि 9.20 नंतर मी कायम तुला सोबत करणार आहे." अस म्हणून उषा बोलायची थांबली.

........ अपर्णासुद्धा बोलायची थांबली. तिने शून्यात खिळवलेली नजर उचलून पृथाकडे बघितले. पृथा थिजून गेलेल्या नजरेने एकदा  अपर्णाकडे बघत होती आणि एकदा मंनगटावरच्या घडाळ्याकडे. ती सारखी घडाळ्याकडे का बघते आहे हे लक्षात न आल्याने अपर्णानेसुद्धा घडाळ्याकडे बघितले. रात्रीचे ९.४० झाले होते.

अपर्णा आणि पृथाची नजरभेट झाली आणि अपर्णा काही बोलणार तेवढ्यात platform ला ट्रेन येऊन थांबली............. आणि...............

आणि दोघीना ट्रेनमधून एक हाक एकू आली.............."अपर्णा............ पृथा ......... चढता ना ट्रेनमध्ये???"

कथा

प्रतिक्रिया

स्पा's picture

28 Jul 2016 - 4:46 pm | स्पा

हा भाग जामच गंडलाय :(

पुढील कथांना शुभेच्छा

अमितदादा's picture

28 Jul 2016 - 5:17 pm | अमितदादा

छान कथा पण लवकर आटोपत घेतलं..उषा लगेच भूत होऊन मालकाला पण लवकर घेऊन गेली...

किसन शिंदे's picture

28 Jul 2016 - 5:29 pm | किसन शिंदे

पहिल्या दोन भागांमुळे वाढलेला सस्पेन्स या भागात तेवढा नाही जाणवला.

वरील प्रतिसादांशी बव्हंशी सहमत. पुलेशु.

रातराणी's picture

28 Jul 2016 - 8:31 pm | रातराणी

Sarvaans

रातराणी's picture

28 Jul 2016 - 8:34 pm | रातराणी

सर्वांशी सहमत असं म्हणायचं होतं. दुसऱ्या भागात वातावरण निर्मिती झकास जमली होती. त्यामानाने हा भाग मी निवांत वाचू शकले =))

निओ's picture

28 Jul 2016 - 9:19 pm | निओ

कथा आवडली ...पुलेशु

सुखी's picture

28 Jul 2016 - 10:39 pm | सुखी

कथा छान आहे.

एक प्रश्न आहे, ९:२० मिनटानी, अपर्णा व पृथा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर उषा कोणाकडे जाइल? (क्रु ह.घे.हे.वे.सां.न.ला.)

खटपट्या's picture

29 Jul 2016 - 12:36 am | खटपट्या

आवडली, उषा एकदा येउन समजाउन गेली होते ते ठीक होते पण रोज येउन कशाला त्रास देत होती... असो.

पहिल्या दोन भागांवरुन मला अपर्णाच भूत असेल असे वाटत होते ;)

ज्योति अळवणी's picture

29 Jul 2016 - 8:38 am | ज्योति अळवणी
गिरिजा देशपांडे's picture

29 Jul 2016 - 5:43 pm | गिरिजा देशपांडे

पहिल्या दोन भागांवरुन मला अपर्णाच भूत असेल असे वाटत होते.- मला पण अगदी असेच वाटले होते.:)

दिपुडी's picture

29 Jul 2016 - 9:09 pm | दिपुडी
दिपुडी's picture

29 Jul 2016 - 9:08 pm | दिपुडी