नंदनवन

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
21 Jul 2016 - 12:35 am

चंदीगढच्या त्यांच्या घरात गोरे-पान, नाकेले, उंच रैनाजी टी व्ही समोर बसून काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीविषयीची बातमी पाहत होते. समोरच सोफ्यावर तिशीतला मुलगा अविनाश आणि स्वयंपाकघरातून त्यांची पत्नी आरतीदेवी हेही लक्ष देऊन पाहत होते.

काश्मिरी पंडितांचं हे विस्थापित कुटुंब. १९९० च्या अखेरीस अतिरेक्यांनी सोपोर मधल्या काली मन्दिराच्या केलेल्या विध्वंसानंतर तिथले पुजारी असलेले रैनाजींचे वृद्ध वडील आणि इतर रैना कुटुंबीय आधी दिल्लीला आणि तिथून चंदीगढला येऊन स्थिरावले होते. तेंव्हा पिढीजात वास्तव्य असलेलं काश्मीर सोडायला लागल्याचं शल्य होतंच, पण खूप जवळचे, अगदी सख्खे नातेवाईक असावेत, इतके प्रिय असलेले शेजारी असिफभाई आणि त्यांचे कुटुंबीय यांना सोडून यावं लागण्याच्या यातना अतोनात होत्या. दिल्लीच्या ट्रेन मध्ये बसवून देतांना असिफभाई तर आले होतेच, पण त्यांचा तेंव्हा ७-८ वर्षांचा मुलगा झहीर हाही समवयस्क अविनाशला निरोप देतांना ओक्साबोक्शी रडला होता.

रैनाजींच्या वडिलांचं चंदीगढला आल्यानंतर लवकरच निधन झालं. त्यानंतरची गेली पंचवीस वर्षे मधून मधून फोन वर रैनाजी आणि असिफभाई यांचा संपर्क होतच होता. कधी सुरुवातीच्या काळात रैनाजी (त्यांच्या ओपिंदर कृष्ण - ओ के - या या आद्याक्षरांवरून असिफ भाई त्यांना 'ओके जी' म्हणायचे) "आम्ही भेटायला येतो" म्हणाले तर असिफ भाई म्हणायचे, "आप ना ही आये तो बेहेतर है, ओके जी, हालात अब भी अच्छे नाही हैं! हम लोग ही आकर मिलेंगे" म्हणायचे. नंतर दोन-तीन वेळा ते येऊनही गेले, दोनच वर्षांपूर्वी झहीरच्या निकाहचे आमंत्रण देण्यासाठी आले होते. त्या लग्नाला जाणंही अशांततेमुळे राहिलंच. आधी सोपोर मध्ये पोलिसांत भरती झालेला झहीर सध्या इन्स्पेक्टर म्हणून कुपवारा जिल्ह्यात द्रुगमुल्ला इथे वास्तव्याला होता.

आजची टीव्ही वरची बातमी द्रुगमुल्ला इथलीच होती.

*************************************************

झहीर आणि अविनाश फेसबुकवरून एकमेकांच्या संपर्कात राहायचे. महिन्याभरापूर्वी झहीरचा अविनाशला फोन आला होता. तो सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीविषयी आणि सीमा सुरक्षा बल तसंच पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांविषयी बोलत होता. "सतत भूमिका बदलत राहणारे हे राजकारणी लोक! त्यांच्या तावडीत सापडल्याने पोलिसांचं सामान्य जनतेशी नातं तुटतंय! आणि लोकांची दिशाभूल करायला हे सीमेपलिकडचे घुसखोर आहेतच! मधल्या मध्ये हल्ले आमच्यावर होताहेत...." तो बराच वेळ बोलत राहिला, आवेगाने. "न जाने कब रुकेगा ये सिलसिला?.....या फिर रुकेगा ही नही?"

*************************************************
रैनाजी आणि कुटुंबीय टीव्ही वरील वृत्त ऐकत होते. सीमा सुरक्षा बलाच्या मोहिमेत कुणा फुटीरतावाद्याच्या झालेल्या मृत्यूनंतर उसळलेल्या जनक्षोभानंतर द्रुगमुल्ला इथे म्हणे पोलिसांवर दगडफेक चालू होती. आणि अचानक जमावातून पुढे आलेल्या कुणा अतिरेक्याने ए के ४७ वापरून केलेल्या अंदाधुन्द गोळीबारात तीन पोलीस जखमी तर एक पोलीस इन्स्पेक्टर मृत्युमुखी पडला होता. परिस्थिती तणावपूर्ण असली तरी सीमा सुरक्षा बलाने ती नियंत्रणाखाली आणली होती. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री घटनास्थळी जायला निघाल्या होत्या.

*************************************************

रैनाजींनी न राहवून सोपोर मध्ये आसिफभाईंना फोन लावला. खूप वेळ प्रयत्न करूनही फोन सारखा बिझी लागत होता. अविनाश म्हणाला, " मी फेसबुकवर झहीरने काही अपडेट टाकलाय ते पाहतो, तुम्ही फोन करत राहा." तो त्याच्या कम्प्युटर च्या खोलीकडे गेला.

एकच मिनिटानंतर रैनाजींचा फोन लागला. असिफभाई स्वतःच होते, त्यांना बोलवत नव्हते, ते कसे-बसे म्हणाले, "ओके जी, हमारा झहीर नाही रहा! ....... ईन्सानियत की नामपे शहीद हो गया मेरा झहीर!" फोन ठेवल्यावर रैनाजी सुन्न होऊन आरतीदेवींचा हात धरून बसले. आरतीदेवींनी त्यांच्या नजरेतून काय जाणायचं ते जाणलं. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना जवळ घेतलं. "अविनाशला सांगायला हवं..." असं म्हणत आरतीदेवींनी रैनाजींना हात धरून आतल्या खोलीकडे नेलं.

आत अविनाशचे डोळे वाहत होते, कम्प्युटरच्या स्क्रीन वर दोन विन्डोज उघड्या होत्या, एकीत हल्ल्यातील मृतांची छायाचित्रे, तर दुसऱ्यात फेसबुकावरचं झहीरचं पेज. त्याचा अखेरचा मेसेज होता:

"मै इस मुल्क को जी जानसे प्यार करता हूं!
बस इतना नही जानता की ये मुल्क मुझसे प्यार करता है के नही!"

*************************************************

"अगर फिरदौस बा रुह जमिनस्त, हमीनस्तो, हमीनस्तो, हमिनस्त!!"
पृथ्वीवर स्वर्ग जर कुठे असेल, (तर तो) इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे!!"
- अमीर खुस्रो ने काश्मीरविषयी काढलेले उद्गार

कथाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

एस's picture

21 Jul 2016 - 1:03 am | एस

कथा आवडली.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 3:48 am | मुक्त विहारि

काश्मीर ही एक चिघळणारी जखम आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Jul 2016 - 3:11 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आवडली. काळजाला भिडली.

राजाभाउ's picture

22 Jul 2016 - 3:53 pm | राजाभाउ

कथा आवडली.

इशा१२३'s picture

22 Jul 2016 - 4:03 pm | इशा१२३

आवडली!

इशा१२३'s picture

22 Jul 2016 - 4:03 pm | इशा१२३

आवडली!

इशा१२३'s picture

22 Jul 2016 - 4:03 pm | इशा१२३

आवडली!

नाखु's picture

22 Jul 2016 - 4:53 pm | नाखु

आणि सध्याचा एका एकांगी (कळवळ्याच्या) धागापार्श्वभुमीवर जास्त परिणामकारक आहे.

विस्थापीतांचेही दु:ख असते ते मान्य न करणार्या/आणि सोईस्कर काखा वर करणार्या (मानव हक्क ढोंगीना) देव सुबुद्धी देवो.

नितवाचक नाखु

खेडूत's picture

22 Jul 2016 - 4:56 pm | खेडूत

वाचतोय.

सामान्य माणसाला ही गुंतागुंत समजायला अवघड आहे!

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 6:18 pm | अभ्या..

अर्रर्रर्रर्र.

पैसा's picture

23 Jul 2016 - 5:35 pm | पैसा

कथा आवडली.