पाऊस असा...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
24 Jun 2016 - 6:29 pm

मुंबईत पाऊस पडतोय. मुंबईचा म्हणून ओळखला जाणारा पाऊस पडतोय. पागोळीची सुरावट सुरू आहे बराच वेळ... एका सुरात... पागोळीला अजून तरी शहराचं वावडं नाही, मुंबईचं वावडं नाही. त्यामुळे ती आहेच... परळ भागातला हा म्हटलं तर मध्यवर्ती, म्हटलं तर शांत असा भाग. इमारतीखाली, आजुबाजूला पावसाचा चिकचिकाट, रस्त्यावर साचलेलं पाणी, शाळेतून परतणारी मुलं, त्यांना न्यायला आलेल्या, पावसामुळे खोळंबलेल्या आया, किरकोळ विक्रेते, त्यांचे ठेले, भज्यांचा खमंग दरवळ, वाफाळत्या चहाच्या हाका, त्या ओढीने गर्दी करणारी कोंडाळी...

पाऊस थोडा सुस्तावलाय आता. म्हणून तर पागोळीचं ठिबकणं इतकं छान स्पष्ट ऐकू येतंय... झेंडा अमुचा प्रिय देशाचा... स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात समुहगायनात गायचं गाणं लेक गाऊन दाखवतेय... माझ्या मनात मात्र पाऊस... गाणं ऐकून, मान डोलावली मी आणि शाळेतून कुडकुडून आलेली लेक चादर गुरफटून मांडीवर डोकं ठेवून झोपलीसुद्धा.. माझ्या मनात पाऊस सुरूच...

माझा आवडता ऋतू पावसाळा... ऋतू हा शब्दही खास पावसाळ्यासाठीच जन्मला असावा, असं नेहमीच वाटत आलेलं... मी पावसाळ्याच्या आणि बहुधा तो ही माझ्या तुडुंब प्रेमात... मन आनंदाने भरलेलं असो, नाराज असो, दु:खी असो किंवा आणखी काही.. तो आनंद घेऊनच येणार. मी आनंदात असले तर त्यात आणखी भर घालणार...
काही माणसं असतात ना, आपल्याला उगीचच आवडणारी. अगदी ओळख नसली तरी. त्यांना फक्त बघीतलं, तरी हसू फुलतं ओठांवर आपसूक... तसाच पाऊस.. तितकाच आवडता, हवाहवासा पाऊस...

आठवणीतला पाऊस, पावसाळ्याच्या आठवणी, आठवणींचा पाऊस... म्हटलं ना मी.. असं होतं वेडावल्यासारखं...

मनाला बेचैन करणारी
बरसत्या पावसाची रिमझिम
आपल्याही नकळत आपण भिजतो,
आठवणींनी, ओलेचिंब...

पावसाचा नाद, कोसळतो मनात
झिरपत राहतो मनभर...
सरी बरसतात आठवणींच्या
न थांबता क्षणभर...

मध्येच कधीतरी थांबतो पाऊस
अचानक आपल्याच धुंदीत
भानावर येतो, पुन्हा बरसतो
त्याच त्या धुंदीत, लयीत...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

रातराणी's picture

25 Jun 2016 - 12:06 pm | रातराणी

सुरेख! एकदम दिलसे आलेलं मुक्तक!

एक एकटा एकटाच's picture

25 Jun 2016 - 10:49 pm | एक एकटा एकटाच

मस्त