अथांग

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
23 Jun 2016 - 2:25 pm

IMG_2394

समुद्र..

त्याच्या नुसत्या आठवणीनेही जीवाला थंडावा मिळतो, कानांत लाटांची गाज घुमायला लागते, मग लगोलग एखादा
समुद्रकिनारा गाठण्याची, त्याला डोळे भरून पाहण्याची, मन भरून भेटण्याची अनावर ओढ लागते ..

IMG_2424

त्याच्याशी कुठले जन्मांतरीचे नाते आहे माहित नाही, पण मनाला त्याच्या भेटीची आस लागून राहिलेली असते सतत .
रोजच्या बेचव जगण्याने जीव शिणला की त्याच्याकडे जायला निघायचं, त्याच्या एका भेटीने सगळा शीण,
सगळी दु:खं, सगळे त्रास नाहीसे होतात, जगण्यासाठी नवी उमेद, भरभरून ऊर्जा मिळत राहते.

IMG_2336

IMG_2316

किनार्‍यावर आधी आपले स्वागत करते ती सुळसुळीत, मऊशार वाळू. ही वाळू कधी शुभ्र पांढरी असते, कधी करडी,
कधी पिवळसर, तर कधी चकचकीत सोनेरी, कधी काळीशार. रंग बदलते असले तरी आपला मऊपणा ती सोडत नाही.
वाटेत शंख शिंपल्यांचा खजिना विखुरलेला असतो, त्यातला जमेल तेवढा गोळा करून घ्यायचा, सांभाळून ठेवायचा.
मग वाळूच्या पायघड्यांवरून अनवाणी चालायला लागायचं, वाळूत पाऊल टाकले की ते खोल आत रूतत जाते,
तो मखमली स्पर्श पायापासून डोक्यापर्यंत सर्वांगात झिरपत जातो.
नंतर इथून घरी परतल्यावर रोजच्या जगण्यात बुडून जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वाळूचा तो मऊमुलायम स्पर्श
सतत जाणवत राहतो पावलांना, आठवण करून देत राहतो मागे राहिलेल्या त्या जीवलगाची.

IMG_20160219_184356

मग त्या मखमली गालिच्यावरून सावकाश पावले टाकत समुद्राकडे चालत जायचे, त्याला मन भरून पाहत..
त्याचे रूप डोळ्यांत जितके जमेल तितके साठवून घेत. तरीही डोळे कमी पडतात, मन भरत नाही.
समोर तो असतो, त्याचे विशाल बाहू पसरून, जणू आपलीच वाट पाहत थांबलेला. वर्षानुवर्षे.
कधीही गेलं तरी त्याला ओळख पटते, दरवेळी तसाच भेटतो तो मनापासून, युगा-युगांचे नाते असल्यासारखा.
जगन्मित्र तो, सगळ्यांशी मैत्री करणारा, त्याच्याकडे कुठले भेदभाव नाहीत, विकार नाहीत,
त्याच्याकडे जाणारे सगळे त्याचेच.

IMG_20141115_133626

पाण्यात पहिले पाऊल टाकले की त्या थंडाव्याने पायापासून डोक्यापर्यंत एक थंडगार शिरशिरी उठते.
तसंच एकेक पाऊल टाकत पुढे जात रहायचं, मग हळूहळू तो थंडावा कमी होत जातो, पाण्यात ऊब जाणवायला लागते.
गुड्घ्यापर्यंत लाटा येऊ लागल्या की तिथेच थांबायचं, समोरचा त्याचा अफाट विस्तार डोळ्यांत साठवत उभं रहायचं.
नजर दूर जिथवर जाईल तिथवर तोच असतो, अनंत, नेमस्त..
सभोवतालचा नजारा मनसोक्त नजरेत उतरवून झाला की मागे येऊन लाटा अंगावर घेत बसून घ्यायचं,
तंद्री लावायची निवांत.

IMG_20141115_130553

एकामागे एक येत राहणार्‍या लाटा जसजसं आपल्याला भिजवत अंगावरून येतात, जातात, तसतसं आपण आतून
बाहेरून स्वच्छ होत चाललोय असं वाटायला लागतं, निर्मळ.. शुध्द..
शरीराबरोबरच मनावरही चढलेली, रोजच्या जगण्याने दान म्हणून पदरात टाकलेली कसली कसली, निराशा, विषाद,
दु:ख, नकारात्मकतेची पुटं हटत जातात. सगळ्या जगण्यावर जणू एक मळभ दाटून आलेलं असतं ते दूर होऊ लागतं.

मग आपलं अस्तित्व शून्य होत जातं, त्याचं अस्तित्व आपल्यात भिनू लागतं हळूहळू .. अलवारपणे..
मग आपणही त्या अंतहीन प्रवाहाचा एक भाग बनून जातो..
मग मन पिसासारखं हलकं होऊन लाटांच्या हेलकाव्यांबरोबर तरंगू लागतं..

IMG_20160221_101649

किनार्‍यावरून दिसणार्‍या समुद्राला रंग नसतो, नुसत्याच करड्या पांढर्‍या लाटा दिसतात, मात्र जसजसे आपण आतमध्ये
जाऊ लागतो, तसतसे आत लपलेले त्याचे खरे रंग दिसू लागतात. कधी मोरपिशी निळा तर कधी शाईसारखा गडद,
कधी मातकट, कधी पाचूची हिरवाई घेतलेला, कधी फिकट पोपटी, कितीक रंगांची मनमोहक उधळण दिसून येते.

IMG_20160220_165027

IMG_20160220_174417

IMG_2328

IMG_2446

उगवत्या सहस्त्र्रश्मीने त्याच्यावर उधळलेला गुलाबी तांबूस रंग तो हौसेने मिरवतो, मध्यान्हीला सूर्याच्या प्रखरतेने सगळे रंग उतरवून निस्तेज, फिकुटलासा होतो. मात्र त्याची खरी जादू पहायची सांजवेळेला, तेव्हा आसमंतात पसरलेली पिवळसर केशरी आभा सर्वत्र परावर्तित करून तो सारा सभोवताल सोनेरी बनवतो, आपल्या तेजाने सगळ्यांचे डोळे दिपवतो.

DSC01531

संध्याकाळी समोर अस्ताला चाललेले सूर्यबिंब पहात लाटा पायावर घेत नुसतं उभं रहायचं..
पायांखाली वाळू सरकत, गुदगुल्या करत असते, ती सुखद भावना मनभर पसरवून घ्यायची.
गार वारा वाहत असतो, निरामय शांतता पसरलेली असते, फक्त लाटांची गाज ऐकू येत राहते निरंतर.
हा लाटांचा आवाज एकाचवेळी शांतही असतो आणि रौद्रही, संमोहित करणारा.
क्षितीजापार सूर्यदेव आपला सौम्य पिवळा रंग मागे सोडून सर्वत्र गडद केशरी, लाल तांबड्या छटा
पसरवत हळूहळू मावळत असतो. निव्वळ जादूई, भारलेलं, मंतरलेलं वातावरण असतं ते.
सगळं जग त्या एका क्षणासाठी जणू थांबलेलं असतं, स्तब्ध. नि:शब्द.

IMG_2487

IMG_2524

समुद्राचे रात्रीचे रूप अगदीच वेगळे, धीर गंभीर, गूढ. समोर काहीही दिसत नसतं, रात्रीच्या नीरव शांततेत केवळ लाटांचा
आवाज घुमत असतो, चांदण्यांत शुभ्र लाटा चमकत असतात. दिवसभर जिवाचा सखा वाटणारा तो, त्याचे हे वेगळेच रूप
समोर असते, अगदीच अनोळखी, एकाकी. त्याचं हेही न्यारं रूप अनुभवत किनार्‍यावर फिरायचं, थकून झोप अनावर
होईपर्यंत. मग परत सकाळी भेट्ण्याचे वचन देऊन जड मनाने मागे फिरायचं.

त्याची गाज कानाशी, त्याच्या आठवणी उशाशी घेऊन झोपायचं, शांत.

IMG_20160220_174929

सगळ्यात अवघड वेळ असते निरोपाची, ही वेळ फार वाईट. अशा वेळेस वाटतं इथून कुठेही जाऊ नये,
समुद्रकिनारी घर बांधावं अन रहावं तिथेच, कधी प्रत्यक्षात येतील न येतील अशा अनेक स्वप्नांपैकी हे एक.

IMG_2539

IMG_2515

IMG_20160220_175011

IMG_2500

मग निघायचं, त्याचा लांबूनच निरोप घेऊन, जवळ जायची, त्याच्या नजरेला नजर मिळवायची हिंमत अजिबातच नसते.
मग तिथली थोडी वाळू भरून घ्यायची, घेऊन जायची सोबत, जेव्हा जेव्हा त्याचा आठव अनावर होईल तेव्हा ती वाळू
हातात घेऊन तिच्यात भरून राहिलेला त्याचा स्पर्श अनुभवत राहायचं.
जे हवं ते सगळंच मिळत नसतं, आहे त्यात समाधान मानणं हेच आयुष्य शेवटी.

DSC07326

IMG_2343

पृथ्वी सत्तर टक्के पाण्याने बनली आहे म्हणतात, त्यातले किती टक्के पाणी समोर पसरलेय कसे आणि कशाने मोजायचे.
या समुद्राची पुढे जाऊन भेट होते हिंद महासागर, प्रशांत महासागर, आर्क्टिक, दक्षिण, अटलांटिक सगळ्या सागरांशी.
या सार्‍या समुद्रांचं पाणी एकत्र येऊन एक मोठा जलाशय बनतो जो संपूर्ण पृथ्वीला व्यापून उरलाय.
या पृथ्वीवर आधी काहीही नव्हतं, तेव्हा तो होता, आत्ताही तो आहे, तोच असणार आहे कायम..

IMG_2376

एक दिवस असा येईल की जगात कुणीही नसेल, मनुष्य, प्राणीमात्र, जीवसृष्टी, नावालाही काही उरणार नाही,
सगळं संपलेलं असेल.
तेव्हाही तो असेल इथे.. अथांग.. शाश्वत.. चिरंतन..
संपूर्ण पृथ्वीवर त्याची अमर्याद सत्ता असेल, त्याचेच राज्य..
एक तोच, अनादि, अनंत.

IMG_0633

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

23 Jun 2016 - 2:35 pm | पद्मावति

अत्यंत सुंदर लेख. फोटोही मस्तं!

हाही लेख परत वर स्क्रोल करून वाचला नक्की कुणी लिहिलाय! :-)

अतीव सुंदर.

बोका-ए-आझम's picture

23 Jun 2016 - 2:42 pm | बोका-ए-आझम

फोटोही आणि लेखही!

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 2:49 pm | टवाळ कार्टा

फटू लय म्हन्जे लयच आवल्डे...कंची जागा?

नीलमोहर's picture

23 Jun 2016 - 3:32 pm | नीलमोहर

गोवा, नागाव (अलीबाग), मालगुंड (रत्नागिरी)

गणामास्तर's picture

23 Jun 2016 - 3:48 pm | गणामास्तर

पालोलिम आणि अगोंदा ना ? मस्त आलेत फोटो..

रत्नागिरी चा नाही पाहिला अजुन पण नागाव फार सुंदर आहे. सीरीन शब्द च आठवतो फक्त. गोव्याचा समुद्र देखील तसा सतत गजबजलेला असुन ही तुमच्या फोटोज मध्ये निवांतपणा नेमका टिपलाय. सुंदर फोटो आलेत फार.

किसन शिंदे's picture

23 Jun 2016 - 11:31 pm | किसन शिंदे

साऊथ गोवा = भरपूर निवांतपणा

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 5:50 pm | सतिश गावडे

अलिबाग परीसरात फिरताना कुणी स्थानिक व्यक्ती सोबत असेल तर अगदी अनवट खडकाळ समुद्र किनारा पाहायला मिळतो.

धनंजय माने's picture

23 Jun 2016 - 3:08 pm | धनंजय माने

ई हैवे बिकम गणेशा. कन्नोट सी फोटोज.

धनंजय माने's picture

23 Jun 2016 - 3:28 pm | धनंजय माने

फ़ोटो दिसले. डोळे निवले.

खूप च मस्त लेख आणि फोटो.

गर ये आर्टिकल टशन के वास्ते लिखा गया है तो ऐसेच टशन होना मांगताय.
हमको अच्छी दावत मिल रही है!

जगप्रवासी's picture

23 Jun 2016 - 3:18 pm | जगप्रवासी

खूप सुंदर, लेख आणि फोटो देखील. सूर्य आणि नावेचा फोटो खूप आवडला.

जे हवं ते सगळंच मिळत नसतं, आहे त्यात समाधान मानणं हेच आयुष्य शेवटी.>> हे सगळ्यात जास्त आवडलं.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jun 2016 - 3:22 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर विडंबन !

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2016 - 3:34 pm | टवाळ कार्टा

विडंबन? कशाचे?

नाखु's picture

23 Jun 2016 - 3:24 pm | नाखु

सुखाचा आणि वाचनीय (दर्शनीय सुद्धा) केल्याबद्दल जंगलभेट्,समुद्र भेट आणि पावश्या कळा चा अतिषय आभारी आहे.

डायरी लेखन आणि राजकीय-धार्मीक (अकारण) दंगा-धुराळी धाग्यातून मिपाकरांचा जीव सुखावला..

या हंगामाचा पाऊस असाच बरसू दे अशी मिपा वाचक महांसंघाक्डून प्रार्थना..

पुलेशु

वाचक नाखु

फोटो बघून आम्हाला पाटणे आणि पाळोले आठवले, कारवार किंवा साउथ गोवा आहे बहुतेक. छान आलेत फोटो.
बाकी असल्या स्वप्नील मजकुराची तिडीक बसलीय आजकाल. एचडीडी फोरम्याट मारायला हवी. सो पास.

स्पा's picture

23 Jun 2016 - 4:14 pm | स्पा

दवणीय मेसेज झेपत नाहीत हल्ली

फोटो सुंदरच आहेत

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 9:55 pm | संदीप डांगे

+१.

किसन शिंदे's picture

23 Jun 2016 - 6:08 pm | किसन शिंदे

सुंदर आहे सगळं !!

निळाशार समुद्र, किनार्‍यावरची मऊ पांढरीशुभ्र वाळू, दाट नारळाची झाडे आणि रंगीबेरंगी हट्स !! बहुतांश फोटो पाळोलेमचे आहेत हे नक्की. लेखन लय आवड्या.

लेख आवडला.फोटो जास्त आवडले!

सस्नेह's picture

24 Jun 2016 - 12:04 pm | सस्नेह

असेच म्हणते.

उल्का's picture

23 Jun 2016 - 6:17 pm | उल्का

सुंदर फोटो आहेत.
लेख वाचताना सगळं नाही पण बरंचसं आपलंच मनोगत वाचत असल्यासारखं वाटत होत. :)

सही रे सई's picture

24 Jun 2016 - 12:19 am | सही रे सई

+१

जव्हेरगंज's picture

23 Jun 2016 - 6:26 pm | जव्हेरगंज

कडक!!

चांदणे संदीप's picture

23 Jun 2016 - 6:41 pm | चांदणे संदीप

समुद्र ही आवडत्या गोष्टींपैकी एक पण लेख वाचताना बोर झालं!

Sandy

रातराणी's picture

23 Jun 2016 - 8:07 pm | रातराणी

अप्रतिम!! कुणीतरी फार खुश झालं असणार!

लेखन व फोटू आवडले. अनेक आठवणी जाग्या झाल्या.

प्रचेतस's picture

23 Jun 2016 - 9:59 pm | प्रचेतस

अप्रतिम मुक्तक.

समुद्राचं इतकं अनिवार आकर्षण असं कधी वाटलंच नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jun 2016 - 1:09 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख, अप्रतिम फोटो !

जयंत कुलकर्णी's picture

24 Jun 2016 - 12:00 pm | जयंत कुलकर्णी

अथांग सागराचा आवाज मनाला भुरळ पाडतो... त्याचा अखंड कुजबुजणारा आवाज मनाला एकाकीपणाच्या पोकळीत घिरट्या घालण्याचे आमंत्रण देत असतो तर कधी मनातील विचारांच्या जाळ्यातून सुटका करुन घेण्याचे आवाहन करतो. समुद्र तुमच्या आत्म्याशी संवाद साधतो तेव्हा त्याचा मृदुपणा तुम्हाला त्याच्या बाहुपाशात घट्ट लपेटून घेतो....अथांग समुद्र...आपला एक सांगाती...
- केट चॉपिन द अवेकनिंगमधे..

अभिजीत अवलिया's picture

26 Jun 2016 - 5:39 pm | अभिजीत अवलिया

मस्त लिहिलेय ...

लेख वाचतांना तुमचं हळुवार मन आणि सौंदर्यदृष्टी सतत जाणवत राहते.
हा लेख तुमच्या "स्व" च्या सर्वात जवळ जातो.

तुषार काळभोर's picture

26 Jun 2016 - 7:02 pm | तुषार काळभोर

अप्रतिम फोटो व लेख!

अनिवासि's picture

1 Jul 2016 - 10:07 pm | अनिवासि

मस्त लेख -- त्याहून masta फोटो . वर सर्वानी लिहिले आहे त्याशिवाय अधिक काय लिहिणार.
समुद्रकाठी रिटायर होऊन राहायला आवडेल!
धन्यवाद.