ड्रॅगन....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Jun 2016 - 3:36 pm

मित्रांनो,

ही गोष्ट चीनमधील किअांग्सू प्रांतातल्या हुआई गावच्या वू चेंगने लिहिली. त्याचा काळ कुठला होता हे ठामपणे सांगता येत नाही, पण साधारणत: १५०५ ते १५८० दरम्यान हा होऊन गेला असावा. तो त्या काळातील एक बर्‍यापैकी प्रसिध्द कवी आणि लेखक होता. मींग राजदरबाराच्या बखरीत त्याचा आणि त्याच्या काही काव्यांचा उल्लेख सापडतो.

या महाकाव्याचा किंवा महाकादंबरीचा विषय ह्युएन्संगाची भारतातील यात्रा हा आहे. ही व्यक्ती अर्थातच काल्पनिक नसून खरी आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून इतिहासात प्रसिध्दी पावलेला प्रवासी हयुएन्संगच आहे. तो ७ व्या शतकात होऊन गेला. त्याच्या हिंदुस्थानातील प्रवासाविषयी त्यावेळच्या इतिहासकारांनी भरपूर लिहून ठेवलेले आढळते. हा प्रवास त्याने हिंदुस्थानातील बौध्द धर्माचे पवित्र ग्रंथ चीनमधे आणण्यासाठी केला होता. दहाव्या शतकापर्यंत ह्युएन्संगाच्या हिंदुस्थान यात्रेसंबधित अनेक दंतकथा प्रचलित झाल्या. तेराव्या शतकात या दंतकथांवर चीनी रंगभूमीवर अनेक नाटके येऊन गेली. मला वाटते, अजूनही चीनच्या सांस्कृतिक इतिहासात ही कथा आणि यावरची नाटके यांचा सहभाग लक्षणीय आहे. या सगळ्यामुळे वू चेंगला ही कथा लिहिताना भरपूर साहित्य उपलब्ध होते.

या गोष्टीला अर्थाचे अनेक पापुद्रे आहेत. एक एक उलगडला की त्याच्या खालचा आपल्याला त्याच्या अर्थासाठी खुणावत असतो. तसेच ही गोष्ट करमणुकीसाठी, प्रवासवर्णानासाठी, कल्पनारम्यतेसाठी, तत्वज्ञान यासाठीही वाचली जाऊ शकते. मुख्य गोष्टीमधे माकड आणि त्याचे पालक ह्युएनसंग, शालुका आणि वराहाला ज्या ऐक्याऐंशी संकटातून जावे लागले त्याचे वर्णन आहे.

या गोष्टीतील सर्वच पात्रे प्रतिकात्मक आहेत. उदा.
हयुएनसंग - मानवाचे सगळे गुण दुगद्दुण यात आपल्याला दिसतात. निणद्दय घेण्याची क्षमता नसणे. सतत गोंधळलेल्या अवस्थेत असणे इ.
माकड - मन, बुध्दी, शौर्य, ताकद. या सगद्धया गोष्टी आपल्या ताब्यात ठेवायच्या असतात.
वराह - भूक, स्वार्थ, हव्यास, हावरटपणा, भौतिक सुखांच्या मागे लागणे इ.
शालूका - सहनशीलता, सोशिक, वाट पाहणारा.
ताओ त्झू - शारीरिक अमरत्व प्राप्त करु शकणारा ताओमुनी.
बुध्द - गौतमी बुध्द. जो कोणी बुध्दाची अध्यात्मिक पातळी गाठू शकेल त्यालाही या नावाने ओळखले जाऊ शकते.
कुआन-यीन - बोधीसत्व. दयेची देवता. जो कोणी हिला हाका मारेल, त्याला दया दाखवते.

हे लक्षात घेतले तर हे पुस्तक वाचण्यास जास्त गंमत येइल हे निश्चित !

मी लिहिलेल्या "मर्कटलिलामृत'' (इंग्रजीमधील मंकी नावाच्या पुस्तकाचा स्वैर अनुवाद) नावाच्या पुस्तकात हे मनोगत आहे.

पण मी लिहिलेल्या वरील पुस्तकातील खालील प्रकरण मी येथे टाकले आहे याचे कारण वेगळे आहे. इन्सेप्शन चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. त्यातील स्वप्नात जाऊन कारवाया करण्याची कल्पना मुळ या पुस्तकात आहे असे मला वाटते. अनेक चित्रपटात यातील कल्पना उचलल्या आहेत. उदा. लॉर्ड ऑफ द रिंग मधील काही दृष्ये. हॅरी पॉटर मधील काही कल्पना...
माझे हे पुस्तक लिहून झाले आहे. बघू कधी प्रकाशित होते ते.....

ड्रॅगन...
त्सुअॅान झँगने त्याच्या अध्यात्म्याच्या अभ्यासात काय प्रगती केली हे न बघता, चँगअॅनला जी नदी वळसा घालून जाते त्या नदीच्या काठी दोन हुशार माणसांच्या काय गप्पा चालल्यात ते बघूया. ही माणसे जरी दरबाराच्या कुठल्याही परीक्षेला बसलेली नसली तरी ते अनुभवामुळे जात्याच हुशार होते, ही हुशारी आपल्याला खेडयातील माणसांमधे बघायला मिळते.

एकाचे नाव होते झँग शाओ. तो जातीने कोळी होता आणि जो दुसरा होता त्याचे नाव होते, लि डींग. तो एक लाकूडतोडया होता.

त्या दिवशी झँग शाओने आपली मासळी बाजारात विकली आणि लि डींगने आपली लाकडे बाजारात विकली आणि निवांतपणे ते बाजारात एका गुत्यात मद्य पीत बसले होते. त्या मद्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केल्यावर त्यांनी आपले मद्यपान आवरते घेतले आणि दारुच्या बाटल्या हातात घेऊन ते तसेच नदीच्या काठाने घरी निघाले. एका चौकात त्यांचे रस्ते वेगळे होणार त्याठिकाणी ते परत गप्पा मारायला थांबले.

झँग म्हणाला,
‘मित्रा, माणसे प्रसिध्दीसाठी एवढे हपापलेली असतात की त्यासाठी ते प्राण पणाला लावायला मागे पुढे बघत नाहीत, संपत्तीसाठी माणसे मृत्यूमुखी पडतात. ज्या लोकांना मानमरातब मिळतो त्यांना तो टिकवण्यासाठी तर मरमर मरावे लागते. ज्यांना राजाच्या दरबारात गौरवले जाते, त्यांचे हाल तर विचारुच नकोस ! त्यापेक्षा आपण बरे. आपल्या निळ्याशार पाण्यावर आणि डोंगरावर आपण खरोखरंच सुखी म्हणायचे.''

‘खरे आहे. पण माझ्या डोंगरापुढे तुझे हे पाणी काहीच नाही.’ लि डिंगने उत्तर दिले.

‘माझ्या पाण्यावरची ही कविता ऐक म्हणजे तुला मी काय म्हणतो आहे ते पटेल.’ झँग म्हणाला.

‘कवितेचे नाव आहे ‘फुलपाखरांचे फुलावरचे प्रेम’. ऐक !

माझी होडी लहानशी असेल
या विशाल सागरापुढे,
मी शांतपणे माझ्या शिडाच्या काठीला टेकतो,
ऐकत समुद्रदेवतेचे गाणे सुंदर !
माझे विचार पाण्याइतकेच स्वच्छ आहेत,
प्रसिध्दी आणि संपत्ती माझ्यापासून दूर आहेत.
मोजत समुद्रपक्षी मी करतो सफर आनंदाने,
काठावर वाळूत माझी सखी आणि मुले माझ्याबरोबर
बागडतात आणि हसतात.
मी झोपल्याक्षणी लाटा आणि समुद्री वारे
बंद करतात आवाज वादळी,
नाही प्रतिष्ठा, नाही लांछन, नाही काळजी.

‘तुझ्या पाण्याला माझ्या डोंगराची कशी सर येणार ? पुरावा म्हणून हे गाणे ऐक !

पाण्याने भरलेले ढग ज्यावर उतरलेत,
त्या डोंगरावर झाडांचा मोहोर बहरतो.
बासरी म्हणून ऐकावे तर
असते पक्षांचे गाणे.
हिरव्या रंगात घनदाट,
ऊबदार लाल वसंतऋतूत.
ग्रीष्म संपून हिवाळा आणतो
चंदनाचा घमघमाट, वाढवित माझा आनंद.
क्रूर पानगळ खुडते सौंदर्य,
या ऋतूचक्रातही मी असतो आनंदी,
कोणी नाही माझ्या, आणि मी कोणाच्या
अध्यात ना मध्यात !

एकामेकांना कोपरखळ्या मारत त्यांनी कविता म्हटल्या. अखेरीस निरोप घ्यायची वेळ झाली.

‘जंगलातून जाताना काळजी घ्या ! नाही, वाघ बीघ असतात. उद्या याच रस्त्यावरुन एकटेच चालायची वेळ येऊ नये म्हणून म्हटले ! झँग शाओ गमतीने म्हणाला.

हे ऐकून लि डिंगला राग आला. ‘मी मरावे अशी तुमची इच्छा आहे की काय ? आणि तुम्हीही काळजी घ्या. पाण्यात होडी उलटून बुडायला काय वेळ !’ लि डिंगने रागावून जवळ जवळ शापच दिला.

‘नशिबात जसे असेल तसे होईल. पण माझ्या बाबतीत तसे होण्याची शक्यता कमी आहे. मी बुडून मरणे तर शक्यच नाही.’ झँगने उत्तर दिले.

‘जीवन मृत्यू हे काही आपल्या हातात नसतात. तुम्ही असे कसे म्हणू शकता की तुम्हाला अपघात होणारच नाही ?’ लि डिंगने आश्चर्याने विचारले.

‘मित्रा, तू काहीही म्हणालास तरी ती अनिश्चितता तुझ्या बाबतीत खरी असेल, पण माझ्याबाबतीत मात्र तसे होणार नाही याची मला खात्री आहे.’ झँगने हसत उत्तर दिले.

‘अरेच्चा ! समुद्रात तर धोकेच जास्त असतात तरीपण तुम्ही असे म्हणता म्हणजे कमालच आहे’ लि डिंग गोंधळून म्हणाला.

‘त्याचे रहस्य तुम्हाला माहीत नाही. मी दररोज चँगअॅुनच्या पश्चिमेच्या वेशीवरच्या एका ज्योतिषाला एक वाम दिली, की तो मला दुसर्‍या दिवशी नदीच्या कुठल्या भागात जास्त मासळी मिळेल हे सांगतो. आत्तापर्यंत शंभरात तो एकदाही चुकलेला नाही. आज त्याने मला नदीच्या पश्चिम किनार्‍यावर जाळी टाकायला सांगितली आहेत. मला खात्री आहे, नेहमीप्रमाणे मला आज पण भरपूर मासळी मिळेल. ती विकून उद्या आपण गुत्यावर त्या पैशाने दारु प्यायल्यावर हा विषय संपवू. काय ? आहे मान्य ?’ झँग म्हणाला.

पण म्हणतात ना रस्त्यावर हळू बोलले तरी शेजारच्या गवतात ऐकू जाते. नदीच्या काठाकाठाने, पण पाण्यातून गस्त घालणार्या यक्षाला हे ऐकू गेले आणि त्याने त्वरित ड्रॅगनराजाला याचा अहवाल दिला.

"जर त्या ज्योतिषाचे भविष्य शंभर टद्वके खरे ठरत असेल तर, महाराज आपल्या सृष्टीचा निर्वंश फार दूर नाही हे आपल्या लक्षात येते आहे का ?"

ड्रॅगनराजाला ताबडतोब या घटनेचे गांभीर्य लक्षात आले. त्या ज्योतिषाचा ताबडतोब वध करावा असे त्याचे मत पडले. पण त्याच्या राणीने, मुलांनी, कासवांनी, देवमाशांनी त्याची समजूत काढली.

‘महाराज अगोदर हे खरे आहे का हे तरी तपासून घेऊया. तुम्ही जर असेच तातडीने तिकडे गेलात तर पावसाळी ढगांना तुमच्या मागे येण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. असे झाले तर चँगअॅनन वर पाऊस पडणार नाही. त्यांच्या हालाला सीमा राहणार नाही. सर्व नागरिक देवांना देवळात कोंडतील आणि प्रार्थनेतून आपल्याविरुध्द स्वर्गाकडे गार्‍हाणे मांडतील. स्वर्गाला मग यात हस्तक्षेप करणे भाग पडेल. त्यापेक्षा आपण आपली जादूची शक्ती वापरुन, रुप बदलून, त्याची परीक्षा घ्या. जर आपल्याला वाटले तो दोषी आहे, तर त्याला तुम्ही जागेवरच शिक्षा द्या, तसे न झाल्यास एका निरपराध माणसाचा जीव तरी वाचेल.’

मंत्रीमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे ड्रॅगनराजा चँगअॅनच्या पश्चिम वेशीवर आपले रुप बदलून आला. त्याला त्या चौकात एका माणसाभोवती बरीच गर्दी जमलेली दिसली. त्या गर्दीतून मार्ग काढत ते त्या माणसाच्या जवळ पोहोचले. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी त्याला आजच्या हवामानाबट्टल विचारले. विशेषत: पावसाबद्दल. ज्योतिषाने मंत्र म्हणून त्यांच्या हातात एक कागद दिला. त्यावर लिहिले होते ‡

डोंगरांनी ढग आडवले आहेत,
धुक्यात झाडांची मस्तके,
जर पाऊस असेल येणार तर
उद्याच त्याची वाट आहे !

‘जर उद्या पाऊस येणार असेल तर तो केव्हा येणार आणि किती ? ड्रॅगनराजाने विचारले.

‘उद्या सकाळच्या पहिल्या प्रहरी ढग जमतील, आणि सकाळच्या उत्तर प्रहरी विजांच्या कडकडाटासहीत वादळ सुटेल आणि दुपारी पाऊस कोसळेल.’ ज्योतिषाने सांगितले.

‘ड्रॅगनराजा मोठयाने हसत म्हणाला "बरं ! तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर झाले, तर मी तुम्हाला सोन्याच्या ५० मोहरा बक्षीस देईन. पण तसे जर झाले नाही तर भोळ्याभाबडया जनतेला फसवले म्हणून मी तुझे हे भविष्याचे दुकान उध्वस्त करेन आणि तुला या शहरातून हाकलून देईन."

‘तुम्हाला काय अटी घालायच्या आहेत त्या घाला. आता आपण जाऊ शकता. आपण उद्या पाऊस पडल्यावरच भेटू.’ ज्योतिषाने रागावून उत्तर दिले.

त्याच्या त्या अती आत्मविश्वासाने अस्वस्थ झालेला ड्रॅगन आपल्या पाण्यात परतला. त्याचे मंत्री त्याच्याकडे बघत हसून म्हणाले,

‘महाराज आपण या प्रदेशातल्या आठ नद्यांचे सार्वभौम राजे आहात. या विभागातले सर्व वरुण आपल्या हाताखाली काम करतात. चँगआनवर पाऊस पाडायचा का नाही हे आपणच ठरवणार. असल्या ढोंगी ज्योतिषाचे आपण एवढे काय मनावर घेता ?’

त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि ड्रॅगनसाठी आदेश ऐकू आला. सर्वांनी वरती बघितले तर त्यांना आकाशात एक सुवर्णाचा पोषाख परिधान केलेला स्वर्गदूत दिसला. ड्रॅगनराजाने घाईघाईने धूप पेटवला आणि स्वत:ला नीटनेटके केले. जेव्हा त्याच्या हातात तो हुकूम पडला तेव्हा तो स्वर्गाचा राजा मर्झूक यांचा होता हे कळले. त्यात ड्रॅगनराजाला उद्या दुपारी चँगआन वर, असलेली सर्व वीज घेऊन कडकडाटासह मुसळधार पाऊस पाडण्याची आज्ञा होती. खाली वेळ, काळ, इत्यादीचे सविस्तर स्पष्टीकरण दिले होते, ते त्या ज्योतिषाच्या भाकीताशी बरोबर जुळत होते.

ड्रॅगनला ते वाचून धक्काच बसला. माझ्या स्वप्नातही असे कधी होईल असे वाटले नव्हते. या मर्त्य जगात भविष्याचा वेध घेणारा असा जादूगार असणे म्हणजे त्याने स्वर्ग आणि पृथ्वीवर विजय मिळवला आहे, असेच म्हणावे लागेल. त्याच्यावर विजय मिळवणे अशक्यप्रायच आहे.

सेनापती देवमासा म्हणाला,
‘महाराज कृपा करुन आपण शांत व्हा. त्याचा पराभव करणे एवढे काही अवघड नाही. मी तुम्हाला त्याची युक्ती सांगतो. पाऊस पाडण्याच्या वेळेत थोडासा बदल केला की झाले. मग त्याचे भविष्य खोटे ठरल्यात जमा होईल. हाकलून द्या मग त्याला. फार सोपे आहे सगळे.’

दुसर्‍या दिवशी, ड्रॅगनने त्याच्या वारा आणि विजांच्या सेनापतींना बोलावले. पाऊस घालणार्‍या मुलांना, आणि त्यांना घेऊन तो चँगआन वर गेला. ज्योतिषाने सांगितलेली वेळ टळून गेल्यावर त्याने काळे ढग आणले, विजेचा कडकडाट केला, वार्‍याला वादळ आणायला सांगितले आणि पाऊस पाडला. पण तोही थोडासाच. अशारितीने त्याने त्याचे भविष्य चुकेल अशी व्यवस्था केली. हे सगळे झाल्यावर त्याने परत आपले रुप बदलले आणि तो त्या ज्योतिषाच्या समोर उभा राहिला. गेल्या गेल्या त्याला बोलण्याची अजिबात संधी न देता त्याने त्याचे कार्यालय पाडायला सुरवात केली.

ज्योतिषी आपला शांतपणे हे सर्व बघत उभा होता. त्याच्या चेहर्‍यावर कसलेच भाव नव्हते. अधिकच चिडून ड्रॅगनने तेथील एक तुळई उचलली आणि त्या ज्योतिषाला शिव्या देत तो त्याच्यावर चालून गेला. ‘हलकटा, इतके दिवस तू चँगआनमधल्या गरीब, भोळ्याभाबडया जनतेला फसवत आलास त्याचे हे प्रायश्चित्त ! तू सगळ्यांना फसवू शकतोस पण मला नाही. तुझे पावसाचे सर्व भाकीत चुकलेले आहे. वेळ आणि तो किती पडेल हे तर तू फारच चुकीचे सांगितले आहेस. असे असताना या जगाचा भाग्यविधाता असल्यासारखे येथे बसताना तुला लाज कशी वाटत नाही ? याक्षणी येथून चालता हो नाहीतर मला तुला ठार मारावे लागेल.’

याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही, उलट त्याने त्याचे हात डोक्यामागे नेले, आरामात तक्याला टेकला आणि खो खो हसायला लागला. ‘मला तुझी अजिबात भीती वाटत नाही. हा मर्त्य गुन्हा, तुझ्या हातून घडला आहे माझ्या हातून नाही. मला तू कोण आहेस हे पर्ण माहीत आहे. तू चींग नदीचा ड्रॅगन, रुप बदलून आला आहेस आणि स्वर्गाच्या राजाची आज्ञा तंतोतंत न पाळून तू त्यांचा उपमर्द केला आहेस. ड्रॅगनांचा शिरच्छेद करण्यासाठी वेगळी तक्तपोशी तयार केली गेली आहे. मला वाटते तुला तेथेच जावे लागेल. असे असूनसुध्दा तू येथे येऊन मलाच दमदाटी करतोस ! व्वा !’

हे ऐकून ड्रॅगनचे खवले अंगावर ताठ उभे राहिले. थरथर कापत त्याने त्या ज्योतिषाच्या समोर लोटांगण घातले आणि म्हणाला, ‘महाराज क्षमा करा. माझे बोलणे एवढे मनावर घेऊ नका. माझी ही चेष्टामस्करी वरती एवढी गांभीर्याने घेतली जाईल याची मला खरोखरच कल्पना नव्हती. मला मदत करा महाराज ! मी मेलो तर माझे भूत तुमच्या मानगुटीवर बसेल आणि तुम्हाला कधीच शांतता लाभणार नाही.’

‘मी आता याच्यात काहीच करु शकत नाही. पण तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर एक मार्ग आहे. तुझा शिरच्छेद उद्या दुपारी मंत्री ‘वी चेंग’ यांच्या हातून होणार आहे. तू आत्ता ताबडतोब टँग सम्राटांकडे जा. वी चेंग त्यांचाच मंत्री आहे. सम्राटांनीच जर वी चेंगपाशी तुझी रद्दबदली केली तरच काहीतरी होऊ शकेल.’

ड्रॅगन डोळ्यातील अश्रू पुसत तेथून बाहेर पडला. त्या रात्री उंदीरवेळेला राजा त्याच्या स्वप्नात, बहरलेल्या झाडांच्या बागेत चंद्रप्रकाशात फेरफटका मारायला बाहेर पडला. अचानक त्याच्या पायाशी कोणीतरी लोळण घेतली.

‘वाचवा !महाराज मला अभय द्या !’

‘तू कोण आहेस? माझ्या चरणाशी आलेल्याला मी नेहमीच अभय देतो. काय झाले ?’

‘महाराज आपणच खरे थोर ड्रॅगन आहात. आम्ही नुसते नावालाच ड्रॅगन. माझ्या हातून स्वर्गाची अवज्ञा झाली आहे. आणि माझा, उद्याच आपले मंत्री वी चेंग यांच्या हातून शिरच्छेद होणार आहे. तशी आज्ञाच झाली आहे. माझा जीव वाचवा !’

‘हंऽऽऽ वी चेंगच जर तुझा वध करणार असेल तर काहीतरी करता येईल. काळजी करु नकोस.’ ड्रॅगनने परत परत सम्राटांचे आभार मानले आणि तो तेथून चालता झाला.

दुसर्‍या दिवशी दरबारात हजर असलेल्या मंत्र्यांवर नजर फिरवताना टँग राजाच्या लक्षात आले की वी चेंग दरबारात हजर नाही. जेव्हा त्याच्या वरिष्ठ मंत्र्याला ही हकीकत कळली तेव्हा तो म्हणाला, ‘महाराज जर आपल्याला आपले वचन पाळायचे असेल तर वी चँगला ताबडतोब बोलावून घ्या आणि आज दिवसभर त्याला डोळ्यासमोर ठेवा. कदाचित ड्रॅगनचे प्राण वाचू शकतील. दुसरा मार्गही दिसत नाही.’

इकडे वी चँग, रात्री त्याच्या घरी गच्चीवर धूप पेटवून, आकाशाचे निरीक्षण करत होता. तेवढयात त्याला उंचावर एका करकोचाचे दर्शन झाले. या वेळी करकोचे ओरडत नसतात पण हा ओरडत होता. त्याच क्षणी तेथे एक देवदूत अवतीर्ण झाला. त्याने स्वर्गसम्राटाचा हुकूम आणला होता की वी चँगने त्याच्या स्वप्नात उद्या दुपारपर्यंत चिंग नदीच्या ड्रॅगनचा वध करायचा आहे. वी चँगने त्यासाठी तयारी चालू केली. त्याने शुचिर्भुत होऊन धूप पेटवला आणि मनाच्या शक्तीची धार तल्लख केली आणि दरबारात जाण्याचा बेत रद्द केला. टँगराजाचा दूत जेव्हा त्याला बोलवायला आला तेव्हा त्याला त्याचे ते बोलावणे नाकारायचे धाडस झाले नाही. त्याने घाईघाईने कपडे केले आणि तो दरबारात दाखल झाला. आल्या आल्या त्याने दरबारातील गैरहजेरीसाठी सम्राटांची क्षमा मागितली.

‘माझी त्याबट्टल काहीच तक्रार नाही. चला आपण जरा बुध्दीबळ खेळूया’ सम्राट म्हणाले.

खेळ चालू झाल्यावर दुपारच्या थोडे अगोदर वी चँगची मान अकस्मात एका बाजूला कलली आणि तो घोरायला लागला. त्याला गाढ झोपच लागली होती.

‘त्यांना उठवू नका. एवढयामोठया राज्याची धुरा वाहताना दमून गेला आहे बिचारा तो.’ महाराज खूष होऊन म्हणाले.
जेव्हा वी चँगला जाग आली तेव्हा त्याला स्वत:ला महालात झोपलेला बघून तो हादरलाच. महाराजांच्या पायाशी लोळण घेऊन त्याने त्यांची माफी मागितली. ‘मला हजार मृत्यूदंडांची शिक्षाच योग्य आहे. अशी कशी झोप लागली मला ! असे कसे झाले समजत नाही. माझ्या या उध्दट वागण्यासाठी महाराज, क्षमा करा.’

‘ऊठ ! महाराज त्याला उठवत म्हणाले. तुझ्या हातून एवढा काही मोठा गुन्हा घडलेला नाही. पहिल्या डावाच्या सगळ्या सोंगटया पटावरुन बाजूला करुन त्यांनी वी चँगला अजून एका डावाचे निमंत्रण दिले. सोंगटया लावत असतानाच महाराजांच्या सैन्यातील दोन अधिकारी धावत पळत दरबारात शिरले. त्यांच्या हातात ड्रॅगनचे धडावेगळे शीर होते आणि त्यातून रक्त ठिबकत होते. महाराजांच्या समोर शीर ठेवून ते म्हणाले, ‘महाराज आम्ही समुद्राची पातळी घटलेली आणि नद्या कोरडया पडलेल्या ऐकल्या आहेत पण हे असले आम्ही कधी बघितले नव्हते.’

‘कुठून आले हे?’ दोघांच्या तोंडातून एकदमच हा प्रश्न बाहेर पडला.

‘हजार पायर्‍यांच्या गृहाच्या दक्षिणेला चौकाच्या येथे हे आकाशातून पडले.’

‘याचा अर्थ काय ?’ महाराजांनी वी चँगला विचारले.

‘ज्या ड्रॅगनचा मी आत्ता स्वप्नात शिरच्छेद केला, त्याचे हे शीर आहे वी चँगने नम्रपणे उत्तर दिले.

‘पण तुम्ही आत्ता झोपला होतात तेव्हा तुम्ही हाताची किंवा पायाची कसलीही हालचाल केली नाही. तुमच्याकडे तर तलवारही नव्हती, मग कसे काय शक्य आहे हे...... ?’ महाराजांनी आश्चर्याने विचारले.

या सगळ्या प्रकाराने राजा दु:खी झाला. एकतर त्याने ड्रॅगनला अभय दिले होते आणि तो त्याला वाचवू शकला नव्हता. शेवटी स्वत:ला सावरुन त्याने ते शीर चँगआनच्या बाजारपेठेत भाल्याच्या टोकावर खोचून ठेवायला सांगितले. संध्याकाळी महालात परतल्यावरसुध्दा त्याचे मन त्याला खात होते. शेवटी तो आजारी पडण्याची चिन्हे दिसायला लागली.

रात्रीच्या दुसर्या प्रहरी त्याला बागेतून हुंदक्याचा आवाज ऐकू आला आणि राजाची झोपच उडाली. तेवढयात त्याला ड्रॅगन त्याचे स्वत:चे शीर हातात घेऊन त्याच्यासमोर दिसला. ते शीर मोठमोठयाने किंचाळत होते, ‘माझा प्राण मला परत द्या ! काल तुम्ही मला वाचवणार असे वचन दिले होते. तरीपण तुम्ही तुमच्या सरदाराला माझा शिरच्छेद करायला पाठवले. कुठे फेडाल हे पाप ? मी तुमची तक्रार यमाकडे करेन.’ असे म्हणून त्याने आपले हात राजाच्या गळ्याभोवती आवळले आणि तो त्याचा गळा दाबू लागला. राजाने त्याच्या हातातून सुटण्याची धडपड चालू केली. मदतीसाठी तो जोरात ओरडला, किंचाळला, पण त्याच्या घशातून आवाजच उमटला नाही. त्या धडपडीमुळे त्याला दरदरुन घाम फुटला.

जेव्हा यातून तो जागा झाला तेव्हा ते पिशाच्च अदृष्य झाले होते. ते बघताच राजा जोरजोराने ओरडू लागला भूत ! भूत ! त्या रात्री मग ना त्याचा डोळा लागला ना त्याच्या राण्यांचा, ना त्याच्या रखेल्यांचा !. दुसर्‍या दिवशी त्याला दरबारात सर्व मंत्रीगण राजाची वाट बघत थांबले पण राजा आलाच नाही. शेवटी महालातून दुपारी निरोप आला की राजाची तब्येत बरी नसल्यामुळे आज ते दरबारात येऊ शकणार नाहीत आणि आजचा दरबार रद्द झाला आहे.

सगळीकडे बातमी पसरली की राजवैद्यांना राजमहालावर बोलावण्यात आले आहे. जेव्हा राजवैद्य महालाबाहेर पडले तेव्हा मंत्रीगण त्यांची वाट बघत बाहेरच थांबले होते. त्यांनी राजाला काय झाले आहे असे विचारल्यावर ते म्हणाले त्यांची नाडी अनियमित चालत आहे. ‘कधी तिचा ठोका चुकतो तर कधी ते जलद गतीने पडतात. त्या गुंगीत ते भूत बघितले असे काहीतरी पुटपुटताएत. प्रत्येक दहा ठोक्यानंतर एक चुकतो आहे. पंचेंद्रीयांमधे काही जीव आहे असे वाटत नाही. मला वाटते सात एक दिवसात परिस्थिती हाताबाहेर जाईल.’

त्यांचे हे बोलणे ऐकून तेथे एकच गोंधळ माजला. सगळ्यांची गाळण उडाली. या गोंधळातच महालातून मंत्री सु माओ कुंग यांना इतर मत्र्यांना घेऊन महाराजांच्या शयनगृहात जमायचा निरोप आला.

सर्व मंत्री जमल्यावर महाराजांनी दृढ पण शांत आवाजात बोलायला सुरवात केली,

‘माझ्या विश्वासू मंत्र्यांनो आणि आधिकार्‍यांनो, वयाच्या १९व्या वर्षापासून मी चहूदिशेला घनघोर लढाया करतोय पण एवढया वर्षात मला कधीही भुताखेतांनी त्रास दिला नाही. मग आत्ताच मला भुते का दिसायला लागली आहेत, हे मला कळत नाही.’

‘तुमच्या या लढायांमधे आपल्या हातून हजारो माणसे मारली गेली आहेत, मग आता आपल्याला भुताखेतांची भीती वाटायचे कारण काय ? वि चीह नावाच्या मंत्र्यांनी विचारले.

‘माझ्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका, रात्र जशी जशी जवळ येत जाते तसे तसे मला बाहेरच्या आणि वरच्या फरश्यांवर जोराने काहीतरी आपटल्याचा आवाज येतो आणि ती भुते इतकी तारस्वरात किंचाळतात, की त्या आवाजाने माझ्या छातीत धडकी भरते. दिवसा मला याचे काही वाटले नसते पण शांत आणि काळोख्या रात्री तो आवाज सहन करणे अशक्य आहे.’ महाराज म्हणाले.

‘महाराज आपण बिलकुल काळजी करु नका. मी आणि हु चिंग आज इथेच दाराबाहेर पहार्‍याला थांबतो. बघूया तरी कोणती भुते आहेत ती ! चीन शू पाओ नावाचा मंत्री आवेशाने म्हणाला.

त्यांच्या विनंतीचा स्वीकार करण्यात आला आणि त्या दोन शूर सरदारांनी आपला लढाईचा वेष परिधान करुन महालाबाहेर रखवालदाराच्या जागा घेतल्या. पहाट झाली पण भुते काही आली नाहीत. राजाला रात्रभर शांत झोप लागल्यामुळे खूष होऊन त्याने या दोन मंत्र्यांना खास बक्षीस जाहीर केले. मग पुढचे काही दिवस हाच उपक्रम राबवण्यात आला. पण या सगळ्या प्रकारात राजाच्या अन्नग्रहणात जो फरक पडला त्यामुळे त्याची प्रकृती ढासळतच गेली. शेवटी राजाने त्या दोन मंत्र्यांना बोलावणे पाठवले आणि त्यांना सांगितले की त्यांना आता अधिक त्रास देण्यात अर्थ नाही. मी एका हुशार मूर्तीकाराला बोलावतो. तो तुमच्या दोघांच्या हुबेहूब मूर्ती तयार करेल, त्याच आपण तुमच्या जागेवर ठेवू. बघूया काय होते ते. त्याप्रमाणे त्या दोघांच्या मूर्ती करुन त्यांच्या जागी ठेवण्यात आल्या. त्या रात्री भूतांचा काहीच त्रास झाला नाही. बर्‍याच रात्री शांततेत गेल्यावर मात्र एका रात्री मागच्या सारखाच आवाज आला पण मागच्या दरवाजाच्या बाजूने.

‘आपण पुढच्या दरवाजाची काळजी घेतली. आता वी चँगला बोलावून घेऊ आणि त्याला मागच्या दरवाजाच्या राखणीस उभे करु ते दोघे म्हणाले.

त्या रात्री वी चँग आपली हत्यारे आणि चिलखते परिधान करुन मागच्या दरवाजाच्या राखणीस उभा राहिला. रात्रभर काहीच झाले नाही पण सकाळी महाराजांची तब्येत अधिकच ढासळली. आता आपले अखेरचे दिवस जवळ आल्याचे जाणून त्यांनी आपल्या सर्व सरदारांना आणि मंत्र्यांना बोलावून घेतले. स्वत: राजाने त्यांच्या नंतर काय काय करायचे त्याच्या सूचना केल्या. राजपुत्र ‘चू’ ला वारस नेमण्यात आले. तेवढयात वी चँग राजाच्या शय्येपाशी आला आणि त्यांच्या कानात पुटपुटला,

‘महाराज तुम्ही काळजी करु नका. माझ्याकडे एक योजना आहे जी तुम्हाला अजून अनेक वर्षे जिवंत ठेवेल.’

‘माझे आजारपण आता माझ्या हाडात मुरले आहे. माझे मरण अटळ आहे. तू एवढया खात्रीने कसे बोलू शकतोस ?’ महाराज निराशेने म्हणाले.

‘माझ्याकडे एक पत्र आहे. हे पत्र घेऊन तुम्ही यमाच्या दरबारात जा. हे पत्र मी त्सु चीओ यांना लिहिले आहे. हे सद्गृहस्थ यमाच्या दरबारात फार मोठया हुद्द्या वर आहेत.’

‘मी तर त्यांचे नाव कधीच ऐकले नाही.’

‘आपल्या राज्याच्या संस्थापकांच्या वेळी तो त्यांच्या दरबारात धर्मविधीमंत्री होता. त्याला आणि त्याच्या ज्ञानाला फार मोठा मान होता. मेल्यावर त्याला यमाच्या दरबारात चित्रगुप्ताचा हुद्दा मिळाला आहे. ते माझ्या स्वप्नात नेहमी येतात. माझी पत्राद्वारे केलेली विनंती ते निश्चितच धुडकावणार नाहीत. मला खात्री आहे ते तुम्हाला परत पाठवतील. राजाने ते पत्र घेतले आणि आपल्या बाहीत खोचून ठेवले. त्यानंतर मात्र त्याचे डोळे बारीक झाले, श्वास मंद झाला, आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राण्यांनी, रखेल्यांनी मुलांनी, मुलींनी, सरदारांनी, मंत्र्यांनी एकच आक्रोश केला. त्याचे मृत शरीर महालाच्या एका मोठया सभागृहात दर्शनासाठी ठेवण्यात आले.

....टँगचा राजा परत जिवंत कसा झाला हे तुम्हाला माहीत करुन घ्यायचे असेल तर तुम्हाला पुढच्या भागाचे वाचन करायला लागेल......

जयंत कुलकर्णी.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Jun 2016 - 4:26 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

अभ्या..'s picture

12 Jun 2016 - 4:50 pm | अभ्या..

जबरदस्त.
मात्र पूर्ण लक्ष देउन वाचावी लागतीय कथा. अगदी प्रत्येक डिटेलसहित. कारण एकतर चिनी नावे लक्षात राहत नाहीत आणी उपकथानकांची इतकी मस्त एकातून एक वीण उलगडत चाललीय की बस्स.
येउद्या जयंतराव.

पीशिम्पी's picture

14 Jun 2016 - 3:17 pm | पीशिम्पी

पण पुढचा भाग कदी ??

सस्नेह's picture

14 Jun 2016 - 3:41 pm | सस्नेह

चांदोबातली गोष्ट वाचली खूप वर्षांनी !!

नाखु's picture

14 Jun 2016 - 5:16 pm | नाखु

अश्या गोष्टी चांदोबात हमखास असत आणि त्याची बहारदार चित्रे अगदी अक्राळ विक्राळ रुपात.

चांदोबा-किशोर-विचित्र विश्व वाचक नाखु