'चार नगरांतले माझे विश्व' - जयंत विष्णु नारळीकर

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
6 Jun 2016 - 8:27 pm

(मी कधी कोणत्या पुस्तकाचे समीक्षण लिहिले नाही आहे. हा पहिलाच प्रयत्न आहे. आजच हे पुस्तक वाचून संपवले. ते मला खूप भावले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटले, म्हणुन लिहायचा प्रयत्न करतेय. पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे. मी मला जितकं झेपेल तितकंच लिहू शकेन. बघा जमलंय का?)

एखादे पुस्तक एकदा वाचले की पुरेसे ठरते तर एखादे पुस्तक पुन्हा एकदा अभ्यासपूर्वक वाचावेसे वाटते.

जयंत विष्णु नारळीकर यांचे आत्मचरित्र 'चार नगरांतले माझे विश्व' हे एकदा वाचून पुरेसे ठरत नाही. ह्या पुस्तकासाठी त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हे ५३३ पानांचे जाडजूड पुस्तक लेखकाचे जीवन आपल्यापुढे उलगडून ठेवते. बरं! लेखक तरी कोण? जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ! त्यामुळे ह्या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्यांचे वैज्ञानिक संशोधन आहे. घरगुती प्रसंगाचा उल्लेख कालानुरूप व प्रसंगानुरूप जितका यावयास हवा तितका येतो. त्यांचा जीवन प्रवास ज्या चार नगरांतून झाला ती नगरे म्हणजे बनारस, केम्ब्रिज, मुंबई आणि पुणे. पुस्तक ह्या चार भागात विभागले आहे पण अखंडित आहे.

जयंत विष्णु नारळीकर - जन्म १९ जुलै १९३८

मूळचे ते कोल्हापूरचे. एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित, मध्यमवर्गीय अशा घरात त्यांचा जन्म झाला. ते वडिलांना तात्यासाहेब म्हणत तर आईला ताई म्हणत. तात्यासाहेब स्वत: केम्ब्रिज मधून रँगलरची पदवी धारण केलेले आणि बनारस विद्यापीठात गणित शिकवत असत. त्यामुळे नारळीकरांची सुरवातीची वर्षे बनारस येथे गेली. ताई संस्कृतच्या एम. ए. होत्या. तात्यासाहेबांचे संस्कृतही उत्तम. त्यामुळे मुलावर संस्कृत श्लोक पठण, स्पष्ट शब्दोच्चार यांचे संस्कार लहानपणी अगदी सहज झाले. पहिला भाग वाचताना वयाने लहान पण बुद्धीने महान अशा लेखकाची ओळख होते. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील एकेक स्कॉलर पाहून अचंबित व्हायला होते. आणखी एका गोष्टीचे कौतुक वाटते ते म्हणजे शालेय शिक्षण हिंदीतून, उच्चशिक्षण इंग्रजीतून पण आत्मकथन मात्र मराठीतून. त्यांचे मातृभाषेविषयिचे प्रेमच ह्यातून दिसून येते.

मग प्रवास सुरु होतो केम्ब्रिजचा. ह्यात त्यांची शिष्यवृती, बोटीचा प्रवास, सुरवातीचे दिवस जसे आहेत तसेच तिथे रुळतानाचे, तिथे फिरातांनाचे आलेले अनुभवही आहेत. केम्ब्रीजमधील वास्तव्यात त्यांचे दोनाचे चार हात झाले. त्यांची पत्नी मंगला गणित विषयातील मुबई विद्यापीठाची चँसलर सुवर्णपदकाची मानकरी! लग्नाच्या वेळी टी. आय. एफ. आर. येथे त्या संशोधन करीत होत्या. लग्नानंतर त्याही केम्ब्रिजला गेल्या. त्याही आठवणी आहेत. शिवाय मुख्य भर हा त्यांच्या संशोधनावर असल्यामुळे हा भाग मोठा आहे. त्यांचे गाईड आणि मित्र फ्रेड हॉएल अगदी शेवटच्या भागापर्यंत सोबत करतात. त्यांच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या साहित्यिक एडवर्ड फॉस्टर यांच्या आठवणी देखील रंजक आहेत. केम्ब्रिजला असताना ताई आणि तात्यासाहेब यांना ते कायम सविस्तर पत्रे लिहित. त्या पत्रांच्या आधारे ह्या आठवणी ठळकपणे जाग्या करता आल्या असा ओझरता उल्लेखही ते करतात. त्यांचा विनम्रपणा संपूर्ण कथनात पदोपदी जाणवतो. आणि आपला आदर दुणावत जातो.

तिसरा भाग म्हणजे केम्ब्रिज सोडून मुंबईला स्थायिक झाल्यावरचा प्रवास. टी. आय. एफ. आर येथील संशोधन, जबाबदारीची पदे, वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचे सविस्तर वर्णन ह्यात वाचावयास मिळते. टी. आय. एफ. आर. मधली वर्षं ते 'मध्य पर्व' म्हणून उल्लेखतात. मुंबईत आल्यावर त्याना ताई तात्यासाहेब यांच्यासमावेत रहायला मिळाले हाही आनंदाचा भाग होताच.

चौथा भाग हा प्रामुख्याने आयुका मधील वास्तव्याचा आहे. आयुकाचे प्रमुख म्हणून ते आले आणि पंधरा वर्ष ती जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडून वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाले. आयुकाचे बस्तान बसवतानाचे अनुभव वाचण्यासारखे आहेत. आयुकाचे वर्णन तर अहाहा! ते वाचून कधी आयुकाला भेट देईन असे झालेय मला. (जागतिक विज्ञान दिवशी सामान्य नागरिक आयुकला भेट देऊ शकतात ही माहिती त्यांनीच दिली.) ह्या भागातील शेवटचे प्रकरण म्हणजे 'मागे वळून पाहताना'. आपण आयुष्याच्या विविध टप्प्यांवर मागे वळून पाहत असतो. काय मिळवलं, काय गमावलं, काय हुकल ह्याचा हिशोब मांडत असतो. पण इथे त्याव्यतिरिक्त त्यानी कृतज्ञता आणि काही जनतेच्या मनातील महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. त्या उत्तरांमधून त्यांची मते सुस्पष्ट होतात. मातृभाषेतून शालेय शिक्षण घेणे असो किवा बुवाबाजी असो ते ठामपणे आपले मत मांडतात. आपले मतही तसे असेल तर वाचताना एक वेगळाच आनद मिळतो.

त्यांचा हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. मन भरत नाही आणि आपण परत एकदा तो प्रवास त्यांच्यासोबत अनुभवायचे ठरवूनच पुस्तक मिटतो. (निदान मी तरी ह्या विचाराने मिटले आहे.)

पुस्तकाची माडणी आणि बांधणी उत्कृष्ट! मधोमध अनेक छायाचित्रे आहेत. प्रस्तावना व मनोगत दिले नाही आहे पण काही बिघडत नाही. शेवटचे प्रकरण मनोगतच वाटते.

काही खटकलेच असेल तर ते म्हणजे संशोधनविषयी लिहिताना कंसात इंग्रजी प्रचलित शब्द द्यावयास हवे होते. काही ठिकाणी समजण्यास सोप्पे पडले असते. अतिशुद्ध मराठीत लिहिले आहे. पण हे खटकणे म्हणजे पुस्तकाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेली तीट समजायला हरकत नाही.

पुस्तक वाचून पहाच तुम्ही. नक्की आवडेल!

- उल्का कडले

साहित्यिक

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

6 Jun 2016 - 8:36 pm | राघवेंद्र

सुंदर परीक्षण. लवकरच पुस्तक मिळवावे लागेल.
पुढील लिखाणास शुभेच्छा !!!

प्रचेतस's picture

6 Jun 2016 - 8:40 pm | प्रचेतस

नारळीकर अत्यंत आवडते शास्त्रज्ञ. अतिशय साधा माणूस.
परिक्षण छानच आहे.

जव्हेरगंज's picture

6 Jun 2016 - 9:26 pm | जव्हेरगंज

'आकाशाशी जडले नाते' लहानपणीच वाचले होते, तेव्हापासून जयंत नारळीकर हे एक आवडतं नाव होऊन बसलंय !

पद्मावति's picture

6 Jun 2016 - 9:34 pm | पद्मावति

सुंदर ओळख.

अर्धवटराव's picture

6 Jun 2016 - 9:45 pm | अर्धवटराव

छान ओळख करुन दिलीत पुस्तकाची.
अशी पुस्तकं कायम संग्रही असावीत व खासकरुन लहानग्यांना अवष्य वाचायला द्यावीत.

उल्का's picture

6 Jun 2016 - 10:02 pm | उल्का

सर्वांना धन्यवाद!

हे परिक्षण आवडले. शाळेपासूनच त्यांची पुस्तके वाचली आहेत.
पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे असणार..
२००० साली त्यांच्याशी प्रदीर्घ भेट झाली, त्यावेळी त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला.

अत्रन्गि पाउस's picture

6 Jun 2016 - 10:17 pm | अत्रन्गि पाउस

त्यांच्या मातोश्रींनी लिहिलेले 'एका wrangler ची कहाणी" जरूर वाचावे ...
नारळीकरांच्या अफाट बौद्धिक झेपेच सकौतुक(हा खास त्यांच्या पठडीतला शब्दसंधी) हेवा वाटतो व त्याच बरोबर त्यातील प्रांजल आत्मकथन फारच भावते ...
उत्कृष्ट मराठी ...
पुस्तक आणि कथनाच्या एकेका पैलूबद्दल एकेक स्वतंत्र लेख होऊ शकेल ...
वा ...उत्तम धागा काढलात ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2016 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर पुस्तकओळख !

एका संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त काही वर्षांपूर्वी डॉ नारळीकर यांचा दोनतीन तास सहवास मिळाला होता. तेवढ्या अल्प कालातही त्यांच्या माणुस म्ह्णून प्रगल्भतेची, सहज साधेपणाची आणि तरुणाईबद्दलच्या आपुलकीची झलक मोहवून गेली !

हे पुस्तक नक्कीच संग्रहात सामील होईल !

एस's picture

6 Jun 2016 - 10:50 pm | एस

Great!

प्रियाजी's picture

6 Jun 2016 - 10:58 pm | प्रियाजी

पुस्तकाची अतिशय मनमोहक ओळख करून दिली आहे. ह्यामुळेच हे पुस्तक जरूर विकत घेउन वाचले जाईल.

उल्का's picture

6 Jun 2016 - 11:10 pm | उल्का

सर्वान्चे आभार!
@अ पा - त्यान्च्या मातोश्रींच्या पुस्तकाचा उल्लेख आहे शेवटच्या प्रकरणात. वाचायची इच्छा झालीच. मी लगेच शोधलं पण बुकगंगा वर नाही आहे. दुकानात जाउन विचारेन.
@ खेडूत आणि डॉ. - माझा मुलगा पण एक वर्षांपूर्वी भेटला होता. आय टी सी मध्ये व्याख्यान होतं. त्यान्चे व मंगला ताईंचे. अर्थात फार बोलणे नाही झाले. एखाद दुसरे वाक्य बोलला. पण प्रत्य्क्षात त्याना पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आला होता हेही नसे थोडके. आम्हाला त्यातच समाधान. :)

अश्विनी वैद्य's picture

7 Jun 2016 - 2:59 am | अश्विनी वैद्य

गेल्या वर्षी जयंत नारळीकरांचे हे पुस्तक असेच एका वर्तमान पत्रात आलेले त्या बद्दलचे समीक्षण वाचून आणले होते. अतिशय सुंदर आणि संग्रही असावे असेच पुस्तक आहे. तुम्हीही पुस्तकाचा साधारण सारांश योग्य शब्दांत मांडला आहे. धन्यवाद.

रेवती's picture

7 Jun 2016 - 5:30 am | रेवती

मस्त ओळख करून दिलियेत उल्काताई!
कधीएकदा वाचायला मिळतेय असे वाटले.

चलत मुसाफिर's picture

7 Jun 2016 - 6:38 am | चलत मुसाफिर

आत्मकथन आणि चरित्र हे साहित्यप्रकार मुळातच आवडतात. आपल्या एका वीतभर आयुष्यात अनेक जीवने जगल्यासारखे वाटते.

यशोधरा's picture

7 Jun 2016 - 7:33 am | यशोधरा

घेईन हे पुस्तक. धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

7 Jun 2016 - 7:47 am | सुधीर कांदळकर

या वंदनीय व्यक्तिमत्त्वाबाबत कितीही वाचले तरी मन भरणार नाही हे खरेच. एका रँग्लरची कहाणी वाचले होते. आता या पुस्तकाच्या परिच्याबद्दल धन्यवाद. ग्रंथालयात अग्रक्रम लावून ठेवतो.

एक सुरेख आठवण जागी झाली. एकदा पुणे विद्यापीठात प्रभातफेरी मारतांना अचानक नारळीकर समोर आले. आम्ही त्यांच्यासमोर थांबलो. बोलावे की न बोलावे या संभ्रमात. पण तेच बोलले हो, मीच नारळीकर. अचानक भेटल्यामुळे काय बोलावे सुचलेच नाही. तुमच्या दर्शनाने आनंद झाला म्हणालो. तो तुमच्या चेहर्‍यावर दिसतोच आहे म्हणाले. फारच निगर्वी आणि नम्र वाटले. मग नमस्कार करून निघालो.

उल्का's picture

7 Jun 2016 - 9:16 am | उल्का

सर्वाना धन्यवाद!
@सुधीर - कित्ती मस्त आठवण सांगितली तुम्ही. :) जणू 'किती सांगू मी सांगू तुम्हाला आज आनंदी आनंद झाला' असेच काहीसे त्यादिवशी झाले असणार हे नक्की. मी कल्पना करू शकते.
मला माझ्या मुलाने फोन करून सांगितले की आज मला यायला उशीर होईल कारण नारळीकर यांचे लेक्चर आहे. तेव्हा त्यांना मी नाही पण निदान मुलगा तरी भेटू शकतोय म्हणून माझीही अशीच अवस्था झाली होती. रात्री घरी आल्यावर जेवण वगैरे न जेवता त्याच्याकडून सगळं नीट ऐकून घेतलं आणि मस्त वाटलं. त्याची देखील पहिली प्रतिक्रिया हीच होती की आई, एकदम साधे वाटतात ग ते.
त्याना मुलाखतीत पाहताना, ऐकताना त्यांचा मृदुभाषी, निगर्वी आणि विनम्र स्वभाव कायम जाणवतो.
मी कॉलेज मध्ये असताना 'प्रेषित' विकत घेतलं होतं. ते माझ्या संग्रहातील पाहिलंवहिलं पुस्तक!

ह्या साध्या माणसाला सुदैवाने मी दररोज भेटतो. पुण्यात पंचवटीमध्ये आमच्या सोसायटी जवळच राहतात. दररोज सकाळी फिरायला भेटतात. मी आणि माझी बायको सकाळी फिरायला जात असताना एकदा माझी ओळख करून करून देताना म्हटले मी हर्षद खुस्पे आणि ही माझी बायको विजया. तर मला म्हणाले मी जयंत नारळीकर आणी ही माझी बायको मंगला :)

पैसा's picture

7 Jun 2016 - 10:39 pm | पैसा

उत्कृष्ट पुस्तकाची छान ओळख!

फेरफटका's picture

8 Jun 2016 - 12:43 am | फेरफटका

"तात्यासाहेब स्वत: केम्ब्रिज मधून रँगलरची पदवी धारण केलेले" - रँग्लर ही पदवी नाहीये. गणितात, तृतीय वर्षाला, गणितात फर्स्ट क्लास ऑनर्स मिळवलेल्या व्यक्तिला रँग्लर म्हणतात. दुसर्या क्रमांकचे गुण मिळवणार्याला द्वितीय रँग्लर ई. सर्वात कमी (तृतीय श्रेणी) गुण मिळवणार्या ला 'वुडन स्पून' म्हणतात. मागे एकदा नारळकरांच्याच एका लेखात रँग्लर विषयी त्यांनी विस्तारानं लिहीलं होतं.

उल्का's picture

8 Jun 2016 - 7:01 am | उल्का

@ हर्षद - खूप छान किस्सा सांगितला तुम्ही.
@ फेरफटका - हो पदवी हा शब्द इथे काहीसा चुकला असेल. तो एक सन्मान आहे. पण रँग्लर होणे ह्याअर्थी मी पदवी लिहिले. ट्रायपॉस पार्ट2 परीक्षा प्रथम श्रेणीत पास होणाऱ्याला रँग्लर होण्याचा मान मिळे आणि पार्ट3 ची परीक्षा खगोलशास्त्रात सर्वोत्तम गुणांनी पास झाल्यावर टायसन मेडल असे व त्याला स्टार रँग्लर म्हणून ओळखले जाई. 1930 साली तात्यासाहेबांना ते मिळाले होते. त्याअर्थी ते स्टार रँग्लर होते.
त्यांच्यानंतर मधल्या काळात कोणाही भारतीयाला ते न मिळता एकदम जयंत नारळीकरांना मिळाले.
तुम्ही जे सांगितले आहे ती पद्धत 1909 नंतर बंद करण्यात आली. पुस्तकात तसा उल्लेख आहे.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

राजाभाउ's picture

8 Jun 2016 - 10:43 am | राजाभाउ

मस्त ओळख. धन्यवाद. आता हे वाचलेच पाहीजे.