डाकिया डाक लाया डाक लाया, कारगिलचा पोस्टमन....

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
28 May 2016 - 8:26 am


मे 09,1999,0930 वाजता

जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांसाठी एक रजिस्टर्ड पोस्ट पॅकेट हाती होते, ते द्यायला मी आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो, पॅकेट खुद्द साहेबांच्या नावचे होते म्हणून मी सामान्य प्रशासन मधे डाक न देता साहेबांच्या गोपनीय विभागात आलो होतो. हा खास कलेक्टर साहेबांची डाक हाताळणारा विभाग होता, आत गेलो ते एकटे बशीर मियाँ बसले होते त्यांनी मला पाहताच उठून एक खुर्ची आणली अन म्हणाले,

"आइये आइये साब बैठिये कैसे आना हुआ".

"कुछ नहीं ये साहब का रजिस्टर्ड था".

"ओके ओके" म्हणतच बशीर मियाँनी डीस्पॅच रजिस्टर काढले, अन झटकन अक्नोलेजमेंट मला काढून दिली मी ती माझ्या बॅग मधे टाकली अन बशीर मियाँना म्हणालो,

"अच्छा मियाँ येतो मी".

"बसा हो ज़रा कावाह मागवतो".

"नाही नको तिकडे पोस्ट ऑफिसला काम आहे भरपुर".

"ठीक आहे पोस्टमन बाबु भेटु परत पुढल्यावेळी वेळ काढून या".

तिथून बाहेर आलो अन माझ्या मोटरसायकलवर मी परत माझ्या पोस्ट ऑफिसकड़े निघालो ऑफिसला पोचताच मी गाडी लावली अन हेलमेट काढून बेरे कॅप लावणारच होतो तितक्यात समोरून लांस नाईक विश्वंभर दास आला अन एक कड़क सल्यूट केला त्याला तोच परत देताच लगेच बोलला,

"सर इमरजेंसी ड्यूटी लगी है आपको मेजर साब ने अभी बुलाया है"

काय झाले असेल ह्या नवलात मी तड़क मेजर साहेबांच्या ऑफिसला पोचलो,रितसर दरवाजा टकटक करुन परवानगी घेतली अन आत जाऊन मेजरसाहेबांना सल्यूट केला तसे त्यांनी at ease केले अन बसायला सांगितले, बसलो तेव्हा ते म्हणाले,

"कैसे हो सुबेदार साब?"

"बस सर ठीक है , आपने बुलाया था सर??"

"येस येसsssss सुबेदार साब कुछ ऐसी ड्यूटी थी जो सिर्फ आप जैसा एक्सपीरियंस बंदा ही कर पायेगा".

"मेरे लिए क्या ऑर्डर्स है सर??"

"आपको एक बॅग डिस्पैच रन करना है, श्रीनगर टु कारगिल,आज 09 तारीख है कल सुबह 0700 तक ये बॅग कर्नल.पुरी को डिस्पैच होगी कारगिल बेस कमांड में बॅग सिर्फ कर्नलसाब के हात में हैंडओवर होगी, कोई शक??"

"नो सर"

"सुबेदार साब लेटेस्ट रिपोर्ट कहती है की बकरवाल लोगोने कुछ बंदो को एलओसी रीजेस पर बैठा हुआ देखा है और उनकेपास सामान भी है, इसीलिए आपको थोड़ा ऐतियात से जाना होगा , और बचाव के लिए आप जिप्सी नहीं बाइक से जायेंगे ताकी आप स्पॉट न हो, मेल सेंसिटिव है आप बस इतना जानिये"

"हो जायेगा सर, मैं तुरंत निकल रहा हूँ"

"गुडलक सुबेदार साब"

"थैंक यू सर"

मे 09, 1999 , 1025 वाजता

मी प्रथम माझ्या क्वार्टरला गेलो सेंसिटिव पोस्टिंगमुळे मी एकटाच राहत होतो. जायच्या अगोदर मी ऑफिस मधुनच घरी फोन केला अन थोड़ा कमनिमित्त बाहेर जातोय आता थेट पुढल्या आठवड्यात बोलु हे घरी कळवले. क्वार्टर मधे जाऊन मी माझे बॅगपॅक भरले त्यात इमरजेंसी राशन म्हणजे चिक्की बिस्किट ग्लूकोज़ डबा अन एक एक्स्ट्रा बिसलरी भरली अन तड़क ऑफिसला आलो तोवर, लांस नाईक दास ने माझी यशवंती घोड़ी उर्फ़ रॉयल एनफील्ड 500 तयार करुन ठेवली होती , त्याला विचारले

"तयारी ओके है दास?

"सर 2 जेरीकॅन्स पेट्रोल साइड फ्रेम में दोनों तरफ चढ़ाये है, पंक्चर किट पीछे वाले राइड पाउच में है, पानी और ड्राय राशन भी भर दिया है एक्स्ट्रा ब्रेक क्लच और अस्क्लेटर केबल्स भी रखवा दिए है"

हे म्हणतानाच त्याने बाइक चार्ज चे पेपर दिले त्यावर सही करुन मी अधिकृत रीत्या ती नखशिखांत ओजी उर्फ़ ऑलिव ग्रीन रंगवलेली घोड़ी ताब्यात घेतली. त्याचे ब्रेक अन क्लच चे ताण अन प्ले चेक केले अन दास ला इंस्ट्रक्शन दिली

"2 2 एक्स्ट्रा हेडलाइट और टेल लैंप बल्ब भी ले लो स्टोर से और ठीक से पॅक कर के बॅक पाउच में रखवा दो".

"ठीक साब " म्हणत तो सुसाट स्टोर कड़े सुटला.

तोवर मी आत जाऊन लॉकर रूम मधे माझा ऑफिशल यूनिफार्म काढला अन कामोफ्लाज कॉम्बैट ड्रेस चढ़वला, छातीवर वेल्क्रो ने नावाची पट्टी लावली "विश्वास". पायात डीएम शूज चढ़वले माझी बेरे लावली अन बाहेर आलो, येता येता कोत मधे जाऊन मी रजिस्टर मधे सही करुन एक 9mm बरेटा पिस्टल अन 4 मैग्ज़ीन ताब्यात घेतले, पिस्टल कापड़ी पट्टयात अड़कवलेल्या होल्स्टर मधे खोचली अन बाहेर आलो ते हाती हेलमेट धरून दास उभाच होता, मी समोर जाताच त्याने सल्यूट केला अन हेलमेट ताब्यात दिले मी त्याला सल्यूट रिटर्न केला बेरे काढून माझ्या बॅकपॅक मधे टाकली अन हेलमेट चढ़वले, अन जासुद काम करायला तयार झालो.

बाइकच्या उजव्या हाताला वैष्णो देवीची लाल सोनेरी चुनरी बांधली होती तिला नमस्कार केला, डाव्या हैंडलला लेह मॉनेस्ट्री ने दिलेला थांगका बांधला होता त्याला स्पर्श करुन हात छातीला लावला, अन सणसणुन किक मारली ते आमची यशवंती जिवंत होऊन फुरफरु लागली.

09 मे, 1999, 1100 वाजता

"जय हिंद साब".

"जय हिंद दास" म्हणून मी गियर टाकला पहिला अन सुसाट निघालो. श्रीनगर शहरातले वेगवेगळे भाग तिथे तिथे मिळेल तश्या ट्रॅफिक ने मी कमी जास्त गतीने कापत होतो दूर गावात कुठेतरी रोजच्याप्रमाणेच कुठलेतरी आंदोलन झालेले दिसत होते, ते समजायचा एकमेव मार्ग म्हणजे दंगा करणाऱ्या लोकांनी टायर जाळले की उठणारा काळाकुट्ट धुर त्या धुराकडे एकवार नजर वळवुन मी परत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले अन चांगली 60 ची स्पीड पकडली, पण हे सुख मला जास्तकाळ लाभणारे नव्हते कारण शहरी वस्ती संपली तसाच राखाडी करड़ा रंग असलेला रस्ता उर्फ़ लद्दाख रोड सुरु झाला, मे महिन्याची सुरुवात म्हणजे बहुतांश बर्फ वितळलेला तरीही थोड़े थोड़े पॅच शिल्लक असलेला असा तो असमंत होता, तापमान -3℃ ते 15℃च्या मधे फिरत असते दिवसाच्या वेळेनुसार सद्धया सोसल असे तापमान होते खड़बड़ीत म्हणण्यापेक्षा थोड़ी कच्ची अन मधेच डांबराचे पॅच उडलेली सड़क असल्यामुळे मी गती आता कमी करुन जवळपास 40च्या स्पीड ने पुढे चालू लागलो, साधारण श्रीनगरच्या बाहेर 30 किमी आल्यावर मला गार वारे बोचु लागले तसे मी लेफ्ट इंडिकेटर देऊन गाड़ी थांबवली थोड़े पाय मोकळे केले अन बॅगपॅक मधुन जाड ऑलिव ग्रीन जॅकेट काढून चढ़वले त्याची चेन गळ्यापर्यंत ओढून मी पुर्ण पॅक झालो मग परत पुढे सुटलो. थोड्याचवेळात मी वायुल पार केले अन आता थोड़ा लयीत आलो होतो. जवळपास दीड तास झाला होता निघुन, आता पुढे अजुन 3 तास वर सोनमर्ग तिथून 4 तास पुढे कारगिल मग मी मोकळा असा विचार येईपर्यंत पहिले विघ्न आले मागच्या चाकातुन एकदम फुसकन आवाज आला, झाला प्रकार समजायला मला वेळ लागला नाही परत एकदा गाड़ी थांबली अन मी यांत्रिकपणे पंक्चर काढत बसलो. टोटल 20 मिनट तिथे घालुन मी परत पुढे निघालो तेव्हा 1350 वाजले होते, अजुन सोनमर्ग 3 तास लागणारच होते मी जवळपास 30 35 च्या स्पीड न पुढे सरकू लागलो सोनमर्ग पासुन अंदाजे 38 ते 40 किमी असताना ऊंची जाणवू लागली सोनमर्ग 2650 मीटर ऊंचीवर होते अन श्रीनगर जवळपास 1580 मीटर तरी बरं सतत इकडे काम करुन माझे शरीर ह्या हवामान अन ऊंचीला अडॉप्ट झाले होते. हा महीना मेचा होता अन बर्फ वितळु लागले होते कुठे छोटे ओघळ तर कुठे ओढ्याच्या आकारात डीपफ्रीजर मधे ठेवलेले असते तितक्या तापमानाचे पाणी वाहत होते. खाली सिंधुमातेला भेटायला जाणारी उसळती अवखळ बाळेच होती ती जणू पण त्यांच्यामुळे एक लफ़ड़े झाले होते ह्या जलधारा फ़क्त निसर्गाचे नियम पाळतात त्यांना फ़क्त गुरुत्व वापरून वरतुन खाली जाणे होते. मग त्यांना मज़्ज़ाव करणाऱ्या सड़का दगड शिला ह्यांना त्या धारा चिरून ढकलुन पुढे पुढे सरकतात, त्यांना नीट मार्ग द्यायला बॉर्डर रोड्स आर्गेनाईजेशनची माणसे चर खोदतात धारांचा अभ्यासकरुन वाटा बनवतात पण नादिष्ट वांड पोरांचा अन त्यांच्या खेळांचा भरोसा देता येत नाही तसेच ह्यांचे ही असते जो रस्ता आवडेल त्यावर दौड़त सुटतात, सोनमर्ग पासुन अंदाजे 30 किमी वर एका वळणावर मी असाच फसलो तिथे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याने एक रोड पॅच अपल्यासोबत खाली नेला होता अन तश्या त्या वाहत्या ओढ्यात मी बुलेट घातली, वाहत्या पाण्यात पुढचे चाक ओढले जाऊ लागले इतपत त्याची गती होती त्याच दरम्यान समोरील चाकाच्या खाली एक वाटोळा दगड यायला अन मागच्या चाकाखालील चिखल सरकायला एकच गाठ पडली अन गाड़ी डाव्याबाजुला कलली! माझं नशीबच थोर म्हणायला हवे म्हणून गाड़ी डावीकड़े पडलो उजवीकडे पड़ता पाणी अन गाडी सोबत मी ही खाली नदीमातेच्या कुशीत गेलो असतो, डावीकड़े गाडी कलताच मी ओणवा फेकला गेलो अन आपण दंडवत घालतो तसे धपकन पाण्यात पडलो उणापूरा 5 बोटे खोल ओहोळ अन त्यात मी पालथा पडलेलो खाली असलेली दगड माती खचकन रुतली अन तोंडी गढुळ पाणी गेले, धडपड करत मी उठून उभा राहिलो पाणी थुंकले जरा सावरलो अन स्वतःकडे पाहिले तर तळहातात दगडाची एक कपची शिरून रक्त येत होते अन उजवा गुड़घा दुखत होता पण एकंदरित मी ठीक होतो, आता फ़क्त एक प्रॉब्लेम होता मी नखशिखांत भिजलेलो होतो तितक्यात मला मेलबॅगचा विचार आला म्हणून मी यांत्रिकपणे बॅकपॅकला हात लावला तर नाशिबाने ती शाबुत होती, गाड़ीकडे पाहता तिलाही काही खास अपाय झाला नव्हता मी परत गाडीजवळ आलो अन ती उभी केली उभी करताच ती सुरु करायला बघु लागलो 5 6 किक्स मधे गाड़ी सुरु झाली अन मी पुढे निघालो , भिजल्यामुळे मात्र आता भयानक हिव भरू लागलं होतं, वरती उन होतं थोडं थोडं पण हवा जोरात सुरु असल्यामुळे मला कापरं भरू लागलं होतं हाताची बोटे सुन्न पडू लागली होती. मी तड़क ओले हातमोजे काढून पिळले अन परत चढ़वले अन हात झटकुन बोटे गरम करायचा प्रयत्न करु लागलो, पण ते काही जमेना म्हणल्यावर मी शिस्तीत गाडी कडेला लावली अन पहिले उड्या मारल्या भरपुर आता नाकाचा शेंडा बधीर झाला होता ओला यूनिफार्म मी काढला पुर्ण ताकद लावुन पिळला अन परत चढ़वला आता होईल ते बघु म्हणून मी पुढे निघालो, सुन्न पडत असलेले हात पाय अन चेहऱ्यामुळे माझी गती आता 20 25 ची झाली होती. कपडे चिखलात रॅड झाले होते. मी सोनमर्गच्या शेड्यूल्ड टाइम पेक्षा जवळपास तासभर मागे होतो पण माझा निरुपाय होता. तरीही मी गती वाढवू लागलो कारण मी टाइम बाउंड डिलीवरी वर होतो. अंदाजे 1730 ला सोनमर्ग दिसू लागले तसे मला थोड़ा हुरूप आला समोर जाता मला एक बॉर्डर रोड्स आर्गेनाइजेशनची चौकी दिसली तिथे मी गाडी थांबवली तशी तिथे राहणारी मजूर मंडळी अन त्यांचा मुकादम असलेला एक जेसीओच असणारा माणुस माझ्याकडे आले, ओजी जामानिमा पाहून त्यांनी मला ओळखलेच होते नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी मला आत नेले चहा दिला अन मी तिथल्याच एका शेकोटी समोर बसकण मारली. गरम चहा अन थोड़ी ऊब पोटी जाताच मी परत एकदा त्या मित्रांचा निरोप घेऊन पुढे निघालो. निघताना त्यांना विचारले पुढे कारगिल पर्यंत रोड कसा आहे हो? त्यावर ते म्हणाले की आम्ही थोड़ाबहुत बंदोबस्त केला आहे पण पुढे पर्वतराजाची जी इच्छा असेल ती! तसे मी हसून पुढे निघालो, मी सोनमर्ग पार केले तेव्हा जवळपास अंधार झाला होता पहाड़ी भागात लवकर अंधारुन येते तरीही 1830 म्हणजे आता मात्र खासे अंधारुन आले होते म्हणून मी गाडीचा हेडलाइट लावला अन माफक गतीने तरीही काळजीपूर्वक पुढे जाऊ लागलो, सोनमर्ग ते बालाथल अंतर मी सहज पार केले नॉर्मल गतीने अगदी ज्याची भीती होती ते बालाथलचे झिगझेग घाट सुद्धा शिस्तीत पार पडले आता मी द्रासच्या वाटेला लागलो होतो, पुढचा सहा तासाचा प्रवास हा माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक तरीही साहसी प्रवास ठरणार होता हे मला तेव्हा माहीती नव्हते. द्रास पासुन 5 किमी अगोदर मी अतिशय निवांत जात होतो गाड़ीची टिपिकल बुलेटची धगधग वगळता आवाज नव्हता नाही म्हणायला वरती आकाशात निव्वळ सड़ा पडू लागला होता ताऱ्यांचा. प्रदुषण नसलेल्या ह्या भागात तारे सवाष्णीच्या कुंकवासारखे दिसतात एकदम ठसठशीत. अश्या वातावरणात मी वाया गेलेला वेळ भरून काढायला एक्सीलरेटर पिळु लागणार इतक्यात, हलकासा "कुईंईईई" असा आवाज आला अन मला काही समजायच्या आत रस्त्याच्या डाव्या बाजुला 35 ते 40 फुटांवर भयानक स्फोट झाला .सहज क्रियेने मी बुलेट उजवीकडे घातली अन रस्त्याच्या उजव्या बाजुला एक खळगा होता पाणथळ असा तिथे घुसलो. डोके गरगरत होते कान बधीर होऊन गेले होते दचकल्यामुळे ह्रदय बरगड्या तोड़ते की काय इतक्या जोरात धड़धड़त होते. परत एकदा मी ओलागच्च झालो होतो गाड़ी त्या डबक्यात अन खळग्यात उजवीकडे कलंडली होती, पाठीवरले बॅगपॅक काढले अन आधी मेल बॅग चेक केली ती ओके होती. थोड़ा सावरत होतो तसे मी ज्या पाऊलवाटेने खाली उतरलो होतो तिकडे परत एकदा स्फोट झाला अन चिखल माती बारके दगड, चिपा ह्यांचा मला अभिषेक झाला. अन एकदम डोक्यात प्रकाश पडला!.

शेलिंग!! पाकिस्तानी आर्मी शेलिंग करते आहे , बकरवाल , रिजेस सामान, माणसे, एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! झुंजरके साधुन हरामी पाकडे डाव साधत होते, कारगिलचं युद्ध अक्षरशः सुरु होताना पाहणारा मी पहिला मनुष्य होतो, मी गुमान बिसलरीची बाटली काढली एक घोट पाणी प्यालो, तसा परत एकदा धुडुमधड़ाम आवाज आला फ़क्त या वेळी तो दिवाळीतल्या सुतळी बॉम्ब सारखा आला बहुदा शेल थोड़े दूर पडले होते मी क्रॉलिंग करत रस्त्याच्या पातळीला आलो इकडे तिकडे पाहता अंदाजे 100 मीटर दूर धूळ बसताना दिसली, नवी इंफॉर्मेशन, पाकिस्तानी भारताच्या गर्दनीची नस असणारा हाईवे तोडू इच्छित होते.होय!! नॅशनल हाईवे 1 डी ! अन त्यावर द्रासच्या वाटेला असलेला मी आर्मी पोस्टल सर्विस कोरचा सुबेदार विश्वास प्रभाकर बांदेकर.मी परत क्रॉलिंग करत खाली आलो आता ठराविक अंतराने आर्टिलरी शेल्सचा आवाज येऊ लागला, लगेच मनाने गणित बांधले,कुठल्या गन्स असतील बॅटरी कशी ऑपरेट होते आहे हे सुटत नव्हते गणित कारण मी आर्टिलरीचा माणुस नाही मी तर साधा डाक ड्यूटी रनर होतो. आता काय करावे ह्यात मी मिनिटभर विचार केला अन पहिले गाड़ी कड़े मोर्चा वळवला गाडी ठीक होती फ़क्त उजवीकडली दोन्ही इंडीकेटर्स चुराडा झाली होती गाड़ी अजुन जवळून पाहता उजव्या बाजूला असलेल्या जेरीकॅन मधे एक बारीक अणकुचीदार दगड रुतुन पेट्रोल लीक होऊ लागले होते. क्षणभर विचार करुन मी तो कॅन ओढला अन पेट्रोल रिकाम्या होऊ घातलेल्या गाड़ीच्या टाकीमधे ओतले अर्धे पेट्रोल त्यात बसले तरी कॅन मधे थोड़े होतेच मी माझ्या हातमोज्याचं मनगटाजवळ असलेलं कापड फाडलं अन लीक होत्या कॅन मधील बारीक़ छिद्रावर दाबून बसवलं, हा इलाज तर जमला होता आता अजुन एक प्रश्न होता माझ्या गाड़ीचा हेडलैंप अन टेललैम्प अगदी प्रखर जरी नाही म्हणला तरी अंधारात नक्कीच चमकला असता, आर्टिलरी कवर मधे जर एखादे शत्रूचे यूनिट पुढे सरकत असले तर मी त्याच्या तावडीत सापडू शकलो असतो , परत समोरची शॉकप अन साइड पेनल वर असलेली रिफ्लेक्टर स्टिकर्स सुद्धा चमकन्याचा धोका होता, काय करावे ह्या विचारात मला एक शक्कल सुचली मी सरळ ज्या पाण्याच्या थारोळ्यात बसलो होतो त्याच्या बुडाला हात घालुन खरवडले ते हाती थोड़ा मुलायम चिखल लागला मी तो चिखल सरळ रिफ्लेक्टर्स अन टेल लाइट वर फासला अन त्यांना conceal केले त्या नंतर तसाच चिखल हेडलाइटवर चोपड़ला फ़क्त मधे एक छोटेसे वर्तुळ सोडले जेणे करुन पसरणारा लाइट कंट्रोल होईल पण मला अंधुक रस्ता सुद्धा दिसत राहील, मी एक आर्मी पोस्टमॅन होतो मला घाबरुन चालणार नव्हते. माणसाचे मन विचित्र असते, ह्या क्षणी मला गोष्ट आठवत होती ती एका प्राचीन ग्रीक निरोप्याची, फिडिपेडिस त्याचं नाव, एथेंसचा राहणारा फेडिपेडिस धावत जाऊन सन्देशवाहन करत असे अथीनियान आर्मीचं एकदा असंच मैराथनच्या मैदानात असलेल्या युद्धभुमीपासुन त्याला एथेंस पर्यंत निरोप पोचवायचे काम त्याला मिळाले. निरोप बाका होता "मैराथन चे मैदान मारले आपण जिंकलो" हा निरोप एथेंस सिटी कौंसिलला न पोचला तर ते अज्ञानापाई शहर शरण करतील ते व्हायला नको म्हणून फिडिपेडिस धावत सुटला श्वास न मोजता कसलीच तमा न बाळगता धावत सुटला शेवटी एथेंस च्या दरवाज्यावर आला तेव्हा कोसळून पडला त्याला विलक्षण धाप लागली होती त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले "Rejoice we won" अन तिथेच तो फेडिपेडिस वारला होता. आजही लांब अंतरची धावण्याची शर्यत होते ती मैराथन म्हणावते ती फ़क्त फिडिपेडिसचा सन्मान अन त्याची आठवण म्हणून. आज मी ही फेडिपेडिस् झालो होतो, जीव गेला तरी बेहत्तर फ़क्त तो माझे एथेंस उर्फ़ कारगिल बेसलाच जायला हवा ह्या निश्चयाने मी तयार झालो चिखल माखुन गाडीचा कमांडो मी आधीच केला होता, अंगावर सुद्धा काहीच चमकदार नको म्हणून सर्वांगाला मी चिखल फासला बॅगपॅक परत एकदा पाठीवर आवळले अन सुसाट म्हणजे अक्षरशः सुसाट सुटलो. आता हल्ल्याची व्याप्ती लक्षात आली होती, येत होती गाड़ी चालवण्यात अनेक व्यवधाने येत होती हेडलाइट वरच्या चिखलामुळे रस्ता नीट दिसत नव्हता त्यामुळे मधेच कंबरतोड़ गचके लागत होते ते वेगळेच मधेच एखादे शेल सड़केजवळ आदळले की मी हेलपाटत गाडी परत उजवीकडे रस्त्याखाली घालत असे , एकदा तर हा वेग इतका होता की रस्त्यावर शेल आदळले अन त्याने जेसीबी काढतो तसा एक स्कूप काढला रस्त्याच्यामधुन डाव्या कोपर्यापर्यंत तेव्हा गाड़ी कंट्रोल करुन उजवीकड़े न वळवता आल्याने मी जिथुन रस्ता उखड़ला होता त्याच्या अगदी चिकटुन बोजड़ बुलेट काढली होती उड़नारी माती खड़े अंगावर असंख्य ओरखडे देत होते पण मला पर्वा नव्हती, कारगिल जवळ पोचलो तेव्हा ही धग अजुन जाणवली मला पण मला मागे वळायचे नव्हते, कारगिल बेस जवळ आलो तेव्हा मी अक्षरशः गलितगात्र झालो होतो, बेसच्या सेंट्री ने मला शीट्टी वाजवुन थांबवले तेव्हा मी भानावर आलो होतो, कदाचित युद्धज्वर ह्यालाच म्हणतात असे वाटते, सेंट्रीला चिखलात माखलेला मी ओळखु येइना तसे मी परिचय दिला अन कर्नल पूरी ह्यांना भेटायचे आहे असे सांगितले तसे चार च्या चार सेंट्री बंदुकी खाली करुन धावत आले

"ओये अपना बंदा है ओये" म्हणत्या जवानाची ग्रेनेडियर्स लोगो लावलेली बेरे दिसली तेव्हा मी निश्चिन्त झालो होतो माझ्या अंगातून चार पाच ठिकाणहुन रक्त येत होते हाताची बोटे काळसर नीळसर पडली होती, पाय कान पाठ बधीर झाली होती पण बॅगपॅक घट्ट होती पाठीवर एका जवानाने माझे ओले हातमोजे काढून टाकले होते दुसऱ्याने बूट अन सॉक्स दोघे खसखसा चोळून माझे हातपाय गरम करत होते तोवर तिसऱ्या ने आत मॅसेज दिला रेडियोवर अन मला न्यायला जिप्सी आली रेडियो करणारा जवान माझी बुलेट घेऊन मागून आला अन थेट मी बेसच्या MI सेक्शनला आणलो गेलो होतो, तिथे एक खाट तयार होती आत रूम हीटर होता मला माझे कपडे बदलायला सांगुन तिथे निजवले गेले डॉक्टर ने अंगावर असलेले छोटे मोठे ओरखड़े जखमा नीट स्वच्छ करुन बांधल्या अन मी पडलो होतो तेव्हाच कर्नल पूरी आले ! रात्री साडे अकरा वाजता मी माझ्या इच्छित अधिकार्याला भेटलो ! जवळ पडलेल्या बॅगपॅक मधुन मी मेल बॅग काढून कर्नल साहेबांना दिली अन म्हणालो

"सर ये मुजाहिद नहीं है ये प्रॉपर आर्टिलरी कवर था सर द्रास से कारगिल के बीच में एनएच 1डी तोडा जा रहा है श्रीमान"

मे 09,1999 2330 वाजता मी जे करायला निघालो ते पुर्ण केले होते.

तेव्हा पूरी सर म्हणाले "बहुत बढ़ीया सुबेदार साब हम देख लेंगे अब आप सो जाएँ" औषधांच्या इफ़ेक्ट मुळे मला पण झोप आली सकाळी मला जाग आली ती आर्टिलरीच्या आवाजानेच पण जवळून आवाज येऊन सुद्धा कोणी गड़बड़ीत दिसत नव्हते अर्थ स्पष्ट होत्या भारताच्या बोफोर्स नामे वाघिणी तैनात झाल्या होत्या अन पाकिस्तानचे धिरडे भाजायची आपली ड्यूटी चोख बजावत होत्या निरोप नीट पोचले होते.

एक पोस्टमन समाधानी होता.

समाप्त.

.


(कथा पूर्णपणे काल्पनिक, आधी इतरत्र प्रकाशित, चित्रे जालावरून साभार)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

28 May 2016 - 8:52 am | बाबा योगिराज

काल्पनिक?
.
.
तरीही मस्तच आहे कथा. एकदम सगळं चित्रच नजरेसमोर उभं केलत.

वल्लाह है यह.

यशवंती चालक
बाबा योगीराज.

विवेकपटाईत's picture

28 May 2016 - 9:06 am | विवेकपटाईत

कथा एकदम मनाला भिडली. अश्या पोस्टमनला सलाम.

सिरुसेरि's picture

28 May 2016 - 9:45 am | सिरुसेरि

डाकिया सोल्जर भारीच ..

मुक्त विहारि's picture

28 May 2016 - 10:28 am | मुक्त विहारि

छान लिहिले आहे.

एस's picture

28 May 2016 - 10:35 am | एस

सॅल्यूट!

मार्गी's picture

28 May 2016 - 10:44 am | मार्गी

अप्रतिम सर! खूप जीवंत वर्णन किंबहुना अनुभव सांगितला! सोनमर्गनंतर त्या वेळेमध्ये- मे महिन्यातला झोजिला ओलांडतानाचं वर्णन असतं तर अजून जीवंत वाटलं असतं! पु. ले. प्र.

प्रचेतस's picture

28 May 2016 - 10:45 am | प्रचेतस

खूपच सुरेख.

नाईकांचा बहिर्जी's picture

28 May 2016 - 10:53 am | नाईकांचा बहिर्जी

खिळवुन ठेवणारे लेखन!! अप्रतिम जमली कथा...

बादवे, आपण आर्मीत आहात का सोन्याबापु सर??

शिव कन्या's picture

28 May 2016 - 11:26 am | शिव कन्या

श्वास रोखून वाचत राहीले. उत्तम निवेदन!

तुषार काळभोर's picture

28 May 2016 - 11:27 am | तुषार काळभोर

हे काल्पनिक असेल तर वास्तव कसे असेल..!

बाप्पूसाहेबांना व (काल्पनिक) विश्वासरावांना _/\_

सगळा घटनापट डोळ्यासमोर उभा राहिला.
सुंदर लिहिलंय.
काल्पनिक का असेना, पण या आणि अश्या अनेक भारत मातेच्या सुपुत्रांना मनापासून प्रणाम!

संजय पाटिल's picture

28 May 2016 - 11:45 am | संजय पाटिल

त्या फिल्ड् पोस्ट्मन ला.. आणि तुम्हाला पण
कथा रोमांचक आहे.

रमेश भिडे's picture

28 May 2016 - 12:16 pm | रमेश भिडे

कसलं थरारक आहे हे

अद्द्या's picture

28 May 2016 - 12:28 pm | अद्द्या

परत एकदा तेच

not so worthy citizen salutes you people :)

जियो

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 May 2016 - 1:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

अर्र ऐसा नय बोलनेका बरंका भावसाहेब! Everyone is every worth by almighties blessings!

Hail the Motherland :)

बुलेट प्रीपेअर करतानाच वर्णन वाचताना हात शिवाशिवायले. एकदा खाडकन किक बसली, बुलेटला आणि मेंदूला पण.
नंतर नुसती गिरगिर डोसक्यात. नॉर्मल राईड येगळ आन असलं जीवावरचं मिशन येगळ.
बापूसाब मर्दा, लका जिन्दगीच वायली हि. सॅल्यूट

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 May 2016 - 1:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या भावा,

फ़ौज आर्मी वगैरे म्हणले की लोकांना फ़क्त गोळ्या विमाने रणगाड़े इतकेच दिसते खरंतर ती फाइटिंग फ़ोर्स असते तिला फिट ठेवायला सपोर्टची मंडळी अव्याहत खपत असते त्यात आर्मी सर्विस/सप्लाई कोर उर्फ़ ASC झाली , RVC उर्फ़ रिमाउंट एंड वेटर्नरी कोर (पशुधन काळजी घेणारा विभाग) आर्मी पोस्टल सर्विस असे खुप भाग असतात ते ही जबरी काम करतात त्यांच्याबद्दल थोड़ी जागृती म्हणून हा लेखन प्रपंच!

पध्दतशीर पोहोचलं बापूसाब. हे पडद्याआडचे कलाकार दिसत नाहीत पण त्यांच्या जीवावर चाललेली ही लढत खरोखर भिडली.
ह्या सर्वांना सलाम. यशवंतीला देखील.

कॅप्टन रामा राघोबा राणे या बॉम्बे सॅपर्समधल्या अधिकाऱ्याला परम वीर चक्र मिळालं आहे. त्यांची हकीकत फारच भारी आहे. (सॅपरला मिळालेलं एकमेव pvc असावं)

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 10:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

येस्स सर!! बॉम्बे सॅपर्स (हल्ली बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप) ला मिळालेले एकमेव परामवीरचक्र आहे ते

मी-सौरभ's picture

31 May 2016 - 6:05 pm | मी-सौरभ

त्याची आणि बाकी प.वी.च. विजेत्यांच्या शौर्यगाथा लिहीनार का??
आम्ही वाचायला आहोतच.

+१ अगदी नक्की लिहा बापूसाहेब.

अवांतरः वायुदलातला एकमेव परमवीरचक्र विजेता निर्मलजीतसिंह सेखाँ यांना ज्या सेबरने शेवटी टिपलं त्या पाकिस्तानी वैमानिकाने लिहिलेली त्या प्रसंगाची आठवण इथे आहे.

आदूबाळ's picture

28 May 2016 - 12:56 pm | आदूबाळ

वा वा वा वा बापूसाहेब. लय भारी गोष्ट. त्या मेलबॅग मध्ये काय होतं?

अवांतर: ज्यूल व्हर्नची 'मायकेल स्ट्रॉगॉफ' आठवली. आणि भा रा भागवतांनी केलेलं 'बादशाही जासूद' हे भाषांतरही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 May 2016 - 1:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

त्यात "confidential mail" होती ! :)

जव्हेरगंज's picture

28 May 2016 - 7:16 pm | जव्हेरगंज


भारताच्या बोफोर्स नामे वाघिणी तैनात झाल्या होत्या अन पाकिस्तानचे धिरडे भाजायची आपली ड्यूटी चोख बजावत होत्या निरोप नीट पोचले होते.

महासंग्राम's picture

28 May 2016 - 3:10 pm | महासंग्राम

वाह गाववाले क्या खूब लिख्खा है, रच्याकने हे वाचताना 'संदेसे आते हे गाण्यातला चिठ्ठी घेऊन येणारा रनर आठवला.
किती किती आठवणी तो रोज नेत असेल कोणाचा जन्म, जीवलागांचे मृत्यू, तिचं वाट पाहते आहे लिहिणार पत्र. आता संपर्काची साधने जरी वाढलीत तरी त्याचे महत्व कमी होणार नाही

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 10:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

थैंक यु गाववाले! अन तुमचे बरोबर आहे ह्या पत्रव्यवहाराचे महत्व कधीच बदलणार नाही

पैसा's picture

28 May 2016 - 4:19 pm | पैसा

जय हो!

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 10:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

_/\_

John McClain's picture

28 May 2016 - 4:45 pm | John McClain

Faar jabara...
Saaheb, aanakhi kuthale asataat ase padadyamagache kalakaar?

अनुप ढेरे's picture

28 May 2016 - 6:11 pm | अनुप ढेरे

मस्तं!

बोका-ए-आझम's picture

28 May 2016 - 6:39 pm | बोका-ए-आझम

एक शंका - आताची परिस्थिती काय आहे? Confidential mail आजही अशीच पाठवली जाते की काही नवीन पद्धत वापरली जाते? इमेल्सचा वापर होतो का? हे तर १९९९ चं आहे, जेव्हा इमेल वगैरे फार नवीन प्रकार होता. पण आता काय आहे हे वाचण्यास उत्सुक.

जव्हेरगंज's picture

28 May 2016 - 7:17 pm | जव्हेरगंज

+१

बादवे, मस्त स्टोरी!!!

कोंबडी प्रेमी's picture

29 May 2016 - 6:54 am | कोंबडी प्रेमी

दुसरं म्हणजे काही कारणांनी बुलेट पोहोचू शकली नसती तर पर्यायी सोय काय असती ?
आणखीन एक म्हणजे मध्ये त्या बुलेट चा कुणी मागोवा घेतो का ? म्हणजे तो कुठे आहे, कसा आहे वेग्रे ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 11:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

कोप्रे साहेब,
अहो मी आर्मी पोस्टल सर्विस कोरला नाहीये हो! किनभुना मी आर्मी मधेच नाहीये, त्यामुळे इतके बारीक़ डिटेल्स काही मला ठाऊक नाहीत, सदर कथा ही मी एकदा हिमवर्षावामुळे आमच्या छावणीमधे मुक्कामी राहिलेल्या पोस्टल सर्विसच्या एका वयस्कर माणसाने सांगितलेल्या अनुभवांवर लिहिलेली कल्पनिक कथा आहे

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 10:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

ईमेल कुठे अन कसे पाठवणार बोक्याभाऊ? लक्षात घ्या आपण इथे कायम सैनिक म्हणजे ओ आर (अदर रॅन्क्स) ते कमीशंड अधिकारी सगळ्यां बद्दल बोलतोय, आर्मी बहुतांश अश्या सतरा अठराव्या वर्षी भर्ती झालेल्या अन विलक्षण मेहनती अश्या भोळ्या पण राकट जवानांची बनलेली असते त्यातलेही बहुतांशी ग्रामीण पार्श्वभूमीची मंडळी असते, त्यांना कुठला आलाय ईमेल अन स्काइप? बरं फोर्सेस मधे जवानांना शिकवता येईलही मेल वगैरे सगळे दामटून पण घरी कसे? आजकाल पोरी शिकायला लागल्या म्हणून जवानांना पत्रे तरी नीट येतात नाहीतर आधी शाळेत जाते पोर किंवा गावातलाच पोस्टमैन पकडून पत्र साहजिकच बाळबोध अक्षरात लिहून घेतली जात, ते ईमेल अन स्काइप व्हायला अजुन वेळ लागेल कारण ते फ़क्त सैनिकांना नाही तर त्यांच्या फॅमिली ला सुद्धा आत्मसात करावे लागेल त्याला वेळ लागणार बघा,

बाकी

नुकतेच झालेले पोर किंवा (माझ्या केस मधे) बायकोच्या पहिल्या सणांचे फोटो हे मेल अन व्हॉट्सऍप ला पाहण्यात ती मजा नाही जी आलेली डाक सी ओ ऑफिस मधुन रिलीज़ झाली की आधाश्यासारखी पाकिटं फोडून वाचण्यात आहे.

बोका-ए-आझम's picture

30 May 2016 - 11:38 pm | बोका-ए-आझम

जो मजा हाथ की लिखावट को पढनेमे और जो नही लिखा है उसका अंदाजा लगानेमे है, वो इमेलमे कहां?

स्वामी संकेतानंद's picture

28 May 2016 - 7:32 pm | स्वामी संकेतानंद

जियो बाप्पू!
पडद्यामागच्या हिरोजना कड़क सल्यूट!

चांदणे संदीप's picture

29 May 2016 - 6:20 pm | चांदणे संदीप

काल्पनिक तर काय वाटले नाही. हा नक्कीच कुठल्या सैनिकाचा अनुभव असेल जो इथे शब्दांत उतरला आहे. कारण असेच थरारक अनुभव वडिलांकडून ऐकले आहेत तसेच त्यांचे एक जिवलग कारगिल युद्धात लढले आहेत त्यांच्या किश्श्यातूनही ती लढाई पाहिली आहे.

असो, MI रूम मुळे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या! मिलीटरी हॉस्पिटलमध्ये जी तातडी, तत्परता अन सेवाभाव दाखवतात तो अजूनपर्यंत दुसरीकडे पाहण्यात आलेला नाही. खाजगी किंवा सरकारी दवाखान्यातले वॉर्डबॉईज, नर्सिंग स्टाफ, असिस्टंटस् पाहिले की एक झोकून दंडवत घालावा वाटतो.

बापूसाहेब क्या बात, क्या लिखते हो आप. ऐसेही लिखते रहो!

जयहिंद!
Sandy

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 11:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

क्या बात है!! आर्मी बॉय का तुम्ही!! तुमच्या वडिलांस आमचा मानाचा "जय हिंद साबजी" सांगा

_/\_

(बालके) बाप्या

मस्त कथा पण खुप घाईत पूर्ण केली असं वाटलं, शुद्धलेखनाचं तंत्र थोडं बिघडल्यासारखं वाटलं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 11:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्या सल्ल्यावर नक्की काम करतो!आभार

नाखु's picture

30 May 2016 - 9:09 am | नाखु

(म्हणताय) म्हून काल्पनीक..
आम्च्या साठी फक्त खरीखुरी आणि मानवंदना देण्याइतकी जबराट..

सुरक्षीत म्हणून आळशी सिव्हीलीयन नाखु

राजाभाउ's picture

2 Jun 2016 - 6:54 pm | राजाभाउ

+१११११
>>(म्हणताय) म्हून काल्पनीक..
>>आम्च्या साठी फक्त खरीखुरी आणि मानवंदना देण्याइतकी जबराट..

असेच म्हणतो.

आतिवास's picture

30 May 2016 - 10:17 am | आतिवास

चित्रदर्शी कथा.

इन्दुसुता's picture

30 May 2016 - 10:57 am | इन्दुसुता

जय हिन्द!
जय हिन्द कि सेना !! Again and again!!
And yes, Hail the Motherland !

बदामची राणी's picture

30 May 2016 - 12:07 pm | बदामची राणी

+१

लयच मस्त बापू..!! फर्मास बापू स्टाइल !
आमचा सलाम पोहोचवा त्या पोस्ट्मनला !!!

बदामची राणी's picture

30 May 2016 - 12:06 pm | बदामची राणी

ईतक्या डीटेलमधे वर्णन प्रत्यक्ष अनुभवाशिवाय अशक्य! वर म्हन्टल्याप्रमाणे
जय हिन्द!
जय हिन्द कि सेना !!

स्वीट टॉकर's picture

30 May 2016 - 1:51 pm | स्वीट टॉकर

तुमच्या गोष्टीनी रोमांच उभे राहिले ! अजिबात काल्पनिक वाटंत नाही.

भारतीय नागरिकाचा, घास रोज अडतो ओठी |
सैनिकहो तुमच्या साठी, सैनिकहो तुमच्या साठी ||

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 11:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

काय गंमत आहे की नाही सर! तुम्हाला सैनिक भारी वाटतात अन मला दर्यावर्दी! तुम्हाला सैनिकांचे राष्ट्राप्रति असलेले डेडिकेशन आवडते अन मला सेलर लोकांचा निधड़ेपणा अन प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स! जमिनीवर पाय ठेवणे तरी सोपे हो चौबाजुला फ़क्त निळाशार समुद्र असताना त्याच्याशी झोंबुन सफरी करणे कर्मकठिण! ह्या जन्मी तर नाही शक्य पण पुढल्या जन्मी मी नक्कीच ब्रिज वर उभा राहून गरुडाच्या नजरेने समुद्र पाहात राहिल एकदिवस! हे रिजर्व्ड अन पेटेंट स्वप्न आहे आमचे

आभार बाप्या

शलभ's picture

30 May 2016 - 2:07 pm | शलभ

रोमांचक आणि थरारक..
भारत माता की जय.._/\_

शाम भागवत's picture

30 May 2016 - 4:08 pm | शाम भागवत

_/\_ _/\_ _/\_ _/\_

पद्मावति's picture

30 May 2016 - 4:21 pm | पद्मावति

_/\_

समीरसूर's picture

30 May 2016 - 4:28 pm | समीरसूर

एकदम जबरदस्त!!! काल्पनिक वाटत नाही. डिफेन्समध्ये कर्तव्य बजावणाऱ्या सगळ्यांना मानाचा मुजरा!

अजून येऊ द्या..

स्रुजा's picture

31 May 2016 - 1:08 am | स्रुजा

+१००

सोन्याबापू ___/\___

सखी's picture

30 May 2016 - 6:01 pm | सखी
सखी's picture

30 May 2016 - 6:01 pm | सखी
सखी's picture

30 May 2016 - 6:02 pm | सखी

थरारक! 24 तास/365 दिवस सीमेवर लढणा-या प्रत्येक जीवासाठी कर माझे जुळती!

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 May 2016 - 11:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

सर्वांचे आभार

स्वाती दिनेश's picture

30 May 2016 - 11:27 pm | स्वाती दिनेश

डोळ्यासमोर तो बुलेटवरून जाणारा आर्मी पोस्टमन आला, त्याची कारगिल बेस पोस्टपर्यंत पोहोचण्याची सगळी धडपड एखादा व्हिडिओ पाहतो आहोत अशी समोर आली.
स्वाती

नंदन's picture

31 May 2016 - 9:58 am | नंदन

असेच म्हणतो. अगदी चित्रदर्शी शैलीतलं लेखन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2016 - 9:50 am | डॉ सुहास म्हात्रे

खास सोन्याबापू स्टाईलमधील थरारक कथा !

फ्रंटलाईनवर लढणार्‍या सैन्याला सपोर्ट करणार्‍या दलांचे महत्व अनन्य आहे यात संशय नाही ! एक कडक सॅल्युट !!!

स्वीट टॉकर's picture

31 May 2016 - 1:33 pm | स्वीट टॉकर

सोन्याबापू ,
पुढच्या जन्मी तुम्ही दर्यावर्दी व्हालच. पण ट्रेलर याच जन्मी पाहायला काय हरकत आहे? अंदमानला जाणार्या आणि शिवाय सिंगापूरच्या आसपास फिरणार्या क्रूझशिपवर सफर करता येईल. (suffer नव्हे!)

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 May 2016 - 2:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुद्दाम मोह टाळतो आहे हो! ऊगा त्या दर्याला भिडायची नशा लागली तर नोकरी सोडुन डेक कॅडेट होईन अन घरच्यांच्या शिव्या खाईन :D

गमतीचा भाग वगळता आईडिया में दम है सर!

मी-सौरभ's picture

31 May 2016 - 6:08 pm | मी-सौरभ

जब्राट कथा..

Madhavi1992's picture

31 May 2016 - 9:55 pm | Madhavi1992

सोन्याबापू ___/\___

आदिजोशी's picture

2 Jun 2016 - 4:00 pm | आदिजोशी

कथा बुलेटसारखीच सुसाट सुटली. काल्पनिक आहे हे सांगितल्या शिवाय कळणार नाही. अप्रतीम.

मेघना मन्दार's picture

2 Jun 2016 - 5:24 pm | मेघना मन्दार

दंडवत !! सुरेख कथा ..

राजाभाउ's picture

2 Jun 2016 - 7:03 pm | राजाभाउ

बापु तुमच्या लिखाणाला आणि सैनिकांना दंडवत __/\__. बाकी तुम्ही म्हणताय म्हणुन(च) काल्पनीक नाहीतर चित्रपटा सारख डोळ्यासमोर उभ केलय सगळ.

अवांतर
पाकिस्तानी आर्मी शेलिंग करते आहे म्हणजे काय ? तिथ नक्की काय चालु होतं हे जरा समजाउन सांगा ना.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Jun 2016 - 9:41 pm | कैलासवासी सोन्याबापु

शेलिंग म्हणजे आर्टिलरी उर्फ़ तोफखाना दळ वापरून केलेले बॉम्बार्डिंग , ह्याचा मुख्य हेतु असतो शत्रूच्या सीमाभागात असलेले इंफ्रास्ट्रक्चर म्हणजेच रस्ते पुल चौक्या संगर अन बंकर वगैरे नष्ट करणे,आर्टिलरी गन च्या गेज नुसार त्याची रेंज म्हणजेच पल्ला ठरतो साधारणतः सीमेच्या ८ ते ३० किमी अशी वेरिएबल रेंज असते आर्टिलरी गन्सची म्हणजे तुम्ही तुमच्या आर्टिलरीला तुम्ही सीमेच्या जितक्या जवळ तुमचे आर्टिलरी पीसेस पोस्ट करू शकता तितके शत्रूच्या राज्यात तुम्ही आतवर मारा करू शकता अर्थात त्यात तुमच्या तोफा शत्रुने नष्ट करण्याची शक्यता सुद्धा वाढते हे वेगळे सांगणे न लगे. ह्याच काही कारणांमुळे आर्टिलरीच्या तोफा जितक्या लांब पल्ल्याच्या असतील तितक्याच हलक्या अन खोलायला जोडायला सोप्या किंवा मोबाइल असतील तितक्या त्या उत्तम मानल्या जातात तुर्तास भारतीय थलसेनेच्या विश्वासार्ह असलेल्या बोफोर्स (घोटाळ्यामुळे कुप्रसिद्ध झालेल्या) ह्या अतिशय चांगल्या गन्स असुन त्यांनी त्यांची उपयुक्तता कारगिल मधे सिद्ध केली मात्र आता भारतात डीआरडीओ ने विकसित केलेल्या १०० mm इंडियन लाइट फील्ड गन्स ह्या सुद्धा फाइनल टेस्टिंग पुर्ण करुन हळू हळू डिप्लॉय होत आहेत. आर्टिलरी पीस टेस्टिंग खुप रिगरस असते त्या तोफेला मणिपुर मेघालयचा पाऊस कारगिल अरुणाचलची थंडी अन राजस्थान मधल्या गर्मी मधे टेस्ट केल्या जाते त्या दरम्यान त्यांचा धातु किती आकुंचन अथवा प्रसरण पावतो त्याने गन्सची एक्यूरेसी किती प्रभावित होते हे पाहतात त्या सोबतच ती गन सुट्टी करुन ट्रांसपोर्ट करुन परत जोडायला किंवा टो करुन आर्मी ट्रक्स मागे जोडून किती लवकर परत डिप्लॉय करता येतात तो वेळ मोजला जातो तो कमीत कमी करायला अन चालवणाऱ्या सैनिकांना ती चालवायला सुलभ व्हावी म्हणून त्यांचे इनपुट्स घेऊन त्या प्रमाणे डिज़ाइन मधे बदल इंकॉर्पोरेट केले जातात मग तिला ऑपरेशनल क्लेअरेंस मिळतो.

बोफोर्स बद्दल खुप चांगले रिजल्ट आहेत सद्ध्यातरी ,कारगिल मधे त्या होत्या म्हणून इन्फंट्रीला प्रचंड मदत झाली त्या काळचे आर्टिलरी चे वेटरन सुबेदार अन मेजर वगैरे असलेल्या माणसासोबत बोलणे झाले होते एकदा त्याने सांगितले होते की बोफोर्स ची बॅटरी (तुकडी) इतकी अव्याहत आग ओकत होती की बरेच वेळा तिची नाल (बॅरल) उष्णते ने लाल होऊन जात असे तरीही आपल्या तोफखान्याने फय्यर थांबवली नाही कारण इरादा पक्का होता *"चाहे नाल पिघल जाए या शहादत आ जाए आर्टिलरी नहीं रुकेगी और अपने इन्फंट्री के भाइयों को सपोर्ट करती रहेगी" हा तो इरादा होता.

.

(आर्टिलरी पीसचं चित्र जालावरून साभार)

*हेच माझा आर्टिलरी मधे मेजर असलेला मित्रही सांगतो अर्थात तेव्हा आम्ही शाळुसोबती शाळेत होतो नंतर साहेब आर्मी मधे गेले अन आम्ही बॉर्डरमॅन झालो :)

-(आर्टिलरी फॅन)बाप्या

राजाभाउ's picture

3 Jun 2016 - 2:19 pm | राजाभाउ

ओके आता समजल . इतक सविस्तर उत्त्र दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

निशदे's picture

2 Jun 2016 - 8:34 pm | निशदे

तुफान...... कथेचा ओघ इतका झकास जमला आहे की बस्स!!!! अजून येउद्यात

निशाचर's picture

3 Jun 2016 - 9:39 pm | निशाचर

जबरदस्त कथा! _/\_

मोदक's picture

27 Jun 2016 - 4:01 pm | मोदक

जबरदस्त बापुसाब..

याच रस्त्याने अलिकडे येणे झाल्याने डिटेलिंग भिडले. __/\__

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 4:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

थँकयु कक्के!

पक्षी's picture

27 Jun 2016 - 6:17 pm | पक्षी

शत्रूने हमला केला आहे आणि आपण त्याचा रेंज मध्ये आहोत हे माहीत असून सुद्धा शांतपणे पाणी पिणे... ग्रेटच... आपण तिथे असतो तर जाम तंतरली असती. फाटून हातात आली असती.
रच्याकने,बिलकुल काल्पनिक वाटत नाही कथा, अगदी डोळ्या समोर घडतं आहे असं वाटलं