इंग्लिश विन्ग्लीश !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
27 May 2016 - 12:53 pm

मी इंग्रजी सिनेमे पाहण्याचे जवळजवळ थांबवल्यापासून माझ्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या नजरा वाढल्या आहेत. खरं म्हणजे माझ्या पाहण्या न पाहण्यामुळे या सिनेमांच्या लोकप्रियतेत किंवा अर्थकारणात काहीही फरक पडत नाही. फरक केंव्हा पडतो तर जेंव्हा चार लोकांत मी अमुक अमुक सिनेमा पहिला नाही असे कबूल करतो तेंव्हा.
"नाही...मी नाही पहिला अवतार"
"काय? तू अवतार नाही पाहिलास?", खुर्चीवरून उसळत माझा कलीग मला विचारतो.
"नाही"
"मूर्ख आहेस का तू ? तुला कळत नाहीये तू काय गमावलं आहेस!!!"

हे प्रातिनिधिक संभाषण नेहमी,"तुझे पता हैं तुने किसका कॅच छोडा हैं?" या आवेशात सुरु होतं. आणि शेवटी "गाढवाला गुळाची चव काय" यावर संपतं. आता मी इंग्रजी सिनेमे सहसा पाहत नाही यामागे हिंदी/मराठी सिनेमावर असलेले प्रेम, गोऱ्या लोकांचा राग, भारतीय संस्कृतीरक्षणाचा घेतलेला वसा असे कुठलेही कारण नसून, ' बा...आपल्याला कळत नाही" एवढे एकमेव कारण आहे. मला मान्य आहे की मी गाढव असेल,मला गुळाची चव नसेल वगैरे वगैरे. पण माझा गाढवपणा स्वत: पुरता मर्यादित ठेऊन जर मी इतर गाढवांना 'गुळाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम' यावर व्याख्यान देत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे? अरे बाबांनो..नाही ना झेपत आम्हाला !

"असं कसं झेपत नाही रे तुला ? इंग्लिश समजत नाही म्हणून? शिकला असशीलच ना?"

"इंग्लिश समजते! इंग्लिश सिनेमे नाही समजत !!"

"पण का ? ते फालतू हिंदी सिनेमे बरे समजतात.....इर्रीटेटिंग...इल्लॉजिकल ..होपलेस मुवीज !!"

"हे बघ बरेचसे हिंदी सिनेमे सुद्धा समजण्यापलीकडे असतात...इल्लॉजिकल असतात हे मान्य .पण सिनेमा फालतू होता असे म्हणण्याची मुभा असते तिथे. इंग्लिशचं तसं नाही...तो आवडावाचं लागतो."

"असं काही नाहीये"

" बरं...मग आजपर्यन्त तुला न आवडलेल्या एक तरी इंग्लिश सिनेमाचं नाव सांग."

"..............................................................................." (पंधरा सेकंदाचा पॉझ )

"आठवला?"

"अरे पण कितीतरी चांगले इंग्लिश सिनेमे आहेत त्याच काय?"

"हजारोनी असतील....पण त्यातला एकही इर्रीटेटिंग नव्हता? प्रत्येक सिनेमाच लॉजीक १०० टक्के कळलं तुला?"

"प्रत्येक सिनेमा १०० टक्के कळलाच पाहिजे असं काही नियम आहे का ?"

"नाहीये ना...पण मला कळला नाही असही म्हणता येत नाही! प्रत्येक इंग्लिश सिनेमावर ठरलेल्या कॉमेण्ट्स द्याव्या लागतात. त्या नाही दिल्या तर आपल्याला सिनेमा बघण्याची अक्कल नाही असे सांगितले जाते."
"कोणत्या ठरलेल्या कॉमेण्ट्स."

"सांगतो ना...ऑस्सम मुव्ही यार क्या कन्सेप्ट है (सिनेमा जितका आवडला तितका ऑस्समचा 'स्स' लांबवत न्यायचा) किंवा काय इफ़्फ़ेक्ट आहेत यार खूपच आवडले मला किंवा पेहले पार्ट से भी अच्छा बनाया इस बार किंवा धीस इज दी बेस्ट जेम्स बॉण्ड मुव्ही एव्हर!"

" मग त्यात काय चुकीच आहे ?"

"थांब ना जरा..सिनेमा आवडला किंवा कळला नसेल तर ह्याच कॉमेण्ट्स कश्या असतात बघ....अच्छी मुव्ही थी यार, कन्सेप्ट सबके समज मी नही आयेगा लेकीन (म्हणजे ह्याला कळलेला नाही!!) किंवा स्टोरी जाऊदे रे इफ्फेकट्स कसले आहेत बघ ना (म्हणजे स्टोरीत दम नाही!) किंवा मस्त बनाया इसबार..पेह्लेवाले पार्टसे ज्यादा कनेक्क्शन नही है ये अच्छा किया (अरे मग कशाला बनवला?) किंवा मुव्ही छोड रे...ग्यॅझेट्स देखे क्या बॉण्ड के !!( (आता हेच राहिलंय..बाजारातसुद्धा रिमोटवाल्या कार मिळतात आजकाल...एलइडी वाले घड्याळसुद्धा मिळतात)

“........................................ (पाच सेकंद पॉझ) म्हणजे काहीतरी बघण्यासारखं असतंच रे त्या सिनेमांमध्ये."

"पण ते जर मला नसेल बघायचं तर?"

"हे बघ त्याच त्याच घीस्यापीट्या स्टोऱ्या बघण्यापेक्षा हे बघणं केंव्हाही चांगलं"

"ज्युरासिक पार्क बघितला असशील ना?"

"तुला तो सुद्धा आवडत नाही? हद्द झाली आता!"

"मला खूप आवडतो तो सिनेमा..पण पहिल्या आणि दुसऱ्या सिनेमाच्या स्टोरीत काय फरक होता? तोच डायनासोर आणि तीच धावणारी माणसं...बरं एक- दोन वेळा कौतुक...तिसऱ्या सिनेमात काय वेगळं होतं? तीच घीसीपीटी स्टोरी."

"अरे पण शेवटी ज्युरासिक पार्क आहे तो...स्पीलबर्ग यार !!!"

"चल ठीक आहे...स्पीलबर्गच्या सन्मानार्थ सगळं मान्य...पण दुसरा डायरेक्टर डायनासोरच्या जागी गॉडझीला आणतो. स्टोरी बदलली ? तिसरा डायरेक्टर डायनासोर आणि किंगकॉँग यांच्यात भांडणं लावतो. चौथा किंगकॉँगला पोरीच्या प्रेमात पाडतो. सगळं किती लॉजीकल चाललंय नाही!!!"

"ते प्राण्यांचे सिनेमे सोड रे. त्याच्यासाठी तू सगळ्या इंग्लिश सिनेमांना नावं ठेवशील का?"

"मग कोणत्या सिनेमांविषयी बोलू? सिनेमांच्या कथेचे साचे ठरलेले आहेत. प्राण्यांच्या कथा,अंतराळातील कथा, समुद्री कथा, जगबुडीच्या कथा, अतार्किक संकटाच्या कथा, चोरीच्या सुरस कथा आणि महामानवाच्या कथा !! प्रत्येकवेळी तेच असते. फक्त कथेचं आवरण बदलते आणि उरते केवळ तंत्रज्ञान ! मी नावं ठेवत नाहीये. सुंदर सिनेमा हा कुठल्याही भाषेत बनू शकतो. त्याला इंग्लिशच्या कोंदणाची गरज नाही."

" तरी पण इंग्लिश सिनेमांचा फील वेगळाच असतो रे."

" आता या फीलगुड फॅक्टरवर काय बोलायचं? आता या फीलगुड फॅक्टरवर काय बोलायचं. एक शास्त्रज्ञ उगाचच एखादं आभासी जग तयार करतो. तिथं जाऊन मुळात अस्तित्वात नसलेल्या शत्रूंना मारतो. कश्याचा कशाला पत्ता नाही. कोण? कुठे ? कधी? कश्यासाठी? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत, पडले तर विचारायचे नाहीत. फक्त गुडी गुडी वाटून घ्यायचं.

"तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही."

तर अश्या प्रकारे फील गुड फॅक्टरवर येउन आमची चर्चा संपली. नंतर मी विचार करत होतो की आपण आजकाल बघत नाही वगैरे ठीक आहे पण जसा बऱ्याच लोकांना हिंदी/मराठी सिनेमे न बघण्याचा अभिमान असतो तसा मला इंग्लिशच्या बाबतीत आहे का?.......नाही ! आजही टीव्हीवर "Speed" किंवा "Independance Day" लागला की मी भक्तीभावाने पाहायला बसतो का?.....हो! फरक एवढाच आहे की त्याच भक्तीभावाने मी आजही "दिवार" बघतो आणि त्याच हक्काने "सुर्यवंशम" लाथाडतो. इंग्लिश सिनेमांच्याबाबतीत हे घडताना दिसत नाही. कारण एकंच....

"इंग्लिश सिनेमांचा फील वेगळाच असतो रे!!!!”
--चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

अभिरुप's picture

27 May 2016 - 1:52 pm | अभिरुप

लेखामधील विचारांशी पूर्णपणे सहमत.
आपल्यातील बहुतांशी लोकांना इंग्लिश सिनेमे समजत नाहीत याचा उगीचच न्यूनगंड वाटतो हे कटू सत्य आहे.

ब़जरबट्टू's picture

27 May 2016 - 2:10 pm | ब़जरबट्टू

बाकी इंग्लिश सिनेमे म्हणजे समजायला कठीणच हो. काय तोंडातल्या तोंडात पुटपुटत असतात, देव जाणे. भारतात एव्हढी स्पीडी इंग्लिश नसते, त्यामुळे सुरवातीला समजायचा त्रास होतोच. आजकाल खाली सब-टायटल देत असल्यामुळे तरी हा प्रकार सुसह्य झालाय. अर्थात सर्वच इंग्लिश सिनेमे चांगले नसतातच, किंबहुना अधिक बरबादच.. पहिले गती नव्हती समजण्यात. आता बघुन बघुन ब-यापैकी गती वाढलीय समजण्याची.. बाकी त्यांच्या कल्पनाशक्तीचे आपण पंखे आहोत बा.. झपाटलेला आता नाही झेलू शकणार पण X-Men हमखास आवडतोच..

सामान्यनागरिक's picture

27 May 2016 - 2:36 pm | सामान्यनागरिक

शास्त्रीय गाणी ऐकतांना सुद्धा अशीच पंचाईत होते. समजत तर काही नाही पण उगीचच मान डोलवायची, इतरांनी वाह वाह केली की आपणही करायची ! नंतर वर्णन करतांना ' काय आवाज आहे ! स्वर्गीय ' असं बोलत राहायचं ! कारण, जर काही समजले नाही असे मान्य केलं तर ' किती क्षुद्र जीव आहे हा !' अश्या नजरेने आपल्याकडे पहातात.

मला वाटतं की अश्या माणसांसाठी एखादा ' एनॉनिमस ' ग्रुप' चालू करायला हवा . इंगलीश सिनेमे, शास्त्रीय संगीत ह्या गोष्टी कळल्या नाही तरीही आपण माणूसच आहोत याचस विश्वास त्यांना देण्यासाठी समूपदेशन देण्यात यावे !

मृत्युन्जय's picture

27 May 2016 - 2:47 pm | मृत्युन्जय

सहमत आहे. मी पण सहजी समजेल असेच इंग्रजी पिक्चर बघतो.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

27 May 2016 - 3:04 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मला तर भारतातील इंग्रजीही नीट समजत नाही,इंग्लिश पिक्चरचे तर लांबच,शुड वुड कुड या ऑक्झीलरी वर्बचा वापर कुठे आणि कसा करतात हे अजुनही लवकर ध्यानात येत नाही,भुतकाळात वापरलय कि कंडीशनल सेंटेंन्समध्ये याचाही गोंधळ उडतो.सबटाईटल्स हा गाढव प्रकार आहे ,पिक्चर पाहायचा की सबटाईटलाचा अर्थ लावत बसायचा याचाच गोंधळ उडतो.

पण तरीसुद्धा इंग्रजीमध्ये देखील वेगळ्या वाटेवरचे मूव्हीस पण येत असतात. मध्ये न्युरेन्बर्गवरचा एक मूव्ही बघत होतो. तो म्हणा किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगवरचे काही इंग्रजी मूव्हीझ खरेच बघण्यासारखे आहेत. समजत नसले तरी ते मूव्हीझ बघून समजून घ्यायचा प्रयत्न करतो.
कलेला भाषेचे बंधन नाही.

अश्विनी वैद्य's picture

27 May 2016 - 3:26 pm | अश्विनी वैद्य

लेखाशी पूर्णपणे सहमत…आता कधी कोणी चीनी, रशियन सिनेमे बघत असल्याचेही कौतुक मिरवते…पण म्हणून जे बघत नाहीत त्यांनी न्यूनगंड कशास बाळगा…आवड प्रत्येकाची …
तसेही कलेला भाषेचे बंधन नसतेच

ईश्वरसर्वसाक्षी's picture

27 May 2016 - 3:33 pm | ईश्वरसर्वसाक्षी

मस्त रे...... भात्यातला आणखि एक बाण काढलास भाउ.

वेगळी मातृभाषा असणाार्‍य् लोकांची बोलण्याची पद्धत ही एकाची दुसर्‍य्यालापटकन कशी समजणार
त्यासाठी प्रॅक्टीसच पाहीजे. मला इंग्लिश पुस्तक वाचून एवढे समाधान वाटत नाही जेवढे
मराठी वाचून मिळते. सो लेखक बरोबर आहे.

चिनार्या मस्त रे !!!

कंपनीतही काही महाभाग किल्ला/शाळा/बालक पालक बद्दल सांगताना (एक चार पाच जण त्यातही अमराठींपेक्षा मराठीच आग्रहाने जास्त) इंग्रजीच गुणगाण करीत होते आणि कारण नसताना मराठी म्हणजे ह्या (भिक्कारच) असा पवित्रा घेतला होता. मी नेटाने किल्ला लढवून तुम्ही किती मराठी पहिलेत (आणि ते रद्दड का वाटले ते सांगा) उदाहरण म्हणून त्यांनी स्वतः न पाहिलेले पण ऐकीव एक दोन सिनेमाची नावे सांगीतली मितवा/तू ही रे का काय ते. ( आणि पाहिलेल्या इंग्रजी सिनेमाबद्दल सांगा म्हटल्यावर... जुळवा जुळव सुरू झाली )

तेच कथा सांग म्हटलं की इफेक्ट्/टेक्निक बघ्,अभिनय म्हटल्म की कसला स्पीड आहे कथेत आणि लोकेशन्पण लै भारी याच पालुपद. मलाही अभिनयासाठी काही इंग्रजी सिनेमे (मोजकेच पाहिलेत कास्ट अवे सारखे )आवडले आहेत. जॅकी चैनचे कथेपेक्षा करामतींम्साठी आवडतात, पण उठ्सूट मराठी/हिंदीला नावं ठेवणे रुचत नाही. अगदीच टाकाऊ तर इंग्रजीत पण असेलच की, आप्लयाला माहीत नाही म्हणून सगळं कसं भारी आणि लै भारी असं नको.

अलिकडेच जंगलबुक (हिंदीतला) कन्येबरोबर बघितला, तीला कळाला+आवडला बरे वाटले.

चिनार's picture

27 May 2016 - 4:17 pm | चिनार

धन्यवाद !!

अनिरुद्ध प्रभू's picture

27 May 2016 - 4:20 pm | अनिरुद्ध प्रभू

आमच्या मित्राचे उवाच आठवले....

एक विचारु का रे.....तुझ्या त्या अमेरिकन पिक्चरमधे, जवळपास सगळ्या,लोक एफ बी आय मधे असतात...याचा अर्थ काय तिथली ६०% जनता काय एफ बी आय मधे आहे का रे, **********???? लोजिक सांगतोय

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 4:32 pm | नाईकांचा बहिर्जी

मला इंग्लिश नीट समजते तरीही बहुतेक इंग्लिश सिनेमे फालतू वाटतात! त्यापेक्षा युट्यूब वर प्रभुजींचा "गुंडा" पाहणे बरे! शिवाय मला जवळपास 99 % इंग्लिश पिच्चरात एक नवल वाटते जगबुडी, झोंबी हल्ले होत असताना, ऐन युद्धाच्या मधे, प्रचंड जगड्व्याळ सुनामी किंवा पृथ्वी हलवणाऱ्या भूकंपात किंवा एखादा परमाणु बॉम्ब डीफ्यूज करताना सुद्धा हीरो/हीरोइन ला हीरो/हीरोइनचा एक प्रेमाने ओथांबलेला मुका घ्यायला कसे सुचते/साधते हे अगम्य आहे मजला! ती का स्क्रिप्ट ची गरज असते का त्यात काही इफ़ेक्ट असतो देव जाणे

अहो भर महाभारतीय युद्धाच्या धुमश्चक्रीत कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलीच की.

अर्थात - लेखकाच्या मनात असेल तर काहीही शक्य आहे.

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 8:22 pm | नाईकांचा बहिर्जी

हॉलीवुड मधील एका अतार्किक अवेळी अस्थानी घेतलेल्या मुक्याची तुलना साक्षात् मधुसूदनाने दिलेल्या दिव्यबोधाशी तुलना केलेली पाहून मी 84 लक्षचा एक पुर्ण फेरा वारलो आहे

______/\_______

(हलके घ्या त्रास नको)

एक प्रेमाने ओथांबलेला मुका घ्यायला कसे सुचते/साधते हे अगम्य आहे मजला!

जबराट !!!

मुक्त विहारि's picture

27 May 2016 - 4:41 pm | मुक्त विहारि

कृपया खालील सिनेमे जरूर पहा....

१. वेट अंटील डार्क. (इंग्रजी सबटायटल मध्ये उपलब्ध आहे.)

२. साउंड ऑफ म्युसिक. (इंग्रजी सबटायटल मध्ये उपलब्ध आहे.)

३. शटर आयलंड (हिंदी मध्ये उपलब्ध आहे. आणि इंग्रजी सबटायटल मध्ये देखील.)

४. व्हाय वरी (मुकाभिनय)

५. सेफ्टी लास्ट (मुकाभिनय)

हे ५ सिनेमे जर नाही आवडले किंवा नाही समजले तर, जरूर कळवा.

पण आधी निदान एकदा तरी बघाच.वेळ नक्कीच वाया जाणार नाही.

मी हिंदी-मराठी सिनेमे का बघत नाही? तर त्याचे अर्थकारण मनाला पटत नाही म्हणून.

१९८०च्या सुमारास दावूदने भारत सोडला आणि मी पण त्याच सुमारास मुद्दामहून (पदरचे पैसे खर्च करून) हिंदी सिनेमे बघणे सोडले, हा निव्वळ योगायोगच आहे.

चिनार's picture

27 May 2016 - 4:49 pm | चिनार

मुवी काका,

तुम्ही सांगितलेले सिनेमे जरूर बघेल. कदाचित याहीपेक्षा चांगले इंग्रजी सिनेमे मी बघितलेले आहेत.
आक्षेप आहे तो, "इंग्लिश आहे म्हणून तो बेस्ट्च आहे आणि हिंदी/मराठी आहे म्हणून फालतू या मानसिकतेला.

वपाडाव's picture

27 May 2016 - 6:06 pm | वपाडाव

आम्च्या पाहणीत पण अशेच एक वल्ली आहे... ज्यंना विन्ग्रजी शिनुमाचा लय माज आहे..
येता जाता माय मराठी शिनुमाला श्या देत असतेत... एकदा त्यांना साइडला घ्यायचे आहे.

घीवूच रे एखांद्या क्वाटरवेळी.
मला बी लै काव आलाय. ;)

प्रचेतस's picture

27 May 2016 - 7:08 pm | प्रचेतस

कोणाला रे?

अभ्या..'s picture

27 May 2016 - 7:40 pm | अभ्या..

काय रे?
काय झाले?

प्रचेतस's picture

27 May 2016 - 7:41 pm | प्रचेतस

कुणाला साइडला घ्यायचं म्हणालास.

.....आणि हिंदी/मराठी आहे म्हणून फालतू या मानसिकतेला."

अशा लोकांना चार हात दूरच ठेवणे योग्य आणि काही कारणांमुळे ते जमत नसेल तर, ऐकून सोडून द्यायचे.

जव्हेरगंज's picture

27 May 2016 - 9:20 pm | जव्हेरगंज

यूटूबवर हाईत काय?
लिंका द्या की राव!!

ओ ते परवा जीओटी जीओटी कुठे गेले?

रमेश भिडे's picture

27 May 2016 - 9:32 pm | रमेश भिडे

हॉस्टेल मध्ये एकाच आशेने इंग्रजी चित्रपट बघायचो.
'अबे चूप बैठ सीन है!'

चिनार's picture

30 May 2016 - 9:34 am | चिनार

आम्ही पण हेच करायचो..
सिनेमा बोअर होत असला की फोरवर्ड करून करून सीन शोधायचो :-)

मस्त.. नेहमीप्रमाणेच भारी लिहिले आहे!

कथांचा एक साचा राहिला .. "Based on a true story"! एकदम अशा भन्नाट विषयांवर नसले की मग ते कथानक "true story" वर आधारीत असते.

बाकी रशियनांनंतर हॉलिवूडवाल्यांना पृथ्वीतलावर कुणीच त्यांचा शत्रू शोभेल या योग्यतेचे वाटले नाहीत.. त्यामुळे एलियन्स, डायनॉसॉर यांचीच उपस्थिती जास्त.

लालगरूड's picture

28 May 2016 - 7:03 pm | लालगरूड

unstoppable
inception
the core
martian

महामाया's picture

28 May 2016 - 11:10 pm | महामाया

मी बघितलेला पहिला इंग्रजी चित्रपट होता चार्ली चैपलिन चा दि ग्रेट डिक्टेटर। पार डोक्यावरुन गेला। पण चार्ली बघायला इंग्रजी येणं सक्तीचं नाही। मजा आली। लगेच इतर इंग्रजी चित्रपट बघायला लागलो, असं म्हणता येणार नाही। पण टीवी नुकतांच आला होता। जबलपुरला आतोबा होते-प्रभाकर गणेशपुरकर। ते विंबलडन ची मैचेस बघायचे। एका दिवसांत क्रिस एवर्ड लायड चे आपण पंखे झालो। ते तिसरया मजल्यावर चढून तिथे बसून रेडियोवर आस्ट्रेलिया-इंग्लैंड ची टेस्ट मैच ऐकायचे। या दरम्यान कुणाला रेडियोला हाथ लावायची परवानगी नव्हती। साधारण याच काळांत दूरदर्शन वर तिसरया शुक्रवारी रात्री सव्वा अकरा पासून इंग्रजी चित्रपट सुरू झाले। त्यांत वेट अंटिल डार्क, हिचकॉकचा स्पेलबाउंड, दि लास्ट एंपरर बघितले।

आता नुकत्याच मैट्रिक झालेल्या हिंदी मीडि़यमच्या मुलाला कितीसं इंग्रजी समजलं असणार? पण आतोबां मुळे लॉन टेनिस समजू लागलं। प्वाइंट्स कसे मोजतात, ऐस काय असते। तसंच रेडियोवर कमेंट्री म्हणजेच इंग्रजी ऐकायची सवय जडली।

काही योगायोग देखील असावेत। स्टार मूवी घरच्या टीवीवर सुरू झाला, पहिलाच पिक्चर होता दि सांग ऑफ बेरनाडेट।
टीएनटी वर नजर गेली ती फ्रेड अस्टेयर च्या ब्रॉडवे मैलोडी ऑफ १९४० मुळे। रोनाल्ड कोलमन चा प्रिजनर ऑफ झेंडा, रेंडम हार्वेस्ट नी मजा आली। रेंडम हार्वेस्ट बघतांना जॉय मुखर्जी-साधनाचा एक मुसाफिर एक हसीना आठवला।
हे चित्रपट बघतांना जाणवलं की हे देखील आपल्या हिंदी चित्रपटांसारखेच की, म्हणून मग मजा यायची।

तर्राट जोकर's picture

29 May 2016 - 7:44 pm | तर्राट जोकर

तंतोतंत माझेच विचार. आपली रास एकच आहे बहुतेक.

बर्‍याच प्रतिसाद्कांना चिनार ला काय म्हणायचे आहे हे कळलेले दिसले नाही. कोणते इंग्रजी चित्रपट बघितले पण फालतू वाटले ह्याबद्दल कोणीच लिहिले नाही...? माझ्याकडे लिस्ट आहे. नंतर आठवून टंकतो.

गॅरी ट्रुमन's picture

30 May 2016 - 10:35 am | गॅरी ट्रुमन

एक गोष्ट कळत नाही. अमेरिकन लोक रोजच्या आयुष्यात बोलतात तेव्हा ते काय बोलत आहेत हे अगदी आरामात समजते, अमेरिकन लोक भाषण करत असतात तेव्हाही समजायला काहीच अडचण येत नाही.किंबहुना रोजच्या आयुष्यात बोलताना किंवा भाषण करताना बहुतांश वेळी अमेरिकन लोकांचा वेग त्या मानाने हळूच असतो.पण मग चित्रपटात हेच लोक इतक्या वेगाने का बोलत असावेत?

त्यांना लय घाई असते ट्रुमन भाऊ

नाखु's picture

30 May 2016 - 12:13 pm | नाखु

ओठातल्या ओठात असल्याने ते ओठात पुट-पुट्पुटल्यासारखे बोलत असावेत असा कयास आहे नक्की माहीती अद्या-प्रगो आणि वल्लीच देऊ शकतील.

कळनेबल सिनेमा बघणारा नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jun 2016 - 9:26 am | डॉ सुहास म्हात्रे

त्यांना चित्रपट अडीच-तीन तासाऐवजी दीड तासात संपवायचे असतात त्यामुळे असेल कदाचित् (खखो अर्नोल्ड स्वाझेनेग्गर / स्पीलबर्ग जाणे) :) ;)

मला आजवर एक गोष्ट कळू शकली नाहीये की एखादा इंग्रजी सिनेमा बघितल्याचा/ आवडल्याचा या लोकांना इतका अभिमान का असतो ? कौतुक तर इतके की जणू काही स्पीलबर्ग किंवा नोलानने यांचा सल्ला घेऊनच सिनेमा बनवला आणि एवढंच नव्हे तर ह्यांच्या परसातल्या बागेतच शूटिंग झालंय बरचसं !

चांदणे संदीप's picture

30 May 2016 - 11:19 am | चांदणे संदीप

=))=))=))=))=))=))

समीरसूर's picture

30 May 2016 - 4:54 pm | समीरसूर

उत्तम लेख! आवडला.

इंग्रजी सिनेमेदेखील भयानक असू शकतात. मी 'फिफ्थ एलेमेंट' नावाचा अतिभंगार सिनेमा पाहिला होता. 'वर्ल्ड वार्झ' हा असाच एक भिकार सिनेमा. अजून बरेच आहेत. आत्ता आठवत नाहीयेत. मला ते अजस्त्र मशिनरीचे देह असलेले माणूससदृश्य राक्षस हातात बंदुका वगैरे घेऊन फिरतात तसले इंग्रजी सिनेमे लैच भंगार वाटतात. आणि लेखात म्हटल्याप्रमाणे डायनोसोरच्या पिक्चर्समध्ये तीच तीच कथा! अनाकोंडाच्या सगळ्या भागात तीच कथा. लेक प्लासिड असो की अजून तो मगरीचा सिनेमा असो...कथा सेम! नुसती तंत्राची दिवाळी बघून कितीसं मन रमणार? मजा नही आता.

पण इंग्रजी सिनेमाची हाताळणी, पटकथेवरचं काम, कथेची बांधणी, अभिनय, तंत्रकुशलता, इत्यादी बाबी खूप सरस असतात हे खरे. मी नुकताच 'द रेवेनंट' पाहिला. लिओने आणि त्या व्हिलनने काय काम केलंय! वा!
पटकथा, चित्रीकरण खूप छान आहे पण कथेत थोडा गंडल्यासारखा वाटला. उगीच जास्त खेचलाय आणि लिओ व्हिलनला कसा शोधणार याची योजना फसल्यासारखी वाटते. अडीच तासाऐवजी पावणे दोन तासात सही जमला असता. एनीवे. पण इंग्रजी सिनेमाच्या खुबी बर्याच आहेत.

सिटीझन केन - अतिशय सुरेख चित्रपट
गॉन विथ द विंड - उत्कृष्ट. विवियन ली जबरा. क्लार्क गेबल अव्वल!
शायनिंग - हॉरर चित्रपटांचा बाप! जेक निकोल्सन खतरनाक!
कासाब्लांका - एकदा बघाच. सुरुवातीच्या संगीतावरच मी फिदा झालो होतो. कथा सोल्लिड!
स्कारफेस, कसिनो, टेक्सी ड्रायवर - क्लासिक न्यू योर्क पट, बेफाट!
व्हाट लाईज बिनीथ - थरारक
अन्स्टोपेबल - रंजक!
मार्शियन - भारी!
द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय - अफलातून पिक्चर!
मेकेनाज गोल्ड - मस्त!
द गुड द बेड द अग्ली - तांत्रिकदृष्ट्या इटलीचा सिनेमा पण इंग्रजी होता. जबरदस्त!

इंग्रजीमध्ये उत्तमोत्तम सिनेमे होते आणि आहेत. इंग्रजी सिनेमांचा आवाका, त्यांच्यातली विषयांची विविधता, कल्पनाशक्तीची झेप, प्रगल्भता, इत्यादी गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत हे खरं पण म्हणून बाकी सिनेमे भिकार हे साफ चुकीचं आहे. इंग्रजी चित्रपटांना चांगलं म्हणण्यासाठी बाकी चित्रपटांना नावे ठेवायची हा फालतूपणा आहे. आणि इंग्रजी चित्रपट आहे म्हणून त्याला नावे ठेवायचीच नाहीत हा हरामखोरपणा आहे. आणि असे जीव माझ्या पाहण्यात आहेत. मोप आहेत.

चिनार's picture

30 May 2016 - 5:48 pm | चिनार

धन्यवाद समीर भाऊ !

आणि इंग्रजी चित्रपट आहे म्हणून त्याला नावे ठेवायचीच नाहीत हा हरामखोरपणा आहे.

हे वाक्य मी ," मिष्टर धनंजय माने हा शुद्ध हलकटपणा आहे" या चालीवर वाचलं :-)

इंग्रजीमध्ये उत्तमोत्तम सिनेमे होते आणि आहेत. इंग्रजी सिनेमांचा आवाका, त्यांच्यातली विषयांची विविधता, कल्पनाशक्तीची झेप, प्रगल्भता, इत्यादी गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत हे खरं पण म्हणून बाकी सिनेमे भिकार हे साफ चुकीचं आहे. इंग्रजी चित्रपटांना चांगलं म्हणण्यासाठी बाकी चित्रपटांना नावे ठेवायची हा फालतूपणा आहे. आणि इंग्रजी चित्रपट आहे म्हणून त्याला नावे ठेवायचीच नाहीत हा हरामखोरपणा आहे. आणि असे जीव माझ्या पाहण्यात आहेत. मोप आहेत.

साली अशी कुर्कुरीत आणि मिरचीची भजी कशी बनेनात आमच्याकडून तेव्च कळेना..

मुदलातच गंडलेला मुदपाकी नाखु

अभिजीत अवलिया's picture

3 Jun 2016 - 8:35 am | अभिजीत अवलिया

चिनार, अगदी माझ्या मनातले लिहिले आहात तुम्ही. मी पण इंग्रजी सिनेमे अजिबात बघत नाही. कारण मला ते समजत नाहीत. एकाच बोटीचे प्रवासी आहोत आपण.

चिनार's picture

3 Jun 2016 - 9:40 am | चिनार

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

3 Jun 2016 - 12:12 pm | मराठी कथालेखक

एकदम मस्त , खुसखुशीत लेख..
मी आजपर्यंत फक्त दोन (हो दोनच) इंग्लिश चित्रपट चित्रपटगृहात जावून पाहिले. त्यापैकीही स्वेच्छेने आणि तो ही दोन वेळा पाहिलेला एकच ..टायटॅनिक. हा मस्तच होता. आवडला, फक्त इफेक्ट्ससाठीच नाही तर नायक नायिकेच्या प्रेमासाठीसुद्धा..
दूसरा जबरदस्ती एका कंपूत पाहिला 'Guardians of the Galaxy' अतिशय टूकार, कंटाळवाणा. रिकाम्या चित्रपटगृहात फक्त आमचाच कंपू (९-१० होतो बहूधा) होता. त्यातले दोघे उठून बाहेर भटकायला गेले. एकाला झोप लागली, एक दोघांनी नाही आवडला, ठीक होता वगैरे प्रतिक्रिया दिल्यात तरी 'सही होता, आवडला' म्हणणारे दोन-तीन जण निघालेच. असो.

तुम्ही म्हणताय तस मलाही उच्चार समजायला खरचं अवघड जातं, शिवाय subtitles वाचायचे म्हंटले तर screen कडे एकाग्र होवून पाह्ता येत नाही , चित्रपट बघण्यातली निम्मी मजा निघून जाते. मी DTH मध्येही English Movies pack घेतलेला नाही.

बाकी मी हिंदीमध्ये डब असलेली आवृत्ती इंटरनेटवरुन घेवून वा (हिंदीवाल्या) चॅनेलवर आली तर कधीतरी बघतो.
मलाही ते sci-fi फारसे आवडत नाही. Gravity हौसेने बघितला पण नाही आवडला.
मला आवडलेले काही (हिंदी आवृत्ती बघितली होती)
Vertical limit
The Karate Kid
The next Karate Kid
United States of Leland हा अर्धवट बघायला मिळाला पण चांगला वाटला

अजून एक चित्रपट आहे ज्याचे मला आता नाव आठवत नाहीये. त्यात नवरा घरच्या काही जबाबदार्‍या आणि कामातील ताण या दोन आघांड्यावर लढताना वैतागलेला असतो, आयुष्यात नुसती गडबड , काहीच नीट होत नाही.. ना बॉस खूश ना बायको अशा परिस्थितीत स्वतःचा एक क्लोन निर्माण करतो आणि त्याच्या मदतीने सावरण्याचा प्रयत्न करतो. पण sci-fi वा fantasy पेक्षा मला हा कौटुंबिक व प्रतिकात्मक तसेच पुरुषांना विचार करण्यास प्रवृत्त करणारा असा वाटला. म्हणजे बायको दोन आघाड्या (घर, करीअर) यशस्वीपणे सांभाळते पण एकट्या पुरुषाला मात्र ते जमत नाही त्याला ते एकाचे नाहीतर दोघांचे काम वाटते असं काहीसं. कुणी नाव सांगू शकेल का या चित्रपटाचं ?

एकूणातच इंग्लिश चित्रपट एकसूरी वा कंटाळवाणे असतात असं मी नाही म्हणणार पण भारतात चित्रपटगृहात येणारे तरी बहूधा तसेच असतात. दर्जेदार चित्रपट मुद्दामच शोधावे लागतात किंवा चुकुन एखाद्या चॅनेलवर सापडू शकतात.

सतिश पाटील's picture

3 Jun 2016 - 12:44 pm | सतिश पाटील

अगदी अगदी..बरोबर
आमच्या हापिसात आणि सोसायटीच्या कट्ट्यावर सुद्धा असल्या इंग्रजी सिनेमांची फार चवीने चर्चा चालू असते.मी मात्र चेहरा शून्यात ठेवून कधीच त्यांच्या चर्चेत सहभागी होत नाही.
असल्या सिनेमांच्या तर म्हणे मालिकाच असतात. काही हौशी लोक तर त्या सिनेमाच पात्र कधी कुठे काय करीत होत, पासून तो किती कमावतो आणि कुठली गाडी वापरतो इथपर्यंत सामान्य ज्ञान पाजळत असतात.

एक दोनदा मी मित्रांसोबत या असल्या फिक्शन आणि वॉर टायीप सिनेमा पाहायला गेलो, तिकीट अव्वाच्या सव्वा, सिनेमात ते काय बडबड करीत असतात हे ढेकळ कळत नाही. जे दाखवतात ते पटत नाही.असं वाटत होत कि विदिओ गेम मोठ्या पडद्यावर पाहतोय. नायिका मात्र कडक असतात. माझ्या मते तेच पाहण्यासारखे असते.त्यात १५०-२०० रुपयाच्या मक्याच्या लाह्या त्याला हे लोक पोपकोर्ण म्हणतात, जे नाही घेतलं कोक सोबत तर कोण हा भिकारडा बसलाय इथे अश्या नजरेने पाहतात. इंग्रजी मधले भुताचे सिनेमे मात्र आवडीने जाऊन पाहतो, कळत तर त्यातही काही नाही पण भीती वाटली भूत पाहून कि मजा वाटते.

एकूण काय तर 500-६०० रुपये खर्चून काही कळत नाही असा सिनेमा पाहणे मला परवडत नाही.
एक दोनदा मी मित्रांना अशीच इंग्रजी सिनेमांची चर्चा चालू असताना, " चला न आपण पिंजरा किंवा भो-भो पाहायला जाऊ " असे म्हटले तर त्यांनी अगदी क्षुद्र नजरेने पहिले. " शी पिंजरा? कसले सिनेमा पाहतो रे तू? आणि भो-भो काय आहे?

मला वाटते कि इंग्रजी सिनेमे पाहणारे बरेच लोक उगाच आपले " स्टेटस" सांभाळण्यासाठी किंवा ग्रुप मध्ये चर्चा करता यावी आणि भाव खावा यासाठीच पाहत असावीत.
इंग्रजी येणाऱ्याला ज्ञानी समजणे हि एक अंधश्रद्धाच आहे. असे कुठेतरी वाचलं होते.

हिंदी सिनेमे पाहणे सोडून दिलाय, उगच साले आपल्या जीवावर पैशे कमावून आपल्याच देशाविरोधात वक्तव्य करीत फिरतात. हिंदीतही बरेच सिनेमे टुकार असतात.शेवटचा हिंदी सिनेमा पहिला होता तो द्रूशम. आवडला होता.
हटकून फक्त मराठीच पाहतो, तिकीट परवडते, आणि सिनेमाही समजतो.मराठीतही टुकार सिनेमे असतातच. उदाहरणार्थ- रितेशचा लय भारी.

एकूण काय माझा पैसा आणि मी काय पहायचं,हे मीच ठरवणार.
एखादा इंग्रजी पाहतो म्हणून तो प्रत्येकाने पाहावा अस काही नाही.

सिरुसेरि's picture

3 Jun 2016 - 1:04 pm | सिरुसेरि

द कंजुरिंग आणी राँग टर्न हे पिच्चर भारी वाटले .

अनिरुद्ध प्रभू's picture

3 Jun 2016 - 1:07 pm | अनिरुद्ध प्रभू

दोन्ही फिल्म्स आवडल्या....द डा विन्चि कोड आणि एंजल्स अअँड डिमोन्स....

पैसा's picture

3 Jun 2016 - 2:24 pm | पैसा

:D एकदम खुसखुशीत!

राजाभाउ's picture

3 Jun 2016 - 2:54 pm | राजाभाउ

मझी फिल्ल्म्बाजी मध्ये कणेकरानी मस्त खिल्ली उडवली आहे इंग्लीश चित्रपटांची ते आठवल.