ढोरवाडीचा कट्टा

घाटी फ्लेमिंगो's picture
घाटी फ्लेमिंगो in जनातलं, मनातलं
27 May 2016 - 12:21 pm

काही दिवसांपुर्वी MSEB ने मागेल त्याला वीज कनेक्शनची योजना जाहिर केली. दिखाव्यासाठी काही कनेक्शनही तडका-फडकी दिली. एकीकडे हजारो कनेक्शन तिष्टत कंटाळलेली असताना ही विसंगत कृती पेपर मध्ये छापून देण्याचा आगाऊपणाही केला. त्याविषयी...

ढोरवाडीचे सरपंच आन्ना जमदाडे हापिसात रिकाम्या फाईलीनी वारा घेत डोस्क्यावरच्या बंद फॅनकडं रागारागानं बघत बसल्यात तवंर ग्रामशेवक दादू तिथं पोचतो.

दादू: आन्ना... आन्ना... घात झाला की हो आपला...!

आन्ना: (घामाच्या धारांनी आधीच वैतागलेले आन्ना अजून काव काढत खेकसतात.) ऎ... उन्हाच्या पारात असं बोंबट्या मारत येत जाऊ नकोस म्हनून कितीयेळा सांगितलं रं तुला...!?

दादू: हा... आन्ना... बोंबट्या मारु न्हाय तर काय करु...!? तुमी इतं लोकांचे लाईट कनेक्शनचे अर्ज फाडून ह्या रिकाम्या फाईलीनं वारा घेत बसले... अन तिकडं शहरात बगा... ’मागेल त्याला लाईट कनेक्शन देनार’ अशी योजना राबवली सरकारनं...! आता सरपंच ह्या नात्यानं तुमीच बगायला नको गावाचं बरंवाईट...!? असल्या योजना आनल्या न्हाईत तर म्होरच्या निवडनुकीला कुत्र तरी उबं करल का आपल्याला दारात...!?

आन्ना: (दादूच्या ह्या आगाऊपनामुळं आन्नाचं मेंटाल पार भडकलं...! कानाखाली मारायच्या आवेशात दादूच्या अंगावर जात.) आता ह्यो शहानपना तु मला शिकवनार व्ह्यय रं... अक्कल नाय काडीची अन गाठ सुटंना नाडीची...! न्हाई संद्याकाळपर्यंत तुज्या शेताचं पानी तोडलं तर नावाचा आन्ना जमदाडे न्हाई बग मी...!

(मागं एकदा रामू कुंभाराच्या गाडवाच्या मागं उबं राहून शेपटी ओड्न्याचा प्रसाद दादूला मिळाला व्हता. आज सायबाच्या पुडं गेल्यावर तिच वेळ आली व्हती त्याच्यावर. एकदम अंगाला कापरं सुटल्यागत करत आन्नांच्या पायाशी पडत.)

दादू: न्हायजी... न्हाय... आपन आमचं सरकार... मायबाप... अन्नदाते...! मला माफ करा सरपंच. सकाळी सकाळी बायकोनी नव्या फ्रिजसाठी लै तोंडं केली बगा. हितं बारा-बारा तास लोडशेडींग अन फ्रिज कुनाच्या मढ्यावर घालायचाय...!? त्यात त्या कुलकर्नी मास्तरनी कायबाय पेपरात आलेलं वाचून दाखवलं... म्हनुन वैतागुन बोललो तुमाला. एकडाव शेन खाल्लं. माफी करा. पुन्यांदा असं कदी बी होनार नाय.

(दादूच्या विनवण्यानं आन्ना जरा थंड झाले. तवर लोड्शेडींग संपुन टकुर्यावरचा फॅन फिराया लागला. दादूचा आगाऊपना असला तरी हि बातमी आन्नांनी बी सकाळी पेपरात वाचलीच होती. ते आता जरा समजावनिच्या आवाजात दादूला सांगू लागले.)
आन्ना: दादू... मला एक सांग... तुज्या पाच वर्साच्या काळात सरकारी खर्चानं कितीवेळा जाऊन आला शहराकडं...!?

दादू: (ओशाळत) न्हाय आन्ना... आता तुमच्या मर्जीच्या भायेर एकडाव तरी गेलोय का शहराला...!?

आन्ना: व्हय... सरकारी खर्चात तुज्या सगळ्या फेमिलीला शिनेमा दावायला, मोठमोठ्या शोरुममध्ये खरेदीला, वॉटरपार्कच्या पान्यात डुंबायला माजी मर्जी इचारली व्हतीस व्ह्यय रं...!?

दादू: पन आन्ना... तुमिच म्हनला व्हता नवं...? शहराकडचे सरकारी कर्मचारी अभ्यासाच्या नावाखाली सरकारी खर्चानं फॅमिलीबरोबर फॊरेनयात्रा करत्यात तर आपन शहरयात्रा कराया काय हरकत आहे म्हनुन...!?

आन्ना: आरं व्हयं... पन तिकडे गेल्यावर बाकी काही बगतोस का फकस्त मजा मारतोस...!?

दादू: म्हंजे...!? (जमेल तितका बावळट चेहरा करत.)

आन्ना: आरं आपल्या गावाकडं नविन शाळेचं, सरकारी दवाखान्याचं, एस.टी. श्टॅंडचं, वृध्दाश्रमाचं, पानीयोजनंचं किती वेळा आनी कुटं-कुटं भुमिपुजन कार्यक्रम जालाय? आंब्यापल्याडच्या रस्त्याचं तर आपन दरसाली भुमिपुजन करतो...!

दादू: (एकदम उत्साहात येऊन...) आपल्या गावच्या महाडिकरावांच्या ’ढोरवार्ता’ मध्ये तुमचा फोटो पन येतो. पन त्याचं काय...!?

आन्ना: तुला म्हंजे सगळं इस्काटून सांगाव लागतं बग...! आरं हिच गेम तिथं चालते... एकीकडं हजारो लाईट कनेक्शन खोळंबून ठेवायची आनी पेपरात येन्यासाठी ही १५-२० कनेक्शन लगोलग द्यायची...! कदी शहराकडल्या हाफिसात दिकून जात जावा म्हंजे कळंल. कुठल्याही प्रकल्पाच्या फाईली महावितरणाकडं जमा केल्या तर त्या पुडं सरकतच न्हाईत... ठेकेदार किंवा ग्राहक स्वोता येऊन ’प्रेमाची भेट’ देन्याची वाट बघत्यात. मंग साईट-व्हिजीट करायची... तिथल्या अनाठाई गोष्टी सांगून ठेकेदाराचा... गिर्हाईकाचा खर्च वाढवायचा... वर एसओपी चा अभाव... मिटर्सचा तुटवडा... असल्या गोष्टी सांगून त्याला घाबरवून सोडायचं... एकडाव भ्यालेलं शिंगरु कायबी करायला लगेच तयार होतय मग...! मग मनाला वाटेल त्या भावाला तडजोड करायची आनि कदी बी न भरणारी पैशाची तुंबडी भरत राहायची...!

दादू: आयला... आन्ना... मला वाटलं व्हतं की आपनच गावाकडच्या ह्या अडानी लोकांचा दुर्फायदा घेतो म्हनुन...! पन शहरातल्या शिकल्या-सवरल्या लोकांना गंडा घालायचा म्हंजे भारीच गेमाडपंथी दिसतात हे महावितरणवाले...!! पन आन्ना... म्या शहरातले कित्येक ठेकेदार शिकलेले...कार-बंगलेवाले...सुटा-बुटातले पाहिलेत...! किती लोकांची पोरं तर फॊरेनला जाऊन शिकतेत... त्यांना हे अडानी सरकारी नोकर चिमटीत पकडतेत...!?

आन्ना: खरंय बाबा तुजं... अडला हरी अन गाडवाचे पाय धरी...! पन ह्यात एक गेम हाये बरं का दादू...! मला सांग... आपन आपल्या गावच्या ज्या बायकांना अडानी.... चूल-मुल करनार्या म्हनतो... त्यांनी मागल्या महिन्यात काय केलं...!?

दादू: (कमालीचा उदासिन होत.) आपल्या गावातला एकुलताएक देशीचा गुत्ता बंद पाडला... ते पन फकस्त लाटण्या-फुंकण्या घेऊन...! पन काय करनार आन्ना... गावच्या सगळ्याच बाया आल्या व्हत्या...! सरावन्या मांग म्हंजे कसला टर्रेबाज गडी. आपल्यासारख्या चार गड्यांना ऐकनार न्हाई...! पन बाया बगुन घाबरला अन पाय लाऊन पळाला...!

आन्ना: अरे हेच...! साळेत गेला असतास तर शिकला असतास... एकीचे बळ काय असते ते...! हे शहराकडचे ठेकेदार जरा एकत्र आले आनि ह्याचा विरोध केला तर सरकारी नोकरांना कळेल की ते ’नोकर’ आहेत अन दिलेलं काम करनं त्यांचं काम आहे...! एकटा ठेकेदार विरोध करायला घाबरतु... पुन्यांदा आपलं काम कवाच होनार नाय म्हनुन गप बसतो. आदीच धंद्यातल्या संकटांनी जेरीला आलेला कुटं-कुटं तोंड देनार...!? एकाएकाला मोडनं सोपंच जातय... येडं शिंगरू एकट्च फिरतय अन कोल्ह्या-कुत्र्याचं चांगलचं फावतयं...!

दादू: (एकदम प्रेरित होऊन...) आन्ना... तुमी माजं डोळं उघडलतं आन्ना...! ह्या हराम्यांचं म्या आता चालू देनार नाही... म्या सगळ्यांना एकत्र करीन आन्ना... शिष्टीम म्या सुधरवीन आन्ना... कोन कसं काम करत न्हाई हे म्या बघीन आन्ना...!

आन्ना: अरं ए दिडशहान्या... हितं उंट लागलाय बुडाया अन शेळी म्हंते मी येऊ का...!?

दादू: (एकदम भानावर येत...) म्हंजे...!?

आन्ना: आरं... मोठमोठं लोक ह्या भ्रष्टाचारापुडं हात टेकत्यात... आपल्यासारखी... निदान चांगल्याची जानीव असलेली लोकं त्येच करत्यात जे साह्येब लोकं सांगत्यात अन तु काय करनारेस रं...!? (जागेवरनं उठत...) ते खुळ काड आता तुज्या टकुर्यातनं...! सांच्याला मोठ्या साहेबास्नी बोलावलय आज आमी वस्तीवर... बोकूड कापलाय...!
(पांढरी गांधी टोपी डोक्यावर चढवत...) आदर्श ग्रामपंचायतीची ढाल हवीय नव्हं...!? मग लागा तयारीला...!

घाटी फ्लेमिंगो

प्रतिक्रिया

कट्टा फर्मास आहे. 'जनातलं मनातलं' मध्ये टाकायला हवा होता. काथ्याकूट पाहून पब्लिक घाबरलंय इथं यायला! ;-)

घाटी फ्लेमिंगो's picture

27 May 2016 - 1:48 pm | घाटी फ्लेमिंगो

कॅटेगरी चुकली काय...!? स्वारी हां...!!

माझं तर सगळं लेखन जनातलं मनातलं मध्ये टाकतो मी …. यावरून एकदा गडबड होऊन मग बरोबर ३ महिने आणि पाच दिवसापूर्वी मी मस्ती पण केली होती …. http://www.misalpav.com/node/35009… पण मिपाकर गोड आहेत… मला फार सहन करतात .

सुबोध खरे's picture

27 May 2016 - 1:43 pm | सुबोध खरे

अक्कल नाय काडीची अन गाठ सुटंना नाडीची
हितं उंट लागलाय बुडाया अन शेळी म्हंते मी येऊ का..

लै म्हंजे लैच आवडलं राव

ही ढोरवाडी भोकरवाडीच्या तोलाची होऊ दे अशी शुभेच्छा … (एक विनाकारण सूचना : जमल्यास संवाद कमी आणि वर्णन जास्त टाका … नाहेतर नाटक वाचल्याचा फील येतो … इतरांचं माहीत नाही पण नाटकापेक्षा कथा वाचायला वाचायला मला सोपी जाते) लिहिते रहा …

घाटी फ्लेमिंगो's picture

28 May 2016 - 12:58 pm | घाटी फ्लेमिंगो

सुचना सर आखोंपर... पण हा एक संवाद म्हणूनच लिहिला असल्याने वर्णन कमी आहे.

आता ती संवादातली तॄटी असावी जी धड नाटकाचा फिल देतेय ना धड कथेचा...!! :(

स्पा's picture

27 May 2016 - 6:14 pm | स्पा

हा हा हा

भारीच एकदम

गेमाडपंथी =)) वाचून फुटलो साफ

प्रीत-मोहर's picture

27 May 2016 - 6:39 pm | प्रीत-मोहर

लोल फ्लेमिंग्या भारीच किस्सा

मुक्त विहारि's picture

27 May 2016 - 10:35 pm | मुक्त विहारि

मस्त...

चौकटराजा's picture

28 May 2016 - 5:07 pm | चौकटराजा

घाटी आन्न्ना, येकदम फर्मास ब्येत झालाया. आता सकाळ वाल्यानी त्या व्रिटीश नंदीला हाटवायला हारकत न्हाय !

प्रसाद_१९८२'s picture

28 May 2016 - 6:54 pm | प्रसाद_१९८२

ढोर वार्ता,
=))

बोका-ए-आझम's picture

28 May 2016 - 7:07 pm | बोका-ए-आझम

मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद असा होता एकेकाळी. त्यात कायपण फरक पडलेला नाही हे घाटीसाहेबांनी फर्मास दाखवल्याबद्दल मंडळ त्यांचं कचकावून आभारी आहे.