होरपळ

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
22 May 2016 - 2:26 pm

"मॅडम तुमच्या आईंचा फोन येऊन गेला दोनदा"

बरं म्हणत सवयीने तिनं एप्रनच्या खिशात हात घातला. खिशात फोन काही नव्हता. कामाच्या व्यापात कसं काय आपल्या लक्षात नाही आलं बरं, आज फोन काढलाच नाही पर्समधून, म्हणत तिनं पर्स उघडली. फोन पाहिला तर आईचे सात मिसकॉल. तरीच हॉस्पिटलमधे फोन केलेला दिसतोय. आणि इतक्या वेळा ट्राय केला म्हणजे काहीतरी गंभीर असणार. तसाच तिने आईला फोन केला. हॅलो वगैरे म्हणायच्या आतच पलीकडुन काहीसा रडवेला आवाज आला, "अग अरु त्यांना परत त्रास व्हायला लागलाय. तू लगेच ये"

"हम्म आलेच मी" एक खोल श्वास घेऊन अरुंधती गाडीची चावी घेऊन बाहेर पडली.

बाहेर रखरखीत ऊन. ड्यूटी संपली की घरी जायचं, जेवण करायच आणि मुलं यायच्या आधी तासभर तरी आराम करू असा तिनं विचार केलेला. पण तिचं आणि आरामाच गणित कधीच जूळलं नव्हतं. कधी चुकून रिकामा वेळ मिळाला तर तो तिला खायला उठायचा. पण म्हणून तिला तो वेळ हवाच नसायचा असंही नाही. विचारांच्या तंद्रीत घरी पोचली तेव्हा साडेतीन झाले असतील. गाडी लावून आत गेली तशी सोफ्यावर अंगाच मुटकुळ करून बसलेले अप्पा दिसले. चेहरा काळवंडलेला. डोळे लालसर. तीनचार दिवस तरी झोपले नसणार.

" काय अप्पा? झोप लागली नाही का?"

"कशी लागेल? ह्या बाईची बडबड थांबली तर ना"

हॉलमधल्या रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवत अप्पा म्हणाले. एकंदर प्रकरण घरी सांभाळता येणार नाही हे ओळखून ती किचनमधे गेली. आई चहासाठी आधण ठेवत होती. फ्रीजमधून पाण्याची बाटली काढून पाणी पीत ती म्हणाली,

" किती दिवस झाले गोळ्या खाल्ल्या नाहीत?"

"मनानी घेऊन खात होते ग रोज. मला वाटलं खात असतील. दोन दिवस झाले सारखे उठत होते रात्रीचे लघवीला. आज उठल्यापासून बडबड सुरू आहे. म्हणून नीट बघितलं तर खिडकीतून बाहेर टाकलेल्या गोळ्या."

हे ऐकताच अरु भडकली.

"एक काम तुला जमत नाही आई. गोळ्या फक्त चुकवू नकोस या माणसाच्या किती वेळा सांगू मी?" चिडली की वडीलांचाही एकेरी उल्लेख करने ही तिची जुनी सवय.

"बोला सगळे मलाच. सकाळपासून नाही नाही ते ऐकून घेतलं. आता तुलापण त्यासाठीच बोलवलंय. काढा बापलेक मिळून उरली सुरली कसर भरून काढा." हुंदके देत आई म्हणाली.

" एवढ वाईट वाटतं ना तर जरा आधीच काळजी घेत जा. आणि जेव्हा बघावं तेव्हा तुझच रडगाण. आता शांत रहा जरा"

" मी तरी काय करू..?"

आईला खुणेनच गप्प करत तिने डॉ.धर्माधिकारीना फोन लावला. सरांना सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिल्यावर त्यांचही हेच मत पडलं की दोन तीन दिवस तरी नजरेखाली ठेवायला हवं. त्यातल्या त्यात एक बरं की अजून अप्पा आक्रमक झाले नव्हते. तसं काही झालं असतं तर तिला आशीषला बोलवाव लागलं असत जे तिला स्वप्नातही नको होतं. मदत करण बाजूला फक्त आयुष्यभर त्याचे टोमणे ऐकावे लागणार. रात्री पिऊन आल्यावर घरादाराचा उद्धार करायला निमित्त मिळेल ते वेगळंच.

ठीक आहे म्हणत तिने सरांशी बोलणं संपवल आणि त्यांच्या ड्रायव्हरला फोन केला. त्याला गाडी घेऊन यायची सूचना केली आणि ती आता अप्पाना बाहेर कसे न्यायचे विचार करू लागली.

हॉलमधे येऊन अप्पांच्या शेजारी बसत म्हणाली, "चला अप्पा चहा पिऊन जरा फिरुन येवू."

"मला त्या बाईच्या हातचं पाणी सुधा नको. काय टाकलंय त्यात काय माहीत!" तावातावाने अप्पा बोलले. आईला हुंदका आला.

"रडतीये बघ कशी खोटारडी. तिच्यामुळे झालं सगळ. तिनी नीट लक्ष दिलं असत तर माझा मुलगा गेला नसता मला सोडून"

"तुमचाच होता का फक्त? माझ्यापण पोटचा गोळा होता तो. मी सांगितल होतं का त्याला वाईट मुलांच्या नादी लागायला? तुम्हाला कामावरून आलं की झोपण्याशिवाय काही सुचलं नाही. किती वेळा सांगितलं बघा जरा कुठे गेलाय बघून या. त्याच्या शिक्षकांना भेटून या. ऐकलं का कधी माझं? आता का वेड लावून घेतलंय मग?"

"आईच काम असत संस्कार करायच. आधी सांगितल असत मला नाही जमणार तर तुला तेव्हाच सोडून दिली असती."

"दिली असती ना आणि त्या नटवींन केला असता होय तुमचा संसार? मी आहे म्हणून डोक्यावर छप्पर तरी शिल्लक आहे. नाहीतर कधीच लागला असता भिकेला. "

तांबरलेल्या डोळ्यांनी हात उगारुन अप्पा उठले तशी एक वेळ आईमागे लपायची तिला इच्छा झाली पण डोक्यात आलेला विचार तेवढ्याच तीव्रपणे बाजूला सारत तिनी पटकन उठून अप्पांचा हात धरला. धूसफूसत अप्पा खाली बसले तशी एवढावेळ धीराने वागणारी अरु कोसळली.

"हात जोडते मी तुझ्यापुढे. त्यांना एक कळत नाहीये आपण काय बोलतोय काय करतोय? तुलापण कळत नाहीये का?"

"तूच सांग अरु तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक केला का मी? एका छताखाली राहिला, एक अन्न खाल्लं. तू कशी नाही गेली वाया? तुमचेच गुण उधळलेत ना मुलानी? मला एकटीला का देता दोष. . "

"तू शांत बसशील का जरा?" अरु नाराज होऊन म्हणाली.

"माझ्या बोलण्याचाच त्रास होतो ना सगळ्यांना? मलाच दे औषध. पिऊन मरते. मग कायमची शांतता मिळेल तुम्हाला"

"खा माझ्या झोपेच्या गोळ्या. कोण नाही म्हणतंय तुला?" अप्पा हसत हसत म्हणाले.

ह्या वादविवादाचा ताण असह्य होऊन अरु ओरडली,

"कुणीच नको. तुम्ही जगा. मी मरते. नवरा तो तसला. त्याला दिवस आहे की रात्र शुद्ध नसते. आणि तुम्ही दोघं हे असे. सकाळी घर सोडलंय चहाच्या एका कपावर. पळतीये नुसती. अन्नाचा कण नाही पोटात. कुणाला पडलीये माझी काळजी. तो गेला,विझला तुमच्या वंशाचा दिवा आता दहा वर्षं झाली.अजून गळे काढताय त्याच्यासाठी. मीच मूर्ख म्हणून तुमचं करतीये ना. मला जगू द्या ना माझ आयुष्य."

अरुचा आवेश पाहून घरात भयाण शांतता पसरली.

खुर्चीत बसल्या बसल्या चुळबूळ करत अप्पा म्हणाले..

"चहा तरी दे आता तिला. बसलीस काय रडत. "

हसावं की रडावं हे न कळून अरु उठून बाहेर आली. डॉ.धर्माधिकारींची गाडी येताना दिसली. एवढ सगळं होऊनही अप्पा सहजासहजी बाहेर येणार नाहीत हे माहीत होतं, म्हणून ती तशीच परत अप्पांची मनधरणी करायला आत गेली.

"चला ना अप्पा बाहेरच जाऊ. मस्तपैकी सादिकचा डोसा खाऊ. कॉफी पिऊ. हिला बसू दे घरी."

"आलो असतो ग पण तो देशपांड्या बसला असेल बाहेरच. चौकाचौकात उभी असतात माणसं."

"कशाला उभी असतात? कोण माणसं??"

"त्या देशपांड्याची माणसं. माझ्यावर लक्ष ठेवायला. माझा पण गेम करायचाय त्याला."

हा संवाद काही नवीन नव्हता. हे असे भास होणं, कुणीतरी आपल्याच कडे पाहतंय अशी भिती वाटणं या सगळयाची सवय झाली होती तिला.

"देशपांड्याला नेलाय कालच पोलिसांनी धरून. कुणीच नाही बाहेर. चला ना अप्पा. "

लहान मुलांशी खेळताना लढवावी लागते तशी कल्पनाशक्ती तिला वापरावी लागत होती.

"खर का?"

"मग काय! असा कसा सुटेल तो."

"काय म्हणलं होतं मी." शर्ट घालायला अप्पा आत गेले तसं तिनी हळूच आईला तू मागून रिक्षानी ये म्हणून सांगितलं. उदासपणे मान डोलावुन आईने तिच्या पर्समधे बिस्किटचा पुडा कोंबला. खा वाटेत असं डोळ्यांनीच सांगितल. तिनी कपाळावर हात मारून घेत रागारागाने तो पुडा काढून ठेवला. पुन्हा एकदा आईचे डोळे झरझर वाहू लागले.

अप्पा बाहेर येईपर्यंत गाडी येऊन थांबली होती. शेजारच्या मुलाला तिच्या गाडीची चावी देऊन मागे यायला सांगत ती अप्पाना घेऊन गाडीत बसली. मागे वळून घराकडे एकवेळ बघताना उंबर्यात उभी आई दिसली. नेहेमीप्रमाणे डोळे पुसत. किती काळ झाला नाही आईला असंच पाहतोय आपण. तिच्या अंगावर सरकन काटा आला. घड्याळात पाच वाजून गेले होते. माझी पिल्ल आली असतील शाळेतून. मम्मा कुठेय म्हणून घर डोक्यावर घेतलं असेल. सासूबैना फोन करावा का, विचारावं का काही खाल्लं का मुलांनी. करवादून जातील नाहीतर. जाऊ दे. नकोच ते. फोन केला की म्हणतील एवढी काळजी वाटते तर येऊन घाल खायला. त्यांना किती वेळा सांगायचं इकडच्या प्रॉब्लेम्सबद्दल. गाडीत डोळे मिटून शांत बसून राहिली ती. कृपामयीच्या आवारात गाडी थांबली तशी ती भानावर आली. खाली उतरताना फसले गेलेले अप्पा म्हणाले, "मला माहिती होतं तू इथंच आणणार मला. वेड करून टाकलं तुम्ही सगळ्यांनी मला."

"माझं छोटं काम आहे अप्पा... "

तिचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोवर वॉर्डबॉय येऊन अप्पाना आत घेऊनसुद्धा गेले. हाताला झटके देत, अर्वाच्य शिव्या देत अप्पा गेले. डॉ. धर्माधिकारी त्यांना तपासायला आले तेव्हा हसत हसत म्हणाले, "काय दळवी करमत नाही तुम्हाला आमच्याशिवाय?"

"बायको जगून देत नाही मला." हसत हसत अप्पा म्हणाले. ती आश्चर्याने एकदा डॉक्टरांकडे एकदा अप्पांकडे पहात होती.

"बरं का दळवी तुम्ही झोपत नाही, रात्र रात्र भर जागे असता. असं करून कसं चालेल. एक इंजेक्शन देतो. शांत झोपा बघू जरा."

"ती नाही आली ना इथं मग तुम्ही इंजेक्शन नाही दिलं तरी मी झोपतो."

"आजच्या दिवस घ्या इंजेक्शन. उदया राहू दे. ठीक."

थकून गेलेल्या अप्पानी नुसती मान डोलावली. सिडेटीव शरीरात फिरू लागले तसे डोळे जड़ होऊ लागले. डॉक्टर आणि अरु बाहेर पडले तेव्हा बाकावर आई येऊन बसली होती. तिला धीर देऊन डॉक्टर त्यांच्या केबिनकडे निघाले.

" कसं जमत हे डॉक्टर तुम्हाला? ते माझे आईवडील असून मला हा ताण असह्य होतो. मी नाही इतकी शांत राहू शकत. असं वाटतं हे सगळ आपल्याच नशीबी का आहे?"

"अगं माणूस माणूस असतो. कधी चुकतो कधी बरोबर असतो.आता या क्षणी त्यांच्या मनातली खळबळ समजून घेणं जास्त महत्वाच. भूतकाळातले संदर्भ शोधायचे ते फक्त आता या अडकून पडलेल्या जीवाला त्यातून बाहेर काढण्यासाठी. मोकळं करण्यासाठी. याशिवाय माझ्या लेखी भूतकाळाच काहीच प्रयोजन नाही. माझ्याकडे आल्यावर चूक बरोबर च लेबल लागणार नाहीये हे माहित असतं म्हणून पेशंट रेस्पोंड करतात. विश्वास ही एक गोष्ट सोडली तर याव्यतिरिक्त माझ्याकडे कुठलंही स्किल नाही."

डॉ.धर्माधिकारी म्हणजे शहरातले नावाजलेले मनोविकार तज्ञ. टेंशनखाली असलेल्या माणसाला सावरायची त्यांची हातोटी अगदी कौतुकास्पद. पहिल्यांदा त्यांना भेटली तेव्हा त्यांच्या हॉस्पिटलची पायरी कधी आपल्यालाही चढावी लागेल अस तिला स्वप्नातही वाटल नव्हतं. डॉ. धर्माधिकारी म्हणजे आशिषचे फेमिली फ्रेंड. लग्न झाल्यांनतर आशिषला आणि तिला जोडीन घरी जेवायला बोलावलं होत तेव्हा त्यांच्या अगत्यान काहीशी गोंधळून गेलेली ती. बायकोवर सतत चीड चीड न करणारा नवरा, हसतमुख बायको, मुलंही तितकीच गोड. काही क्षण तर तिला हेवाच वाटला त्या घराचा. आणि त्यानंतर मग एखाद्या हरवलेल्या मुलाला कुणीतरी हाताला धरून खाऊ घालाव, डोळे पुसून आपण शोधू हं तुझे आईबाबा म्हणावं असे ऋणानुबंध जुळत गेले त्यांचे. म्हणले तर ती देसाइंची सून झालेली पण धर्माधिकारींची मुलगी झाली. कुठल्या जन्मीच पुण्य असेल बर म्हणून अशी माणस आपल्या पाठीशी उभी आहेत. विचारात गुंग झालेली ती भानावर आली तेव्हा किती उशीर झाला म्हणून गडबडीत उठली.

"सर ते आशिषला यातल काही…. "

"नाही सांगत. पण तू किती दिवस अशी ओढाताण करणार आहेस. मला वाटत अजूनही वेळ गेलेली नाही. तू अजूनही सावरू शकतेस यातून अस वाटत मला. बघ विचार कर थोडा."

"मला माझा विचार करायला वेळ कुठे आहे सर. माझ्यावर प्रेम नसल तरी पिल्लावर जीव आहे आशिषचा आणि त्यांचा त्याच्यावर. काय म्हणून मी माझ्या सुखासाठी त्यांच्या आयुष्यातून वडीलांचं प्रेम काढून घेऊ?"

"अस त्यागाची मूर्ती होऊन जगण्यात जीवनाचं सार्थक आहे ही जी आपल्या समाजात समजूत आहे ना तिचा राग आहे मला. होरपळ आहे ही नुसती. स्वतःच्या आयुष्याची जाणूनबुजून केलेली होळी."

"बदलेल ना सर, वेळ बदलेल. हेही दिवस जातील. तोपर्यंत सहन करेन थोडे चटके."

मागे वळून न पाहता ती केबिनमधून बाहेर पडली. डॉक्टरांनी उगीच आपला चष्मा काढून पुसला आणि पेशंटची फ़ाइल वाचण्यात पुन्हा मग्न झाले. पण आता त्यांच कामात लक्ष लागेना. नर्सला बोलावून आता काही पेशंट घेऊ नको असे सांगून ते बाहेर पडले.

सकाळपासून उपाशीपोटी वणवण फिरणारी अरु घरी पोचली. ममा ममा म्हणत मुलं गळ्यात पडली. सासुबैच किचनमध्ये काहीतरी सुरु होत. हात पाय धुवून तोंडावर जरा पाणी घेऊन ती ओट्याजवळ गेली तशी,

"आलीस, मला वाटलं विसरलीस का काय पत्ता." असा खास शालजोडीतला टोमणा मिळाला.

डोक्यावर बर्फ ठेवत तिन खाली मान घालून कामाला सुरवात केली. स्वैपाक करून मुलांना खायला देउन त्यांच होमवर्क, त्यांची बडबड हे सगळ संपेपर्यंत तिची जेवायची इच्छा मरून गेली. तशीच बेडरूममध्ये येउन पडून राहिली.

दिवसभराच्या थकव्याने आलेली गुंगी म्हणा पडता क्षणी तिचा डोळा लागला. डोळ्यासमोर धडधड ज्वाळा उठत होत्या. होरपळ आहे ही नुसती! पुन्हा पुन्हा कानात ते शब्द घुमत होते. रात्री कधीतरी शुद्ध हरपलेला आशिष जवळ येउन पडला. त्याच्या तोंडातून आलेल्या भपकार्यान तिला गाढ झोपेतही मळमळल्यासारख झालं. तशीच उठून ती मुलांच्या रूममध्ये येऊन झोपली.

एवढा वेळ सावरलेल्या भावनांचा बांध शेवटी फुटला. उशीत तोंड खुपसून हमसून हमसून ती रडू लागली. डोळे पुसून पुसून पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागली, पण काही वेळा अशा असतात जेव्हा मेंदूचा मनावरचा ताबा सुटतो. काहीकेल्या मन ऐकत नाही. तिनही मग वाहू दिले तसेच डोळे. समजूत तरी कोण काढणार होत तिची? ज्या आईवडीलांच्या पंखाखाली जाउन मन मोकळ करायच त्याच आईवडीलांची घुसमट होत असलेली तिलाही दिसतच होती की. आईला थोडीफार कुणकुण लागायची पण घरात एका अपत्याच्या अकाली जाण्यान मोडून पडलेला नवरा, मुलीचे हाल, तिचे दु:ख पाहून बहुदा स्वतःचातरी जीव देईल किंवा कुणाचातरी घेईल तरी अशी परिस्थिती. काय म्हणून ती हे घर सोडून त्या घरी जाणार होती? अस म्हणतात एकदा लग्न झालं की मुलीच माहेर तुटत. तिच्यासाठी ते खर्या अर्थान तुटलं होत. हक्कानी जाउन आराम करावा, शांत आपल्याला आवडतील ती पुस्तक वाचावी, गाणी ऐकावी, पिक्चर बघावे, स्वप्नरंजनात रमावे हे असलं बालपण आणि नंतर माहेरपणही कधी तिला लाभलं नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चालणारी भांडण, कधी तरी रागाच्या भरात उठणारा हात, तोंडावर उशी ठेऊन दाबून ठेवलेले हुंदके या पलीकडे तिच्या बालपणीच्या आठवणी नव्हत्या.

ती मुलगी होती. तिचं नैराश्य रात्रीच्या अंधारात डोळ्यावाटे वाहून जात होतं. भावाला मात्र कस व्यक्त व्हायचं हेच कळेना. सहन करण्याचा, परिस्थितीला तोंड देण्याचा अवघड मार्ग झुगारून अडनिड्या वयात व्यसनाच्या अधीन झाला. हातातून वाळू सुटावी तस दोघांच बालपण गेल पण कुणालाच त्याची फिकीर नव्हती. मग एक दिवस घरातलं बेगॉन पोटात रिकाम करून तो त्याच्या वाटेन निघून गेला. जोवर मुलं होती तोवर त्यांची किमत नव्हती. या घटनेन अप्पा खचले. मुलाच्या कार्याला घरात आलेल्या लोकांना बघून अप्पांनी "काय काम काढलंय आज?" असा प्रश्न विचारला तेव्हाच तिच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. पण थोडा वेळ देऊ या. मोठा धक्का बसलाय असा विचार करून ती गप्प बसली. आई मात्र आईसारखी रडत राहिली. अरुनच शेवटी पप्पांना तूच संभाळल पाहिजे म्हणून आईला उभी केली. नेटाने शिक्षण पूर्ण केल. घर जरा सावरल्यासारख झालं.

भूतकाळातील घटनानी आपल्याला समाजात किमत नाही ही जाणीव दृढ झालेल्या अप्पानी मोठ्यात मोठ घर बघून थाटामाटात लग्न लावलं मुलीच. समाजात मला मान वर करून चालायचंय ही एकच अपेक्षा. मुलगी लग्न करून गेली आणि घरातलं चैतन्य जणू निघून गेल. मुलीसाठी तरी गप्प बसू म्हणणारे आई वडील आता उठता बसता झालेल्या चुकांची उजळणी करू लागले. त्यातून काहीतरी शिकण्यापेक्षा एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याचीच त्यांची स्पर्धा सुरु झाली. लग्नानंतर हिचंही वर्ष दीड वर्ष बर गेल. नव्याची नवलाई संपताच माणसांचे खरे चेहरे दिसू लागले. इकडे आड नि तिकडे विहीर अशा परिस्थितीत तिची तारेवरची कसरत सुरु झाली. मग स्वतःच बाळंतपण, मुलांची आजारपण यात अडकून पडली. या सगळ्यात एकच गोष्ट तिनी तिच्या मनासारखी केली, काम सोडल नाही. किती धावपळ झाली, दगदग झाली तरी नेटाने दोन्ही टोकं सांभाळली. अप्पांच्या पहिल्या नर्वस ब्रेक डाउनचे कळल्यावर आधीच तिला पाण्यात पहानारा आशिष आता तर बिनदिक्कतपणे मित्रांपुढे तिची खील्ली उडवू लागला. तिनं एक दोनदा सुचवलं तिला हे आवडत नाही तर उलट अजून हे प्रकार वाढत गेले. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर वळत ती कटू आठवणीना दूर करत राहिली. रात्रीच्या अंधारात एक गोष्ट मात्र तिला स्पष्ट दिसू लागली. ती तिच्या आईवडिलांकडे माणूस म्हणून पहातच नाहीये. मदत करण, वेळ प्रसंगी धावून जाण यामागे खरा हेतू तिच्या संसारापर्यंत ही झळ पोचू नये हा आहे. नाही दिलं त्यानी आपल्याला हव ते बालपण म्हणून आता तिनही तसच वागून शिक्षा द्यायची का त्यांना? तुम्ही चुकलात हेच आपण कधी अप्रत्यक्षपणे कधी प्रत्यक्ष सांगत आलो ना त्यांना? आपण कधी माफ केलच नाही त्यांना मनापासून. आता आपण करतोय हा संसार त्यात आपल्या आईवडीलांचाच वारसा पुढे नेतोय. तडजोडीचा. मन मारण्याचा. तोही जाणूनबुजुन. न जाणो उद्या आपणही त्यांच्यासारखेच झालो तर! भितीने तिच्या अंगावर काटा आला.

पहाटे अलार्म वाजल्यावर अरुनं उठून स्वतःच आवरले. मुलांना उठवलं, तयार केलं, त्यांचे डबे करून भरले. त्यांना स्कूल बसमधे बसवलं आणि घरी येऊन बेडरूममधल्या टेबलवर एक चिट्ठी ठेवली. आणि तशीच घराबाहेर पडली. सादिकच्या हॉटेलजवळ थांबून भैया ३ मसाला डोसा अशी ओर्डेर दिली. त्यानी दिलेली पिशवी पुढे अडकवत गाडी कृपामयीच्या दिशेने वळवली. रात्रभर झालेली होरपळ डोळ्यातच विझली होती. पण तिची जागा आता एक नवं स्वप्न घेत होतं. आशिषला जाग आली तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर त्या चिट्ठीतले शब्द नाचत होते.

"आयुष्याच्या शेवटी जर मला तुझ्याबरोबर आणि तुला माझ्याबरोबर कटू आठवणीच आठवनार असतील तर आपण आठवणी तरी बदलायला हव्यात किंवा सोबत तरी. तुझी इच्छा असेल तर मी पुन्हा नवीन सुरुवात करायला तयार आहे. उत्तराची वाट पाहतेय."

हॉस्पिटलमधे पोचल्यावर तिनं आईला फ्रेश होऊन यायला सांगितलं. अप्पांच्या रूममधे जाऊन त्यांना पाहिलं. एखाद्या शांत बाळासारखे ते झोपले होते. मनाने रचलेले अनेक डाव ते हरले होते, अनेक स्वप्नं उध्वस्त झाली होती. पण आता चुक बरोबरचे सगळे संकेत गळून गेले होते. तिला, तिच्या आईला, तिच्या वडीलांना आणि अशा होरपळून निघालेल्या सर्वांनाच पुन्हा माणसासारखं जगता यावं हेच एक स्वप्न तिच्या डोळ्यांत आकार घेत होतं. सुरुवात तिनी स्वतःपासुनच केली होती.

नव्या दिवसाच्या नव्या आव्हानांना तोंड द्यायला ती पुन्हा सरसावली होती.

टीप: मी मानस शास्त्राचा अभ्यास केलेला नाही. कथेत काही अधिकउण लिहिलं गेलं असेल तर या क्षेत्रातील जाणकारानी मार्गदर्शन करावे. मी बदल करण्याचा प्रयत्न करेन.

कथा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

22 May 2016 - 2:53 pm | जव्हेरगंज

टेंन्शन दिलय तुम्ही !!

क्लास !

कपिलमुनी's picture

22 May 2016 - 3:09 pm | कपिलमुनी

छान कथा आहे. फाफटपसारा न लावता नेमक्या शब्दात मांडले आहे

तुषार काळभोर's picture

22 May 2016 - 3:51 pm | तुषार काळभोर

होरपळ जाणवली.
शेवट आशादायक केलात, हे उत्तम!

कानडाऊ योगेशु's picture

22 May 2016 - 3:54 pm | कानडाऊ योगेशु

हेच म्हणतो.!
कविता पण कथा पण. एकुण तुम्ही अष्टपैलु खेळाडु दिसता. :)

यश राज's picture

22 May 2016 - 4:33 pm | यश राज

छान कथा

नंतर सविस्तर प्रतिसाद देईन. खूप आवडली कथा.

मराठी कथालेखक's picture

22 May 2016 - 6:28 pm | मराठी कथालेखक

कथा छान आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2016 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कथा. नायिकेच्या मनातिल आंदोलने बरोबर टिपली आहेत.

टवाळ कार्टा's picture

22 May 2016 - 9:21 pm | टवाळ कार्टा

टोचले :(

पद्मावति's picture

22 May 2016 - 9:42 pm | पद्मावति

खूप सुंदर कथा!

कथानायिकेचे भाव आणि अगतिकता छान रेखाटले आहे.
आशा बगेंच्या वळणाची कथा.

प्रचेतस's picture

22 May 2016 - 9:56 pm | प्रचेतस

छान झालीय कथा.

पैसा's picture

22 May 2016 - 10:14 pm | पैसा

कथा आवडली

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 10:30 pm | बोका-ए-आझम

पण फार पटकन संपली.

क्रमशः पूर्ण होईल की नाही अशी भिती वाटली त्यामुळे एका भागात संपवली. :)

महामाया's picture

22 May 2016 - 10:33 pm | महामाया

खूप आवडली कथा....

सतिश गावडे's picture

22 May 2016 - 10:51 pm | सतिश गावडे

कथा छान आहे असं म्हणवत नाही. कथानायिकेची होरपळ अंगावर येते अक्षरशः.

तुमच्या कथेचा शेवट आशादायक झाला आहे. वास्तवात मात्र अशा समस्यांना सामोरं जाणार्‍यांना आयुष्यातील कटू वास्तवापुढे अगतिकपणे शरणागती पत्करावी लागते.

थोडं मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहायचे तर कथानयिकेच्या माहेरचं कुटुंब Dysfunctional family वाटते आणि कथानायिका Codependent

अगदी अगदी. पहिल्यांदा दुखांत करणार होते, तसा शेवट लिहलाही होता पण मलाच कसंतरी वाटलं ते वाचून. त्यामुळे अगदीच सुखांत नाहीतर कमीत कमी आशेचा एक किरण तरी असू द्यावा असा शेवट केला.

रमेश भिडे's picture

22 May 2016 - 11:18 pm | रमेश भिडे

लिहिलेली चिठ्ठी नवऱ्याला समजेल काय पण?
लेखन आवडून देखील कथा आवडली म्हणवत नाही.

सतिश गावडे's picture

22 May 2016 - 11:22 pm | सतिश गावडे

लिहिलेली चिठ्ठी नवऱ्याला समजेल काय पण?

शक्यता खुप कमी आहे. ज्याला अशी चिठ्ठी कळेल तो चिठ्ठी लिहीण्याची वेळच येऊ देणार नाही.

रमेश भिडे's picture

22 May 2016 - 11:31 pm | रमेश भिडे

म्हणून च विचारलं.
त्यापेक्षा 'कडेकडेने वाटेला लाग' म्हणणं सोपं ना?

रातराणी's picture

23 May 2016 - 11:15 am | रातराणी

मुलांकरिता प्रयत्न करत आहे असं अभिप्रेत होतं. कथेचा हा भाग तेवढ्या प्रभावीपणे मांडला गेला नाहीये असं वाटतंय.

रमेश भिडे's picture

23 May 2016 - 12:25 pm | रमेश भिडे

तिचे प्रयत्न आम्हाला समजले, पोचले देखील. ज्याला समजायला हवेत तो *दरचो* (इथेच वाचला होता कधीतरी) हे समजून घेईल काय???

नीलमोहर's picture

22 May 2016 - 11:38 pm | नीलमोहर

फार होरपळ झाली तिची, कायमच. मात्र ती ज्या प्रकारे आईवडिलांना समजून घेते आणि त्यांची काळजी घेते ते आवडले.
आशावादी शेवट केला हे खूपच छान.

शिव कन्या's picture

23 May 2016 - 12:00 am | शिव कन्या

कथा आवडली. लिहीत रहा.

नाखु's picture

23 May 2016 - 8:50 am | नाखु

आवडली.

वाट्याला आपसूक आलेले नातेवाईक हे परिस्थीती बिघडवण्याची ठेकेदारी चालवतात
आणि निवडायच स्वातंत्र्य असल्याने मिळालेले मित्र सुटण्यासाठी धीराचे/मदतीचे हात देतात असाच अनुभव आहे.

गेल्या महिनाभरात वाचलेले सर्वात सकस लिखाण म्हणून नक्की उल्लेख करीन.

सुहृदांचे आधारानेच चालणारा प्रापंचीक नाखु

रातराणी's picture

23 May 2016 - 11:22 am | रातराणी

कसच कसं काका :) फारफार तर गेल्या २ ३ दिवसातले म्हणा ते ठीक आहे. :)

प्राची अश्विनी's picture

24 May 2016 - 7:29 am | प्राची अश्विनी

गेल्या महिनाभरात वाचलेले सर्वात सकस लिखाण म्हणून नक्की उल्लेख करीन.
1000% सहमत.

चिनार's picture

23 May 2016 - 10:43 am | चिनार

सुन्दर कथा !
आवडली असं म्हणवत नाही.. ह्यातच कथेच यश आहे

रातराणी's picture

23 May 2016 - 11:13 am | रातराणी

सर्वांचे मनापासून आभार!

प्रचंड ताकदीचे निर्दोष लेखन,
एकेक केरेक्टर अगदी प्रभावी उभे झालेय. अरु विस्कळीत पण साहजिक आहे. तिला स्वतःची भूमिका मांडताच येईना हि होरपळ आहेच.
खूप शुभेच्छा पुढील लेखनासाठी

पिशी अबोली's picture

23 May 2016 - 5:09 pm | पिशी अबोली

+१

साहेब..'s picture

23 May 2016 - 11:48 am | साहेब..

सुन्दर कथा !

अजया's picture

23 May 2016 - 12:27 pm | अजया

आवडली कथा.

चांदणे संदीप's picture

23 May 2016 - 1:09 pm | चांदणे संदीप

सेम चुली घरोघरी..
भाजा एकसारख्या
भाकरी रोज त्यावरी
सेम चुली घरोघरी..!

Sandy

मृत्युन्जय's picture

23 May 2016 - 1:36 pm | मृत्युन्जय

काय नेमके लिहिले आहे. ताकद आहे तुमच्या लेखणीत. कथा उत्तम साकारलीत.

अनुप ढेरे's picture

23 May 2016 - 2:06 pm | अनुप ढेरे

छान लिहिलय!

उत्तम आहे. वास्तव संबंध असतात तसेच रेखाटले आहेत तुम्ही. कथेसाठी कृत्रिमता आणली नाही हे चांगलं आहे. (उदा. सर्व पात्रांच्या तात्कालिक रिअ‍ॅक्शन्स. आईने दिलेला बिस्किटाचा पुडा चिडून काढून ठेवणं, वैताग व्यक्त करणं, सर्वांनी आपापलं फ्रस्ट्रेशन आईवरच रागरुपात काढणं - सॉफ्ट टार्गेट) वगैरे.

असंका's picture

23 May 2016 - 2:44 pm | असंका

भयंकर टेन्शन दिलेत...!

सुरेख लिहिता.
धन्यवाद!

पिलीयन रायडर's picture

23 May 2016 - 3:05 pm | पिलीयन रायडर

छानच लिहीलय! आवडलं!

मेघना मन्दार's picture

23 May 2016 - 4:51 pm | मेघना मन्दार

सुरेख!!

प्रीत-मोहर's picture

23 May 2016 - 4:56 pm | प्रीत-मोहर

आशादायी शेवट आवडलाच.

ब़जरबट्टू's picture

23 May 2016 - 5:15 pm | ब़जरबट्टू

खुप आवडली.. एक एक पात्र मस्त उभे केलेय..

खरच खूप चांगली झाली आहे कथा

नगरीनिरंजन's picture

23 May 2016 - 7:26 pm | नगरीनिरंजन

शेवटाच्या आधीपर्यंत कथा खूप आवडली.
बाकी काही का होईना शेवट आशादायीच झाला पाहिजे हा हट्ट का?

शेवट कुठे आशादायी झालाय? दोन्ही शक्यता ह्या तशा वेदनादायकच नाहीत का?

सतिश गावडे's picture

23 May 2016 - 11:48 pm | सतिश गावडे

वाह... दुसर्‍या शक्यतेतील फोलपणा नेमका पकडलात.

रातराणी's picture

24 May 2016 - 12:53 am | रातराणी

:)

नगरीनिरंजन's picture

24 May 2016 - 5:33 am | नगरीनिरंजन

लग्न मोडलं की सगळं फोल?

मी असं कुठे म्हटलंय?

नगरीनिरंजन's picture

24 May 2016 - 10:52 am | नगरीनिरंजन

तुम्ही नाही गावडे सर म्हणाले. हा शेवट वेदनादायी असला तरी आशावादीच आहे.

सतिश गावडे's picture

24 May 2016 - 11:12 am | सतिश गावडे

माझा रोख कथानायिकेने असंवेदनशील व्यक्तीकडून समजून घेण्याची अपेक्षा करण्याकडे होता.

नगरीनिरंजन's picture

24 May 2016 - 12:00 pm | नगरीनिरंजन

असं होय. हम्म. तसंही ठीक आहे.

मृत्युन्जय's picture

24 May 2016 - 12:16 pm | मृत्युन्जय

शेवट आशावादी नाहिच पण सकारात्मक आहे. इथे कथानायिका एक शेवटचा प्रयत्न करुन पाहते आहे. त्या प्रयत्नाचे रुपांतर काय होते याबद्दल ही कथा कुठेही भाष्य करत नाही. त्यामुळे गुडी गुडी शेवट आहे असे काही वाटत नाही. आणि हा निर्णय घेताना नायिकेच्या मुलभूत मानसिकतेचा विचार करुन लेख लिहिला आहे असे वाटते. स्वतंत्र बाण्याची पण सर्व बाजुंनी निराश झालेली (आणि तरीही उम्मेद टिकवण्याची धडपड करणारी) पण स्वतंत्र विचारांची आणी बाण्याची मध्यमवर्गीय कथानायिका कुठे ना कुठे आधार शोधण्याची आणी टिकवण्याची धडपड करेल. विस्कटलेल्या नात्यांचा मुलांच्या मानसिकतेवर होणारा परीणाम स्वानुभवातुन तिला माहिती असल्याने ती स्वतःच्या मुलावर तो परिणाम होउ नये म्हणुन स्वतःच्या स्वाभिमानाचा, मानसिक शांतीचा आणि कौटुंबिक सौख्याचा विचार करुन एक शेवटचा निकराचा प्रयत्न नक्की करु बघेल. एकदम तोडुन टाकणार नाही.

कविता१९७८'s picture

23 May 2016 - 11:29 pm | कविता१९७८

सत्यकथा असण्याची जास्त शक्यता वाटते , असो छानय कथा

सतिश गावडे's picture

24 May 2016 - 10:01 am | सतिश गावडे

सत्यकथा असण्याची जास्त शक्यता वाटते

कधी असं काही त्रयस्थपणे तर कधी हतबलतेने पाहीलेलं असतं. कधी दुरुन तर कधी जवळून अनुभवलेलं असतं. लिहीणारा ताकदीचा असेल तर तो असं चित्र आपल्यानजरेसमोर उभं करतो.

अशा कथा हवेत लिहीणे शक्य नाही.

कथा आवडली. यातून सावरलेली बाई असलेला शेवट वाचायलाही आवडेल.

बरंच शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून! खूप प्रभावी लिखाण!

प्राची अश्विनी's picture

24 May 2016 - 7:31 am | प्राची अश्विनी

अत्यंत प्रभावी, थेट भिडणारी, विचार करायला लावणारी कथा. क्या बात रारा! जियो.

मितान's picture

24 May 2016 - 8:52 am | मितान

छान ! कथा आवडली.

जबरदस्त प्रभावी लिखाण

आजुबाजुची अशी अनेक होरपळलेली माणसे आठवली :(

शित्रेउमेश's picture

24 May 2016 - 9:57 am | शित्रेउमेश

खूप आवडली कथा.....

भाग्यश्री कुलकर्णी's picture

24 May 2016 - 10:03 am | भाग्यश्री कुलकर्णी

कथा छान मांडली आहे. छान लिहता आपण

रातराणी's picture

24 May 2016 - 12:17 pm | रातराणी

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार. कथेला मिळालेल्या प्रतीसादाने भारावून गेले आहे. _/\_

मराठी कथालेखक's picture

24 May 2016 - 12:44 pm | मराठी कथालेखक

नायिकेनं नवर्‍याला अल्टिमेटम दिलय हे योग्यच पण आईवडीलांनाही असंच अल्टिमेटम द्यावं आणि न ऐकल्यास त्यांच्याशीही संबंध तोडावे असं मला वाटतं कारण कृतज्ञतेपोटी फरपट सहन करण्यात अर्थ नाही.

वपाडाव's picture

24 May 2016 - 6:43 pm | वपाडाव

पण तिला असं वाटत आहे ना की ते तरी तिला (ती तरी त्यांना) मदत करु शकेल्/शकतील.
अन सगळ्याशी संबंध तोडुन मग काय टाळ कुटत बसणार का?

मराठी कथालेखक's picture

24 May 2016 - 7:17 pm | मराठी कथालेखक

मुले आहेत ना...
आणि नेहमी मनस्ताप आणि उपेक्षाच पदरी पडत असेल तर टाळ कुटणेहि परवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2016 - 2:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कथा. अरुची घुसमट जबरा उतरली आहे, खुपच छान लेखन.

-दिलीप बिरुटे

विटेकर's picture

24 May 2016 - 2:52 pm | विटेकर

दर्जेदार !
वो अफसाना जिसे अंजाम देना हो मुष्किल , उसे एक खूबसुरत मोड देकर छोडना अच्छा !
आपल्याकडे विभक्त होण्याबाबत खूपच संकुचित मनोवृत्ती आहे.

यशोधरा's picture

24 May 2016 - 3:08 pm | यशोधरा

कथा आवडली.

अतिशय सुंदर! विलक्षण हातोटी! अगदी हृदयाला भिडणारी कथा. खूप मनापासून आवडली.

अशी बरीच माणसे असतात, कुणाच्या तरी चुकांचं निगरगट्ट ओझं पेलणारी...आणि ज्यांच्या चुका असतात, ते मजा करतात, अशी ओझी वाहणाऱ्या, वाकलेल्या सहृदय, हळव्या माणसांच्या जीवावर...

नाखु's picture

25 May 2016 - 8:41 am | नाखु

भेंडी काय वाक्य आहे

अशी बरीच माणसे असतात, कुणाच्या तरी चुकांचं निगरगट्ट ओझं पेलणारी...आणि ज्यांच्या चुका असतात, ते मजा करतात, अशी ओझी वाहणाऱ्या, वाकलेल्या सहृदय, हळव्या माणसांच्या जीवावर...

मी परवानगीने हे वाक्य चोरणार आहे.

ता.क. समीर जरा माझ्या कळफलकाला हात लावणे , असं काही तरी सटीक्/चपखल लिहिले जाईल (लेखणी असती तर लेखणीला आशीर्वाद द्या असे म्हटले असते)

मुद्दलातला नाखु

अगदी अगदी.. यांनी दिलेल्या एका प्रतिसादातल्या नियतीचं षडयंत्र अशा शब्दयोजनेमुळे मला टेनेरीफ दुर्घटनेवरचा आख्खा लेख सुचला होता.

गवि - हे आपण माझ्याबद्दल लिहिलं आहे का? असेल तर मला खरंच आठवत नाही. आणि आपल्या लिखाणकौशल्यापुढे माझे फारच सामान्य आहे. आणि हे मी अगदी मनापासून म्हणतोय. :-)

आज वजन वाढलं असणार माझं नक्कीच...चांगलं दहा-बारा मुठी मांस चढलं आहे. ;-)

एस's picture

25 May 2016 - 10:13 am | एस

+२.

समीरसूर's picture

25 May 2016 - 7:25 pm | समीरसूर

अहो परवानगी कसली मागताय...आणि एवढं काही ग्रेट नाहीये हे वाक्य...बिनधास्त घेऊन टाका... :-)

आणि हात लावणे वगैरे काही म्हणू नका हो...मी अगदीच अतिसामान्य लिहितो...त्याला लिखाणदेखील म्हणवत नाही.. :-)

खटपट्या's picture

24 May 2016 - 7:30 pm | खटपट्या

कथा आवडली.

मोहनराव's picture

24 May 2016 - 8:04 pm | मोहनराव

कथा आवडली. _/\_

नमकिन's picture

25 May 2016 - 7:10 pm | नमकिन

तसं पहायला गेले तर हरेक पुरुष पात्र इथे जिवंत मरण सोसतोय (१ तर गेला), मग फक्त स्त्री ला सोशिक दाखवण्याचा व पुरुषांवर दोषारोपण केल्यासारखे वाटले. एकतर्फी चिठ्ठी लिहून सोडवणूक/ऊपाय कशी काय शक्य?
आयुष्य हे भोग की उपभोग की कर्तव्य साकारण्याचा साक्षात्कार हे समजले की होरपळ जाणवणारंच नाहीं. शेवट उरकू नका.
पुलेशु

शाम भागवत's picture

25 May 2016 - 8:19 pm | शाम भागवत

"आयुष्याच्या शेवटी जर मला तुझ्याबरोबर आणि तुला माझ्याबरोबर कटू आठवणीच आठवनार असतील तर आपण आठवणी तरी बदलायला हव्यात किंवा सोबत तरी. तुझी इच्छा असेल तर मी पुन्हा नवीन सुरुवात करायला तयार आहे. उत्तराची वाट पाहतेय."

मस्त.

म्हटल तर सकारात्मक म्हटल तर एक धमकीही आहे यात. काही झाल तरी बायको घर सोडून निघून जाणार नाही हे नवरा गृहित धरतोय आणि त्याला कारण तीच आहे हे धर्माधिकारींशी झालेल्या बोलण्यातून स्पष्ट होतयं. नवर्‍याच्या गृहितकालाच धक्का बसल्यामुळे नवरा जरा जबाबदारीने वागायचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. इतके झाले तरी तिचा त्रास कमी होऊ शकेल असे वाटते.