एक होती...

विजय पुरोहित's picture
विजय पुरोहित in जनातलं, मनातलं
26 Apr 2016 - 5:56 pm

क्रींऽऽऽऽऽऽऽ

गजराच्या कर्कश्श आवाजाने विवानला जाग आली. सकाळचे ७ वाजले होते. थोड्याशा अनिच्छेनेच तो आळोखेपिळोखे देत उठला. डोळे जरा कष्टानेच उघडल्यावर त्याने नजर आजूबाजूला फिरवली. ते कळाखाऊ घर बघून त्याला थोडंसं खिन्नच वाटलं. इथे आता सकाळी उठल्यावर चहा घेऊन आपली आई येणार नाही याची जाणीव त्याला अधिकच उदास करुन गेली.

नुकतीच त्याची बदली या ग्रामीण आदिवासी भागात झालेली होती. इकडे येण्यास तसा तो नाराजच होता. परंतु येथे एक दोन वर्षे काम केल्यावर त्याला प्रमोशनसहित मुंबईत काम करण्याची संधी मिळेल, अशी साहेबांनी लालूच दाखवलेली होती. त्याला देखील ही ऑफर आवडलेली होती. वयाच्या २४ व्या वर्षीच त्याला बॅंकेत चांगल्या हुद्द्यावर नोकरी लागलेली होती. त्याचं भविष्य अतिशय उज्ज्वल ठरणार होतं. शिवाय अंजलीने (त्याची प्रेयसी) तिचे इंजिनियरींग पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असा स्पष्ट निश्चय त्याला कळविलेला होता. मग ही एक दोन वर्षे कशीबशी ढकलावीत आणि मग मुंबईत स्थिर व्हावं असा त्याचा विचार होता.

भराभर आह्निके आटोपून तो व्हरांड्यात जाऊन बसला. तेवढ्यात दोंदू गडी सायकलवर चहा नाश्त्याचं पार्सल घेऊन आला. दोंदू हा तिथल्याच कुठल्याशा आदीवासी पाड्यावरचा माणूस होता. बॅंकेने इथली मागास परिस्थिती लक्षात घेऊन एक स्वतंत्र गडी कायमचा इथल्या अधिका-याच्या दिमतीला ठेवलेला होता. पण विवानला हा माणूस अजिबात आवडलेला नव्हता. त्याच्या गळ्यातील त्या विचित्र माळा, तोंडावरचे थंड, खुनशी भाव आणि सतत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत राहणं यामुळे विवानचं डोकंच फिरायचं त्याला बघून.

चहा नाश्ता करुन झाल्यावर त्याने बाईक सुरु केली आणि थेट बॅंकेकडे निघाला. बॅंकेत पोहोचून तेथील थोडीफार किरकोळ कामे आटोपल्यावर तो संगणकावर सरळ गेम्स खेळत बसला. इथे कामे कमी असल्यामुळे रिकाम्या वेळेत काय करायचं हाच मोठा यक्षप्रश्न होता. स्वतःचं कुटुंब असतं तर त्यांच्यासोबत वेळ तरी गेला असता. पण इथे ते ही शक्य नव्हतं. आईवडिलांनी येण्याची तयारी दाखवलेली होती. पण वडिलांच्या प्रकृतीचा विचार करता विवाननेच त्याला नकार दिलेला होता.

संध्याकाळी अगदी खिन्न मानसिकतेत तो घरी परतला. तेथील उदास-भकास वातावरण त्याची वाटच पहात होतं. हा बंगला खास बॅंकेच्या अधिका-यांसाठीच बांधलेला होता. पण इथे फारसं कुणी टिकत नसल्यामुळे बंगल्याची दुर्दशा झालेली होती. त्यातच आता अंधारून आल्यामुळे अधिकच उदासवाणं वाटू लागलेलं होतं. एक अद्याप ब-यापैकी टिकून असलेली आरामखुर्ची दारात ओढून घेऊन तो बाहेर शून्यात एकटक बघत बसला.

थोड्याच वेळात तुफानी पाऊस कोसळायला सुरुवात झाली. लगोलग लाईट्स पण गेले. तेवढ्यात दोंदू गडी सायकलवर एका हाताने छत्री सांभाळत रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन आला.
“का रे बाबा? आज इतक्या लवकर?”
“पावसामुळे!” दोंदूचं त्रोटक उत्तर. या माणसाची अडचण तरी काय आहे? थोडंसं मोकळं ढाकळं माणसासारखं बोलावं की? पण नाही! विवान गप्पच बसला मग. डबा टेबलावर ठेवून आणि कंदील लावून दोंदू परत गेला. घर पुन्हा गहन शांततेत बुडालं.

रात्रीचे ९ वाजले होते. पाऊस अद्याप पडतच होता. पण आता ब-यापैकी कमी झालेला होता. भुकेची जाणीव झाली तसा विवानने डबा उघडला. अर्धवट कच्च्या चपात्या, कसलीशी कडवट रानभाजी आणि पाणचट आमटी. त्याची भूकच मेली. तो डबा सरळ खिडकीतून बाहेर फेकून देऊन तो आरामखुर्चीवर येऊन बसला. आत घरात कंदिलाचा प्रकाश होता. पण बाहेर पूर्ण अंधार पसरलेला होता. जवळपास वस्ती पण नव्हती. अगदी गावाच्या बाहेरच बांधलेला बंगला. त्याला नाही म्हटलं तरी आता थोडी भीतिच वाटू लागली. भाड्याचे पैसे वाचवण्यापेक्षा आपण गावात घर घेतलं असतं तर बरं झालं असतं असं त्याला आता मनोमन वाटू लागलं.

इतक्यात कडाडकन वीज चमकली. विजेच्या प्रकाशात काही एक क्षणच त्याला दिसलं की अंगणातील आंब्याच्या झाडाखाली कुणीतरी उभं आहे. भीतिची एक तीव्र लहर त्याच्या सर्वांगातून दौडत गेली. कोण असेल? दोंदूला परत जाताना त्याने प्रत्यक्ष पाहिलेलंच होते. मग हा काय प्रकार आहे? कुणी दरवडेखोर? चोर? नाही! मग आत्तापर्यंत त्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता! या विचाराने जरासा धीर येऊन तो उठला. कोप-यात ठेवलेला कंदिल त्याने उचलला आणि व्हरांड्यात आला. तो कंदिल पुढे धरुन तो आंब्याच्या झाडाकडे पाहू लागला.

पहिल्या प्रथम त्याला काही दिसेना. पण जरा नजर सरावल्यावर त्याला आंब्याच्या झाडाखाली एक युवती उभी असलेली दिसली. पारंपारिक आदिवासी पोषाखात. तिच्या हातात केळीच्या पानात गुंडाळलेलं काहीतरी होतं. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.
“कोण आहात तुम्ही? इथे काय करताय?”
अनेक क्षण गेले. एक ना दोन. ती तशीच गप्प उभी होती.

शेवटी थोडा विचार करुन विवानने तिला आत यायला सांगितलं. पडत्या पावसात तिला तसंच उभं ठेवणं माणुसकीच्या दृष्टीने त्याला चुकीचं वाटत होतं. ती यावर एकही शब्द न बोलता आत आली. आपलं हक्काचं घर असावं तसंच! ती आत आल्यावर विवानने तिला अंग पुसायला टॉवेल दिला. तिने हातातील केळीच्या पानाचे पुडके आणि एक मातीचे छोटे भांडे टेबलावर ठेवले आणि टॉवेलने अंग पुसू लागली. आत्ता कुठे विवानला तिच्या मादक सौंदर्याची जाणीव झाली. पण त्याचबरोबर ती का आलीये इथे? हा प्रश्न अजूनही तसाच होता.

त्याच्याकडे पहात पहात तिने केळीच्या पानाचे पुडके सोडले. एक अप्रतिम खमंग वास दरवळला. कुठल्याश्या वन्यपशूचे भाजलेले मांस होते त्यात. मातीच्या भांड्याला बांधलेले पान देखील तिने सोडवले. एक गोड, आंबूस असा मजेशीर वास लगेच खोलीत पसरला. फळांचे मद्य असावे त्यात, असा विवानने तर्क केला.
“तुम्ही का आणलंयत हे माझ्यासाठी?”

काहीच प्रत्युत्तर नाही. ती फक्त त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत होती. विवान शंभरात एक होताच तसा. अतिशय देखणा, गोरापान आणि धिप्पाड बांधेसूद शरीराचा. कॉलेजात असताना अनेक मुली त्याच्याशी मैत्री करायला उत्सुक असत. पण त्याचे अंजलीवरच मनापासून प्रेम होते. तिच्या विश्वासाला तडा जाईल असे तो आजपर्यंत कधीच वागलेला नव्हता. पण आता मात्र त्याला या आगंतुक युवतीविषयी शारीरिक आकर्षण वाटू लागलेलं होतं. त्याच्यातील पुरुष त्याला भ्रमवत होता. त्याचा स्वतःवरील ताबा सुटत चाललेला होता.

एखाद्या जादूने भारित झाल्यासारखा तो टेबलापाशी गेला. खुर्च्या ओढून त्याने तिलाही बसायला सांगितलं आणि तो स्वतः देखील बसला. ती फळांपासून बनवलेली मदिरा आणि मांसाचे भाजलेले तुकडे दोन्हीही अगदी अप्रतिम होतं. त्याने तिला देखील खाण्याचा आग्रह केला. विशेष काही बोलणं न होता त्यांनी भराभर जेवणं उरकली. जेवण झाल्यावर हात धुऊन तो परत बाहेरच्या खोलीत आला. ती अद्याप तिथेच होती. एकही शब्द न बोलता! त्याच्याकडे एकटक पाहत! त्याने बेडरुमचा दरवाजा उघडला. आणि तिला आत येण्याची खूण केली. तिच्या चेहे-यावर लगेच हसू पसरलं…

***

दुस-या दिवशी विवान सकाळी उशीराच उठला. तेव्हां सूर्याची किरणे घरात पसरलेली होती. पाऊस आता थांबलेला होता. घरात कुणीही नव्हतं. ती निघून गेली की काय? त्याने इकडे तिकडे सगळीकडे फिरुन पाहिलं. घरातील सर्व वस्तू जिथल्या तिथे होत्या. पण ती कुठेच नव्हती. मग ते काय होतं? स्वप्न की भास की भुताटकी? शेवटचा पर्याय त्याने लगेच झटकून टाकला. असल्या भाकडकथांवर त्याने कधीच विश्वास ठेवलेला नव्हता. भास किंवा स्वप्न म्हणावे तर अद्याप त्याने उपभोगलेल्या सुखाची जाणीव त्याच्या गात्रागात्रात पसरलेली होती. ती खोटी कशी असेल? त्या भाजलेल्या मांसाचा आणि मदिरेचा वास देखील अद्याप खोलीत कोंदून राहिलेला होता.

शेवटी एकाच निष्कर्षावर तो आला. ती काल प्रत्यक्ष आलेली होती. गेले काही दिवस त्याला जाणवत होतंच की कुणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना देखील त्याला ही जाणीव सतत होत होती की कुणीतरी त्याचा पाठलाग करतंय. तिला इतकं का आकर्षण वाटतंय त्याचं? नाहीतरी त्याच्याइतका देखणा व धिप्पाड तरुण ह्या गावठी मुलींना या खेड्यात तरी कुठून पहायला मिळणार? हा विचार मनात येताच त्याला एकदम हसू फुटलं. स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेनं त्याला अंमळ सुखावल्यासारखं झालं. आणि या विचारासरशीच ती आज रात्री परत येईल की नाही? या विचाराने त्याचा पिच्छा पुरवला.

ऑफिसमध्ये गेल्यावर पण त्याच्या डोक्यात सतत तिचाच विचार होता. ती येईल की नाही? तो दिवसभर काय कामं करतोय आणि काय नाही याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी ५.00 चा ठोका घड्याळाने दिल्यावर तो तातडीने बाहेर पडला. दोंदूला संध्याकाळचा डबा पोहोचवण्याची गरज नाही असा त्याने शिपायामार्फत निरोप पाठवला. हो, तो खापरतोंडा म्हातारा मध्येच नको कडमडायला! वाटेत त्याने एका ब-यापैकी आधुनिक दिसणा-या दुकानात थांबून एक त्यातल्या त्यात चांगल्या क्वालीटीचा सेंट खरेदी केला. वाटेतच एक बाई फुलं विकत बसलेली होती, तिच्याकडून एक सुंदरसा रानमोग-याचा गजरा त्याने खरेदी केला.

तो घरी आला तेव्हां अंधार पडायला सुरुवात झालेली होती. आभाळ पण चांगलंच भरुन आलेलं होतं. पाऊस पडण्याची चिह्नं दिसत होती. घरी येऊन हातपाय धुऊन तो फ्रेश झाला आणि आरामखुर्चीत बसून अस्वस्थपणे तिची वाट पाहू लागला. जसजसा वेळ जाईल तसतसं त्याच्या शरीरातलं रक्त उसळ्या मारु लागलं.

आठ वाजून गेले.
नऊ वाजून गेले.
साडेनऊ…
दहा…
सव्वादहा…

निराशेने त्याला पुरतं घेरलं. सारं शरीर अगदी संतापून संतापून धुत्कारच टाकत होतं जणू! अचानक एक वीज चमकली “कडाड् कड्”. आणि त्या क्षीण प्रकाशात त्याला आंब्याच्या झाडाखाली ती उभी असलेली दिसली. मनावरचं मणामणांचं ओझं कुणीतरी अचानक काढून टाकावं तसं त्याला झालं. धावतच तो बाहेर गेला आणि तिला आत येण्याची विनंती त्याने केली. ती देखील कालच्याच निर्विकारपणे आत आली. आजही तिच्या हातात केळीच्या पानाचे पुडके आणि मातीचे छोटे भांडे होतेच. ती रात्र देखील त्याच्यासाठी आनंदाचा ठेवा घेऊन आलेली होती.

***

यानंतरचे दोन तीन महिने त्याच्यासाठी स्वप्नवत् गेले जणू. त्याला बाकी कुठल्याच गोष्टीचे भान नव्हते. घरच्यांशी किंवा अंजलीशी देखील फारसा संपर्क साधण्याची इच्छा त्याला झालेली नव्हती. अंजलीचा क्वचित फोन आलाच तर तो “तुझ्या अभ्यासात डिस्टर्ब नको म्हणून फोन करत नाही.” अशी मखलाशी करत असे. बॅंकेतील कामाकडे देखील त्याचे फारसे लक्ष नव्हते. आजकाल बॅंकेतील कर्मचारी मात्र त्याच्याकडे थोडेसे वेगळ्याच नजरेने बघताहेत असे त्याच्या लक्षात आलेले होते. पण ते त्याने फारसे मनावर घेतलेले नव्हते. एकदोघा जणांनी मात्र तो अतिशय “सुटत चाललाय” असे स्पष्ट सांगितल्यावर त्याला काळजी वाटू लागली. पण ती काळजी फारशी टिकली नाही. “ती” आणि केवळ “ती” यावरच त्याचं सर्व लक्ष लागलेलं होतं.

एके रात्री मात्र यात खंड पडला. ती आलीच नाही. वादळवा-याने धुमसणारी ती सर्व रात्र त्याने तळमळत काढली. काय झालं असेल? पहाटे विषण्ण मनःस्थितीत तो उठून बसला. त्याला तिचा भयानक राग आलेला होता. आज ती आली तर तिच्याशी अजिबात बोलायचं नाही असं त्याने ठरवलं. मुळात ती आजपर्यंत कधी एक देखील शब्द बोललेली नव्हती. पण त्याही दिवशी ती आलीच नाही. पुढ़चे दहा बारा दिवस देखील ती आलीच नाही. तिच्यासोबत घालवलेले दिवस म्हणजे एक स्वप्न होतं की काय असंच त्याला आता वाटू लागलं.

पौर्णिमेची रात्र होती. व्हरांड्यात आरामखुर्ची टाकून तो आकाशात शून्यात नजर लावून बसलेला होता. हातातील लाईट्सच्या धुरांची वलये खिन्नपणे हवेत विलीन होत होती. ती का येत नसेल? तिच्या घरी काही समजलं असेल का? तिच्या घरचे आपल्याशी भांडायला येतील का? एक ना दोन! अनेक विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली होती. एवढ्यात कुणीतरी चालत येतंय असं त्याला जाणवलं. पौर्णिमेच्या निळ्या चंद्र प्रकाशात त्याला ती येताना दिसली. तिच्या नेहमीच्या जागी आंब्याच्या झाडाखाली ती थांबली. उजव्या हाताच्या तर्जनीने तिने त्याला आपल्याकडे येण्यास खुणविले. तत्काळ एखाद्या मंत्रभारीत माणसासारखा तो उठला आणि तिच्या मागून चालू लागला.

ती घरापासून लांब घनदाट अरण्याच्या दिशेने चालू लागली. लवकरच डांबरी सडक सोडून ते दोघे दाट झाडीत घुसले. इथे दाट पर्णसंभारातून अगदी मोजकेच चंद्रकिरण खाली पडत होते. पण ती मात्र अगदी सराईतपणे त्या अंधा-या जंगलवाटेवर चालत होती. क्वचितच कुठेतरी सळसळ किंवा खसफस ऐकू येत होती. नाहीतर सर्वत्र अगदी निष्प्राण शांतता होती. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक? पण एक जाडजूड बुंध्याचे झाड ओलांडल्यावर मात्र ते दोघे एका छोट्याशा पण मोकळ्या मैदानात पोहोचले. मैदानाच्या मधोमध एक कुटी उभी होती. आज पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश नसता तर ती कुटी दिसणे अशक्यच होते. तिने विवानला आपल्याबरोबर येण्याची खूण केली आणि ती कुटीच्या दिशेने जाऊ लागली.

दार उघडून त्या दोघांनी आत प्रवेश केला. बाहेरुन कुटीच्या आतील विस्ताराचा अंदाज चुकीचा ठरत होता. आत ती ब-यापैकी विस्तृत होती. कुटीच्या मधोमधच एक काथ्याची खाट मांडलेली होती. वेतापासून बनवलेल्या काही कामचलाऊ खुर्च्या देखील आजूबाजूला होत्या. कुटीच्या भिंतींवर पलिते लावलेले होते. त्यामुळे आत पुरेसा उजेड होता. इकडे तिकडे काही चित्रविचित्र वस्तु टांगलेल्या होत्या. काही मुखवटे, अस्थी, प्राण्यांची शिंगे, काही जडीबूटी वगैरे. ही तिची स्वतःची कुटी असेल का? तिचं दुसरं कुणीच नाही का? या सर्व वस्तूंचं ती काय करते? विवानच्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं.

कुटीच्या कोप-यातून तिने एक मातीचा छोटा बुधला काढला. एका मातीच्या भांड्यात तिने तो द्रव ओतला आणि विवानला प्यावयास दिला. त्यात तीच नेहमीची फळांची दारु होती. पुढे वाढून ठेवलेल्या सुखाच्या अपेक्षेने त्याने ती घटाघटा पिऊन टाकली. एव्हांना तिने कोप-यातील चुलीत लाकडे घालून जाळ वाढवला आणि त्यावर कुठल्याशा प्राण्याच्या मांसाचे तुकडे भाजत ठेवले. मग तिथेच निवांत बसकण मारुन ती बसून राहिली. इकडे हळूहळू विवानचं डोकं हलकं होऊ लागलं. हातापायांची हालचाल करणं अशक्य झालं. घाबरुन त्याने उठण्याचा प्रयत्न केला. पण वेड्यावाकड्या पायांचा तोल जाऊन तो कोसळला. तिने त्याच्याकडे पाहिले. याच वेळेची ती वाट पहात असावी. ती झपाट्याने त्याच्याकडे धावत आली. तिच्या चेह-यावरचे मादक हावभाव लुप्त झाले होते. त्यांची जागा आता एखाद्या भुकेल्या श्वापदाने घेतलेली होती.

तिने त्याला अगदी अलगद उचललं आणि मधल्या काथ्याच्या खाटेवर उचलून ठेवलं. तिच्यात कुठून आली इतकी ताकद? पण त्याहीपेक्षा त्याला जास्त काळजी होती ती त्याच्या बंद पडलेल्या चलनवलनाची. हाताचं बोट देखील त्याला उचलता येत नव्हतं. फार काय आता त्याची बुबुळं देखील न हलता छताकडे एकटक रोखून पहात होती. त्याची अशी अवस्था तिनं करण्याचं कारण तरी काय? त्याला खाटेवर टाकल्यावर तिने त्याला एका जाडजूड काथ्याने घट्ट बांधायला सुरुवात केली.

काथ्या बांधताबांधताच तिची सावळी, तजेलदार त्वचा तुकडे तुकडे होऊन झिजून खाली पडू लागली. आतील हिडीस आणि ओंगळ दिसणारी हिरवट पिवळी त्वचा बाहेर दिसू लागली. डोक्यावरचे केस गळून पडू लागले. डोळे एखाद्या नारळासारखे बटबटीत झाले. अगदी काळेशार. एखाद्या माशीचे असतात तसे. त्याला डोळ्यांच्या कोप-यातून थोडंफारच दिसत होतं. पण जे दिसत होतं ते बघून तो गळपटलाच. तिचे हात पाय लांब लांब एखाद्या कीटकासारखे होऊ लागले. डोक्याच्या मागून दोन्ही बाजूच्या पंखांची जोडी देखील दिसू लागली. एखाद्या मधमाशीसारखा दंश देखील तिच्या पोटाच्या खालील भागात दिसू लागला. तो दंश तिने त्याच्या पोटात खुपसला. कुणीतरी जाडजूड दाभण खुपसावी तशा कळा त्याच्या पोटात येऊ लागल्या.

एवढ्यात दार वाजलं. कुणीतरी आत आलं. ‘ति’चं काम संपलं असावं. ती तिथून बाजूला झाली. धडपडत काहीतरी जमिनीवरुन चालत गेल्याचा आवाज आला. दार अगदी बेडौलपणे कर्रकर्र वाजलं. ती बाहेर पडली असावी नक्कीच. त्याचे डोळे अधिकाधिक ताठर होत चालले होते. आता हलकीशी गुंगी देखील येऊ लागली होती. त्या अवस्थेत देखील त्याला त्याच्या शेजारी उभा असलेला दोंदू दिसला. त्याच्या हातात एक नारळाची करवंटी होती. त्यात हात बुडवून त्याने बोटावर कसलातरी गिळगिळीत हिरवा द्रव घेतला आणि विवानच्या अंगाला निर्विकारपणे फासू लागला.

“ती जखीण आहे.” आज दोंदू पहिल्यांदाच एखादं वाक्य इतक्या आपुलकीने बोलला असेल.
“ती या जगातील जीव नाही. एक प्राचीन दैत्य आहे ती. गेल्या अनेक पिढ्यांपासून आम्ही तिची सेवा करत आलोय. ”

ती दैत्य आहे हे विवानला आता कुणी सांगण्याची गरज नव्हतीच. पण हा माणूस मला सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी हे काय फासत बसलाय? त्याने मनातल्या मनात अनेकवेळा आक्रोश केला. पण व्यर्थ.

दोंदूच्या काळसर, सुरकुत्या पडलेल्या चेह-यावरील भाव आता अधिकाधिक क्रूर होत गेले.
“जखिणींत नर नसतो. तिला मानवी पुरुषांशीच संबंध ठेवून स्वतःचा वंश चालवावा लागतो.” त्या करवंटीतला हिरवा द्रव विवानच्या पोटाला फासत तो उद्गारला.

“या वेळेस तिने तुमची निवड केली. भाग्यवान आहात तुम्ही. तिचा तयार गर्भ ती तिच्या नराच्याच शरीरात एका माशीचे रुप घेऊन सोडते. त्यातून बाहेर येणारी दुसरी नव्या पिढीतील जखीण ही त्या पित्याचं रक्त आणि मांस खाऊनच मोठी होते. दुस-या कुठल्याही माणसाच्या शरीरात ती टिकूच शकत नाही. त्यासाठीच तुम्हांला खाऊ पिऊ घालून लठ्ठ केलं आम्ही.”

“त्या नवजात अर्भकास तुमचं मांस पचणं सोपं जावं म्हणूनच मी हे द्रव्य तुमच्या शरीराला फासतोय. या औषधाने तुमचं शरीर हळूहळू विरघळत जाईल. त्रास पण जाणवणार नाही फारसा. काळजी करु नका.” त्याच्या चेह-यावर आता सैतानी हास्य पसरलेले होते. औषध फासायचं काम संपलेलं होतं. विवानच्या डोळ्याच्या कोप-यांतून तो आता बाहेर पडला.

कुटीतील पलिते पूर्ण विझवण्यात आले. आता फक्त उघड्या दरवाजातून आत येणारा पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश काय तो येत होता. थोड्याच वेळात दारातून कुणीतरी बाहेर पडल्याचा आवाज आला. लगोलग दार बंद केल्याचा आवाज.

आत पूर्ण अंधःकार दाटला…

कथा

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

26 Apr 2016 - 7:53 pm | एक एकटा एकटाच

शेवट आवडला

पीशिम्पी's picture

26 Apr 2016 - 8:08 pm | पीशिम्पी

थर्राट

कविता१९७८'s picture

26 Apr 2016 - 8:09 pm | कविता१९७८

मस्त

बाबा योगीराज's picture

26 Apr 2016 - 8:12 pm | बाबा योगीराज

आवड्यास.

बाबा योगीराज's picture

26 Apr 2016 - 8:12 pm | बाबा योगीराज

आवड्यास.

सैराट, भिंनाट, बुन्गाट!!
एक नं!

कथानक तसे प्रेडिक्टेबल होते पण लेखनशैली अतिशय सुरेख त्यामुळे कमालीचे वाचनीय.

बोका-ए-आझम's picture

26 Apr 2016 - 10:59 pm | बोका-ए-आझम

पण मला नाही एवढी अपील झाली. कदाचित ती जखीण मला दररोज report करत असल्यामुळे असेल! हा हा हा हा हा हा!(पाताळविजयम)
- वेताळ-ए-आझम

बोकाभाऊ माझ्याकडे भी पाठवा ना मग!
;)

बोका-ए-आझम's picture

26 Apr 2016 - 11:14 pm | बोका-ए-आझम

तो project संपल्यावर नक्की!;)

रातराणी's picture

27 Apr 2016 - 12:36 am | रातराणी

सही!

स्पा's picture

27 Apr 2016 - 7:33 am | स्पा

मजा नाय, जामच टिपिकल.

नायक बहुधा शिलाजिताच्या बुस्टर वर असावा, दोन तीन महीने रोज म्हणजे

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 10:24 am | विजय पुरोहित

नायक बहुधा शिलाजिताच्या बुस्टर वर असावा, दोन तीन महीने रोज म्हणजे
;)

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2016 - 12:19 pm | टवाळ कार्टा

काय प्रॉब्लेम आहे? जीम करत जा रेग्युलरली मग जमते सगळे रोजच्या रोज ;)

अभ्या..'s picture

27 Apr 2016 - 1:00 pm | अभ्या..

जंगलजीम. ;)

नाखु's picture

27 Apr 2016 - 8:34 am | नाखु

लेखकांना (तितकी) आवडली नसावी,पण आम्ही सामन्य वाचक आवडली पण तरी जो एक कलाटणी (नाट्यमयता) सपक झाली असावी.

अर्थात यावर भाष्य करण्या इतका चार आण्याचाही लेखक नसलयाने समीक्षक्/साहीत्यभक्षकांचे प्रतिसाद वाचण्याचा धोपट मार्ग क्रमप्राप्त आहे.

छान लिहिलंय. भाषा सोपी आहे, वाचायला मजा आली.

राजाभाउ's picture

27 Apr 2016 - 12:55 pm | राजाभाउ

मस्त जमलीय ...

पद्मावति's picture

27 Apr 2016 - 3:01 pm | पद्मावति

सही!

सुमीत's picture

27 Apr 2016 - 3:57 pm | सुमीत

सांगितले होते ना, मिपा वर दर्जेदार थरार कथांचा दुष्काळ संपला.
मला चेट्कीण असेल वाटले होते, पण शेवट भलताच होता

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 4:37 pm | मराठी कथालेखक

मजा आली.. भाषाशैली छान आहे.

टेम्प्टिंग भयकथा ! पण शेवट आधीच कळला.

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 6:00 pm | कानडाऊ योगेशु

भन्नाट.
कथेला क्रमश: का नाही आहे?
दुसरा भाग लिहु शकाल.

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 6:22 pm | विजय पुरोहित

कल्पना भारी आहे!!!

जव्हेरगंज's picture

27 Apr 2016 - 6:25 pm | जव्हेरगंज

कडक!

अजया's picture

27 Apr 2016 - 6:39 pm | अजया

:)छान आहे कथा.
अशीच पण वेगळ्या आशयाची एक रत्नाकर मतकरींची कथा आहे.त्यात तो फाॅरेस्ट आॅफिसर असतो.तो झाड तोडु देत नाही म्हणून आदिवसी त्याला मुलगी देतात.तो तिचा स्वीकार करत नाही म्हणून त्याला शिक्षा करतात.झाडाचे काहीतरी नाव असते तिथल्या.तेच कथेचे नाव आहे.

जव्हेरगंज's picture

27 Apr 2016 - 7:22 pm | जव्हेरगंज

+१

नारायण धारपांची एक विज्ञानकथा अशाच ढंगाने पुढे जाते. शेवट असाच काहिसा आहे !

पण तीचा आवाका वेगळा होती हीचाही वेगळा आहेच!

कथेचं नाव बहुधा 'झाड' हेच आहे.

बाकी ही कथा मला मतकरींच्याच 'कामिनी' ह्या गूढ़कथेच्या जवळ जाणारी वाटली.

एक एकटा एकटाच's picture

27 Apr 2016 - 9:08 pm | एक एकटा एकटाच

कामिनी.........अगदी वेगळ्या ढंगाची आहे.
आणि हि वेगळीय

पण कामिनी सॉल्लिड आहे

धन्यवाद त्या कथेची आठवण करून दिल्याबद्दल

प्रचेतस's picture

27 Apr 2016 - 10:35 pm | प्रचेतस

हो. कथा पूर्णपणे वेगळी आहे. मात्र पुरुषांना शोषून घेणारी स्त्री (भूत) हे समान आहे.

बाकी मतकरींच्या उल्लेखामुळे त्यांच्या बऱ्याच कथा आठवल्या. बहुतेक सर्वच उत्कृष्ट आहेत.

मांत्रिक बुवा, अवधुत पुर्ण करा बघु आधी. हा प्रयत्न चांगला होता पण अपेक्षित शेवटाने मजा नाही आली.

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 9:32 pm | विजय पुरोहित

धन्यवाद स्रुजातै... नक्कीच!!!

छान जमलीये. परिणामकारक झालीये.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 7:50 pm | विजय पुरोहित

सर्व वाचक व प्रतिसादक धन्यवाद!!!

एक एकटा एकटाच's picture

28 Apr 2016 - 7:57 pm | एक एकटा एकटाच

नुसते धन्यवाद नकोत

लवकर नवीन कथा पाहिजे