जागतिक पुस्तक दिनः वाचन आणि आपण

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
23 Apr 2016 - 7:07 pm

United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून घोषित केला आहे. महान लेखक शेक्सपिअर तसेच इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

UNESCO तर्फे नामांकन करून, ठराव मांडून एक शहर एका वर्षासाठी 'जागतिक पुस्तक राजधानी' 'World Book Capital' म्हणून निवडण्यात येते, त्यानिमित्ताने वर्षभर तेथे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. २०१६ साठी व्रोक्लॉ (पोलंड) या शहराची 'जागतिक पुस्तक राजधानी' म्हणून निवड झाली आहे. आपले दिल्ली शहर २००३ साली 'जागतिक पुस्तक राजधानी' होते.

पुस्तक दिन लेखक आणि पुस्तकांना समर्पित केला गेला आहे. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे

  • लेखक, प्रकाशक आणि प्रताधिकार यांचे महत्व अधोरेखित करणे.
  • लहान मोठे सर्वांमध्येच वाचनाची आवड निर्माण करणे.
  • ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे
    त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करणे.

वाचन म्हणजे एका अर्थाने परकाया प्रवेश असतो, जिथे लिहिणाऱ्याच्या नजरेतून आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो, तिथले अनेकविध अनुभव घेतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रत्यक्ष जगतो. पुस्तकांशी मैत्री केली तर आयुष्यभराची साथ देणारे अनेक जिवाभावाचे सोबती आपल्याला मिळू शकतात, त्यांचं आणि आपलं एक वेगळं विश्व तयार होतं.
वाचनाने ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचन भूक उत्तरोत्तर वाढत जाते आणि वाचनाचं व्यसन लागत जातं, अर्थात हे व्यसन असणं चांगलंच.

अनेक भाषांतील, अनेक प्रकारचे साहित्य आपण वाचतो तेव्हा आपले विश्वही अनुभवसंपन्न होत जाते, आपले जग ठराविक गोष्टींपुरते मर्यादित न राहता विस्तारत जाते, जाणिवा समृद्ध होणे, कक्षा रुंदावणे म्हणजे काय हे वाचनातून आणि अभ्यासातून कळत जाते. 'We learn to see the big picture.'

वाचन हा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा, मनाच्या अत्यंत निकटचा, आवडता विषय आहे. शिक्षणातूनही कळत नाहीत अशा अनेक जीवनोपयोगी गोष्टी वाचनातून कळत गेल्या, जगणे शिकवून गेल्या, अजूनही शिकवत असतात.

माझी वाचनाची सुरुवात झाली असेल साधारण दुसरीत असल्यापासून, तेव्हा आम्ही इंदौरला होतो, छान बैठं घर, घरामागे जवळच शाळा, कोपऱ्यावर एक पाण्याची टाकी त्याखाली लायब्ररी. तेव्हा काही वाचता वगैरेही येत नव्हतं पण दादा आणेल ती पुस्तके आवडीने बघायचे, हळूहळू वाचू लागले, तिथूनच वाचनाची गोडी लागली.
पूर्वी बालकथांची छोटी छोटी पुस्तके मिळायची, आम्ही सगळी आते-मामे भावंडं मिळून ते वाचायचो, आजोळच्या गावी मोठा वाडा होता, तिथे बाहेर ओसरीवर लायब्ररी मांडून बसायचो, वेगवेगळ्या पुस्तकांचा मोठा खजिनाच होता तिथे, घ्यायला बरीच मुलं यायची, चार आठ आण्यांची बदल्यात पुस्तके घेऊन जायची. आमचा डब्बल फायदा, पुस्तके वाचायला मिळायची शिवाय कमाईही व्हायची, तीही एक मजाच.

नंतर शाळेच्या लायब्ररीत पुस्तके मिळायला लागल्यावर खऱ्या अर्थाने पुस्तकी कीडा चावला आणि वाचनाचे वेड लागले ते आजतागायत तसेच आहे. तिथे टिनटिन, अॅस्ट्रीक्स, फेमस फाईव्ह, सिक्रेट सेव्हन अशा पुस्तकांतून सुरूवात झाली नंतरही अनेकविध विषयांवरील पुस्तके वाचली. लुईसा मे अल्कॉटचे लिटील वुमनही तेव्हाच वाचलं होतं, नंतर त्याचाच शांता शेळकेबाईंनी केलेला मराठी अनुवाद 'चौघीजणी' वाचलं, तेव्हापासून हे पुस्तक आवडत्या पुस्तकांच्या यादीत बर्‍याच वरच्या क्रमांकावर आहे.

घरीही सगळे वाचनवेडे, खाऊच्या पुड्याचा कागदही वाचून काढणारी जमात, त्यामुळे घरही पुस्तकांनी भरलेले असायचे, अजूनही असते. दादा फॅन्टम, मॅन्ड्रेक्सचे कॉमिक्स आणायचा, चंपक, चाचा चौधरी, फास्टर फेणेच्या पुस्तकांचा संग्रहही होता, त्याचे तर कहर वेड होते. राऊ, झोंबी इ.पुस्तके खूप लहानपणी आणि खूप वेळा वाचल्याचे आठवते, कोसला, मृत्युंजय त्यामानाने उशीरा वाचनात आले. मराठी पुस्तके त्यामानाने कमीच वाचली गेली, घरी इंग्रजी पुस्तके जास्त असायची. नंतर मात्र पुणे मराठी ग्रंथालयाचे सदस्यत्व बाबांनी घेतले तेव्हा पुन्हा एक मोठ्ठा खजिना हाती लागल्याचा आनंद झाला, आताही मराठी पुस्तके नियमित वाचतो. काही आवडते लेखक म्हणजे सानिया, आशा बगे, प्रिया तेंडूलकर, मोनिका गजेंद्रगडकर, मिलिंद बोकील, रत्नाकर मत्करी, मंगला गोडबोले इ. खूप सारी नावे आहेत पण आत्ता नेमकी बरीच आठवत नाहीत.

दोस्तोव्हस्की, शेक्सपिअर, ओ.हेन्री, जेन ऑस्टेन, सर आर्थर कॉनन डॉयल, जेफ्री आर्चर, जॉन ग्रिशॅम, मायकेल क्रायटन, डॅन ब्राऊन, स्टीफन किंग, पाउलो कोअल्हो, रॉबिन कूक इ.सर्व प्रकारच्या लेखकांची पुस्तके कपाटात मिळून मिसळून राहतात. त्यातच अनुवादित साहित्य, मोटीव्हेशनल पुस्तके, बालसाहित्य, पाककला विषयक पुस्तके, अनेकविध मासिके इ. अगणित प्रकारचे साहित्य जमा होत राहते. विविध लेखकांची अनेक पुस्तके घरी आहेत जी अर्थातच सर्व वाचून झाली नाहीत.

ज्युरासिक पार्क हे पुस्तक आणि त्यावरचा चित्रपट दोन्हीची पारायणेही अजूनही सुरू असतात.
टू किल अ मॉकिंगबर्ड हे हार्पर ली या लेखिकेचं एका लहान मुलीचं भावविश्व उलगडून सांगणारं सुरेख पुस्तक, हेही अत्यंत आवडतं.
सायकिएट्रिस्ट भावामुळे मानसशास्त्राशी निगडीत अनेक पुस्तकेही वाचनात आली, त्यातील द न्यू सायको सायबरनेटीक्स हे स्व-सुधारणा व ध्येय-प्राप्तीसाठी उपयुक्त असे उत्तम प्रेरणादायी पुस्तक.

मॅन्स सर्च फॉर मिनिंग हे नाझींच्या छळछावणीतील अनुभवांवर लिहीलेले पुस्तक म्हणजे आवडलेही म्हणवत नाही असं,
मनावर खोलवर जबरदस्त परिणाम करणारं. अत्यंत विपरीत परिस्थितीतूनही, अजिबात न खचता एक माणूस तावून सुलाखून अधिक खंबीर होऊन कसा बाहेर पडतो याची ही प्रभावी कहाणी, प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी.

मागे हारुकी मुराकामीची 'काफ्का ऑन द शोअर' कादंबरी वाचली होती, साधारण नॉयर प्रकारातील कथा, त्यात बर्‍याचशा मांजरींचा वाईट प्रकारे संदर्भ होता ते एक लक्षात राहिलं, बाकी कथा बरीचशी अॅब्सट्रेक्ट, बरीचशी बोल्ड, त्यातील फक्त एक भाग विशेष लक्षात राहिला आणि आवडला, कथा नायक आपले घर शहर सोडून एका अनोळखी शहरात पोहोचतो, तेथील एक ग्रंथालय शोधून काढतो आणि तिथे पुस्तके वाचण्यासाठी जात असतो, पुढे तेथील मालकीण बाईंच्या कृपेने तिथेच कामही मिळवतो.

ही ग्रंथालयात काम करण्याची कल्पना अगदीच अफाट, मनाला भिडणारी, त्याचं तेथील रोजचं आयुष्य, त्या जागेचं वर्णन, तो तेथे करत असलेले काम, हे सगळं वाचतांना त्याचा फार हेवा वाटत होता, एवढ्या सगळ्या पुस्तकांच्या निकट सान्निध्यात रोज रहायला मिळणे म्हणजे.. ड्रीम जॉब म्हणतात तो ह्यापेक्षा अजून वेगळा काय असेल !!
ते सगळं वाचतांना मी त्या ग्रंथालयाची कल्पना करत होते, ते कसे असेल, उंच छत,मोठाल्या फ्रेंच खिडक्या, भरपूर उजेड, हवेशीर, भव्य.. वाचनाचा हाही एक फायदा, एरवी ज्या गोष्टी अपण अनुभवू शकत नाही, जे जग पाहू शकत नाही ते सारे वाचनाद्वारे करू शकतो, एक सर्वस्वी वेगळं आयुष्य जगू शकतो.

मुराकामी एक वेगळी शैली असणारे लेखक आहेत, त्यांचे लिखाण थोडे अनाकलनीय, वेगळे परंतु रोचक असते. त्यांचे ट्विटर पानही वाचनीय असते, त्यात अनेक वेगवेगळे सुविचार असतात ज्यांत उपयुक्त तत्वज्ञान सोप्या रितीने मांडलेलं असतं, उदा:

  • तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात.
  • त्याच्यासाठी फक्त एकच जागा होती, जिथे तो आत्ता होता तीच.
  • तुम्ही जिथे आहात, सुख तिथेच आहे.
  • तुम्ही कितीही दूरचा प्रवास करा, स्वतःपासून लांब कुठेही जाऊ शकत नाही.
  • आयुष्यात पुढे कुठे जायचे आहे हे तुम्हाला माहित नसले तरी ठीक, मात्र कुठे जायचे नाही हे माहित असणे गरजेचे आहे.

खरेतर आवडत्या लेखक आणि पुस्तकांबद्दल लिहायला जागा आणि वेळ दोन्ही कमी पडेल, अशी असंख्य पुस्तके आहेत, अगणित लेखक आहेत, प्रत्येकाचा उल्लेख करणे शक्यही नाही. हा विषयच असा आहे की त्यावर कितीही लिहीले तरी कमी पडेल, मन भरणार नाही.

मात्र आताशा लोकांमध्ये वाचनाची तितकीशी आवड म्हणा, सवय म्हणा दिसून येत नाही. त्यातून आताच्या पिढीत सखोल वाचन करणारे खूप कमी आढळतात, वाचन करणारा तरुण वर्ग आहे पण त्याचे एकूण प्रमाण कमी असेल.
आताचं जग हे स्मार्ट आणि फास्ट झालंय, जिथे वेळ ही एक अत्यंत मौल्यवान गोष्ट बनली आहे, त्यात वाचनासाठी लागणारा संयम, एकाग्रता इ. जवळ असणे अवघड बनत चालले आहे.

सहसा जरा रिकामा वेळ मिळाला की तो आपल्या स्मार्टफोनमध्ये घालवण्याकडे कल असतो, त्यात इतर कामांबरोबर व्हॉट्सॅप, फेसबुक, गेम्स, चित्रपट, फोटोज, व्हिडिओज इ.गोष्टी पाहणे सुरू असते. रोजच्या धकाधकीच्या जगण्यात लोक शक्यतो एका गोष्टीचा आसरा शोधतात - एन्टरटेन्मेंट,एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट. अर्थात ते चुकीचे वा वाईट असे मुळीच म्हणायचे नाही, सर्वच गोष्टी आयुष्यात प्रमाणशीर पाहिजेत, मात्र मिळणारा रिकामा वेळ इतर चांगल्या गोष्टींसाठी दिला तर त्यात सर्वांचाच फायदा आहे.

मुलं सहसा अनुकरणीय असतात, बरेचदा ते आपल्या आईवडिलांचा आणि कुटुंबातील इतरांचा आदर्श समोर ठेवतात,
आपण जे करतो तेच संस्कार त्यांच्यावर घडत असतात, म्हणूनच या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतोय हा महत्वाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपण जरा वेळ मिळाला की मोबाईलमध्ये डोकं घालून बसत असलो तर मुलेही तेच करतील, टीव्ही समोर तासनतास वेळ घालवत असलो तरी तेच, मात्र आपण एखादे पुस्तक घेऊन त्यांच्याजवळ बसलो, लहानपणापासूनच त्यांना निरनिराळ्या गोष्टी, कविता, माहिती इ. वाचून दाखवले तर त्यांच्यातही हळूहळू वाचनाची आवड निर्माण होईल, आणि एकदा ही आवड लागली की सहजासहजी सुटणे कठीण, त्यातून ही परंपरा पुढेही कायम चालू राहू शकते.

वाचनाची ही ज्योत अखंड तेवत ठेवणे आपल्या हातात आहे, पुढील पिढीला वाचनाची सवय आणि आवड जपायला शिकवून आपण हे नक्कीच साध्य करू शकतो. जेवढ्या शक्य तेवढ्या लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन त्यांचेही जगणे समृद्ध करण्यास हातभार लावू शकतो.

वाचनाचे महत्व जेव्हा लोकांना पूर्णतः कळेल आणि नियमित वाचनाचे व्रत सगळे अंगीकारतील तेव्हा आपला समाज नुसताच साक्षर नाही, तर खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुधारित होण्याकडे वाटचाल करू लागेल हे निश्चित.

पुस्तकदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.
वाचत रहा, जगत रहा, शिकत रहा...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

पुस्तकदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.
वाचत रहा, जगत रहा, आणि वाचनाने जाणीवा समृद्ध होत राहोत...

उत्तम लेखक हा आधी उत्तम वाचक असतो याची प्रचीती देणारा लेख.

दुर्गविहारी's picture

23 Apr 2016 - 7:41 pm | दुर्गविहारी

सकाळमधला हा लेख वाचनीय आहे.
पुस्तक... असं वाचायचं असतं राजा!

उल्का's picture

24 Apr 2016 - 9:25 pm | उल्का

ह्या लेखाला अनुसरुन तुम्ही ह्या लिंक्स दिल्याबद्दल आभार.
माझ्यासारख्या नवीन मिपाकरसाठी उपयुक्त. सवडीने नक्की वाचेन.

उल्का's picture

24 Apr 2016 - 9:26 pm | उल्का

लेख*

विवेक ठाकूर's picture

23 Apr 2016 - 8:45 pm | विवेक ठाकूर

लेख आवडला.

जितकं वाचन समृद्ध तितकं अनुभव विश्व समृद्ध आणि त्याचा परिणाम लेखनात दिसतो. सध्या इंटरनेटसारख्या उत्तम प्रकाशन माध्यमातून अनेकांना अभिव्यक्तीची सुरेख संधी मिळाली आहे, तरी चांगलं साहित्य आभावानंच दिसतं याचं एक कारण लोकांचं वाचन कमी झालंय.

स्रुजा's picture

24 Apr 2016 - 4:08 am | स्रुजा

सुरेख ! समयोचित लेख आवडला.

यथोचित नेमका लेख. वाचनाइतकाच त्याचा प्रवास हाही रंजक आणि रोचक असतो नाही ?

प्रचेतस's picture

24 Apr 2016 - 8:05 am | प्रचेतस

उत्तम लेख.
मनापासून आवडला.

जेपी's picture

24 Apr 2016 - 10:38 am | जेपी

मस्त लेख आवडाला..

कविता१९७८'s picture

24 Apr 2016 - 10:44 am | कविता१९७८

छान लेख

नूतन सावंत's picture

24 Apr 2016 - 2:43 pm | नूतन सावंत

सुरेख लेख,लहानपणी कुठलेही पुस्तक घेऊन कुठेही बैठक ठोकून वाचली आहेत.आताही भेळेचा कागदपण वाचला जातोच.

जव्हेरगंज's picture

24 Apr 2016 - 3:51 pm | जव्हेरगंज

सुरेख!

अभ्या..'s picture

24 Apr 2016 - 8:00 pm | अभ्या..

मस्त लेखन एकदम. आवडले.
भेळेचा कागदसुध्दा वाचणारा हे बिरुद लहानपणापासूनच लाभलेले. शाळेतली लायब्ररी जवळपास वाचून संपवलेली. अगदी आधाशासारखी पुस्तके वाचायचो. १५-१६ वयापर्यंत काय वाचायचे ह्याचे ताळतंत्र नव्हते. महाविद्यालयात असताना रेल्वेने जाता येता पुस्तके वाचायची सवय ठेवली. मिरजेची लायब्ररी त्यासाठी ब्येस्ट. महाविद्यालयाची लायब्ररी जास्तकरुन कलाविषयक पुस्तकांची. त्याचे आकारही मोठे. तेथेच बसून वाचावी लागत. दोन अ‍ॅक्सीडेंट मध्ये मिळालेल्या सक्तीच्या मोठ्या विश्रांतीत वाचन हाच विरंगुळा असायचा. त्या काळात भरपूर वाचन झाले. वाचनाचा स्पीड आपोआप वाढला. तीन चार ओळी वाचताच हे आधी वाचलेय की नाही लक्षात येऊ लागले. थोडासा मुद्रक व्यवसायात चंचुप्रवेश असल्याने अन बुककव्हर डिझाअनिंग व्यवसायामुळे नवनवीन साहित्य कशा पध्दतीने सादर होते याचा अंदाज आला.
आता पुस्तकाची साथ वेळेअभावी सुटल्यातच जमा आहे. बहुतांशी वाचन संस्थळावरच. हिराचंद नेमचंद वाचनालयाची लाइफटाइम मेंबरशिप घ्यावी असे वाटू लागलेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2016 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर समयोचित लेख !

मारवा's picture

24 Apr 2016 - 9:44 pm | मारवा

सुरेख लेख आहे
आवडला.
हाऊ टु रीड व्हॉट टु रीड हे प्रश्न सोडवण्याची ची गरज टु रीड पेक्षा मोठी आहे.

मारवा's picture

24 Apr 2016 - 9:44 pm | मारवा

सुरेख लेख आहे
आवडला.
हाऊ टु रीड व्हॉट टु रीड हे प्रश्न सोडवण्याची ची गरज टु रीड पेक्षा मोठी आहे.

मारवा's picture

24 Apr 2016 - 9:44 pm | मारवा

सुरेख लेख आहे
आवडला.
हाऊ टु रीड व्हॉट टु रीड हे प्रश्न सोडवण्याची ची गरज टु रीड पेक्षा मोठी आहे.

मितान's picture

25 Apr 2016 - 5:54 am | मितान

लेख आवडला.

गणामास्तर's picture

25 Apr 2016 - 10:58 am | गणामास्तर

सरळसाधे आणि सुंदर लिखाण !

पुस्तकविश्व ही मिपाची सिस्टर वेबसाईट होती. त्यातील लेख कुठे जतन करून ठेवले आहेत का?
सहज शक्य असेल 'पुनर्वाचनाय च' हा त्यातील दिवाळी अंकातील नंदन यांच्जा लेख आजच्या दिवशी इथे पुन्हा प्रकाशित करावा अशी व्यवस्थापनाला जाहिर विनंती करतो.आगदी आजच्या दिवसाचा याकुटमणी ठरावा असा लेख होता तो!

प्रचेतस's picture

25 Apr 2016 - 5:59 pm | प्रचेतस

पुस्तकविश्वचे सगळे लेख जतन केलेले आहेत.
लवकरच ते दृश्य स्वरूपात मिपावर येतील अशी अपेक्षा आहे.

हे वाचून प्रचंड आनंद झाला आहे! मराठी जालविश्वातील अत्यंत कमीवेळात निघालेला खूपच दर्जेदार अंक होता तो!
आजचे अनेक अंक बघताना राहुन राहुन त्याची आठवण येते.

लवकरच ते दृश्य स्वरूपात मिपावर येतील अशी अपेक्षा आहे.

व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार

पुस्तकविश्वचे सगळे लेख जतन केलेले आहेत.

अरे वा! हे माहित नव्हते. लवकर सगळे लेख पुन्हा एकदा वाचायला मिळोत, ही इच्छा.

इडली डोसा's picture

26 Apr 2016 - 8:58 am | इडली डोसा

अगदी मनापासुन लिहिलं आहेस.... तु लिहिलेल्या बर्‍याच गोष्टी केल्या आहेत त्यामुळे लेख आपला वाटला =)

पद्मावति's picture

26 Apr 2016 - 3:22 pm | पद्मावति

छान लेख. आवडला.

पियुशा's picture

27 Apr 2016 - 10:55 am | पियुशा

उत्तम लेख !