आमच्या मुलींचे पालक

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
7 Apr 2016 - 10:29 pm

आमच्या घरी हॉलमध्ये बर्‍यापैकी मोठ्या साइझचा एक फोटो आहे. मी, माझी पत्नी शुभदा आणि तिच्या हातात आठ महिन्यांची आमची कन्या पुनव. मूळ फोटो पंचवीस वर्षें जुना. एकदम ordinary.

आमची एक मानसकन्या देखील आहे. तिचं नाव दीपाली. तिच्याकडे हा जुना छोटासा धूसर फोटो होता. फोटोशॉप सॉफ्टवेअरची उत्तम माहिती आणि बरीच मेहनत यांच्या जोरावर तिनी या फोटोला नवजीवन दिलं, एनलार्ज केला, चांगल्या फ्रेममध्ये लावून एक महिन्यापूर्वी आम्हाला भेट दिला. अर्थातच आम्ही कौतुकानी तो हॉलमध्ये टेबलावर ठेवला.

आता उत्तरार्ध.

शुभदा छपाईची कामं करते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचं ऑफिस बंद होतं. एका जोडप्याला त्याच दिवशी तातडीनी त्यांचा जॉब हवाच होता. त्यामुळे हिनं त्यांना डिलिव्हरी घ्यायला आमच्या घरीच बोलावलं. ते जोडपं जेव्हां आमच्या घरी आलं तेव्हां ही बाथरूममध्ये होती. मी टिवल्याबावल्या करंत हॉलमध्ये बसलो होतो.

त्यांच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. नवरा टिपिकल – म्हणजे मितभाषी. चेहर्‍यावरचे भाव म्हणजे आपण बायकोबरोबर शॉपिंगला गेल्यावर कंटाळून दुकानातल्या स्टुलावर बसल्यावर आपल्या चेहर्‍यावर जसे असतात तसे. बायको पण टिपिकल – म्हणजे बोलकी. चेहरा देखील बोलका. उत्तम निरीक्षणशक्ती. दहा मिनिटात त्यांनी हॉलमधल्या वस्तूंबद्दल बरीच माहिती मिळवली आणि स्वतःची सांगितली देखील. माझ्या लहानपणी आमच्या घरी भिंतीवरचं एक घड्याळ होतं. त्याचं डायल पारदर्शक होतं. त्यातून आतली चालणारी सर्व मशिनरी स्पष्ट दिसायची. ताईंचा चेहरा तसा होता. डोक्यात चाललेले सर्व विचार चेहर्‍यावर दिसत होते. ओघाओघात त्यांची नजर या फोटोकडे वळली.

आता अशा फोटोबद्दल थोडंसं. एन्लार्ज केलेला फोटो जर एक व्यक्ती किंवा एका दाम्पत्याचा असेल, भिंतीवर लावलेला असेल आणि फ्रेम जुनी असेल तर त्याला हार घातलेला असतो. त्याबद्दल काहीही बोललं तर 'त्यांनी किती सोसलं' याबद्दल बौद्धिक मिळायची शक्यता असते. याउलट मात्र एन्लार्ज केलेला फोटो टेबलावर असेल, त्याला हार नसेल आणि फ्रेमची क्वॉलिटी उत्तम असेल तर मात्र तो नुकताच काढलेला आहे असं वाटणं स्वाभाविक आहे.

आमच्या मानसकन्येचं कौतुक करावं यासाठी मी तोंड उघडणार इतक्यात ताई म्हणाल्या, “तुमचा मुलगा, सून आणि नात वाटतं!”

मी प्रथमच अशा वेगळ्या नजरेनं त्या फोटोकडे बघितलं. आम्हाला मुलगा नाही. पण त्यांना तसं वाटणं साहाजिक होतं. तोच चेहरा. मात्र फिगर वेगळी आणि विपुल केस.

च्यायला, जाहिरातींचा कसला इफेक्ट असतो आपल्यावर ! ‘विपुल’ हा शब्द कोणी बोली भाषेत वापरतो का? पण भरगच्च केस दिसले आणि ‘विपुल’ हाच शब्द मला सुचला. असो.

मी नाहीतरी टिवल्याबावल्याच करंत होतो. मजेदार गैरसमजुतीची सुरेख संधी चालून आली होती. मी ठरवलं. अजिबात खोटं न बोलता हे संभाषण याच मार्गावर किती वेळ टिकवून ठेवता येतं ते बघू !

मी त्यांच्याकडे बघून फक्त स्मितहास्य केलं. काय काढायचा तो अर्थ काढा.

“तुमची नात किती गोड आहे.” ताई.

बुद्धिबळात एक ‘ब्लिट्झ’ नावाचा सुपरफास्ट प्रकार असतो. त्यात दर काही सेकंदात एक चाल करावी लागते. माझ्या दृष्टीनी तसा डाव सुरू झाला होता.

“लहान मुलं इतकी निरागस असतात, सगळीच गोंडस दिसतात.” मी.

या क्षणी शुभदाची एन्ट्री झाली. “मी सगळे पॅक केले आणि तुम्हाला दाखवायला एक प्रिंट बाहेर काढून . . . . . . . .” असं जॉबबद्दलच बोलत आली पण ताईंनी तिला मधेच तोडलं. “अय्या तुमची सून कित्ती तुमच्यासारखी दिसते!” जबरदस्त निरीक्षणशक्ती !

शुभदा अवाक् ! तिला काहीच कळेना. “सून? कुठली सून?”

कुठल्याही क्षणी भोपळा फुटणार हे मला कळून चुकलं. पुढची मूव्ह लगेच करणंच आवश्यक होतं.

फोटोकडे बोट दाखवून मी म्हटलं, “या दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर आमचं दोघांचं प्रेम एकमेकावर बसलं.” एकही शब्द खोटा नव्हता. आमचं लग्न पूर्णपणे पारंपारिक. म्हणजे लग्नाआधी अगदी जुजबी ओळख. लग्नानंतर प्रेम झालं.

त्या दोघांच्याही भुवया वर गेल्या. डोक्यातल्या गोंधळामुळे ताईंची दोन बोटं तोंडाकडे गेली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. नवर्‍यानं डोळे क्षणभर मोठे करून ताईंना दटावलं. ताईंनी चट्कन् तोंडातली बोटं काढली ! त्या आळीपाळीनी माझ्याकडे, शुभदाकडे, फोटोकडे आणि नवर्‍याकडे बघू लागल्या.

गेस्ट शुभदाचे. आणि तिला मात्र आमच्या अर्थहीन प्रश्नोत्तरांचा आणि त्या दाम्पत्याच्या आविर्भावांचा अजिबात संदर्भ लागत नव्हता. ती हैराण ! तिनी प्रश्नार्थक मुद्रेनी माझ्याकडे पाहिलं. मी तिला डोळा मारला. तिनी छताकडे बघत सुस्कारा टाकला. बायकांच्या सुस्कार्‍याचे परस्परविरोधी कित्येक अर्थ असतात हे सांगण्याची जरूरच नाही. आजचा अर्थ होता, “माझे क्लायंट आहेत. जपून.”

आता त्या फोटोकडे टक लावून बघत होत्या. फोटो आमचाच जुना असेल असं त्यांच्या स्वप्नातही आलं नाही. ताईंच्या डोक्यातल्या शंकाकुशंका आणि विचार चेहर्‍यावर स्पष्ट वाचता येत होते आणि मी वाचनाचा आनंद घेत होतो. ‘सरांचा मुलगा आणि बाईंची मुलगी यांचं लग्न झालं आणि त्यानंतर सरांचं आणि बाईंचं लग्न झालं ?’ विचित्रच आहे गडे.

म्हणजे एक शक्यता
मुलांची लग्नं झाल्यावर हे व्याही-विहीण प्रेमात पडले आणि आपापल्या पार्टनर्सना घटस्फोट देऊन एकमेकांशी लग्न केलं.
शी! नालायक! अशा लोकांशी संबंध सुद्धा नको !

दुसरी शक्यता
मुलांच्या लग्नाआधीच दोघेही घटस्फोटित होते.
पहिलं निभावता आलं नाही, दुसरं काय निभावणार?

तिसरी शक्यता
दुर्दैवानी दोघांचेही पार्टनर्स देवाघरी गेल्यामुळे दोघांनी आपापली मुलं एकेकट्यानीच वाढवली. नेमकं यांच्याच मुलांचं एकमेकाशी लग्न झालं. मग यांचं.
असं असलं तर मस्त आहे. पण हा अतीच कर्मधर्मसंयोग म्हणायचा. याची शक्यता जवळजवळ नाहीच.

काय असेल बरं? फार खाजगी प्रश्न विचारण्याचं त्यांचं धाडस होत नव्हतं. पण कुतूहल तर उतू जात होतं.

“या मुलांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं तुमच्या लग्नाला?” ताई.

मी बुद्धिबळ बरा खेळतो पण इतका एक्सपर्ट नाही. मला काही उत्तर सुचेना. मी फक्त भुवया उंचावल्या.

“तसं नाही. प .... ण..... दुसरं करण्यासाठी या वयात पहिलं मोडायचं म्हणजे ...............”. ताई.

नवर्‍यानी चमकून ताईंकडे बघितलं आणि डोळे वटारले पण त्यांनी लक्ष न दिल्यामुळे तो खिडकीतून बाहेर बघायला लागला.

बायकोच्या अनाहूत प्रश्नांनी कधीही embarrass झालेला नाही असा मनुष्य तुम्हाला दिसला तर खुशाल समजावं की तो ठार बहिरा आहे.

Now I was on solid ground. “छे छे. आमच्याकडच्या कोणाचाही घटस्फोट वगैरे झालेला नाही. (फोटोकडे बोट दाखवून) यांच्या लग्नाआधी बरीच वर्षं आम्ही दोघेही एकेकटेच होतो. त्यामुळे सगळ्यांचाच आमच्या लग्नाला पाठिंबा होता.”

राजा हरिश्चंद्रदेखील एका दमात इतकं खरं बोलला नसेल.

ताईंचा चेहरा एकदम् खुलला ! Against all odds तिसरी शक्यताच खरी ठरली होती. आमच्याबद्दल प्रचंड आदर त्यांच्या डोळ्यात दिसला. इतकंच नव्हे तर इतक्या unique situation बद्दल खूपच कुतूहल कोणालाही वाटणारच. त्यामुळे आता प्रश्नांचा पूर येईल त्याच्या आतच ही भंकस थांबवावी आणि त्यांचा गैरसमज दूर करावा असं मी ठरवलं.

मात्र प्रश्नांऐवजी या वस्तुस्थितीच्या एका corollaryनी त्यांचं लक्षं वेधून घेतलं. “आई हीच सासू !” आणि त्या सुखद विचारानी मोहूनच गेल्या. कल्पना आहेच ती गोजिरवाणी! त्यांना आनंदाचा उमाळा आवरताच आला नाही. “अय्या ! कित्ती कित्ती मज्जा ! धम्माल !” जोडाक्षरांचा नुसता पाऊस. “आईच सासू !” आळीपाळीनी फोटोकडे आणि शुभदाकडे पहात – “अय्या आई म्हणजेच सासू !”

शुभदाच्या दृष्टीनी हा सबंद संवाद म्हणजे असंबद्धतेचा कळस होता. त्यात आता ताई आनंदानी का होई ना, पण बर्‍यापैकी animated झाल्या होत्या. त्यामुळे तिनी हस्तक्षेप करायचं ठरवलं. “यांच्या गप्पा ऐकत राहिलात तर सबंद दिवस पुरणार नाही. तुमचा जॉब तपासून घेताय ना?”

“हो. हो. विसरलेच मी.” असं म्हणत त्यांनी सँम्पल हातात घेतलं आणि डोळ्यासमोर धरलं खरं, पण नजर कागदातून आरपार जाऊन ‘आई हीच सासू’ या स्वप्नातच अडकली होती. आणि का अडकू नये?

त्या जाण्याआधी त्यांना खरं काय आहे ते सांगायचं मी ठरवलं होतं पण कोणालाही गोड स्वप्नातून आणून वास्तवात दाणकन् आपटणं चूकच. त्यांचा आनंद मला हिरावून घेववलाच नाही. त्या तरंगतच दारातून बाहेर पडल्या.

विनोदलेखअनुभव

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

7 Apr 2016 - 10:49 pm | श्रीरंग_जोशी

एकदम भन्नाट किस्सा. भरपूर हसलो :-) .

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2016 - 12:00 am | टवाळ कार्टा

भन्नाट =))

रेवती's picture

8 Apr 2016 - 12:45 am | रेवती

हा हा हा.

ट्रेड मार्क's picture

8 Apr 2016 - 1:09 am | ट्रेड मार्क

हहपुवा झाली.

एवढे होऊन पण त्यांना कळले नाही म्हणजे….

रच्याकने: ती पत्रके (जॉब) अंधश्रद्धा निर्मुलन समितीची होती का?

एस's picture

8 Apr 2016 - 1:20 am | एस

:-)

फेरफटका's picture

8 Apr 2016 - 2:12 am | फेरफटका

वाह गोडबोले काका. काय सुंदर लिहीलय तुम्ही. कुठलाही अनुभव ईतका जिवंतपणे सांगायची तुमची शैली अप्रतिम आहे. असच 'विपुल' लिखाण करा.

यशोधरा's picture

8 Apr 2016 - 4:31 am | यशोधरा

=)) दुत्त दुत्त काका!!

सांगायची शैली खूप आवडली प्रगो साहेब!

असेच धमाल किस्से येउद्यात अजून..
आणि तुमच्या बोटीवरच्या गोष्टी राहिल्यात ना अजून!

नाखु's picture

11 Apr 2016 - 8:47 am | नाखु

जबर्या किस्सा आणि हातोटी विलक्षण !! बोटीवर न्या लवकर .

पंखा नाखु

टिवटिव's picture

8 Apr 2016 - 7:44 am | टिवटिव

भन्नाट ! ! हा हा हा

शित्रेउमेश's picture

8 Apr 2016 - 10:28 am | शित्रेउमेश

हहपुझा...
‘आई हीच सासू’ काय भन्नाट कल्पना आहे?

"त्यांनी सँम्पल हातात घेतलं आणि डोळ्यासमोर धरलं खरं, पण नजर कागदातून आरपार जाऊन ‘आई हीच सासू’ या स्वप्नातच अडकली होती."

खूप हसलो...

अजया's picture

8 Apr 2016 - 11:50 am | अजया

=)) धमाल किस्सा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2016 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

धमाल किस्सा ! पण, इतके स्वीट टॉक करून करून लोकांचे पाय ओढणे बरे नाही ;) :) =))

पिलीयन रायडर's picture

8 Apr 2016 - 12:21 pm | पिलीयन रायडर

आधी पण वाचला होता.. आताही पुन्हा सगळा वाचला.. तेवढीच मज्जा आली!!

माझ्या लहानपणी आमच्या घरी भिंतीवरचं एक घड्याळ होतं. त्याचं डायल पारदर्शक होतं. त्यातून आतली चालणारी सर्व मशिनरी स्पष्ट दिसायची. ताईंचा चेहरा तसा होता. डोक्यात चाललेले सर्व विचार चेहर्‍यावर दिसत होते.

हे खासंच!!

पिराताई, मी हा लेख परवा वाचला आणि प्रतिक्रिया लिहिली पण प्रकाशित करण्या आधीच दुसर्‍या कामात व्यस्त झाले. आत्त प्रकाशित करुन बाकीच्या प्रतिक्रिया वाचताना कळले, तुम्हीच ती माझी जत्रेत हरवलेली बहीण! ;)

प्राची अश्विनी's picture

8 Apr 2016 - 12:54 pm | प्राची अश्विनी

:)

विवेक ठाकूर's picture

8 Apr 2016 - 2:20 pm | विवेक ठाकूर

.

राजाभाउ's picture

8 Apr 2016 - 2:30 pm | राजाभाउ

=:) हा हा हा धमाल किस्सा!

झेन's picture

8 Apr 2016 - 2:43 pm | झेन

माय गॉड खरचं तो तुमचा दोघांचा फोटो होता ? हीला आत्ताच सांगतो

स्वीट टॉकर's picture

8 Apr 2016 - 3:16 pm | स्वीट टॉकर

सर्वजण,
धन्यवाद!

ट्रेड मार्क - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संदर्भ मला कळला नाही

खेडूत - लिहायला अजिबात वेळ नाही. चौदा तारखेला नरेंद्र मोदी आणि कित्येक व्ही आय पी मुंबईला Maritime India Summit साठी येणार आहेत. त्यात माझा छोटंसं योगदान असल्यामुळे आता अजिबात वेळ नाही. त्यामुळे पूर्वीच लिहिलेला हा लेख टाकला.

विवेक ठाकूर - मिपावर फोटो टाकण्याची प्रक्रिया जरा जटिल वाटली. त्यामुळे मी अजून एकही टाकलेला नाही. लवकरंच शिकून घेईन.

झेन - तुमची आयडिया मस्तच आहे.
मात्र हिचे सगळे क्लायंट जवळपासचेच असतात. त्यांनी मजेदार गोष्ट म्हणून इतरांना सांगायला लागल्याबरोबर त्यांना खरं काय ते समजलं. ते दोघेही पुन्हा हिच्या ऑफिसमध्ये येऊन छान गप्पा मारून गेले.

विवेक ठाकूर's picture

8 Apr 2016 - 4:16 pm | विवेक ठाकूर

इथले तज्ञ तुम्हाला मदत करतील

रुपी's picture

8 Apr 2016 - 11:50 pm | रुपी

उपमा एकदम भारी वापरल्या आहेत..
"माझ्या लहानपणी आमच्या घरी भिंतीवरचं एक घड्याळ होतं. त्याचं डायल पारदर्शक होतं. त्यातून आतली चालणारी सर्व मशिनरी स्पष्ट दिसायची. ताईंचा चेहरा तसा होता. डोक्यात चाललेले सर्व विचार चेहर्‍यावर दिसत होते." >> हे बेस्ट!

हसुनहसुन गडाबडा लोळणारा स्मायली.

अद्द्या's picture

9 Apr 2016 - 4:20 pm | अद्द्या

हहहहा

मस्त

अभिजित - १'s picture

9 Apr 2016 - 5:41 pm | अभिजित - १

मस्त .. अवांतर - तुमची रास मिथुन आहे का ?

अत्रे's picture

9 Apr 2016 - 5:43 pm | अत्रे

मस्त, मस्त आठवण!

सस्नेह's picture

9 Apr 2016 - 9:42 pm | सस्नेह

लोक्स इतके गंडतात :)

संजय पाटिल's picture

10 Apr 2016 - 10:25 pm | संजय पाटिल

तसा गंडवनारा असावा लागतो.;)

स्वीट टॉकर's picture

11 Apr 2016 - 9:01 am | स्वीट टॉकर

सर्वजण,

पुन्हा धन्यवाद.

अभिजित - १ - माझी रास मिथुन नाही. वृश्चिक आहे. स्वभाव आणि रास काही जुळत नाहीत.

जगप्रवासी's picture

11 Apr 2016 - 6:03 pm | जगप्रवासी

बेक्कार हसतोय. छान किस्सा

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Apr 2016 - 6:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

जाम भारी!!

पद्मावति's picture

12 Apr 2016 - 1:34 am | पद्मावति

:)

पैसा's picture

12 Apr 2016 - 1:35 pm | पैसा

=))