चोरी

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
27 Mar 2016 - 2:52 am

उंच टेकडीवरचे जुनाट दगडी मंदिर. सीमेंट च्या रस्त्याने मंदिराच्या टेकड़ीला गोल चक्कर घातलेली. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट झाडी आणि नंतर तब्बल दहा फूटी भिंतीचे कुंपन. आत जायला दोन मोठाली प्रवेश द्वार.
एका प्रवेशद्वाराला खेटुनच असलेल्या सिसाच्या डेरेदार झाडाखाली म्हातारी आणि तिचा नातु गोधड़ीवर लोळत पडलेली.
"ये आजे! उथ ना! मया लय भुत लादली" पेंगुळलेल्या आजीला त्यानं दोनदा हलवलं पण तिना काहीच प्रतिसाद दिला नाही.
मग तो झाडाच्या सावलीतून बाहेर आला. रस्त्याच्या कडेला बांधलेल्या कठड्यावर उभा राहुन त्यानं मंदिराच्या पायऱ्याकड़े बघितले. लोकांची वर्दळ वाढलेली. पळत येऊन त्यानं म्हातारीच्या उशाला असलेल्या गोणीतली परात काढली आणि पायऱ्याकड़े पळाला. पेंगुळलेल्या म्हातारीने तो पायरीपर्यंत जाउस्तवर त्याच्याकडे बघितले आणि परत कुस बदलून झोपी गेली.
पायरी उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या लोकांपुढे परात धरून तो फिरू लागला. पायाला तापलेल्या पायरीचे चटके बसु लागले तेव्हा झाडाची पानं गोळाकरुन एका जागी उभा राहिला. पण कुठल्यातरी नववारि नाटी घातलेल्या बाईने टाकलेले दोन आठआणे सोडले तर अर्धा तास पायपिट करुन ही त्याच्या परातीत काहीच पडले नव्हते. शेवटी डोक्याला उन्हाचे चटके बसु लागले तेव्हा पाय चोरत पळत तो म्हातारि जवळ आला. म्हातारी अजुनही झोपेतच. दोन्ही आठअणे मुठीत घट्ट धरून आणि परात तिच्या उशाला ठेऊन तो प्रवेशद्वाराच्या बाहेर आला.
बाहेर चे सगळे वातावरण गजबजलेले. अंतरा अंतराने भेळ-पुरीची दुकानं, फुगेवाले, खेळणीची दुकानं, कसल्या कसल्या वस्तु घेऊन इकडे तिकडे मिरणारे हातगाड़ी वाले. हातातले दोन आठाणे आणखी घट्ट धरत तो भेळीच्या दुकानाजवळ आला.
भेळीवाल्याने भुवया उंचावल्या तसं त्याने हातातले दोन आठाने दाखवत भेळ मागितली.
"जा, हौर पैसे ला! इतने में नै आती भेल!" म्हणत भेळीवाल्याने त्याला हकलले.
मग तो हातगाड्यावरच्या चेंडूची खरेदी करायला गेला, त्यानं ही हकलुन दिले.
एवढ्यात फुगा तरी येईल या अपेक्षेने तो फुगेवाल्याकड़े गेला.
"हे असले आठ आठाने चालत नई रे आता! जाय दुसरे पैसे आन!" म्हणत फुगेवाल्याने पण त्याला पिटाळले.
तो पार वैतागुन गेला.
म्हातारी अजुन झोपेतच होती.
ते दोन आठाणे गोणीत टाकून तो मंदिराच्या पायऱ्या चढु लागला.
वरती देव दर्शनासाठी लागलेल्या रांगेत येऊन उभा राहिला.
रांगेत सरकत सरकत तो गाभाऱ्यात ठेवलेल्या मूर्ती पुढे आला.
सोन्याचा पत्रा बसवालेल्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर एक भली मोठी परात ठेवलेली. दर्शनाला आलेले भाविक त्यात पैसे टाकत. कुणी चिल्लर तर कुणी दहाची, विसची, पन्नासाची किंवा शंभरची नोट त्या परातीत टाकत आणि परातीत ठेवलेला साखरफुटाना प्रसाद म्हणुन उचलत.
पोराने इकडे तिकडे पाहिले आणि साखरफुटाना उचलायचे नाटक करत एक दहाची नोट उचलली. तेवढ्यात आतून एक टप्पू हात बाहेर आला आणि त्याने गचकन पोराचा हात पकडला. त्यानं झटका देऊन पळायचा प्रयत्न केला पण त्या हातासोबत अडदांड उघड़ाबंब पुजारी गाभाऱ्याच्या बाहेर आला.
"देवाच्या घरात चोरी करतोस काय रे राक्षसा?" म्हणत त्यानं पोराच्या कनाखाली लावली व हातातली नोट काढून घेतली.
पोरगं थरथरु लागलं. पूजाऱ्याने त्याला ओढ़त पायरीजवळ आणलं. त्याच्या पाठीत आणखी एक गुद्दा घालुन त्याला पायरीवरून लोटले.
"फिरून मंदिरात दिसला तर तंगडं तोडिल" म्हणत पुजारी निघुन गेला.
पोरगं रडत रडत म्हातारीजवळ आलं.
त्याच्या हुंदक्यानं म्हातारी जागी झाली.
"काय झालं ग माझ्या सोन्याला" म्हातारीनं त्याला जवळ घेतलं. कुणी मारलं? का मारलं? हे विचारण्यात काही अर्थ नव्हता. तिना त्याला थापटुन थापटून झोपी घातलं.
तो झोपल्यावर म्हातारिणे गोणीतून हळदी कुंकु काढले, एक कुठल्या तरी देवीचा छोटासा फोटो काढला. ते सगळं परातीत व्यवस्थित मांडलं. स्वतःला कपाळभर कुंकु लावलं, गळ्यात मोठाल्या मन्यांची तुलसीमाळ घातली आणि मंदिराच्या टेकड़ीला गोल चक्कर घालनाऱ्या सीमेंट रस्त्याने निघाली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडं लावलेली तसेच त्याखाली बसायला सिमेंटचे कठडे बांधलेले.
म्हातारी एका कठड्याजवळ आली. एक जोडपं बसलेलं. म्हातारीने पंजाबी घातलेल्या मुलीच्या पायाकडे बघितले नंतर गळ्याकडे बघितले.
"लै भाग्यवान हैस पोरी! तुला मनासारखा जोड़ीदार भेटलाय" म्हणत म्हातारीने पोरिच्या कपाळाला कुंकवाचे बोट लावले व ताट तिच्या प्रियकरापुढे धरले.
त्याचा चेहरा खुलला. पाकिटातुन पन्नासची नोट काढुन त्यानं ताटात टाकली.
पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हातारी पुढच्या कठड्या कडे निघाली.
पायातले जोडवे, गळ्यातलं मंगळसूत्र पाहुन म्हातारी ने त्या साड़ीवाल्या पोरिला कुंकू लावले आणि लवकरच पाळणा हलनार बोलली. त्या जोडप्याने दहाच्या तिन नोटा म्हातारीच्या ताटात टाकल्या.
नंतरच्या कठड्यावर बसलेल्या जीन्स टीशर्टवाल्या पोरीने आणि तिच्या मित्राने तोंड फिरवले. मग म्हातारी पुढे सरकली व दोघांच्या तोंडासमोर ताट धरून तिथेच उभा राहिली. शेवटी वैतागुण त्या पोरीने पर्समधून एक रुपया काढून परातीत टाकला तेव्हा म्हातारी तिथून निघाली.
पुढे असेच एक एक जोडपे घेत म्हातारी निघाली. काहींनी तिला हकलले तर काही स्वतः उठून गेले.
शेवटी म्हातारी वापस सिसाच्या झाडाखाली पोहचली.
नातू अजुन झोपेतच होता.
ताट गोणीत व्यवस्थीत ठेवून तिना पुडक्यात आनलेली भेळ सोडली आणि नातवाला उठवलं.
भेळ पाहुन त्याला आनंद झाला. भेळीचा पहिला घास त्यानं म्हातारीला भरवाला आणि गळ्यात पडून तिचे मटामट मुके घेऊ लागला.

कथासमाज

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

27 Mar 2016 - 4:09 am | यशोधरा

भेळ पाहुन त्याला आनंद झाला. भेळीचा पहिला घास त्यानं म्हातारीला भरवाला आणि गळ्यात पडून तिचे मटामट मुके घेऊ लागला.

!!

विद्यार्थी's picture

27 Mar 2016 - 5:42 am | विद्यार्थी

एक शंका आहे,

शेवटी वैतागुण त्या पोरीने पर्समधून एक रुपया काढून परातीत टाकला तेव्हा म्हातारी तिथून निघाली.

"न" ला "ण" तुम्ही अनावधानाने लिहिता का ते तसेच असायला हवे असे तुम्हाला वाटते?

"फिरून मंदिरात दिसला तर तंगडं तोडिल" म्हणत पुजारी निघुन गेला.

"तोडिल" नसते हो, "तोडेन" असते.

असो, गोष्ट मात्र मस्त आहे.

कपिलमुनी's picture

27 Mar 2016 - 12:36 pm | कपिलमुनी

बोली भाषेत तंगड 'तोडिल' वापरतात .

आनंद कांबीकर's picture

27 Mar 2016 - 11:50 pm | आनंद कांबीकर

अनावधानाने.
काय करता व्याकरण कच्चे आहे हो आमचे!

नाखु's picture

28 Mar 2016 - 8:51 am | नाखु

जाऊद्या "विद्यार्थी" असल्याने शंका विचारणे आवश्यकच आहे.

तुम्ही बिनघोर लिहा.

चवली-पावली वाला नाखु

आनंद कांबीकर's picture

27 May 2016 - 11:11 pm | आनंद कांबीकर

तुमचा राग समाजु शकतो

आनंद कांबीकर's picture

27 May 2016 - 11:12 pm | आनंद कांबीकर

तुमचा राग समजु शकतो

जव्हेरगंज's picture

27 May 2016 - 11:19 pm | जव्हेरगंज

रामराम कांबीकर!

लै दिवसांनी दिसलात!

वेलकम ब्याक टू मिपा !!!!

आनंद कांबीकर's picture

27 May 2016 - 11:29 pm | आनंद कांबीकर

जव्हेरभौ

रातराणी's picture

27 Mar 2016 - 7:14 am | रातराणी

कथा आवडली.

जव्हेरगंज's picture

27 Mar 2016 - 9:57 am | जव्हेरगंज

भारी. आवडली.

अभ्या..'s picture

27 Mar 2016 - 11:13 am | अभ्या..

मस्त हो आनंदराव.
पाय आन गळा बघून कुणाकडं पैसे मागायचे ती म्हतारीची आयडीया परफेक्ट.
दोघांच्या मधे ताट धरायची पण.

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2016 - 11:52 am | टवाळ कार्टा

चटका :(

प्राची अश्विनी's picture

27 Mar 2016 - 12:09 pm | प्राची अश्विनी

कथा आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Mar 2016 - 12:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख,
आवडली गोष्ट
पैजारबुवा,

Ram ram's picture

27 Mar 2016 - 2:30 pm | Ram ram

Is Duniya ko jisko zukana aa gaya, bina mehnat kiye daulat vohi pa saka

बोका-ए-आझम's picture

27 Mar 2016 - 3:27 pm | बोका-ए-आझम

और आने दो!

कविता१९७८'s picture

27 Mar 2016 - 3:56 pm | कविता१९७८

मस्त

उगा काहितरीच's picture

28 Mar 2016 - 1:50 am | उगा काहितरीच

छान छान...

अनाहूत's picture

28 May 2016 - 8:32 am | अनाहूत

मस्त आहे

गौतमी's picture

28 May 2016 - 11:56 am | गौतमी

आवडली.

पद्मावति's picture

28 May 2016 - 4:18 pm | पद्मावति

कथा खूप आवडली.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

1 Jun 2016 - 5:26 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आवडली

स्वीट टॉकर's picture

3 Jun 2016 - 11:36 am | स्वीट टॉकर

आवडली.

आनंद कांबीकर's picture

4 Jun 2016 - 11:05 am | आनंद कांबीकर

धन्यवाद