सिंधुदुर्ग

हकु's picture
हकु in भटकंती
21 Mar 2016 - 2:26 am

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमाराची राजधानी. संपूर्णपणे महाराजांनीच बांधून घेतलेल्या काही किल्ल्यांपैकी एक. "८४ बंदरांत असा जागा मिळणार नाही!असं म्हणून मालवणच्या 'कुरटे' बेटावर महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला. सुमारे २ वर्ष या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. साधारण ५००० मावळे त्यासाठी खपत होते. यातले बहुतांश मावळे कोळी, भंडारी आणि आगरी होते. रायगडाचे बांधकाम करणारा हिरोजी इन्दळकर /इंदुलकर याच्याकडेच या किल्ल्याच्या संपूर्ण बांधकामाची जबाबदारी सोपवलेली होती. हाच स्वराज्याचा PWD हेड म्हणजेच बांधकाम विभागाचा प्रमुख होता. किल्ला बांधत असताना शेवटी शेवटी शिवाजी महाराज लढायांमध्ये व्यस्त होते, त्यावेळी सिंधुदुर्ग साठी निधी येऊ शकला नव्ह्ता. शिवाजी महाराज स्वतःही या काळात वेळ देऊ शकत नव्हते. अश्या वेळी 'सरकारचं लक्ष नाही, corpus available नाही' असं म्हणून हिरोजी बांधकाम थांबवून गप्प बसला नाही. किंवा पैसे कमी दिले म्हणून खालच्या दर्जाचे बांधकाम सुद्धा त्याने केले नाही. किंवा 'सरकारचं कुठे लक्ष आहे!' असं म्हणून 'थोडे पैसे आपण खाऊ आणि थोडे बाकीच्यांना खायला देऊन गप्प बसवू. किल्ला गेला तेल लावत!' असं म्हणत कुठलाही अफरातफरी चा व्यवहार ही या PWD हेड ने केलेला आढळून येत नाही. या उलट महाराजांना लक्ष द्यायला जमत नसून ही, निधी उपलब्ध होत नसूनही आणि पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांची आक्रमणं येत असूनही त्याने या किल्ल्याचं बांधकाम अविरत चालू ठेवलं, दर्जा सुद्धा उत्कृष्ट राखला आणि स्वतःच्या खजिन्यातून बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला. नंतर महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा महाराजांनी सर्व पैसे त्याला परत केले आणि बक्षीस दिलं. हे बक्षीस काय हवं म्हणून विचारलं तेव्हा हा कुठलंही मोठं मंत्रिपद, किंवा मोठी संपत्ती वगैरे मागू शकला असता. पण याने काय मागितलं? किल्ल्यावर चुन्यामध्ये शिवरायांच्या डाव्या पावलाचा आणि उजव्या पंजाचा ठसा! याने काय मिळणार होतं त्याला? तर याने मिळणार होतं शिवरायांचं त्या किल्ल्यावरचं कायमचं जिवंत अस्तित्व, लढण्यासाठीची प्रेरणा आणि अनंत काळापर्यंत पुरणारा शिवरायांचा आशीर्वाद. जसं आपण रोज सकाळी कामावर जायच्या आधी आई वडिलांच्या पायाला हात लावतो (निदान तशी अपेक्षा आहे) आणि आशीर्वाद घेतो त्या प्रमाणे लढाई वर निघण्यापूर्वी सर्व सैनिक या दोन्ही ठश्यांचे दर्शन घेऊन पुढे निघत. सिंधुदुर्ग
या किल्ल्याचं बांधकाम करणाऱ्या ५००० मावळ्यांपैकी २००० मावळे शिवरायांनी इथे गडावरच ठेवले. त्यांच्यापैकी १७ घराणी आज ही त्या किल्ल्यावर राहतात आणि सध्याची ही त्यांची दहावी पिढी आहे. बहुतांश लोक हे सकपाळ (पूर्वीचे संगपाळ आणि त्याही पूर्वीचे दरबारात शंख वाजवणारे शंखपाळ) आहेत. त्यातल्या अनेकांचा व्यवसाय हा गाईड बनून किल्ल्याची आणि शिवरायांची माहिती पर्यटकांना देणे हा आहे. काहींनी पर्यटकांसाठी सरबताची दुकाने उघडली आहेत. हे लोक पावसाळ्यात सुद्धा किल्ल्यावरच राहतात. साधारण उन्हाळ्याच्या शेवटी समुद्राला उधाण येतं आणि नारळी पौर्णिमेपर्यंत होड्यांचे या किल्ल्यापर्यंत येणं जाणं बंद होतं. त्या चार महिन्यांच्या काळात हे लोक किल्ल्यातच अडकून पडतात. बिनदुधाचा चहा पितात. असलेलं खायचं सामान पुरवून पुरवून वापरतात. तटबंदी ओलांडून किल्ल्यामध्ये समुद्राच्या लाटा घुसतात त्यावेळी जीव मुठीत धरून राहतात. यांची मुलं त्यावेळी किनाऱ्यावरच्या मालवण गावात होडीवाल्यांच्या घरी राहून शाळेत जा-ये करतात. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून पहिली होडी किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत सोडली जाते. ती होडी या किल्ल्यात राहिलेल्या लोकांना ४ महिन्यानंतर जमिनीवर घेऊन येते. किनाऱ्यावरचे होडीवाले किल्ल्यातल्या लोकांची ने-आण फुकट करतात. त्यांची मुलं सांभाळतात. त्याबदल्यात किल्ल्यातले लोक किल्ला बाराही महिने जीता जागता ठेवतात. किल्ल्यावर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, नारळी पौर्णिमा, दसरा आणि मोहरम असे सहा उत्सव होतात. किल्ल्यावरचे हिंदू- मुस्लिम लोक गुण्या गोविंदाने राहतात. मुस्लिमांसाठी मशीद नसल्यामुळे शिवरायांच्या मंदिराच्या आवारातच मोहरम साजरा केला जातो. दोन्ही समाजाचे लोक एकमेकांच्या उत्सवांत आनंदाने सहभागी होतात आणि धार्मिक व राजकीय कारणांसाठी या किल्ल्यावर भगवा झेंडा लावायला शासनाकडून परवानगी नाकारली जाते (!).
शिवरायांच्या नंतर ही हा किल्ला भरपूर लढला. सिद्दी किंवा पोर्तुगीजांच्या आक्रमणाला याने कधीही दाद दिली नाही. शिवरायांनी उभे केलेले आरमार हे प्रचंड बलवान होते. छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे यांच्या नंतर राजाराम महाराजांकडे स्वराज्याची धुरा आली. त्यांनी दक्षिणेत जिंजी कडे जाताना तीन आघाड्यांवर स्वराज्य लढवण्याचा आदेश दिलेला दिसतो. पहिली आघाडी म्हणजे सह्याद्री, जेथे औरंगजेबासह प्रचंड मुघल सैन्य तळ ठोकून बसलं होतं. धनाजी जाधव- संताजी घोरपडे यांच्यासारख्या सरदारांनी सह्याद्री चोख लढवून पुढे इथेच औरंगजेबाला गाडला. दुसरी आघाडी म्हणजे दक्षिण- भारत / कर्नाटक / महाराष्ट्राच्या दक्षिण भागाच्या म्हणजे पन्हाळ्याच्या खालचा प्रदेश. जेथे छत्रपती राजाराम महाराज स्वतः चालले होते. आणि तिसरी आघाडी म्हणजे स्वराज्याचे आरमार. जे स्वराज्याची संपूर्ण कोकण किनारपट्टी लढवत होतं. हे इतकं इतकं बलदंड होतं की आखाती देशांपर्यंत जाऊन छापे मारण्याचे पराक्रम या मराठा नौदलाकडून घडलेले दिसतात. अरबी सागरी चाच्यांचाही मराठी नौदलाने बंदोबस्त केलेला होता. इंग्रज सोडले तर अन्य अनेकांविरुद्ध या नौदलाने यशस्वी लढा दिलेला दिसतो. अश्या या नौदलात सिंधुदुर्ग चे स्थान अतिशय महत्वपूर्ण असे कायम राहिलेले आहे.
तटबंदी
किल्ल्याचे बांधकाम नि:संशय बिनतोड आहे. अजूनही तटबंदी व्यवस्थित रीत्या शाबूत आहे. किल्ल्याला मुख्य दरवाजाशिवाय किल्ल्याबाहेर पडायला दिसेल असा दरवाजा एकच. साधारण पश्चिमेच्या तटबंदीमध्ये अंदाजे चार फुट उंचीचा एक दरवाजा बनवला आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला चौपाटीसारखा छोटासा समुद्रकिनारा आहे. याला 'राणीची वेळा' असं नाव आहे. शिवरायांच्या सूनबाई 'महाराणी ताराबाई' या मनोरंजनासाठी व निवांत वेळ घालवण्यासाठी येथे येत असत असे सांगितले जाते.राणीची वेळा
युद्धाच्या वेळी शत्रूने या दरवाज्यातून आत यायचा प्रयत्न केला तर त्याला ४ फुटाच्या दरवाज्यातून वाकूनच यावे लागेल आणि आत असलेले मावळे तो आत येताच त्याचा शिरच्छेद करू शकतील अशी व्यवस्था होती. या दरवाज्यातून एका वेळी एकच व्यक्ती आत किंवा बाहेर जाऊ शकेल एवढीच या दरवाजाची रुंदी आहे.
राणीची वेळा
या व्यतिरिक्त किल्ल्याच्या मध्य भागी एक शंभू महादेवाचे देऊळ आहे. त्यात एक भुयारी मार्ग पूर्वी अस्तित्वात होता. बाहेरून दिसायला हे मंदिर होतं. त्यामुळे जर शत्रू मुसलमान असेल तर तो मंदिरात जाण्याची शक्यता कमीच. आत असलेलं भुयार सुद्धा सहज दृष्टीस पडेल असं नाही. सर्वसामान्यपणे चौकोनी आकाराची ही एक बारव (विहीर) दिसते. यात डोकावून बघितलं तर आत पाणीसुद्धा दिसतं. पण इथून आतूनच हा भुयारी मार्ग निघतो. तो थेट ओझर पर्यंत जायचा असा म्हणतात. मावळे महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन भुयारात उतरायचे. इंग्रजांनी हे भुयार बंद करून टाकलं. ते अजूनही बंदच आहे.
भुयार
किल्ल्यावर एक भवानी मातेचं मंदिर देखील आहे. मुख्य दरवाजाची रचना स्वराज्यातल्या अनेक किल्ल्यांप्रमाणे गोमुखी आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश करताना उजवीकडे वळण घेत जावे लागते. वळण घेतानाचा हा मार्ग सुद्धा अरुंद आहे. जेणेकरून हल्ला करणारे सैनिक एका वेळी कमी संख्येने हल्ला करू शकतील. या उलट मुख्य दिंडी दरवाजाच्या समोरची जागा रुंद आहे. म्हणजे किल्ल्यातील मावळे बाहेर पडले असता एका वेळी तुलनेने जास्त संख्येने प्रतिकार करू शकतील. दिंडी दरवाजाच्या वरच्या कमानीत शत्रू सैनिकांवर गरम तेल ओतण्याकरिता खाचा बनवलेल्या दिसतात.
महादरवाजा
आजही हा दिंडी दरवाजा सूर्योदयाला उघडतो आणि सूर्यास्तास बंद होतो. सकाळ संध्याकाळ गडावर नौबत झडते. राजाराम महाराजांनी बांधलेल्या आपल्या या वडिलांच्या मंदिरातल्या शिवरायांच्या पाषाण मूर्तीची वेळच्या वेळी पूजा-अर्चा होते. मंदिरांच्या भिंतींना डागडुजीची गरज आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विपुल आहे. समुद्राच्या मध्यभागी असूनही येथे पिण्यायोग्य पाणी बाराही महिने मिळते. त्यासाठी हिरोजींनी काही विहिरी खोदून घेतल्या. त्यांना 'दहिबाव', 'साखरबाव', 'दुधबाव' अशी नावे आहेत. सध्याचं rain water harvesting चं तंत्र हिरोजींनी त्या काळात म्हणजे १६६६ साली अवलंबलं होतं.
बारव
शिवरायांचं हस्त व पद चिन्ह संरक्षक भिंतींच्या आड ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हस्त चिन्ह बरचसं पुसट झालं आहे. पदचिन्ह मात्र अजूनही स्पष्ट दिसतं. किल्ल्याचं बरचसं बांधकाम अजूनही बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, मात्र शिवरायांची किल्ल्यावरची राहण्याची जागा जी दाखवली जाते तिच्याकडे बघून पुरातत्व खात्याची उदासीनता स्पष्ट होते.घर
या दुर्गाचे विशेष महत्व ऐतिहासिक व भौगोलिक दृष्ट्या तर आहेच पण त्या शिवाय काही गोष्टींमध्ये आहे त्या म्हणजे 'श्री शिवराजेश्वर मंदिर' आणि 'शिवरायांचे हस्त व पद चिन्ह'.हस्त चिन्ह
पद चिन्ह
श्री शिवराजेश्वर मंदिर
जवळ जवळ तीनशे वर्षांच्या स्वातंत्र्याचा दुष्काळ दूर करणारा शिवाजीराजा हे महाराष्ट्राचे दैवतच, आणि या दैवी व्यक्तीचा आपल्यासारखाच मनुष्य असल्याचा पुरावा म्हणजे चुन्यात उमटवलेली हस्त व पद चिन्हं. सिंधुदुर्गावरील हे मदिर हे महाराष्ट्रातले शिवरायांचे एकमेव मंदिर आहे की नाही हा संशोधानाचा मुद्दा आहे, कारण आत्ताच हे मंदिर बघण्याच्या ६ दिवसांपूर्वी मला पन्हाळ्यावर 'शिवाजी महाराजांचे मंदिर' म्हणून एक दरवाजे बंद असलेली मंदिराची आकृती आमच्या गाडीच्या ड्रायव्हर ने दाखवली. पण सामान्य मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन आपल्या कर्माने देवत्वाला पोहोचलेल्या व्यक्तीचा हा 'मनुष्य ते देवता' असा प्रवास दाखवणार हा एकमेव किल्ला हे मात्र मी खात्रीने म्हणू शकतो. असा हा सिंधुदुर्ग कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. पावसाळ्याचे दिवस सोडले तर सर्व आबालवृद्धांसाठी हा किल्ला खुला असतो. प्रत्येकाने या तीर्थक्षेत्राचे दर्शन सहकुटुंब सहपरिवार जरूर घ्यावेच.

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

21 Mar 2016 - 7:57 am | चलत मुसाफिर

लेखन आवडले. पण सिंधुदुर्ग किल्ल्याची अवस्था बिकट आहे. एक-दोन वर्षांपूर्वी गेलो होतो. स्वच्छता नव्हती. भिंती ढासळत होत्या. आता परिस्थिती बदलली असल्यास कल्पना नाही.

महाराष्ट्रात सातशेच्या आसपास किल्ले आहेत. इतर राज्यांत याच्या पन्नास टक्केसुद्धा नसतील. महाराष्ट्रात फक्त किल्ल्यांसाठी वेगळा मंत्री नेमला तरी कमी पडेल.

मुख्य म्हणजे या किल्ल्यांना जाज्वल्य इतिहास आहे. इथे युद्धे झालीत. वीरांचे रक्त सांडलेले आहे.

राजस्थानातल्या किल्ल्यांचा इतिहास फारसा भूषणास्पद नाही (काही अपवाद वगळता). पण किल्ल्यांची देखभाल फार चांगली केली जाते.

हकु's picture

21 Mar 2016 - 10:47 am | हकु

खरंय. किल्ल्याची अवस्था समाधानकारक नाहीच.
इथे वर लेखात एक छायाचित्र टाकले होते ते व्यवस्थित दिसत नाहीये.
अवस्था बिकट
शिवाजी महाराजांची राहण्याची जागा
या छायाचित्रात दिसतेय ती.
काय म्हणावे आता याच्या पुढे !!

मदनबाण's picture

21 Mar 2016 - 8:36 am | मदनबाण

लेखन आवडले, फोटोही मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram

स्पा's picture

21 Mar 2016 - 8:46 am | स्पा

मस्त लेख
शिवरायांच्या पायाचा ठसा पाहुन अंगावर काटा आला. :)

__/\__

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Mar 2016 - 5:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटो आणि वर्णन आवडले. किल्ल्यावरिल "rain water harvesting" बद्दल नवीनच समजले.

जगप्रवासी's picture

21 Mar 2016 - 5:44 pm | जगप्रवासी

पुढच्या महिन्यात मालवण दौरा आहे, त्यात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड, निवातीचा किल्ला आणि यशवंतगड बघायला जाणार आहे.

हकु's picture

22 Mar 2016 - 11:48 am | हकु

यापैकी सिंधुदुर्ग सोडून बाकीचे सर्व किल्ले माझे बघायचे राहिले आहेत. तुमचे अनुभव कळवा.

स्वच्छंदी_मनोज's picture

22 Mar 2016 - 12:00 pm | स्वच्छंदी_मनोज

जगप्रवासी, जर यशवंतगड बघायला जाणार असाल तर त्याच्याच जरासा पुढे असणारा आंबोळगड पण जरूर बघा (मी दोन्ही बघीतलेत :)).

कलाल बांगडी चा फोटो नाहि काढलात ?

कलाल बांगडी जंजिऱ्याला ना? सिंधुदुर्गावर नाही.

कंजूस's picture

21 Mar 2016 - 6:11 pm | कंजूस

मस्त.

होबासराव's picture

22 Mar 2016 - 8:23 pm | होबासराव

अरे हो... :(

हा किल्ला पाहण्याचा योग्य नोव्हेंबर मधे येऊन गेला...उत्तम किल्ला आहे...छत्रपत्तींची दूरदृष्टी काय वर्णावी?? अहाहाहाहा ...सर्वोत्तम हा एकच शब्द..आधी वाटायचं कि समुद्रात भर घालून बांधलाय पण नंतर समजलं कि एका बेटावर बांधलाय...काय सुरेख बांधलाय...मी गेलो होतो तेव्हा तटबंदीची डागडुजी चालू होती...एव्हाना पूर्णत्वास गेली असेल...थोडी पडझड आहेच जशी महाराष्ट्र सरकारने इतर किल्ल्याची वाट लागू दिली तशीच इथेही परिस्थिती आहे..असो..

पूर्ण किल्ला तसेच किल्ल्यावर फिरायला खूप मस्त वाटतं... अख्खा एक दिवस हि पुरत नाही...तो अथांग सागरही महाराजांपुढे इथे नतमस्तक झाला असणार...

एक गोष्ट खटकते अत्यंत ती म्हणजे...ज्या हिंदवी स्वराज्यासाठी या भारतात या महाराष्ट्रात भगव्या झेंड्याखाली लढून महाराजांनी आपलं रक्त ओतून त्याची आहुती देऊन हे साम्राज्य उभे केलं त्या साम्राज्याच्या ज्या काही खुणा डौलाने आजही त्या इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत तिथे महाराष्ट्राचा पर्यायाने महाराजांचा भगवा ध्वज उभारण्यास बंदी का??? कोण आहे ज्याच्या पोटात दुखतंय येथे भगवा उभारला तर??? का असल्या बांडगुळांना घाबरून तिथे भगव्याच्या अपमान केला गेलाय??.. ज्यांना या ठिकाणी भगव्याच्या त्रास होतोय अशा लोकांना हाकलून का नाही देत तिथून??

अशाच विचारांच्या कपाळ करंट्या लोकांमुळे फाळणी झाली हे लक्षात असूनही असे का??

एक छायाचित्रकार's picture

24 May 2018 - 6:11 pm | एक छायाचित्रकार

होडीवाले फक्त १ तास देतात किल्ला पहायला. १ तास तर खुप कमी पडतो हा किल्ला पहायला.

वाचून बरे वाटले. लेख आवडला हेवेसांनल.

लेखातल्या मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराच्या उल्लेल्खामुळे काही वर्षांपूर्वी वाचलेले अनुवादित पुस्तक आठवले.

कान्होजी आंग्रे
मूळ इंग्रजी लेखक: मनोहर माळगांवकर,
अनुवाद: पु. ल. देशपांडे.
प्रकाशक: म. ना. जोशी,
सन पब्लीकेशन,
३१७, नारायण पेठ,
पुणे ४११ ०३०
फोन: ०२०-२४४ ९५४१
प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८६.
पृष्ठसंख्या:३०४
किंमत रु. ६५/-
- X – X – X –

ऐतिहासिक लेखन म्हटले की पहिली भिती असते ती लेखकाच्या चष्म्याच्या रंगाची. पूर्वग्रहाच्या नाहीतर लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तीवलयामुळे आलेला भावनिक रंग. त्यातून होणारे एखाद्या लोकप्रिय ऐतिहासिक विभूतीचे अवाजवी उदात्तीकरण किंवा द्वेषबीज पेरणारे लेखन. अधूनमधून जाणवणारा अभिनिवेष, तो नसेल तर नीरस मीमांसा आणि पक्षपाती निष्कर्ष.

इंग्रज माणूस नेक, शिस्तीचा, व्यवहारात प्रामाणिक आणि सचोटीचा, प्रतिकूल परिस्थितीत न डगमगणारा, उच्च नीतीधैर्य बाळगणारा आणि प्रशासनात कुशल असे इंग्रजांचे चित्र शालेय इतिहासातून रेखाटलेले आहे. कान्होजींचे आरमार प्रचंड बलशाली होते आणि पोर्तुगीज आणि इंग्रज यांना ते स्वसामर्थ्यावर पुरून उरले अशा काहीशा समजुती शालेय पाठ्यपुस्तकातून निर्माण होतात.

वरील दोन्ही परिच्छेदात उल्लेख केलेले दोष या पुस्तकात नाहीत. आरमाराची रचना कशी असते, नौकांचे विविध प्रकार, डावपेचांचे व्यूह, अशा क्लिष्ट गोष्टी सामान्यांना समजतील अशा सोप्या भाषेत रंजकतेने मांडल्या आहेत. मला आवडले ते लेखकाचे फक्त विश्वसनीय ऐतिहासिक दस्तावेज स्वीकारणे आणि जिथे ते नाहीत तिथे वस्तुस्थिती काय असू शकते त्याबद्दल दिलेले तार्किक स्पष्टीकरण.

आपल्याकडे आलेले बहुसंख्य इंग्रज कसे भ्रष्ट, साहसाचा अभाव असलेले, बेशिस्त, विश्वासघातकी होते याचे विविध ऐतिहासिक घटनातून केले पुराव्यासह वर्णन पुस्तकात आहे. प्रत्येक प्रकारच्या युद्धनौकेची बलस्थाने कोणती, कोणत्या परिसरात कोणती नौका सरस ठरते, आपल्या नौदलातील नौकांनुसार त्यापरिसरात कसे डावपेच आखावेत याचे सुरेख चित्रण माळगांवकरांनी केलेले आहे. ब्रिटीश, पोर्तुगीज, मराठे, मोंगल यांचे गुणदोष सारख्याच तारतम्याने दाखवलेले आहेत.

एखादी ऐतिहासिक दृष्ट्या लोकोत्तर ठरलेली व्यक्ती श्रेष्ठ आहे असे मानून त्याच्या पुराव्यादाखल फक्त आधारपुरावे वाचकांपुढे ठेवून विरुद्ध जाणार्‍या पुराव्यांचा उल्लेख सहसा टाळलेला असतो. ऐतिहासिक कथाकादंबर्‍यातून तर असेच आढळते. एक कादंबरीकार असूनही माळगांवकर तसे करीत नाहीत. विविध प्रसंगातून विविध पुराव्यातून निघणारे निष्कर्ष आणि आपले वस्तुनिष्ठ विवेचन ते वाचकांपुढे संयत भाषेत कोणताही रंग न देता मांडतात. एक इतिहासकार म्हणून देखील माळगांवकार श्रेष्ठ कसे आहेत याचे दर्शन यातून होते.

मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे पु. ल देशपांडे यांनी. काही काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण शब्दयोजनेतून अनुवादकाची प्रतिभा दिसते. परंतु पुलंचा ठसा मात्र कुठेही जाणवत नाही. हा मोह पुलंनी यशस्वीपणे टाळला आहे. कदाचित ‘घोस्ट अनुवादक’ देखील वापरला असेल. त्याने, आदिलशहाने, या ऐवजी त्यानी, आदिलशहानी अशी शब्दयोजना पुस्तकभर आढळते. त्यामागील प्रयोजन मात्र कळले नाही.

पण आपला इतिहास नव्याने सांगणारे संग्रही असावे असे हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे याबद्दल दुमत नसावे.

असो आपल्या लेखामुळे या पुस्तकाची आठवण झाली आणि पुस्तकपरिचय करून द्यावा असे वाटले.

अनेक धन्यवाद.

यशोधरा's picture

26 May 2018 - 12:20 am | यशोधरा

प्रतिसाद आवडला.

+१. पुस्तक विकत घेण्यात येईल.

यशोधरा's picture

26 May 2018 - 12:20 am | यशोधरा

सुरेख माहिती पूर्ण लेख! फोटोही आवडले.