खरेदी पाहावी करून !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
6 Feb 2016 - 12:35 pm

अमेझॉन अनं फ़्लिपर्काटचा जमाना आहे. सगळं काही एका क्लिकवर मिळतं. मोबाइल काय अनं कपडे काय अनं दागिने काय जे म्हणाल ते मिळेल. खिशात पैसे नसतील तर सुलभ हप्त्यांची सोय सुद्धा उपलब्ध आहे. शक्य तेवढं ह्या मोह्मायेपासून लांब राहण्याचा मी प्रयत्न करतो. कारण एक तर आपल्याला खरेदीचा कंटाळा! त्यात ,"पैसे काय झाडाला लागतात का रे ?" हे मध्यमवर्गीय संस्कार ! त्यामुळे मी या विषयावर लिहिण्याच तसं काही कारण नाहीये. पण कालपरवा एक घटनाच अशी घडली की मला ह्याचा गांभीर्याने विचार करणे भाग पडले. झालं असं की, आमच्या कंपनीच्या क्लायण्टला प्रायोगिक तत्वावर एक प्रोजेक्ट करून द्यायचा होता. त्यासाठी अत्यंत लहान क्षमतेच्या एयर ब्लोअरची गरज होती. बरेच प्रयत्न करूनही कुठेच तो ब्लोअर मिळेना. सगळ्या सप्लायर्सकडे चौकशी करून झाली पण परिणाम शुन्य! आता काय करावं या विचारात असताना अचानक प्रोजेक्ट मॅनेजरचा फोन आला.
तो म्हणाला," ब्लोअर मिळाला."
मी विचारलं," कुठं?"
मी स्वप्नातही विचार केला नव्हता असं उत्तर आलं," फ़्लिपर्काट !!!!"

मी हादरलोच. च्यामारी आमच्या अख्ख्या सोर्सिंग टीमला जे जमलं नाही ते फ़्लिपर्काटवर मिळालं ! कंपनीचे कामं जर फ़्लिपर्काटवर व्हायला लागले तर आम्हाला घरीच बसावं लागेल ना. मी विचारात पडलो. खरंच इतकं सोप्पंय आमचं काम? काय करतो आम्ही कंपनीत? तर सोर्सिंग....म्हणजेच खरेदी. नाही नाही...खरेदी करणं हे खायचं काम नव्हे.( आता खरेदी करणं हे "खायचंच" काम आहे हा सर्वमान्य समज असला तरी ते एवढं सोप्पं नाही !)

रम्य अश्या सकाळी आम्ही रमतगमत कंपनीत पोहोचतो( इथे 'रमतगमत' ह्याचा अर्थ अर्धा तास ट्राफिक जाममध्ये अडकून, अख्ख्या गावाची धुळ अंगावर घेऊन असा घ्यावा!) तर प्रोजेक्ट मॅनेजर आ वासून समोर उभा असतो. त्याच्याकडे कितीही दुर्लक्ष केलं तरी तो मला खिंडीत गाठतोच. मग आमचं सुसंवाद सुरु होतो. सुसंवाद म्हणजे तो बोलतो आणि मी ऐकतो !
" अरे राजा..पंपाचं फौंडेशन ड्रॉईंग्स कुठे आहेत ? साईटवर सिव्हीलचं काम थांबलंय त्यामुळे. व्हॉल्व्स का नाही पोहोचलेत अजून ? असेम्बली थांबलीये साईटवर. बंर ते जाऊदे कॉम्प्रेसरचे डीटेल्स कुठे आहेत ? एयर लाइनचं रुटिंग होत नाहीये त्यामुळे. त्या xxx साईटच्या पाईपिंगची ऑर्डरचं नाही निघालीये म्हणे अजून. कधी करणार ? या महिन्यात बिलिंगला घेतलंय आपण ते. त्या yyy व्हेंडरचा आडव्हांस नाही दिलाय अजून. काम थांबवलंय त्यानी"
एव्हढे सगळे तोफगोळे अंगावर झेलून त्यावर ,"सर बघून सांगतो" असं शक्य तितक्या निर्विकार चेहऱ्याने उत्तर देणं फ़्लिपर्काटला जमेल का?

असो. तर खिंडीच्या मागल्या दराने पळ काढून आपल्या जागेवर स्थानापन्न होताच मोबाईलची रिंग ठणाण वाजते. फोन उचलताच तिकडून एखादा सप्लायर पेमेंटचं रडगाणं सुरु करतो. ह्यांना सकाळी सकाळी राजे गडावर पोहोचल्याची वर्दी मिळतेच कशी कोण जाणे? पण या असल्या फोनची एक गम्मत असते. सप्लायरच्या टोनप्रमाणे किंवा भाषेप्रमाणे आमचं उत्तर बदलते. उदा. समोरच्याने फोनवर नुसतंच ,"साहब मेरा पेमेण्ट" असं म्हटल्यास आम्ही लगेच वरच्या आवाजात ,"अरे दे रहे हैं भाई , भाग जायेंगे क्या?" असं म्हणून फोन ठेऊन देतो. पण समजा समोरच्याने फोनवर ," साहब वो जरा पेमेण्ट का देख लेना." अशी विनंती केल्यास आम्ही लगेच ," हा साहब हो रहा हैं...इस वीक में हो जायेगा." असं ठोकून देतो. आता समोरचा जर इंग्लिशमध्ये विचारत असेल तर आम्ही तितक्याच सफाईने ," येस वुई हॅव टेकन इट इन प्रोसेस. वुई आर जस्ट वेटिंग फोर अवर सीफओजं अप्प्रुव्हल विच कॅन कम एनी मोमेण्ट." असं झाडून मोकळे होतो. वास्तविक बहुतांशवेळा वरच्या तीनही सप्लायर्सच्या पेमेंटचा दूर दूर पर्यन्त पत्ता नसतो. शिवाय काही दिवसांनी जर परत फोन आलाच तर अनुक्रमे उत्तरं तयार असतात....फिलहाल पैसे नही हैं टाइम लगेगा/ चेक सायनिंग में हैं/ सीफओ इज ट्राव्हेलिंग !! ह्या तीनही वाक्यांना वेळेचं बंधन नाही. ह्याउपर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे थोड्या वेळाने ह्यातल्याच एखाद्याला फोन करून ,"मटेरियल कब भेजोगे?" असं विचारायला आम्हाला काहीही वाटत नाही. अमेझॉन अनं फ़्लिपर्काटचा धंदा रोखीत चालतो. त्यांना हे असले उधारीतले बाळंतपण सोसतील का?
ह्यात आणखी एक मजेदार प्रकार असतो. त्याला म्हणतात बदल / चेंज किंवा ह्यापेक्षाही गोंडस नाव म्हणजे रिव्हिजन ! थोडक्यात सांगायचं म्हणजे क्लायंटला जर सोनं हवं असेल तर आमच्याकडून नजरचुकीने किंवा जाणूनबुजून चांदीची ऑर्डर देण्यात येते आणि ती सुद्धा पितळेच्या भावात ! येनकेनप्रकारे क्लायण्टच्या हे लक्षात आल्यावर त्याला सोन्यापेक्षा चांदीच कशी चांगली हे पटवण्याचा असफल प्रयत्न केल्या जातो. शेवटी क्लायंट प्ल्याटीनमची मागणी करतो. मग सुरु होतो तो सप्लायरकडून पितळेच्याच भावात प्ल्याटीनम घेण्याचा एक वेडा अट्टाहास ! बऱ्याच प्रयत्नानंतर सुवर्णमध्य साधला जातो. (आता साईटला गेल्यावर त्या प्ल्याटीनमला गंज का चढतो ते मला विचारू नका!) पण ह्या अश्या परिस्थितीत फ़्लिपर्काटवाले तर चांदी आणि प्ल्याटीनम दोन्ही आमच्या माथ्यावर मारतील. कोणी चांदी घेता का चांदी असं म्हणायची आमच्यावर वेळ येईल.

बरं एकवेळ हे सगळं विसरून जाऊ. पण आमच्या कार्पोरेट विश्वात जबाबदारी हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. आणि जबाबदारी ढकलणे म्हणजेच जबाबदारी निभावणे हा अलिखित नियम आहे. म्हणजे बघा, प्रोजेक्टला उशीर होतोय या सत्यघटनेची जबाबदारी सेल्स डीपार्टमेण्टपासून प्लानिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट, इंजीनीयरिंग असं करता करता शेवटी सोर्सिंगवर ढकलण्यात येते. आम्ही सोर्सिंगवालेसुद्धा निरागसपणे ती सप्लायरकडे ढकलून देतो. काहीही झालं तरी ती आमच्याकडे परत येऊ न देणे ह्यातच आमचं कौशल्य असते. अश्यावेळी जर फ़्लिपर्काट आमचा सप्लायर असेल तर ती जबाबदारी त्याच्या फायरवॉलपर्यन्तही न पोहोचता आमच्याकडे वापस येईल. मग आम्ही पामरांनी कोणाकडे बघायचं ?

नाही नाही...फ़्लिपर्काट आम्हाला किंवा आमच्या सप्लायरला पर्याय असू शकत नाही.पिझ्झ्यावर भाजी फ्री मिळते म्हणून तो भाकरीला पर्याय ठरत नाही.तुझ्यासोबत जमेना अन तुझ्याशिवाय करमेना असं जरी आमचं नातं असलं तरी हर एक सप्लायर जरुरी होता हैं. सप्लायरला फोन करून झापण्यात जो आनंद आहे तो फ़्लिपर्काटच्या कॉलसेंटरला शिव्या घालण्यात नाही. किंवा एकेक अडथळा पार करून शेवटी साईटवर मटेरियल पोहोचवण्यात जे समाधान आहे ते एका क्लिकनंतर डिलीव्हरी बॉय कडून डिलीव्हरी घेण्यात नाही. मी पैजेवर सांगू शकतो की आमचे प्रोजेक्ट मॅनेजरसुद्धा फ़्लिपर्काटला लवकरच कंटाळतील. कारण प्रोजेक्ट मॅनेजरच्या ," अरे अर्जेण्ट आहे" या वाक्याला जर प्रत्येकवेळी ,"युअर ऑर्डर इज रेजीस्टर्ड विद अस. इट विल बी डिलॆवर्ड इन टु वीक्स" असं छापील आणी नीरस उत्तर येणार असेल तर काय फायदा? क्लायण्टला सांगायला काहीतरी ष्टोरी हवी ना! फ़्लिपर्काट २ आठवडे घेणार असेल तर आम्ही १० घेऊ पण त्यासाठी आमच्याकडे काहीतरी ष्टोरी असेल. शेवटी अनुभव नावाची काही गोष्ट असते का नाही!
म्हणूनच म्हणतो ,
येथे पाहिजे जातीचे, फ़्लिपर्काटचे हे काम नव्हे !!
-- चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

6 Feb 2016 - 12:40 pm | कंजूस

हाहाहा!

इस्पिक राजा's picture

6 Feb 2016 - 12:58 pm | इस्पिक राजा

एक नंबर जमलाय लेख

एस's picture

6 Feb 2016 - 1:20 pm | एस

गुडवन!

योगेश बापट's picture

6 Feb 2016 - 1:31 pm | योगेश बापट

वर लिहलेले खरे आहे. मी असाच एक सपलयार आसुन माझा आनुभव हाच आहे.

साहेब..या मग आमच्या कंपनीत एकदा !:-)

महासंग्राम's picture

6 Feb 2016 - 1:41 pm | महासंग्राम

खूब सही लिख्खा तुम्ही, कॉर्पोरेट म्हणजे हे असंच चालायचं, सप्लायार ला पर्याय नाही.

उगा काहितरीच's picture

6 Feb 2016 - 1:52 pm | उगा काहितरीच

मस्त ! बरेच दिवसांनी मिपावर अस हलकंफुलकं वाचायला मिळालं !

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Feb 2016 - 1:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

शॉपिंग मॉलची नवीन क्रेझ आली तसे छोटे दुकानदार धास्तावले होते की आता आपला धंदा कसा चालणार? पण तसे काही झाले नाही हे आपण बघतोच आहोत. ऑनलाईन खरेदीसाठी अनेक वस्तु, जसे की मोबाईल उपलब्ध असुनही लोकल शोरुमचा धंदा चालतोच आहे. कारण ऑनलाईन वस्तु खरेदी करुन विक्री पश्चात सेवा नीट मिळतेच असे नाही.जसे की बदली,खराब माल मिळणे, पैसे परत मिळणे, भलतीच वस्तु मिळणे,सुटे भाग न मिळणे.मग हा ग्राहक पुढच्या खरेदीला पुन्हा दुकानाची पायरी चढतो आणि हवा असलेला माल नीट पारखुन घेतो.
शेवटी एकच ग्राहक कधी फ्लिपकार्ट्चा तर कधी दुकानदारांचा आधार घेत असतो. तस्मात सर्वांची दुकाने चालणार, कोणा एकाची मोनोपॉली होणार नाही असे मला वाटते.

बाकी लेख खुसखुशीत!!

भंकस बाबा's picture

6 Feb 2016 - 1:57 pm | भंकस बाबा

छान लेख.

गणामास्तर's picture

6 Feb 2016 - 2:00 pm | गणामास्तर

आम्ही सोर्सिंगवालेसुद्धा निरागसपणे ती सप्लायरकडे ढकलून देतो. काहीही झालं तरी ती आमच्याकडे परत येऊ न देणे ह्यातच आमचं कौशल्य असते.

एकदम परफेक्ट. बाकी लेखन खुसखुशीत.

अजया's picture

6 Feb 2016 - 2:10 pm | अजया

मस्त लेख.

भुमन्यु's picture

6 Feb 2016 - 2:18 pm | भुमन्यु

हा हा हा. मस्त लेख

चिनार's picture

6 Feb 2016 - 3:36 pm | चिनार

धन्यवाद !!!

मस्त लिहिलंत! बरेच दिवसांनी मिपावर अस हलकंफुलकं, वाचण्याजोगं मिळालं!

उगा काहितरीच's picture

6 Feb 2016 - 4:43 pm | उगा काहितरीच

वरील प्रतिसाद न वाचल्याचे लक्षण ! ... :-)
हघ्या हेवेसांनलगे !

ओ काका, तुमचाच प्रतिसाद चोप्य पस्ते करुन पण अधिक सुधारुन लिहिलाय बरं!

उगा काहितरीच's picture

6 Feb 2016 - 7:50 pm | उगा काहितरीच

काका ? :-( :'( :'(

पद्मावति's picture

6 Feb 2016 - 4:03 pm | पद्मावति

मस्तं आहे लेख.

पैसा's picture

6 Feb 2016 - 5:34 pm | पैसा

मस्त! खुसखुशीत!

जव्हेरगंज's picture

6 Feb 2016 - 7:18 pm | जव्हेरगंज

वाहवा!!

अनपेक्षितपणे काहितरी चांगलं वाचायला मिळालं!!!

लय भारी!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Feb 2016 - 7:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे हे हे हे हे!!! मस्तं लिहिलयं. बाकी सोर्सिंग वाल्यांशी नित्यनेमाने संबंध यायचा त्याच्यामुळे त्या आठवणी ताज्या झाल्या =))!!!

संदीप डांगे's picture

6 Feb 2016 - 9:09 pm | संदीप डांगे

चिनारभौ की जै! नेमक्या टायमाले टाकला बॉ तुम्ही... गजब आहे. आवळ्ळलं. उत्तम लेख अपुरेच वाटतात. अजून लिहायला पाहिजे होतं. दुसरा भाग टाकजा ज्यमलं तं!

(इदर्भातल्या इच्चक पोट्ट्यायले जाईर सुचना... धा दिवस बाकी हायेत. आठोन ठेवा सायाचेहो! आपला आयडी साहित्य संपादक. तिकडेच माराचा शिक्का! एवळी बोंबाबोंब करु रायले सारे, आन साहित्य काई पाठोसानच नायी... फजिता ना व्हायले पायजे, पायजा बरं)

आता हे का यगळं आठोन करून दया लागते काभाौ??

चिनार's picture

8 Feb 2016 - 9:11 am | चिनार

धन्यवाद !

नाखु's picture

8 Feb 2016 - 9:22 am | नाखु

गायबला होतास ते? आणि प्रवेश एकदम दणक्यात !!! जबरा आवडला

कंपनीतले घोळ निस्तरताना (सोर्सिंग टीमला) जवळून पाहिलेला चाकरमानी नाखु

इथेच होतो काका…. परत लिहिता झालो एव्हढेच…

अमितसांगली's picture

8 Feb 2016 - 9:34 am | अमितसांगली

सप्लायरला फोन करून झापण्यात जो आनंद आहे तो फ़्लिपर्काटच्या कॉलसेंटरला शिव्या घालण्यात नाही.

पिलीयन रायडर's picture

8 Feb 2016 - 11:24 am | पिलीयन रायडर

एकच नंबर

जबाबदारी ढकलणे म्हणजेच जबाबदारी निभावणे

अगदी अगदी..!! चांगला लोकांशी अज्जिबात बोलायची गरज नसलेला, चकचकीत प्लास्टिकचा रोल बदलुन प्लांटमध्ये येऊन बसलेय. डोकंच धरलं चार दिवसात!! हाणामार्‍याच राहिल्यात पहायच्या!

एकच नंबर लेख!! ष्टोरी आवडलेली आहे!

चिनार's picture

8 Feb 2016 - 1:55 pm | चिनार

धन्यवाद पिरा तै !

गणामास्तर's picture

9 Feb 2016 - 9:43 am | गणामास्तर

चकचकीत प्लास्टिकचा रोल बदलुन प्लांटमध्ये येऊन बसलेय. डोकंच धरलं चार दिवसात!! हाणामार्‍याच राहिल्यात पहायच्या

आमचं नेमकं उलटं झालंय. प्लांट मधलं चैतन्यपूर्ण वातावरण सोडून एकदम प्लास्टिक रोल मध्ये आलेलं मानवेना. सौजन्य सप्ताह पाळून पाळून कंटाळा यायला लागलाय.

विवेकपटाईत's picture

8 Feb 2016 - 11:47 am | विवेकपटाईत

मस्त आवडले. शिवाय
एका पराजित योध्याचे वाक्य ' बचेंगे तो और भी लढेंगे'. स्वत: फ़्लिपर्काट बना.. अन्यथा पराजय अटल आहे.

चिनार's picture

9 Feb 2016 - 9:15 am | चिनार

:-):-)

अल्पिनिस्ते's picture

8 Feb 2016 - 6:49 pm | अल्पिनिस्ते

:)

विटेकर's picture

9 Feb 2016 - 10:30 am | विटेकर

खुसखुशीत आणि खुमासदार !
पण फ्लिप कार्ट / स्न्यप्दिल / अमेझोन हेच भविष्य आहे अन्यथा हू मूवेड माय चीज .. म्हणायची पाळी येईल हे नक्की !

फ्लिप कार्ट / स्न्यप्दिल / अमेझोन मध्ये ओपनिंग आहेत का ??