माझी दंतकथा (अर्थात My Experiments with Tooth)

केडी's picture
केडी in जनातलं, मनातलं
29 Jan 2016 - 2:19 pm

सध्या बायकोला , पत्रिका वाचन आणि त्यांचा अभ्यास करणे हा एक छंद जडलेला आहे. त्यामुळेच, मिळेल त्याची पत्रिका घेवून तिचं ती dissection करत असते. अर्थात माझी पत्रिका हि किती किचकट आहे, आणि माझा स्वभाव देखील, हे ती मला दिवसातून चार वेळेला तरी नक्कीच ऐकविते , आणि त्यात तिचे ग्रह-तारे माझ्या ग्रह-तार्यांची कशी युती ठेवून आहेत, हे देखील सांगायला विसरत नाही!
अगदी उदहरण द्यायचा झालाच तर, माझ्या पत्रिकेत म्हणे माझा लफडं होऊ शकतं असे काही योग आहेत (एक सुखद वाऱ्याची झुळूक अंगावरून जावी तोच, तिच्या पहिल्या का ११व्या घरातला शनि का गुरु कसा माझ्यावर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे ती तसा काहीही होवू देणार नाही, असा एक रुक्ष निदान तिने केले. त्यामुळे आयुषातल्या एकमेव लफड्या ने होणार्या गुददुल्या, तिच्या शनि मूळे विरून जाताना मला दिसतात.

माझ्या पत्रिकेत माझ्या चेहेर्यावर गंभीर इज्जा होण्याचे योग आहेत, हे निदान तिने एकदा मला ऐकविले, आणि मग अचानक "अरे हो कि रे, तू नाही का शाळेत असताना तोंडावर पडलेलास आणि तुझी पुढचे दोन्हीही दात आता खोटे आहेत" हे सुद्धा ऐकविले! आता हे वाचून, मला ओळखणाऱ्या बर्याच लोकांच्या मनात "तरीच हा असा डोक्यावर पडल्या सारखं वागतो" अशी खोचक शंका नं आली तर नवल!

तर मंडळी मी शाळेत चौथीत असताना, एका मुलाने जिना चढताना केलेल्या वात्रटपणा मुळे मी तोंडावर आपटलो. समोरच्या दोन्ही दातांचे तुकडे तेवढे तोंडात राहिले. नंतर प्रचंड वेदना, रडारड आणि बोंबाबोंब करून मी घरी पोचलो. घरी आल्यावर मात्र , दुधाच्या दातांनी कधीच हाय खाल्याने, आपल्याला आता नवीन दात येणार नाहीत हि एक नवीन माहिती मिळाली आणि मग ओळखीच्या दंतवैद्यांकडे माझी हजेरी लागली.
दंतवैद्या ने मात्र "हा १२ वर्षाचा होईस्तोवर root canal आणि caps नाही बसवता येणार…. " असे निदान करून टाकले. मग काय, दरवर्षी शाळेत होणार्या वैद्यकीय तपासणीत "Needs root canal and caps" असा शेरा मिळे. एकदाचा मी ७वीत पोचल्यावर, ती प्राणांतिक वेदना देणारी root canal procedure सुरु केली आणि असंख्य "seatings" नंतर माझ्या त्या समोरील दोन दाताना cap लागली, आणि खर्या अर्थाने माझ्या दंतकथेची सुरुवात झाली.

हे नवीन नकली दात काही मला मानवेच ना. कधी एक महिन्यात तर कधी एक आठवड्यात हे नकली दात निघून येत. जेवताना, अचानक दाताखाली खडा यावा तसे माझ्या दाताखाली दात येत. खेळताना अचानक पडलेले हे दात मी दगड माती जीवाच्या आकांताने उपसून उपसून शोधून काढीत असे. "मेल्या २००० र चे आहेत ते दात, नीट वापर …. ", हि घरून मिळालेली तंबी ह्याला कारणीभूत असे.

मग दर दोन दिवसांनी मी दंतवैद्याच्या दारात उभा राहत असे. तोंडाच बोळक उघडून आणि हातात ते नकली दात घेऊन. आधी कसनुसं हसून आमचे दंतवैद्य माझे स्वागत करीत असे. हळूहळू मात्र माझी ती बिन दातांची smile बहुदा त्यांना फारशी रुचत नसावी. का कोणास ठाऊक, मला बघून ते फारसे खुश दिसत नसत. इतर patients बरोबर हसता हसता मला दारात उभा राहिलेला पाहून अचानक ते गंभीर होऊन जात. (बहुदा त्यांच्या काळजात धस्स होत असेल). कधी कधी मला दाट शंका येई कि माझी cycle खाली दारात लावलेली दिसली, कि बहुतेक ते वरच येत नसे किंवा धडधडत्या छातीने आणि पडलेल्या चेहेर्याने वर येत. मग मी देखील माझी cycle कधी लपवून तर कधी मागे पुढे लावून येत असे. बहुदा इतर धंद्या प्रमाणे जसे पहिलच गिर्राहिक शुभ मानला जाते असा काही अलिखित नियम आहे तसा त्यांचा देखील असावा. आधी फुकट कॅप बसून देणारे नंतर नंतर मात्र मजल दर मजल १०, २० आणि ५० रुंपये घेऊ लागले (ह्या मागे कदाचित हे केल्याने मी त्यांच्या कडे जाण्याचे थांबेन, किंवा घाबरून येणारच नाही, हा देखील हेतू असावा)

शेवटी एकदा त्या दोन दातांवर त्या cap ला पुरेसा support मिळत नाही अशी उपरती त्यांना झाली. (क्रिकेट मध्ये कस कधी कधी २ umpires ना third umpire ची गरज भासते, अगदी तसेच). मग ह्या दातांच्या शेजारच्या दाताचा बळी देऊन ३ दातांवर cap बसवण्यात आली. हि कवळी मात्र आजतागायत शाबूत आहे. इतकी, कि कोणी दात पाडेन म्हंटल तरी त्याला जोरात सांगावासा वाटत "दाखवच पाडून … "

अश्या रीतीने माझ्या दंतकथेचा सुखद अंत एकदाचा झाला!

"आई दंतकथा म्हणजे काय ग?" आमच्या चिरंजीवांच्या प्रश्नाने मी भानावर आलो. "बाबाला विचार! ". मी आपला माझेच दात-ओठ खाऊन गप्प राहिलो!

विनोदलेख

प्रतिक्रिया

हाहाहा! दंतकथा आवडली. :-)

अजयाताईंच्या एखाद्या किश्श्याच्या प्रतीक्षेत! ;-)

पद्मावति's picture

29 Jan 2016 - 3:34 pm | पद्मावति

:) मस्तं!

उगा काहितरीच's picture

29 Jan 2016 - 3:39 pm | उगा काहितरीच

छान छान.

खेडूत's picture

29 Jan 2016 - 3:40 pm | खेडूत

अरेरे..!
पण छान लिहीलंय..

मन१'s picture

29 Jan 2016 - 3:44 pm | मन१

मस्त, खेळकरपणे मांडलत .
ऐन विशीतच केस विरळ होउ लागल्यानं आम्ही असाच एकदा धागा काढला होता :-
http://www.aisiakshare.com/node/1236

रे माझ्या गळणार्‍या केसा.... ;)

केडी's picture

29 Jan 2016 - 5:35 pm | केडी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! तुमचा धागा पण वाचून काढला. एकदम मस्त!

विवेक ठाकूर's picture

29 Jan 2016 - 3:46 pm | विवेक ठाकूर

.

छान लिहिलंय! आधी मला वाटलं दंतकथेचा हा भाग मी कधी लिहिला!
लहान मुलांची ट्रीटमेंट करणं डेन्टिस्टची कसोटी पाहणारंच असतं. अशाच एक बच्चु ट्रीटमेंटच्या दिवसाचा हा किस्सा!
काही वर्षापूर्वी माझ्याकडे एक आठ वर्षाचा मुलगा यायचा.त्याचेही समोरचे परमनंट दात खेळताना तुटून पडले होते.हा बाबा काही तोंड उघडून दाखवायला तयार नाही.त्याला सर्व प्रकारे सांगून झालं.आमिष दाखवून झालं.रागावून झालं.पोरगा हुप्प.हात जवळ नेला तरी ओठ घट्ट आवळुन घ्यायचा.त्याने त्या दिवशी काही केल्या मला चेक करु दिलं नाही.मग दुसर्या दिवशी त्याचे बाबा,काका अशी गँग आली सोबत! बाबांनी डोकं धरलं. काकाने पाय.मग तो या स्थितीत उलटापालटा होऊन चेअरमध्ये लोळायला लागला.मधेच काकाचा हात सुटला.तर त्याच्या तोंडावर याची लाथ बसली.काकाने भडकुन त्याला पायावर फटका दिला! ते बघताना बाबांची पकड सुटली.त्याने सरळ पालथे झोपुन घेतले.रडून संपलं होतं.मग ओकार्या काढायचा प्रयत्न सुरु झाला.तेवढ्यात बाबा काका मिळून त्याला परत सुलटे करु लागले.बाहेरचे एक पेशंट पण या कुस्तीत जाॅइन झाले.ते कच्चे लिंबू असल्याने डायरेक्ट तोंडाजवळ येऊन तोंड उघडायला गेले.त्यांचं बोट काही कळण्याआधीच करकचून चावले गेले.मग ते जे बाहेर गेले,स्वतःच्या ट्रीटमेंटला पण बसले नाही.याचे रडणे ऐकुन बाहेर अजून दोन मुलं ट्रीटमेंटला येऊन बसली होती त्यांनी मोठ्ठे गळे काढले.याला शांत करा जरा बाहेर नेऊन म्हणून दुसर्याला आत घेतलं तर त्याचा दात काढणार या विचाराने त्याच्या आईने गळा काढला.मग तिला चक्कर आली.आम्ही मुलाच्या जागी मग तिलाच चेअरवर झोपवलं.ग्लुकोज वगैरे प्यायला दिलं.तिला हुशारी आली तशी पोराने मी नाही म्हणून भोकाड पसरलं.त्यांना परत यायला सांगून आधीचा वीर बोलवायला असिस्टंट गेली तर पेशंट थेट रस्त्यावर पळत सुटला.त्याचे बाबा ,काका गँग त्याच्यामागे.आणि इथे महत्त्वाचा किस्सा घडला!!
बाबा काकाच्या चपलेत अडकून तोंडावर पडले.त्यांचेही तेच सेम दात तुटले! मग पोराला ठेवुन बाबांचे दात आधी अटेंड केले.ते बघायला मात्र ते पोरगं आनंदाने बसलंच पण बाबा ,बोंबलू नका सुई देतील तेव्हा म्हणून बापावर डाफरलं पण!
आता चार वर्षांनी तो शहाणा झालाय.त्याची नुकतीच ट्रीटमेंट झाली.वेदनारहीत असते हो रुटकॅनाल हल्ली! बाबा आणि मुलाला आता सारख्याच कॅप लावल्या आहेत :)

नाखु's picture

29 Jan 2016 - 4:48 pm | नाखु

खरे खानदानी दातृत्व !!

किस्सा आणि मूळ धागा आव्डला.

दाढ गायबी नाखु

पियुशा's picture

29 Jan 2016 - 4:52 pm | पियुशा

=)))) महालोल किस्सा आहे हा :)
कथा हे आपल दंतकथा आवल्डी ;)

मन१'s picture

29 Jan 2016 - 5:09 pm | मन१

आवरा....

मन१'s picture

29 Jan 2016 - 6:02 pm | मन१

अजयातैंच्या किश्श्यातल्या पोट्ट्यासारखेच माझे काही बाल-उपद्व्याप :-
http://www.misalpav.com/node/28836

असंका's picture

29 Jan 2016 - 5:25 pm | असंका

अशक्य!!!!

-)) -)) -))

धमाल किस्सा आहे हा! डोळ्या समोर चित्र उभे राहिले!

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2016 - 5:45 pm | टवाळ कार्टा

आवरा...खत्रा किस्सा

विटेकर's picture

29 Jan 2016 - 5:55 pm | विटेकर

धमाल किस्सा ! बराच वेल हसून झाले आणि आता पुन्हा पुन्हा हसतोय !

रच्याकने,
वेदनारहीत असते हो रुटकॅनाल हल्ली!
हा ज्योक आहे ना ?

जोक नाही काका.रुट कॅनाल ट्रीटमेंट ही बधिरीकरण केल्यानंतर केली जाते.ती वेदनादायक नसते.

जव्हेरगंज's picture

29 Jan 2016 - 7:42 pm | जव्हेरगंज

+1

पण पहील्या भेटीत ती खुर्ची आणि सुया वगैरे यंत्र पाहिल्यावर जाम टरकते :-(

-(रुटकँनॉलफेल्युअरग्रस्त) जव्हेरगंज

जव्हेरगंज's picture

29 Jan 2016 - 7:42 pm | जव्हेरगंज

+1

पण पहील्या भेटीत ती खुर्ची आणि सुया वगैरे यंत्र पाहिल्यावर जाम टरकते :-(

-(रुटकँनॉलफेल्युअरग्रस्त) जव्हेरगंज

अनुप ढेरे's picture

29 Jan 2016 - 6:06 pm | अनुप ढेरे

=))
कहर!

प्रियदर्शनच्या सिनेमाचा शेवट म्हणून शोभून दिसेल हा किस्सा.

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 12:52 am | संदीप डांगे

+१०००

यशोधरा's picture

29 Jan 2016 - 6:21 pm | यशोधरा

ऑफिसात हे वाचताना हसताही येईना!

एस's picture

29 Jan 2016 - 8:35 pm | एस

निर्वाण पावलो आहे... उद्या जिवंत झालो की येऊन उरलेलं हसून घेईन.

ज्योत्स्ना's picture

29 Jan 2016 - 4:49 pm | ज्योत्स्ना

काय धम्माल किस्सा आहे हा. हसता हसता पुरेवाट झाली की. डोळ्यासमोर दृश्य उभे राहिले.वडिलांचे दात त्यांच्या घशात घातले की पोरानं.

भाते's picture

29 Jan 2016 - 7:55 pm | भाते

मस्तच!

जव्हेरगंज's picture

29 Jan 2016 - 8:03 pm | जव्हेरगंज

मस्त लिहीलयं!!

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jan 2016 - 10:57 pm | ब्रिटिश टिंग्या

लेख आणि अजयाताईंचा प्रतिसाद - दोन्हीही लोल!

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2016 - 2:42 am | श्रीरंग_जोशी

खुमासदार आहे एकदम हा लेख.

त्यावर अजयातैंच्या प्रतिसादातला किस्सा म्हणजे मोदकावर ओतलेले तूप.

रातराणी's picture

30 Jan 2016 - 4:03 am | रातराणी

हाहा! दोन्ही किस्से भारी!

अनन्त अवधुत's picture

30 Jan 2016 - 4:20 am | अनन्त अवधुत

अनुमोदन

अभिप्राया बद्दल धन्यवाद सगळ्यांचे!

च्यामारी केदारराव. तुम्ही सुखी आहात माझ्यापेक्षा. तुम्ही दोनच गमावलेत. मी पाच आणि खालच्या जबड्याचा बारीकसा तुकडा गमावला. कायतरी बायोटेक्नॉलॉजीने दातं उगवायची टेक्निक हुडकायला पायजे राव. लै लुटतेत डेन्टिस्टं.

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 4:00 pm | संदीप डांगे

आता त्या पाचाचीही काही ष्टुरी असन ना अभ्या..., लागली तुमच्यावर बित्ती... सांगा कहानी. कहानी सांगितल्यास अजयातै बायोटेकचे पैसे घेणार नैत तुमच्याकडून.

अजया's picture

30 Jan 2016 - 4:03 pm | अजया

:)

अभ्या..'s picture

30 Jan 2016 - 6:27 pm | अभ्या..

हाय का आता? ह्याला आमच्या सोलापुरी भाषेत लैच ग्राम्य गर्दभवाचक वाक्यप्रचार आहे. ते असो.
पाचाची स्टोरी लै शिंपल हाय. माझ्या चित्तरकथेत उल्लेख आहे. कोंण्डुसकरांच्या कृपेने आम्ही बसलेली वॉल्वो नदी कीती खोल आहे ते पाहायला खाली गेली सरळ. नदीत पाणीच नव्हते. मग काय. आत बसलेले काही जण पाणी न पिता वर गेले. आमचे थोडक्यावर निभावले. क्लेम मध्ये इतर गोष्टी झाल्या. दात मात्र कॉस्मेटिक मध्ये येतात म्हणे. कुठलाही डेंटिंस्ट १ लाखाच्याखाली बोलेचना. १५-२० हजाराचा एक दात अस्ल्याने आणि नुकताच आपल्या घासकडवी गुरुजींचा लेख वाचल्याने एक निरागस इच्छा उत्पन्न झाली की पालीचे कसे शेपूट तुटून परत उगवते किंवा लहान मुलांचे पडून परत येतात तसे जेनेटिक ईंजिनिअरिंग ने पडलेले दात उगवले असते तर काय बहार झाली असती.

कायतरी बायोटेक्नॉलॉजीने दातं उगवायची टेक्निक हुडकायला पायजे राव.

माझ्या प्रतिसादात मी नॅचरली उगवायचे बोलतोय. बाकी वैयक्तिक अनुभवातून लुटला गेलो हे ठाम मत. त्यावेळी जास्त चिकित्सा करत बसलो नाही. आताही इच्छा नाही. पैसे वाचवायच्या काही आयडीया कळाल्या ते अनुभवातून आलेले शहाणपण.

बायोटेकने दात मिळणं आता दूर नाही फारसं. पण तेही डेन्टिस्टच लावतील ;) लुटून!!

या संक्रातीला वाण म्हणून दात लुटावेत का? ;)

पियू परी's picture

30 Jan 2016 - 4:03 pm | पियू परी

लहानपणापासुन वारसाहक्काने दाताची दुखणी आली आहेत माझ्याकडे.
तेव्हापासुन असंख्य दुखणी, असंख्य डेंटिस्ट आणि असंख्य किस्से.
देवाच्या कृपेने घरापासुन ३ मिनिटे अंतरावर एक अतिशय प्रोफेशनल डेंटिस्ट मिळाली आहे.
(देवाला माझी दया आली).
नुकतेच एका दाताचे एरेक्शन, एकाचे रुट कॅनाल आणि कॅप अतिशय सुंदर आणि वेदनारहीत पद्धतीने झाले आहे.
आता सगळ्याच्या दातांचे चेकप आणि ती सांगेल ते सर्व उपचार करुन घेणार आहे.

यशोधरा's picture

30 Jan 2016 - 4:13 pm | यशोधरा

हायला! वर्णनावरुन आमची अजयातैच वाटते आहे हो :)

अजया's picture

30 Jan 2016 - 4:17 pm | अजया

लो यु यशो ;)

यशोधरा's picture

30 Jan 2016 - 4:18 pm | यशोधरा

इ लोवे यु आठवले! =))