जंटलमन्स गेम ८ - बेवडा मार के!

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
26 Jan 2016 - 2:11 am

क्रिकेटच्या खेळाने जगाला अनेक उत्तमोत्तम खेळाडू दिले आहेत. यापैकी अनेक खेळाडू हे चांगलेच रगेल आणि रंगेलही निघाले! अगदी पार चार्ल्स बॅनरमन, डब्ल्यू जी ग्रेस पासून ते डेव्हीड वॉर्नर, जो रूट यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे! यापैकी अनेक खेळाडूंच्या रंगेलपणाच्या कहाण्या तर इतक्या प्रसिद्ध झाल्या की त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रेक्षकांनीही त्या खेळाडूंना त्यावरुन चिडवण्यास सोडलं नाही! शेन वॉर्नला इंग्लंडच्या बार्मी आर्मीने त्याच्या बायकोशी डायव्होर्स घेतल्यावरुन चिडवणं हा या प्रकरणाचा कळसाध्याय!

अर्थात वॉर्नसारखे सर्वच क्रिकेटपटू रंगेल नसले तरी एक गोष्टं मात्रं जगभरातील सर्व खेळाडूंच्या जवळपास व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनून गेलेली आहे, ती म्हणजे दारू! जगभरातले, अगदी आशियाई देशातील खेळाडूही यात तसूभरही मागे नाहीत! २००७ च्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजमध्ये एका बारमध्ये भारतीय खेळाडूंची आजूबाजूच्या प्रेक्षकांची झालेली बाचाबाची बरीच कुप्रसिद्ध आहे. याचं पर्यावसन पुढे मारामारीत झालं आणि आशीश नेहराने फटके खाल्ले अशीही बातमी होती.

क्रिकेट खेळाडू आणि दारु याचं नातं पार १९ व्या शतकात काऊंटी सामन्यांपासूनचं आहे. दारुशी अजरामर नातं असलेला पहिला खेळाडू म्हणून नि:संशयपणे मानाचं स्थान जातं ते नॉटींगहॅमशायरचा ऑलराऊंडर विल्यम उर्फ बिली बार्न्स! बार्न्सच्या बेवडेबाजीचे अनेक किस्से मशहूर होते. अनेक वेळा मॅचच्या आदला रात्रभर पिऊन तो सकाळी ग्राऊंडवर येत असे! मजेशीर बाब म्हणजे आदली रात्रभर दारु पित बसल्यावर तो हमखास शतक तरी झळकावत असे किंवा विकेट्स काढत असे!

१८८२ मध्ये नॉटींगहॅमशायरची मिडलसेक्सविरुद्ध लॉर्ड्सवर मॅच होती. बार्न्स आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच पीत बसला होता. सकाळी आठच्या सुमाराला नॉटींंगहॅमचे खेळाडू लॉर्ड्सवर पोहोचले तेव्हा बार्न्सचा पत्ता नव्हता! टॉस होण्यापूर्वी जेमतेम अर्धा-पाऊण तास तो लॉर्ड्सवर आला तो पूर्णपणे 'टाईट' अवस्थेत! कॅप्टन आर्थर श्रूस्बरी त्याची ही मद्यधुंद अवस्था पाहून उडालाच! त्यातच नॉटींगहॅमच्या संघात एक्स्ट्रॉ बॅट्समन नसल्याने बार्न्सला खेळवण्यावाचून पर्याय नव्हता!

टॉस जिंकून श्रूस्बरीने बॅटींग घेतली परंतु त्याच्यापुढचा प्रश्न होता तो म्हणजे नेहमी वन डाऊन बॅटींगला येणार्‍या बार्न्सला कोणत्या क्रमांकावर पाठवायचं? बॅटींग ऑर्डर बदलली आणि लॉर्ड्सवरच्या ढुढ्ढाचार्यांना बार्न्सची झिंगलेली अवस्था कळली तर निश्चितच अनावस्था प्रसंग ओढावणार होता! नॉटींगहॅमची पहिली विकेट तिसर्‍याच ओव्हरमध्ये गेल्यावर बार्न्समहाशय नेहमीप्रमाणे वन डाऊन बॅटींगला आले!

सुरवातीची दहा-पंधरा मिनीटं बार्न्सला आजूबाजूला काय चाललं आहे याची काहीही कल्पना येत नव्हती! केवळ नशीब म्हणून तो या काळात आऊट झाला नाही! इतक्या वेळात खेळलेला एकही बॉल त्याच्या बॅटवर नीट बसला नव्हता. पण नवव्या ओव्हरमध्ये दोन दणदणीत कव्हरड्राईव्ह बसल्यावर बार्न्स एकदम 'भानावर' आला! आणि मग तो अक्षरशः उधळला! मिडलसेक्सच्या एकाही बॉलरला त्याला रोखणं अशक्यं झालं होतं! लंचपूर्वीच्या अवघ्या पावणेदोन तासात त्याने एकट्याने १२४ रन्स झोडपून काढल्या!

कॅप्टन आर्थर श्रूस्बरी आणि नॉटींगहॅमचे इतर सर्व खेळाडू बार्न्सची इनिंग्ज सुरु असताना थक्कं होऊन पाहत होते! लंचब्रेकमध्ये तो परत आला तेव्हा त्याच्यावर सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. बार्न्स कॅप्टनकडे पाहून थंडपणे म्हणाला,

"Can you get me a scotch skipper?"

एव्हाना बार्न्सच्या पराक्रमाचं 'रहस्यं' षटकर्णी झालं होतंच! मिडलसेक्सच्या अधिकार्‍यांनी कॅप्टन श्रूस्बरी आणि नॉटींगहॅमशायर कौंटीच्या अधिकार्‍यांवर बार्न्सवर कोणाचाही कंट्रोल नसल्यावरुन टीकेची झोड उठवली. खवळलेल्या नॉटींगहॅमशायर कौंटी बोर्डाचा प्रेसिडेंट विल्यम क्लार्क आपल्या दहा सहकार्‍यांसह त्याच दिवशी लंडनमध्ये आला! कॅप्टन श्रूस्बरीने बार्न्सला क्लार्क आणि कंपनीपुढे हजर करण्याचं टाळण्याचा खूप प्रयत्नं केला! एकतर त्याच्या तडाखेबंद शतकामुळे नॉटींगहॅमची मॅचवर चांगलीच पकड बसली होती, पण दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे आऊट होऊन परत आल्यापासून बार्न्स लॉर्ड्सच्या बारमध्ये पीत बसला होता!

क्लार्क आणि कंपनीने बार्न्सची चांगलीच खरडपट्टी काढली! त्याच्या बेवडेबाजीमुळे नॉटींगहॅम काऊंटीची नाचक्की झाल्यामुळे क्लार्क बराच भडकला होता. बार्न्सवर नियंत्रण न ठेवू शकल्यामुळे श्रूस्बरीवरही क्लार्कचा विशेष रोष होता!

बार्न्सने क्लार्क आणि इतरांची सर्व आगपाखड कोर्‍या चेहर्‍याने ऐकून घेतली. त्यांचा सर्व दारुगोळा संपल्याची खात्री झाल्यावर अद्यापही दारुचा अंमल न उतरल्यामुळे अडखळतच तो म्हणाला,

"I agree with you Mr. Clarke that I got a little carried away. Just a question, If I could score a hundred befoer lunch after few drinks, then in the interest of the county, how about making arrangements before next match for me?"

क्लार्क, श्रूस्बरी आणि इतर सर्वजण आSS वासून पाहत राहीले!

नेव्हील कार्डस म्हणतो,
"Nobody gets drunk on the day of the match at Lords anymore! Nobody scores a hundred before lunch either!"

आर्थर श्रूस्बरी बार्न्सच्या दारू पिण्याबद्दलंच वर्णन "Visits to the land of the Golden Fleece" या शब्दांत करत असे! बार्न्सला तत्कालीन इंग्लंडमध्ये असलेल्या एटीकेट्स आणि सार्वजनिक जागी वर्तणूकीबद्दल असलेल्या निर्बंधांचा मनस्वी तिटकारा होता. त्याचबरोबर कोणी आपला अधिकार गाजवलेला त्याला बिलकूल खपत नसे! १८८४-८५ मध्ये सिडनीच्या तिसर्‍या टेस्टच्या आधी कॅप्टन श्रूस्बरीने दारू पिण्यास मनाई केल्यावर भडकलेल्या बार्न्सने या संपूर्ण टेस्टमध्ये एकही ओव्हर बॉलिंग टाकण्यास साफ नकार दिला! श्रूस्बरीने वारंवार केलेल्या विनवणीचा काहीही परिणाम झाला नाही! ऑस्ट्रेलियाने ६ रन्सनी ती मॅच जिंकली!

१८८६-८७ च्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर तर बार्न्सच्या बेवडेबाजीने आणखीन पुढची पायरी गाठली!

ऑस्ट्रेलियन कॅप्टन पर्सी मॅक्डोनेलशी कोणत्यातरी कारणावरुन बार्न्सची चांगलीच खडाजंगी झाली. इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये आलेल्या मॅक्डोनेलला पाहिल्यावर आधीच टाईट असलेल्या बार्न्सचं माथं भडकलं. मॅक्डोनेलच्या अंगावर धावून जात त्याने त्याला जोरदार ठोसा लगावला! परंतु झालं भलतंच! दारूच्या अंमलाखाली असलेल्या बार्न्सला नक्की किती मॅक्डोनेल दिसत होते कोणास ठाऊक! त्याचा हात ड्रेसिंगरुमच्या भिंतीवर जोरात आपटला! परिणामी दुसरी टेस्ट आणि दौर्‍यावरच्या अनेक मॅचेसना त्याला मुकावं लागलं!

क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर बार्न्सने पब सुरु करावा यात काहीच आश्चर्य नव्हतं! वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी दारुच्या अतिरेकामुळे बार्न्स ख्रिस्तवासी झाला!

परंतु दारु पिण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा हात धरणं मात्रं कोणालाही जमणार नाही! पार चार्ल्स बॅनरमन, 'गव्हर्नर जनरल' चार्ल्स मॅकार्टनी, जॅक फिंगल्टन, कीथ मिलर, इयन चॅपल असे अनेक दिग्गज खेळाडू पट्टीचे पिणारे होते! अर्थात ऑस्ट्रेलियनांच्या रक्तातच हा गुण आहे! कोणत्याही ऑस्ट्रेलियन माणसाला दारू पिऊ नकोस हे सांगणं म्हणजे राज ठाकरेंना भय्यांवर टीका करु नका असं सांगण्यासारखं आहे! त्यातच क्रिकेटखेळाडूंच्या बाबतीत तर हे निव्वळ अशक्यं! इंग्लंड दौर्‍यावर ब्रॅडमनने एका दिवसात ३०७ रन्स फटकावल्यावर त्याला हजार पौंडांचं बक्षीस मिळाल्यावर इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफक अपेक्षा होती ती म्हणजे ब्रॅडमनने सर्वांना किमान एक-दोन पेग दारु पाजावी!

इयन चॅपल कॅप्टन झाल्यावर तर त्याने आपल्या खेळाडूंच्या दारु पिण्यावर कोणतंही नियंत्रण घालण्यास साफ नकार दिला! ऑस्ट्रेलियाचे टेस्ट क्रिकेटर्स म्हणून दिवसभर खेळताना असलेला मानसिक ताण दूर करण्यासाठी खेळाडूंनी संध्याकाळी किंवा रात्री दारु पिण्यास चॅपलचा पूर्ण पाठींबा होता! कॅप्टन म्हणून चॅपलला आपल्या सर्व खेळाडूंचा पूर्ण पाठिंबा होता याचं हे देखिल एक कारण होतंच! चॅपलच्या रांगड्या ऑस्ट्रेलियन संघाला मैदानावरच्या स्लेजिंगमुळे आणि मैदानाबाहेरच्या दारुबाजीमुळे 'अग्ली ऑस्ट्रेलियन्स' असं नाव पडलं, पण चॅपलला त्याची पर्वा नव्हती!

चॅपलच्या ऑस्ट्रेलियन संघातले पट्टीचे पिणारे खेळाडू म्हणजे गॅरी गिल्मोर, रॉडनी मार्श, डेनिस लिली, कीथ स्टॅकपॉल आणि काही प्रमाणात स्वत: इयन चॅपल!

परंतु या सगळ्यांच्या वरताण होता तो म्हणजे केव्हीन डग्लस उर्फ 'डग' वॉल्टर्स!

डग वॉल्टर्स हा अंतर्बाह्य ऑस्ट्रेलियन होता! उत्कृष्ट बॅट्समन असलेल्या वॉल्टर्सला मनापासून तिटकारा कसला असेल तर तो म्हणजे अनावश्यक व्यायाम आणि अंगमेहनतीचा! यात वेळ घालवण्यापेक्षा बारमध्ये बसून दारू पिण्याला त्याचं कायम प्राधान्यं होतं! १९७० च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये वॉल्टर्सला दारू पिण्याच्याबाबतीत तोडीस तोड असलेला आणखीन एक खेळाडू ऑस्ट्रेलियन संघात आला तो म्हणजे रॉडनी मार्श! दोघांची चांगली मैत्री व्हाही यात काहीच आश्चर्य नव्हतं! दिवसभराचा खेळ संपला की बहुतेक वेळी वॉल्टर्स आणि मार्श रात्री उशीरापर्यंत आणि कित्येकदा तर पहाटेपर्यंत बारमध्ये दारु पीत बसत!

१९७४-७५ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांनी इंग्लिश खेळाडूंचे शब्दशः हाल केले होते. याच सिरीजमध्ये पर्थच्या टेस्टमध्ये रेस्ट डेच्या दिवशी रात्रभर दारू पीत बसलेल्या वॉल्टर्सला आपल्या हॉटेलमध्ये झोप लागल्याने तो मॅच सुरु झाल्यावर तासाभराने मैदानावर पोहोचला होता! वॉल्टर्सच्या बेवडेबाजीकडे इतर वेळेस काणाडोळा करणारा इयन चॅपलसारखा कॅप्टनही यावेळेस वैतागला होता. त्याने शिक्षा म्हणून वॉल्टर्सची रवानगी थर्डमॅनला केली आणि दरवेळेस ओव्हर संपल्यावर दुसर्‍या मैदानाच्या एका टोकाकडून दुसर्‍या टोकाला असलेल्या थर्डमॅन पोझीशनवर जाण्याची आज्ञा फर्मावली! वॉल्टर्सने काय करावं?

मॅच पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाची सायकल घेऊन दरवेळी ओव्हरनंतर तो एका एंडच्या थर्डमॅन पोझीशनवरुन दुसर्‍या एंडच्या थर्डमॅन पोझीशनकडे फेर्‍या मारू लागला!

इयन चॅपलने कपाळावर हात मारला!
वॉल्टर्सला शिस्तं लावणं त्याच्याही आवाक्याबाहेरचं होतं!

१९७३ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर गेला होता. वॉल्टर्सने हा दौरा मैदानात तर गाजवलाच (४९७ रन्स, अ‍ॅव्हरेज ७१!) पण तितक्याच तब्येतीत बारमध्येही गाजवला! इथेही त्याच्या जोडीला मार्श होताच! पण सर्वात धमाल आली ती म्हणजे दौरा संपून ऑस्ट्रेलियाने परतीचं विमान पकडल्यावर!

वॉल्टर्स आणि मार्श यांचा हिशोब अगदीच साधा होता. त्याकाळी वेस्ट इंडीजहून ऑस्ट्रेलियाला जाणारी फ्लाईट ही तब्बल तीस तासांची होती. तासाला एक या हिशोबाने आपण बियरचे २५ कॅनतरी संपवू शकतो असं वॉल्टर्सचा दावा होता! मार्शच्या मते तो स्वतः ३५ कॅन्स सहजपणे संपवू शकला असता! विमानाने टेक ऑफ घेतल्यावर दारू उपलब्ध होताक्षणीच दोघं प्यायला बसले! परंतु आपण नेमकी किती कॅन बियर प्यायली हे दोघांनाही अखेरपर्यंत कळलं नाही!

इयन चॅपल रिटायर झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनपदाची जबाबदारी ग्रेग चॅपलवर आली. १९७७ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडच्या दौर्‍यावर आलेला असताना ग्रेग चॅपलने आपल्या सर्व खेळाडूंचा फिटनेस सुधारण्याच्या हेतूने रोज सकाळी सर्वांनी एकत्रं जॉगिंगला येण्याचा फतवा काढला! अर्थात वॉल्टर्सला हे फारसं मानवणारं नव्हतंच! तो नियमितपणे जॉगिंगला दांड्या मारत असे! वैतागलेल्या ग्रेग चॅपलने खडसावल्यावर एकदा तो सगळ्या टीमबरोबर हॉटेलमधून जॉगिंगसाठी बाहेर पडला खरा, पण जेमतेम पाच-दहा मिनीटात गायब झाला आणि सगळी टीम परतीच्या मार्गावर असताना हॉटेलपासून अवघ्या दोनशे मीटर्सवर साळसूदपणे पुन्हा त्यांच्यात सामील झाला!

दुसर्‍या दिवशी सकाळी तो ब्रेकफास्ट टेबलवर आला तो खास टी-शर्ट घालूनच! त्या टीशर्टच्या पाठी लिहीलं होतं,
Jogging kan kill!

पहिली टेस्ट होती ती क्राईस्टचर्चला!

टेस्ट मॅचच्या आदल्या दिवशी टीम मिटींग झाल्यावर आणि हॉटेलच्या बारमध्ये ड्रिंक्सचा राऊंड झाल्यावर बरेचसे ऑस्ट्रेलियन खेळाडू आपापल्या रुम्समध्ये परतले. काहीजण आणखीन एक-दोन ड्रिंक्सनंतर उठले. रात्री एकच्या सुमाराला बारमध्ये दोघंच दारु पीत बसले होते....

मॅनेजर रॉजर वूटन आणि अर्थातच डग वॉल्टर्स!

साडेबाराच्या सुमाराला वूटन आपल्या रुममध्ये परतला तो वॉल्टर्सला जास्तं वेळ दारु न पिण्याची ताकीद देऊनच! अर्थात वॉल्टर्सवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही हा भाग वेगळा! त्याचं पिणं आपलं मनोभावे सुरुच होतं!

पहाटे पाचचा सुमार!

रॉडनी मार्शच्या रुमच्या दारावर टकटक झाली. डोळे चोळतच मार्शने दार उघडलं. आदल्या रात्री त्यानेही बर्‍यापैकी दारु ढोसली होती! भल्या पहाटे रुमच्या दारात मॅनेजर वूटनला पाहून तो चकीतच झाला! काय भानगड असावी मार्शला काहीच कळेना.

हॉटेलच्या स्टाफने भल्या पहाटे वूटनची गाठ घेतली होती! त्यांना बार बंद करायचा होता परंतु वॉल्टर्स अद्यापही दारु पीत बसल्याने त्यांना बार बंद करता येत नव्हता! वूटनला कॅप्टन ग्रेग चॅपलला ही बातमी सांगण्याचा धीर होत नव्हता म्हणून त्याने व्हाईसकॅप्टन असलेल्या मार्शकडे मोर्चा वळवला होता! वॉल्टर्सला बारमधून रुममध्ये जाण्याचं सांगणं हे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे असं त्याने मार्शला सांगितलं!

मार्शला वॉल्टर्सच्या पिण्याच्या कपॅसिटीची कल्पना होतीच! वॉल्टर्स कितीही पीत असला तरी मॅचच्या दरम्यान तो 'कंट्रोल' मध्ये असतो याचा मार्शला अनुभव होता. वूटनची समजूत काढून त्याने त्याला परत आपल्या रुममध्ये पाठवून दिलं! वूटनची फारशी खात्री पटली नव्हती, पण मार्शपुढे त्याचा नाईलाज झाला होता!

न्यूझीलंडचा कॅप्टन ग्लेन टर्नरने टॉस जिंकल्यावर ढगाळ वातावरणाचा फायदा घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाला बॅटींगसाठी पाचारण केलं! या मॅचचं एक वैशिष्ट्य म्हणजे पीटर लिव्हरचा बॉल डोक्यावर लागल्यावर जवळपास मृतावस्थेतून पुनर्जन्म झालेल्या इव्हान चॅटफिल्डची ही दुखापतीनंतरची पहिलीच टेस्ट होती! ऑस्ट्रेलियाच्या जेमतेम ९ रन्स झालेल्या असताना त्याने अ‍ॅलन टर्नरची दांडी उडवल्यावर क्राईस्टचर्चच्या प्रेक्षकांनी स्टेडीयम डोक्यावर घेतलं होतं!

इयन डेव्हीस (३४), रिक मॅक्कॉस्कर (३७), गॅरी कोझीयर (२३) यांना डेल आणि रिचर्ड दोघा हॅडलीबंधूंनी गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर झाला ११२ / ४! एका बाजूला ग्रेग चॅपल खेळत होता. त्याच्या जोडीला आला लालभडक आणि तांबारलेले डोळे झालेला डग वॉल्टर्स!

वॉल्टर्स बॅटींगला आला खरा, पण आजूबाजूला काय चाललं आहे याची त्याला काहीही कल्पना येत नव्हती! रिचर्ड हॅडलीचे बॉल जबरदस्तं स्विंग होत होते. सुरवातीच्या सुमारे पाऊण तासात वॉल्टर्स किती आऊटस्विंगर्सवर कॅच जाण्यापासून वाचला असेल हे तो किंवा हॅडलीच जाणे! दरवेळी वॉल्टर्स बॉल खेळताना 'मिस' झाला की नॉनस्ट्रायकर एन्डला असलेला ग्रेग चॅपल नि:श्वास सोडत होता! कोणत्याही क्षणी वॉल्टर्स आऊट होईल असं न्यूझीलंडच काय पण पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचीही पक्की खात्री झाली होती! परंतु रिचर्ड हॅडलीच्या गळाला लागला तो ग्रेग चॅपल! वॉल्टर्सबरोबर ९३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर ग्लेन टर्नरने स्लिपमध्ये चॅपल (४४) चा कॅच घेतला. चॅपलपाठोपाठ रॉडनी मार्श (२) ही झटपट परतल्यामुळे टी टाईमला ऑस्ट्रेलियाचा स्कोअर होता २०८ / ६!

वॉल्टर्स एकही बॉल बॅटच्या मध्ये न लागता कसाबसा ४२ वर पोहोचला होता!

टी टाईमनंतरही वॉल्टर्स चाचपडतच होता. त्याच्या जोडीला आला होता तो म्हणजे १९७५ च्या वर्ल्डकप सेमीफायनलचा हिरो असलेला गॅरी गिल्मोर! हॅडलीच्या एका आऊटस्विंगरवर कॅच जाण्यापासून थोडक्यात वाचल्यावर वॉल्टर्स गिल्मोरला म्हणाला,

"Gus, I can't fucking see tha ball!"

डेल हॅडलीच्या बॉलवर स्लिपमध्ये मार्क बर्जेसने १३ वर गिल्मोरचा कॅच टाकला. वॉल्टर्स अद्यापही चाचपडत असल्याने गिल्मोरने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली! विशेषतः हॅडली हॉवर्थवर त्याने आक्रमक हल्ला चढवला. वॉल्टर्स हा एकमेव बॅट्समन राहिलेला असल्याने आणि तो सुद्धा धडपडत असल्याने ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज गुंडाळण्याची ग्लेन टर्नरला आशा वाटत होती. त्या दृष्टीने त्याने रिचर्ड हॅडलीला पुन्हा बॉलिंगला आणलं!

परिणाम?

वॉल्टर्सने एका ओव्हरमध्ये तीन खणखणीत कव्हरड्राईव्हज ठोकले!
आतापर्यंत रन्स काढण्यासाठी सुरु असलेली त्याची धडपड अचानक एका क्षणी संपुष्टात आली!
.... आणि वॉल्टर्स 'सुटला'!

रात्रभर ढोसलेली दारू त्याच्या अंगात संचारली असावी. आतापर्यंतच्या अडखळत खेळण्याचा आणि धडपडीचा जणूकाही बदलाच घेतो आहे अशा आवेशात तो न्यूझीलंडच्या बॉलर्सवर तुटून पडला! अक्षरशः कोणीतरी झपाटल्यासारखा तो खेळत होता! त्याला रोखणं ही अशक्यं कोटीतली गोष्टं झाली होती! गॅरी गिल्मोरचीही फटकेबाजी सुरु होती, पण वॉल्टर्सने अक्षरश: धुमाकूळ घातला होता! हॅडली बंधू, चॅटफिल्ड, हॉवर्थ, काँग्डन सगळ्यांची त्याने पार दुर्दशा करुन टाकली!

दिवसाचा खेळ संपला तेव्हा टी टाईमला २०८ / ६ अशा अवस्थेत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा स्कोअर होता ३४५ / ६!
गिल्मोर ६५ रन्सवर नॉटआऊट होता!
वॉल्टर्स १२९ वर पोहोचला होता! त्यात चौदा बाऊंड्री आणि रिचर्ड हॅडलीला मारलेल्या सिक्सचा समावेश होता!

हॉटेलवर परतल्यावर वॉल्टर्सने अर्थातच पुन्हा बार गाठला!
शतक फटकावल्याचं सेलिब्रेशन करायला नको?

दुसर्‍या दिवशी पुन्हा पहाटेच्या सुमाराला मॅनेजर वूटन मार्शच्या दारात हजर!

वॉल्टर्सने पुन्हा आख्खी रात्रं बारमध्ये दारु पिण्यात घालवली होती!
पण यावेळी वॉल्टर्स एकटा नव्हता! त्याला दारु पिण्यासाठी तितकाच तुल्यबळ साथीदार मिळाला होता!
गॅरी गिल्मोर!

दोघं रात्रभर बारमध्ये ढोसत होते! सर्वात वाईट गोष्टं म्हणजे काही ऑस्ट्रेलियन पत्रकारांची त्यांच्यावर नजर पडली होती! दोघं नॉटआऊट बॅट्समन रात्रभर दारु ढोसत आहेत हे कळल्यावर दोघांपैकी कोणीही सकाळी लवकर आऊट होण्याचा अवकाश, पेपरामधून त्यांची चांगलीच खरडपट्टी निघाली असती! अर्थात वॉल्टर्स आणि गिल्मोर दोघांना असल्या खरडपट्टीची पर्वा होतीच कुठे?

मॅनेजर वूटनची समजूत घालून त्याला रुममध्ये पाठवण्यास यावेळी रॉडनी मार्शलाही खूप प्रयास पडले! परंतु त्याने ना वॉल्टर्स किंवा गिल्मोर दोघांनाही एका चकार शब्दाने काही विचारलं ना हा सर्व प्रकार ग्रेग चॅपलच्या कानावर घातला! पिण्याच्या बाबतीत वॉल्टर्स काय चीज आहे याची मार्शइतकी कोणालाच खात्री नव्हती!

वॉल्टर्स आणि गिल्मोरच्या रात्रभर दारु पिण्याची बातमी ऑस्ट्रेलियन संघात सगळ्यांना सकाळी समजलीच! कॅप्टन ग्रेग चॅपल दोघांनाही काहीच बोलला नाही. बोलून काही फायदा होणार नाही याची त्याला पक्की खात्री होती! (वॉल्टर्सला दारु पिऊ नको असं सांगणं म्हणजे केजरीवालना धरणं धरु नका हे सांगण्यासारखंच होतं!) परंतु केरी ओक्कीफने मात्रं दोघांची चांगलीच हजेरी घेतली! ओक्कीफ पुढचा बॅट्समन होता! दोघा नॉटआऊट बॅट्समननी रात्रंभर दारु पिणं म्हणजे आपल्याला लवकरच हॅडलीच्या तोफखान्यासमोर जावं लागेल याची त्याला भिती वाटत होती!

मॅच सुरु झाली ती पहिल्या दिवसाप्रमाणेच ढगाळ वातावरणातच!
आणि पहिल्या दिवसाप्रमाणेच वॉल्टर्स पुन्हा एकदा चाचपडत होता!
चॅटफिल्ड आणि हॅडलीचा एकही बॉल त्याच्या बॅटवर नीट लागत नव्हता!
आऊटस्विंगर्सवर तो कितीतरी वेळा कॅच जाण्यापासून वाचला होता!
ऑस्ट्रेलियन पत्रकारांचे हात शिवशिवत होते, पण वॉल्टर्स आऊट होत नव्हता!

गिल्मोर मात्रं बर्‍यापैकी 'कंट्रोल' मध्ये होता! चॅटफिल्डच्या एका ओव्हरमध्ये त्याने लागोपाठ दोन बाऊंड्री आणि हुकची सिक्स ठोकली! सुमारे पाऊण तास चाचपडल्यावर डेल हॅड्लीला फटकावून काढत वॉल्टर्सही पुन्हा रंगात आला! आणि मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! दोघांनीही पद्धतशीरपणे न्यूझीलंड बॉलिंगची धुलाई करण्यास सुरवात केली!

लंचपूर्वी सुमारे अर्धा तास डेल हॅडलीला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारत गिल्मोरने शतक झळकावलं! पण पुढच्याच ओव्हरमध्ये चॅटफिल्डच्या बॉलवर तो बोल्ड झाला! १४६ बॉल्समध्ये २० बाऊंड्री आणि १ सिक्स फटकावत गिल्मोरने १०१ रन्स काढल्या! टेस्ट क्रिकेटमधली ही त्याची एकमेव सेंच्युरी! वॉल्टर्स - गिल्मोर यांनी सातव्या विकेटसाठी विक्रमी २१७ रन्सची पार्टनरशीप ठोकली होती!

गिल्मोर परतल्यावरही वॉल्टर्सच्या डोक्यात भिनलेली दारु अद्याप उतरलेली नव्हती!

मार्क बर्जेसच्या अचूक थ्रोमुळे गिल्मोर आणि वॉल्टर्सवर आगपाखड करणारा केरी ओक्कीफ ८ वर रनआऊट झाला! वॉल्टर्स एव्हाना पावणेदोनशेच्या पुढे जाऊन पोहोचला होता! आलेला प्रत्येक बॉल हा ठोकून काढण्यासाठीच आहे या एकमेव उद्देशानेच तो बॅटींग करत होता! डेनिस लिली (१९) बरोबर ५२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर मॅक्स वॉकर (१०*) बरोबर त्याने ४८ रन्स फटकावल्या! अखेर डेल हॅडलीच्या बॉलवर कव्हरड्राईव्ह मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि स्लिपमध्ये हॅडली हॉवर्थने त्याचा कॅच घेतला! ऑस्ट्रेलिया ऑल आऊट ५५२!

वॉल्टर्सने ३४२ बॉल्समध्ये ३० बाऊंड्री आणि दोन सिक्स फटकावत २५० रन्स ठोकून काढल्या होत्या!
दोन रात्रं बारमध्ये ढोसलेली दारू पुरेपूर सत्कारणी लागली होती!

दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने पहिल्या इनिंग्जमध्ये १०६ / ३ अशी मजल मारली होती. हॉटेलवर परत आल्यावर वॉल्टर्सची पावलं अर्थातच बारच्या दिशेने वळली! त्याच्या अफलातून इनिंग्जचं सेलिब्रेशन करण्यासाठी कॅप्टन ग्रेग चॅपल, मॅनेजर रॉजर वूटनसह सर्वजण हजर होते!

हॅडली हॉवर्थ (६१) आणि डेल हॅडली (३७) यांच्या ७३ रन्सच्या पार्टनरशीपमुळे न्यूझीलंडने फॉलोऑन टाळण्यात यश मिळवलं. चौथ्या दिवशी ग्रेग चॅपलने न्यूझीलंडपुढे ३५० रन्सचं टार्गेट ठेवत ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज डिक्लेअर केली परंतु पाचव्या दिवशी न्यूझीलंडला गुंडाळणं ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. बेव्हन काँग्डन पाच तास खेळून काढत १०७ रन्स काढून नॉटआऊट राहीला. ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्स घेतल्या, पण पहिल्या इनिंग्जप्रमाणेच पुन्हा एकदा डेल हॅडली ऑस्ट्रेलियासमोर उभा ठाकला! काँग्डनच्या साथीने शेवटचा तासभर खेळून काढत त्याने मॅच वाचवली!

मॅच संपल्यावर वॉल्टर्स आणि गिल्मोर रात्रंभर पुन्हा बारमध्ये ठिय्या देऊन बसले होते!
यावेळी त्यांच्या जोडीला रॉडनी मार्शही होता!

न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजनंतर ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस साठी इंग्लंडला प्रस्थान ठेवलं.

चार वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजमधून परतीच्या मार्गावर असताना वॉल्टर्स आणि मार्श यांनी विमानात रिचवलेल्या बियरच्या कॅन्सना आता त्यांनी स्पर्धेचं रुप दिलं! ऑस्ट्रेलिया ते इंग्लंड या लांबलचक विमान प्रवासात जास्तीत जास्तं बियरचे कॅन्स कोण रिचवू शकेल याची स्पर्धा! चॅलेंज! चार वर्षांपूर्वी कोणी किती कॅन ढोसले याबद्द्ल कोणालाच काही कल्पना नसली तरी या वेळी मात्रं अगदी पद्धतशीरपणे पिण्याचं रेकॉर्ड ठेवण्यात येणार होतं! इतकंच नव्हे तर त्यासाठी काही खास नियम आणि बेटींगही करण्यात आलं! संपूर्ण विमानातील प्रवासी आणि ऑस्ट्रेलियन संघातील यच्चयावत खेळाडूंना या चॅलेंजमध्ये भाग घेण्याचं खुलं आवाहन होतं! परंतु खरे दर्दी स्पर्धक दोघंच होते! मार्श आणि वॉल्टर्स!

ही स्पर्धा किंवा चॅलेंज अर्थातच जिंकली ती वॉल्टर्सने!

लंडन एअरपोर्टवर विमान पोहोचण्याच्या बेतात असताना मार्श आणि वॉल्टर्स यांच्यात ४३-४३ असा 'टाय' झाला होता. परंतु मार्शला ४३ वा कॅन पितानाच प्रचंड प्रयास पडले होते! दोघंही अनेकदा बाथरुममध्ये जाऊन ओकले होते! परंतु अखेर वॉल्टर्सने ४४ वा कॅन ढोसल्यावर मार्शसकट सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला! वॉल्टर्सनेही अगदी विजेत्याच्या थाटात हात उंचावून मानवंदना स्वीकारली!

आणि दुसर्‍याच क्षणी तो धपकन आपल्या सीटमध्ये बसला!

लंडन एअरपोर्टवर विमान उतरलं तेव्हा वॉल्टर्स स्वतःच्या पायांनी चालण्याच्या अवस्थेत नव्हता! रिची रॉबिन्सन आणि मॅक्स वॉकर या दोघांचा आधार घेत तो विमानातून कसाबसा बाहेर पडला! मार्शचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती! त्याला आधार देणारे होते गॅरी कोझियर आणि डेनिस लिली! दोघांची अवस्था पाहून परंपरागत एटीकेट्सवर गाढ श्रद्धा असलेल्या ब्रिटीश कस्टम अधिकार्‍यांनी नाकं मुरडली नसती तरच आश्चर्य!

डग वॉल्टर्सचा ४४ कॅन्सचा हा रेकॉर्ड मोडणं कोणालाही शक्यं होणार नाही अशी जवळपास सर्वांचीच खात्री होती. परंतु १९८३ च्या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला जाताना मार्शने वॉल्टर्सच्या ४४ कॅन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली होती! वॉल्टर्सचा विक्रम मोडण्याचा मार्शने विचार केला नव्हता, परंतु त्याच्या इतर सहकार्‍यांनी जवळपास बळजबरीनेच ४५ वा कॅन पिण्यास त्याला भाग पाडलं! यावेळी मात्रं १९७७ प्रमाणे मार्शला आधार घेऊनही विमानातून बाहेर पडणं अशक्यं झालं! गंभीर चेहर्‍याच्या ब्रिटीश कस्टम अधिकार्‍यांसमोर मार्शला आणण्यात आलं, तेव्हा त्यांनाही असू आवरलं नाही!

मार्शला लगेजच्या ट्रॉलीवर झोपवून विमानातून बाहेर काढून कस्टम्स तपासणीसाठी आणण्यात आलं होतं!

मार्शसारख्या पट्टीच्या पिणार्‍याची ४५ कॅन्स पिताना ही अवस्था झालेली पाहिल्यावर तर हा रेकॉर्ड मोडणं कोणालाही शक्यं होणार नाही याबद्दल सर्वांची पक्की खात्रीच पटली होती! स्वतः मार्शलाही आपला हा रेकॉर्ड मोडणं एकाच माणसाला शक्यं होईल याबद्दल कोणतीही शंका नव्हती! तो माणूस म्हणजे अर्थातच डग वॉल्टर्स! पण १९८० मध्ये टेस्टमधून रिटायरमेंट घेतल्यावर वॉल्टर्सचं पिण्याचं प्रमाण तुलनेने बरंच कमी झालं होतं! ग्रेग चॅपलच्या मते वॉल्टर्स आणि मार्शनंतर इतर कोणामध्येही हा रेकॉर्ड मोडता येण्याइतका 'स्पार्क' दिसत नव्हता!

परंतु....

वॉल्टर्स आणि मार्शचा वारसदार ऑस्ट्रेलियातूनच येणार होता!

१९८९ मध्ये अ‍ॅशेस सिरीजसाठी अ‍ॅलन बॉर्डरचा ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर जाण्यास निघाला होता. हा संघ म्हणजे ऑस्ट्रेलियातील तत्कालीन सर्वोत्कृष्ट बेवड्यांची मांदीयाळीच होती जणू! मार्क टेलर, डीन जोन्स, कार्ल रॅकमन, इयन हिली असे एकापेक्षा एक दर्दी आणि दिग्ग्ज दारुडे होतेच, परंतु या सर्वांना एकहाती मात देऊ शकेल असा मर्व्ह ह्यूज होता! जाडजूड बांध्याचा आणि भरघोस मिशी वागवणार्‍या ह्यूजचं दारु पिणं बर्‍याचदा अमानवी कॅटेगरीत मोडेल इतकं अफाट असे! परंतु ह्यूजच्याही वरचढ असा दारुवरच्या प्रेमापोटी मनसोक्तं दारु पिणार एक महाभागही या संघात होता!

डेव्हीड बून!

१९८४ मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला बून पिण्याच्या बाबतीत ९० च्या दशकातला डग वॉल्टर्स होता! अर्थात वॉल्टर्सप्रमाणे रात्रभर दारु ढोसून दुसर्‍या दिवशी बॅटींगला जाणाचा पराक्रम बूनने कधी केला नाही तरी रात्री उशिरापर्यंत बारमध्ये बसून तब्येतीत दारु ढोसणं हे त्याच्या प्रकृतीला मानवणारं होतं! मर्व्ह ह्यूजचा १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियन संघात शिरकाव झाल्यावर तर बूनला तोलामोलाचा पार्टनर मिळाला!

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डर आणि कोच बॉबी सिंप्सन यांना मात्रं दारु पिण्याबद्दल फारसं कौतुक नव्हतं. उलट त्यांचा अतिमद्यप्राशनाला सक्तं विरोधच होता! बॉर्डर आणि सिंप्सन दोघांचाही ऑस्ट्रेलियन संघाची फिल्डींग सुधारण्यावर भर होता. त्या दृष्टीने 'फिट्नेस'चं तंत्रं रुजवण्याचा त्यांचा प्रयत्नं सुरु होता. स्टीव्ह वॉच्या शब्दात सांगायचं तर,

"This was an era when Border and Simpson were trying to get the team out of the idea that hamburgers were not healthy just because it had lettuce in it!"

डीन जोन्सचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. इंग्लंडमध्ये बॅटींग करताना कोणकोणत्या अ‍ॅडजेस्टमेंट कराव्या लागतात, विशेषतः लॉर्ड्सला जिथे मैदानावर आठ फूटाचा उतार आहे असा प्रश्नं त्याने आपल्या वडिलांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं,

"Sit next to Boonie, have a beer and get whatever knowledge out of him!"

क्वांटास एअरलाईन्सच्या फ्लाईटने सिडनीहून टेक ऑफ घेतला आणि बून, टेलर आणि मर्व्ह ह्यूज यांच्या पिण्याचा सिलसिला सुरु झाला! ते पहिला कॅन संपवत असतानाच डीन जोन्स त्यांच्यात सामील झाला. चौघांनाही ड्रिंक्स सर्व्ह करणारे अचंबित झाल्यासारखे पाहत होते! त्या तिघांपैकी कोणीही आपण किती कॅन ढोसतो आहे याची नोंद ठेवण्याचे कष्टं घेतले नव्हते, परंतु जोन्स मात्रं बारकाईने त्या तिघांच्या आणि स्वतःच्याही पिण्याची नोंद ठेवत होता! सिडनी ते सिंगापूर या पहिल्या टप्प्यातच बून आणि स्वत: जोन्स यांनी प्रत्येकी २१ कॅन्स रिचवले होते!

अर्थात हे सगळं अतिशय गुप्तपणे आणि काळजीपूर्वक सुरु होतं! क्वांटासचं ते विमान डबलडेकर होतं. अ‍ॅलन बॉर्डर, कोच सिंप्सन आणि सिलेक्शन कमिटीचा चेअरमन लॉरी सोल हे वरती बसले होते. त्यांना या प्रकाराची कुणकूण लागली असती तर खैर नव्हती! डीन जोन्स म्हणतो,

“Boonie had plenty of advice for me as we had just left Singapore and we had just finished our 22nd can of beer!”

२५ व्या कॅननंतर जोन्सची कपॅसिटी संपली! त्याला चालणंही अशक्यं झालं होतं. फ्लाईट अटेंडंट्ने त्याला वरच्या मजल्यावर नेलं आणि सिंप्सनच्या पुढेच असलेल्या एका सीटवर बसवलं! खुर्चीत बसताक्षणीच जोन्सला गाढ झोप लागली होती! मर्व्ह ह्यूज, मार्क टेलर यांचाही कोटा एव्हाना संपला होता! परंतु बूनचं पिणं मात्रं पूर्वीइतक्याच उत्साहाने सुरु होतं!

जोन्स ऐवजी बूनच्या पिण्याचं रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी घेतली जेफ लॉसनने! विमानात उपलब्ध असलेल्या 'सिक बॅग्ज' (उलटी झाली तर वापरायच्या पिशव्या!) वर तो बूनने ढोसलेल्या प्रत्येक कॅनचं रेकॉर्ड ठेवत होता! ह्यूज, जेफ मार्श, टॉम मूडी आणि कार्ल रॅकमन बूनला सतत प्रेरणा देत होते! स्टीव्ह वॉच्या शब्दांत सांगायचं तर,

"Moral support from the non-striker's end!"

डीन जोन्सच्या मते वॉल्टर्स आणि मार्श यांचे रेकॉर्डस अनुक्रमे ५० आणि ५१ कॅन्सचे होते. दोघांनीही बियर व्यतिरिक्त ढोसलेल्या इतर दारुचाही त्याने यात समावेश केला होता!

लंडनला पोहोचण्यापूर्वी अर्धा तास विमानाच्या कॅप्टनने आपल्या फ्लाईट अटेंडंट्सना विमान लँडींगसाठी तयार करण्याची सूचना दिली! ही सूचना मिळताच खालच्या डेकवर सर्विस देणार्‍या एका फ्लाईट अटेंडंटने थेट कॉकपिटमध्ये धाव घेतली आणि हिथ्रो एअरपोर्टवर विमानाचं लँडींग पुढे ढकलण्याबाबत विनंती केली! गोंधळलेल्या कॅप्टनने याचं कारण विचारल्यावर अटेंडंट उत्तरली,

"He's on his 49th can! He's got no chance of breaking the record!"

विमानाच्या कॅप्टनने दोन मिनीटांनी ट्रॅफीक प्रॉब्लेम असल्यामुळे लँडीगला थोडासा वेळ लागेल अशी घोषणा केली!

एव्हाना बूनचे ५१ कॅन्स ढोसून झाले होते! मार्शच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली होती! त्याने ५२ वा कॅन उघडताच ह्यूज, मार्श, टेलर यांनी दबक्या सुरात त्याला उत्तेजनार्थ घोषणा दिल्या,

"Come on mate!Buck up Boony!"

हिथ्रोच्या विमानतळावर विमान उतरलं तेव्हा बूनने ५२ वा कॅन संपवला होता!
खालच्या डेकवरुन टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला होता!
बूनवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला!

वरती बॉब सिंप्सनच्या कानावर हा जल्लोष गेला होताच! त्याची कल्पना होती की बूनने पत्त्याच्या जुगारात भरपूर मोठी रक्कम जिंकली असावी! १९६४ च्या इंग्लिश दौर्‍यावर येताना सिंप्सनने अशाच मोठ्या सकमेचा जुगाराचा हात जिंकला होता! त्या सिरीजमध्ये त्याने सहाशेच्यावर रन्स फटकावल्या होत्या! सिम्प्सन शेजारी बसलेल्या लॉरी सोलला म्हणाला,

"Listen to the comradery of the boys downstairs! Boonie has won 500 dollors on cards just like I did in 1964! He’s going to have a fantastic tour!”

नेमक्या याच क्षणी कॅप्टनने अनाऊन्समेंट केली,
"David Boon had broken the record of 52 cans from Sydney to London!"

सिंप्सन रागाने तांबडालाल झाला होता! बूनच्या या उपद्व्यापाची त्याला काहीच कल्पना नव्हती! नेमक्या याच वेळी जागा झालेल्या आणि अद्यापही हँगओव्हरमध्येच असलेल्या डीन जोन्सने सिंप्सनला विचारलं,

"Coach, how unprofessional is that? I will send him home and I will bat 3, won’t be a problem!”

भडकलेला सिंप्सन जोन्सवर डाफरला,
"Dino, you have pissed before you landed in Singapore! Shut the shit! Outside!"

इतकी बियर ढोसल्यावरही बून कोणाच्याही आधाराविना चालत विमानाबाहेर पडला! मार्श किंवा वॉल्टर्ससारखी दुसर्‍या कोणाच्याही आधाराची त्याला गरज भासली नाही! लगेजच्या पट्ट्यावरुन आपली बॅग घेऊन तो कस्टम्सच्या लाईनीत उभा राहिला तेव्हा पूर्वीइतकाच स्थिर होता!

कस्टम्स आणि इमिग्रेशनचे सर्व सोपस्कार पार पडल्यावर ऑस्ट्रेलियन संघातील सर्व खेळाडू वेस्टबरी हॉटेलच्या बॉलरुममध्ये पोहोचले. अ‍ॅशेस सिरीजमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूची इंग्लिश पत्रकारांशी ओळख करुन देण्याची जी वर्षानुवर्ष जुनी परंपरा आहे त्याचं पालन करण्यासाठी सर्वजण इथे आले होते! बूनच्या (आणि बॉर्डर-सिंप्सनच्या!) नशिबाने कोणाही इंग्लिश पत्रकाराने त्याला एकही प्रश्नं विचारला नाही! खेळाडूंची पत्रकारांसमोरची ही ओळखपरेड संपल्यावर अद्याप आणखीन एक सोपस्कार बाकी होता तो म्हणजे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या हॉटेलच्या खाली असलेल्या पबमध्ये तासाभराची कॉकटेल पार्टी अटेंड करणे! ही पार्टी टूरच्या स्पॉन्सर्सनी दिलेली असल्याने प्रत्येकाने त्याला हजर असणं आवश्यक होतं!

लॉरी सोलकडून या कॉकटेल पार्टीबद्दल कळताच बून उत्साहात ओरडला,
"Oh great! Feel like a beer!"

बूनचा रुम पार्टनर होता डीन जोन्स! त्याचा २५ कॅन्सचा हँगओव्हर अद्यापही उतरलेला नव्हता! बीयरचा एक पिंट उचलून त्यातली अर्धी बियर प्यायल्यावर जोन्सचं डोकं पार जड झालं होतं! बूनचा निरोप घेऊन तो आपल्या रुममध्ये गेला आणि सरळ आडवा झाला! बूनचं पिणं मात्रं जोशात सुरु होतं! जोन्सला अर्धा कॅन संपवण्याचं जीवावर आलेलं असताना त्याचे दोन कॅन संपवून तिसरा सुरुही झाला होता!

सुमारे तासाभरानंतर जोन्सला खालून फोन आला!
पबच्या मॅनेजरने बूनला रुममध्ये घेऊन जाण्याची त्याला सूचना दिली!
जोन्सने खाली जाऊन बूनकडे नजर टाकली आणि त्या परिस्थितीतही त्याला हसू आवरेना!

बून ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या ब्लेझरमध्ये टेबलवर डोकं ठेवून नशेत झोपला होता!
तिथे हजर असलेल्या कॅमेरामननी त्याचे फोटो काढण्यास कधीच सुरवात केली होती!

डीन जोन्स आधीच हँगओव्हरमध्ये होता. बूनसारख्या 'वजनदार' माणसाला उचलून नेणं एरवीही त्याच्या आवाक्याबाहेरचंच होतं! जोन्सने हॉटेलची लॉबी गाठून सामान नेण्याची ट्रॉली ढकलत पबमध्ये आणली आणि इतरांच्या मदतीने बूनला त्याच्यावर बसवलं! ट्रॉली ढकलत तो लिफ्टजवळ आला आणि आपल्या रुममध्ये जाण्यासाठी त्याने लिफ्टचं बटण दाबलं. लिफ्ट तळमजल्यावर येऊन थांबली आणि लिफ्टमधून कोण बाहेर पडावं?

बॉबी सिंप्सन!

बूनचा एकंदर अवतार पाहून सिंप्सन म्हणाला,
"David, My room, tomorrow morning, 9 o’clock! Bring your passport!"

जोन्सने कशीबशी ट्रॉली आत ढकलली आणि आपल्या मजल्याचं बटण दाबलं. लिफ्ट वर जात असतानाच बून एकदम बरळला,

"He’s not fucking happy! Isn’t he?"

दुसर्‍या दिवशी सकाळी बॉबी सिंप्सनने बूनला ५००० डॉलर्सचा दंड ठोठावला! झालेला सगळा प्रकार दडपण्याचा त्याने बराच प्रयत्न केला, पण तोपर्यंत मर्व्ह ह्यूजने तीन ते चार रेडीओ स्टेशन्सना बूनच्या पराक्रमाची साद्यंत हकीकत तिखटमीठ लावून सांगितली होती! ह्यूजच्या म्हणण्याप्रमाणे बूनने ५२ नव्हे तर ५३ कॅन बियर ढोसली होती!

बूनला इंग्लंडचा दौरा चांगला जाणार हा बॉबी सिंप्सनचा अंदाज मात्रं अचूक ठरला! बूनने संपूर्ण दौर्‍यावर दहा अर्धशतकांसह सहाशेच्यावर रन्स फटकावल्या! यात लॉर्डस (९४ आणि ५८*), नॉटींगहॅम (७३) इथल्या अर्धशतकांचा समावेश होता! अकरावं अर्धशतक, खरंतर पहिलं अर्धशतक त्याने इंग्लंडमध्ये उतरण्यापूर्वीच काढलं होतं!

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात इयन बोथमचा बॉल स्क्वेअरलेगला फ्लिक करत अ‍ॅशेस जिंकणार्‍या रन्स काढणारा बॅट्समन होता डेव्हीड बून!

शास्त्रीय दृष्ट्या विचार करता बूनचं हे दारु पिणं निव्वळ अचाट आणि अशक्यं प्रकारात बसणारं होतं! ऑस्ट्रेलियन बियरचा कॅन हा नेहमीच्या पिंटप्रमाणे ५०० मिलीलीटरचा नसून ३७५ मिलीचा असतो हे हिशोबात घेतलं तरी ५२ कॅन्सच्या हिशोबाने त्याने १९ १/२ लिटर बीयर ढोसली होती! एका दिवसात माणूस इतकं पाणीही पीत नाही! याखेरीज सिडनीला विमानात चढण्यापूर्वी त्याने दोन कॅन 'मारले' होते हे जेफ लॉसनने शपथेवर सांगितलं आहे! हे दोन कॅन्स आणि इंग्लंडमधल्या कॉकटेल पार्टीतले पाच कॅन विचारात घेतले नाही तरी केवळ विमानात प्यायलेल्या ५२ कॅन्समधून त्याने ८९७ मिली शुद्ध दारु पोटात रिचवली होती!

ऑस्ट्रेलियाच्या मेडीकल जर्नलमध्ये डॉ. डोनाल्ड करनने या प्रकारावर टीका करताना लिहीलं,
“With the inevitably shorter flights to London, the next record breaker may arrive ‘dead’ on time … It is well-known that alcohol can have very serious toxic effects on heart muscle resulting in cardiac arrest.”

खुद्दं बूनची प्रतिक्रीया काय होती?

आजतागायत बूनने कायम या विषयावर भाष्यं करण्याचं टाळलेलं आहे! वीकेंड ऑस्ट्रेलियन मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला,

“Never spoke about it, never will!”

ज्या व्हीबी या कंपनीची बियर बूनने विमानात ढोसली होती, त्या कंपनीचाच पुढे तो ब्रँड अँबॅसेडर झाला हे योग्यंच होतं!

ओल्ड ट्रॅफर्डची टेस्ट जिंकून अ‍ॅशेस परत मिळवल्यावर त्याच संध्याकाळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी नॉटींगहॅमशायरची वाट धरली! दुसर्‍या दिवशी नॉटींगहॅमविरुद्धच्या तीन दिवसाच्या मॅचसाठी! या मॅचपाठोपाठच साऊथअ‍ॅम्ट्पनशायरविरुद्धची तीन दिवसाची मॅच होती! दौर्‍याच्या विलक्षण आखणीमुळे एकूण सलग ११ दिवस क्रिकेट खेळल्यावरच त्यांना ब्रेक मिळणार होता!

रात्री एकच्या सुमाराला ऑस्ट्रेलियन खेळाडू नॉटींगहॅमला पोहोचले! अ‍ॅलन बॉर्डर या मॅचमध्ये खेळणार नसल्याने व्हाईसकॅप्टन इयन हिलीची कॅप्टन म्हणून नेमणूक करण्यात आली होती! इतक्या उशीरा पोहोचल्यावर खुद्दं हिलीनेच इतक्या रात्री उघडा असलेला पब शोधून काढला! अ‍ॅशेस जिंकल्याच्या आनंदात सर्वजण सेलिब्रेशनमध्ये दंग झाले!

यानंतर जे काही झालं ते (आणि बूनच्या रेकॉर्डबद्द्लही!) डीन जोन्सच्या शब्दांतच ऐकणं चांगलं!

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स आणि दारु याचं अविभाज्यं नातं असलं तरी इतर देशांचे खेळाडूही त्यात मागे नव्हते! इयन बोथम आणि इयन चॅपल यांच्यातली वादावादी जी पुढे हातघाईवर आली ती दारुच्या अंमलाखालीच सुरु झाली होती! रिकी पाँटींगचा कलकत्त्याच्या आणि नंतर सिडनीच्या बारमध्ये झालेला मारामारीचा किस्साही ताजाच! दोन-तीन वर्षांपूर्वी अ‍ॅशेस जिंकल्याच्या आनंदात इंग्लंडचे खेळाडू भरमैदानातच इतके 'टुन्न' झाले की चक्कं पीचवरच आपल्या प्रेशरला वाट करुन देण्याची त्यांच्यावर पाळी आली! डेव्हीड वॉर्नर आणि जो रुट यांच्यातील दारुच्या नशेत झालेली मारामारीही बरीच फेमस झाली होती! अ‍ॅंड्र्यू सायमंड्सवर दारुच्या व्यसनामुळे ऑस्ट्रेलियन संघातली आपली जागा गमावण्याची नामुष्की आली! मजेची गोष्टं म्हणजे सायमंड्सला डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका होती ती रिकी पाँटींगची! श्रीलंकेचा क्रिकेटर रमिथ रम्बूकवेला याने तर दारूच्या नशेत ३५००० फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नं केला होता! जेम्स फॉकनरला दारुच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल इंग्लंडमध्ये पोलीसांनी पकडलं होतं! प्यायल्यावर 'अब भाई गाडी चलाएगा!' हे केवळ आपल्याकडेच होतं असं नाही!

दारुच्या बाबतीत सर्वात दुर्दैवी ठरला तो डेव्हीड हूक्स!
मेलबर्नच्या एका पबमध्ये झालेल्या बोलाचलीचं पर्यावसन मारामारीत आणि हूक्सच्या मृत्यूत झालं!

अर्थात शेवटी क्रिकेट हा खेळ आहे आणि खेळाडूही शेवटी माणसंच आहेत!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अगम्य's picture

26 Jan 2016 - 5:37 am | अगम्य

तुमची विषय रंगवून सांगण्याची हातोटी विलक्षण आहे.

बोका-ए-आझम's picture

26 Jan 2016 - 8:36 am | बोका-ए-आझम

वेस्ट इंडीजचे रमप्रेमी क्रिकेटर्स यात नाहीत? विशेषतः व्हिव्ह रिचर्ड्स!

अगम्य's picture

26 Jan 2016 - 10:17 am | अगम्य

भरपूर व्हिस्की किंवा रम पिऊन सोबर्स साहेबांनी १९८ धावा काढल्याचा किस्सा कुठेतरी वाचल्यासारखा वाटतो

बेकार तरुण's picture

26 Jan 2016 - 11:02 am | बेकार तरुण

हो बरोबर आहे तुमचं अगम्य
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/550266.html

आपले जडेजा साहेब (अजय) पण एका एकदिवसीय सामन्यास पूर्ण रात्र पार्टी करुन तसेच आले होते, पण त्यांनी त्या सामन्यात (ईतर अनेक सामन्यांप्रमाणेच, बँगलोर १९९६ व्यतिरिक्त) फारसे काही केले नाही ! डॉ. अलि ईराणी ह्यांनी भारतीय क्रिकेटपटुंच्या पार्टी करण्याच्या सवयीवर भाष्य केलं होत, त्यात मी ऐकले होते हे
तसेच रॉजर बिन्नी ही भरपूर बीयर शौकीन होता असे ऐकले आहे, पण सामना चालु असताना प्यायचा वगैरे नसावे कदाचित.

अगम्य's picture

27 Jan 2016 - 12:50 pm | अगम्य

सोबर्स साहेबांची ती खेळी वेगळी असावी. मला १९८ हा आकडा स्पष्ट आठवतो आहे. बहुतेक कणेकर किंवा संझगिरींनी कुठेतरी लिहिल्याचे आठवते ते असे की स्वतः सोबर्स साहेबांनी त्यांना हा किस्सा सांगितला. म्हणजे साहेबांनी इतकेच सांगितले की आदल्या रात्रभर भरपूर प्यायल्यावर त्यांच्यावर अकस्मात batting करायची पाळी आली . त्यानंतर लेखक महाशय स्वतः म्हणतात की "त्यांनंतर "मग किती धावा काढल्या" असा मूर्खासारखा प्रश्न मी विचारलाच. सोबर्स साहेब म्हणाले " बहुतेक १९८ "!
मी पाहिले असता, त्यांनी १९८ धावा १९५८ मध्ये कानपूरला भारताविरुद्ध काढल्या होत्या.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/62846.html
आणखी शोधाशोध केली असता असे दिसते
Sat, 13 Dec - day 2 - India 1st innings 209/5 (VL Manjrekar 29*, MS Hardikar 8*)
दुसर्या दिवस अखेर २०९/५ असलेले भारतीय खेळाडू आणखी ५ विकेट साठी तिसर्या दिवशी बराच वेळ किल्ला लढवतील आणि त्यानंतर ४थ्या क्रमांकावर खेळायला जायला बराच वेळ असेल (कदाचित खेळायला जायची वेळ सुद्धा येणार नाही) असा काहीसा विचार करून बहुतेक सोबर्स साहेबांनी रात्र पिण्यात घालवली असेल.
परंतु तिसऱ्या दिवशी सकाळी आणखी फक्त १३ धावांची भर घालून भारताचा डाव २२२ वर आटपला. भरीस भर म्हणून वेस्ट इंडीज चे दोन्ही ओपनर्स शून्यावर बाद झाले . म्हणजे सोबर्स साहेबांना अगदी खेळाच्या पहिल्या तासातच bat धरावी लागली असेल. आणि दिवसभर खेळून त्यांनी शतक केले.

Sun, 14 Dec - day 3 - West Indies 2nd innings 261/5 (GS Sobers 136*, JS Solomon 13*)

मुक्त विहारि's picture

26 Jan 2016 - 10:20 am | मुक्त विहारि

मस्त.

नया है वह's picture

26 Jan 2016 - 12:38 pm | नया है वह

+१

मारवा's picture

26 Jan 2016 - 1:01 pm | मारवा

तुमचा क्रिकेट या विषयाचा व्यासंग अभ्यास थक्क करणारा आहे.
तुमची पुर्ण मालिका वाचल्यावर जे आजवर माहीत नव्हत अशा कीतीतरी असंख्य गोष्टी क्रिकेट संदर्भातल्या तुमच्या या अफलातुन सीरीज मुळे कळल्या.
तुमच्या व्यासंगाला आणी शैलीला सलाम
तुम्ही स्वत: क्रिकेटर आहात होता का ?

स्पार्टाकस's picture

26 Jan 2016 - 6:22 pm | स्पार्टाकस

धन्यवाद मारवा!

मी ९ वर्ष क्रिकेट खेळलो, पण पुढे अभ्यासाच्या कारणावरुन ते सोडावं लागलं.
आमच्या सोसायटीच्या टीममध्ये :)

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 6:31 pm | टवाळ कार्टा

अप्रतीम लेख....बेवड्यानंतर पार्ट्यांवर पण लिहा ;)

भंकस बाबा's picture

26 Jan 2016 - 6:58 pm | भंकस बाबा

चीयर्स,

नुस्त्या उचापती's picture

26 Jan 2016 - 7:37 pm | नुस्त्या उचापती

शेन वॉर्न एकदा चालू सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून बीअरचा

ग्लास घेऊन प्याला होता . ऑसी बेवडेपणाचे आणखी एक उदाहरण .

नुस्त्या उचापती's picture

26 Jan 2016 - 7:37 pm | नुस्त्या उचापती

शेन वॉर्न एकदा चालू सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून बीअरचा

ग्लास घेऊन प्याला होता . ऑसी बेवडेपणाचे आणखी एक उदाहरण .

नुस्त्या उचापती's picture

26 Jan 2016 - 7:37 pm | नुस्त्या उचापती

शेन वॉर्न एकदा चालू सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून बीअरचा

ग्लास घेऊन प्याला होता . ऑसी बेवडेपणाचे आणखी एक उदाहरण .

नुस्त्या उचापती's picture

26 Jan 2016 - 7:37 pm | नुस्त्या उचापती

शेन वॉर्न एकदा चालू सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून बीअरचा

ग्लास घेऊन प्याला होता . ऑसी बेवडेपणाचे आणखी एक उदाहरण .

नुस्त्या उचापती's picture

26 Jan 2016 - 7:37 pm | नुस्त्या उचापती

शेन वॉर्न एकदा चालू सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून बीअरचा

ग्लास घेऊन प्याला होता . ऑसी बेवडेपणाचे आणखी एक उदाहरण .

नुस्त्या उचापती's picture

26 Jan 2016 - 7:38 pm | नुस्त्या उचापती

शेन वॉर्न एकदा चालू सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून बीअरचा

ग्लास घेऊन प्याला होता . ऑसी बेवडेपणाचे आणखी एक उदाहरण .

नुस्त्या उचापती's picture

26 Jan 2016 - 7:38 pm | नुस्त्या उचापती

शेन वॉर्न एकदा चालू सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडून बीअरचा

ग्लास घेऊन प्याला होता . ऑसी बेवडेपणाचे आणखी एक उदाहरण .

प्रचेतस's picture

26 Jan 2016 - 7:40 pm | प्रचेतस

सात वेळा =))

भंकस बाबा's picture

26 Jan 2016 - 8:03 pm | भंकस बाबा
भंकस बाबा's picture

26 Jan 2016 - 8:03 pm | भंकस बाबा
भंकस बाबा's picture

26 Jan 2016 - 8:03 pm | भंकस बाबा

वाॅर्न हा मैदानावरच्या कर्तृत्वामुळे (ball of the century) वगैरे गाजला त्याच्याएवढाच किंवा जास्त मैदानाबाहेरच्या कर्तृत्वामुळे गाजला.

श्रीगुरुजी's picture

26 Jan 2016 - 9:18 pm | श्रीगुरुजी

पुन्हा एकदा मस्त लेख!

पण १९८० मध्ये टेस्टमधून रिटायरमेंट घेतल्यावर वॉल्टर्सचं पिण्याचं प्रमाण तुलनेने बरंच कमी झालं होतं! ग्रेग चॅपलच्या मते वॉल्टर्स आणि मार्शनंतर इतर कोणामध्येही हा रेकॉर्ड मोडता येण्याइतका 'स्पार्क' दिसत नव्हता!

किरकोळ दुरूस्ती. डग वॉल्टर्स भारताच्या १९८०-८१ च्या दौर्‍यात भारताविरूद्ध तीनही कसोटी खेळला होता. शेवटची तिसरी कसोटी जानेवारी १९८१ मध्ये खेळली गेली व तो कसोटी सामना भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ थ्या डावात ८३ धावात खुर्दा करून जिंकली होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या वॉल्टर्स १९८१ मध्ये निवृत्त झाला.

सतिश गावडे's picture

26 Jan 2016 - 9:42 pm | सतिश गावडे

अतिशय रोचक माहिती. ही माहिती गोळा करण्यासाठी केव्हढे संदर्भग्रंथ पालथे घालावे लागले त्याबद्दल वाचायला आवडेल. :)

नाखु's picture

27 Jan 2016 - 10:57 am | नाखु

अशीही...

अर्थात काही भारतीय खेळाडूंचे पाय काहीही न पिताही लटपटत असतं त्या विशयी लिहा एकदा...

पैसा's picture

27 Jan 2016 - 11:34 am | पैसा

अगागा! वेस्ट इंडियन्स आणि भारतीय खेळाडूंना सोडले का?

मृत्युन्जय's picture

27 Jan 2016 - 12:35 pm | मृत्युन्जय

अप्रतिम संकलन आहे. मजा आली वाचताना.

जगप्रवासी's picture

27 Jan 2016 - 1:29 pm | जगप्रवासी

तुमचा क्रिकेट या विषयाचा व्यासंग अभ्यास थक्क करणारा आहे.
तुमची पुर्ण मालिका वाचल्यावर जे आजवर माहीत नव्हत अशा कीतीतरी असंख्य गोष्टी क्रिकेट संदर्भातल्या तुमच्या या अफलातुन सीरीज मुळे कळल्या.
तुमच्या व्यासंगाला आणी शैलीला सलाम
>>>> हेच म्हणतो, म्हणजे डोकं आहे की संगणक.

अप्रतिम संकलन आहे. मजा आली वाचताना.

+११११ वाचताना खूप मजा आली.

विचारलेले नसताना एक सुचवत आहे. राग मानू नये.

१) कोणत्याही ऑस्ट्रेलियन माणसाला दारू पिऊ नकोस हे सांगणं म्हणजे राज ठाकरेंना भय्यांवर टीका करु नका असं सांगण्यासारखं आहे!
२) वॉल्टर्सला दारु पिऊ नको असं सांगणं म्हणजे केजरीवालना धरणं धरु नका हे सांगण्यासारखंच होतं!

अशी वाक्ये वाचली की कणेकर/संझगिरींचे* लेख वाचल्या सारखे वाटते, तुमची शैली स्वतंत्र आहे आणि एकदम उत्कंठवर्धक आहे. ती तशीच जोपासा.

* अशा वाक्यावर त्यांचा कॉपीराईट नसेलही परंतु तुमच्या लेखणीतून अशी वाक्ये येण्याची आवश्यकता वाटत नाहीये आणि अशा वाक्यांशिवायही लेखाचा बाज कमी होत नाही.

वाचुनच डोकं गरगरलं! चढलं!
और भी आने दो ;)

गामा पैलवान's picture

28 Jan 2016 - 3:32 am | गामा पैलवान

स्पार्टाकस,

क्रिकेटची नाश ऐकून होतो. पण आज नशेतल्या क्रिकेटवर वाचायला मिळालं. त्याबद्दल धन्यवाद. :-) काय मेहनत घेतली असेल तुम्ही.

आ.न.,
-गा.पै.

अवांतर : तसंही पाहता दारुशिवाय क्रिकेटची कल्पनाही शक्य नाही. ;-)

गामा पैलवान's picture

28 Jan 2016 - 3:33 am | गामा पैलवान

वर नाश नाही नशा असं वाचा बरंका!
-गा.पै.