आमचं एकत्र मालवणी भोजन.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
25 Jan 2016 - 8:29 am

“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.”
बाबल्या हळदणकराच्या खानावळीत मी पूर्वी अनेक वेळा जेवलो आहे.हळदणकर दांपत्यांची मुलं मोठी झाल्यावर आणि कामा-धंद्याला लागल्यावर मुलांनीच त्यांची खानावळ बंद केली होती.
” आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्लात.आता थकावट येण्याच्या वयात आरामात रहा”
असं आम्ही आमच्या आईबाबांना विनंती करून सांगीतलं आणि त्यांनी ते मानलं.”
गुरूनाथ-हळदणकरांचा मोठा मुलगा-मला सांगत होता.
“तुमच्या खानावळीत मी अनेकदां जेवलो आहे.जेवणाची चव अजून माझ्या जीभेवर आहे.”
मी गुरूनाथल म्हणालो.
“तुझ्या काही लहानपणाच्या आठवणी मला तुझ्याकडून ऐकायला बरं वाटेल.”
असं मी म्हणाल्यावर गुरू म्हणाला,
“मी मोठा झाल्यानंतर आणि कमाई करायला लागल्यानंतर मला माझ्या बाबांचं लहानपणी मिळणारं जेवण कमी मिळायाला लागलं.मी अगदी लहान असताना माझ्या त्या चिमुकल्या डोळ्यांना आमच्या स्वय़ंपाक घरात आल्यावर माझे बाबा मला “स्वयंपाक घराचे राजा” वाटायचे.
आमच्या पुस्तकाच्या कपाटावर माझ्या आईबाबांनी रुचकर पदार्थ करण्याच्या पद्धतीबद्दल अनेक पुस्तकं रचून ठेवली होती.त्यात बाईचा फोटो असलेलं पदार्थ करण्याचं एक पुस्तक होतं.अगदी लहानपणी मला तो फोटो जेमतेम दिसायचा आणि उगाचच वाटायचं की माझ्या आईबद्दल लिहिलेलं ते पुस्तक असावं.”
“मी पण ती कपाटावरची पुस्तकं पाहिली होती.मला आठवतं मी एकदा तुझ्या बाबांना म्हणालो होतो,
“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.”
तेव्हा तुझे बाबा मला म्हणाल्याचं आठवतं,
“अहो ही पुस्तकं गुरूची आई वाचते.तिला वाचनाचा नाद आहे.”
हे ऐकल्यावर गुरूनाथ म्हणाला,
माझ्या बाबांना काहीही आणि सगळंकाही शिजवायला जमायचं.
मास्यांची तिखलीं,मास्यांच्या आमट्या,पापलेटाची किंवा बांगड्याची सुकी शाक,शहाळं घालून भरपूर रसाची गुंजूल्यांची आमटी,हळदीचं पान घालून केलेली पेडव्यांची आमटी,तिरफळं घालून केलेली ताज्या बांगड्याची आमटी, सुंगटं,कुर्ल्या,तिसर्‍याचे प्रकार,तसंच अनेक तळलेल्या मास्यांचे प्रकार करायला यायचे.
तसंच अगदी शाकाहारी-भट्टी- जेवणाचे प्रकार त्यांना करायला यायचे,मग ते श्रीखंड,बासुंदी पासून, निरनीराळ्या खीरी, गवल्याची,रव्याची, साबूदाण्याची, तसंच हळदीच्या पानात गुंडाळून केलेले पातोळे, उकडीचे मोदक,येल्लापे,पर्यंत सर्व यायचं.आपलं तन,मन,धन,ओतून ते स्वयंपाक करायचे.आमची आई त्यांना जेवणाची तयारी करण्यात मदत करायची. शिवाय चपात्या लाटण्याचं तिचं काम असायचं.”
मी गुरूनाथला म्हणालो,
तुझे बाबा स्वतः गिर्‍हाईकांना वाढायला घ्यायचे.अगदी घरातल्या माणसासारखं आग्रह करून, त्यांच्या तब्येत वगैरेची चौकशी करून वाढायचे.
जेवणाचे प्रकार चवदार तर असायचेच त्याशिवाय तुझ्या बाबांच्या वाणीत साखर पेरलेली असल्याने साखर घातलेले पदार्थ आणखी गोड वाटायचे.”
गुरूनाथला त्याच्या बाबांच्या स्वभावाची ही बाजू माझ्याकडून ऐकून बरं वाटलं.
मला म्हणाला,
“बर्‍याच वेळेला काही पदार्थ -विशेष करून मास्यांचे पदार्थ -घरी नेण्यासाठी गिर्‍हाईकं यायची.सकाळी आणि संध्याकाळी ताजा स्वय़ंपाक व्हायचा.
कारण एकवेळच्या बनवलेल्या वस्तू नक्कीच संपून जायच्या.काही वेळा उशीरा आलेल्यांना जेवण संपलं हे ऐकून निराश होऊन जावं लागायचं.”
कोकणातल्या एका गावात हळदणकराची खानावळ होती.”बाबल्या हळदणकराचे रूचीदार पदार्थाचे भोजनालय” म्हणून बाहेर पाटी होती.कालांतराने त्या पाटीवर इतकी मळ जमली होती की कुणालाही त्यावरची अक्षरं वाचायला कठीण जायची.आणि पाटी वाचण्याची जरूरीच कुठे असायची.”बाबल्याची खानावळ लय प्रसिद्ध होती.”बाबल्या” गुरूच्या आजोबांचं नाव असावं.त्याच्या बाबांचं त्यांच्या वडलांवर अत्यंत प्रेम होतं.म्हणून कदाचीत त्यांनी त्यांचं नाव खानावळीला दिलं असावं.
“तुम्ही लोक रात्री किती वाजता जेवायचा?.कारण मी केव्हा केव्हा रात्री नऊ पर्यंत जेवायला यायचो.मी गुरूनाथला म्हणालो.
“रात्री नऊ वाजता खानावळ बंद झाल्यावर मग आमची जेवणाची वेळ यायाची.मी,माझा धाकटा भाऊ,आणि आईबाबा एकत्र जेवायला बसायचो.
जेवण्यात आम्हाला एव्हडं चैतन्य यायचं की,दोनदां कधी कधी तिनदां मागून घेऊन जेवायचो.आमचं पोट फुटणं हा दुय्यम भाग होता.मुख्य म्हणजे चवदार जेवण असायचं.आम्ही सगळे जेवायला बसलो की एखादा तास सहज निघून जायचा.माझे आईबाबा सकाळपासून खानावळीच्या व्यवस्थेत एव्हडे गर्क असायचे की फक्त रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्ही एकत्र येऊ शकत होतो.रात्रीची जेवण्याची क्रिया आम्ही लांबवायचो त्यामुळे आमच्या एकमेकाच्या जवळ रहाण्याच्या वेळेत वाढ व्हायची.मी आणि माझा भाऊ जास्त वेळ जेवत बसल्याने आमचं एकमेकाशी बोलणं वाढायचं.”
आम्ही मोठे होऊन आपआपल्या कामा-धंद्याला लागल्याने आणि आमचे आईबाबा वयस्कर होऊन थकत चालल्याने ,आम्ही त्यांना खानावळ बंद करण्य़ाबाबत सुचवलं”
तुम्ही खानावळ बंद केव्हा केली? ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना गुरूनाथ मला सांगू लागला.
“आता कुटूंब म्हणून एकमेकाशी बोलण्यासाठी पूर्वीसारखी ठरावीक वेळ साधण्याची जरूरी कमी कमी भासू लागली.मी माझ्या तयार कपड्याच्या धंद्यात व्यस्त राहायचो आणि माझा भाऊ त्याच्या नारळाच्या व्यवसायात व्यस्त रहायचा. माझ्या आईबाबांना ते घरीच असल्याने भरपूर वेळ मिळायचा.परंतु रात्रीचं जेवण एकत्र जेवण्याची आमची प्रथा मात्र कायम राहिली.अलीकडे ह्या प्रथेचं महत्व मला जास्त जाणवायला लागलं.आम्हा दोघा भावांची कुटूंबं,शिवाय आमचे आईबाबा एकत्र येऊन रात्री जेवत असल्याने,आमच्या दिवसभराच्या जीवनातल्या समस्या,त्यातून निर्माण होणारे विनोद आणि चुटके,इतर अडचणीतून मार्ग काढण्याची चर्चा होऊन आमचं जेवणापलीकडे जाऊन पोट भरलं जातं.”
“खरंच तुम्ही मुलं आणि तुमचे आईबाबा नशिबवान आहांत.पैसे घेऊन का होईना,भुकेलेल्या गिर्‍हाईकाचा आत्मा तुझ्या आईबाबांचं जेवण जेऊन शांत होत असावा.नकळत मिळालेल्या समाधानीच्या आणि तृप्तीच्या बदल्यात त्यांच्या शुभेच्छाच ह्याला कारणीभूत असायला हव्यात.”
मी गुरूनाथला शाबासकी देत म्हणालो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

राहणीलेख

प्रतिक्रिया

मास्यांची तिखलीं,मास्यांच्या आमट्या,पापलेटाची किंवा बांगड्याची सुकी शाक,शहाळं घालून भरपूर रसाची गुंजूल्यांची आमटी,हळदीचं पान घालून केलेली पेडव्यांची आमटी,तिरफळं घालून केलेली ताज्या बांगड्याची आमटी, सुंगटं,कुर्ल्या,तिसर्‍याचे प्रकार,तसंच अनेक तळलेल्या मास्यांचे प्रकार करायला यायचे.
तसंच अगदी शाकाहारी-भट्टी- जेवणाचे प्रकार त्यांना करायला यायचे,मग ते श्रीखंड,बासुंदी पासून, निरनीराळ्या खीरी, गवल्याची,रव्याची, साबूदाण्याची, तसंच हळदीच्या पानात गुंडाळून केलेले पातोळे, उकडीचे मोदक,येल्लापे

:)

एस's picture

25 Jan 2016 - 6:19 pm | एस

:(