एअरलिफ्ट

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
24 Jan 2016 - 11:23 pm

एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो.

पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स. प्रकाशाचे गोळे वगैरे. त्या युद्धाची एकदम मोठी ठळक आठवण म्हणजे गल्लोगल्ली सुरु झालेले पी सी ओ / एस टी डी / आय एस डी चे फोन बूथ. मोबाईल अजून यायचे बाकी होते. म्हणून गल्फ मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांसाठी संवाद करण्याचा तो महत्वाचा दुवा होता. माझा प्रिय मित्र ओंकार पत्की याचे बाबा सौदी अरबला असायचे. जेंव्हा अमेरिकेने चढाई सुरु केली त्या दिवशी ते सौदीला परत गेले होते. त्यानंतर ओंकार आणि त्याची आई यांची जीवाची घालमेल जवळून पाहिली होती. युद्ध तसे दूरच होते ते जवळ आले होते केवळ ओंकारच्या बाबांमुळे.

नंतर करीअर आणि अभ्यास करताना हे दूरचे युद्ध विसरलो. जवळपास १० वर्षांनी स्वतःचा क्लास चालू केला क्लासमध्ये मुलांना १९९१ च्या आर्थिक उदारीकरणामागची कारणे शिकवताना, भारतापुढील परकीय चलनाचे संकट गल्फ युद्धाने वाढले हे सांगताना युद्धाचे आर्थिक परिणाम वाचायला मिळाले. आणि दूरचे युद्ध आर्थिक अंगाने दिसू लागले. एअरलिफ्टमुळे झाले काय की या दूरच्या आणि केवळ आर्थिक बाजू दिसलेल्या युद्धाला माझ्या मनात मानवी स्पर्श मिळाला. आणि गेल्या दहा वर्षात वाचनामुळे कल्पिलेल्या आणि आंतरजालामुळे वाचू किंवा बघू शकलेल्या अनेक गोष्टी अधिक परिणामकारकपणे अनुभवता आल्या. त्यांची दाहकता अंगावर आली. आपण किती सुरक्षित जीवन जगत आहोत ते जाणवले.

२०१५ च्या एप्रिल मध्ये झालेले "ऑपरेशन राहत", ज्यात येमेनमधून ४६४० भारतीयांना आणि ९६० परदेशी लोकांना बाहेर काढले गेले त्या सुटकेचे आपण सर्व साक्षीदार होतो. आता २४ तास चालणारी माध्यमे आणि त्याशिवाय सोशल मिडियाद्वारा सतत हातात मिळणाऱ्या अपडेट्स यामुळे आपण त्याचा थरार अनुभवू शकलो होतो. पण जेंव्हा संपर्काची साधने तुटपुंजी होती त्या काळात १,७०,००० लोकांना १३ दिवस दिशाहीन आणि नंतरचे ५९ दिवस त्या युद्धकाळात वाळवंटात कसे वाटले असतील त्याची जाणीव एअरलिफ्ट अगदी यथार्थपणे करून देतो.

मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीशी मोझेस बद्दल बोललो होतो. इजिप्तच्या राजदरबारात वाढलेला मोझेस. रामसिस राजाच्या भावासारखा वाढलेला मोझेस. ४०,००,००० लोकांना केवळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा मोझेस. मग वचनात सांगितलेल्या दुधा मधाच्या प्रदेशापर्यंतची सिनाई च्या वाळवंटातील ४० वर्षाची दिशाहीन, कंटाळवाणी आणि असुरक्षित वाटचाल करणारा मोझेस. अन्न धान्याची टंचाई. अनुयायांचा अविश्वास, त्यांच्या कटकटी सहन करणारा मोझेस. देवाकडून स्पष्ट दिशानिर्देश मिळत नाही म्हणून हतबल झालेला मोझेस. जोशुआ सारख्या मदतनीसांच्या आधारे सर्व अडचणीना पुरून उरणारा मोझेस. यातील अनेक गोष्टी मला रणजीत काट्याल मध्ये दिसल्या.

इराकी सैनिक निशस्त्र कुवेती नागरिकांना जवळून डोक्यात गोळ्या घालताना पाहिले आणि दक्षिण व्हिएतनामच्या National Police चा प्रमुख असलेला लोन ग्युएन चे एडी अॅडम्स ने काढलेले जगप्रसिद्ध छायाचित्र आठवले.

"टिपू सुलतान" जहाज युनोच्या बंदीनंतर वळताना बघितले. ५०० लोक भंगार जहाजात बसून कुवेत बाहेर पडताना बघितले आणि तीन रात्री जागून रडत रडत वाचलेली “लिऑन युरिस” या लेखकाची “बाळ भागवत” यांनी भाषांतरित केलेली “एक्झोडस” ही कादंबरी आठवली. त्यातला "आरी बेन कनान" हा कणखर नायक आठवला. त्यात "आलिया बेत" (homecoming) च्या योजनेंतर्गत दोन आठवड्याच्या रेशनवर ४५०० पेक्षा जास्त ज्यू लोकांना घेऊन आखाती समुद्रात अडकलेल्या “एस एस एक्झोडस” ह्या जहाजावरील प्रवाश्यांची वेदना आणि असुरक्षितता पुन्हा जाणवली. त्यावेळी ब्रिटीश रॉयल एअर फोर्स आणि इतर ब्रिटीश सरकारी संस्थाचे, अजून ज्याला देश म्हणून मान्यता मिळाली नाही पण ज्यांनी महायुद्धाची प्रचंड झळ सोसली आहे त्या व्यक्तीसमूहाशी नियम न तोडता कसे वागावे या बद्दलची घुसमट आणि हतबलता देखील जाणवली.

सगळ्यात शेवटी अम्मानच्या विमानतळावर जाण्यासाठी जॉर्डनच्या वेशीवर भारतीयांच्या बसेस आणि कार्स येतात आणि सीमेवरचा जवान गेट उघडतो तेंव्हा या सुखांतामुळे डोळ्यात आनंदाश्रू आले तरी कुठेतरी याच्या विरुद्ध अत्यंत दुर्दैवी शोकांतिकेचा नायक असलेला तीन वर्षाचा आयलान कुर्दि आणि त्याचे कुटुंबीय आठवून खूप हळहळ वाटली. अम्मानच्या विमानतळावरची भकास चेहऱ्याची गर्दी बघून सिरियन रीफ्युजी क्रायसिस काय असू शकतो, ते दृश्य स्वरूपात जाणवले.

चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पासपोर्ट नसलेल्या लोकांना ओळखायचे कसे? ही समस्या असलेल्या भारतीय दूतावासाचा राग येत नाही. जेवणाच्या वेळी फोन न उचलणाऱ्या कोहली नामक सरकारी कर्मचाऱ्याचा, मलेशियाला जा सांगणाऱ्या सेक्रेटरीचा, कोहलीला टाळणाऱ्या मंत्र्याचा, प्रत्येक माणशी २०० डॉलर घेऊन ५०० लोकांना घेऊन जाणाऱ्या भंगार जहाजवाल्याचा, युद्ध क्षेत्रात जायला सुरवातीला नकार देणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकांचा, अम्मानच्या विमानतळावर "गर्मी मत खाओ, मुझे भी कुछ पता नही" असे अजीजीने सांगणाऱ्या कर्मचाऱ्याचा, सतत कटकट करणाऱ्या जॉर्ज किंवा पूनावालाचा, इतकेच काय शेवटी कुवेती स्त्रीला पाहून भडकलेल्या आणि नंतर भारतीय लोकांची गर्दी पाहून वरमलेल्या इराकी सैनिकाचा; कुणाचाच राग येत नाही. सगळेच त्या परिस्थितीचे बळी वाटतात. कथेच्या नायकाला देखील पळून जाण्याची किंवा हे सगळं सोडून द्यावंसं वाटणं, त्याच्या पत्नीने आधी विरोध नंतर साथ देणं; सगळं नैसर्गिक वाटतं. कटकट्या जॉर्ज शेवटी विमानात बसल्यावरसुद्धा स्वभावानुसार हवाई सुंदरीला, "फर्स्ट क्लासमध्ये कोण बसणार हे कसे ठरवले?" असे विचारतो आणि ही सगळी आपल्या आजू बाजूला वावरणाऱ्या अनेक लोकांची गोष्ट आहे याची खात्री पटते.

अक्षय कुमारचे चाहते हा पिक्चर तर बघतीलच आणि कदाचित निम्रत कौरचे देखील पण आपल्या आजूबाजूला सद्य काळात घडत असणाऱ्या घटनांची भीषणता जाणवून घेण्यासाठी आणि व्यवस्था आपले काम कसे करते, त्यात इच्छाशक्ती आणि भावना किती महत्वाचा भाग पार पाडते ते समजण्यासाठी तर हा चित्रपट सर्वांनी पहायला हवा.

चित्रपटलेखमतशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

24 Jan 2016 - 11:28 pm | किसन शिंदे

अक्कीमुळेच बघणारेय हा चित्रपट.

प्रचेतस's picture

24 Jan 2016 - 11:34 pm | प्रचेतस

कोण अक्की?

किसन शिंदे's picture

24 Jan 2016 - 11:40 pm | किसन शिंदे

माहितीसाठी गूगल करा. धन्यवाद!

प्रचेतस's picture

24 Jan 2016 - 11:41 pm | प्रचेतस

तुम्ही असताना गूगल कशाला?
सांगा ना प्लीज.

किसन शिंदे's picture

24 Jan 2016 - 11:44 pm | किसन शिंदे

जुने धागे वाचा आणि अभ्यास वाढवा.

प्रचेतस's picture

24 Jan 2016 - 11:48 pm | प्रचेतस

आमचा अभ्यास तेव्हढा नाही हो आणि जुने धागे वाचण्यास वेळही नाही.
तुम्हीच सांगा ना प्लीज.

कोण आहे अक्की? माहीत नाही का नक्की? खात्री करा पक्की? कारण सटकतायत इथली टाळकी

कट्टप्पा's picture

25 Jan 2016 - 12:32 am | कट्टप्पा

अक्की म्हणजे अक्शयकुमार बहुतेक

किसन शिंदे's picture

25 Jan 2016 - 12:38 am | किसन शिंदे

आमच्या अभ्या अगदी बरोबर बोलतो हो कट्टप्पा सर.

कट्टप्पा's picture

25 Jan 2016 - 12:53 am | कट्टप्पा

ते आमचे सर आहेत किसन सर. बरोबरच बोलतात.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jan 2016 - 12:11 am | श्रीरंग_जोशी

या चित्रपटाची तुम्ही लिहिलेली ओळख आवडली.

बोका-ए-आझम's picture

25 Jan 2016 - 12:12 am | बोका-ए-आझम

धन्यवाद!

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 12:21 am | संदीप डांगे

तुम्ही खरंच सुंदर लिहलंय...

राँर्बट's picture

25 Jan 2016 - 1:05 am | राँर्बट

मस्तं लेख आनंदभाऊ!

लेख वाचून सिनेमा बघावासा वाटायला लागला आहे.

प्रोड्युसर बद्दल काही माहिती असेल तर सांगा. कमिशन मागायचं म्हणतो आहे.

तुमच्याकडूनच का वसूल करु नये?

कविता१९७८'s picture

25 Jan 2016 - 9:03 am | कविता१९७८

अक्षय फारसा आवडत नव्हता पण एयरलिफ्ट मधे खुपच आवडला, अतिशय ताकदीचा अभिनय केलाय त्याने आणि सर्वानीच, कुणीच कुठेही कमी पडलेले नाही.

मंदार कात्रे's picture

25 Jan 2016 - 9:20 am | मंदार कात्रे

काल रात्रीच बघितला

प्रचन्ड आवडला

पगला गजोधर's picture

25 Jan 2016 - 9:31 am | पगला गजोधर

काल रात्रीच बघितला

चित्रपटाचे माझ्यासाठी सगळ्यात मोठे यश कुठले असेल तर त्याने सर्वांना माणसातच ठेवले आहे. कुणालाही नायक किंवा खलनायक बनविण्याचा प्रयत्न केलेला नाही.

सेम पिंच, मलाही हेच वाटलेले.

शेवटचा डायलॉग पण आवडला.

'भारतात भ्रष्टाचार गलथानपणा पाहून त्यावेळीही मला राग यायचा, आजही वाईट वाटते…. कोणी काय तर कोणी काय म्हणो, पण निदान 'या देशाने माझ्यासाठी काय केले ??' असा कृतघ्न प्रश्न तरी माझ्या मनाला स्पर्शून जात नाही, त्या घटनेनंतर … ' अश्या काहि अर्थाचा डायलॉग...

हो... त्या ओळी मला पण खूप आवडल्या

नया है वह's picture

25 Jan 2016 - 6:22 pm | नया है वह

मस्त परिचय

अदि's picture

25 Jan 2016 - 10:21 am | अदि

हॉलिडे, बेबी आणि आता एयरलिफ्ट तिन्ही चित्रपट खूप आवडले. सगळ्या खानावळीपेक्षा छान आहे.

उगा काहितरीच's picture

25 Jan 2016 - 4:21 pm | उगा काहितरीच

स्पेशल २६ राहिलं का लिहायचं ? रच्याकने लेख आवडला जमल्यास नक्की पाहू .

अदि's picture

25 Jan 2016 - 6:13 pm | अदि

विसरलेच!!

एस's picture

25 Jan 2016 - 3:53 pm | एस

छान लिहिलेय!

खेडूत's picture

25 Jan 2016 - 5:26 pm | खेडूत

परिक्षण आवडले.
अक्षय् कुमार साठी पहाणार!

मुक्त विहारि's picture

25 Jan 2016 - 5:38 pm | मुक्त विहारि

जमल्यास बघीन....

आजकाल हिंदी सिनेमे पचत नाहीत....

यात बरेच इंग्रजी आणि अरबी शब्द आहेत.... तेव्हा बघितल्याने तुमचा नियम मोडणार नाही... :-)

मुक्त विहारि's picture

26 Jan 2016 - 11:59 am | मुक्त विहारि

मग भले ते १००% इंग्रजी भाषेत का असेना....

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 6:34 pm | टवाळ कार्टा

हा बघाच

सतिश गावडे's picture

26 Jan 2016 - 10:23 am | सतिश गावडे

चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही इतिहासातील तसेच कथा कादंबर्‍यांमधील तत्सम घटनांची केलेली उजळणी आवडली.

धन्यवाद... माझे बहुतेक लिखाण... एका गोष्टीमुळे मला आठवणाऱ्या इतर गोष्टी अश्याच स्वरूपाचे असते..

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2016 - 11:32 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

उत्तम रसदार परिक्षण. कुवेतवरच्या इराकी आक्रमणाच्या वेळी ओमानमधे होतो. त्यावेळेच्य खूप आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद, मोरेसाहेब !

चित्रपट नक्कीच पाहणार !

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2016 - 11:05 am | प्रभाकर पेठकर

कालच पाहिला. चांगला आहे. अरबस्थानात इतकी वर्षे राहात असल्यामुळे त्यातील भयानकता जास्तच जाणवते. अशा प्रसंगाला कोणालाही (हिन्दूस्थानी किंवा कुवेती अथवा कुणाही देशी व्यक्तींना) सामोरे जावे लागू नये.
त्या काळातही मी मस्कतमध्येच होतो. इथल्या अरबांना कुवेती अरबांबद्दल कांही कणव वाटत नव्हती. ह्याला कारण कुवेती लोकांचा 'माज'. तेलावर कमाविलेल्या अफाट संपत्तीच्या जोरावर ते इतर अरबांना तुच्छ समजतात. त्यामुळे कुणा इतर अरबांना त्यांच्या बद्दल वाईट वाटले नाही.
माझा त्या काळात सुपरमार्केटचा व्यवसाय होता. १० वर्षांची नोकरी सोडून सर्व जमापुंजी धंद्यात घातली होती. आणि ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जे तणावाचे, असुरक्षिततेचे वातावरण मस्कतमध्ये निर्माण झाले होते त्यामुळे घाऊक पुरवठ्याच्या गिर्‍हाईकांकडून (लेबर कँप्स) रोखीत येणारे पैसे २-३ महिन्याने येऊ लागले. आणि एक महिना उधार देणार्‍या सप्लायर्सनी उधारी बंद करून गळचेपी सुरु केली. कॅश फ्लो बोंबलला. धंदा बसला. असो.
ह्या चित्रपटात अक्षयकुमारच्या जागी नसिरुद्दीन शहा आणि निम्रत कौर च्या जागी सुष्मिता सेन किंवा मनिषा कोईराला किंवा डिंपल कपाडिया ह्या पैकी कोणी जास्त आवडले असते. ह्यचा अर्थ अक्षयकुमार आणि निम्रत कौरच्या अभियात कांही उणीवा आहेत असे नाही पण नसिरुद्दीन शहा आणि उपरोलेखित नायिकांचा अभिनय अधिक परिणामकारक (इंटेन्स) वाटला असता.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2016 - 11:50 am | बिपिन कार्यकर्ते

आनंद, सिनेमाच्या निमित्ताने लिहिलेले मनोगत अतिशय उत्तम आणि आवडलेही. एखाद्या ट्रिगरमुळे अनेकानेक स्मृति उसळून वर येतात त्यात त्या स्मृतींचा जोर तर असतोच पण तो ट्रिगरही अत्यंत परिणामकारक असतो हे ही आहेच. नीट मांडलं आहे सगळं.

मला माझे खोबारचे-कुवेतचे दिवस आठवले. मी खोबारला गेलो तेव्हा सातेक वर्षंच झाली होती गल्फ वॉर होऊन गेल्याला. लोकांच्या मनात त्या सगळ्या आठवणी आगदी ताज्या होत्या. इराकी सैन्य सौदीत बर्‍यापैकी आत आले होते. लोक सांगायचे, इराकी सैन्य आत घुसत गेलं आणि सौदी सैन्य ढुंगणाला पाय लावून मागे हटत गेलं. कुवेती राजपरिवारातील बहुतेक लोक आणि असंख्य कुवेती सौदीत येऊन (पूर्वीच्या थाटामाटात) राहिले होते.

स्थानिक सुन्नी सौदी सोडले तर कुणालाच कुवेतींबद्दल काहीही सहानुभूती नव्हती. अगदी स्थानिक शियांनादेखील. कुवेती लोक अत्यंत माजोरडे असाच लौकिक होता सर्वत्र. बरी अद्दल घडली त्यांना असंही म्हणायचे लोक. अमेरिकेच्या जीवावर इराकच्या कुरापती काढायचा उद्योग कुवेतींनी आरंभला होताच. संधी मिळताच इराकने वचपा काढला. सद्दामचे चुकले इतकेच की, त्याने अमेरिकेला विश्वासात न घेता हे सगळे केले. अमेरिकेसाठी कुवेत व सौदीचं तेल अत्यंत महत्त्वाचं होतं, तसंच पर्शियन आखातात आधीच इराणसारखा वैरी उभा होता, अजून एक शत्रू त्यांना परवडण्यासारखा नव्हता. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, सद्दम हुसेनला राक्षस ठरवून त्याचा केलेला बिमोड. सौदी किंवा कुवेतपेक्षा इराक सामाजिक दृष्ट्या कितीतरी जास्त पुढारलेला होता. लष्करी राजवट होती, गुप्त पोलिसांचा सुळसुळाट होता, लोकांवर अत्याचार होत होते, शिया व कुर्द लोकांवर सैन्याकडून अत्याचर होत होते या सगळ्या बाबी अत्यंत खर्‍या आहेत. पण हे सगळे अनेक वर्षांपासून चालू होते. तेव्हा कधीच कुणाला त्यांचा पुळका आला नाही. तेल धोक्यात आल्यावर मात्र हे सगळे आठवले.

कुवेतला गेलो तेव्हा दुसरे गल्फ वॉर अजून व्हायचे होते. युद्धाचे ढग दिसू लागले होते दूरवर. इराकने कुवेतवर केलेल्या आक्रमणाच्या खुणा मात्र बर्‍याच ठिकाणी अगदी जपून ठेवल्याप्रमाणे दिसत असत. विमानतळावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा सर्वत्र दिसत असत. आक्रमणाच्या वेळी अडकलेल्या भारतीयांपैकी अनेकजण ओळखीचे झाले होते. त्यांच्याकडून इराकी सैनिकांच्या वागणुकीच्या हकिकती ऐकायला मिळत. एक मात्र खरे, इराकींनी प्रचंड लुटालूट केली, पण भारतीयांना फारसा त्रास नाही दिला. भारतीय म्हणलं की, केवळ चीजवस्तू घेऊन सोडून देत, मारहाण होत नसे किंवा स्त्रियांना काहीही केले जात नसे. माझ्या माहितीतलीच काही मराठी कुटुंबं वाळवंटातून प्रवास करत अम्मानमार्फत भारतात पोचली होती. काही लोक मोटारीतून प्रवास करत इराक, इराण, पाकिस्तानमार्फत वाघा बॉर्डरपर्यंत आले आणि अमृतसरला पोचले. ते सांगत की, त्यांना सगळीकडे मदत मिळाली. कित्येकांजवळ पासपोर्ट वगैरेही नव्हते. पण बहुतेकांनी मदतच केली, अगदी पाकिस्तानातही. खाण्यापिण्याची, मुलांसाठी औषधं वगैरेची मदत झाली. मात्र वाघा बॉर्डरवर तब्बल आठेक दिवस ताटकळावे लागले. कारण काय, तर पासपोर्ट नव्हते काहींजवळ. भारतीय नोकरशाहीच्या माणुसकीशून्य वागणुकीमुळे मुलाबाळांसकट अडकून पडले लोक. असो.

आखातातील इतिहासातील हे एक फार मोठे प्रकरण आहे.

तर्राट जोकर's picture

26 Jan 2016 - 5:26 pm | तर्राट जोकर

बिकाशेठ, प्रतिसाद ख्हूप आवडला.

यशोधरा's picture

26 Jan 2016 - 7:53 pm | यशोधरा

भारतीय नोकरशाहीच्या माणुसकीशून्य

बिकादा, तुम्ही वाघा बॉर्डर पाहिलीच असेल. तिथे ठराविक खबरदारी बाळगणे लष्कर, नोकरशाही आणि देशाच्या हितासाठी श्रेयस्करच आहे. समजा खबरदारी घेतली नाही आणि केवळ माणूसकी म्हणून सरसकट प्रवेश दिले आणि त्यातून काही कांड उद्भवले तर तुमच्या आमच्यासारख्या व्यक्ती ह्याच लोकांचा निष्काळजीपणा देशाला भोवला म्हणून कळफलक बडवू! तेव्हा ह्या लोकांच्या डोक्यावर अशा बाबतीत काटेरी मुकूट असतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jan 2016 - 1:11 pm | बिपिन कार्यकर्ते

यशो, माझी भूमिका टिपिकल 'सरकार ना? नालायकच असणार!' अशा प्रकारची नाहीये / नसते. तू लिहिलेल्या सर्वच मुद्द्यांची जाण मलाही आहे. आणि घडलेल्या घटना सांगणार्‍या (आणि भोगावं लागलेल्या) व्यक्तीलाही होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय प्रवेश न देणे हे ठीकच. ते तसेच व्हायला हवे. पण जेव्हा, मानवीय आपत्तीत सापडलेली अनेक माणसे, बायकामुलांसकट हजारो मैल प्रवास करत, जीव मुठीत धरून तुमच्या दारात येतात तेव्हा 'मानवीय पातळीवर' मदत होणे आवश्यक असते. सरळ सरळ भारतीय आहेत असे समजून येणार्‍या, अनेकानेक भारतीय भाषा बोलणार्‍या समुदायाला बेसिक सहानुभूती तरी मिळायला हवी की नाही? त्यांना आत घेऊ नका फार तर. वेगळा कँप लावा. तिथे त्यांना खाऊपिऊ तरी घाला. मुलांना दूध द्या. गरजूंना वैद्यकीय मदत द्या. सुरूवातीला हे काहीच झाले नाही. शेवटी पाकिस्तानी अधिकार्‍यांनी सोय केली. असेच एक-दोन दिवस गेल्यावर मग मात्र कुठून तरी चक्रं फिरली आणि भारतीय अधिकार्‍यांनी मदत केली म्हणे. अर्थातच, मी हे सर्व ऐकले त्यालाही आता १४ वर्षं होऊन गेली, आणि तेव्हाही त्या घटनेला १० वर्षं झाली होती. मी मांडलेल्या तपशीलांमध्ये चुका होऊ शकतात / असतीलच. पण एकंदरीतच मला ज्या व्यक्तीकडून हे सर्व ऐकायला मिळाले होते ती अत्यंत वरिष्ठ, जबाबदार आणि मॅच्युअर व्यक्ती होती.

यशोधरा's picture

27 Jan 2016 - 1:21 pm | यशोधरा

ओके. तुम्हांला मिळालेली माहिती जबाब्दार व्यक्तीकडून मिळाली हे गृहीत धरुनही मी पुन्हा हेच म्हणेन की बॉर्डरवरची गणिते सर्वसामान्यांच्या प्रथमदर्शी आकलनापेक्षा फार वेगळी असतात, तेव्हा केवळ मानवतेचा दृष्टीकोन ठेवणे भारताला आणि भारतीय अधिकार्‍यांना परवडणारे नसावे.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jan 2016 - 1:43 pm | बिपिन कार्यकर्ते

थोडं अधिक स्पष्ट करतो... सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊन / घेत असतानाही मानवतेची भूमिका घेता येते. ती घेतली गेली नाही, एवढेच.

यशोधरा's picture

27 Jan 2016 - 1:57 pm | यशोधरा

अपेक्षा करणे सोपेच असते बिकादा, त्या प्रत्यक्षात उतरवणे हे कधी कधी अपेक्षांपेक्षा बिकट असू शकते इतकेच

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2016 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुर्दैवाने, भारतिय नोकरशाहीचे असे अनुभव विरळ नाहीत.

आठदहा वर्षांपूर्वी जेद्दा (सौदी अरेबिया) मध्ये बरीच (काहीशे) छोटी दुकाने असलेला एक मोठा मॉल आगीच्या भक्षस्थानी पडला होता त्यावेळीही असेच काही ऐकले होते. त्या मॉलमधील दुकांनांत कमी पगारांची कामे करणारे व तेथेच रहणारे अनेक अशियाई देशांचे नागरीक होते. सौदी अरेबियामध्ये उच्च्पदस्थ परदेशी नागरीक सोडून इतरांचे पासपोर्ट्स त्यांचे स्पॉन्सर्स स्वतःच्या ताब्यात ठेवतात. अर्थात ऑफिसमध्ये ठेवलेले बहुतेक सर्व नोकरांचे पासपोर्ट्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

दुर्घटनेची माहिती समजताच बांगलादेश, श्रीलंका, फिलिपिन्स, इत्यादी देशाच्या वकिलातीतील अधिकारी तातडीने तेथे गेले व केवळ "मी देशाचा नागरीक आहे" इतक्या तोंडी दाव्यावर कपडे, ब्लँकेट्स, अन्नपदार्थ, पाणी, थोडे चलन अशी मदत करू लागले होते. भारतीय वकिलातीचे अधिकारी तीन दिवस "पासपोर्ट दाखवून भारतीय असल्याची खात्री करा तरच मदत मिळेल" या अटीवर अडकून बसले होते. त्या काळात ज्यांना स्वतःची व्यवस्था स्वतः करता येत नव्हती अश्या काही भारतियांना बांगलादेशी व श्रीलंकन अधिकार्‍यांनी विनाशर्त मदत केली असे समजले ! :( तिसर्‍या दिवसानंतर काही चक्रे फिरली व पासपोर्टविना मदत सुरू झाली !!!

परदेशातील भारतीय वकिलातीत पासपोर्ट नवीनीकरण, इत्यादी सर्वसामान्य कामांसाठी भारतिय नागरिकांना ताटकळत ठेऊन परदेशी नागरिकांना तात्काळ सेवा देताना पाहिले आहे. अश्या सापत्न वागणूकीबाबत जबाब विचारला असता त्याचे अधिकार्‍यांना फारसे पडले आहे असे दिसले नाही. तद्दन सारवासारवीची सरकारी आणि/अथवा उद्धट उत्तरे तयार होती.

हाच अनुभव एअर इंडियाने प्रवास करताना आला आहे. आतापर्यंत तीनदा देशभक्तीचा झटका येऊन एअर इंडियाने प्रवास केला आहे आणि दर वेळेस त्या निर्णयाचा पश्चाताप वाटावा असेच अनुभव आले आहेत. याविरुद्ध एकदा श्रीलंकन एअरलाईन्सने प्रवास केला तेव्हा, त्यातील हवाईसुंदर्‍या, खाडीदेशांत कनिष्ठ स्तराची कामे करणार्‍या आपल्या देशवासियांना केवळ उत्तम सुहास्य सेवा देत होत्या असेच नाही तर काहींना स्वतःहून चौकशी करून इमिग्रेशन कार्ड्सही भरून देताना दिसल्या... एअर इंडियाच्याच नव्हे तर इतर कोणत्याही एअरलाईन्सच्या तुलनेत हा एक सुखद झटकाच होता !!!

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 2:18 pm | संदीप डांगे

जाऊ द्या डॉक्टरसाहेब, त्या लोकांना कामाचा किती किती 'ताण' असतो ते तुम्हाला नाही माहित. ;-)

'काही चुकीचे झाल्यास माझे बखोट कुणी धरू नये' ह्यास सरकारी कामांमधे प्रथम प्राधान्य असते. ते सांभाळून होता होइल ती सर्व मदत सर्व शक्तीने ते करतच असतात. आजकाल परराष्ट्रमंत्र्यांचे ट्विट ज्यात म्हटलंय की "परदेशात कुणाही भारतीयाला काहीही समस्या असेल तर मदत केली जाईल" हे फार कौतुकाने फॉरवर्ड केल्या जाते. फॉरवर्ड करणारे हे विसरतात की हेच तर सरकारचे नॉर्मल काम आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jan 2016 - 3:05 pm | बिपिन कार्यकर्ते

जेद्दाचं माहीत नाही. पण मी खोबारमध्ये पोचलो होतो त्याच्या एखाद दोन आठवड्यातच माझ्या घराच्या बाजूला असलेला अल शुला नावाचा मॉल आगीमुळे बेचिराख झाला होता. तीन दिवस आग धुमसत होती. त्यावेळेस हे असे पासपोर्ट वगैरे जळले होते.

आग मुद्दाम लावण्यात आली होती, कारण एका प्रिन्सला तिथे नवीन मॉल बनवायचा होता असं मागाहून कळलं. फायर ब्रिगेडवाले आग विझवताना एका हातात तो पाण्याचा पाईप आणि दुसर्‍या हातात कोक/पेप्सीचे कॅन घेऊन गप्पा मारत प्रोक्षण केल्यासारखं पाणी मारताना बघितल्यामुळे त्या अफवेवर विश्वास बसला होता.

यशोधरा's picture

27 Jan 2016 - 4:06 pm | यशोधरा

परदेशामध्ये पासपोर्ट नूतनीकरणाचे काम १० दिवसांत कोणत्याही फॉलोअपशिवाय.
२ महिन्यांचे बाळ घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवास करताना संपूर्ण प्रवासात एअर ईंडियाच्या कर्मचार्‍यांकडून मिळालेली अत्यंत सौहार्दपूर्ण मदत.

असो. :)

प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद … त्या स्थळ काळाशी संबंधित स्वतःचे अनुभव शेअर केल्याबद्दल प्रभाकर पेठकर आणि बिपीन कार्यकर्ते यांचे विशेष आभार .

सतिश गावडे's picture

26 Jan 2016 - 9:35 pm | सतिश गावडे

आज हा चित्रपट पाहीला. चित्रपट म्हणून न पाहता युद्धकाळातील एका सत्यघटनेचे नाट्यमय रुपांतर म्हणून पाहीला.

नुकतेच अतुल कहाते लिखीत आयसीसवरील छोटेखानी पुस्तक वाचले होते. त्यात इराकवरील प्रकरणात इराकने कुवेतवर जो हल्ला केला त्याबद्दल सविस्तर लिहीले आहे. मात्र "एयरलिफ्ट"चा उल्लेख त्या पुस्तकात नाही. मात्र पुस्तक वाचताना जाणवत होते, आपण खुपच सुरक्षित वातावरणात आहोत. बाँबस्फोटांचे काही दुर्दैवी प्रकार वगळले तर आपल्या देशात युद्ध हे फक्त सीमेवर होते. सामान्य नागरीकांना त्याची झळ पोहचत नाही.

जेव्हा परकीय आक्रमण देशांतर्गत भागात पोहचते तेव्हा सामान्य नागरीकांची गय केली जात नाही. आज हा चित्रपट पाहताना ही जाणिव ठळक झाली.

तीन वर्षापूर्वी बहारिनला झालेला उठाव आठवत होता पिक्चर बघताना. उगाचच असे काही परत झाले तर ,माझ्या नवर्यावर अशी अडकायची वेळ आली तर .. असं काय काय उगाच मनात येऊन अत्यंत अस्वस्थ झाले सिनेमा बघताना आणि नंतरही.

पद्मावति's picture

26 Jan 2016 - 10:34 pm | पद्मावति

खूप छान चित्रपट ओळख. तुमची लेखनशैली नेहमीप्रमाणेच मस्तं.

ब़जरबट्टू's picture

27 Jan 2016 - 10:47 am | ब़जरबट्टू

माफ करा, मला तरी हा चित्रपट आवडला नाही.. मुळात Airlift या नावासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना जोडू शकला नाहीये. नक्की काय कौतुस्कापद आहे ? १,७०,००० भारतीयांनी युद्धप्रसंगी एकत्र येउन राहणे, का एवढ्या मोठ्या संखेने युध्दभूमीवरुन या लोकांना विमानाने बाहेर काढणे ? माझ्यामते तरी Airlift करणे जास्त कौतुस्कापद आहे. ४५० च्या आसपास विमानफेर्या युध्दभूमीवरुन करणे हा प्रसंग चित्रपटात मोजुन ५ मिनिटात आटोपण्यात आला आहे. पुर्ण चित्रपट केवळ अक्षयभोवती गुंफलेला वाटला. २ तासाच्या चित्रपटात १.५ तास सरकारी अनास्था दाखवुन शेवटी सरकारकडूनच केलेले सर्वात मोठ्या रेस्कू आपरेशनला असे चिंचवड बस फ़ेल आहे, म्हणून रावेत बस सोडली आहे, अश्या अविर्भावात दाखवणे, यातच किती विसंगती आहे. मुळात अख्खा सेकंड हाफ या योजनेत झालेले मिक्रोप्लांनिंग, राबलेली सरकारी यंत्रणा दाखवण्यात खर्ची झाली असती, तर हा चित्रपट नक्कीच आवडला असता.

जव्हेरगंज's picture

31 Jan 2016 - 9:53 pm | जव्हेरगंज

मुळात Airlift या नावासोबतच हा चित्रपट प्रेक्षकांना जोडू शकला नाहीये.>>>>+1000

मुळात अख्खा सेकंड हाफ या योजनेत झालेले मिक्रोप्लांनिंग, राबलेली सरकारी यंत्रणा दाखवण्यात खर्ची झाली असती, तर हा चित्रपट नक्कीच आवडला असता.>>>+10000000

पण तरीही चित्रपट आवडला ... शेवट गुंडाळ्यासारखा वाटला.

चिगो's picture

31 Jan 2016 - 10:28 pm | चिगो

चित्रपट आवडला.. त्यातल्या सर्व अभिनेते/अभिनेत्रींचा अभिनयपण आवडला. पण तुमचा मुद्दा मला पटला. मलापण 'इतिहासातील सगळ्यात मोठं रेस्क्यु ऑपरेशन' ह्यावरुन त्याच्या 'इंट्रीकसीज' बघायला मिळतील, असं वाटलं होतं. पण एक कोहली सोडून बाकी काही सरकारी यंत्रणा तेव्हा कशी वागली, हे काही दाखवलं नाही..
असो. सरकारी यंत्रणेचे अपयश ही चर्चणीय आणि चर्वणीय घटना असते, यश नव्हे. तेव्हा चित्रपट आवडला हेच पुन्हा म्हणेल..

माझीही शॅम्पेन's picture

1 Feb 2016 - 5:05 pm | माझीही शॅम्पेन

+१००००००००००००००००००००
अगदी प्रचंड सहमत , इतका गाजावाजा झाला आणि चित्रपट बघायला गेलो आणि पार निराश झालो , कुठेही युध्द सदृश्य परिस्थिती झाली की भारत सरकार बर्‍या पैकी सतर्क होते , इतक प्रचंड ओपरेशन भारत सरकारने पार पाडल त्याच फारस कौतुक दिसत नाही उलट नोकरशाहीवर टीका करण्यात बराच वेळ वाया घालवला आहे
मुळात हा चित्रपट बर्‍या पैकी काल्पनिक आहे , इराकी आर्मी ओफीसॅर हिंदी बोलतो इत्यादी तद्दन खोट वाटत..
चित्रपटाने जास्तीत जास्त काल्पनिक गोष्टी दाखवून पार निराश केल राव ह्या पेक्षा बेबी आणि हॉलिडे खूप सरस आहेत (ते बघून ह्या चित्रपट बघण्यच ठरवू नका)

पिलीयन रायडर's picture

27 Jan 2016 - 11:35 am | पिलीयन रायडर

कालच हा चित्रपट पाहिला. बरा वाटला पण अगदी फार आवडला असं म्हणवत नाही.
मी मुद्दमच आधी फारशी काहीच माहिती न घेता पाहिला. त्यामुळे अगदी कोर्‍या मनाने पहाता आला. सगळ्यात आधी तर चित्रपटाचा वेग फारच संथ आहे. बेबी मध्ये जसं भराभर नाट्य घडत जातं तसं इथे होत नाही. उलट गाणी वगैरे टाकल्याने (अगदी पहिल्या ३ मिनिटातच आयटम नंबर..!) अनेकदा महत्वाच्या प्रसंगातुन अकारण लक्ष उडते.

ह्या प्रकारचे रेस्क्यु ऑपरेशन्स घडलेच नाहीत असं नाहीये.. पण तरीही ही घटना महत्वाची होती ते लोकांच्या संख्येमुळे. पावणे दोन लाख भारतीयांना सोडवण्याची ही एकमेव घटना असावी. "पावणे दोन लाख" हा भयंकर अंगावर येणारा आकडा आहे. पण संपुर्ण चित्रपटात तो अजिबात जाणवत नाही. एवढ्या लोकांची व्यवस्था दोन चार लोकांनी मिळुन एका शाळेत केली हे पटत नाही. हे लोक राहिले कसे? खाल्लं काय? पिण्याच्या पाण्याची सोय काय? औषधपाणी? रोजचा स्वयंपाक? त्याचे वितरण? टॉयलेट्स? कितीतरी गोष्टी होत्या. पण एवढ्या खोलात चित्रपट जातच नाही. एकदाही "रणजित कट्याल" हा मनुष्य पावणे दोन लाख लोकांची व्यवस्था पहात आहे असं वाटत नाही. तो फक्त म्हणत रहातो की आम्ही एवढे लोक अडकलेले आहोत..

भारतीय सरकारला मात्र अगदीच व्हिलन करुन टाकले आहे. आपल्या सरकारला रणजित कट्यालनेच फोन करुन कळवलं की असे हल्ले झालेत आणि आता पहा आमचं काहीतरी असं मला वाटायला लागलं. सरकारकडुन एकही प्रयत्न नाही झाला. कोहली नामक मनुष्याने तगादा लावुन काहीतरी करुन घेतलं इतकंच समजतं. पण ते ही नाट्य उरकले आहे. जॉर्डनची बॉर्डर उघडतात तो प्रसंग अजुन थरारक करता आला असता.

एवढ्या प्रचंड संख्येने लोक एका देशातुन दुसर्‍या देशात जाणार असतील तर विचार करा किती प्रचंड गोंधळ उडेल. चित्रपटात मात्र लाईन लावुन एक माणुस नावं लिहुन घेतो आणि आजुबाजुच्या फोडलेल्या गाड्या गोळा करुन "पा व णे दो न ला ख" लोक जातात. अगदी दोन चार दिशांना पांगले म्हणलं तरी किमान चार पाचशे गाड्या एकत्र दिसायला नकोत का? अगदीच पाच पन्नास गाड्या.. त्यातही अर्ध्या कार.. कसे काय इतके लोक वाळवंटातुन प्रवास करत गेले? सरळ एका दमात १००० किमी प्रवास केला का? त्यांचं खाणं पिणं? काही म्हणजे काही दाखवलेलं नाही..

मुळात ह्या सगळ्या घटनेच्या "टाइमलाईन्स" कळतच नाहीत. किती दिवस हे लोक कुवेत मध्ये अडकले? किती दिवस प्रवास करत होते? एवढ्या लोकांना भारतात न्यायला किती दिवस लागले? सगळा खेळ "स्केल" चा होता. चित्रपट आपला कट्याल भोवतीच फिरत रहातो. पावणे दोन लाख फक्त आपलं म्हणायला.

बरं एवढा निवांत चालवलेला पिक्चर, शेवटच्या माहिती देणार्‍या दोन स्लाईडला मात्र पळवला. नीट काही वाचताच आलं नाही. मी आपली कट्यालचे फोटो दाखवतील म्हणुन पहात होते तर मॅथ्युज आणि वेदी म्हणुन दोघं सेकंदाभरासाठी दिसले. हा काय प्रकार म्हणुन घरी येऊन गुगल करुन माहिती काढली थोडीफार तेव्हा कळालं की मुळात "रणजित कट्याल" नाहीच. मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा एका बिझिनेसमनने हे सगळं केलं आहे. पण ह्या घटनेत असणारे अनेक लोकांना त्यांचेही नाव माहिती असेलच असे नाही. एका लेखात असेही वाचले की ह्या घटनेत जवळपास ७५% केरळी लोक होते. त्यामुळे केरळमध्ये मॅथुजना आदराने आठवले जाते. ह्याच ढंगाचे नाव मुख्य हिरोला द्याला काय हरकत होती खरं तर? नेहमी पंजाबी बिझिनेसमनच का हवा असतो हे सगळं करायला? पण बॉलीवुड म्हणलं की काही गोष्टी सोडुन द्याव्या लगतात..

हे सगळं रेस्क्यु ऑपरेशन करायला खरं तर पुष्कळच महिने लागले. एअर इंडिअयाच्या जवळपास ५०० खेपा झाल्या होत्या म्हणतात. लोकांना वाळवंटात तंबु ठोकुन रहावं लागलं. एका लेखात तर ह्या भारतीयांमध्ये असणार्‍या एकाने UN ने पांघरुणं वगरे पुरवल्याचेही सांगितले आहे. हे सगळे बारकावे अर्थातच चित्रपटात नाहीत.

सरकार करुन गुजराल तेव्हा परराष्ट्र मंत्री होते आणि ते स्वतः जाऊन सद्दामला भेटले होते. त्यांच्या सद्दम सोबतच्या फोटोवर बरीच टिकाही झाली होती. तेव्हा सरकार कशामुळे असे नकारात्मक दाखवले आहे ते कळत नाही.

पिकचरच्या सुरवातीलाच "इस कहानी के सभी पात्र काल्पनिक है.." वगैरे दाखवल्यामुळे सत्य घटनेवर रचलेली ही एक कथा आहे. जास्त संताप वगैरे असलं काही झालं नाही पण खेद वाटला. बर्‍याच चांगल्या पद्धतीने दाखवता आली असती पण... असो..

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 11:55 am | संदीप डांगे

मेसी (?) मॅथुज नावाच्या कुणा एका बिझिनेसमनने हे सगळं केलं आहे.

>> मॅथ्युज चे नाव सनी मॅथ्युज असे होते. मेसी म्हणजे प्रत्यक्षात "मसिहा मॅथ्युज" - "देवदूत" असे त्याला आदराने संबोधले गेले आहे.

पिलीयन रायडर's picture

27 Jan 2016 - 12:52 pm | पिलीयन रायडर

अच्छा असय होय ते!! थॅन्क्यु हां!!

पगला गजोधर's picture

27 Jan 2016 - 12:04 pm | पगला गजोधर

भारतीय लोकप्रतिनिधींना हलकासा व्हिलनिश टच आलाय खरं,
त्यावेळी प्रत्यक्षात भारतात राजनैतिक अस्थिरता होती (लोकसभेत सरकारला विश्वासदर्शक ठराव इ गोष्टीत भयानक अडकलेलं होते), तरीही भारतीय सरकारने यथाशक्ती प्रयत्न केलेलेच. उदा. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सद्दामला आक्रमणानंतर बोल लावायचे टाळले, त्याच्या राजवटीशी जुळवून घेतले, (अग अग मगरी … तुझी पाठ किती मऊ याप्रकारे),
अन्न व औषधे देऊ केली (तेलाच्या बदल्यात ह्युम्यानेटेरिअन बेसिसवर),
भारतीय मिलिटरी विमाने जर लोकांना रेस्कू करायला, युद्धक्षेत्रात पाठवली असती, तर अजून परिस्थिती चिघळली असती, व क्लिअरन्स घेण्यात बराच काळ खर्ची पडला असता, म्हणूनच, पूर्ण विचाराअंती सिविलिअन एअर लाइन (सार्वजनिक क्षेत्रातली) वापरली, (र च्या क ने , आत्ता खासगी विमान कंपन्याच्या बाजूने जे सरकारी विमान कंपन्यांवर ताशेरे ओढतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की अश्या परिस्थितीत खासगी कंपन्या कदाचितच पुढे आल्या असत्या, की ज्या नेहमी फायदेशीर मार्गावर बिसिनेस घ्यायला नेहमी सरसावतात.)

मालोजीराव's picture

27 Jan 2016 - 3:11 pm | मालोजीराव

चित्रपट चांगला आहे, पण बर्याच महत्वाच्या गोष्टी दाखवल्या नाहीत. सद्दाम ला दाखवला नाही :) , ज्यांच्यामुळे Airlift शक्य झाले ते परराष्ट्र मंत्री गुजराल आणि सद्दाम ची तेव्हा गाजलेली गळाभेट दाखवली नाही. अर्थात हे दाखवलं असत तर चित्रपटाच्या हीरोचं क्रेडीट कमी झालं असतं

पिक्चर सत्यघटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे ? तांत्रिक बाजू भक्कम आहेत की नाही? संपूर्ण घटनेला न्याय देण्यात लेखक दिग्दर्शक यशस्वी झाले की नाही? या सर्व प्रश्नांच्या फंदात न पडता, तो बघताना माझ्या मनात कोणते विचार आले ते मी नोंदवले आहे. हे पिक्चरचे समीक्षण किंवा रसग्रहण नाही. त्या तीन तासात मला आठवलेल्या गोष्टी असे माझ्या लेखाचे स्वरूप आहे.

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 4:09 pm | संदीप डांगे

मोरेसाहेब, डोण्ट वरी. पब्लिक धाग्याचा मूळ विषय पाहून लिहिते. धाग्यावर आपले म्हणणे मांडण्यासारखे वातावरण आहे का हे बघून प्रतिसाद येतात. बाजीराव-मस्तानी, कट्यार काळजात घुसली, ह्याबद्दल अनेक धागे निघाले. जिथे योग्य वाटले तिथे लोकांनी लिहिले. तेव्हाही मूळ लेखकाने कोणता दृष्टिकोण ठेवून लिहलंय हे बघितलं नाही. वातावरण बघितले. तुमच्या धाग्यावर इतरांचेही अनेक चांगले प्रतिसाद आले, ही चांगली गोष्ट आहे.

मला परीक्षण आवडले. बघणार आहे सिनेमा.

पिलीयन रायडर's picture

27 Jan 2016 - 5:51 pm | पिलीयन रायडर

सॉरी हां तुमच्या लेखावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मी वाचला नव्हता कारण त्यातुन स्टोरी कळेल असं मला वाटलं.

लेख आवडला. म्हणजे चित्रपटापेक्षाही तुमच्या आठवणी जास्त आवडल्या!

Anand More's picture

27 Jan 2016 - 7:10 pm | Anand More

धन्यवाद... :-)

हेमंत लाटकर's picture

27 Jan 2016 - 7:33 pm | हेमंत लाटकर

आज airlift पाहिला. आवडला.

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2016 - 9:49 pm | स्वाती दिनेश

परीक्षण व त्या अनुषंगाने मांडलेले विचार असा लेख आवडला,
चित्रपट बघेन.
स्वाती

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2016 - 11:33 pm | निनाद मुक्काम प...

माझ्या मते मेध्यू ने एकट्याने लाख भर लोक घेऊन अम्मान ला जातांना दाखवणे हे सिनेमच्या अंगाने घेतलेली लिबर्टी होती जे सिनेमाच्या सुरवातीला दाखवले आहे.
मात्र त्याने केलेले प्रयत्न इराक व दिल्लीत साधलेला संपर्क व निदान काही हजार लोकांना भारतात पाठवण्यास जबाबदार होता .
दोन वर्ष अबुधाबी मध्ये होतो तेव्हा भारतीय दूतावासाचा सुखद अनुभव आला ,
खाडीभागात कनिष्ठ वर्गातील अनिवासी भारतीय राहतात त्यांचे पैसे सरकारला आवडायचे मात्र त्यांना सुविधा देण्यास त्यांचे उत्तर दायित्व घेण्यास आपण बांधील आहोत ह्याबाबत त्यांची उदासीनता असायची
जेथे भारतातील भारतीयांना सरकारी कारभाराचा लाल्फितीचा अनुभव येतो तेथे खाडीदेशात लेबर केंप मध्ये राहणर्या लोकांची पर्व कोण करेल
मोदी ह्यांनी यु ए इ मध्ये लेबर केंप ला भेट दिली त्या लोकांशी संवांद साधला ह्या गोष्टीला महत्व न देता त्यांचा मॉस्क ला भेट देण्याच्या बातमीवर चर्विचरण केले.

ह्यामुळे केरळातील शहरात महानगरपालिकेत भाजपचे मुसंडी मारली.
सिनेमा भयानक आवडला
डोळ्यात पाणी तरळले.
दुबई मधील आप्त मंडळींनी बाबरी निमित्ताने घडलेला किस्सा सांगितला होता
बाबरी पडल्याचे टीव्ही वर पाहून तेथील केरळी मुसलमानांनी दुबई मध्ये रस्त्यावर मोर्चा काढला व हिंदूचे मंदिर तोडले
हिंदू त्यावेळी दहशती खाली होते तेव्हा दुबई मधील सिंधी व इतर व्यापारी वर्गाने दुबईच्या शेखला दुबई सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा दिला व पुढे दुबई च्या शेखने स्वतः ते मंदिर बांधून दिले-
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.

आदूबाळ's picture

28 Jan 2016 - 5:16 am | आदूबाळ

अगदीच अवांतर:

मोरेसाहेब, एक्झॉडस आवडलं असेल तर "मिला १८" नक्की वाचा.

सुहास झेले's picture

28 Jan 2016 - 10:16 am | सुहास झेले

सिनेमा बघितला... खूप काही मिसिंग वाटले. अनेक प्रसंगात ती गंभीरता दिसली नाही. सिनेमाचा वेळ वाढवून रेस्क्यू ऑपरेशनची आणखी दृश्य टाकली असती तर प्रभाव पडला असता असे वाटते. परीक्षणासाठी आभार :)

माझ्या एका मित्राचे मत आहे की, ही विद्यमान सरकारची एक प्रपोगंडा फिल्म आहे. त्याच्या मते या या चित्रपटात सरकारची भूमिका नगण्य आणि निष्क्रिय दाखवली आहे, जे वास्तवाला धरून नाही. असे करण्यामागचे कारण तेंव्हाचे सरकार वेगळ्या पक्षाचे होते. कोन्स्पिरसी थिअरिज वर कमी विश्वास असूनही मला हे मतही थोड्या प्रमाणात पटले आहे.

चौकटराजा's picture

29 Jan 2016 - 5:21 pm | चौकटराजा

सरकार जबाबदार दाखवले असते तर नायकाच्या देशभक्त प्रतिमेचे काय ? दुसरे असे की वास्तवात घडत असले तरी दगाबाज मित्र व यारी यात भारतीय प्रेक्षक यारी पसंत करतो.जारकर्म करणारी भारतीय स्त्री त्याला पडद्यावर आवडत नाही .एका नायकाने अनेकाना यमसदनी पिस्तूल न वापरता पाठ वल्याचे आवडते.

पगला गजोधर's picture

29 Jan 2016 - 6:34 pm | पगला गजोधर

नायकाच्या देशभक्त प्रतिमेचे काय ?

तरी नशीब प्रेक्षकांच, निदान नायक पंजाबी दाखवलाय, गुजराती नाही....

उदय८२'s picture

31 Jan 2016 - 7:23 pm | उदय८२

उत्तराखंडातून इनोव्हा वापरून १५००० गुजरात्यांना ज्यांनी बाहेर काढले. त्यावर नक्की एक चित्रपट येईल ;)

पगला गजोधर's picture

1 Feb 2016 - 9:21 am | पगला गजोधर

उत्तराखंडातून इनोव्हा वापरून १५००० गुजरात्यांना ज्यांनी बाहेर काढले. त्यावर नक्की एक चित्रपट येईल

इथे, 'सिंगल ह्यांडेंडली' १५००० गुजरात्यांना बाहेर काढले, असा शब्दप्रयोग तुमच्याकडून राहिला… (आठवा रामायणातील मारुतीरायने 'सिंगल ह्यांडेंडली' पर्वत एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलेला… )
कोणी सांगावे, कदाचित पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी येईलही तसा चित्रपट…

संदीप डांगे's picture

1 Feb 2016 - 10:10 am | संदीप डांगे

कुणी सांगावं हा चित्रपट त्याचेच रुपक असेल.. ;-)

पगला गजोधर's picture

1 Feb 2016 - 10:24 am | पगला गजोधर

हा बेपारी, अक्की पन बेपारी… ह्याला हलकी दाढी, त्याला पण दाढी….
हा शादीशुदा, तो पन शादीशुदा…
अक्की इराकी सैनिक अधिकार्याला, वरपर्यंत ओळखी असल्याच्या थापा मारतो….
हा सिंगलह्यान्डेडली बरेच काही करतो, तो १.७ लाख भारतीयांना १००० किमी वर लपवून घेवून जातो…
अजुन बरेच काहि....

ह ह ग लो (हसून हसून गडबडा लोळतोय)

गामा पैलवान's picture

9 Feb 2016 - 3:37 am | गामा पैलवान

http://im.rediff.com/news/2013/jul/14live3.jpg

-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

9 Feb 2016 - 9:33 am | गॅरी ट्रुमन

जाऊ द्या हो गा.पै मोदीविरोधात गरळ ओकली की आपण किती पुरोगामी,लोकशाहीवादी,सहिष्णु इत्यादी इत्यादी सर्टिफिकिटे मिरवता येतात ना लोकांना. त्यातलाच हा एक प्रकार.

भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या जागता पहारा या ब्लॉगवर अशाच प्रवृत्तीविषयी लिहिले आहे--"मोदी विरोधात काहीही बरळावे, कोणतेही आरोप करावेत, त्यावर माध्यमे तुटून पडतात. म्हणून असे विनोद निर्माण होत असतात." (मोदींनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली हा आरोप आझमखानने केला आहे त्याला तोरसेकर "असा" विनोद म्हणत आहेत)

अशा लोकांकडे दस्तुरखुद्द मोदी जर "हाथी चाले अपनी चाल कुत्ते भौके हजार" असे म्हणत दुर्लक्ष करत असतील तर आपल्यासारख्यांनी तरी ते फार गांभीर्याने का घ्यावे?

मृत्युन्जय's picture

10 Feb 2016 - 2:57 pm | मृत्युन्जय

बंधो ज्यांचा प्रताप होता त्या टैम्सने स्पष्टीकरण दिले आहे आणि मान्य केले आहे की ही त्यांचीच चूक होती.

राजनाथ सिंग म्हणतात की " पार्टी वर्कर्सनी असे केलेले असु शकेल. पण आमचे असे काही म्हणणे नाही" . पार्टी वर्कर्सनी हे विधान केलेच असे काही ते म्हणाले नाही. ज्यांनी वातमी लिहिली त्यांनीच मान्य केले की चूक भाजपा, मोदी अथव त्यांच्या समर्थकांची नव्हती तर त्यांची स्वतःची होती. त्यानंतर इतर कोण काय म्हणते हे सर्वथा गौण आहे. काहिही करुन मोदींवर किंवा त्यांच्या समर्थकांवर टीका करायचीच या घाईत तुम्ही वरची गोष्ट विसरत आहात. अर्थात टाइम्स देखील मोदींचा पित्त्या आहे त्यामुळे तो देखील "भक्त" त्यामुळे ही परत भाज्पाचीच चूक असा आरडाओर्डा करायचा असेल तर गोष्ट वेगळी ;)

शिवाय हे देखील वाचा:

LUCKNOW: BJP chief Rajnath Singh on Wednesday said the Gujarat chief minister Narendra Modi never claimed that he has saved 15,000 Gujaratis from Uttarakhand. He was reacting to allegations that Modi made tall claims after his visit to calamity-struck Uttarakhand and tried to take political mileage.

"Modi went to Uttarakhand to express his sympathies and it is being said that he evacuated 15,000 Gujaratis from there. I myself talked to him and he said that he never gave any such statement," said Singh while talking to reporters. "How it is being publicised is beyond his understanding," he added.

Singh arrived in Lucknow for a two-day visit of the state on Wednesday. It was his first trip after being made national president of the party earlier this year. Twice his visit was cancelled in the past few months. Singh also flagged off the relief material collected by the state BJP unit for the Uttarakhand.

The Congress and other parties had attacked the BJP for projecting Modi as Rambo following reports that the Gujarat chief minister helped in evacuating 15,000 Gujaratis who were stuck in Uttarakhand. Singh said he had appealed to party workers that not to politicise Uttarakhand disaster.

The UP BJP also announced a financial assistance of Rs 56 lakh to Uttarakhand and Rs five lakh each to the kin of those killed in the helicopter crash during rescue operation in Uttarakhand. Singh said he had appealed to all party MPs and MLAs to donate at least their one month's salary.

पगला गजोधर's picture

11 Feb 2016 - 9:15 am | पगला गजोधर

a

मृत्युन्जय's picture

8 Feb 2016 - 1:55 pm | मृत्युन्जय

माझ्या एका मित्राचे मत आहे की, ही विद्यमान सरकारची एक प्रपोगंडा फिल्म आहे.

कुठल्याही गोष्तीचे खापर मोदी आणि भाजपावर फोडण्याची कमाल हातोटी आहे ही. तुमच्या मित्राला खाली पॉईंट्स पुरवा तो अजुन खुष होइलः

१. मूळ घटनेतील हिरो ख्रिश्चन असुनही चित्रपटात तो हिंदु दाखवण्यामागे मोदींचे षडयंत्र आहे
२. हिंदी चित्रपटस्रूष्टीत इतके यशस्वी मुसलमान कलाकार असुनही हिंदु भाटियाला चित्रपटात घेण्यामागे जातीय आ़णि धर्मांध भाजपाचा हात आहे.
३. चित्रपटातले कटकटे पात्र ख्रिश्चन दाखवुन मूळ घटनेत नायक असलेल्या धर्माला खलनायक ठरवण्याचा संघीय डाव आहे.
४. जगात चित्रपट बनवण्यासाठी इतके विषय असताना मुसलमानांमधल्या युद्धावर चित्रपट बनवण्यामागे केंद्रसरकारचे मुस्लिमविरोधी धोरण कारणीभूत आहे.
५. मुसलमान इराकी सैन्याधिकारी भ्रष्ट दाखवुन मुसलमानांची जाणुनबुजुन अवहेलना करण्याचे आदेश प्रत्यक्ष मोहन भागवतांकडुनच दिले गेले होते.

होउन जौद्या.

हा हा हा.... काय वकील वगेरे आहात की काय? मी तर या वादाच्या भानगडीत पडतंच नाही.... मला आलेला अनुभव महत्वाचा..... असे मानून सगळ्यांनाच मान डोलावतो

आत्ताच ऐकलेल्या बातमीनुसार, सध्याच्या केंद्रसरकारने अक्की वर खुश होवून त्याला नेव्ही चा ब्रांड अँम्बँसीटर म्हणून नेमलेल आहे. ख खो मो जा
अक्कीच्या या चित्रपटानंतर हा निव्वळ योगायोग समजावा, अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक कार्य एकमेवद्वितीय असावे.

मृत्युन्जय's picture

8 Feb 2016 - 3:06 pm | मृत्युन्जय

अक्कीचे भारतीय-नेव्ही विषयक कार्य एकमेवद्वितीय असावे.

तेंडुलकर इतकेच अद्वितीय असावे ;)

मृत्युन्जय's picture

8 Feb 2016 - 3:08 pm | मृत्युन्जय

तेंडुलकरचे एयर फोर्स बाबत आहे तितकेच एकमेवद्वितीय असावे असे वाचा,

तेंडुलकरांनी गाडीचा कर माफ करण्याचा अर्ज करून आपली देशभक्ती सिद्ध केलीच होती. आता मी पण देशभक्त व्हायचे म्हणतोय. पण कोणी गाडीच भेट देत नाहीये.

अक्की रे अक्की काही दिवसांनी तुझे भारतरत्न नक्की:;-)

पगला गजोधर's picture

8 Feb 2016 - 4:58 pm | पगला गजोधर

भारतरत्न नाही … तर निदान, गेला बाजार… फिल्म टेले इन्स्टी संस्थेचे अध्यक्षपद नक्की ….