वेड्या आठ्वणी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
11 Sep 2008 - 11:12 pm

अक्का,
आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात."आठवणी येतात",असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात.

तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझं बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्षाने आठवली.
आठवतं का तुला?

तूं पंधरा सोळा वर्षाची असावीस,आपण सर्व दादरला इंदीरा निवास मधे रहात असूं.त्याच मजल्यावर दहा नंबरच्या फ़्ल्याट मधे प्रसीद्ध मराठी ऍक्टर चन्द्रकान्त(मांढरे) रहात असे.तूं सुन्दर दिसायचीस, तुझं अक्षर पण किती सुन्दर,चन्द्रकान्तने इंदीरा निवासच्या सार्वजनीक गणपतीच्या कार्यक्रमात,"शारदा" नाटक बसवलं होतं.त्यात तुला "शारदेची " मुख्य भुमीका दिली होती."मुर्तीमंत भिती उभी मज समोर राहीली"हे गाणं आणि "म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान"हे सुन्दर गाणं सुरात गाऊन तूं टाळ्या घेतल्यास,आणि वन्समोअर पण घेतलेस
आठवतं का तुला?

म्याट्रीक पर्यंत तूं दादरच्या गर्ल्स स्कूल मधे शिकत होतीस.महात्मा गांधी एकदा मुंबईला आले होते,त्यांची जाहिर सभा शिवाजी पार्कवर झाली होती.त्यांच्या सन्मानासाठी देशाच्या गौरवासाठी आणि त्याना खूप आवडणारं गाणं "वैष्ण्व जन तो तेणे कही रे जो पिडपराई जाणे रे"हे गाणं गाण्यासाठी तुला तुझ्या शाळेमधून निवडलं होतं.स्टेज वरच्या तुम्हा सर्व मुलींची
स्वत:हून महात्माजीनी पाठ थोपटली,
हे तूं आम्हाला अभिमानाने सांगायचीस.
आठवतं का तुला?

अण्णा आजारी झाले तेव्हां आपण सर्व वेंगुर्ल्याला रहायला गेलो.तिकडे तूं रेशनींग ऒफ़ीस मधे नोकरी करायचीस.सुट्टी दिवशी तूं,मी,सुधा आणि तुझ्या मैत्रीणी मिळून आपण सर्व वेंगुर्ल्याच्या "क्यांप"मधे फ़िरायला जात असूं."बाब्ल्याच्या "कोळड्रीन्क हाउस "मधे तूं आम्हा सर्वाना दुध कोळ्ड्रीन्क मधे आईसक्रीम घालून मिळणारं रंगीबेरंगी ड्रिन्क पोटभर देत
असायचीस.
आठवतं का तुला?

मला आठवतं एकावन,बावनच्या दर्म्यान तुझं लग्नं झालं.मी कॊलेजला दुसरया वर्गात शिकत होतो.तुझं लग्न मुंबईत (गिरगावांत) झालं.अण्णा आजारी असल्याने अण्णा आणि आई दोघही तुझ्या लग्नाला येऊं शकली नाहीत.तुझ्या सासरी जाताना त्यांची आठवण काढून तूं खूप रडलीस.मी पण तुला जवळ घेऊन तुझे अश्रु पुसत म्हणालो"रडू नकोस हे ही दिवस
जातील"आपण आई अण्णाना "आराम नगर" मधे आणलं.त्रेपन्न मधे तूला विरेन झाला.
आठवतं का तुला?

प्रत्येक भाऊबिजे दिवशी तूं माझ्याकडे यायचीस,किती आनंद व्हायचा त्या दिवशी?बोट धरून फुलांची परडी घेऊन देवपुजेला फुले आणण्यासाठी संगत देणारी तूं संगत देत राहीलीस.
"आठवतं का तुला?"
असं आतां मी कसं म्हणूं?

परलोकीच्या प्रवासाल निघालेली तूं आता अण्णा,आईला भेटशील,आणि या इहलोकात राहून तुझ्या फ़क्त वेड्या आठवणी देशील.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

शिवा जमदाडे's picture

12 Sep 2008 - 8:36 am | शिवा जमदाडे

नि:शब्द केलेत....

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Sep 2008 - 5:30 am | श्रीकृष्ण सामंत

शिवा जमदाडेजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2008 - 9:16 am | प्रकाश घाटपांडे

:( प्रकाश घाटपांडे

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Sep 2008 - 5:33 am | श्रीकृष्ण सामंत

प्रकाश घाटपांडेजी,
दुःख हे असंच सॅड असतं.काय करणार.
अपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

आनंदयात्री's picture

12 Sep 2008 - 9:51 am | आनंदयात्री

किती आठवणी.. केवढा प्रवास !!
कसे जगावे .. कसा घ्यावा अदमास ?

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Sep 2008 - 5:36 am | श्रीकृष्ण सामंत

आनंदयात्रीजी,
खरं आहे आपलं म्हणणं.
सूख जवापाडे दुःख पर्वता एव्हडे
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रभाकर पेठकर's picture

12 Sep 2008 - 9:58 am | प्रभाकर पेठकर

डोळे पाणावले. फार हृद्य आठवणी.

पण एक खटकलं. 'आठवतं का तुला?' ह्या प्रश्नाने एकूण लिखाण त्या 'प्रिय व्यक्तिशी संवाद' ह्या साच्यात उतरवलेला आहे. हे अति खाजगी स्वरूपाचे विचार वाटतात. ते तसे यायला नको होते. त्या ऐवजी 'आक्का' ह्या शिर्षकाने आक्काच्या आठवणी वाचकाशी संवाद साधत आल्या असत्या तर त्या जास्त बर्‍या वाटल्या असत्या असे मला प्रामाणिकपणे वाटते.

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Sep 2008 - 8:29 pm | श्रीकृष्ण सामंत

प्रभाकर पेठकरजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपल्याला जे वाटलं-हे अति खाजगी स्वरूपाचे विचार वाटतात.-तसं हे लिहिताना मला
खरोखरंच वाटलं नाही.खरं म्हणजे "आक्का" ह्या जगात नसताना सुद्धा मी तिच्याशी संवाद
साधण्याचा जो प्रयत्न करित होतो तो केवळ माझे मायबाप वाचक माझ्या मनात न आणताच करीत होतो.तेव्हा तो आपण म्हणता तसंच " प्रिय व्यक्तिशी संवाद" ह्या स्वरूपात होता.
लिहून झाल्यावर असं वाटलं,की "माझी आक्का अशी अशी होती"हे जरी संवादाच्या कल्पनेने वाचका पुढे ठेवलं तर ती एक "कहाणी" सांगितल्या सारखी झाली असती.आणि तिचं खासगीपण जास्त प्रकर्षाने दिसलं असत.

माझ्या सारख्या अनेक जणांच्या(वाचकांच्या) अशाच प्रिय व्यक्ति चटका लावून त्यांना सोडून जात असतील.त्यांच्या पण मनात त्या व्यक्तिला,
"आठवतं का तुला"?
हा प्रश्न मनात येऊन त्याना त्या व्यक्तिला आठवून माझ्या सारखं त्यांच्या ही डोळयात पाणी आल्याविना रहाणार नाही.अशी कल्पना करून मी हा लेख लिहिला.
खासगी असून सुद्धा सार्वजनीक करून तो वाचायला, वाचकाना वाचताना "ट्ची" वाटावा हा उद्देश ठेवला.

संकेस्थळ आणि जालामुळे वाचकांची आणि लेखकांची जवळीक एव्हडी होत आहे,की खासगी काय आणी सार्वजनीक काय ह्याच्या मधलं अंतर अगदी पुस्सट झालं आहे.
पुस्तकाचा लेखक आणि त्याचे वाचक यामधल्या दुव्या पेक्षा ह्या मधला दुवा जास्त बोलका आणि तात्कालीक झाला आहे असं मला वाटत. निदान माझ्या पुरता तरी.
मला प्रामाणिकपणे काय वाटलं ते मी लिहिले आहे.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

नारायणी's picture

13 Sep 2008 - 2:25 am | नारायणी

फारचं सुंदर लिहिलंय काका!! खुप आवडला लेख.

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Sep 2008 - 5:40 am | श्रीकृष्ण सामंत

नारायणी,
तुला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com