भाली नावाचा असाच एक सडेफटिंग

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
8 Sep 2008 - 9:47 pm

खरं म्हणजे आम्ही त्यांना भाली म्हणत असलो तरी त्यांच खरं नांव भालचंद्र रेडकर.भाली तसे दिसायला स्मार्ट होते.तरतरीत नाक,गोल चेहरा, गुबगुबीत शरिरयष्टी अणि अतिशय लाघवी स्वभाव त्यांचा.आयुष्यभर भाली ब्रम्हचारी राहीले. आणि त्याला एक कारण होतं.गावात जेव्हा देवीची लागण होती तेव्हा भालीच्या नशिबी आजारपण आलं.सर्व आंगावर देवीचे व्रण उठले आणि त्यांचा चेहरा त्या व्रणानी भरला.त्यामुळे एखाद्दया पितळीच्या अथवा तांब्याच्या कळशीवर जशी ठोकणं दिसतात अगदी तशीच ठोकणं त्यांच्या चेहऱ्यावर आली होती.आणि
" ह्या विद्रुप चेहऱ्याच्या मला कोण मुलगी देणार? आणि माझ्याशी कोण मुलगी लग्न करणार?"
असा प्रामाणिक प्रश्न मनात आल्याने,
"मी लग्नाचा विषयच मनातून काढून टाकला"
असं ते मला म्हणत.

भरपुर घोळ असलेला शुभ्र सफेद लेंगा, त्यावर लांबसडक कुठल्याही रंगाचा उभ्या लाईन्स असलेला शर्ट,पायात चप्पल आणि आता ह्या वयात डोक्यावर टक्क्ल,स्थुल शरिर घेऊन गिरगांवातल्या फुटपाथवर सामोरा आलेल्या ओळखीच्या व्यक्तिला,
"अरे तू असतोस कुठे?बरा आहेस ना?"
असे एका श्वासात विचारलेले वाक्य कानावर ऐकू आल्यास खचितच मागे वळून पहाण्याची जरूरी न भासता हा भालीच असणार ह्याची खात्री व्हायची.

शिक्षण मॅट्रिक पुरते,इंग्रजी लिखाणावर हातखंडा, आणि मेक्यानिकल गोष्टीकडे जास्त कल असल्याने माझगाव डॉकमधे कारकूनाची नोकरी मिळणं त्यांना कठिण झालं नाही.ऑफिसात तोच ड्रेस तोच गावभर कुणाकडेही जायला तोच ड्रेस असायचा.त्यामुळे,
"उच्च विचारसरणी आणि साधी रहाणी "
ह्या उक्तीचा समर्पक अर्थ भालीकडे पाहून मनात यायचा.हा मराठी लोकांची बाणा आहे असे त्यांना वाटत असायचं.

कुठेही सगीत क्लासची वर्गणी भरून क्लासिकल गाणे शिकल्याचे ऐकीवात नसता,कुठल्याही शास्त्रोक्त गाण्याच्या संगीत मेळाव्यात किंवा रेडियोवर चाललेल्या गाण्याचा कुठचा राग आहे ते भाली बिनचूक सांगायचे,आणि त्यामुळे ह्या गृहस्थाला संगीताची उपजतच देणगी असावी अशी खात्री व्हायची.भालीचा दुसरा छंद ड्राईव्हिंग करण्याचा.ग.म.लाडांच्या ऑफिसने
दिलेल्या गाडीतून लाडाना गावोगावी टूरवर नेण्यासाठी कोण उत्सुक्तता असायची.अशावेळी लाडांच्या ऑफिसने दिलेल्या ड्रायव्हरला बाजुला बसायला सांगून गाडीचे चक्र आपल्या हातात घेण्यात कोण अभिमान त्यांना वाटायचा.अशा संवयीमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्र त्यानी पालथा घातला होता.

संध्याकाळी चारच्या सुमारास डॉकयार्ड सुटल्यावर "F" रूटने भाली पांच मिनीटात घरी लगबगीने गिरगावात यायचे.म्हाताऱ्या आईने झाकून ठेवलेला कपभर चहा आणि बाजूला एका बशीत ठेवलेले कधी कधी कांदे पोहे तर कधी तिखट शिरा तर कधी थालीपीठ घशाखाली घालून,
"आई येतो गं! "
असं म्हणत तिन मजले उतरून गिरगावच्या फुटपाथवर चालू पडायचे ते थेट करंड्यांच्या ताईला भेटायला किंवा कामथांच्या काकाशी चार गोष्टी करायला किंवा शिरश्वेकरांच्या आजींची चौकशी करायला म्हणून निघायचे ते थेट संध्याकाळी लाडांच्या दादरच्या हिदूकॉलनीतल्या "GIP" रेल्वेसमोरच्या ब्लॉकवर रात्रीच्या मुक्कामाला जायचे.संध्याकाळचं जेवण बहुदा लाडांकडेच असायचं.

जस जसं वय होत गेलं तस तसं भालीच्या रोजच्या रिवाजात खंड पडत गेला. आणि रिटायर्ड झाल्यावर आठ तास ऑफीसात जात असलेला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडू लागला.घरी बसण्याची संवय नसल्याने उगाच कुणाच्याही घरी जावून बसणं कठीण होवू लागलं.
"बाबारे, म्हातरपण कुणालाही नको.आणि असलंच तर उत्तम प्रक्रृती आणि भरपूर पैसा असेल तर म्हातारपणा सारखी मजा नाही"
असं मला कधीतरी म्हणायचे.
"रोज सकाळी उठ्ल्यावर प्रकृतीच्या काही ना काही तरी कटकटी असतात बघ"
असं म्हणून झाल्यावर पु.लं चा जोक सांगायला विसरायचे नाहीत.
"सकाळी उठल्यावर जर का आपले गुड्घे दुखले नाहीत की समजावं की आपण मेलो"
असं म्हणून मनसोक्त हंसायचे. हा जोक सांगायचा नसल्यास दुसरा एक जोक सांगायचे,
"हे बघ, आपला कोणही सल्ला घेत नाही हे लक्षात आल्यावर आपण समजावं की आपण आता खरंच म्हातारे झालो,आणि हा सल्ला आपल्याकडून मिळाला असता तर बरं झालं असतं असं जर त्यांच्या मनांत आलं तर समजावं की आपण खरंच मेलो ."

मी इकडे आल्यानंतर भालीचा आणि माझा संपर्क जवळ जवळ तुटला म्हणायला हरकत नाही.नाही म्हटलं तर अलिकडे माझ्या एका मित्राने ईमेलवर बातमी दिली की भाली निर्वतले.रात्री झोपी गेल्यावर सकाळी अंथरूणातून उठेनात. हे पाहून कळायला कठीण झालं नाही की भाली झोपेतच गेले.

माणसाला झोपेची आवश्क्यता नसती तर भाली सतत असेच पायाला चक्र लागल्यासारखे इकडून तिकडे फिरतच राहिले असते.कदाचित ईश्वराला त्यांची दया आली असावी म्हणूनच की काय त्यांना त्याने "चीर नीद्रेत "पाठवलं तर नाही ना?

भालचंद्र रेडकर जाण्यासमयी ऐंशी वर्षाचे होते.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख