"आत्मा" ज्ञान!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
26 Nov 2015 - 12:05 pm

वर्ष :- १९८९-९०
स्थळ :- १०१ ची गच्ची
वेळ :- पोटं भरलेल्याची
पात्रं :- मेंदू क्रमांक-१ (संजय पाटील)
मेंदू क्रमांक-२ (बाजी प्रभू)
मेंदू क्रमांक-३ (किरण केंचे)
मेंदू क्रमांक-४ (राजेश सोनावणे)

एका टळटळीत दुपारच्यावेळी संजयने शिट्टी मारून ९७ मध्ये असलेल्या मला!..येण्याचा इशारा केला. उड्या मारत त्याच्याकडे गेलो तर तिकडे बाकीचे दोन मेंदू आधीच हजर होते...संजयच्या पहिल्याच प्रश्नाने मी ताडकन उडालो....
ये आपण 'प्लँचेट करायचं का?
खरंतर संजयला करूयात का? विचारायचंच नव्हत...करायचंच त्याने आधीच ठरवलं होतं, फक्त तो अजून दोन-तीन बकरे शोधत होता....बाकीच्या दोन मेंदूंची टॉमसारखी फिरणारी बुबुळं थांबायची वाट बघत असतांनाच संजयने कृती आणि साहित्य सांगून टाकलं....
मेंदू क्रमांक ३-४ :- ये नको रे!!...ते लय मोठं लफडं असतं, च्याआयला ह्या आत्म्या बित्म्याची लफडी नकोत आपल्याला.
पण त्यांचा लटका विरोध संजयने एकहाथी मोडून काढला.... संजय प्लान करून चिट तर करत नाही ना? ची खात्री झाल्यानंतर सगळे तयार झाले.
उद्देश काय? तर किशोर वयात आम्हाला बरेच प्रश्न पडले होते. त्याची उत्तरं शोधायची होती. असं म्हणतात की दासबोधात समर्थांनी आपल्यासारख्या सामान्यांना सुचणारही नाहीत इतक्या शंका काढून स्वतःच त्या शंकांची उत्तरं दिली आहेत. पण आमचे प्रश्न आणि शंकांची दासबोधात उत्तरं नव्हती म्हणून डायरेक्ट आत्म्यालाच विचारायचे संजयने ठरवले होते.
थोडी उस्सुकता थोडी भितीच्या मिश्र वातावरणात आम्ही सुरवात केली. एवढ्या मोठ्या भानगडीची कृती एकदम सोप्पी होती.
मोठ्ठा चित्र काढायचा कागद घेऊन त्यावर ‘ए’ ते ‘झेड’ अक्षरं, बाजूला शून्य ते नऊ आकडे लिहायचे, बरोबर मधोमध "बाहेरच्या" पाहुण्यांसाठी आणि आजू बाजूला 'येस'-'नो' चे गोल काढायचे....उदबत्ती लागणार होती पण महिन्याच्या हिशोबाने मोजून घेतलेल्या उदबत्त्या घरी शॉर्ट पडल्यातर उगाच चौकशी होईल म्हणून फक्त स्टीलची वाटी हि एकच प्रॉपर्टी वापरायचं ठरवलं. संजयच्या ग्यॅलरीवजा रूम मध्ये चार्ट बनवुन झाला...वाटीपण हजर होती, आता फक्त आत्मे यायचे बाकी होते. इतक्यात,
मेंदू क्रमांक-३ :- ये घरात नको! समजा वाटी चुकून सटकली आणि उलटली तर आत्मा त्या घरातच रहातो म्हणे!
मेंदू क्रमांक-४ :- पण देवगण वाल्यांना भूत काही करत नाही. संजय आणि त्याच्या घरातले स्वभावाला चांगले आहेत म्हणजे सगळ्यांचा देवगणच असणार!!
बाकीच्या मेदूंना त्याचं कौतुक वाटलं पण उगाच रिस्क नको म्हणून बाकीची बौधिकं झाल्यानंतर आम्ही आमचा जामानिमा १०१ च्या गच्चीवर हलवला. आताशा आम्ही अधीर झालो होतो, जसं तुम्ही हा लेख वाचायला झालेत तसे....पटा-पटा गच्चीवर पोहोचून पेपर पसरवून बसलो.

मेंदू क्रमांक-१ :- अरे पण बोलवायचं कोणाला?
मेंदू क्रमांक-२ :-प्लँचेटसाठी भारतभर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्म्याला बोलावण्यास प्राधान्य दिले जाते. सावकर यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे तो लवकर येतो, तसेच प्रश्नांची उत्तरेही तो अचूक देतो, असे प्लँचेट करणारे लोक मानतात. ह्या! ह्या! ह्या!
मेंदू क्रमांक-१,३,४ :- माझ्याकडे बघून एक तुच्छ कटाक्ष आणि कशाला ह्या येड्याला बोलावल्याचे भाव.
मेंदू क्रमांक-१ :- अरे नाही! कोणीतरी मर्डर झालेला पाहिजे किंवा ताजे ताजे गेलेले आत्मे पाहिजेत.
मेंदू क्रमांक-२ :- अरे माझे आजोबा नुकतेच खपलेत आणि काय लफडं झालं तर मी बघुन घेइन...चालेल का? (मी काय बघून घेणार होतो ते मलाच माहित नव्हतं).
माझे चौथी पास आजोबा इंग्रजी चार्टवर आमच्या प्रश्नांची उत्तरं कशी काय देणार असले फालतू प्रश्न आम्ही लवकरच निकाली काढले आणि एकदाचं नाय-होय करता करता माझ्या आजोबांना बोलवायचं ठरलं.
डाव्या आणि उजव्या बाजूला “येस” आणि “नो” च्या मधे काढलेल्या वर्तुळाकार होमवर वाटी उलटी ठेऊन सगळ्यांनी तर्जनी वाटीवर ठेवली आणि आजोबांना आवाहन करायला सुरवात केली.
मेंदू क्रमांक-२ :- अतिशय नम्रपणे. शिवराम शामराव देसाई!! तुम्ही या आणि आमच्या काही प्रश्नांची उत्तर द्या, आणि तुम्ही आलात हे कळण्यासाठी “येस” वर जा आणि नसेल तर "नो" वर जा.
मेंदू क्रमांक-१,३,४ :- क्षणाचाही विलंब न करता ...ये च्युxxx!!, येडxxx!!..“नो” वर कशाला जातील....च्युxxx साला.
मेंदू क्रमांक-२ :- अरे हो रे!!! परत नम्रपणे. शिवराम शामराव देसाई!! तुम्ही या आणि आमच्या काही प्रश्नांची उत्तर द्या, आणि तुम्ही आलात हे कळण्यासाठी “येस”वर जा.
नातवासाठीच्या मित्रांच्या ओव्या ऐकून आपल्या नावाच्या ओव्या चालू व्हायच्या आत आजोबा वाटीत शिरले आणि काय आश्चर्य!! वाटी हलायला लागली आणि "येस" वर जाऊन थांबली....

वातावरण एकदम गंभीर झालं....कारण एकदा का आत्म्याची एन्ट्री झाली आणि मधेच बोट उच्चलं तर भूत उचलणारयाच्या मानगुटीवर बसणार हे संजय ने आधीच क्लिअर केलं होतं....त्यामुळे सगळ्यांचीच पाचावर धारण बसली होती. पण आता संजयच्या गाईडलाईन प्रमाणे जो आलाय तो असली आहे कि नकली हे त्याचाच नावाची स्पेलिंग विचारून कन्फर्म करायचं होतं. मग माझे आजोबा ऐक ऐक करून त्यांच्या नावाच्या अक्षरांवरून फिरू लागले. पण S-H-I-V-R नंतर मधेच थांबले. त्यांचे पाय लटपटले कि आमचे हाथ! माहित नाही पण वाटी जागची हलायला तयार नव्हती....बरयाच विनत वाऱ्या करून झाल्या पण आजोबा काय जागचे हलायला तयार नाहीत. तसे ते खूप हट्टी होते पण आता कुतूहलाची जागा भितीने घेतली होती.
मेंदू क्रमांक-३,४ :- च्याआयला!! कशाला ह्या म्हाताऱ्या माणसाला बोलावलं? आता काय बोटं तुझ्या XXXXXX??????

आणि ढँटडँ!!
माझे आजोबा परत चालायला लागले...आजोबा जाम शिव्या दयायचे ते माहित होतं मला पण, त्यांना स्वतःलासुद्धा शिव्या खायला आवडतं! हे नवीन होतं मला....पण आता ते फक्त "शिवराम" ची स्पेलिंग पूर्ण करून "होम' वर जाऊन बसले......बसले कसले! तिथेच थांबले....
लगे रहो मुन्ना भाई मधला केमिकल लोच्या एव्हाना आमच्या चौघांच्या डोक्यात झाला होता... मग इंदिरा गांधीला बोलवायचं ठरलं. दिल्ली सोडून ती बाई १०१ च्या गच्चीवर कशाला येईल असले वायफळ प्रश्न आता आम्हाला पडत नव्हते.
बाईला तुमचा मर्डर कोणी केला पासून ते अमुक अमुक मोठेपणी कोण होणार? कुठला अभियन्ता होणार? नोकरी करणार की धंदा? का धंद्याला? कुठल्या कंपनीत? आमचं लग्न कधी? कोणाशी? मुलीचं नाव काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इंदिरा गांधीनी खळ-खळ न करता दिली होती. देशाचे प्रश्न सोडवले नसले तरी आमचे प्रश्न तिने चुटकी सरशी सोडवले होते. त्यादिवशीच्या यशस्वी प्रयोगानंतर आम्हाला प्लँचेटचा छंदच लागला होता.
राजीव गांधी, किशोर कुमार, संजीवकुमार, संजय गांधी, पंडित नेहरू, गांधीजी असे रथी-महारथी आमच्या वाटीत येउन गेले होते. ती वाटी म्युझिअम मधे ठेवायला पाहिजेचा प्रस्तावपण आम्ही पास केला होता.

नव्याची नवलाई एक-दोन महिन्यातच संपली आणि प्लँचेट प्रकरण काळाच्या ओघात विस्मृतीत गेलं.
मागे पेपरात दाभोळकर हत्येच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी प्लँचेटचा वापर केल्याची बातमी वाचली आणि संजयच्या प्लँचेटचा प्रयोग आठवला, परत विस्मृतीत जायच्या आत लिहून ठेवला होता. जो आत्ता इकडे पोस्ट करतोय.

त्यावेळी पौंगडावस्थेत असलेले आम्ही!! प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काय काय करत होतो ह्याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं. प्लँचेट किती खोटा किती खरा ते मला आजही माहित नाही पण त्यावेळी आमच्या प्रश्नांना उत्तरं देणारा तो आमचा “गुगल” होता… मिपाकरांचा काय अनुभव??

विनोदअनुभव

प्रतिक्रिया

गवि's picture

26 Nov 2015 - 12:40 pm | गवि

हॅहॅहॅ.

चौघांपैकी 'हलवे'न्टियर कोण होता? ;-)

बबन ताम्बे's picture

26 Nov 2015 - 12:54 pm | बबन ताम्बे

लय भारी शब्द . :-)

बाजीप्रभू's picture

26 Nov 2015 - 1:05 pm | बाजीप्रभू

'हलवे'न्टियर … खी खी खी
काय माहित? प्रत्येकाला वाटायचं बाकीचे तीन 'हलवे'न्टियर आहेत म्हणून.

संजय पाटिल's picture

26 Nov 2015 - 1:07 pm | संजय पाटिल

पात्रं :- मेंदू क्रमांक-१ (संजय पाटील)>>>
हा मी नव्हे

बाजीप्रभू's picture

27 Nov 2015 - 4:07 am | बाजीप्रभू

हा हा हा..... हा मेंदू तुमचा नाही.

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2015 - 1:26 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर चुरचुरीत लेखन.

S.S.C.ला असताना आम्हीही प्लँचेट केले होते. बरीच उत्तरे खरी निघाली. जी त्या काळी आम्हा चौघांनाही (आम्ही चौघे होतो) माहीत नव्हती. त्या बालवयात सगळंच खरं वाटायचं. भूताखेतांवर जाम विश्वास होता. आता परिस्थिती बदलली आहे. विश्वास उडाला आहे. आता पुन्हा एकदा प्लँचेट करून पाहिले पाहिजे. शीना बोरा हत्याकांडाचा तडा लावला पाहिजे.

कपिलमुनी's picture

26 Nov 2015 - 2:27 pm | कपिलमुनी

इंद्राणी मुखर्जीला सोडवायची पेठकर काकांची खटपट !

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2015 - 2:41 pm | प्रभाकर पेठकर

आँ! स्पष्ट दिलें आहे 'हत्याकांडाचा तडा लावण्यासाठी'.
सोडविण्याची धडपड वगैरे नाही हो, तिचे नातेसंबंध समजून घेण्यासाठी. फारच गुंता आहे.

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा

खिक्क

अमृत's picture

26 Nov 2015 - 2:01 pm | अमृत

अगदी खुस्खूशीत. अजुन येऊ द्या.

उगा काहितरीच's picture

26 Nov 2015 - 4:47 pm | उगा काहितरीच

मस्त खुसखुशीत लेख !
रच्याकने तुम्हाला केवळ एकाच व्यक्तीला बोलवायचं आहे तर कुणाला बोलवणार ?
माझे उत्तर : ओसामा ! ;-)

बाजीप्रभू's picture

27 Nov 2015 - 4:11 am | बाजीप्रभू

माझे उत्तर : बाजी प्रभू ! :-)

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 8:45 pm | DEADPOOL

रच्याकने तुम्हाला केवळ एकाच व्यक्तीला बोलवायचं
आहे तर कुणाला बोलवणार ?
माझे उत्तर : चे गवेरा