लाईन

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
7 Nov 2015 - 10:47 pm

भडक मेकअप करुन ओठ लाल चुटुक चुटुक करत कमली जेव्हा रस्त्यानं ओढणी फिरवत जायची, तेव्हा पोरांच्या रसाळ नजरा कोपऱ्या कोपऱ्यातनं तिच्याकडं वळायच्या. पुढुन बारीक कापलेल्या केसांची हिप्पी स्टाईल करुन खाली मान घालुन रस्त्यानं जाणारी कमली अजिबात नखरेल वगैरे नव्हती. चांगली 'ईज्जतदार' घराण्यातली होती. पण तिला बघुन पोरांच्या नजरा चाळवायच्या. हाटेलं, पानटपऱ्या, न्हाव्या बिव्याच्या दुकानातली पोरं माना पुढं करुन चोरट्या नजरेनं ती लांब जाईस्तोर तिच्याकडं बघत राहायची.
कमलीला या नजरा कधी कधी टोचायच्या, पण आतुन मात्र ती सुखावायची. आपल्या सौदर्याचा तोरा सगळ्या गावात मिरवत ती छुपा आनंद घ्यायची. तिचं घराणं गब्बर असल्यानं तिच्याजवळ जायचं धाडस कुणीसुद्धा करत नसायचं.

त्यादिवशी ती अशीच लांबवर गेल्यावर दिपकनं दोनचाकी काढली. रघ्याला मागं बसवुन गाडी तिच्यामागं दामटली. तिकडंच्या रस्त्यावर चिटपाखरु नसायचं. तिच्या थोडं पुढं जाऊन दिपकनं ब्रेक दाबले. ती जवळ येत चालली तरी आधी ठरल्याप्रमानं ना दिपकनं हातात गुलाबाचं घेतलं, ना त्याच्या तोंडातनं शब्द फुटला. नुसताच मुका होऊन गाडीचा चोक फिरवत राहिला.
"रघू, अरे तु मला ती चाफ्याची रोपं आणुन देणार होतास, भेटली का कुठे?" तिचा आवाज कसा अगदी नाजुक. ऊच्चार स्पष्ट. ओढुन ताणुन शहरी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

त्यादिवशी मी असाच खोलीमध्ये बिड्या ओढत बसलो होतो. खोली एकदम लहान. सिंगल. दुसऱ्या मजल्यावरची. स्वस्तात मिळाली म्हणुन घेतली. मागच्या बाजुला एक खिडकी आणि पुढं दाराला लागुनच दुसरी. रात्री मी समोरच्या गॅलरीत कठड्यावर जाऊन निवांत बसायचो. रात्रीचचं हा. दिवसा तिथे ऊन असायचं. पैश्याची चणचण असायची, मग आणायचो बिड्याची बंडलं आन बसायचो ओढत. त्यादिवशी मी भरपुर बिड्या ओढल्या. पार फुफ्फुसं जळोस्तर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"चांगली हायती का चाफ्याची रोपं, तुला मनलं नव्हतं का ऊद्या आणतु म्हणुन"
सकाळी सकाळी कमली प्रसन्न हसली.
"रघु तू खुप चांगला आहे रे, मला अशी मुलं खुप आवडतात. शांत. अबोल. अरे पण ही लावायची कशी?"

अंगणातच दोन तीन खड्डे खणले गेले. त्यात चाफ्याची रोपं विसावली. चिखलानं भरलेलं हात पाण्यानं धुतले गेले. रघ्यानं सायकलवर टांग टाकली.
"गुलाबाची रोपं पण हायती बरका, आणतु यकान्दीशी"

सकाळी सकाळी कमली प्रसन्न हसली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"कसं रं आता, नेमकं काय ठरवलयं त्वा?"
रघ्या गुमाट चालत होता.
"आसतं लेका नशीब ऐकेकाचं"
पिंट्या चितागती त्याच्याबरोबर चालत राहीला.
"तुला सांगतु, ह्या पोरी लई बेकार असत्यात, कदीबी त्यांच्या नादी लागुगी, पार काशी हुती जगण्याची" टेन्शन मध्ये असला की रघ्या असलं कायबाय बरळायचा. पिंट्या डोळं फाडुन ऐकत राहिला.
पुलापाशी आली तशी दोघंबी खाली सडकवर बसली. अंधारातच. म्होरच्या घरातल्या लाईटीकड बघत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बसस्टँडवर कमली बराच वेळ वाट बघत होती. तेवढ्यात एक दोनचाकी आली.
"किती वेळ?, मी ईथं कधीपासुन थांबलेय"
"सॉरी, पंपावर गर्दी हुती, बस, यीव डोंगरावर फिरुन"
"नको, कोणी पाहील्यावर किती गोंधळ उडेल माहीतेय का?"
"ह्या, त्याला काय घाबरायचं, साखरपुडा झालायचं की"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

'रोते रोते युही रात गुजर जाती है' किंवा 'तेरी बेवफाई को भुलाना सकेंगे' किंवा 'हर कसम तोड दी आज तुमने' असली रडकी गाणी ऐकत रघ्या पडुन राहायचा. टेपचा व्हॉल्युम पार तिच्या घरापर्यंत ऐकू जाईल एवढा वाढवायचा. पान बिडी गुटखा मावा खाणं वाढतच चाललं. नवनव्या दर्दभऱ्या कॅसेट आणुन वाजवत राहणं आता नित्याचचं झालं होतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"काटा घुसल्यावर कसं वाटतं गुलाबाचा" तिच्या वेणीतलं फुल काढत रघ्या म्हणाला.
"तू निघ बाबा ईथुन, आई घरीच आहे"
"आसं कसं यक चानस तरी पायजेच" रघ्यानं आज तिला घराम्हागंच गाठलं हुतं.
"मला माहीतेय तुला काय पाहीजेल, पण आता नको, नंतर" लाडीक हिसका देऊन ती घरात निघुन गेली.
गुलाबाचा सुगंध घेत रघ्या बराच वेळ ऊभा राहीला. देठावर ऊठलेले चापाचे वळ त्याला मनोमन सुखावत गेले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कधी कधी पंधरा पंधरा दिवस काम नसायचं. मग असं खोलीत एकटं दुकटं पडुन राहावं लागायचं. त्या दिवशी कंटाळा आला म्हणुन स्टेशनवर गेलो. आगगाड्या बघायला बरं वाटायचं. टापटीप साडी नेसलेली कमली गेटच्या आत येताना दिसली आन जीव कावराबावरा झाला. माझ्या समोरनं गेली पण बघितलंसुद्धा नाही. मागनं दिप्या येताना दिसला. मी तोंड फिरवुन सरळ चालत गेलो. रुळावरुन चालत चालत सरळ खोलीवर आलो. माचीस काढुन बिडी पेटवली. साला त्या चाफ्याच्या झाडांना आता फुलं लागली असतील. झाड पार आकाशी गेलं आसल. भिंतीला टेकुन मनात विचारांचं काहुर दाटलं. त्यादिवशी मी भरपुर बिड्या ओढल्या. पार फुफ्फुसं जळोस्तर.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

शिव कन्या's picture

7 Nov 2015 - 11:40 pm | शिव कन्या

चाफ्याचे झाड..... खानोलकर आठवले.
आर्तता=चाफा.
असो.अवांतर झालं हे!
कथा हेलकावे देते.
थोडक्यात जमवलंय सगळं. छान.

एक एकटा एकटाच's picture

7 Nov 2015 - 11:47 pm | एक एकटा एकटाच

चांगलीय

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 11:53 pm | टवाळ कार्टा

मस्तय....बस, ट्रेन चा नियम लक्षात ठेवावा

उगा काहितरीच's picture

8 Nov 2015 - 1:15 am | उगा काहितरीच

"जव्हेरगंज" टच वाटला नाही !

दमामि's picture

8 Nov 2015 - 9:16 am | दमामि

सहमत

बाबा योगिराज's picture

8 Nov 2015 - 8:50 am | बाबा योगिराज

ऊगा भौ शी सहमत...

किसन शिंदे's picture

8 Nov 2015 - 9:10 am | किसन शिंदे

सहमत. तुमचा स्पेशल 'टच' जाणवला नाही.

संदीप डांगे's picture

8 Nov 2015 - 1:46 pm | संदीप डांगे

चांगली आहे. नवीनही काही करुन बघावं...

व्वा मस्त लिहीलय.आवडल. पण दुसर्यांदा वाचल्यावर समजल