गढीवरची दिवाळी

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 8:56 pm

.
.
या दिवाळीला शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घ्यायचे. जाताना हिंगोलीच्या आत्याच्या घरून जायचे ठरले, तेव्हापासून मनाला एक अनामिक हुरहुर लागून राहिलीय. का होतंय असं? पंचवीस-तीस वर्षे उलटली असतील आता, अजूनही कालच आत्याच्या घरून परल्यासारखे वाटतेय. चिमुकल्या रेल्वेस्थानकावर उतरून बैलगाडीतून धक्के खात मी आत्याच्या बोराळ्याच्या गढीत केव्हाच पोहोचलेय.

कालच सहामाही परीक्षा संपली. "या वर्षी दिवाळी नांदेडलाच करा पोरांनो.." भाऊंनी सांगितले, तसे रडू येऊ लागले. दर वर्षी बोराळ्याला दिवाळी साजरी व्हायची, तरी या वर्षी जायचे नाही म्हटल्यावर भोकाड पसरणेच बाकी होते. माझा रागरंग बघून "रडू नको बाई, जा आत्याकडे" असे म्हणत भाऊंनी परवानगी देताच आमची कळी खुलली. शिवूदादाबरोबर केव्हाच बोराळ्यात पोहोचले मी.

पहिला मुक्काम हिंगोलीला. मंगळवारातील दोन खणी घरात मोठ्या आतेबहिणी आणि भावांबरोबर दोन-तीन दिवस भुर्रकन उडून गेले. गावाकडे कोणाची गाडी जाणार आहे याची चौकशी दरम्यानच्या काळात मामा करत होते. आत्यालाही गावी पोहोचण्याची घाई झालेली असल्याने तिने शेवटी "रेल्वेस्टेशनवर आपलीच गाडी मागवून घ्या. मी पोरांना घेऊन पुढे होते" असे सांगितल्याने बोराळ्याची प्रतीक्षा थोडी कमी झाली. सकाळचीच गाडी असल्याने भल्या पहाटे उठून दशम्या बांधून घेतल्या. रेल्वेत बसून एक-दीड तासाच्या अंतरावरील चिमुकल्या स्टेशनावर उतरलो. डमनी तयार होतीच. (बैलगाडीला वरून छत तयार केलेले असते. जुन्या काळी वाड्यावरच्या महिला या डमनीतून जात असत.) गड्याने बैल जोडले. बाजूच्या घाणेरीची फुले तोडत, अंगावर येणारे झाडांचे फाटे बाजूला करत डमनीत सतत आदळणारे अंग सावरत तीन तासांचा बैलगाडीचा प्रवास सुरू झाला.

राने हिरवाईने नटली होती. गव्हाची पेरणी झाल्याने हिरवे गालिचे डोलत होते. गावच्या मंदिरातून मध्येच घंटानाद कानावर पडत होते. उन्हे उतरू लागली, तशी "जरा वेगाने घे रे बाबा, रात्रीच्या आत पोहोचू दे घरी." आत्याने गड्याला सूचना केली. तिची कळकळ जणू बैलांनाही कळली. त्यांनी आपला वेग वाढवला, त्यांना हाकारा देण्याची गड्याला गरजच पडली नाही. दुरून गढीवरचे पलेते दिसू लागले, तसा आत्याच्या चेहर्‍यावरच्या चिंतेच्या रेषा हलल्या. तिने गाडीतूनच दिव्याला हात जोडले. बरोबर चार पोरी आणि पंधरा-सोळा वर्षाचा पोरगा होता. अंधार पडायच्या आत घरी जाऊन पडलेले बरे, तिच्या चेहर्‍यावरची चिंता थोडी कमी झाली.

अंधाराबरोबरच गढीवर थंडीही उतरली. दोन बैलगाड्या एकाच वेळी आत जातील अशा दरवाजातून आमची डमनी गढीत पोहोचली, तशी खाली राहणार्‍या बिर्‍हाडातले कुटुंब धावत आले. "आल्या का बाई, अंधार पडला यायला" म्हणत त्या बिर्‍हाडातल्या बाईने आत्याचे स्वागत केले. तोपर्यंत वरच्या मजल्यावरून कंदील हातात घेऊन किसना गडी धावत आला. अरे किसना म्हातारा होतोय की.. अंधूक प्रकाशातही त्याच्या चेहर्‍यावरचे जाळे स्पष्ट दिसले. प्रत्येक सुटीत मायेने आमचे करणारा हा किसना आत्याचाही भलता लाडका. त्याच्या हातातल्या कंदिलाच्या प्रकाशात गढीच्या दगडी पायर्‍या चढून ओसरीत पोहोचलो. डोळ्यात झोप दाटली होती. चुलीत लाकडे सरकवत आत्याने गरम गरम भाकरी करून वाढली. पोटभर दूध भाकरी खाऊन झोपेच्या अधीन झालो.

मधल्या घरातल्या खिडकीतून उन्हाची तिरीप डोळ्यावर आली. डोळे किलकिले करून पाहिले, तेव्हा नऊवारी नेसलेली, सुस्नात, कपाळावर लालभडक मोठे कुंकू, हातात गायीच्या दुधाचा लोटा घेतलेली प्रसन्न चेहर्‍याची आत्या समोर आली. "झाली का ग झोप? ऊठ बाई आता." तिच्या प्रेमळ हाकेने झोप उडाली. धावतच अंगणात आले. समोरच्या डोंगरावरील देवीच्या मंदिरातील कळस उन्हात चमकताना बघायचा होता खरा, पण सकाळच्या धुक्याने कळस अजूनही वेढलेला होता.
"बाई, तोंड धुवून घ्या, मालकीन बाईने दूध ठेवलंया" म्हणत किसना राखुंडी घेऊन आला. आधणातील तांब्याभर पाणी त्याने तोंड धुवायला काढून दिले. आता खरी सुटी सुरू झाली होती. दिवाळी तीनचार दिवसांवर आल्याने फराळाची तयारी सुरू झाली. खेडेगाव असल्याने गावात विजेचा पत्ता नाही. संध्याकाळ झाली की कंदील चिमण्याची काच स्वच्छ करून, त्यात रॉकेल भरून गडी प्रत्येक खोलीत एक कंदील किंवा दिवा नेऊन ठेवत. दळण आणायलाही पाचसहा किलोमीटरच्या दुसर्‍या गावी जावे लागे. सकाळीच चार पायल्या दळण घेऊन आत्याने गड्याला पिटाळले. रवा, सपीट काढण्यासाठी भिंतीला उभे केलेले जाते तिने आडवे केले, तसे मी मागच्या बुरजावर धावले. कस्तुरीबाई, कस्तुरीबाईच्या हाकांचा सपाटा लावला. कपाळभर कुंकू, हातात भरमसाठ बांगड्या आणि हिरवेकंच लुगडे नेसलेली कस्तुरी गढीच्या मागच्या बुरजाच्या खालीच राहायची. जात्यावरचे दळण करायचे तर कस्तुरीनेच. म्हटले तर आत्याची ती सखी, म्हटले तर घरची सगळी कामे करणारी बाई. त्या गढीवरचीच एक सदस्य.

आतेभावंडे सगळी मोठी, त्यांनी लाड करावेत आणि मी करून घ्यावेत. मोठी आक्का, तिच्या पाठची मिनू आणि सोनूताई, शेंडेफळ संजूदादा. माझा सगळ्या आवडता शिवूदादा. आपल्यातच राहणारा. काहीसा तापट, खोड्या काढणारा आणि त्यापेक्षाही जास्त लाड करणारा. मोठ्या पदव्या घेऊन आला, तरी मातीत रमणारा, लहानांना जपणारा, सकाळी बैलगाडीतून आमची शेताची चक्कर ठरलेली. मळ्यातल्या पन्नास फूट खोल विहिरीत त्याने मारलेली उडी मनात धडकी भरवायची. तो मात्र आपल्याच मस्तीत, त्याचा तो स्वभाव त्याच्या प्आणखी रेमात पाडायचा. आकाशकंदील बनवायचा तर तो त्याच्यासोबत, बुरजावरच्या कोरांटीची फुले काढून द्यावीत तर त्यानेच, मागच्या विहिरीतले पाणी रहाटाने काढावे तर त्याच्या देखरेखीखाली. दिवस त्याच्या भोवती भोवती करण्यात कसा सरला कळलेच नाही.

फराळ तयार करताना माझी लुडबूड सुरू झाली, तशी आत्याने "जा गं, तेल काढून आण" म्हणत पिटाळले. माळवदात ठेवलेल्या तेलाच्या ड्रममधून बाटलीचा पोहरा करून तिला करडीचे तेल काढून देताना गंमत वाटत होती. कोपराभर बांगड्या भरलेले आत्याचे हात सरावाने सगळी कामे करत होती. पण गढीवरून दिसणार्‍या दूरवरच्या वाटेवर आज सकाळपासूनच तिचे डोळे लागले होते. शाळेची कामे संपवून मामा आज गावी येणार होते. त्यांना घ्यायला बैलगाडी सकाळीच रवाना झाली होती. मामा येणार म्हणून माझ्या मनात मात्र धाकधूक सुरू झालेली. पांढरेशुभ्र धोतर, अंगात सदरा, उंचपुरे गोरेपान. मितभाषी असले तरी उगीचच त्यांचा धाक वाटायचा. बोलण्यापेक्षा त्यांचे लाड कृतीतून व्यक्त व्हायचे. दिवाळीचे विशिष्ट सामान ते तालुक्याच्या ठिकाणाहून घेऊन आले. त्यात दोन वस्तू खास माझ्यासाठी होत्या. छानसा फ्रॉक आणि खूप सारे फटाके.

रात्रीची जेवणे होताच पिशव्यांची बांधलेली तोंडे सुटली. "पुड्यावरचा दोरा गुंडाळ गं" म्हणत आत्याने माझ्याकडे दोर्‍याचा गुंडा सरकवला. माझे लक्ष मात्र सगळे फटाके आणि नव्या फ्रॉककडे. सामानाची एक एक पुडी सुटत होती. दोरा गुंडाळला जात होता. मध्येच उटण्याच्या पुडीचा वास आला. त्यापाठोपाठ मोती साबणाची वडी आणि उदबत्तीचा मंद सुगंध दरवळला. सुगंधी तेलाची बाटली जपून बांधून आणलेली. अभ्यंगस्नानाची जय्यत तयारी झाली होती. सगळ्यात शेवटी प्लास्टिकच्या पिशवीतील फ्रॉक आत्याने बाहेर काढला, तसे माझे डोळे लकाकले. फ्रील फ्रीलचा तो फ्रॉक मनात भरला. सोबत फटाके होते. दोन्ही पिशव्या माझ्या हातात देत "घे तुझी दिवाळी" म्हणत संजूदादाने चिडवले, तशी मी "बघ ना गं आत्या" म्हणत भोकाड पसरले. पुढचा अर्धा तास माझी समजूत काढण्यात गेला.

भल्या पहाटेपासून आज मोठ्या हंड्याखाली जाळ धडाडून पेटला होता. सारवलेल्या जमिनीवर रांगोळीची शुभ्र महिरप, ओवाळणीचे तबक, उटणे, सुगंधी तेलाचा नुसता घमघमाट, सुगंध घेऊन दिवाळी आली होती. सगळ्यांच्या आधी न्हाणे आटोपून आत्या एकेकाला उठवत होती. मोठ्या बहिणींच्याही आंघोळी आटोपल्या होत्या. आक्काकडे माझ्या आंघोळीची जबाबदारी. डोक्याला चपचपीत तेल चोपडण्यात आले. पितळेच्या तांब्यांत उकळलेली शिकेकाई घेऊन आक्का आली. थंडी मी म्हणत होती. हंड्यातले पाणी घंगाळात घेत तिने चोळून चोळून स्नान घातले. तिच्या प्रेमात शिकेकाई-उटण्याचा सुगंधही मिसळून गेला. फराळावर ताव मारून नवा फ्रीलवाला फ्रॉक घालायचा, नंतर दर वर्षीची मळ्यातली चक्कर मारायला निघालो. मळ्यातल्या विहिरीत डोकावून बघणार्‍या पांढर्‍याशुभ्र चाफ्याची फुले वेचून शिवार फेरी मारली. गावच्या मारुतीचे दर्शन घेऊन उन्हे डोक्यावर चढायच्या आत घर गाठाले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सारा गाव आत्याच्या आणि मामांच्या पाया पडण्यासाठी आला होता. गावातल्याच कुंभाराने तयार केलेल्या पणत्यांच्या उजेडात एकेकाचा चेहरा वाचण्याचा माझा छंद सुरूच होता. पाडव्याला गावातील गायी-म्हशींची मिरवणूक निघाली. गावातील मारुतीला प्रदक्षिणा घालून मिरवणूक विसर्जित झाली. पुरवून पुरवून फोडलेले फटाके संपत आले की दिवाळीही संपत आल्याची जाणीव व्हायला लागली होती. आज भाऊबीज. दोघा भावांना ओवळले, त्यांनी टाकलेल्या छोट्याशा ओवाळणीतही खूश झाले. माझी गढीवरची दिवाळी साजरी झाली होती.

"आई, कुठेय तुझे लक्ष? चकली जळली ना तुझी.." मुलाने हाक मारली, तशी भानावर आले. तीस वर्षांपूर्वीच्या दिवाळीत हरवलेली मी आजच्या जगात पोहोचले, तेव्हाही मनाची हुरहुर कमी झाली नव्हती. शिवूदादा चटका लावून निघून गेला, तसा गढीवरच्या दिवाळीचा प्रकाशोत्सव काहीसा झाकोळला. त्याचीही हुरहुर होती की मुलाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षा दिवाळीनंतर दोनच दिवसांनी आल्याने, आतेघरमार्गे होणारा शेगावचा प्रवास ऐनवेळी रद्द करावा लागला होता. त्याची हा मानसिक एवढा वाढला की तो चिडचिडीच्या रूपाने बाहेर पडलाच. लॅपटॉपमध्ये डोके खुपसून बसलेल्या मुलांवर अभ्यंगस्नाला उशीर होतोय म्हणून चिडले. तो फेसबूकवरून दिवाळीच्या शुभेच्छा पोस्ट करण्यात मग्न होता. नकळत त्याच्या-माझ्या लहानपणाची तुलना केली. ज्या गढीने आणि तिच्यात राहणार्‍या माणसांनी माझे बालपण समृद्ध केले, त्यांची कहाणी मुलाला सांगण्याचे ठरवले खरे; पण त्याने "आई, असे कुठे प्रत्यक्षात घडते काय?" म्हणत मलाच उडवून लावले. मी मात्र माझ्या गढीवरच्या दिवाळीत अजूनही गुंतून पडले होते. तेथे विणलेल्या नात्याच्या संस्कारांच्या गोफाचा एक पदर आत्याचीच नात माझी वहिनी होऊन घरात आली, तेव्हा पुन्हा जोडला गेला. याच पदराला धरून नवा गोफ विणण्याचा प्रयत्न आमची पिढी करू पाहत आहे. तिला गढीवरच्या समृद्ध दिवाळीची सर येणार नाही कदाचित, परंतु त्या गोफाचा पदर सुटू दिला नाही, याचे समाधान तर नक्कीच असेल.
.

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

10 Nov 2015 - 4:17 pm | अन्या दातार

छान स्मरणरंजन. लेखनशैलीमुळे अत्यंत वाचनीय झाला आहे.

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 12:03 am | बोका-ए-आझम

असं गाव आणि दिवाळी ज्यांना अनुभवता आली ते भाग्यवान.

खुप सुंदर आठवणीचा लेख. छोटी गढी,बैलगाडीतून प्रवास,छोटे किर्लोस्करवाडी सारखे रेल्वे स्थानक, मोठी विहीर , डोळ्या समोर सर्व काही ऊभे राहिले. काळ पुढे जातो आहे, घटना क्रम बदलता आहेत याची मनाल पुर्ण कल्पना असते,मात्र कोडगे मन भूतकाळातून परत यायला तयार नसते. आहो ताई ,हे कालचक्र आसेच चालायचे

खुप सुंदर आठवणीचा लेख. छोटी गढी,बैलगाडीतून प्रवास,छोटे किर्लोस्करवाडी सारखे रेल्वे स्थानक, मोठी विहीर , डोळ्या समोर सर्व काही ऊभे राहिले. काळ पुढे जातो आहे, घटना क्रम बदलता आहेत याची मनाल पुर्ण कल्पना असते,मात्र कोडगे मन भूतकाळातून परत यायला तयार नसते. आहो ताई ,हे कालचक्र आसेच चालायचे

स्वाती दिनेश's picture

11 Nov 2015 - 11:40 pm | स्वाती दिनेश

गढीवरची दिवाळी आवडली,
स्वाती

मितान's picture

12 Nov 2015 - 9:46 am | मितान

हे सगळंच खूप खूप ओळखीचं..अनुभवलेलं आहे.
तुमचे लेखन माहेरी,आजोळी घेऊन गेले. लहानपणची दिवाळी लख्ख समोर उभी राहिली.
भावुक झाले.
धन्यवाद !

मुक्त विहारि's picture

15 Nov 2015 - 12:08 pm | मुक्त विहारि

"पुरवून पुरवून फोडलेले फटाके संपत आले की दिवाळीही संपत आल्याची जाणीव व्हायला लागली होती. "

अगदी....अगदी...

पैसा's picture

15 Nov 2015 - 12:19 pm | पैसा

एकदम नॉस्टॅल्जिक केलंत! लहान असताना ते टोपलीभर फटाके आणि दिवाळी कितीतरी दिवस चालू आहे असं वाटायचं. हळूहळू ती मजा हरवत गेली. आता माझ्या मुलांनी तर फटाके आणणं कधीच बंद केलंय. प्रदूषणमुक्त दिवाळी हे खरंच. पण तरीही आठवण यायची ती येतेच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2015 - 1:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

खुपच मस्त आठवणी!

एस's picture

15 Nov 2015 - 2:13 pm | एस

खूप छान लेख!

(शेवटच्या परिच्छेदातली मधली एकदोन वाक्ये गाळली गेलीत असे वाटले.)

मित्रहो's picture

15 Nov 2015 - 6:00 pm | मित्रहो

जुन्या आठवणींना उजाळा दिला. परत त्या आठवणी जाग्या केल्या.
आपली लेखनशैली आवडली.

नूतन सावंत's picture

15 Nov 2015 - 7:49 pm | नूतन सावंत

मामं,आत्यांकडे लाडाच्या दिवाळ्या अनुभवायला मिळालेल्या भाग्यवान लोकांपैकी मीही एक आहे.पार लहान करून सोडलंस.