रेट्रो कांदेपोहे

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 6:07 pm

ढिसक्लेमर : ( खालील लेखाचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी लेख १९१३च्या एखाद्या मराठी चित्रपटाची नायिका ही आपल्या फ़्लशबॅकमध्ये जाऊन सांगत आहे अशा टोन मध्ये वाचा. )

सन १९९९ जानेवारी. नुकतेच ऑक्टोबर मध्ये १८ पूर्ण केले होते आणि अचानक घरामध्ये आमच्या शुभमंगलाचे वारे वाहू लागले आणि आम्ही सावधान झालो. अरे माझे वय काय आणि एवढ्यातच मला ही काळ्यापाण्याची शिक्षा? पण तेव्हा वडीलधाऱ्याचा नजरेचा धाकच असा की हे विचार वादळासारखे मनात घुमत राहायचे. पण विचार जरी मनात घुमत असले तरी वयानुसार मनात स्वप्नांचे वसंत फुलतच होते आणि त्या वसंत बहरातून आमच्या मनीच्या राजकुमाराचा धुसरसा का होईना एक चेहरा अस्पष्ट दिसू लागायचा. मनात काजवे चमकायचे आणि मन हे प्रेम प्रकाशाच्या त्या इवलुश्या तेजाने ही उजळून जायचे.

असेच मग एकेदिवशी तो दिवस उजाडला आणि आम्हास पहावयास "ते" आले. पण आता जरी या आठवणी उजळताना असलेली मी १९१३ मधल्या असलेल्या नायिकेसारखी भासत असली तरी तेव्हाची मी ही आजच्या मुलींसारखीच होती. आईने नेसवलेली साडी आणि मामीने बनवलेले चहा- पोहे असे उसने स्वरूप घेऊन मी माझ्या पहिल्या कांदेपोहेला सामोरी गेले. समोरचे "ते" आणि मी कशा कशात ही आमची रंगसंगती बसत नव्हती. त्यामुळे पाहताक्षणीच कदाचित एकमेकांनी नजरेतूनच एकमेकांना नकार दिला होता पण सर्वांसमोर असे एकदम बोलून जाणे शोभले नसते म्हणून उगाच प्रश्नावली चालू केली. मग तुम्ही काय करता आणि शाळा किती शिकली हे सगळे सोपस्कार पार पडले. ( अवांतर: दोन लोकांच्या लग्नामध्ये शाळा किती शिकली याचे काय देणे घेणे असते बुवा? विचारणार्‍यांनी … बाई ग, तू किती शिकलीस असे नाही का विचारता येत. असो) . पण मग या नंतरच कदाचित बोलण्यातुन आम्ही उमगत गेलो, कारण बोलताना मनास भावला तो त्यांचा मिश्किल स्वभाव आणि बस मनी ठरवले कि "हाच" तो राजकुमार. कारण माझी पहिली अट माझ्या स्वतःशी हीच होती कि मुलगा गरीब असला तरी चालेल पण मनमिळावू हवा. पाहुणे गेल्यानंतर सगळ्यांच्या माझ्याकडे वळलेल्या माना अवघडतील कि काय याची भीती वाटूनच कि मी लगेच माझा होकार कळवला. पण अजून समोरून होकार येणे बाकी होते. दोन दिवसात तिथूनही होकार आला आणि मला कळवण्यात आले. सर्वांसमोर जरी शांत असल्याचे भासवत असले तरी मनोमंदिरात मात्र साडीचे एक टोक हातात घेत लाजत चेहरा ओंजळीत लपवत हळूच हात खाली घेत नजरेचे विभ्रम करीत लाजले. तेव्हाचे माझ्या आईचे कामाचे ठिकाण आणि माझे होणारे सासर हे जवळ असल्याने आईबरोबर होणाऱ्या नेहमीच्या भेटीमुळे दोन्ही कुटुंबाचे संबध फुलले जात होते. मग असेच एके दिवशी आमचे "ते " रविवारी घरी येणार आहेत असे कळले. तेव्हा काही आता सारखे भ्रमणध्वनी नव्हते. दूरध्वनी होते पण ते काही सगळ्याकडे नसायचे. चाळीत एखाद्याकडे असायचा आणि त्यावर सगळ्या चाळकराचे निरोप यायचे. तसाच आमचा हि निरोप आला. यांना पाहायला मिळणार, थोडे फार बोलणे होणार याने आमचे मनमयूर मनातच नाचू लागले.

पहिल्यांदा हे घरी येणार, घर साफ करायला हवे, कोणता ड्रेस घालावा, काय बोलावे याची उजळणी होऊ लागली मनामध्ये. हे सगळे जरी असले तरी आता बऱ्यापैकी जेवण बनवणारी मी, तेव्हा फक्त एक- दोन वेळाच मॅगी, भात आणि पाण्यासारखा लागणारा चहा करण्याएवढेच स्वयंपाक कौशल्य होते आमच्यात. आई तेव्हा कामावर जायची, बाबाही दुपारचे निघायचे, आजी आत्याकडे गेली असल्याने त्यांना काय करावे खाण्यासाठी हा यक्ष प्रश्न होता. "ते" संध्याकाळी येणार होते म्हणून जेवूनच जातील असे आई म्हणाली पण आल्यानंतर चहा बरोबर पोहे करू असा बेत ठरला. आई म्हणाली मी लवकर येईन कामावरून ते येण्याचा आधी आणि गरम गरम पोहे करेन. तेव्हा मोजकेच किराणा भरायचो आम्ही. त्यामुळे पोहे, रवा हे पदार्थ पाहुणे येणार असतील त्याच दिवशी आमच्या घरचा उंबरठा चढायचे. तर आईने मला सुचना दिल्या तू दुकानातुन पोहे आणुन ठेव, कांदा मिरची कापून ठेव. मी आले का पटकन पोहे करेन. आमच्याइकडे तेव्हा एकच वाणी होता जवळ आणि रविवारी संध्याकाळी ४ नंतर तो दुकान बंद करायचा. त्यामुळे आईने दुपारीच आणुन ठेव पोहे आठवणीने ही ताकीद दिली. रविवार उजाडला. आई पण सर्व आवरून कामावर गेली. मी तिने सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले. पण या मनीचे काही स्थिर नव्हते. आपला माणूस येणार आहे त्याला आपल्या हाताने काही करून घालावे पण तेव्हा काही येत नसल्याने माझ्या होणाऱ्या इवल्युश्या मनाची तीव्र घुसमट कशी उमगेल बरे तुम्हाला. पण जेवढे होईल तेवढे आपण आईला मदत करावी जेणे करून या पदार्थाला आपला हात जास्त लागला याचे समाधान राहील म्हणुन आईने न सांगितलेली कामे ही मी केली. पोहे कधी केले नाही म्हणुनी काय झाहले करताना पाहिले तर आहेत या विश्वासावर आठवेल तसे करत गेले. पहिले पोहे काढले, निवडले, चाळले. मग आई पोहे भिजवते. हो बरोबर. पण कसे आणि किती पाणी घ्यावे हे काही आठवेना. पोहे म्हणजे भातच. खीमटीला कसा तांदूळ भिजवतो आपणही तसेच यालाही भिजत ठेवुया म्हणजे आई येईपर्यत पोहे चांगले भिजतील. मग पाव किलो पोह्याला एक लिटर पाण्यात भिजत ठेवले. आई आली का घेईल निथळून असा कयास लावला. आई आल्यावर आपल्या या अक्कल हुशारीबद्दल मिळणारी शाबाशीचे बोल आमच्या कानात तेव्हाच गुंजारव करू लागले. इकडे हे व्याप करेपर्यंतच ५ ला येणारे आमचे हे चारलाच प्रकट झाले. इश्श …. कससंच झाले. एवढ्या वेळे अगोदर कोणी येते का? पण आमचे मनी धरलेले सगळे बेत फसले जाणार हे कोणी बरे सांगावे यांना. आता "ते" आले ते आले पण एका मित्राला सोबत घेऊन आले. एकटे असते तर मी सर्व गोची सांगितलीही असती आपल्या माणसासमोर काय ते लाजावे पण त्यांच्या मित्रासमोर आपली शोभा नको म्हणून पाणी वैगेरे देऊन चहा करावयास ठेवला. इकडे मनाचे आईचा धावा करणे सुरु झाले होते. चहा झाला आणि आम्ही तो सादर केला. आता यांचे मित्र म्हणजे यांच्या सारखेच मिश्किल की (खवचट) आहेत ते त्या दिवशी कळले. रंगरूप पाहून मला विचारणा झाली " हे काय आहे?" मी ही मनातल्या मनात लग्न झाल्यावर घरी या कडूलिंबाचाच चहा देते असे म्हणत ओठांवर तेवढेच गोड हास्य आणत चहा आहे हे उत्तर देत किचन मध्ये गेले. आता तेव्हाच्या १० x १० च्या घरात दुसरीकडे जाणार तरी कुठे. किचन मध्ये जाऊन उगाच भांडी आपटत बसले. कळायला हवे न की मुलगी काम ही करते ते. नसीब माझे कि ते आले आणि ५ मिनटाच्या अंतरानी आई आली. आपटत असलेल्या भांड्यात माझा जीव आपटला. हुश्श … आता सगळे ठीक होईल. इकडे आईने परिस्थिती सांभाळत पोहे करायला घेतले आणि डोक्यावर हात आदळला पोह्याचा टोप पाहून. " अग, हे काय आहे?" मी: पोहे भिजवले आहेत म्हंटले कि तू येईस्तो भिजतील चांगले. जास्त नाही अर्धातास झाला आहे. आईचे तेव्हा क्रोधायमान झालेले डोळे आजही आठवतात मला. आजही काही स्वयंपाकविष्कार बिघडला की. पण त्यावेळी आईचा ओरडा मी प्रथमतः एवढ्या हळू आवाजात ऐकलाही. एवढे छान वाटले. कार्टे … कोणी सांगितले होते तुला हे उद्योग करायला? आता याचे पोहे कसे करू मी? आता यांच्या समोर जाऊन आणुही शकत नाही नवीन पोहे. मी: (अतिशय निरागसपणे)तसंही धर्माने आता दुकान बंद केले असेल. तेव्हा आपल्या रागावर नियंत्रण कसे आणावे याचे प्रात्यक्षिक मला आईकडून मिळाले. पण शेवटी आईच ती. सांभाळून घेतले मला तेव्हाही. भावी जावयाबरोबर गप्पागोष्टी करत आमचे एक एक उणेधुणे काढत आज तुमच्याच बायकोने पहिल्यांदा केले आहेत हो पोहे तेव्हा गोड मानुन घ्या बरे का? शिकेल हळू हळू असे काही काही बोलत पोहे त्यांच्या पोटात जाण्याआधी त्यांच्या मनाची तयारी करून घेतली. शेवटी काळी असा का गोरी असा पण होणारी बायको असा डायलाग मारत आईने त्या अती भिजवलेल्या पोह्याचा गोळ्याचा भात आमच्या यांच्या समोर सादर केला. आणि शेवटी मित्राने दीनपूर्ण दिलेल्या कटाक्षासकट आवंढे गिळत मनामध्ये तुझे अपना बनाने कि कसम इस पोहे के साथ खायी है या गाण्याचा लयीवर आमच्या यांनी ते पोहे सदृश्य भात जिरवला. किती कृतकृत्य झाले होते तेव्हा मी. पण खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात याचा प्रत्यय लग्न झाल्यानंतर आला हो. असो. अशाप्रकारे आमचे तेव्हाचे हे अनोखे पहिले रेट्रो कांदेपोहे सफळ आज या अनुभवकथना नंतर संपूर्ण झाले.

.
चित्र संकल्पना -सानिकास्वप्निल

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

16 Oct 2015 - 9:59 am | बाबा योगिराज

हा हा हा. मस्तच.
अर्धा तास भिजवलेले पोहे???
छान लिहिलाय...

सस्नेह's picture

16 Oct 2015 - 10:51 am | सस्नेह

लेख मस्त आणि चित्रही भारी !
चित्राचे श्रेय लिही गं हेमे !

अजया's picture

16 Oct 2015 - 11:40 am | अजया

खमंग लेख!

अमृत's picture

16 Oct 2015 - 11:54 am | अमृत

+१

उमा @ मिपा's picture

16 Oct 2015 - 11:59 am | उमा @ मिपा

हे हे हे :))) धम्माल धम्माल खुसखुशीत कुरकुरीत खमंग

मीता's picture

16 Oct 2015 - 12:13 pm | मीता

खमंग लिहिलंय..

जिन्गल बेल's picture

16 Oct 2015 - 12:47 pm | जिन्गल बेल

सुंदर अनुभव कथन...हसून हसून वाट लागलीये ........ :D :D :D :D :D

पिलीयन रायडर's picture

16 Oct 2015 - 1:18 pm | पिलीयन रायडर

देवा!!! अर्धा तास पाण्यात पोहे भिजवले???
मजा आली लेख वाचुन!

के.पी.'s picture

16 Oct 2015 - 1:22 pm | के.पी.

हाहा.. रेट्रो अनुभव....
मजा आली वाचताना...

स्नेहल महेश's picture

16 Oct 2015 - 1:46 pm | स्नेहल महेश

ऑफिस मध्ये एकटीच हसतेय …… आणि शेजारी विचित्र नजरेने बघत होता
फक्त अर्धा तास भिजवलेले पोहे हा हा हा हा

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 2:32 pm | कविता१९७८

मी ही एकटीच हसतीये , मस्त रीट्रे पोहे

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 3:39 pm | सानिकास्वप्निल

खुसखूशीत लेख भावनाकल्लोळ.
तुझी लेखनशैली आवडतेच, अगदी धम्माल :)

मितान's picture

26 Oct 2015 - 7:34 am | मितान

+१११ :))

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 5:07 pm | प्रीत-मोहर

हा हा हा . टिपीकल भावना स्टाईल!!!!

मधुरा देशपांडे's picture

16 Oct 2015 - 6:30 pm | मधुरा देशपांडे

कहर. लिहिण्याची शैली भावना स्टाईल एकदम.

प्रश्नलंका's picture

16 Oct 2015 - 8:08 pm | प्रश्नलंका

+१ असचं म्हणते.

स्रुजा's picture

17 Oct 2015 - 12:57 am | स्रुजा

अगदी अगदी, फार च मजा आली वाचताना.

पियुशा's picture

16 Oct 2015 - 7:09 pm | पियुशा

हेमातै रॉक्स !

लेखन आवडले. चित्रातून जास्त समजले. ;)

रातराणी's picture

17 Oct 2015 - 3:17 am | रातराणी

मस्त!

नूतन सावंत's picture

17 Oct 2015 - 10:01 am | नूतन सावंत

हहपुवा.
उमगली गो बाय,तुझ्या इवलुशा मनाची घुसमट उमगली.जेव्हा तू पोहे भिजत घातलेस तेव्हाच उमगली.
पाच मिनिटांच्या अंतरानी आई आली तेव्हा आमचापण जीव भांड्यात पडला.
चित्रही समर्पक.

तुषार काळभोर's picture

17 Oct 2015 - 12:29 pm | तुषार काळभोर

चूलीवरच्या कढईतले कांदेपोहे!

पिशी अबोली's picture

17 Oct 2015 - 12:56 pm | पिशी अबोली

अगंगंगंगं.. :-D:-D:-D:-D:-D

पैसा's picture

17 Oct 2015 - 4:30 pm | पैसा

=)) =)) =))

एस's picture

17 Oct 2015 - 6:19 pm | एस

तुम्ही फक्त अर्धातास भिजवले पोहे. मी एकदा रात्री झोपण्यापूर्वी भिजत घातले होते सकाळी लवकर उठून पोहे बनवण्यासाठी. मग सकाळी त्याचे कटलेटसदृश्य काहीतरी बनवले आणि भाव खाल्ला!

बाकी १९१३ साली कुठला मराठी चित्रपट आला होता नि त्याची मिशा काढलेली कुठली नायिका होती हे आठवण्याचा प्रयत्न करतोय. ;-) 'फ़्लशबॅक' हा शब्दही आवडला आहे! :-)

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 7:41 pm | मांत्रिक

हा हा हा! आवडले खमंग कांदापोहे!

वैदेहिश्री's picture

19 Oct 2015 - 4:14 pm | वैदेहिश्री

कांदेपोहे आवडले

आताची परिस्थिती कशी आहे? पोहे कोण करतं?

चतुरंग's picture

20 Oct 2015 - 7:22 pm | चतुरंग

भिजवलेले पोहे!! हा हा हा! =))

-(साबूदाण्याची संपूर्ण खिचडी डावासकट वर उचलू शकणारा)बल्लवरंग ;)

हाहाहाहा... फुल हेमा इष्टाईल. हेमे खुप आवडला.

अनन्न्या's picture

22 Oct 2015 - 4:20 pm | अनन्न्या

तुझा लेख म्हटल्यावर आजुबाजूला कोणी नाही असे पाहूनच वाचला.

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 9:16 pm | बोका-ए-आझम

रेट्रो कांदेपोहे हे शीर्षकच भन्नाट आहे!

स्वाती दिनेश's picture

23 Oct 2015 - 9:42 pm | स्वाती दिनेश

भन्नाट लिहिलं आहेस भावना!
स्वाती

आरोही's picture

25 Oct 2015 - 12:18 pm | आरोही

सहीच .. आवडले रेट्रो कांदेपोहे ..

मस्तं, खमंग रेट्रो कांदेपोहे. आवडले.

दीपा माने's picture

3 Nov 2015 - 7:25 am | दीपा माने

त्या वेळच्या मनोभावना अगदी तंतोतंत आठवतात हे अगदी खरे आहे.