सुपरस्पाय

अजया's picture
अजया in दिवाळी अंक
15 Oct 2015 - 8:12 am

सुपरस्पाय-बोका ए आझम

“ त्याने हेरगिरीच्या इतिहासात अतुलनीय काम केलेलं आहे” – जनरल डग्लस मॅकॉर्थर; दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रशांत महासागर क्षेत्रातल्या अमेरिकन सैन्यदलाचे प्रमुख.
“ त्याच्या हेरगिरीला तोड नाही.” – हॅरॉल्ड ‘किम’ फिल्बी; ब्रिटीश गुप्तचर संघटना एम.आय.६ मध्ये रशियाच्या के.जी.बी.ने यशस्वीरीत्या घुसवलेला दुहेरी हेर.
“ हेरगिरीच्या इतिहासातला सर्वात जबरदस्त हेर” – ईअन फ्लेमिंग; जेम्स बाँडचा जनक.
“त्याच्या हेरगिरीने जगाला वाचवलं.” – लान्स मॉरो; जगद्विख्यात इतिहासकार आणि स्तंभलेखक.
“त्याने इतिहास घडवला पण आपण दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.” – कार्ल बर्नस्टाईन; जगद्विख्यात शोधपत्रकार.
“इतिहासात फार कमी हेर असे असतील की त्यांनी मिळवलेल्या आणि पुरवलेल्या माहितीमुळे आपल्या जगाचा इतिहास संपूर्णपणे बदलून गेला. त्याचा समावेश त्या हाताच्या बोटांवर मोजता येईल अशा हेरांमध्ये होतो” – फ्रेडरिक फोर्साईथ; जगद्विख्यात कादंबरीकार.
हे सगळे दिग्गज ही अशी स्तुतीसुमनं कोणावर उधळत आहेत? कोण होता तो? त्याचं नाव रिचर्ड सॉर्ज. ईअन फ्लेमिंगच्या जेम्स बाँडच्या व्यक्तिरेखेत सॉर्जच्या वास्तविक आयुष्यातून घेतलेल्या अनेक गोष्टी आहेत. मात्र एक मोठा फरक आहे. बाँड कुठल्याही संकटात अडकला, तरी त्यातून सहीसलामत सुटतो. सॉर्जच्या बाबतीत मात्र तसं घडलं नाही. तो पकडला गेला आणि हेरगिरीच्या आरोपावरून फासावरही गेला. पण त्याने जी कामगिरी बजावली आणि त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाला आणि विशेषतः नाझी जर्मनी आणि सोव्हिएत रशिया यांच्यातल्या युद्धाला जे निर्णायक वळण मिळालं, त्यामुळे तो अजरामर झाला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
२२ जून १९४१ या दिवशी सॉर्ज टोकियोमध्ये परत आला. त्याच्या दोन आठवडे आधी तो सुट्टीवर होता आणि त्याच्या नवीन मैत्रिणीबरोबर जपानमध्ये भटकत होता. याच दिवशी मध्य युरोपियन प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेचार वाजता जर्मन फौजांनी आठ ठिकाणी रशियन सीमा ओलांडून सोव्हिएत रशियामध्ये प्रवेश केला होता आणि जगातल्या सर्वात मोठ्या आक्रमणाला सुरुवात केली होती. या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन बार्बारोसा.
जेव्हा सॉर्जने ही बातमी टोकियोच्या रस्त्यांवर वर्तमानपत्रं विकणाऱ्यांच्या तोंडून ऐकली, तेव्हा त्याचा पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. पण ही बातमी ऐकल्यावर तो तडक त्याच्या एका मित्राला भेटायला टोकियोमधल्या इंपीरियल हॉटेलमध्ये गेला आणि तिथे त्याने ज्याच्यासाठी तो कुप्रसिद्ध होता, ती गोष्ट करायला सुरुवात केली. दारूचे पेल्यावर पेले रिचवणे. आज तर तसं करायला कारणही होतं. जर्मनीने केलेलं आक्रमण.
“हिटलर हा अत्यंत xxxxx असा गुन्हेगार आहे,” तो बरळला, “खुनी आहे तो. पण तू बघ. फक्त बघत राहा तू. स्टॅलिन त्या xxxxx ला जन्माचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.” बारटेंडर, बारचा मॅनेजर आणि त्याचा मित्र – या सगळ्यांनी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही.
तिथून झोकांड्या खात तो बाहेर पडला आणि एका पे फोनवरून त्याने टोकियोमधल्या जर्मन वकिलातीत फोन केला आणि सरळ जर्मन राजदूत युजेन ओटशी बोलायला सुरुवात केली. ओट आणि सॉर्ज जुने मित्र होते. “संपलंय. सगळं संपलंय. हे युद्ध जर्मनी जिंकू शकत नाही.” ओटला त्याचं बोलणं ऐकून धक्काच बसला.
सॉर्जच्या संतापाची दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे त्याला युद्ध या गोष्टीविषयी वाटणारा तिरस्कार. तो पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्यात होता आणि जखमी झाला होता. आणि दुसरं, महत्वाचं आणि खरं कारण म्हणजे त्याने काही आठवडे आधी जर्मनी रशियावर हल्ला करणार आहे ही माहिती मॉस्कोला पाठवली होती पण रशियनांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नव्हता. टोकियोमध्ये सॉर्ज जर्मन पत्रकार आणि जर्मन वकिलातीमध्ये अर्धवेळ प्रेस ऑफिसर म्हणून काम करत होता. तो नाझी पक्षाचा सदस्यदेखील होता. प्रत्यक्षात मात्र तो रशियन सैनिकी गुप्तहेरखात्याचा (G.R.U.) एक अधिकारी होता आणि त्याने अत्यंत हुशारीने आणि शिताफीने ही माहिती मिळवली होती. पण त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नव्हता.
१ जूनच्या दिवशी त्याने रशियाला पाठवलेल्या माहितीत असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं, की जर्मनी १५ जूनपर्यंत रशियावर आक्रमण करण्याची शक्यता आहे आणि टोकियोमधला जर्मन राजदूत युजेन ओट याच्यासाठी लेफ्टनंट कर्नल शोल याने आणलेल्या संदेशावरून हा अंदाज बांधण्यात येत आहे. रशियन अधिकाऱ्यांनी ही माहिती केराच्या टोपलीत टाकली. त्याच्या आधीही त्याने असाच एक संदेश पाठवला होता आणि रशियन सर्वसत्ताधीश स्टॅलिनने ‘ जपानमध्ये काही कारखाने आणि कुंटणखाने चालवणाऱ्या एका फालतू माणसाकडून आलेला संदेश ’ म्हणून तोही केराच्या टोपलीत फेकून दिला होता.
पण त्याचं जर्मन आक्रमणाबद्दल केलेलं भाकीत अचूक ठरल्यावर त्याचा भाव एकदम वधारला. त्याने पाठवलेल्या माहितीच्या आधारेच रशियन सैन्याने आपली व्यूहरचना केली आणि मॉस्कोच्या दरवाज्यांवर धडका मारणाऱ्या जर्मन सैन्याला थोपवून धरलं.
.
रिचर्ड सॉर्ज
अशा या रिचर्ड सॉर्जच्या आयुष्याची कहाणी अत्यंत नाट्यमय होती. त्याचा जन्म १८९५ मध्ये त्यावेळी रशियन साम्राज्याचा भाग असलेल्या अझरबैजानची राजधानी बाकू शहराच्या एका उपनगरात झाला. त्यावेळी बाकू हे तेलउद्योगामुळे भरभराटीला येऊ घातलेलं शहर होतं. रिचर्डचे वडील विल्हेल्म सॉर्ज हे त्याच व्यवसायात होते. ते जर्मन होते तर त्याची आई निना ही रशियन होती. तो तीन वर्षांचा असताना त्याचं कुटुंब बाकू सोडून जर्मनीमध्ये बर्लिनला स्थायिक झालं. वडील जर्मन आणि आई रशियन असल्यामुळे रिचर्डला दोन्हीही भाषा अस्खलित बोलता आणि लिहिता येत असत.
१९१४ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी रिचर्ड जर्मन सैन्यात भरती झाला. ते पहिल्या महायुद्धाचे दिवस होते. त्याची नेमणूक पश्चिम आघाडीवर झाली. तिथल्या एका लढाईमध्ये बॉम्बचा तुकडे पायात घुसून जखमी झाल्यामुळे त्याच्यासाठी युद्ध तिथेच संपुष्टात आलं. हे वर्ष होतं १९१६. या जखमांमधून त्याचा पाय कधीच पूर्णपणे बरा झाला नाही. अगदी शेवटपर्यंत तो लंगडत चालत असे.
मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याच्यावर उपचार करणाऱ्या नर्सशी त्याचं सूत जुळलं. ती आणि तिचे डॉक्टर वडील हे दोघेही छुपे पण कट्टर कम्युनिस्ट होते. त्यांनी सॉर्जला कम्युनिझमची दीक्षा दिली. युद्धाची उर्वरित वर्षे त्याने अर्थशास्त्र, राजकारण आणि मार्क्सवाद यांचा अभ्यास करण्यात घालवली आणि जेव्हा १९१८ मध्ये युद्ध संपलं तेव्हा तो स्वतः एक कट्टर कम्युनिस्ट बनला होता. अर्थात तसं म्हटलं तर त्यात स्वतः सॉर्जला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं कारण त्याचे आजोबा फ्रेडरिक अॅडॉल्फ सॉर्ज हे कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांचे जवळचे सहकारी होते आणि १८४८ मध्ये प्रकाशित झालेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोच्या लेखनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.
१९१९ मध्ये हँबुर्ग विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएच.डी. केल्यानंतर सॉर्ज जर्मन कम्युनिस्ट पक्षात दाखल झाला आणि त्याने कोळसा कामगारांमध्ये कम्युनिस्ट तत्वज्ञानाचा प्रसार करण्याचं काम करायला सुरुवात केली. त्याच वेळी त्याचं त्याच्या एका प्राध्यापकाच्या पत्नीशी प्रेमप्रकरणही सुरु झालं. तिचं नाव होतं ख्रिस्टिन गेर्लाख. तिच्या नवऱ्याला तिला घटस्फोट देण्यासाठी पटवून सॉर्जने १९२२ मध्ये तिच्याशी लग्न केलं. ते फार काळ टिकलं मात्र नाही.
इकडे त्याच्या कम्युनिस्ट तत्वज्ञानाच्या प्रसारामुळे सॉर्ज पोलिसांच्या नजरेत आला होता. त्यामुळे १९२४ मध्ये संधी मिळताच तो रशियामध्ये पळून गेला. तेव्हा रशिया अधिकृतरीत्या सोविएत युनियन झाला होता आणि इतर देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती घडवणं हे सोविएत राजवटीचं एक प्रमुख ध्येय होतं. त्याच्यासाठी स्टॅलिनने पुढाकार घेऊन कम्युनिस्ट इंटरनॅशनल किंवा कॉमिंटर्न ही संघटना स्थापन केलेली होती. सॉर्जने त्याच्याचसाठी काम करायला सुरुवात केली. इतर देशांमधल्या कम्युनिस्ट पक्षांशी संबंध प्रस्थापित करणे आणि तिथे क्रांतीची शक्यता कितपत आहे याची चाचपणी करणे हे त्याच्या कामाचं स्वरूप होतं. त्याच संदर्भात १९२९ मध्ये तो रशियन सैनिकी गुप्तचर विभागात (G.R.U.) मध्ये दाखल झाला आणि त्याच्या हेरगिरीच्या कारकीर्दीला सुरुवात झाली.
सॉर्जवर सोपवण्यात आलेली सर्वात पहिली कामगिरी म्हणजे ब्रिटनमधल्या लेबर किंवा मजूर पक्षाबद्दल आणि कम्युनिस्ट पक्षाबद्दल मॉस्कोला अहवाल पाठवणे. त्याला राजकारणापासून अलिप्त राहण्याच्या आणि कुठल्याही परिस्थितीत स्वतःची खरी ओळख न देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
१९२९ च्या नोव्हेंबरमध्ये सॉर्जला जर्मनीला पाठवण्यात आलं. ही कामगिरी थोडी अधिक गुंतागुंतीची होती. एक महिन्यापूर्वीच, ऑक्टोबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये वॉल स्ट्रीट कोसळला होता आणि जागतिक महामंदीला सुरुवात झाली होती. पहिल्या महायुद्धाची खंडणी भरून आधीच मेटाकुटीला आलेल्या जर्मनीची अर्थव्यवस्था हा आघात सहन करू शकणार नाही आणि त्यामुळे तिकडे क्रांती होण्याची शक्यता आहे असं रशियामधल्या अनेक कम्युनिस्ट नेत्यांचं मत होतं, पण त्यात अडसर एकच होता, तो म्हणजे वेगाने उदयाला येत असलेला आणि अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालेला नाझी पक्ष. सॉर्ज जर्मनीत येऊन चक्क नाझी पक्षात सामील झाला आणि त्याने नाझी पक्षाच्या शेतीविषयक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून नोकरीदेखील मिळवली. त्याला कुठल्याही डाव्या विचारांच्या माणसापासून आणि संस्थेपासून दूर राहण्याची सूचना देण्यात आली होती.
पुढच्याच वर्षी – १९३० मध्ये सॉर्जच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याला फ्रँकफुर्टर झायटुंग नावाच्या एका वर्तमानपत्राने चीनमध्ये पाठवलं. त्याच्या रशियन वरिष्ठांनीही आडकाठी घेतली नाही. इथे त्याला जे लोक भेटले, त्यांचं आणि सॉर्जचं स्वतःचं आयुष्यही आता आमूलाग्र बदलणार होतं. हे लोक म्हणजे जर्मन एजंट उर्सुला कुचिन्स्की, अमेरिकन पत्रकार अॅग्नेस स्मेडली, जर्मन रेडिओ तंत्रज्ञ मॅक्स क्लाउसेन, जपानी पत्रकार होत्सुमी ओझाकी, हानाको इशी आणि एकातेरीना उर्फ कात्या मॅक्सिमोव्हा. यातल्या कुचिन्स्की, इशी आणि मॅक्सिमोव्हा यांच्याबरोबर त्याची प्रेमप्रकरणं झाली. मॅक्सिमोव्हा आणि त्याने लग्नही केलं होतं.

चीनमध्ये पत्रकारिता करताना सॉर्जला शेतीतज्ञ म्हणून लोक ओळखायला लागले होते. त्यामुळे त्याला ठिकठिकाणाहून भाषणांसाठी आमंत्रणं येत असत. त्याचा फायदा घेऊन त्याने तीन वर्षांत संपूर्ण चीन पालथा घातला आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांबरोबर नियमित संपर्क ठेवला. पण त्याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली, ती म्हणजे चीन-जपान युद्ध. १९३१-३२ मध्ये जपानने चीनच्या मांचुरिया प्रांतावर हल्ला चढवला. रशियाचा पूर्वेकडचा, सैबेरिया या नावाने प्रसिध्द असलेला भाग हा वांशिक दृष्ट्या चीन आणि जपान यांना जास्त जवळचा होता. शिवाय तिथून हजारो मैल दूर असलेल्या मॉस्कोचे हुकुम आपण का पाळायचे असा प्रश्न तिथल्या जनतेला पडला होताच. त्यामुळे तिथे हळूहळू असंतोष वाढायला लागला होता. सैबेरियासारखा खनिजसंपत्तीने समृद्ध प्रदेश हातातून जाणं स्टॅलिनला परवडणारं नव्हतं. मांचुरिया रशियन सरहद्दीच्या अगदी जवळ असल्यामुळे जपान अतिपूर्वेकडील रशियन ठाण्यांवरही हल्ला करेल किंवा मग तिथल्या जनतेला उठाव करायची फूस देईल अशी शक्यता सोविएत नेत्यांना, विशेषतः स्टॅलिनला स्वतःला वाटत होती. त्यामुळे सॉर्जला मॉस्कोला परत बोलावण्यात आलं आणि जपानला जायचा आदेश देण्यात आला.
जपानी हेरखात्याला संशय येऊ नये म्हणून सॉर्ज सरळ जपानला न जाता आधी जर्मनीला गेला. तिथे गेल्यावर अत्यंत निष्ठावंत नाझी असल्याचं भासवण्यासाठी त्याने नाझी प्रचारवाङ्मय अगदी अथपासून इतिपर्यंत वाचून काढलं. हिटलरचं माईन काम्फ तर त्याला जवळजवळ तोंडपाठ होतं. त्यामुळे नाझी अधिकाऱ्यांबरोबर त्याची उठबस वाढली. त्याची आपल्या कामावरची निष्ठा इतकी जबरदस्त होती की प्रत्यक्षात मद्यपानाचा छंद असूनही जर्मनीत असताना त्याने एका थेंबालाही स्पर्श केला नव्हता.
एव्हाना १९३३ हे वर्ष उजाडलं होतं आणि त्याच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर झाला होता. नाझी पक्षाचं स्वप्न पूर्ण झालं होतं. जपानची साम्राज्यकांक्षा आणि वांशिक अस्मिता नाझी विचारसरणीशी बऱ्यापैकी मिळतीजुळती असल्याचं हिटलरचं स्वतःचं मत होतं, त्यामुळे जपानशी मैत्री करायला जर्मन नेते उत्सुक होतेच. त्याच अनुषंगाने टोकियोमधल्या जर्मन वकिलातीमध्ये लष्करी प्रतिनिधी (Military Attache) म्हणून कर्नल युजेन ओट या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.

इकडे सॉर्जला चार जर्मन वर्तमानपत्रं आणि नियतकालिकांकडून त्यांचा विशेष प्रतिनिधी म्हणून जपानमधून वार्तांकन करण्याची ऑफर मिळाली. पण जर्मनीमधून सॉर्ज लगेचच जपानला गेला नाही. तो अमेरिकेला गेला आणि सान फ्रान्सिस्कोवरून त्याने जपानला प्रयाण केलं.
६ सप्टेंबर १९३३ या दिवशी सॉर्जने जपानच्या योकोहामा बंदरातून जपानमध्ये प्रवेश केला आणि तिथून तो टोकियोला गेला आणि त्याने आपल्या कामाला सुरुवात केली. त्याच्या लेखांमुळे तिथल्या राजनैतिक वर्तुळात तो लोकप्रियही झाला. तिथल्या नाझी पक्षाच्या शाखेमध्ये त्याचं नियमित येणंजाणं असे. त्यामुळे त्याला जर्मन वकिलातीमध्येही प्रवेश मिळाला. त्या वेळी हर्बर्ट फॉन डिर्कसेन हा जर्मनीचा जपानमधला राजदूत होता. तो अल्पावधीतच सॉर्जच्या कह्यात आला. सॉर्जची मतं आणि विश्लेषण डिर्कसेन जर्मनीला स्वतःची म्हणून पाठवत असे.
इथे टोकियोमध्ये सॉर्जने त्याचा कुणालाही संशय येऊ नये म्हणून वेगळीच युक्ती केली. नाझी नेत्यांच्या वागण्यावर आणि मूर्खपणावर तो नियमित टीका करत असे. त्याचप्रमाणे नाझींनी ज्यूंवर चालू केलेल्या अत्याचारांविरुद्धही तो बोलत असे. त्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांमध्ये त्याची विश्वासार्हता कमी होण्याऐवजी उलट वाढली. एवढ्या उघडपणे सरकारवर हा माणूस टीका करू शकतो म्हणजे तो नक्कीच सरकारच्या नजरेत महत्वाचा असला पाहिजे. शिवाय जर्मनीमध्ये दारूला स्पर्शही न करणाऱ्या सॉर्जने टोकियोमध्ये सगळी कसर भरून काढायची ठरवलं होतं. इथे जपानमध्ये मदिरा आणि मदिराक्षी यांच्या सहवासात तो इतका रमला होता की तो हेरगिरीसारखं जोखमीचं काम करत असेल, यावर कुणाचाही विश्वास बसणं शक्यच नव्हतं.
याच दरम्यान सॉर्ज आणि ओट यांची ओळख आणि मैत्री झाली आणि ओटने त्याला आपल्याबरोबर मांचुरियाच्या दौऱ्यावर यायचं आमंत्रण दिलं. या दौऱ्याचा वृत्तांत ओटने सॉर्जकडून लिहून घेतला आणि बर्लिनला पाठवला. तिथे त्याचं आणि पर्यायाने ओटचंही प्रचंड कौतुक झालं आणि त्यामुळे सॉर्ज ओटचा जपानी राजकारणावरचा अत्यंत विश्वासू सल्लागार बनला. ओटच्या घरीही त्याचं येणंजाणं वाढलं. अगदी ओट घरी नसतानाही ओटची सुंदर पत्नी हेल्माला भेटायलाही तो बिनदिक्कत जात असे. ओटला त्यांच्या संबंधांबद्दल समजलं होतं की नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाहीये. काही जणांचं मत असं आहे की हा सॉर्जचा मूर्खपणा होता आणि केवळ नशिबाने ओटला हे समजलं नाही आणि जेव्हा समजलं तेव्हा हे संबंध संपुष्टात आले होते आणि आपली कारकीर्द वाचवण्यासाठी त्याने त्याची कुठेही वाच्यता केली नाही. काही जण असंही म्हणतात की ओटला त्यांच्या संबंधांविषयी समजलं होतं पण त्याचे स्वतःचेही बाहेर संबंध होते. ते उघड होतील म्हणून त्याने या गोष्टीकडे कानाडोळा केला. शिवाय सॉर्जच्या मैत्रीमुळे त्याला फायदाही होत होता आणि सॉर्जचे आपल्या पत्नीशी संबंध आहेत या एका कारणावरून हा फायदा हातचा जाऊ द्यायला ओट तयार नव्हता.
.
युजेन ओट
हळूहळू सॉर्जने टोकियोमध्ये आपलं खरं काम सुरु केलं. त्याच्या नेटवर्कमध्ये त्याला चीनमध्ये भेटलेल्या लोकांचा समावेश होताच आणि काही जणांशी त्याने टोकियोमध्ये संपर्क साधला होता. मॅक्स क्लाउसेन त्याच्याबरोबर शांघायमध्ये होता. तो या नेटवर्कचा रेडिओ तंत्रज्ञ होता. सॉर्जचे संदेश रशियाला पाठवण्यासाठी क्लाउसेन वन टाईम पॅड्सचा वापर करत असे. अशा पद्धतीने पाठवलेले संदेश उकलणं म्हणजे जवळजवळ अशक्य गोष्ट होती. जपानी हेरखात्याला या संदेशांपैकी काही संदेश पकडण्यात यश आलं पण त्यांना संदेशांचा अर्थ किंवा ते कुठून पाठवले जात आहेत आणि कुठे जात आहेत याबद्दल काहीही समजलं नाही. मूळचा युगोस्लाव्ह असलेला ब्रँको वुकेलिक सॉर्जला टोकियोमध्ये भेटला होता. तोही पत्रकार म्हणूनच काम करत होता. तो सॉर्जने जमवलेल्या माहितीचं मायक्रोफिल्म रूपांतर करत असे. मियागी ओतोकू हाही पत्रकार होता. तो एका फ्रेंच वृत्तपत्राचा जपानमधला प्रतिनिधी म्हणून काम करत होता. क्लाउसेनची पत्नी अॅना त्यांची कागदपत्रं एका पत्त्यावरून दुसऱ्या पत्त्यावर पोहोचवत असे. क्लाउसेनने रशियन हेरखात्याकडून आलेले पैसे वापरून फोटोकॉपी मशीन्स विकण्याचा व्यवसायही सुरु केला होता आणि तो भरभराटीला आल्यावर त्याच्यातून मिळणारे पैसे हेरगिरीसाठी वापरले जात होते.
पण सॉर्जच्या पाठोपाठ त्याच्या संपूर्ण नेटवर्कमध्ये सर्वात महत्वाचा माणूस होता जपानी पत्रकार होत्सुमी ओझाकी. त्याची आणि सॉर्जची भेट शांघायमध्ये झाली होती. ओझाकी तेव्हा असाही शिम्बून या विख्यात जपानी दैनिक वर्तमानपत्रासाठी काम करत होता. आता जपानमध्ये परत आल्यावर तो त्याच्या एका मित्राच्या मदतीने जपानचा पंतप्रधान प्रिन्स फुमिमोरो कोनोये याचा सल्लागार बनला होता आणि त्यामुळे त्याचं ऑफिस हे पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानामध्येच होतं. तिथे असलेल्या अनेक गुप्त आणि महत्वाच्या कागदपत्रांमधली माहिती ओझाकी सॉर्जला पुरवत होता आणि तिथून ती माहिती खऱ्या स्वरूपात रशियामध्ये आणि बऱ्यापैकी मालमसाला घालून ओटपर्यंत आणि तिथून जर्मनीपर्यंत पोहोचत होती.

.
होत्सुमी ओझाकी
टोकियोमध्ये असताना सॉर्ज एका छोट्या, भाड्याने घेतलेल्या घरात राहात असे. त्याचं हे घर तिथल्या पोलिस स्टेशनच्या समोरच होतं. हाही सॉर्जच्या स्वतःवरचा संशय दूर करण्याच्या प्रयत्नांमधला एक होता. हेरांविषयी लोकांचं जे मत असतं, त्याच्या अगदी विरुद्ध गोष्टी करणं यात त्याचा हातखंडा होता. त्याचाच एक भाग म्हणून तो टोकियोच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून भन्नाट वेगाने आपली मोटरसायकल पळवत असे, आणि कधी कधी तर दारू पिऊन तर्र अवस्थेतही तो असं करायचा.
१९३६ मध्ये सॉर्जच्या मेहनतीला फळ आलं. १९३० च्या दशकात जपान शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये बऱ्यापैकी आघाडीवर होता. पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीच्या शस्त्रास्त्रखरेदीवर निर्बंध होते. त्यामुळे जपानकडून शस्त्रं खरेदी करणं जर्मनीसाठी फारच सोयीचं होतं. अशा काही जपानी शस्त्रव्यापाऱ्यांशी युजेन ओटची ओळख होती. त्यांच्याकडून त्याला जर्मनी आणि जपान यांच्यामधल्या कॉमिन्टर्नविरोधी कराराबद्दल समजलं. बर्लिनमधल्या नाझी जर्मन सरकारने जाणूनबुजून आपल्या जपानमधल्या वकिलातीला या कराराबद्दल अंधारात ठेवलं होतं. ओटने ही माहिती फक्त दोघांना सांगितली – एक म्हणजे राजदूत डिर्कसेन आणि दुसरा माणूस म्हणजे रिचर्ड सॉर्ज. सॉर्जने ही माहिती ताबडतोब मॉस्कोला कळवली. त्यामुळे तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पोटात गोळा येण्यासारखीच परिस्थिती होती, कारण जर्मनी शस्त्रसज्ज होत आहे ही बातमी चिंताजनक होतीच पण जपानही जर्मनीच्या बरोबर आहे हा अजून एक मोठा काळजीचा विषय होता. सोविएत युनियनला त्यामुळे दोन आघाड्यांवर लढावं लागलं असतं.
१९३८ मध्ये ओटला बढती मिळाली आणि तो जपानमध्ये जर्मनीचा राजदूत झाला. त्यामुळे सॉर्जचं महत्व अजून वाढलं. आता ओट जर्मनीला पाठवायच्या केबल्स सॉर्जला दाखवून, त्याचा सल्ला घेऊन मगच त्या पाठवत असे. वकिलातीमधल्या इतर अधिकाऱ्यांनी यावरून योग्य तो संदेश घेतला आणि आपल्या केबल्ससुद्धा सॉर्जला दाखवूनच जर्मनीला पाठवायला सुरुवात केली. सॉर्जने स्वतः त्याच्या रोजनिशीमध्ये अशी नोंद केलेली आहे – “ते स्वतःहून माझ्याकडे येतात आणि मला विचारतात की आम्ही हे जे ऐकलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला सांगा, कारण जर जर्मनीमधून त्यावर कारवाई व्हायला हवी असेल तर ते तुमच्या भाषेमध्येच जायला पाहिजे.” जर्मन वकिलातीमधला गेस्टापो अधिकारी कर्नल जोसेफ मायसिंजर याच्या म्हणण्यानुसार – “ आमचा प्रत्येक रिपोर्ट हा मुळात सॉर्जने लिहिलेला असतो आणि आम्ही फक्त त्याच्यात थोडीफार भर घालून आणि आमच्या सह्या करून तो पाठवून देतो.”
त्या वर्षी जूनमध्ये एक घटना घडली. रशियन गुप्तचर संघटना एनकेव्हीडीचा (केजीबीचं आधीचं नाव) पूर्व विभागाचा प्रमुख जनरल गेनरिख ल्युश्कोव्ह याने मांचुरियामध्ये रशियन सरहद्द ओलांडून जपानी सैन्यतळावर जाऊन जपानमध्ये राजकीय आश्रय मागितला. तेव्हा रशियामध्ये सैन्य आणि पोलीसदल यांची स्टॅलिनप्रणित ‘साफसफाई ’ जोरात चालू होती. अनेक सैनिकी आणि पोलिस अधिकाऱ्यांना प्रतिक्रांतीवादी आणि स्टॅलिनचा कट्टर विरोधक ट्रॉट्स्की याचे हस्तक असल्याच्या खोट्या आरोपांवरून अटक करून मृत्युदंड दिला जात होता. त्यामध्ये आपलाही नंबर कधीतरी येणार अशी सार्थ भीती ल्युश्कोव्हला वाटत होती आणि म्हणूनच त्याने जपानमध्ये आश्रय मागितला होता. त्याच्या मोबदल्यात तो जपानला रशियन सैन्याच्या अतिपूर्वेकडील मोर्चेबांधणीबद्दल सगळी माहिती द्यायला तयार होता.
तो नक्की काय माहिती देतोय हे अर्थातच मॉस्कोमधल्या एनकेव्हीडी अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचं होतं. जेव्हा जर्मनीमध्ये ही बातमी गेली, तेव्हा जर्मनांनी पण आपला एक अधिकारी टोकियोमध्ये ही माहिती समजून घेण्याकरता आणि जपान्यांना मदत करण्याकरता पाठवला. त्याला मिळालेली सगळी माहिती त्याने टोकियोमधल्या जर्मन वकिलातीमध्ये दिली. तिथे ती ओटच्या आणि त्याच्याकडून सॉर्जच्या हातात पडली आणि तिथून ती रशियनांना समजली. ल्युश्कोव्हच्या माहितीप्रमाणे रशियामध्ये स्टॅलिनच्या जुलमी राजवटीविरुद्ध प्रचंड असंतोष होता आणि जर जपानने पूर्वेकडून हल्ला केला असता, तर रशियन सैन्याचा निभाव लागणं कठीण होतं, कारण अनेक कर्तबगार आणि हुशार अधिकारी स्टॅलिनच्या दमनसत्रामध्ये मारले तरी गेले होते किंवा मग सायबेरियामध्ये कैदेमध्ये खितपत पडले होते.
ल्युश्कोव्हच्या पलायनानंतर सहा आठवड्यांनी त्याने जिथे रशियन सीमा ओलांडून जपानी अंमलाखाली असलेल्या प्रदेशात प्रवेश केला होता, तिथे रशियन आणि जपानी सैन्यामध्ये एक चकमक उडाली. रशियन सैन्याचा तिथे एखादं कायमस्वरूपी ठाणं उभारून जपानी सैन्यावर नजर ठेवायचा इरादा होता आणि याला कारणीभूत होती सॉर्जने पाठवलेली माहिती. जपानी पंतप्रधान कोनोयेचा सल्लागार असलेल्या हात्सुमी ओझाकीकडून सॉर्जला हे समजलं होतं की जपानी नेत्यांची या संघर्षामधून एखादं मोठं युद्ध सुरु व्हावं अशी अजिबात इच्छा नव्हती. त्यांचं लक्ष चीनवर होतं आणि त्यांना रशियन भूभागामध्ये अजिबात रस नव्हता. एकदा हे समजल्यावर स्टॅलिनने हजारो सैनिक, रणगाडे आणि विमानं पूर्वेकडे पाठवून दिली. त्यामुळे आधीच रशियाबाबत सबुरीचं धोरण स्वीकारणाऱ्या जपानने माघार घेतली.
पुढे १९३९ मध्ये जेव्हा जपान आणि रशिया यांच्यात मंगोलिया आणि मांचुरिया यांच्या सीमारेषेवरून संघर्ष झाला, तेव्हाही सॉर्जने पुरवलेल्या माहितीचा उपयोग रशियन सैन्याला करता आला. या संघर्षात झालेल्या पराभवामुळे जपानने रशियाचा नाद पूर्णपणे सोडून प्रशांत महासागरातल्या बेटांवर आणि ब्रिटन, फ्रान्स आणि नेदरलँड्स यांच्या आशियाई साम्राज्यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.
त्याच वेळी सॉर्ज मॉस्कोला जपान आणि जर्मनी यांच्यातल्या वाढत्या जवळिकीबद्दल माहिती पुरवत होता. त्यामुळे १९३९ च्या ऑगस्टमध्ये सोविएत रशियाने स्वतः पुढाकार घेऊन जर्मनी आणि रशिया यांच्यात अनाक्रमणाचा करार घडवून आणला. या करारामध्ये असलेला एक मुद्दा म्हणजे पोलंडची फाळणी. हिटलरने तोपर्यंत ऑस्ट्रिया आणि झेकोस्लोव्हाकिया हे दोन्ही देश घशात घातले होते. पोलंड पचवणं मात्र तितकं सोपं नव्हतं. अशा वेळी जर रशिया बरोबर असेल तर ब्रिटन आणि फ्रान्स जर्मनीवर हल्ला करायची हिम्मत दाखवू शकणार नाहीत, असा हिटलरचा अंदाज होता.
स्टॅलिनने बरोबर उलटा विचार केला होता. त्याला हे माहित होतं, की हिटलरवर विश्वास ठेवायला ब्रिटन आणि फ्रान्स तयार नाहीत. हे दोन्हीही लोकशाही देश असल्यामुळे तिथल्या जनमताचा आदर सरकारांना करावाच लागेल. त्यामुळे हे देश जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारतील पण जर्मनी आणि पोलंड मध्ये असल्यामुळे ते रशियापर्यंत येऊन रशियावर आक्रमण करणार नाहीत. परिणामी रशियाची पश्चिम सीमा सुरक्षित राहील आणि एकदा जर्मनी युरोपमधल्या युद्धात गुंतला की मग जपानपासून त्याला तोडणं सोपं जाईल. काळाच्या ओघात स्टॅलिनचे निर्णय बरोबर ठरले हे आपल्याला आज माहित आहे पण त्याच्या या निर्णयांमागे सॉर्जसारख्या हेरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मिळवलेली माहिती होती हेही तितकंच खरं आहे.
इकडे सॉर्जचं काम चालूच होतं. त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी मात्र अजून त्याने बजावलेली नव्हती.
१९४० च्या शेवटी सॉर्जच्या कानावर जर्मन सैन्य रशियन सरहद्दीजवळ मोर्चेबांधणी करत असल्याच्या बातम्या यायला लागल्या होत्या. त्याची खात्री करून घेतल्यानंतर त्याने २८ डिसेंबरला आपली खबरदारीचा इशारा देणारी पहिली केबल पाठवली.
१९४१च्या मे महिन्यापर्यंत सॉर्जची जर्मनी रशियावर आक्रमण करणार असल्याबद्दल पक्की खात्री पटली होती. ही सगळी माहिती त्याला ओटकडून मिळत होती. जर्मन अधिकाऱ्यांच्या मनात रशिया आणि रशियाची रेड आर्मी यांच्याबद्दल काय विचार आहेत, हेही सॉर्जने मॉस्कोला कळवलं. पोलंडमध्ये पोलिश सैन्याने रशियन रेड आर्मीला चांगला प्रतिकार केला होता आणि नाझी सैन्याच्या ब्लिट्झक्रीग तंत्रासमोर सपशेल नांगी टाकली होती. त्यानंतर १९३९ च्या हिवाळ्यात झालेल्या रुसो-फिनलंड युद्धात रशियन सैन्य केवळ संख्याबळ अधिक असल्यामुळे जिंकलं होतं पण छोट्याश्या फिनलंडनेही त्यांची दमछाक केली होती. त्यामुळे रेड आर्मीबद्दल जर्मन सैन्य निश्चिंत होतं. हे सगळं सॉर्ज मॉस्कोला कळवत होता.
३० मे रोजी त्याने पाठवलेल्या केबलमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं होतं की बर्लिनमधून ओटला आलेल्या संदेशानुसार जूनच्या शेवटी जर्मनीचं रशियावरचं आक्रमण सुरु होऊ शकतं.
३१ मे या दिवशी लेफ्टनंट कर्नल एरविन शोल या अधिकाऱ्याने सॉर्जला ही खात्रीलायक बातमी दिली की जवळजवळ १७० ते १९० जर्मन डिव्हिजन्स स=रशियन सीमेवर तैनात होत आहेत आणि १५ जूनपर्यंत कमीतकमी ८ ठिकाणांहून जर्मन सैन्य रशियामध्ये घुसणार आहे. सॉर्जने ताबडतोब १ जूनला हा संदेश मॉस्कोला पाठवला. हा बहुतेक त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा संदेश होता.
मॉस्कोमध्ये मात्र त्याची बरोबर उलटी प्रतिक्रिया आली. जर्मनी हल्ला करेल याच्यावर खुद्द स्टॅलिनचा विश्वास नव्हता आणि त्याच्याविरुद्ध मत देण्याची हिंमत पूर्ण रशियामध्ये कुणातही नव्हती.
इकडे सॉर्ज बेचैन होत होता. २० जूनला, म्हणजे प्रत्यक्ष हल्ल्याच्या दोन दिवस आधी त्याने पुढील संदेश मॉस्कोला पाठवला – “ओटच्या म्हणण्यानुसार युद्ध अटळ आहे. इन्वेस्ट (हे ओझाकीचं टोपणनाव होतं) मला असं सांगतोय की जपानी सरकार यावेळी आपण काय करायचं याबद्दल विचार करत आहे.” क्लाउसेनने २१ जूनला हा संदेश मॉस्कोला पाठवला.
सॉर्जने दिलेले सगळे इशारे अचूक होते हे मॉस्कोमधल्या रशियन अधिकाऱ्यांना २२ जूनच्या सकाळी समजलंच. लगेचच त्यांनी त्याला अजून माहिती पाठवण्याची विनंती केली. स्टॅलिनला त्यावेळी भेडसावणारा एकच प्रश्न होता – जपान काय करणार आहे? जर जपानने पूर्वेकडून रशियावर हल्ला चढवला असता, तर एकीकडे जर्मनी आणि दुसरीकडे जपान अशा कात्रीत सोविएत युनियन सापडलं असतं. ओटला जर्मन सरकारने अत्यंत स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या – काहीही करून जपानला पूर्वेकडून हल्ला करायला लाव.
त्याच वेळी जपान एका वेगळ्या पेचप्रसंगात सापडला होता. चिनी सैन्य जरी मार खात असलं, तरी चीन देश अवाढव्य असल्यामुळे जपानी सैन्याच्या चढाईवर मर्यादा होत्या. शिवाय चीनचा हुकुमशहा चँग-कै-शेक आणि त्याचे प्रच्छन्न शत्रू असणारे चिनी कम्युनिस्ट जपानविरोधात एकत्र आले होते. त्यामुळे चीन-जपान युद्ध हा जपानसाठी कठीण प्रकार होऊन बसला होता. दुसरी गोष्ट म्हणजे जर्मनीने युरोपमध्ये तोपर्यंत नेदरलँड्स आणि फ्रान्स यांना पादाक्रांत केलं होतं आणि ब्रिटनला एकाकी पाडलं होतं. त्यामुळे या देशांच्या आशियाई वसाहती आता जपानला खुणावत होत्या. या वसाहती जपानच्या दक्षिणेला होत्या आणि रशियावर हल्ला करायचा तर चीनमधून उत्तरेला करावा लागणार होता. जपानची एकाच वेळी दक्षिणोत्तर लढण्याची तयारी नव्हती.
सॉर्जने परिस्थितीचा अचूक अंदाज बांधला. चीनमधल्या प्रतिकारामुळे वैतागलेले जपानी आता रशियन सैन्याचा तितकाच तिखट प्रतिकार सहन करण्याच्या परिस्थितीत नाहीत हे त्याने ओळखलं होतं. शिवाय ब्रिटन आणि अमेरिका यांनी जपानने चीनवर हल्ला केल्यावर जपानची सर्व परदेशस्थ मालमत्ता जप्त केली होती. या अपमानाचा बदला जपान घेतल्याशिवाय राहणार नाही असं सॉर्जचं मत होतं. आणि तसंच घडलं. जून १९४१ मध्ये त्याने जी केबल पाठवली त्यात असं म्हटलं होतं – “ रशिया आणि जर्मनी यांच्यातल्या युद्धाचा काय परिणाम होतो हे पाहून जपान निर्णय घेणार आहे. जर जर्मन सैन्याने रेड आर्मीचा तीन महिन्यांत पराभव केला, तर जपान मांचुरियामधून रशियावर हल्ला करण्याचा विचार करेल. पण सध्या तरी हे होणार नाही “
२ जुलै या दिवशी जपानच्या युद्धकालीन मंत्रिमंडळाची जी बैठक झाली, त्यात या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जुलैमध्येच ब्रिटन आणि अमेरिकेने जपानवरचे निर्बंध अजून तीव्र केले आणि जपान आयात करत असलेल्या तेलाचा पुरवठा बंद केला. जपानकडे आता एकच मार्ग उरला होता – तेलाच्या विहिरी असलेली डच ईस्ट इंडीज बेटं (आजचा इंडोनेशिया) ताब्यात घेणं आणि तेलाचा पुरवठा सुरळीत करणं.
जपानमध्ये त्यावेळी दोन मतप्रवाह होते – एकाच्या मतानुसार उत्तरेकडे रशियावर हल्ला करावा; दुसऱ्याच्या मतानुसार दक्षिणेला डच ईस्ट इंडीज, फ्रेंच इंडोचायना (आत्ताचा लाओस, व्हिएतनाम आणि कंबोडिया), हॉंगकॉंग, सिंगापूर – हे भाग ताब्यात घ्यावेत आणि जपानी साम्राज्य वाढवावं. कमालीच्या हिशोबी जपान्यांसाठी दुसरा मार्ग हा कमी त्रासाचा होता. हे हेरून सॉर्जने ऑगस्ट २५-२६ ला केबल पाठवली ज्यात असं स्पष्टपणे म्हटलं होतं की “ जपान जरी मांचुरियामध्ये मोर्चेबांधणी करत असला, तरी जपानी सरकारची या वर्षी सोविएत युनियनवर हल्ला करण्याची कुठलीही योजना नाही.”
६ सप्टेंबरला झालेल्या अजून एका बैठकीमध्ये जपानच्या मंत्रिमंडळाने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि नेदरलँड्स यांना पूर्व प्रशांत महासागरातून हुसकावून लावणं, जपानचं साम्राज्य पश्चिमेकडे भारतापर्यंत वाढवणं आणि जर जर्मनीचा मॉस्कोवर कब्जा झाला, तरच रशियावर हल्ला करणं ही उद्दिष्टं ठरवली. ओझाकी आणि ओट या दोघांकडून सॉर्जला हे समजलं. त्याने १३ सप्टेंबरला पाठवलेल्या केबलमध्ये असा स्पष्ट उल्लेख केला की जपानच्या क्वांटुंग आर्मीचा रशियावर हल्ला होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.
ही बातमी मिळाल्यावर ;लगेचच स्टॅलिनने १५ भूदल डिव्हिजन्स, ३ घोडदळाच्या डिव्हिजन्स, १७०० रणगाडे आणि १५०० लढाऊ विमानं एवढं सैन्य पूर्वेकडून पश्चिमेला मॉस्कोच्या संरक्षणासाठी हलवायचा आदेश दिला. हे सैन्य रशियाच्या सुदैवाने ऑक्टोबरच्या सुरुवातीला मॉस्कोपाशी पोचलं आणि त्याने जर्मनीची घोडदौड रोखली. ऑक्टोबरमध्ये हिवाळाही सुरु झाला होता त्यामुळे जर्मन सैन्याला उन्हाळा सुरु होऊन रस्त्यावरचा बर्फ वितळून तो व्यवस्थित होण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही आणि मॉस्कोवरचं संकट टळलं. डिसेंबरच्या सुरुवातीला जर्मन सैन्याने पहिल्यांदा माघार घेतली. साधारण त्याचवेळी जपानने पर्ल हार्बरवर बॉम्बहल्ला केला आणि हॉंगकॉंगवर आक्रमण केलं.
सॉर्जच्या नेटवर्कशिवाय हे होऊ शकलं नसतं ही गोष्ट खरी आहे आणि सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे या यशामुळेच सॉर्जची पुढे परवड झाली.
१९४१च्या ऑक्टोबरमध्ये जपानी पोलिसांनी एका शिंप्याला अटक केली. हा शिंपी आपलं दुकान हेरगिरीसाठी वापरू देत होता असा त्याच्यावर संशय होता आणि तो खरा होता. या शिंप्याला हेरगिरीसाठी वापरणारा माणूस होता मियागी ओतोकू. जेव्हा पोलिसांना मियागीचं नाव समजलं तेव्हा ते त्याच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेले. तेव्हा मियागीने घराच्या खिडकीतून उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला. त्याच्या दुर्दैवाने तो यशस्वी झाला नाही आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची हाडं मोडली होती आणि तो वेदनेने तळमळत होता. त्याने पोलिसांना ओझाकी आणि सॉर्ज यांची नावं सांगितली आणि हेही सांगितलं की ते कम्युनिस्ट एजंट आहेत. १८ ऑक्टोबर १९४१ या दिवशी पोलिसांनी सॉर्जला अटक केली.
एक आठवडाभर सॉर्जने पोलिसांना दाद दिली नाही पण शेवटी त्याच्या बचावाचे बुरुज ढासळले आणि त्याने जपानमधल्या आपल्या सर्व कामगिरीचा वृत्तांत पोलिसांना दिला. त्याच वेळी त्याने हेही ठासून सांगितलं की त्याच्याशी संबंध असलेल्या कुठल्याही स्त्रीचा वापर त्याने माहिती जमा करण्यासाठी किंवा हेरगिरीसाठी केलेला नाही. त्या सगळ्या निर्दोष आहेत. विशेषतः त्याची जपानी प्रेयसी हानाको इशी ही निर्दोष असून तिचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही हे त्याने कोर्टातही शपथेवर सांगितलं. त्यावरून इतिहासकारांना असं वाटतं की कदाचित तिला त्रास होईल अशी धमकी सॉर्जला देऊन पोलिसांनी त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेतली असावी.
सॉर्जवर खटला चालवण्यात आला आणि त्याला हेरगिरी आणि राजद्रोह या आरोपांवरून मृत्युदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली पण जपानी सरकारने ती लगेचच अंमलात आणली नाही. आपल्याला फाशी होणार नाही असा सॉर्जलाही विश्वास होता. त्याला असं वाटत होतं की एखाद्या जपानी हेराच्या मोबदल्यात रशियन सरकार त्याची सुटका करून घेईल. जपान्यांनाही तसंच व्हायला हवं होतं. तीन वेळा जपानने तसे प्रयत्नही केले पण प्रत्येक वेळा रशियन सरकारकडून एकच उत्तर आलं – रिचर्ड सॉर्ज नावाच्या माणसाला आम्ही ओळखत नाही.
अनेक देश स्वतःच्या हेरांना स्वीकारत नाहीत. सॉर्जच्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी होती. १९४३ मध्ये, जेव्हा सॉर्जला मृत्युदंड सुनावण्यात आला, तेव्हा रशियन रेड आर्मीने स्टॅलिनग्राड आणि कर्स्क असे दोन मोठे विजय मिळवले होते आणि जर्मनी युद्ध जिंकू शकणार नाही हे उघड होतं. या विजयाचं श्रेय घ्यायला स्टॅलिन अगदी आतुर होता. अशा वेळी सॉर्जचं समोर येणं म्हणजे स्टॅलिनने सुरुवातीला केलेल्या चुका आणि सॉर्जने दिलेल्या इशाऱ्यांकडे केलेलं दुर्लक्ष यांची आठवण करून देण्यासारखं होतं.
रशियाकडून काहीही उत्तर मिळत नाही हे बघितल्यावर जपान सरकारने सॉर्ज आणि ओझाकी यांना ७ नोव्हेंबर १९४४ या दिवशी टोकियोमधल्या सुगामो तुरुंगात फाशी दिलं. त्याच्या एक वर्ष आधी त्याची रशियन पत्नी कात्या मॅक्सिमोव्हा मरण पावली. तिच्यावर जर्मन हेर असल्याचा खोटा आरोप ठेवून तिला सैबेरियामधल्या श्रमछावणीत पाठवण्यात आलं होतं. तिचा खरा गुन्हा कदाचित रिचर्ड सॉर्जची पत्नी असणं हाच होता.
सॉर्जची जपानी प्रेयसी हानाको इशीची मात्र इतकी परवड झाली नाही. जपान सरकारने तिच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि तिने तिचं आयुष्य पुढे टोकियोमध्येच शांतपणे घालवलं. १९४९ मध्ये तिने सॉर्जचा तुरुंगाच्या आवारात पुरलेला मृतदेह टोकियोमधल्या एका खाजगी दफनभूमीमध्ये हलवला.
स्टॅलिन १९५३ मध्ये मरण पावला आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या निकिता क्रुश्चेव्हने स्टॅलिनच्या कारकिर्दीत झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचून त्यात होरपळलेल्या लोकांचं पुनर्वसन करण्याची मोहीम चालू केली. तेव्हा त्याच्या पाहण्यात एक चित्रपट आला, ज्याचं नाव होतं – Who Are You, Mr. Sorge? हा चित्रपट सोविएत युनियनमध्येही प्रदर्शित झाला होता. तो पाहिल्यावर क्रुश्चेव्हने केजीबी अधिकाऱ्यांकडे त्यात दिलेल्या माहितीच्या सत्यतेबद्दल विचारणा केली. जेव्हा ते सगळं खरं आहे हे त्याला कळलं, तेव्हा सॉर्जला हिरो ऑफ द सोविएत युनियन हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर देण्यात आला. हानाको इशीला तहहयात पेन्शन मंजूर करण्यात आली, जी तिला तिचा २००० मध्ये वयाच्या ८९व्या वर्षी मृत्यू होईपर्यंत मिळत होती. शिवाय रशियन सरकारने स्वखर्चाने सॉर्जच्या थडग्यावर त्याला मिळालेल्या सन्मानाची नोंद केली आणि अजूनही त्याची देखभाल रशियन सरकारकडून केली जाते. शिवाय मॉस्कोमधल्या एका रस्त्याला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या सन्मानार्थ स्टँपही काढण्यात आले होते.
सॉर्ज जेम्स बॉंड नव्हता पण त्याच्यावरूनच जेम्स बॉंडचा जनक आणि स्वतः ब्रिटीश गुप्तचरखात्यातला एक अधिकारी असणाऱ्या ईअन फ्लेमिंगला जेम्स बॉंडची कल्पना सुचली हे स्वतः फ्लेमिंगने लिहून ठेवलेलं आहे.
सॉर्जने पुरवलेल्या जर्मन आक्रमणाबद्दलच्या माहितीवर जर स्टॅलिनने विश्वास ठेवला असता, तर युद्धाचा इतिहास खूप वेगळा झाला असता. जपान रशियावर हल्ला करणार नाही ही सॉर्जने पुरवलेली माहिती वेळेत मिळाल्यामुळे सोविएत युनियनचं नाझींच्या हातून पराभव होण्यापासून संरक्षण झालं. ही माहिती पुरवणाऱ्या सॉर्जला मात्र मृत्युला सामोरं जावं लागलं आणि तेही का, तर आपण त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं हे स्टॅलिनला बाहेर येऊ द्यायचं नव्हतं म्हणून. हेरगिरीच्या इतिहासातलं हे कदाचित एकमेव उदाहरण असेल, जिथे त्या हेराच्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच त्याचा मृत्यु ओढवला.

संदर्भ –
en.m.wikipedia.org/wiki/Richard_Sorge
www.historynet.com/the-spy-who-saved-the-soviets
https://www.youtube.com/watch?v=kKhR9gflK_8
https://www.youtube.com/watch?v=eVo6AzUI3ug&index=15&list=PLnNmfyY_ccRHl...

दिवाळी अंक २०१५