पहाट.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
4 Oct 2015 - 11:47 am

“पाऊल पुढे टाकायला ही पहाट मला इंधन पुरवते.”---संध्या परब

सकाळीच बाहेर फेरफटका मारायची माझी जूनीच संवय आहे.मग मी कुठेही फिरतीवर असलो किंवा कुणाकडे बाहेर गावी रहायला गेलो असलो तरी सकाळी उठून जवळ असलेल्या कुठच्याही मोकळ्या जागी फिरून यायचो.मग कोकणात असलो तर,बाजूच्या शेतीवाडीत फिरायचो,समुद्राजवळ असलो तर चौपाटीवर जायचो,छोटासा डोंगर असला तर घाटी जढून जायचो.जवळ नदी असेल तर नदीच्या किनार्‍या किनार्‍याने फिरत जायचो.
शहरात असल्यानंतर मात्र अशी निवड करायला मिळत नसायची.

एकदा मी दिल्लीत असताना वसंत विहार कॉलनीत रहायला होतो.कॉलनीत अतीशय सुंदर पार्क होता.खूप लोक सकाळी फिरायला यायचे.गॉल्फचं मैदान पण होतं.मैदानाच्या कडे कडेने फिरत राहिल्यास दोन अडीच मैलाचा एका फेरीत फेरफटका व्हायचा.

सांगायची गोष्ट म्हणजे,संध्याची आणि माझी ह्या पार्कमधे गाठ होईल हे ध्यानीमनी नव्हतं.संध्या कुडतरकर-आता संध्या परब-ही मुळची कोकणातली.
तिचे पती परब हे सैन्यात चांगल्या हुद्यावर होते.वसंत-विहारमधे त्यांना सुंदर बंगला रहायला मिळाला होता. नाईकीचे सफेद कॅनव्हास शूझ,आणि जॉगींगला जायचा स्वेट ड्रेस घालून माझ्या मागून पळत पळत येत संध्या मला मागे टाकून गेली.मी पुढे चालत गेल्यावर एका बाकावर थोडीशी विश्रांती घेत बसलेली दिसली.मी तिला ओळखल्यावर माझ्याशी हंसली.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.चौकशा झाल्या.आणि बोलता बोलता संध्या लहानपणाची आठवण काढून मनाने कोकणात गेली.
"गेले ते दिवस"
मला म्हणाली.
“दिवस जातात पण आठवणी येतात.आठवणी जात नाहीत.सांग तुझ्या आठवणी.मी पण थोडा तुझ्याबरोबर मनाने कोकणात जाईन.”
मी संध्याला म्हणालो.

मला म्हणाली,
“उन्हाळ्याची सुट्टी चालू झाल्यावर माझ्या धाकट्या बहीणी माझ्या आजीआजोबांच्या घरी त्यांना भेटायला कोकणात जायचे. डोंगराच्या पायथ्याशी त्यांचं घर होतं.घर बरंच मोठं होतं.घराच्या भोवती सुंदर बगीचा होता.माझी आजी बगीचा फुलवण्यात तरबेज होती.अगदी दगडातून ती फुलझाड रुजवायची असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.हळूवारपणे झाडांच्या रोपांची निगा ठेवणारी तिची कसबी बोटं पाहून त्याबद्दलचं माझं नवल कधीच विसरलं जाणार नाही.”
“तुझे आजी आणि आजोबा खूपच मेहनती होते.आजोबा शेतात कामं करायचे.आजी,गडी-नोकर असले,तरी घरी सतत कामात असायची.काय सुंदर तिने बाग केली होती?.मला पुजेला फुलं हवी असली की मी हटकून त्यांच्या बागेतली फुलं घेऊन जायचो.”
मी म्हणालो.
माझं म्हणणं ऐकून, संध्याची कोकणातली ओढ जास्त तीव्र झालेली दिसली.

“गम्मत सांगते तुम्हाला.”
असं म्हणत सांगू लागली.
“मी सकाळीच त्यांच्या घरी गेल्यावर, माझ्या आजीआजोबांशी सकाळची खास प्रथा असायची, त्यात मी सहभागी व्ह्यायची. सूर्योदय होण्यापूर्वी आम्ही उठायचो.गरम गरम चहा व्ह्यायचा.एकमेकाजवळ बसून चहा प्यायचो.आता मला आठवण येते,कशी माझी आजी रोज सकाळी उठून माझ्या खोलीत हळूच यायची,अलगत माझ्या खांद्यावर हात लावून मला उठवायची.मी लगेचच उठून तिच्या बरोबर स्वयंपाक घरात जायची.चहाचं आद्ण ठेवलेल्या चुलीवरचं झांकण वाफेने हलत रहायचं.चहाचा घमघमाट सुटल्यावर आजी त्यात दूध घालून एका कपात ओतून मला गरम चहा आणून द्यायची.मी तर त्या क्षणाची वाटच पहात असायची.

चहा घेऊन झाल्यावर मागच्या पडवीत झोपाळ्यावर जाऊन बसायचो.आजी-नातीची इकडची तिकडची बोलणी होत असताना पक्षांची चीवचीव ऐकायला यायची आणि डोंगराच्या माथ्यावरून सकाळच्या सूर्याचा उदय दिसायला लागायचा.आजुबाजूचे लोक पाणी गरम करण्यासाठी हंडे चुल्यावर ठेऊन काटकोळ्या जाळून पाणी गरम करायचे त्या जळणार्‍या लाकडांच्या धुराचा वास मला अजून आठवतो. थंड हवेची झुळूक माझ्या नाकाच्या शेंड्याना लागून नाकात पाणी यायचं आजी आपल्या पदराने माझं नाक पुसायची.थंड हवेमुळे कानाच्या पाळ्याही लाल लाल व्हायच्या.सूर्य वर वर जायला लागल्यावर किरणं माझ्या गालावर येऊन स्पर्श करायची.जणू सकाळच्या शुभेच्छा देण्यासाठीच त्यांचा स्पर्श व्हायचा.पहाटेला कवेत घेऊन झाल्यावर आम्ही बागेत जाऊन झारीने रोपांना अलगद पाणी घालायचो.मला हा सकाळचा प्रहर खूप आवडायचा.सूर्योदय,सकाळचा दव, ह्या गोष्टीच्या आठवणी माझ्या अंतरात अगदी जवळच्या झाल्या होत्या.माझी आजी मला तिचा सूर्यप्रकाश म्हणायची.आता आठवणी येऊन कसंसं होतं.”
“पण चांगलं झालं.त्यामुळे दिल्लीतल्या एव्हड्या थंडीतसुद्धा सकाळी उठायची संवय होऊन बाहेर फिरायला यायला तुला मजा येत असणार.”
मी संध्याला म्हणालो.

“अगदी माझ्या मनातलं सांगीतलंत.”
असं सांगत संध्या म्हणाली,
“ह्या सकाळच्या पहाटा, ज्या एकेकाळी निवांत वाटून,त्यांचा अनुभव माझ्या ह्र्दयाशी निगडीत रहायचा,त्या आता माझ्या जीवनाचं इंधन झाल्या आहेत.
उजाडलेला माझा पूरा दिवस कसा जावा हे त्या दिवसाच्या सकाळवरून मी आता ठरवायला लागली आहे.सकाळी पाचला उठल्यावर,माझ्या मनाची, हृदयाची,आणि शरीराची,सहनशिलतेसाठी आणि शिस्तीसाठी मी तयारी करते. अंथरूणातून उठल्यावर,बुटांची लेस बांधून,माझी चालण्याची सीमा गाठण्याच्या प्रयत्नात असते.ह्या गॉल्फच्या मैदानाला दोन तरी वळसे घालते.मधेच धावते थोडी विश्रांती घेते,परत पळते.असे निदान साडेचार मैल धावण्याचा माझा व्यायाम होतो. सकाळचा फेरफटका,सकाळच्या चहा ऐवजी, व्ह्यायला लागला आहे.जसा फेरफटका वाढतो तसं माझ्या शरीरातलं ऍडर्निल वाढतं.ते वाढल्याने माझा आत्मविश्वास वाढतो,माझी ध्येयं मी गाठूं शकते.”

“ह्या प्रौढवयात तू तुझी प्रकृती कशी ठेवली आहेस ते तुझ्या ह्या व्यायामामुळे मला दिसतंच आहे.दोन किशोर वयातल्या मुलांची तू आई आहेस असं मला मुळीच वाटत नाही.खरंतर तुझ्या वयातल्या इतर स्त्रीयांकडे बघून मला तुझी ही प्रकृती पाहून नवलच वाटतं.”
संध्या तिच्या तब्यतीच्या शेलाटीपणाचं गुपीत मला सांगेल ह्या अंदाजाने मी तिला तसं म्हणालो.
संध्याला हा विषयच हवा होता असं वाटतं.
अगदी खूशीत येऊन,माझ्या मांडीवर थाप मारीत आवंढा गिळत मला म्हणाली,
“तुमचं हे अवलोकन मुंबई सारख्या शहरी वातावरणात जास्त बरोबर आहे.इतके सुंदर पार्क कुठे असतात शहरात?. हा दिल्लीचा शहराचा बाहेरचा भाग आहे.आणि सैन्यातले बरेच लोक इथे रहातात.अपवादाने एखादी स्थुल स्त्री तुम्हाला इकडे दिसेल.स्थुल स्त्रीयांच्या घोळक्यात एखादी सडपातळ स्त्री उठून दिसते.तसंच एखाद्या सडपातळ स्त्रीयांच्या घोळक्यात एखादी स्थुल स्त्री उठून दिसते.”

मी संध्याला म्हणालो,
“म्हणजे,सडपातळ प्रकृतिच्या स्रीयांच्या घोळक्यात स्थुल स्त्रीला नक्कीच कसंसं वाटत असणार.आणि स्थुल स्त्रीयांच्या घोळक्यात सडपातळ प्रकृतिच्या स्त्रीला कसचं! कसचं! वाटत असणार.”
माझा विनोद संध्याला आवडला असं दिसलं.
मला म्हणाली,
“प्रकृती कशी ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.चर्चा म्हणून बोलायला आपल्यावर कुणाचं बंधंन नाही.झी मराठी किंवा आणखी काही टीव्ही चॅनलवरच्या मालिका तुम्ही पहा.जास्त करून पोक्त स्रीया स्थुल दिसतात.प्रथमच पाहिलेल्यांना पहाताना तितकं वाटत नाही.पण ज्यांना पूर्वी तरूण असताना पाहिलं आहे त्यांना आत्ता पाहून त्यांच्या पूर्वीच्या इमेजला धक्का बसतो.”
“ही अशी परिस्थिती यायला कारण उघड आहे.”खाणं भरपूर पण व्यायाम इल्ला!”
असं संध्याला मी सांगून,तिची प्रतिक्रिया पहात होतो.

मला लगेच म्हणाली,
“मी मात्र भरपूर खाते आणि हा असा भरपूर व्यायाम करते.आणि मा्झ्या खाण्यात चरबीचा अंश अगदीच कमी असतो. त्यामुळे माझं वजन पटकन वाढत नाही.”
मी संध्याला बॅन्केचं उदाहरण देत म्हणालो,
“खाणं-अर्थात हेल्धी खाणं- आणि नंतर व्यायाम करणं हे बॅन्केत आपल्या खात्यात पैसे भरणं आणि पैसे काढून घेणं-विथड्रॉ करणं-सारखं आहे.फक्त फरक एव्हडाच बॅन्केतल्या खात्यातले पैसे वाढले-सेव्हिंग झाले-की आपली पत वाढते. आणि खाल्ल्यानंतर व्यायाम न केल्याने आपली पोत आणि पोट वाढतं.शरीराचा घेर वाढतो.माझ्या पहाण्यात आलं आहे की हे फक्त स्त्रीयांपुरतं मर्यादीत नाही पुरूषांची पण अशीच परिस्थिती झाली आहे.कदाचीत आणखी गंभीर म्हटलं तरी चालेल.अर्थात मध्यम वर्गात हे जास्त दिसून येतं.

पण ते जाऊदे.तू पहाटेबद्दल जे सांगत होतीस ते काय?”
“ मी दोन हात पसरून पहाटेला कवेत घेते.जीवनातल्या चांगल्या,वाईट गोष्टींशी दोन हात करायच्या तयारीत असते. भविष्यात काहीही वाढून ठेवलं असलं तरी योग्य मनस्थिती ठेवल्याने माझी मी उन्नति करू शकते, ह्याची मला आठवण दिली जाते. भीति दूर करून,पाऊल पुढे टाकायला ही पहाट मला इंधन पुरवते.”
असं सांगून संध्या मला म्हणाली,
“चला आमच्या घरी.माझा पहिला चहा व्ह्यायचा आहे.मला तुमची कंपनी द्या"
मलाही चहाची तलफ आली होती.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

कथालेख

प्रतिक्रिया

नितिन५८८'s picture

4 Oct 2015 - 12:54 pm | नितिन५८८

मस्त लिहिलंय आणी हे पण आवडले

हे बॅन्केत आपल्या खात्यात पैसे भरणं आणि पैसे काढून घेणं-विथड्रॉ करणं-सारखं आहे.फक्त फरक एव्हडाच बॅन्केतल्या खात्यातले पैसे वाढले-सेव्हिंग झाले-की आपली पत वाढते. आणि खाल्ल्यानंतर व्यायाम न केल्याने आपली पोत आणि पोट वाढतं