जडण घडण - २८ - सप्रेम द्या निरोप...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
4 Sep 2015 - 4:04 pm

शेवटचा किंवा अंतिम भाग असा उल्लेख टाळतेय, कारण एक व्यक्ती म्हणून माझी जडण -घडण सुरूच राहणार आहे. खरं तर हे मी लिहू लागले ते नवऱ्याच्या आग्रहामुळे. त्याला वाचायला अजिबात आवडत नाही. पण माझा हात लिहिता राहावा, असं मनापासून वाटतं. या निमित्ताने मी लिहू लागले आणि प्रकाशित झाल्यानंतर प्रत्येक भाग त्यानेही आवर्जून वाचला. क्वचित कधीतरी, हे मला नव्हतं माहीत... असंही सांगितलं...
या प्रवासात मिपाचं व्यासपीठ आणि मिपाकरांची साथ लाभणं, हे माझं सुदैव. संस्थळावर अशा प्रकारे व्यक्त होण्याची माझी पहिलीच वेळ. सुरूवातीच्या काही भागांनंतर आपण फारच निरस लिहितोय का, वाचणाऱ्यांचा वेळ वाया घालवतोय का, असंही वाटून गेलं. पण हात लिहिता राहू द्यात, असा दिलासा मिपाकरांनी दिला आणि ते मान्य करून मी लिहित राहिले.
आभार नाही मानायचे... हे ऋण जपू द्यात...
------------------------------------------------------------------------------------

कॉर्पोरेट कंपनीतला हा अनुभवही लक्षणीय. मी रूजू झाले तेव्हा मोजके पंधरा - वीस चेहरे असणाऱ्या कंपनीची या कार्यालयातली कर्मचारी संख्या चार वर्षात दोनशेच्या वर पोहोचलीय. क्लायंट लोकेशनवर काम करणारे वेगळे. दोन्ही भाषांमधल्या कंटेट चं काम करणारी मी एकटी, त्यामुळे जवळपास प्रत्येकाशी वैयक्तिक ओळख होत गेली. दरम्यानच्या काळात वेळोवेळी सहकारी बदलले, इतर विभागांमधले अधिकारी बदलले. प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांचं कामकाज जवळून पाहता आलं.

माझा मुख्य संपर्क सीओओं बरोबर. हे पंजाबी गृहस्थ साधारण 50-55 वर्षं वयाचे. समोरच्याला आश्वस्त करून टाकणाऱ्या मोजक्या लोकांत मी यांचा समावेश करेन. माझ्या कामाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली, जबाबदाऱ्याही वाढत गेल्या पण त्याबद्दल कधी चुकूनही कुरकूर नाही झाली, त्याचं मुख्य कारण हे सर होते. निवृत्ती जवळ आलेली, पण या वयातसुद्धा हा नवा संयुक्त उपक्रम मार्गी लावण्याची जबाबदारी त्यांच्या अनुभवी खांद्यांनी समर्थपणे पेलली. समोरच्यावर किती विश्वास टाकायचा, डोक्यावर बर्फाची लादी ठेवून कसं बोलायचं हे यांचं वागणं बघून शिकता आलं. वडीलधारे होते, त्यामुळे काही प्रसंगी शुभेच्छा देताना त्यांचे आशिर्वाद घेतले जायचे. ते मात्र चटकन उभे राहात थांबवायचे... क्यू मुझे पाप का भागी बना रही है... हम बेटियों से पैर नही छुआते...

सोबत काम करणाऱ्या तरूणाईची मैत्रीही लोभस. निखळ मैत्रीचं सुरूवातीचं वातावरण काही काळाने बदलत गेलं. पण नात्यातला तो ओलावा अजून मनात उरलाय..

सुरूवातीपासून आमच्यासोबत असणारे एक प्रशासकीय अधिकारीही चांगलेच लक्षात राहिले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले जाणकार. पण आय ए एस या तीन अक्षरांबरोबर अरेरावीही हातात हात घालून येत असावी. आपल्या हाताखालची मंडळी, भेटायला येणारे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, अगदी आमच्या कंपनीचे सी ओ ओ, सगळ्यांशी बोलताना मस्करीच्या थाटात अपमानकारक शाब्दिक चिमटे काढत बोलायची सवय होती त्यांना. सुरूवातीला मी सुचवलेल्या मराठी शब्दांवर त्यांनी बरेचदा आक्षेप घेतला. एखाद्या शब्दावर ते अडकले की मी माझी बाजू मांडायचे आणि शांत राहायचे. मला हे असं म्हणायचं आहे. निर्णय तुमचा.. अशा भूमिकेत असायचे मी.

एकदा काही शब्दांवर गाडी अडली. आगकाडी हा मराठी शब्द नाही, मराठी माणसाला कळणार नाही, असं त्यांचं मत होतं. तर, आपण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी माणसाचा विचार केला तर बहुतेकांना हा शब्द समजेल, असं मला वाटत होतं. पासवर्ड साठी परवलीचा शब्द त्यांना संस्कृत वाटत होता. एकातून एक शब्दांचा पसारा वाढत गेला आणि मग आमच्या क्षेत्रात वारंवार वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द प्रमाणित करायचं त्यांनी ठरवलं. अशा शब्दांच्या विभागवार याद्या मी तयार केल्या. त्यानंतर मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आणखी दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अशा सर्वांबरोबर दोन दिवस चर्चा झाली. ही चर्चा चांगलीच मनोरंजक ठरली. शासकीय विभागांचे प्रतिनिधी एकेका शब्दाचा व्युत्पत्तीसह कीस पाडत होते तर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधले प्रतिनिधी ट्रान्सलिटरेशनवर भर देत होते. काही वेळा टोकाचे वादही झाले. मग बहुतेक मराठी प्रतिशब्द संमत झाले आणि काही तांत्रिक शब्द तसेच वापरायचे, असं ठरलं. त्यानंतर पुन्हा ती यादी घेऊन या अधिकाऱ्याने मला समोर बसवलं. अक्षरश: एक एक शब्द आणि प्रतिशब्द वाचून, वेळप्रसंगी त्यात बदल करून त्या यादीला अंतिम स्वरूप मिळालं.

एका अमराठी अधिकाऱ्याची ही आस्था बघून बरं वाटलं. पण त्या यादीत अनेक शब्द त्यांनी तसेच राहू दिले, ते खटकलं सुद्धा. अशा वेळी Boss is always right हे शब्द आठवायचे. मनस्ताप कमी होतो, हा स्वानुभव.
पण तरीही, इथे काम करणं आवडत गेलं. एकतर आवडीचं प्रसारमाध्यमातलं काम महिन्यातले मोजके दिवस करता येत होतं. त्याच बरोबरीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक गोष्टीही शिकता आल्या. सोबत काम करणाऱ्या तरूणाईमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्सचा भरणा जास्त. त्यांची इंजिनिअरींग शिकतानाची भाषा आणि त्यांच्या पिढीची एकंदर बोलीभाषा, शासकीय विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत काम करताना त्यांना येणारे अनुभव आणि रोजच्या भेटीतून, सोबत काम करताना सगळ्यांचं हळूहळू तयार होत गेलेलं मैत्रिपूर्ण नातं. हे सारंच खूप हवंहवंसं...
चार वर्षं होतील आता मला इथे. रूळले आहे, पण पुन्हा काही नवं जाणून घ्यावं, करून बघावं, अशी उर्मी मनात दाटतेय...

लहानपणी आपल्याला मोठी माणसं विचारतात, तुला मोठेपणी कोण व्हायचंय... आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना पाहून आपल्याला शिक्षक व्हायचं असतं, अक्षर ओळख झाल्यावर, वाचनाचं वेड लागल्यावर आपल्यालाही असं लिहिता यायला हवं, असं वाटतं... आई-बाबा किंवा ताई-दादा, काका यांना ऐटित ऑफीसला जाताना बघून आपल्यालाही मोठेपणी "जॉब " करायचा असतो, कधी डॉक्टर व्हायचं असतं, कधी इंजिनियर, कधी पत्रकार तर कधी ॲक्टरसुद्धा.
माझ्या सुदैवाने मला फारसं काही न ठरवताही बरंच काही करून बघता आलं. अत्यल्प काळासाठी मार्केटिंग, मग शिक्षकी पेशा, लेखन, भाषांतर, वार्तांकन, निवेदन अशी वेगवेगळी क्षेत्रं जवळून पाहता आली. खूप काही शिकता आलं, खूप माणसं जोडता आली.

हा प्रवास असाच पुढे सुरू राहणार आहे. पण आता पुढच्या क्षेत्रात लेखणी नको, काहीतरी पूर्ण वेगळं समोर यावं, असं वाटतं. बोटांना मातीची ओढ लागलीय बहुतेक...

आपण ठरवू तसंच होईल, याची खात्री नाहीच. मग नव्याने काय समोर येईल, याची उत्सुकता आहे. सध्या नवरा आणि दोन्ही लेकींच्या सोबत रोजचं जगणंही हवंहवंसं वाटतंय...

या वळणावर अभिलाषा नावाच्या एका विस्मरणात गेलेल्या मालिकेच्या लक्षात राहिलेल्या शीर्षक गीताच्या ओळी आठवताहेत... हवे हवे ची हाव सरेना किती हिंडशी गावे...

सुदैवाने ही हव्यासाची हाव नाही मनात. आता शांत निवांत जगायचंय. मान्य, वय फार नाही झालेलं. पण निवांत जगण्यासाठी फार वय झालेलं असावं, ही अट कशासाठी... तोपर्यंत आपण जगणार हे आपलं आपणंच गृहित धरायचं? त्यापेक्षा कशाच्याही मागे न धावता आला क्षण मनापासून जगता यायला हवा. जबाबदाऱ्या पूर्ण करायच्याच आहेत. पण कुठे थांबायचं, हे मनाने सांगताक्षणी तिथे थांबता यायला हवं...

सध्या कार्यालयातून परतीचा प्रवास सुरू झाला की माझी रोजची बस मला हायवेपर्यंत सोडते. तिथून पंधरा मिनिटं चालत घरी पोहोचता येतं. मधली वाट एका मोठ्ठ्या मैदानाशेजारून जाते. मैदान गजबजलेलं असतं मुलांनी. पावसात तिथे पाणी साचतं. कडेला आणि मध्ये मध्ये हिरवाई उमलते. मैदानाशेजारची वाट अशी सुखाची.

त्या दिवशी नुकताच पाऊस पडून गेला होता. श्रावणसर... मुलांच्या पळापळीने मैदानात मस्त चिखल तयार झालेला. लहान मुलं आणि क्वचित त्यांच्या सोबत आई-बाबाही मूल होऊन चिखलात मस्ती करत होते. लांबवर झोपाळा दिसला आणि मन लहान झालं चटकन. सात आठ वर्षाची मी दिसू लागले मलाच. आईने शिवलेला फ्रॉक घातलेली. लांबसडक केसांच्या दोन वेण्या, त्यावर आईनेच करून दिलेला अबोलीचा गजरा माळून आपल्याच नादात झोपाळ्यावर बसलेली, उंच उंच झोके घेत आपल्याच नादात गुणगुणणारी...

कुठूनतरी रात्री उशीरा घरी परतताना बसमध्येच झोपल्याचं सोंग घेणारी आणि बाबांनी उचलून घेतल्यानंतर किती वाट उरलीय, हे बघण्यासाठी मध्येच डोळे किलकिले करून बघणारी...

वाचनाचं वेड लागल्यानंतर तासन तास वाचनालयात, मग घरात ठिकठिकाणी पुस्तकात मान खुपसून बसलेली. पुस्तकांच्याच भिंती असलेलं घर हवं. तिथे टेबल-खुर्चीवर बसून, सोफ्यावर लोळत, झोपाळ्यावर झुलत, अंगणातून घरात शिरतानाच्या पायऱ्यांवर बसून आवडती पुस्तकं वाचायला मिळायला हवीत, असं स्वप्नं बघणारी...
हे असं इतकं नि:शंक होऊन जगायचंय...

माझी आई तिसऱ्या इयत्तेत असताना तिची आई देवाघरी गेली. आजोबांनी पुन्हा लग्न केलं नाही. या तीन बहिणी. मोठ्या दोघींची लग्न झाल्यानंतर आईचं शिक्षण नवव्या इयत्तेतंच थांबलेलं. घरचा पसारा मोठा. तो सावरता सावरता लग्न ठरून गेलं आणि मग तिचंही जगणं वेगाने पुढे झेपावत राहिलं. लवकरच आजोबांनाही देवाज्ञा झाली. मग वर्ष- दोन वर्षातून कधीतरी माहेरी जायचं. देवाला जायचं आणि परत यायचं, इतकंच माहेर लाभलं तिला. आम्हा मुलांच्या जन्मानंतरही हक्काचं माहेरपण नाहीच लाभलं... ते माहेरपण द्यायचंय आईला...

आधी मोठा मुलगा, मोठा भाऊ म्हणून आणि नंतर नवरा, बाबा म्हणून आपल्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडणाऱ्या बाबांना आमचं सुख बघून वाटणारं समाधान द्यायचंय...

भावंडांसोबत पुन्हा एकदा तितक्याच निरागसतेने गप्पा मारायच्यात... बहाव्याच्या का कसल्या काळपट चिक्कट शेंगा ठेचून त्यांचे बॉल बनवून ते आईच्या नकळत लपवून ठेवून, मग ते एकमेकांवर मारून बघायचेत... रंगपंचमीच्या दिवशी ओळखण्याच्या पलीकडे गेलेले चेहरे घेऊन घरी यायचंय, आई कडून नारळाची सोडणं रॉकेलमध्ये बुडवून खसाखसा घासून तो रंग काढून घ्यायचाय, दुसऱ्या दिवशी हुळहुळत्या चेहऱ्याचा उरलेला रंग वर्ग मित्र-मैत्रिणींना दाखवायचाय... रात्री आठ वाजताच जेऊन आई-बाबांसोबत हिरवळीवर फिरायला जायचंय... त्यांच्या गप्पा रंगलेल्या असताना हिरवळीवर लोळत पुन्हा एकदा आभाळभर विखुरलेल्या चांदण्यांमध्ये हरवून जायचंय...

कुठल्याही वळणावर निवांतपण न लाभलेल्या नवऱ्यासोबत काही मोजके क्षण नाही, तर उरलेलं सर्व आयुष्य निवांत जगायचंय...

हे सगळं होईल... नक्की होईल... प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, सुरू राहतील.. आजवरच्या प्रवासात जडण-घडण होत राहिलीय, यापुढेही होत राहील... शुभेच्छा असू द्यात...

-------------------------------------------------------------------------

जडण-घडण च्या 25 व्या भागाच्या प्रतिसाद देताना बहुगुणी यांनी म्हटलं होतं...
एकंदरीत प्रवास वाचून या टप्प्यावर काहीसं असं वाटलं असेल ना?
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुम्किन, उसे इक खूबसूरत मोड देकर, छोडना अच्छा!
चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो...

खरं तर या प्रवासात अनेकदा अनेक ओळी मनात उमटल्या. पण का कुणास ठाऊक, त्यांचा लिखाणात समावेश करावा, असं नाही वाटलं.. अशाच आवडलेल्या ओळी इथे देतेय.. संदर्भ नाही देत... आपल्या आवडीनुसार तो लागत जावा...
अभी अभी कुछ गुजरा है, लापरवाह, धूल में दौडता हुआ... जरा पलट कर देखू तो, बचपन था शायद.. ------------------------------------------------------------------
बचपन में जब चाहा हंस लेते थे, जब चाहा रो सकते थे.. अब मुस्कान को तमीज चाहिए, अश्कों को तनहाई...
------------------------------------------------------------
कुछ लोगों को लगता है उनकी चालाकिया मुझे समझ नही आती और मै बडी खामोशी से देखती हूं उनको अपनी नजरों से गिरते हुए
----------------------------------------------------------------------------------
किसी ने धूल क्या झोंकी आँखो में पहले से बेहतर दिखने लगा...
----------------------------------------------------------------------------------
अशा वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखतात
आपण फक्त चालत असतो
----------------------------------------------------------------------------------
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
----------------------------------------------------------------------------------
उम्र के खेल में एकतर्फा है ये रस्साकशी
एक सिरा मुझको दिया होता तो कुछ बात भी थी
मुझसे तगडा भी है और सामने आता भी नहीं
----------------------------------------------------------------------------------
ना सांगताच तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघात कशाला मग शब्दांचा बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद
----------------------------------------------------------------------------------
मी तुझ्या घराशी खरेच होतो आलो
थबकलो... जरासा - क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडुनी धागे
क्षण वळुन पाहिले... तुझा उंबरा मागे
----------------------------------------------------------------------------------
जिंदगी में ये हुनर भी आजमाना चाहिये.. अपनो से अगर हो जंग तो हार जाना चाहिये
----------------------------------------------------------------------------------
अपुल्या हाती नसते काही हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले, हाती घ्यावे

कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला
पाण्याने जर लळा लाविला, रुजून यावे...
----------------------------------------------------------------------------------

जडण घडण
, , , , , , , , , १० , ११ , १२ , १३ , १४ , १५ , १६ , १७ , १८ , १९ , २० , २१ , २२ , २३ , २४ , २५, 26, 27

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

एक अतिशय सुंदर चाललेली मालिका - संपूच नये असं वाटत होतं.

आता रुखरुख राहील.

अर्थात तुमच्याकडे सांगण्यासारखं अजून खूप आहे आणि वाचणारे असंख्य रसिक इथे आहेत.

त्यामुळे निरोप वगैरे काही घेऊ नका. अजून भरपूर लिहा.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!

नाखु's picture

4 Sep 2015 - 4:19 pm | नाखु

मस्त आहे.

देव तुमच्या प्रत्येक प्रवासात सोबत राहो आणि असेच "या नभाने या भुईला दान द्यावे"

नभ तुमचे यश (वैयक्तीक आणि व्यावसायीक) आणि भुई अर्थात माता-पिता त्यांच्याशी मुळे घट्ट आहेत म्हणून्च इतके तटस्थ आणि तरीही संतुलीत खाजगी लिहू शकला.दान = फक्त निर्वाज्य प्रेम इतकाच अर्थ.

पुढील प्रवासाला शुभेच्छा
घर संसारी नाखु

सोनल परब's picture

4 Sep 2015 - 5:16 pm | सोनल परब

सुंदर लेखमाला वाचण्यास मिळाली. पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा.

खूपच सुंदर मालिका. संपूच नये कधी असं वाटत होतं.

संपूर्ण लेखमालिका येईल तशी वाचत होते.तुमच्या मनस्वी स्वभावाला सलाम.शेवट अतिशय सुरेख.पुलेशु.लिहित रहा.वाचत राहूच!

संदिप एस's picture

4 Sep 2015 - 5:43 pm | संदिप एस

<<खूपच सुंदर मालिका. संपूच नये कधी असं वाटत होतं.>>+१००

संदिप एस's picture

4 Sep 2015 - 5:44 pm | संदिप एस

खूपच सुंदर मालिका. संपूच नये कधी असं वाटत होतं.>> अनुमोदन +१००

बहुगुणी's picture

4 Sep 2015 - 6:48 pm | बहुगुणी

... ते माहेरपण द्यायचंय आईला... क्या बात है! वाचतांना घशात आवंढा अडकला...

एक अप्रतिम मन-उधळण या टप्प्यावर येऊन थबकली असेल, पण all good things must end? मी तर म्हणेन all good things must extend!

तुमच्या प्रदीर्घ तरीही सहज-सुंदर, मनमोकळ्या मुक्तकाने किती मनांमध्ये पालवी फुलवली आहे याचा तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण त्या सर्व वाचकांच्या सदिच्छा तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्ती होईपर्यंत साथ देतील.

तुमच्या लिखाणाबद्दल तुमचे आणि तुम्हाला उद्युक्त करणाऱ्या तुमच्या पतिराजांचेही मनापासून आभार!

एस's picture

5 Sep 2015 - 11:50 am | एस

बहुगुणी यांच्या प्रतिसादातील प्रत्येक शब्दाशी सहमत.

या लेखमालिकेतून प्रत्यक्ष लेखिकेला काय मिळाले यापेक्षा आमच्यासारख्या वाचकांना काय मिळाले हे खरेच रोचक आहे. कुणीतरी असे स्वतःचे आयुष्य फार जवळच्या मित्रांपुढे व्यक्त करावे तसे आणि त्याच सहजपणे, इथे लिहित आहे आणि प्रत्यक्ष तुमच्याशी कुठली ओळख नसूनही त्याच अधीरतेने, अंतःकरणापासून प्रत्येक भाग आपण वाचतोय, पुढील भागाची वाट पाहतोय हे आंतरजालावर दुर्मिळच.

कित्येकदा स्वतःशीच वाचक या लेखांतील अनुभवांचा ताळा मांडू पाहतो, कधी व्यथित होतो तर कधी अचंबित. कित्येकांना त्यातून प्रेरणाही मिळाली असणार. ही लेखमाला वाचताना तुमच्याबरोबर रमतगमत फेरफटका मारत चालतो आहोत, तुम्ही सांगताय आणि आम्ही ऐकतोय असं वाटलं.

जगातील कुठलीच पाऊलवाट अनंत नाही, ह्याही मालिकेचा शेवट तर होणारच होता. पण आता थोडी चुटपुट नक्कीच लागून राहील इतपत या मालिकेची सवय झाली होती.

अजून लिहा असा आग्रह करणार नाही कारण फार अप्रतिम वळणावर आणून या मालिकेने वाचकांचे बोट सोडलेय. पण तुम्ही लिहीत मात्र रहाच. तुमच्याकडे वैविध्यपूर्ण अनुभवांची शिदोरी आहे, संवेदनशील मन आहे आणि जगण्याकडे बघण्याची तटस्थ वृत्तीही आहे. हे सगळे लेखणीतून उतरू द्या.

पुढील लेखनास शुभेच्छा!

उमा @ मिपा's picture

9 Sep 2015 - 10:35 am | उमा @ मिपा

पूर्णपणे सहमत!
संपूर्ण मालिका अतिशय सुंदर, हा भाग अगदी असाच यायला हवा होता.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा आणि आम्हा वाचकांना तुमचं अजून लिखाण वाचायला मिळावं हीदेखील.

अभ्या..'s picture

5 Sep 2015 - 12:24 am | अभ्या..

सुरेख अन प्रांजळ निवेदन.
खूप आवडली लेखमाला.

असंका's picture

5 Sep 2015 - 9:18 am | असंका

चांगलं लिहित होतात.

धन्यवाद या सिरीजबद्दल..

मुक्त विहारि's picture

5 Sep 2015 - 10:48 am | मुक्त विहारि

पुढील लेखांच्या अपेक्षेत.

नीलमोहर's picture

5 Sep 2015 - 11:29 am | नीलमोहर

आयुष्यात अशीच वेगवेगळी वळणे येत राहतात.
एवढयात निरोप घेऊ नका, जमेल तसं लिहीत रहा.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

खुप छान लेखन्शैली आहे तुमची. सुरेख झाली ही लेखमाला. पुढच्या वाटचाली साठी मनःपुर्वक शुभेछ्छा. लेखमाला थाम्बली तरी लेखन थाम्बवु नका ही विनन्ती.

रातराणी's picture

5 Sep 2015 - 1:09 pm | रातराणी

खूप सुंदर मालिका बंद होणार याच वाईट वाटतंय. लिहीत रहा.:)

बाबा योगिराज's picture

5 Sep 2015 - 5:45 pm | बाबा योगिराज

छान हिलिता तुम्ही. लेखन माला जरी संपली तरी तुमच लिखान चालुच राहू द्या.
पुढिल लेखनमाले साठी शुभ्भेच्छा......

पैसा's picture

6 Sep 2015 - 8:36 pm | पैसा

सगळी मालिका सुंदर झाली. ओघवते प्रांजळ लिखाण. मनापासून आलेले. मालिका कधी तरी संपणारच. पण प्रवास चालु राहतो. लिहीत रहा!

समीरसूर's picture

8 Sep 2015 - 11:49 am | समीरसूर

अतिशय सुंदर मालिका. आपले लिखाण प्रामाणिक आणि उत्कंठावर्धक आहे. आणि त्याचबरोबर ते थेट हृदयाला भिडणारेदेखील आहे. आपल्या लिखाणात एक आश्वस्त करणारा साधेपणा आणि ठामपणा आहे.

आपण अजून अशा मालिका लिहाव्यात ही विनंती. आणि आपण नक्कीच पुस्तक लिहावे; हे लिखाण एखाद्या पुस्तकासाठी पुरेसे आहे.

इतक्या मनोरम लेखमालेला आजच्या मिपावर मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता मिपाची दिशा चुकतेय का असा प्रश्न पडतोय. विडंबन, काहीतरी स्फोटक लिखाण, वादविवाद, इत्यादी लेखनप्रकारांच्या धाग्यांवर अगदी शेकडो प्रतिसाद असतात आणि काही खरोखर सुंदर कथांवर, लेखांवर अगदीच मोजके प्रतिसाद असतात. हे अनाकलनीय आहे. कित्येक चर्चांवर निष्फळ वाद होतांना प्रतिसादांचा महापूर वाहतो. बहुतांश वेळा ते चर्चेचे मुद्देदेखील बिनमहत्वाचे असतात आणि त्यावर चिकित्सक कीस पाडून खिल्ली उडवणारे किंवा हमरीतुमरीवर येणारे प्रतिसाददेखील बिनबुडाचे असतात. असो.

(आता मला किती शिव्या? ओळखा आणि जिंका इंद्राणी मुखर्जीने कधीकाळी घातलेले goggles ;-))

जेव्हा झाल तेव्हा मनाला चुट्पुट लागून राहीली आहे, की आता अजून नाही वाचायला मिळणार! अतिशय प्रांजळ, प्रामाणीक लेखन. बर्याच वेळा आपण लेखकाचे मनोगत वाचत नसून स्वतःशीच संवाद करत आहोत असे वाटत असे.
ही लेखमाला जरी संपली असली तरी आपले लिखाण चालूच ठेवा असा प्रेमळ आग्रह...

समीरसूर's picture

8 Sep 2015 - 1:40 pm | समीरसूर

या लेखातील ज्या उर्दू-मराठी काव्यपंक्ती आहेत, त्या आपण रचल्या आहेत काय? अतिशय सुंदर आहेत. अगदी आत जाऊन भिडणाऱ्या.

बहुगुणी's picture

8 Sep 2015 - 7:11 pm | बहुगुणी

समीरसूर, तुम्ही या खालील पंक्तिंविषयी म्हणत असाल तर मला वाटतं त्या गुलझार यांच्या त्रिवेणी संग्रहातील आहेत, अर्थात्, इथे त्या अचूक संदर्भात आलेल्या आहेत त्याची दाद द्यायलाच हवी!

उम्र के खेल में एकतर्फा है ये रस्साकशी
एक सिरा मुझको दिया होता तो कुछ बात भी थी
मुझसे तगडा भी है और सामने आता भी नहीं

नि३सोलपुरकर's picture

8 Sep 2015 - 5:19 pm | नि३सोलपुरकर

खरोखर तुमच्या मनस्वी स्वभावाला सलाम,सुंदर लेखमाला वाचण्यास मिळाली.
अतिशय सुंदर.

पुढच्या वाटचाली साठी मनःपुर्वक शुभेछ्छा.
लिहित रहा.

अभिजीत अवलिया's picture

10 Sep 2015 - 9:01 am | अभिजीत अवलिया

लेखमाला संपली असली तरी मिपावर लिहिणे बंद करू नका. तुमचे जडण घडणचे लेखन खूप आवडले आणी मुख्य म्हणजे त्यातून बरेच काही सकारात्मक शिकता देखील आले. त्यामुळे लिखाण चालू राहू दे.

माधुरी विनायक's picture

10 Sep 2015 - 12:37 pm | माधुरी विनायक

खेडूत यांस - मालिका आवडल्याचे आवर्जून कळवलेत. धन्यवाद. यापुढेही लिहित राहण्याचा प्रयत्न राहील...

नाद खुळा यांस - खरं आहे. संस्कार करायचे म्हणून होत नाहीत. आपल्या भवतालच्या माणसांचं जगणं वागणं बघतानाच ते आपसूक होत राहतात. आई-वडीलांचं ऋण कायम राहील. शुभेच्छांचं शब्दांकन सुरेख. मनापासून दिलेल्या शुभेच्छा पोहोचल्या.

सोनल परब यांस - आवर्जून कळवलेत. धन्यवाद.

शलभ यांस - मनापासून आभार...

अजया यांस - लिहित राहण्याचा नक्की प्रयत्न राहील. धन्यवाद...

संदिप यांस - मालिका आवडल्याचे आवर्जून कळवलेत, धन्यवाद...

बहुगुणी यांस - सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. जडण घडणीच्या या प्रवासात वाचकांनाही काही सापडत गेलं असल्यास आनंद आहे. समजून उमजून केलेल्या वाचनानंतरचा तुमचा प्रतिसाद मनापासून आवडला.

स्वॅप्स यांस - लेखन सुरू ठेवण्यासाठी आवर्जून प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये आपणही होता. या लेखनातून व्यक्त होताना मला खरंच खूप काही सापडत गेलं. मनातल्या भावना शब्द होऊन कागदावर उतरल्या की त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. तो प्रवास, ते शब्द उमटविणाऱ्या व्यक्तीला समृद्ध करतो तितकाच त्रासदायकही ठरू शकतो. माझ्या मनातून उमटलेल्या शब्दांचा प्रवास त्रासदायक ठरला नाही. किंबहुना आनंददायीच ठरला, ते सूज्ञ वाचकांमुळे.

उमा @मिपा यांस - या प्रतिसादाबद्दलही धन्यवाद. लिहित राहण्याचा प्रयत्न राहील...

अभ्या यांस - धन्यवाद.

कंफ्युज्ड अकौंटंट यांस - मनापासून आभार...

मुक्त विहारि यांस - जडण घडणीच्या या प्रवासाला आपल्या प्रतिसादांनीही पुढे नेलं. धन्यवाद...

नीलमोहर यांस - प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद...

कालिंदी यांस - धन्यवाद कालिंदी... लेखन सुरू ठेवण्याचा प्रयत्न नक्की राहील.

रातराणी यांस - वेळोवेळी प्रतिसाद देणाऱ्यांमध्ये आपणही होता. या प्रवासात दिलेल्या सोबतीसाठी धन्यवाद...

बाबा योगिराज यांस - शुभेच्छांबद्दल आभार. लिहित राहण्याचा नक्की प्रयत्न राहील.

पैसा यांस - जडण-घडणीच्या मिपा वरील प्रवासात आपल्या शुभेच्छांची साथही मोलाची. धन्यवाद...

समीरसूर यांस - धन्यवाद समीरसूर. आपण वेळोवेळी दिलेले प्रतिसादही पुढचे भाग लिहिण्यासाठी प्रोत्साहन देत राहिले.
या भागात नमूद केलेल्या ओळी स्वरचित नाहीत. कानावर पडलेल्या, नजरेखालून गेलेल्या आणि मनात रेंगाळलेल्या या ओळी. बहुगुणी यांनी गुलजार यांचा दिलेला संदर्भ अचूक. इतर हिंदी-उर्दू ओळींचे रचनाकार माझ्यासाठीही अज्ञात आहेत. मराठी ओळी बहुतेक करून सुधीर मोघे यांच्या आणि शेवटच्या ओळी अर्थात पाडगावकरांच्या...

gogglya यांस - प्रतिसादाबद्दल आभार आणि प्रेमळ आग्रह मान्य. हे सारं लिहिताना माझाही स्वत:बरोबर आणि प्रतिसादांमुळे वाचकांबरोबर संवाद सुरूच होता... तो अव्यक्त राहिला, इतकंच...

नि3 सोलपुरकर यांस - प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद...

अभिजीत अवलिया यांस - लेखन आवडल्याचे कळवलेत. मनापासून आभार. पुढेही लिहित राहीन...

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे मनापासून आभार. मालिकेच्या काही भागांमध्ये निवेदन प्रांजळ असल्याचं नियमित वाचकांनी आवर्जून सांगितलं. एक साधा नियम जगण्यातला. माझा मी मलाच घालून घेतलेला. दिवसअखेर आरशात स्वत:च्या नजरेला नजर भिडवता यायला हवी... आपण स्वत:ला नाही ना फसवू शकत... एवढी काळजी घेतली की इतर कोणालाही कसलंही स्पष्टीकरण द्यावं लागत नाही, कोणतंही अपराधीपण मनात घर करत नाही. आपण वेळोवेळी मन:पूर्वक दिलेल्या प्रतिसादांबद्दल आभार...

अत्यंत प्रांजळ आणि मनस्वी कथन.
सर्व भाग पुन्हा एकदा सलग वाचणार आहे.
वाटचाल थांबवू नका..

खटपट्या's picture

10 Sep 2015 - 2:30 pm | खटपट्या

+१

हेमंत लाटकर's picture

10 Sep 2015 - 2:48 pm | हेमंत लाटकर

अभिनॆदन. छान लेखमाला. एका सिटींग मध्ये 28 भाग वाचून काढले. रविवारचा वेळ छान गेला. अजुन लिहते रहा.

अंतरा आनंद's picture

10 Sep 2015 - 4:33 pm | अंतरा आनंद

शेवटी क्रमशः असलेले लिखाण मी वाचायचे राखून ठेवते आणि त्या लेख्मालिकेची समाप्ती झाली की वाचते त्याच प्रमाणे आज सगळे भाग वाचून काढले. खूप छान लेखमाला. त्या त्या वेळी वाचायला हवे होते म्हणजे वेळेवर प्रतिसाद देता आले असते असे वाटून गेले. स्वतःचा प्रवास असा सुटा सुटा मांडणे कठीण असते . तो तुम्ही मांडलाय तोही साध्या पण आकर्षक शैलीत.

लेखमालेचा शेवट आहे हे ठिक पण येत रहा, लिहीत रहा.

अनन्त अवधुत's picture

13 Sep 2015 - 5:32 am | अनन्त अवधुत

इतक्यात संपू नये असे वाटत होते.
लिहित राहा , वाचत राहू.

ही सगळी लेखमालिका मी वाचलीये. फार प्रांजळ आणि सुरेख असे कथन होते. योग्य असाच समारोप आपण केलात.
आता नवीन काय लिहिणार? वाट बघते.

सविता००१'s picture

14 Sep 2015 - 1:38 pm | सविता००१

फारच छान आहे हो ही लेखमाला. परत सवडीने वाचणार आहे.
पण तुम्ही लिहा हो.शुभेच्छा तुम्हाला

बॅटमॅन's picture

14 Sep 2015 - 3:41 pm | बॅटमॅन

सगळी नसली तरी बर्‍यापैकी वाचलीय लेखमाला. आवडली, प्रांजळपणा विशेषकरून आवडला.

तुमच्या सर्व वांछित गोष्टी मिळोत / होवोत अशी शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो, बहुत काय लिहिणे.

माधुरी विनायक's picture

18 Sep 2015 - 12:13 pm | माधुरी विनायक

स्नेहांकिता यांस - प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वाटचाल सुरू राखण्याचा प्रयत्न राहील.
खटपट्या यांस - धन्यवाद.
हेमंत लाटकर यांस - धन्यवाद हेमंतजी.
अंतरा आनंद यांस - प्रतिसादाबद्दल आभार. लिहित राहण्याचा प्रयत्न राहील.
अनन्त अवधूत यांस - आपल्या प्रतिसादाबद्दलही मन:पूर्वक आभार.
यशोधरा यांस - मनापासून धन्यवाद. नवं काही लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.
सविता 001 - प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक आभार.
बॅटमॅन यांस - प्रतिसाद आणि शुभेच्छा पोहोचल्या. धन्यवाद.

माधुरी विनायक's picture

18 Sep 2015 - 12:13 pm | माधुरी विनायक

स्नेहांकिता यांस - प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वाटचाल सुरू राखण्याचा प्रयत्न राहील.
खटपट्या यांस - धन्यवाद.
हेमंत लाटकर यांस - धन्यवाद हेमंतजी.
अंतरा आनंद यांस - प्रतिसादाबद्दल आभार. लिहित राहण्याचा प्रयत्न राहील.
अनन्त अवधूत यांस - आपल्या प्रतिसादाबद्दलही मन:पूर्वक आभार.
यशोधरा यांस - मनापासून धन्यवाद. नवं काही लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.
सविता 001 - प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक आभार.
बॅटमॅन यांस - प्रतिसाद आणि शुभेच्छा पोहोचल्या. धन्यवाद.

इशा१२३'s picture

19 Sep 2015 - 11:44 pm | इशा१२३

फार सुरेख झाली लेखमाला.लेखनशैली ,त्यातील साधेपणा खुप भावला.लिहीत रहा.

सखी's picture

16 Jun 2016 - 10:13 am | सखी

सुरेख आणि प्रांजळ लेखमाला. शेवटचे 5-6 भाग वाचायचे राहीले होते. लिहीत रहा, वाचत राहूच.

पुन्हा एकदा वाचला हा भाग! प्रतिक्रिया वर दिलेली आहेच पण पुन्हा देण्याचा मोह आवरत नाहीये. सुंदर! कुठलाही अभिनिवेश नसलेलं निर्मळ आणि उत्कट लिखाण. थेट भिडणारं.

बऱ्याच दिवसात दिसला नाहीत मिपावर माधुरीजी....या आणि काहीतरी मस्त लिहा पुन्हा....